अभ्यास लेख २५
गीत ९६ देवाचं अनमोल वचन
याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग २
“त्याने त्यांच्यापैकी प्रत्येकाला योग्य असा आशीर्वाद दिला.”—उत्प. ४९:२८.
या लेखात:
याकोबने आपल्या आठ मुलांबद्दल जी भविष्यवाणी केली त्यातून आपण काय शिकू शकतो ते पाहा.
१. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
याकोब जेव्हा त्याच्या मुलांना आशीर्वाद देत होता, तेव्हा त्याची सगळी मुलं त्याच्या आजूबाजूला जमून त्याचं लक्ष देऊन ऐकत होती. आपण मागच्या लेखात पाहिलं की याकोबने रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यांची त्याने कधीच अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे आता त्यांना कदाचित अशी उत्सुकता लागली असेल, की याकोब बाकीच्या मुलांबद्दल काय बोलेल. तर चला याकोबने जबूलून, इस्साखार, दान, गाद, आशेर, नफताली, योसेफ आणि बन्यामीन यांना काय सांगितलं ते पाहू या.a आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल हेसुद्धा आपण पाहू या.
जबुलून
२. जबुलूनबद्दल याकोबने कोणती भविष्यवाणी केली आणि ती कशी पूर्ण झाली? (उत्पत्ती ४९:१३) (चौकटसुद्धा पाहा.)
२ उत्पत्ती ४९:१३ वाचा. याकोबने म्हटलं की जबुलूनचे वंशज समुद्रकिनाऱ्याजवळ राहतील. हे क्षेत्र वचन दिलेल्या देशाच्या उत्तरेकडे होतं. याच्या जवळपास २०० वर्षांनंतर जबुलूनच्या वंशजांना त्यांचा वारसा मिळाला. त्यांचं क्षेत्र गालील समुद्राच्या आणि भूमध्य समुद्राच्या मधे होतं. पुढे, मोशेनेसुद्धा अशी भविष्यवाणी केली: “हे जबुलून, तुझ्या कारभारात आनंद कर.” (अनु. ३३:१८) जबुलूनचे वंशज दोन समुद्रांच्यामध्ये राहत असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर कारभार किंवा व्यवसाय करू शकत होते. म्हणून कदाचित मोशे असं बोलला असावा. मुद्दा कोणताही असो, जबुलूनच्या वंशजांकडे आनंदी राहण्याचं कारण होतं.
३. समाधानी राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
३ आपण काय शिकतो? आपण कुठेही राहत असलो किंवा आपली परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे काही ना काही कारण नक्कीच असतं. पण त्यासाठी आपण आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. (स्तो. १६:६; २४:५) कधीकधी आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करतो. पण त्याऐवजी आपण आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणून आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा विचार करा आणि जीवनात आनंदी राहा.—गलती. ६:४.
इस्साखार
४. इस्साखारबद्दल कोणती भविष्यवाणी करण्यात आली आणि ती कशी पूर्ण झाली? (उत्पत्ती ४९:१४, १५) (चौकटसुद्धा पाहा.)
४ उत्पत्ती ४९:१४, १५ वाचा. इस्साखार मेहनती असल्यामुळे याकोबने त्याची स्तुती केली. त्याने त्याची तुलना ‘दणकट गाढवाशी’ केली. गाढव हा असा प्राणी आहे जो जड ओझी वाहू शकतो. याकोबने असंसुद्धा म्हटलं, की इस्साखारला चांगली जमीन मिळेल. याकोबने सांगितल्याप्रमाणे इस्साखारच्या वंशजांना यारदेन नदीच्या जवळपासची जमीन वारसा म्हणून मिळाली. ही जमीन सुपीक आणि उपजाऊ होती. (यहो. १९:२२) इस्साखारच्या वंशजांनी या जमिनीची मशागत करण्यासाठी नक्कीच मेहनत घेतली असेल. पण त्यासोबतच त्यांनी इतरांना मदत करण्यासाठीसुद्धा मेहनत घेतली. (१ राजे ४:७, १७) उदाहरणार्थ, जेव्हा-जेव्हा इस्राएल राष्ट्राला युद्ध लढावी लागायची तेव्हा इतर वंशांसोबत इस्साखारचे वंशजसुद्धा त्यात भाग घ्यायचे. जेव्हा बाराक आणि दबोराने सीसरासोबत लढण्यासाठी इस्राएल राष्ट्राला बोलवलं, तेव्हासुद्धा इस्साखारच्या वंशजांनी इतर वंशांसोबत त्यात भाग घेतला.—शास्ते ५:१५.
५. आपण सगळ्यांनी मेहनती का असलं पाहिजे?
५ आपण काय शिकतो? यहोवाला जशी इस्साखारच्या वंशजांच्या मेहनतीची कदर होती, तशीच कदर आपण त्याच्या सेवेत घेत असलेल्या मेहनतीबद्दलही त्याला आहे. (उप. २:२४) उदाहरणार्थ, मंडळीचा सांभाळ करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या भावांचा विचार करा. (१ तीम. ३:१) या भावांना आज खरोखरची युद्धं लढावी लागत नाही. पण देवाच्या लोकांना आध्यात्मिक धोक्यांपासून वाचवण्यासठी त्यांना झटावं लागतं. (१ करिंथ. ५:१, ५; यहू. १७-२३) त्यासोबतच, मंडळीचा विश्वास मजबूत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारी भाषणं तयार करायला आणि ती सादर करायलासुद्धा मेहनत घ्यावी लागते.—१ तीम. ५:१७.
दान
६. दानच्या वंशजांना कोणती जबाबदारी मिळाली? (उत्पत्ती ४९:१७, १८) (चौकटसुद्धा पाहा.)
६ उत्पत्ती ४९:१७, १८ वाचा. याकोब दानची तुलना सापाशी करतो. साप आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यांवर, जसं की घोड्यांवरसुद्धा हल्ला करायला तयार असतो. इतकंच काय, तर तो घोड्याच्या स्वारावरसुद्धा हल्ला करू शकतो. आणि नेमकं असंच झालं. दानचे वंशज खूप शूर आणि धाडसी होते. ते इस्राएलच्या शत्रूंशी लढायला नेहमी तयार असायचे. वचन दिलेल्या देशाकडे जाताना दानच्या वंशजांनी “सर्व छावण्यांचं मागून रक्षण” केलं. (गण. १०:२५) दानचे वंशज जे करत होते ते जरी बाकीच्या वंशजांना दिसत नसलं, तरी ते पार पाडत असलेली जबाबदारी खूप महत्त्वाची होती.
७. यहोवाच्या सेवेत कोणतंही काम करताना आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
७ आपण काय शिकतो? तुम्ही असं एखादं काम केलंय का जे दुसऱ्यांच्या नजरेत आलेलं नाही? कदाचित तुम्ही राज्य सभागृहाच्या साफसफाईत किंवा त्याची देखरेख करण्यासाठी मदत केली असेल, किंवा एखाद्या संमेलनात किंवा अधिवेशनात जाऊन काम केलं असेल, किंवा दुसरं एखादं काम केलं असेल. असं असेल तर ही नक्कीच प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाच्या सेवेत तुम्ही जे काही करता ते तो पाहतो आणि त्याला त्याची कदर आहे. तुम्ही इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी नाही तर यहोवाच्या प्रेमापोटी त्याची सेवा करता तेव्हा त्याला त्याची जास्त कदर वाटते.—मत्त. ६:१-४.
गाद
८. वचन दिलेल्या देशात गादच्या वंशजांवर सहज हल्ले का होऊ शकत होते? (उत्पत्ती ४९:१९) (चौकटसुद्धा पाहा.)
८ उत्पत्ती ४९:१९ वाचा. याकोबने गादबद्दल अशी भविष्यवाणी केली की लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल. याच्या जवळपास २०० वर्षांनंतर गादचे वंशज यारदेनच्या पूर्वेकडे असलेल्या भागात राहू लागले. या भागाच्या सीमेवर शत्रू राष्ट्रं होती. त्यामुळे या वंशाच्या लोकांवर सहज हल्ले होऊ शकत होते. पण तरीसुद्धा गादच्या वंशजांनी तिथे राहायचा निर्णय घेतला, कारण तिथे त्यांच्या गुराढोरांसाठी बरीचशी कुरणं होती. (गण. ३२:१, ५) गादचे वंशज धाडसी होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, त्यांचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. त्यांना भरवसा होता की त्यांच्या जमिनीचं लुटारूंच्या टोळीपासून संरक्षण करण्यासाठी तो त्यांना नक्की मदत करेल. इतकंच काय तर, यारदेनच्या पश्चिमेकडे असलेला वचन दिलेल्या देशाचा उरलेला भाग काबीज करण्यासाठी ते बऱ्याच वर्षांपर्यंत इतर वंशांच्या लोकांसोबत आपलं सैन्य पाठवत राहिले. (गण. ३२:१६-१९) त्यांना पूर्ण भरवसा होता की ते जेव्हा युद्धावर असतील तेव्हा यहोवा त्यांच्या बायका-मुलांचं संरक्षण करेल. त्यांच्या धैर्याबद्दल आणि आत्मत्यागी वृत्तीबद्दल यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला.—यहो. २२:१-४.
९. आपला जर यहोवावर पूर्ण भरवसा असला तर आपण कोणते निर्णय घेऊ?
९ आपण काय शिकतो? कठीण परिस्थितीतही यहोवाची सेवा करण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. (स्तो. ३७:३) आज बरेच भाऊबहीण बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी, गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी आणि इतर नेमणुका पार पाडण्यासाठी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवतात. यहोवा नेहमी त्यांची काळजी घेईल याची खातरी असल्यामुळे ते असं करतात.—स्तो. २३:१.
आशेर
१०. आशेरच्या वंशजांनी काय करायला हवं होतं? (उत्पत्ती ४९:२०) (चौकटसुद्धा पाहा.)
१० उत्पत्ती ४९:२० वाचा. याकोबने अशी भविष्यवाणी केली, की आशेरचे वंशज समृद्ध होतील. नेमकं तसंच झालं. आशेरच्या वंशजांना इस्राएलचा सुपीक भाग मिळाला. (अनु. ३३:२४) त्यासोबतच, त्यांच्या भागाच्या सीमेवर भूमध्य समुद्र होता. आणि तिथे सीदोनचं बंदरही होतं. या बंदरावर मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असल्यामुळे ते खूप समृद्ध होतं. पण आशेरच्या वंशजांनी कनानी लोकांना देशातून घालवून दिलं नाही. (शास्ते १:३१, ३२) कनानी लोकांच्या वाईट प्रभावामुळे आणि आशेरच्या श्रीमंतीमुळे शुद्ध उपासनेसाठी त्यांचा आवेश कमी झाला असावा. बाराकने जेव्हा कनानी राजांशी लढण्यासाठी इस्राएली लोकांना बोलावलं तेव्हा आशेरच्या वंशजांनी त्यात भाग घेतला नाही. त्यामुळे “मगिद्दोच्या झऱ्याजवळ” यहोवाने इस्राएली लोकांना मोठा विजय मिळवून दिला, तेव्हा त्या आनंदात त्यांना सामील होता आलं नाही. (शास्ते ५:१९-२१) बाराक आणि दबोराने त्यांच्या विजयाच्या गीतात असं गायलं, की “आशेर समुद्रकिनाऱ्यावर स्वस्थ बसून राहिला.” हे ऐकून आशेरच्या वंशजांना नक्कीच खूप लाज वाटली असेल.—शास्ते ५:१७.
११. आपण पैशांबद्दल योग्य दृष्टिकोन का ठेवला पाहिजे?
११ आपण काय शिकतो? आपल्याला यहोवाला सगळ्यात चांगलं ते द्यायचंय. जगाचा असा दृष्टिकोन आहे की पैसा आणि ऐशआरामाच्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. पण यहोवाला सगळ्यात चांगलं ते देण्यासाठी आपण जगाचा हा चुकीचा दृष्टिकोन नाकारला पाहिजे. (नीति. १८:११) आपण पैशांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. (उप. ७:१२; इब्री १३:५) म्हणून, गरज नसलेल्या गोष्टींसाठी आपण आपला वेळ आणि पैसा खर्च करत नाही. तसंच, या गोष्टींना देवाच्या सेवेच्या आड येऊ देत नाही. उलट यहोवाला सगळ्यात चांगलं ते देण्यासाठी आपण आपला वेळ आणि ताकद खर्च करतो. कारण आपल्याला माहीत आहे की भविष्यात तो आपल्याला एक चांगलं आणि सुरक्षित जीवन देणार आहे.—स्तो. ४:८.
नफताली
१२. नफतालीबद्दल करण्यात आलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (उत्पत्ती ४९:२१) (चौकटसुद्धा पाहा.)
१२ उत्पत्ती ४९:२१ वाचा. याकोबने नफतालीबद्दल म्हटलं की “त्याचे शब्द मधुर आहेत.” येशू पृथ्वीवर असताना जसा बोलला त्याला कदाचित हे सूचित करत असावं. आपण असं का म्हणू शकतो? येशू हा खूप प्रभावी शिक्षक होता आणि तो कफर्णहूम शहरात बराच काळ राहिला. त्याला हे शहर ‘आपलंसं’ वाटत होतं. आणि विशेष म्हणजे हे शहर नफतालीच्या क्षेत्रात येतं. (मत्त. ४:१३; ९:१; योहा. ७:४६) येशूबद्दल यशया संदेष्ट्याने अशीही भविष्यवाणी केली की जबुलून आणि नफताली वंशातले लोक एक “तेजस्वी प्रकाश” पाहतील. (यश. ९:१, २) आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या शिकवणीने ‘सगळ्या प्रकारच्या लोकांना प्रकाश देणारा’ येशूच खरा प्रकाश होता.—योहा. १:९.
१३. यहोवा आपल्या बोलण्यामुळे खूश व्हावा म्हणून आपण काय करू शकतो?
१३ आपण काय शिकतो? आपण काय बोलतो आणि कसं बोलतो हे यहोवासाठी महत्त्वाचं आहे. मग यहोवा खूश होईल असे ‘मधूर शब्द’ आपण कसे बोलू शकतो? नेहमी खरं बोलून. (स्तो. १५:१, २) आपण जे काही बोलतो त्यांतून इतरांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. इतर लोक जेव्हा एखादं चांगलं काम करतात तेव्हा आपण लगेच त्यांची प्रशंसा करू शकतो. पण, ते जेव्हा चुका करतात तेव्हा आपण त्यांची टीका करणार नाही किंवा त्यांच्या चुकांकडे बोट दाखवणार नाही. (इफिस. ४:२९) तसंच आपण संभाषण सुरू करण्याचं ध्येयसुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे आपल्याला लोकांना चांगल्या प्रकारे साक्ष देता येईल.
योसेफ
१४. योसेफला मिळालेला आशीर्वाद कसा खरा ठरला? समजावून सांगा. (उत्पत्ती ४९:२२, २६) (चौकटसुद्धा पाहा.)
१४ उत्पत्ती ४९:२२, २६ वाचा. याकोबला योसेफचा खूप अभिमान वाटत असावा. कारण यहोवाने त्याच्या ‘सगळ्या भावांपैकी त्याला निवडलं’ आणि त्याचा एका खास मार्गाने वापर केला. याकोबने त्याला “एका फलदायी झाडाची फांदी,” असं म्हटलं. याकोब स्वतः ते झाड होता आणि योसेफ त्या झाडाची फांदी. योसेफ हा याकोबची प्रिय बायको राहेल हिच्यापासून जन्मलेला पहिला मुलगा होता. याकोबने म्हटलं की योसेफला दुप्पट वाटा मिळेल. खरंतर लेआच्या पहिल्या मुलाला म्हणजे रऊबेनला दुप्पट वाटा मिळायला हवा होता. पण त्याने त्याचा प्रथमपुत्राचा हक्क गमावला. (उत्प. ४८:५, ६; १ इति. ५:१, २) या भविष्यवाणीप्रमाणे योसेफच्या दोन मुलांच्या म्हणजे एफ्राईम आणि मनश्शेच्या वंशजांना दोन वेगवेगळे वंश म्हणून मोजण्यात आलं आणि त्यांना वचन दिलेल्या देशात दोन वाटे देण्यात आले.—उत्प. ४९:२५; यहो. १४:४.
१५. योसेफवर अन्याय झाला तेव्हा तो कशा प्रकारे वागला?
१५ याकोबने असंसुद्धा म्हटलं: “तिरंदाज [योसेफवर] निर्दयीपणे हल्ला करत राहिले. त्यांनी त्याला बाण मारले आणि ते मनोमन त्याचा द्वेष करत राहिले.” (उत्प. ४९:२३) हे तिरंदाज म्हणजे योसेफचे भाऊ होते. योसेफवर बरेच अन्याय झाले. त्यांपैकी बऱ्याच अन्यायांसाठी त्याचे हे भाऊ जबाबदार होते. पण तरीही योसेफ त्याच्या भावांवर किंवा यहोवावर कधीही नाराज झाला नाही. याकोबने त्याच्याबद्दल असं म्हटलं: “[योसेफचं] धनुष्य स्थिर राहिलं आणि त्याचे हात मजबूत आणि चपळ राहिले.” (उत्प. ४९:२४) योसेफवर परीक्षा आल्या तेव्हा तो यहोवावर अवलंबून राहिला. त्याने आपल्या भावांना क्षमा केली. इतकंच नाही तर तो त्यांच्याशी दयाळूपणे वागला. (उत्प. ४७:११, १२) या परीक्षांचा सामना करून योसेफ एक आणखी चांगला व्यक्ती बनला. (स्तो. १०५:१७-१९) त्यामुळे यहोवाने आणखी मोठमोठी कामं करण्यासाठी त्याचा वापर केला.
१६. परीक्षांचा सामना करताना आपण योसेफसारखं कसं वागू शकतो?
१६ आपण काय शिकतो? परीक्षांमुळे आपण कधीही यहोवापासून किंवा आपल्या भाऊबहिणींपासून लांब जाणार नाही. लक्षात असू द्या की यहोवा आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ देतो. पण जेव्हा आपण या परीक्षांचा सामना करतो तेव्हा आपल्याला प्रशिक्षण मिळत असतं. (इब्री १२:७, तळटीप) या प्रशिक्षणामुळे आपल्यात क्षमाशीलता आणि दयाळूपणा यांसारखे चांगले गुण वाढतात. (इब्री १२:११) योसेफने धीर दाखवल्यामुळे यहोवाने जसा त्याला आशीर्वाद दिला, तसाच तो आपल्यालाही आशीर्वाद देईल.
बन्यामीन
१७. बन्यामीनबद्दल करण्यात आलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (उत्पत्ती ४९:२७) (चौकटसुद्धा पाहा.)
१७ उत्पत्ती ४९:२७ वाचा. याकोबने म्हटलं की बन्यामीनचे वंशज लांडग्यासारखे असतील आणि ते शूर योद्धे होतील. (शास्ते २०:१५, १६; १ इति. १२:२) त्याने म्हटलं की “तो सकाळी आपली शिकार खाईल.” “सकाळी” याचा काय अर्थ होतो? जेव्हा इस्राएलमध्ये राजांनी राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा पहिला राजा बन्यामीन वंशातला शौल होता. तो खूप शूर योद्धा होता. आणि त्याने पलिष्ट्यांविरुद्ध बऱ्याच लढाया लढल्या. (१ शमु. ९:१५-१७, २१) याकोबने बन्यामीनबद्दल असंसुद्धा म्हटलं की तो “संध्याकाळी लुटीचे वाटे करेल.” “संध्याकाळी” याचा काय अर्थ होतो? राजांचा काळ संपल्याच्या काही काळानंतर इस्राएली लोक मेद-पारसच्या साम्राज्याच्या अधीन होते. त्या वेळी सर्व इस्राएली लोकांचा सर्वनाश करण्याचा कट रचण्यात आला. पण बन्यामीन वंशातल्या एस्तेर राणीने आणि मर्दखयने हा कट हाणून पाडला आणि इस्राएली लोकांचा सर्वनाश होण्यापासून त्यांना वाचवलं.—एस्ते. २:५-७; ८:३; १०:३.
१८. बन्यामीन वंशातल्या लोकांनी यहोवाच्या व्यवस्थेला जशी एकनिष्ठा दाखवली, तशीच एकनिष्ठा आपण कशी दाखवू शकतो?
१८ आपण काय शिकतो? भविष्यवाणीप्रमाणे आपल्याच वंशातला शौल हा राजा बनलाय हे पाहून बन्यामीनी लोकांना नक्कीच आनंद झाला असेल. पण जेव्हा यहोवाने यहूदाच्या वंशातल्या दावीदला राजा बनवलं, तेव्हा काही काळाने बन्यामीनी लोकांनी त्याला पाठिंबा दिला. (२ शमु. ३:१७-१९) याच्या काही दशकांनंतर इतर वंशांनी यहूदाविरुद्धा बंड केलं तरी बन्यामीन वंशातले लोक यहूदाला आणि यहोवाने निवडलेल्या राजाला एकनिष्ठ राहिले. (१ राजे ११:३१, ३२; १२:१९, २१) आज आपल्याबाबतीत काय? आज आपणसुद्धा यहोवा ज्यांना संघटनेत पुढाकार घेण्यासाठी नेमतो, त्यांना एकनिष्ठपणे पाठिंबा दिला पाहिजे.—१ थेस्सलनी. ५:१२.
१९. आपल्याला याकोबने त्याच्या मृत्यूआधी केलेल्या भविष्यवाणीमुळे कसा फायदा होतो?
१९ याकोबने त्याच्या मृत्यूआधी केलेल्या भविष्यवाणीमुळे आपल्यालाही खूप शिकायला मिळतं. याकोबने केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली याचा अभ्यास केल्यामुळे यहोवाने दिलेल्या इतर भविष्यवाण्याही नक्की पूर्ण होतील, यावरचा आपला भरवसा आणखी वाढतो. तसंच याकोबच्या मुलांना ज्या प्रकारे आशीर्वाद मिळाला त्याबद्दल जाणून घेतल्यामुळे यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे खूश कसं करता येईल, हेसुद्धा आपल्याला समजतं.
गीत १२८ अंतापर्यंत धीर धरू या
a याकोबने त्याच्या पहिल्या चार मुलांना आशीर्वाद देताना मोठ्यापासून सुरुवात करून धाकट्यापर्यंत आशीर्वाद दिला. पण त्याच्या बाकीच्या आठ मुलांना आशीर्वाद देताना त्याने हा क्रम पाळला नाही.