वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 ९/१५ पृ. १६-२०
  • जीवनाच्या शर्यतीत धीराने धावा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनाच्या शर्यतीत धीराने धावा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शर्यत जिंकण्यासाठी धीराची गरज आहे
  • ‘साक्षीरूपी मेघ’
  • ते यशस्वी झाले—कसे?
  • आपल्याकरता धडे
  • तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • बक्षीस मिळेल असे धावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • जीवनाची शर्यत पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • तुम्ही जीवनाची धाव कशी धावत आहात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 ९/१५ पृ. १६-२०

जीवनाच्या शर्यतीत धीराने धावा

‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आपण धीराने धावावे.’—इब्री १२:१.

१, २. प्रेषित पौलाने ख्रिस्ती जीवनक्रमाची तुलना कशाशी केली?

दरवर्षी कितीतरी ठिकाणी मॅराथॉन शर्यती आयोजित केल्या जातात. ज्यांना उत्तम धावपटू समजले जाते असे धावपटू एकमेव उद्देशाने शर्यतीत भाग घेतात. तो उद्देश म्हणजे शर्यत जिंकणे. या शर्यतीत भाग घेणाऱ्‍या इतरांना माहीत असते की आपण शर्यत जिंकणार नाही. तरीसुद्धा, ते शर्यतीत भाग घेतात. अंतिम रेषेपर्यंत पोहचणे हेच त्यांचे ध्येय असते.

२ बायबलमध्ये, ख्रिस्ती जीवनक्रमाची तुलना एका शर्यतीशी करण्यात आली आहे. प्रेषित पौलाने प्राचीन करिंथमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांना जे पहिले पत्र लिहिले त्यात त्याने या गोष्टीकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याने लिहिले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल.”—१ करिंथ. ९:२४.

३. शर्यतीत धावणाऱ्‍यांपैकी केवळ एक जण जिंकतो असे पौलाने का म्हटले?

३ शर्यतीत धावणाऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी केवळ एकालाच जीवनाचे बक्षीस मिळेल आणि इतर सर्व जण व्यर्थ धावतील असे पौल म्हणत होता का? मुळीच नाही! शर्यतीत धावणारे धावपटू शर्यत जिंकण्याच्या उद्देशाने उत्तम प्रशिक्षण घ्यायचे व कठोर परिश्रम करायचे. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या आपल्या ख्रिस्ती बांधवांनी असेच कठोर परिश्रम करावे अशी पौलाची इच्छा होती. असे केल्यास, ते जीवनाचे बक्षीस मिळण्याची आशा बाळगू शकत होते. होय, ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीत जे शेवटपर्यंत धावतात त्यांना बक्षीस मिळते.

४. आपल्याला नेमून दिलेल्या धावेसंबंधी आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

४ आज ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांकरता पौलाचे शब्द प्रोत्साहनदायक व सोबतच विचार करायला लावणारे आहेत. का? कारण, जे बक्षीस मिळणार आहे त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. मग ते स्वर्गीय जीवनाचे बक्षीस असो अथवा पृथ्वीवरील नंदनवनातील जीवनाचे बक्षीस. हे खरे आहे, की ही शर्यत दीर्घ पल्ल्याची व कठीण आहे; मार्गात अनेक अडथळे, विकर्षणे, आणि धोके आहेत. (मत्त. ७:१३, १४) दुःखाची गोष्ट म्हणजे, काही जण या शर्यतीत धीमे पडले आहेत, काहींनी ती मध्येच सोडून दिली आहे, तर इतर काही जण दमछाक झाल्यामुळे मध्येच कोसळले आहेत. जीवनाच्या शर्यतीत कोणते अडथळे आणि धोके आहेत? तुम्ही ते कसे टाळू शकता? अंतिम रेषेपर्यंत पोहचण्यासाठी व शर्यत जिंकण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

शर्यत जिंकण्यासाठी धीराची गरज आहे

५. पौलाने इब्री लोकांस १२:१ मध्ये शर्यतीसंबंधी काय म्हटले?

५ पौलाने जेरूसलेम व यहूदामध्ये राहणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍चनांना जे पत्र लिहिले त्यात त्याने पुन्हा एकदा धावण्याच्या शर्यतीचा उल्लेख केला. (इब्री लोकांस १२:१ वाचा.) शर्यतीत भाग का घ्यावा केवळ याकडेच त्याने त्यांचे लक्ष वेधले नाही, तर शर्यत जिंकण्यासाठी एका व्यक्‍तीने काय केले पाहिजे हेही त्याने सांगितले. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या देवप्रेरित सल्ल्यातून आपण काय शिकू शकतो याचे परीक्षण करण्याआधी, त्याने हे पत्र का लिहिले आणि तो आपल्या वाचकांना काय करण्याचे प्रोत्साहन देत होता ते आपण पाहू या.

६. यहुदी धर्मपुढारी ख्रिश्‍चनांवर कशा प्रकारे दबाव आणत होते?

६ पहिल्या शतकातील ख्रिस्ती, आणि खासकरून जेरूसलेम व यहूदामध्ये राहणारे ख्रिस्ती, अनेक परीक्षांचा आणि हालअपेष्टांचा सामना करत होते. यहुदी धर्मपुढाऱ्‍यांचा अजूनही लोकांवर खूप दबदबा होता आणि ते ख्रिश्‍चनांवर प्रचंड दबाव आणत होते. यापूर्वी, हे धर्मपुढारी येशू ख्रिस्ताला देशद्रोही ठरवण्यात व एक गुन्हेगार म्हणून त्याला ठार मारण्यात यशस्वी झाले होते. आणि आता ते येशूविषयी प्रचार करणाऱ्‍यांचे कार्य बंद पाडू इच्छित होते. इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या चमत्कारिक घटनांनंतर लगेच ते ख्रिश्‍चनांना धमक्या देऊ लागले व त्यांच्यावर हल्ले करू लागले. याचे अनेक अहवाल प्रेषितांची कृत्ये पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. यामुळे, विश्‍वासू जनांचे जीवन नक्कीच खूप कठीण बनले होते.—प्रे. कृत्ये ४:१-३; ५:१७, १८; ६:८-१२; ७:५९; ८:१, ३.

७. पौलाने ज्या ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले ते कोणत्या कठीण काळात जगत होते?

७ शिवाय, ते ख्रिस्ती अशा एका काळात जगत होते जेव्हा लवकरच यहुदी व्यवस्थेचा अंत होणार होता. येशूने त्यांना, अविश्‍वासू यहुदी राष्ट्राचा नाश होईल हे आधीच सांगितले होते. या नाशापूर्वी ज्या घटना घडणार होत्या त्यांच्याविषयी त्याने आपल्या अनुयायांना सांगितले होते आणि त्या नाशातून वाचण्यासाठी त्यांनी काय करावे याविषयी सुस्पष्ट सूचनाही त्याने त्यांना दिल्या होत्या. (लूक २१:२०-२२ वाचा.) तर मग, त्यांनी काय करायचे होते? येशूने त्यांना असा इशारा दिला: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.”—लूक २१:३४.

८. जीवनाच्या शर्यतीत काही ख्रिस्ती कोणत्या गोष्टीमुळे धीमे पडले असावेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे त्यांनी ही शर्यत सोडून दिली असावी?

८ पौलाने इब्री लोकांस पत्र लिहिले तोपर्यंत येशूने हा इशारा देऊन सुमारे ३० वर्षे उलटली होती. या काळादरम्यान त्या ख्रिश्‍चनांचे काय झाले? काही ख्रिस्ती दैनंदिन जीवनाच्या दबावांना व विकर्षणांना बळी पडले आणि त्यांनी आध्यात्मिक प्रगती करण्याचे सोडून दिले. ते जर आध्यात्मिक प्रगती करत राहिले असते, तर ते विश्‍वासात दृढ झाले असते. (इब्री ५:११-१४) इतर ख्रिश्‍चनांना कदाचित असे वाटले असावे, की आपल्या सभोवतालच्या बहुतांश यहुद्यांप्रमाणे जीवन जगणे अधिक सोपे आहे. कारण, त्या यहुद्यांनी देवाला पूर्णपणे सोडून दिले नव्हते; काही प्रमाणात ते अजूनही नियमशास्त्राचे पालन करत होते. तसेच, ख्रिस्ती मंडळीत असेही काही लोक होते जे इतरांवर मोशेच्या नियमशास्त्राचे व यहुदी परंपरांचे पालन करण्याचा दबाव आणत होते. पौल असे काय करू शकत होता ज्यामुळे त्याला आपल्या ख्रिस्ती बांधवांना आध्यात्मिक रीत्या जागरूक ठेवण्यास व जीवनाच्या शर्यतीत धीर धरण्यास मदत मिळणार होती?

९, १०. (क) इब्री लोकांस १० व्या अध्यायाच्या शेवटी पौल कोणते प्रोत्साहन देतो? (ख) पौलाने प्राचीन काळातील साक्षीदारांच्या विश्‍वासू कृत्यांबद्दल का लिहिले?

९ पौलाने देवाच्या प्रेरणेने एका उल्लेखनीय मार्गाने इब्री ख्रिश्‍चनांचा विश्‍वास दृढ केला. त्याने आपल्या पत्राच्या १० व्या अध्यायात सांगितले की मोशेचे नियमशास्त्र हे ‘पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया आहे’ आणि ख्रिस्ताचे खंडणी बलिदान किती अनमोल आहे हेदेखील त्याने स्पष्टपणे दाखवून दिले. त्या अध्यायाच्या शेवटी पौलाने आपल्या वाचकांना असे प्रोत्साहन दिले: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्‍तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही.”—इब्री १०:१, ३६, ३७.

१० खरा विश्‍वास म्हणजे काय हे, पौल इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायात कुशलतेने स्पष्ट करून सांगतो. आणि तो हे, प्राचीन काळातील विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांद्वारे दाखवतो. येथे तो विषयाला सोडून बोलत होता का? मुळीच नाही. विश्‍वास दाखवण्यासाठी आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींना धैर्याची व सहनशक्‍तीची गरज आहे हे त्यांनी ओळखावे अशी पौलाची इच्छा होती. प्राचीन काळातील यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उत्तम उदाहरणामुळे इब्री ख्रिश्‍चनांना परीक्षांचा व हालअपेष्टांचा सामना करण्याचे बळ मिळणार होते. गतकाळातील त्या एकनिष्ठ सेवकांच्या विश्‍वासू कृत्यांबद्दल सांगितल्यानंतर पौल असे म्हणू शकला: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—इब्री १२:१.

‘साक्षीरूपी मेघ’

११. आपण ‘साक्षीरूपी मेघाविषयी’ विचार केल्यास आपल्यावर कोणता प्रभाव पडू शकतो?

११ हा ‘साक्षीरूपी मेघ’ आपल्या आवडत्या खेळाडूला किंवा संघाला जिंकताना पाहण्यासाठी केवळ प्रेक्षक किंवा दर्शक म्हणून उपस्थित नव्हता. तर, ख्रिस्तपूर्व काळातील हे यहोवाचे सेवक एका अर्थी खुद्द शर्यतीत धावले होते. आणि त्यांनी आपली शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण केली होती. आज ते हयात नसले, तरी त्यांच्या उदाहरणामुळे नवीन धावपटूंना प्रोत्साहन मिळू शकते. एके काळचे उत्तम धावपटू आपल्याला पाहत आहेत हे जर एका स्पर्धकाला माहीत झाले, तर त्याला कसे वाटेल याची कल्पना करा. त्याला सर्वोत्तम खेळ दाखवण्याची प्रेरणा मिळणार नाही का? ही लाक्षणिक शर्यत कितीही कठीण असली, तरी आपण ती जिंकू शकतो याची ग्वाही प्राचीन काळातील ते साक्षीदार देऊ शकले. अशा प्रकारे, ‘साक्षीरूपी मेघाचे’ उदाहरण डोळ्यांसमोर ठेवल्यामुळे पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्‍चनांना धैर्य मिळाले आणि त्यांना ‘धीराने धावणे’ शक्य झाले. अशाच प्रकारचे धैर्य व धीर आज आपल्यालाही मिळू शकतो.

१२. पौलाने ज्या उदाहरणांचा उल्लेख केला ते आपल्याकरता उपयुक्‍त का आहेत?

१२ पौलाने उल्लेख केलेल्या अनेक विश्‍वासू सेवकांची परिस्थिती आपल्यासारखीच होती. नोहाचे उदाहरण घ्या. तो अशा एका काळात राहत होता जेव्हा जलप्रलयापूर्वीच्या जगाचा लवकरच अंत होणार होता. आज आपणसुद्धा या जगाच्या अंताच्या आधीच्या काळात राहत आहोत. यहोवाने अब्राहाम व सारा यांना खऱ्‍या उपासनेसाठी व त्याच्या अभिवचनाच्या पूर्णतेची वाट पाहण्यासाठी आपला स्वतःचा देश सोडण्यास सांगितले. त्याच प्रकारे, आपल्यालाही स्वार्थत्याग करून यहोवाची कृपापसंती मिळवण्याचा व त्याने आपल्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद प्राप्त करण्याचा आर्जव करण्यात आला आहे. मोशेने प्रतिज्ञात देशात जाण्यासाठी एका भयंकर अरण्यातून प्रवास केला होता. त्याच प्रकारे, आज आपणही प्रतिज्ञात नवीन जगात जाण्यासाठी, लयास जाणाऱ्‍या या जगातून वाटचाल करत आहोत. हे विश्‍वासू स्त्री-पुरुष ज्या परिस्थितीतून गेले म्हणजे त्यांच्या वाट्याला जे यश-अपयश आले, तसेच त्यांचे चांगले गुण व त्यांच्या दुर्बलता, या सर्व गोष्टींवर आपण आवर्जून मनन केले पाहिजे.—रोम. १५:४; १ करिंथ. १०:११.

ते यशस्वी झाले—कसे?

१३. नोहाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, आणि त्यांच्यावर मात करणे त्याला कसे शक्य झाले?

१३ यहोवाच्या या सेवकांना, जीवनाच्या शर्यतीत धीराने धावणे व ही शर्यत यशस्वी रीत्या पूर्ण करणे कसे शक्य झाले? पौलाने नोहाबद्दल काय लिहिले त्याकडे लक्ष द्या. (इब्री लोकांस ११:७ वाचा.) पृथ्वीवरील सर्व काही नष्ट होईल इतके पाणी नोहाच्या “पाहण्यात आले नव्हते.” (उत्प. ६:१७) असे याआधी कधीच घडले नव्हते; ही घटना अभूतपूर्व होती. तरीसुद्धा, असे घडूच शकत नाही असा विचार करून नोहाने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. का? कारण, यहोवाने जे काही म्हटले ते तो नक्कीच पूर्ण करेल यावर त्याचा विश्‍वास होता. यहोवाने आपल्याला जे करायला सांगितले ते खूप कठीण आहे असे नोहाला वाटले नाही. उलट, ‘देवाने नोहाला जे काही सांगितले तसे त्याने केले.’ (उत्प. ६:२२) नोहाला जे काही करायचे होते—तारू बांधणे, प्राण्यांना गोळा करणे, मानव व प्राणी यांच्यासाठी तारवात अन्‍नसामग्री साठवणे, एका इशारेवजा संदेशाचा प्रचार करणे, आणि आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या सुदृढ ठेवणे—ते सर्व विचारात घेता, ‘देवाने जे सांगितले’ होते त्याप्रमाणे करणे साधीसुधी गोष्ट नव्हती. तरीसुद्धा, नोहाने दाखवलेला विश्‍वास आणि धीर यांमुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे जीवन वाचले आणि त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले.

१४. अब्राहाम व सारा यांनी कोणत्या परीक्षांचा धीराने सामना केला? त्यांच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१४ पौल पुढे म्हणतो की आपण ज्या “साक्षीरूपी मेघाने वेढलेले” आहोत त्यात अब्राहाम व सारादेखील समाविष्ट आहेत. देवाने त्यांना ऊर हा आपला मायदेश सोडून जाण्यास सांगितले तेव्हा त्यांचे जीवन पार बदलून गेले; त्यांना आपले भविष्य अनिश्‍चित वाटत होते. त्यांनी परीक्षांच्या काळात अतूट विश्‍वास व आज्ञाधारकपणा दाखवला. अब्राहाम खऱ्‍या उपासनेसाठी कोणतेही त्याग करण्यास तयार होता, त्यामुळे त्याला ‘विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचा बाप’ असे उचितपणे म्हणण्यात आले. (रोम. ४:११) पौलाने ज्यांना आपले पत्र लिहिले होते त्यांना अब्राहामाविषयी व त्याच्या कुटुंबीयांविषयी सविस्तर माहिती असल्यामुळे, पौलाने त्यांच्याविषयी केवळ काही गोष्टींचा उल्लेख केला. तरीसुद्धा, अब्राहामाचा व त्याच्या कुटुंबीयांचा विश्‍वास किती अढळ होता हे दाखवण्यास त्या गोष्टी पुरेशा होत्या. पौलाने म्हटले: “हे सर्व जण [ज्यात अब्राहामाचा व त्याच्या कुटुंबाचाही समावेश होता] विश्‍वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहो असे पत्करले.” (इब्री ११:१३) स्पष्टच आहे, की देवावरील त्यांचा विश्‍वास व त्याच्यासोबत त्यांचा वैयक्‍तिक नातेसंबंध यांमुळे त्यांना जीवनाच्या शर्यतीत धीराने धावणे शक्य झाले.

१५. मोशेने देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे का पसंत केले?

१५ मोशे हा ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेला यहोवाचा आणखी एक अनुकरणीय सेवक आहे. अब्राहामाप्रमाणे मोशेनेदेखील आपले घर सोडले. त्याने राजमहालातील वैभव व धनसंपत्ती सोडून दिली आणि त्याऐवजी, ‘देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले.’ कोणत्या गोष्टीमुळे त्याला असे करण्याची प्रेरणा मिळाली? पौलाने याचे उत्तर दिले: “त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. . . . जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२४-२७ वाचा.) मोशे ‘पापाच्या क्षणिक सुखामुळे’ विकर्षित झाला नाही. त्याच्यासाठी देव आणि देवाच्या प्रतिज्ञा इतक्या खऱ्‍या होत्या की त्याने असामान्य धैर्य आणि धीर दाखवला. इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून प्रतिज्ञात देशात नेण्यासाठी त्याने अथक परिश्रम केले.

१६. मोशेला प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली नाही तेव्हा तो निराश का झाला नाही?

१६ अब्राहामाप्रमाणेच, मोशेनेदेखील आपल्या जीवनकाळात देवाच्या प्रतिज्ञेची पूर्णता पाहिली नाही. इस्राएल लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर उभे होते तेव्हा मोशेला असे सांगण्यात आले: “जो देश मी इस्राएल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील पण तेथे तुझे जाणे होणार नाही.” याचे कारण, याआधी इस्राएल लोकांच्या बंडखोर वृत्तीमुळे चेतवले जाऊन त्याने व अहरोनाने ‘मरीबा नावाच्या झऱ्‍याजवळ इस्राएल लोकांदेखत [देवाचा] विश्‍वासघात केला’ होता. (अनु. ३२:५१, ५२) पण, यामुळे मोशे निराश झाला का, किंवा त्याने मनात राग बाळगला का? नाही. त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला आणि शेवटी म्हटले: “हे इस्राएला, तू धन्य आहेस; परमेश्‍वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तरवार आहे.”—अनु. ३३:२९.

आपल्याकरता धडे

१७, १८. (क) जीवनाच्या शर्यतीविषयी, ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेल्यांकडून आपण काय शिकू शकतो? (ख) पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१७ ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेल्या काहींच्या जीवनाचे आपण जे परीक्षण केले, त्यावरून हे स्पष्ट होते की जीवनाच्या शर्यतीत शेवटपर्यंत धावण्यासाठी आपण देवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर पूर्ण विश्‍वास ठेवला पाहिजे. (इब्री ११:६) देवावरील हा विश्‍वास आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूतून दिसून आला पाहिजे. ज्यांचा देवावर विश्‍वास नाही अशांसाठी सध्याचेच जीवन सर्व काही आहे; पण यहोवाचे सेवक या नात्याने आपण सध्याच्या जीवनाच्या पलीकडे म्हणजे एका उज्ज्वल भविष्याकडे पाहू शकतो. देव “अदृश्‍य” असला, तरी आपल्यासाठी तो खरा आहे आणि त्यामुळे जीवनाच्या शर्यतीत आपण धीराने धावू शकतो.—२ करिंथ. ५:७.

१८ ख्रिस्ती जीवनाची शर्यत सोपी नाही. तरीसुद्धा, जीवनाची ही शर्यत आपण यशस्वी रीत्या पूर्ण करू शकतो. याकरता आणखी कोणती मदत उपलब्ध आहे याविषयी आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• पौलाने प्राचीन काळातील विश्‍वासू साक्षीदारांविषयी सविस्तरपणे का लिहिले?

• ‘साक्षीरूपी मेघात’ समाविष्ट असलेल्यांच्या उदाहरणामुळे आपल्याला धीराने शर्यतीत धावण्यास कशी मदत मिळते?

• नोहा, अब्राहाम, सारा आणि मोशे यांसारख्या विश्‍वासू साक्षीदारांविषयीच्या चर्चेवरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

[१९ पानांवरील चित्र]

अब्राहाम व सारा ऊरमधील ऐशआरामाच्या जीवनाचा त्याग करण्यास तयार होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा