रोमकर यांना पत्र
१ मी ख्रिस्त येशूचा दास, पौल तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. मला प्रेषित होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे आणि देवाच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलं आहे.+ २ या आनंदाच्या संदेशाबद्दल देवाने पवित्र शास्त्रवचनांत पूर्वीच आपल्या संदेष्ट्यांद्वारे वचन दिलं होतं. ३ हा संदेश म्हणजे त्याच्या मुलाबद्दलचा आनंदाचा संदेश आहे. तो शरीराने एक मानव म्हणून दावीदच्या वंशातून* जन्माला आला.+ ४ पण मेलेल्यांतून पुन्हा उठवण्यात आल्यामुळे*+ देवाच्या पवित्र शक्तीच्या* सामर्थ्याने तो देवाचा मुलगा+ ठरला. हा मुलगा म्हणजेच येशू ख्रिस्त, आपला प्रभू. ५ त्याच्याचद्वारे आम्हाला देवाची अपार कृपा आणि प्रेषित म्हणून एक कामगिरी मिळाली आहे.+ हे यासाठी झालं की सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांनी विश्वास ठेवण्याद्वारे आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याद्वारे+ त्याच्या नावाचा गौरव करावा. ६ याच राष्ट्रांतून तुम्हालाही येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. ७ पवित्र जन होण्यासाठी बोलावण्यात आलेल्या रोम शहरातल्या देवाच्या सगळ्या प्रियजनांना:
देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना अपार कृपा आणि शांती मिळो.
८ सगळ्यात आधी तर, मी तुम्हा सर्वांबद्दल येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या देवाचे आभार मानतो. कारण संपूर्ण जगात तुमच्या विश्वासाबद्दल चर्चा होत आहे. ९ ज्याच्या मुलाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करण्याद्वारे मी अगदी मनापासून त्याची पवित्र सेवा करत आहे, तो देव स्वतः माझ्या वतीने ही साक्ष देऊ शकतो, की मी सतत माझ्या प्रार्थनांमध्ये तुमचा उल्लेख करतो.+ १० आणि अशी विनंती करतो की शक्य झालं, तर देवाच्या इच्छेने आता तरी मला तुमच्याकडे यायला मिळावं. ११ कारण तुम्हाला भेटायची माझी फार इच्छा आहे. म्हणजे, तुम्हाला देवाकडून असलेली एखादी देणगी देऊन मला तुमचा विश्वास मजबूत करता येईल. १२ किंवा एकमेकांच्या विश्वासामुळे, म्हणजेच माझ्या आणि तुमच्या विश्वासामुळे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता येईल.+
१३ बांधवांनो, इतर राष्ट्रांप्रमाणेच तुमच्यामध्येही मला प्रचारकार्यात चांगलं फळ मिळावं, म्हणून मी कित्येकदा तुमच्याकडे यायचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत माझ्या मार्गात नेहमी अडथळे आले. याबद्दल तुम्ही अंधारात असावं अशी माझी इच्छा नाही. १४ मी ग्रीक लोकांचा आणि विदेश्यांचा,* तसंच ज्ञानी आणि अज्ञानी लोकांचाही कर्जदार आहे. १५ म्हणूनच, रोममध्ये असणाऱ्या तुम्हालाही आनंदाचा संदेश घोषित करायला मी उत्सुक आहे.+ १६ कारण मला या आनंदाच्या संदेशाची लाज वाटत नाही.+ खरंतर त्यामुळेच विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना,+ म्हणजे आधी यहुद्यांना+ आणि त्यांसोबत ग्रीक लोकांनाही देवाच्या सामर्थ्याने तारण मिळतं.+ १७ कारण या आनंदाच्या संदेशातून देवाचं नीतिमत्त्व विश्वासाद्वारे आणि विश्वासासाठी प्रकट होतं.+ जसं की शास्त्रातही लिहिलं आहे, “नीतिमान त्याच्या विश्वासामुळे जगेल.”+
१८ कारण अनीतिमान मार्गाने सत्य दाबून टाकणाऱ्या+ माणसांच्या सगळ्या अधार्मिकतेविरुद्ध आणि अनीतीविरुद्ध देवाचा क्रोध+ स्वर्गातून प्रकट होत आहे. १९ कारण देवाबद्दल जे जाणून घेण्यासारखं आहे, ते त्यांच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येतं. आणि देवानेच ते त्यांना दाखवून दिलं आहे.+ २० जगाच्या निर्मितीपासूनच देवाचे अदृश्य गुण, म्हणजे त्याचं सर्वकाळाचं सामर्थ्य+ आणि देवपण*+ हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं.+ आणि यामुळे खरंतर देवावर विश्वास न ठेवण्यासाठी ते कोणतंही निमित्त सांगू शकत नाहीत. २१ कारण देवाबद्दल माहीत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे उपकार मानले नाहीत. तर ते मूर्खांसारखे विचार करत राहिले आणि त्यांच्या अविचारी मनांची समजशक्ती पूर्णपणे नाहीशी झाली.+ २२ ते स्वतःला ज्ञानी म्हणवत असले, तरी ते मूर्ख ठरले. २३ आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाला नाश होणाऱ्या माणसांचं, पक्ष्यांचं, चार पायांच्या प्राण्यांचं आणि सरपटणाऱ्या जिवांचं रूप दिलं.+
२४ म्हणूनच, देवाने त्यांच्या मनाच्या वासनांप्रमाणे, त्यांना त्यांच्या शरीराचा अनादर करण्यासाठी अशुद्धपणाच्या स्वाधीन केलं. २५ त्यांनी देवाच्या सत्याऐवजी असत्याला पसंत केलं आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्माण केलेल्या गोष्टींची उपासना* आणि सेवा केली. त्या निर्माणकर्त्याचा सर्वकाळ गौरव होवो. आमेन. २६ देवाने याच कारणामुळे त्यांना त्यांच्या घृणास्पद लैंगिक वासनेच्या अधीन केलं.+ कारण त्यांच्यातल्या स्त्रियांनी नैसर्गिक नियमांच्या विरोधात जाऊन आपल्या शरीराचा वापर केला.+ २७ तसंच, पुरुषांनीही स्त्रीचा नैसर्गिक उपभोग सोडून दिला.* ते एकमेकांसाठी वासनेने पेटले आणि पुरुषांनी पुरुषांसोबत अश्लील कामं केली.+ त्यांच्या या वाईट वागणुकीची योग्य शिक्षा त्यांना भोगावी लागली.*+
२८ ज्या प्रकारे, देवाला मान्य करणं त्यांना योग्य वाटलं नाही,* त्याच प्रकारे देवानेही त्यांना चुकीची कामं करण्यासाठी त्यांच्या घृणास्पद विचारसरणीच्या स्वाधीन केलं.+ २९ ते सर्व प्रकारची अनीती,+ दुष्टपणा, लोभ,*+ वाईटपणा, मत्सर,+ खून,+ भांडणतंटे, फसवेगिरी+ आणि द्वेष+ यांनी भरलेले, इतरांविरुद्ध कुजबुज करणारे, ३० लोकांच्या पाठीमागे त्यांची निंदा करणारे,+ देवाचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ, बढाई मारणारे, कटकारस्थानं करणारे,* आईवडिलांच्या आज्ञा मोडणारे,+ ३१ अविचारी,+ दिलेलं वचन न पाळणारे, माया-ममता नसलेले आणि क्रूर असे होते. ३२ अशा प्रकारे वागणारे मृत्युदंडाला पात्र आहेत.+ देवाचा हा न्याय्य निर्णय माहीत असूनही ते अशी कामं करतच राहतात. शिवाय, इतर जण ती कामं करतात, तेव्हा त्यांनाही ते पसंती देतात.