फिलेमोन आणि अनेसिम—ख्रिस्ती बंधुत्वात समेट
पौलाच्या प्रेरित पत्रांपैकी एकात, आपल्याला एका नाजूक पेचप्रसंगाविषयी वाचायला मिळते, ज्यात दोन माणसे गोवलेली आहेत. यांपैकी एक फिलेमोन आणि दुसरा अनेसिम. हे दोघे कोण होते? त्यांच्यात झालेल्या मतभेदात पौलाने आस्था का व्यक्त केली?
हे पत्र ज्याला लिहिण्यात आले तो फिलेमोन आशिया मायनरमधील कलस्सै येथे वास्तव्यास होता. त्याच भागात राहणाऱ्या इतर ख्रिस्ती लोकांचा नसला तरीसुद्धा, फिलेमोनचा मात्र पौलाशी परिचय होता; त्याने प्रेषित पौलाच्याच प्रचार कार्यामुळे सुवार्तेचा अंगीकार केला होता. (कलस्सैकर १:१; २:१) पौलाच्या लेखी तो एक “प्रिय सहकारी” होता. विश्वास आणि प्रीती यांच्या बाबतीत फिलेमोन अनुकरणीय होता. आतिथ्यशील असण्यासोबतच तो आपल्या सहख्रिश्चनांना प्रोत्साहनही देत असे. ज्याअर्थी त्याचे घर तिथल्या मंडळीच्या सभा चालवण्याइतके मोठे होते त्याअर्थी नक्कीच तो श्रीमंत असावा. पौलाने पत्रात आणखी दोघांचा उल्लेख केला, अफ्फिया आणि अर्खिप्प; काहींच्या मते, ही फिलेमोनच्या बायको व मुलाची नावे असावीत. त्याच्याकडे कमीतकमी एक गुलाम तर नक्कीच होता, अर्थात अनेसिम.—फिलेमोन १, २, ५, ७, १९ब, २२.
रोमला फरार
पौलाने फिलेमोनला सा.यु. ६१ च्या सुमारास पत्र लिहिले तेव्हा अनेसिम आपल्या मालकाच्या घरापासून दूर, १,४०० किलोमीटरहूनही अधिक अंतरावरील रोममध्ये पौलासोबत का होता, याचा उलगडा बायबल करत नाही. पण, पौलाने फिलेमोनला लिहिले: “[अनेसिमने] तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड.” (फिलेमोन १८) यावरून दिसते की नक्कीच अनेसिम आणि त्याचा मालक फिलेमोन यांचे काहीतरी बिनसले होते. पौलाच्या पत्राचा उद्देश या दोघांत समेट घडून आणणे हा होता.
रोमला पलायन करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम फिलेमोनच्या घरातून चोरून अनेसिम फरार झाला असावा असे सुचविण्यात आले आहे. रोम शहराच्या गर्दीत आपल्याला कोणी ओळखणार नाही या विचाराने तो तेथे गेला होता.a ग्रेको-रोमन काळात, गुलामांच्या मालकांपुढेच नव्हे तर सार्वजनिक प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढेही अशा या पळून आलेल्यांचा एक यक्षप्रश्नच होता. रोम हे अशा पळून आलेल्या गुलामांचे “आवडते आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध” होते असे म्हणतात.
पौलाची अनेसिमशी कशी काय गाठ पडली? बायबलमध्ये सांगितलेले नाही. कदाचित, स्वातंत्र्याचा नवा नवा उत्साह सरल्यावर अनेसिम भानावर आला असेल आणि आपण कमालीची धोकेदायक परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतली आहे याची त्याला जाणीव झाली असावी. रोम शहरात, फरारी गुलामांना हुडकून काढण्यासाठी एक खास पोलिस तुकडी होती; आणि गुलामाने आपल्या मालकाकडून पळून जाणे हा त्या जुन्या काळच्या कायद्यानुसार एक अत्यंत गंभीर गुन्हा होता. गेर्हार्ट फ्रीड्रीख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पकडले गेल्यावर या फरार गुलामांच्या कपाळावर गरम लोखंडाच्या चटक्याने डाग देण्यात येत असे. कधीकधी त्यांना खूप छळले जात असे . . . , त्यांचे पाहून दुसऱ्या गुलामांनीही पळून जाण्याची हिंमत करू नये म्हणून कधीकधी त्यांना सर्कशीतल्या हिंस्र जनावरांपुढे फेकले जात असे, तर कधी वधस्तंभावर जिवे मारले जात असे.” फ्रीड्रीख यांचा असा अंदाज आहे की अनेसिमजवळचे चोरलेले पैसे संपल्यानंतर, आश्रयाला एखादे ठिकाण किंवा एखादी नोकरी शोधूनही न सापडल्यावर तो पौलाकडे गेला असावा. फिलेमोनच्या घरात पौलाविषयी ऐकले असल्यामुळे त्याने पौलाकडे आश्रय देण्याची आणि मध्यस्थी करण्याची विनंती केली असावी.
इतरांचे असे म्हणणे आहे की फिलेमोन हा अनेसिमवर दुसऱ्या एखाद्या वाजवी कारणावरून नाराज झाला असल्यामुळे, अनेसिम मुद्दामहून आपल्या मालकाच्या मित्राकडे मदत मागायला गेला असावा, या विचाराने की त्याच्या मध्यस्थीने आपल्याला आपल्या मालकाची मर्जी पुन्हा मिळवता येईल. ऐतिहासिक माहितीसूत्रे असे सुचवतात की, ‘अडचणीत सापडलेले गुलाम सहसा हा मार्ग पत्करायचे.’ त्याअर्थी, अभ्यासक ब्रायन रॅपस्की यांच्या मते, अनेसिमने जी चोरी केली होती, ती “पळून जाण्याच्या इराद्यापेक्षा, पौलाची मदत मागता यावी म्हणून त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी केली असावी अशी जास्त शक्यता भासते.”
पौल राजी होतो
पलायन करण्याचे कारण काहीही असो, पण अनेसिमने आपल्या संतापलेल्या मालकाशी समेट व्हावा म्हणून पौलाची कास धरली हे उघड आहे. पौल आता धर्मसंकटात सापडला. पूर्वी सत्य न मानणारा हा गुलाम चक्क एक फरारी गुन्हेगार होता. कायद्यानुसार योग्य असूनही, त्याला कडक शिक्षा देऊ नये अशी आपल्या ख्रिस्ती मित्राला समजूत घालून, प्रेषित पौलाचे त्याला मदत करणे बरोबर होते का? पौलाने काय करावे?
पौलाने फिलेमोनला पत्र लिहिले तोपर्यंत, पळून आलेला अनेसिम काही काळापासून प्रेषित पौलासोबत राहात होता. तेवढ्या काळाच्या सहवासांती, पौल अनेसिमला एक “प्रिय बंधू” म्हणू शकला. (कलस्सैकर ४:९) अनेसिमसोबत असलेल्या आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक नात्याविषयी पौल म्हणाला, “मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करितो.” फिलेमोनाला स्वप्नातही वाटले नसेल की हे असे घडेल. प्रेषित पौलाने म्हटले, की पूर्वी “निरुपयोगी” असणारा आता एक ख्रिस्ती बांधव म्हणून परततो आहे. यापुढे, आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणेच, अनेसिम हा “फायद्याचा” किंवा “उपयोगी” ठरणार होता.—फिलेमोन १, १०-१२.
तुरुंगवासात असलेल्या प्रेषित पौलाला अनेसिम फारच उपयोगी पडला होता. पौलाला तर त्याला आपल्याजवळच ठेवून घेण्याची इच्छा होती, पण हे बेकायदेशीर असण्यासोबतच फिलेमोनच्याही हक्कांचा गैरफायदा घेण्यासारखे होते. (फिलेमोन १३, १४) फिलेमोनच्या घरी सभांसाठी भेटणाऱ्या मंडळीला त्याच सुमारास लिहिलेल्या दुसऱ्या एका पत्रात पौलाने, ‘तुमच्यातलाच असणारा विश्वासू व प्रिय बंधू’ या शब्दांत अनेसिमचा उल्लेख केला. या शब्दांवरून दिसून येते की, अनेसिमने आपण भरवशालायक असल्याचे एव्हाना सिद्ध केले होते.—कलस्सैकर ४:७-९.b
फिलेमोनने अनेसिमचे प्रेमाने स्वागत करावे अशी पौलाने त्याला विनंती जरूर केली; पण प्रेषित या नात्याने अधिकार असल्यामुळे त्याने अनेसिमला स्वीकारण्यासाठी किंवा त्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फिलेमोनवर दबाव आणला नाही. त्यांच्या मैत्रिसंबंधामुळे आणि परस्पर प्रेमामुळे, पौलाला भरवसा होती की फिलेमोन आपण जे म्हटले ‘त्यापेक्षाही अधिक करील.’ (फिलेमोन २१) ‘त्यापेक्षाही अधिक’ म्हणजे नेमके काय याविषयी खुलासा करण्यात आलेला नाही कारण अनेसिमचे काय करावे हे ठरवण्याचा फिलेमोनलाच अधिकार होता. काहींनी असा अर्थ लावला आहे की अनेसिम ‘पौलाला जशी मदत करत होता तशीच त्याने पुढेही करीत राहावी म्हणून त्याला परत आपल्याकडे पाठवून द्यावे’ असे पौल अप्रत्यक्षपणे सुचवत होता.
अनेसिमच्या संबंधाने पौलाने केलेल्या विनंत्या फिलेमोनने मान्य केल्या का? हो तर, त्याने त्या मान्य केल्या; तथापि, आपल्याही गुलामांनी अनेसिमच्या पावलावर पाऊल ठेवण्याची हिंमत करू नये म्हणून त्याला चांगली अद्दल घडली पाहिजे अशी इच्छा बाळगणाऱ्या कलस्सै येथील इतर गुलामांच्या मालकांना हे कदाचित रुचले नसेल.
एक वेगळा अनेसिम
काहीही असो, अनेसिम कलस्सैला परतला तो एक नवीन व्यक्तिमत्त्व घेऊन. सुवार्तेच्या प्राबल्याने त्याची मनोवृत्ती बदलली आणि तो त्या शहरातील ख्रिस्ती मंडळीचा एक विश्वासू सदस्य ठरला यात शंकाच नाही. कालांतराने फिलेमोनच्या गुलामगिरीतून अनेसिमला मोकळे करण्यात आले किंवा नाही हे बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास, पूर्वीचा हा फरारी आता एक स्वतंत्र मनुष्य बनला होता. (पडताळा १ करिंथकर ७:२२.) आजच्या काळातही अशाप्रकारची रूपांतरे झालेली पाहायला मिळतात. जेव्हा लोक बायबलच्या तत्त्वांचे आपल्या जीवनात पालन करतात, तेव्हा परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्व बदलू लागतात. समाजाकरता पूर्वी निरुपयोगी समजले जाणाऱ्यांना आदर्श नागरिक बनण्याकरता मदत दिली जाते.c
खऱ्या विश्वासात मतपरिवर्तन झाल्यावर परिस्थितीने किती विलक्षण कलाटणी घेतली! पूर्वी अनेसिम फिलेमोनसाठी “निरुपयोगी” ठरला असला तरीसुद्धा नवा अनेसिम नक्कीच “फायद्याचा” या अर्थाच्या आपल्या नावाला जागला. शिवाय, फिलेमोन आणि अनेसिम यांचा ख्रिस्ती बंधुत्वात समेट झाला हेही खरोखर केवढे इष्ट घडले.
[तळटीपा]
a रोमन कायद्यानुसार, ‘परत न येण्याच्या इराद्याने आपल्या मालकाला सोडून जाणाऱ्याला’ सर्व्हस फुजीटिव्हस (फरारी गुलाम) म्हटले जात असे.
b कलस्सैला परतताना, अनेसिम आणि टायखीकस यांच्या हाती पौलाची तीन पत्रे पाठवण्यात आली होती; ही पत्रे आता बायबलच्या प्रेरित पुस्तकांमध्ये सामील आहेत. यांत फिलेमोनला लिहिलेल्या पत्राव्यतिरिक्त, इफिसकरांना आणि कलस्सैकरांना लिहिलेली पौलाची पत्रेही होती.
c उदाहरणांसाठी, कृपया सावध राहाच्या! जून २२, १९९६, (इंग्रजी) पृष्ठे १८-२३ आणि मार्च ८, १९९७, पृष्ठे ११-१३; तसेच टेहळणी बुरूजच्या ऑगस्ट १, १९८९ (इंग्रजी) पृष्ठे ३०-१ आणि फेब्रुवारी १५ १९९७, पृष्ठे २१-४ पाहा.
[३० पानांवरील चौकट]
रोमन कायदेव्यवस्थेतील गुलाम
सा.यु. पहिल्या शतकात अंमलात असणाऱ्या रोमन कायदेकानुनांनुसार, गुलाम हा सर्वस्वी आपल्या मालकाच्या लहरी, वासना आणि मनस्थितीच्या अधीन होता. भाष्यकार गेर्हार्ट फ्रीड्रीख यांच्या मते, “गुलामाकडे मुळातच आणि कायद्यानुसारही माणूस म्हणून नव्हे, तर मालकाने कशाही प्रकारे वापरावयाची निव्वळ एक वस्तू म्हणून पाहिले जात असे. . . . घरातले पाळीव प्राणी किंवा कामाचे अवजार यांच्याइतकाच [त्याचा] दर्जा होता; दिवाणी कायद्यांतर्गतही त्याला कोणत्याच सवलती उपलब्ध नव्हत्या.” अन्याय झाल्यास तो आपले गाऱ्हाणे घेऊन न्यायमंदिरात जाऊ शकत नव्हता. थोडक्यात म्हणजे, मालकाच्या इशाऱ्यांवर नाचणे हेच त्याचे जीवन. मालकाचा पारा चढला की मग तो त्याला मनात येईल ती भयंकर शिक्षा देऊ शकत होता. क्षुल्लकशी चूक झाली तरीसुद्धा तो अक्षरशः जल्लादाचे रूप घेई.*
श्रीमंतांकडे तर शेकडो गुलामांचा ताफा असे; पण त्यांपेक्षा साधारण कमी समृद्ध असणाऱ्यांकडेही निदान दोन ते तीन गुलाम असायचेच. अभ्यासक जॉन बार्कले यांच्या म्हणण्यानुसार, “घरातील गुलामांकडून कितीतरी निरनिराळ्या प्रकारची कामं करवून घेतली जायची. त्याकाळच्या गुलामांमध्ये, द्वारपालापासून स्वयंपाकी, वाढपी, साफसफाई करणारे, निरोपी, मुलं सांभाळणारे, दाया, लहान मोठी कामं करणारी गडीमाणसं, शिवाय आणखी प्रशस्त आणि धनिक घरांमध्ये खास कामांत पारंगत असणारे सेवक देखील असत . . . खरे सांगायचे तर, घरातल्या गुलामाचे जीवन सर्वस्वी त्याच्या मालकाच्या स्वभावावर अवलंबून होते, आणि याचे दोन अर्थ होऊ शकत होते: निष्ठुर मालकाच्या गुलामगिरीत असल्यास त्या गुलामाला सहन कराव्या लागणाऱ्या निरनिराळ्या यातनांना काही अंतच नव्हता, पण दयाळू आणि मोठ्या मनाचा मालक असल्यास जीवन सुसह्य आणि आशादायी बनत असे. गुलामांना दिलेल्या क्रूर वागणुकीची महान ग्रंथांमध्ये चित्रित केलेली काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत, पण त्याच वेळी काही मालक आणि त्यांचे गुलाम यांमध्ये कसे जिव्हाळ्याचे संबंध होते याचीही कितीतरी उदाहरणे लिखाणांमध्ये सापडतात.“
*प्राचीन काळी देवाच्या लोकांमध्ये चालणाऱ्या गुलामगिरीविषयी माहितीकरता, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ९७७-९ पाहा.