वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. १७-२१
  • तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उचित पोषण—अत्यावश्‍यक
  • आपल्याला प्रोत्साहन देणारे प्रेक्षक
  • वेग सुज्ञपणे ठरवा
  • प्रतिफळाकडे दृष्टी लावा
  • अंत जवळ येत असता
  • जीवनाच्या शर्यतीत धीराने धावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तुम्ही जीवनाची धाव कशी धावत आहात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “असे धावा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • जीवनाच्या धावेवर हार मानू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. १७-२१

तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकता

‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आपण धीराने धावावे.’—इब्री लोकांस १२:१.

१, २. धीर धरण्याचा अर्थ काय होतो?

“तुम्हाला सहनशक्‍तीचे [धीराचे] अगत्य आहे,” असे प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्‍चनांना लिहिले. (इब्री लोकांस १०:३६) या गुणाच्या महत्त्वावर जोर देताना प्रेषित पेत्रानेही ख्रिश्‍चनांना आर्जवले: “विश्‍वासात . . . धीराची . . . भर घाला.” (२ पेत्र १:५, ६) पण धीर म्हणजे नेमके काय?

२ एक ग्रीक-इंग्रजी शब्दकोश, “धीर” यासाठी असलेल्या ग्रीक क्रियापदाची व्याख्या, “पळून जाण्यापेक्षा टिकून राहणे . . . निश्‍चल, टिकाव धरणे” अशी करतो. “धीर” यासाठी असलेल्या ग्रीक नामाविषयी एक पुस्तक म्हणते: “धीर हा मनाचा कल आहे जो केवळ शरणागतीने नव्हे तर उज्ज्वल आशेमुळे गोष्टी सहन करु शकतो . . . हा असा गुण आहे जो मनुष्याला वाऱ्‍याचा सामना करताना टिकवून ठेवतो. तसेच हा सद्‌गुण कठीण परीक्षाचे रुपांतर महिमेत करतो, व दुःखापेक्षा ध्येयाकडे त्याचे लक्ष असते.” तेव्हा, धीर एखाद्याला अडथळ्यांचा व हालअपेष्टांचा सामना करत असताना दृढ राहण्यास व आशा न सोडण्यास साहाय्य करतो. या गुणाची विशेषतः कोणाला आवश्‍यकता आहे?

३, ४. (अ) धीराची कोणाला गरज आहे? (ब) आपण शेवटपर्यंत धीर का धरला पाहिजे?

३ सर्व ख्रिस्ती लोक लाक्षणिकरीत्या अशा एका शर्यतीत आहेत जेथे धीराची गरज आहे. सा.यु. ६५ च्या सुमारास, प्रेषित पौलाने त्याचा सहकर्मचारी आणि विश्‍वासू प्रवासी सोबती तीमथ्य याला हे सांत्वनदायक शब्द लिहिले: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.” (२ तीमथ्य ४:७) “धाव संपविली आहे,” या वाक्यांशाद्वारे पौल ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनाची तुलना, ठराविक कालावधी व अंतिम रेषा असलेल्या एका शर्यतीबरोबर करीत होता. आणि त्यावेळेपर्यंत पौल शर्यतीच्या अंताच्या जवळ आला होता व प्रतिफळ मिळण्याची त्याला खात्री होती. तो म्हणाला: “आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल.” (२ तीमथ्य ४:८) आपल्याला बक्षीस मिळणार आहे याची पौलाला खात्री होती कारण त्याने शेवटपर्यंत धीर धरला होता. आपल्या सर्वांबद्दल काय?

४ शर्यतीत भाग घेणाऱ्‍या सर्वांना उत्तेजन देण्याकरता पौलाने लिहिले: ‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आपण धीराने धावू या.’ (इब्री लोकांस १२:१) ख्रिस्ती या नात्याने, आपण येशू ख्रिस्ताद्वारे यहोवा देवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा धीराच्या या शर्यतीत प्रवेश करतो. शिष्यत्वाच्या मार्गावर चांगली सुरवात महत्त्वाची आहे खरी, परंतु शेवटी, शर्यत संपवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) यशस्वीरीत्या शर्यत पूर्ण करणाऱ्‍यांचे बक्षीस आहे, सार्वकालिक जीवन! यास्तव, मनात एखादे ध्येय बाळगून आपण शेवटपर्यंत धीर धरला पाहिजे. ते ध्येय प्राप्त करण्यास काय आपल्याला साहाय्य करील?

उचित पोषण—अत्यावश्‍यक

५, ६. (अ) जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत राहण्याकरता आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे? (ब) आपण सर्वांनी कोणत्या आध्यात्मिक तरतूदींचा फायदा घेतला पाहिजे व का?

५ ग्रीसमधील करिंथ शहरानजिक एक ठिकाण होते जेथे प्राचीन काळी इस्थमियन खेळ खेळले जायचे. तेथे होणारे खेळ आणि स्पर्धा यांविषयी करिंथमधील बांधवांना माहिती होती हे पौल निश्‍चितच जाणून होता. त्यांना माहीत असलेल्या ज्ञानानुसार त्याने त्यांना, ते ज्या जीवनाच्या शर्यतीत उतरले होते त्या शर्यतीची आठवण करून दिली; तो म्हणाला: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षिस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल.” शर्यतीत टिकून राहून शेवट येईपर्यंत पुढे जात राहण्याच्या महत्त्वावर पौल येथे जोर देत होता. कशामुळे ते असे करू शकत होते? तो पुढे म्हणाला: “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.” प्राचीन काळच्या खेळांमधील स्पर्धक काटेकोरपणे प्रशिक्षण घ्यायचे, खाण्यापिण्याविषयी कडक पथ्य पाळायचे व विजय मिळावा म्हणून आपल्या सर्व कार्यहालचालींवर नियंत्रण ठेवायचे.—१ करिंथकर ९:२४, २५.

६ ख्रिश्‍चनांनी प्रवेश घेतलेल्या शर्यतीविषयी काय? “तुम्हाला जीवनाच्या शर्यतीत टिकून राहायचे आहे तर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक पोषणाकडे लक्ष दिले पाहिजे,” असे यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील एक वडील म्हणतात. ‘धीर देणारा देव’ यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या आध्यात्मिक भोजनाचा विचार करा. (रोमकर १५:५) आपल्या आध्यात्मिक भरणपोषणाचा मुख्य उगम, त्याचे वचन बायबल हे आहे. तेव्हा, नियमित बायबल वाचनासाठी आपण एक चांगले वेळापत्रक करायला नको का? शिवाय, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ यहोवा टेहळणी बुरूज व सावध राहा! ही समयोचित नियतकालिके आणि बायबल आधारित प्रकाशने पुरवत आहे. (मत्तय २४:४५) या प्रकाशनांचा मेहनतीने अभ्यास केल्याने आपण आध्यात्मिकरीत्या दृढ होऊ शकतो. होय, व्यक्‍तिगत अभ्यासासाठी आपण वेळ काढला पाहिजे, “वेळेचा सदुपयोग” केला पाहिजे.—इफिसकर ५:१६.

७. (अ) केवळ प्राथमिक ख्रिस्ती शिकवणी शिकून घेण्यावरच आपण समाधान का मानू नये? (ब) आपण “प्रौढतेप्रत” कसे जाऊ शकतो?

७ ख्रिस्ती शिष्यत्वाच्या मार्गावर आपल्याला राहायचे आहे तर आपण ‘प्राथमिक शिक्षणावरच’ न थांबता “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” केला पाहिजे. (इब्री लोकांस ६:१, २) यासाठी आपल्याला स्वतःमध्ये सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” याबद्दल आवड निर्माण केली पाहिजे व ‘प्रौढांसाठी असलेल्या जड अन्‍नातून’ पोषण मिळवले पाहिजे. (इफिसकर ३:१८; इब्री लोकांस ५:१२-१४) उदाहरणार्थ, पृथ्वीवर येशूच्या जीवनाबद्दलच्या चार विश्‍वसनीय अहवालांचा अर्थात मत्तय, मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानांचा विचार करा. या शुभवर्तमान अहवालांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर, येशूने केलेल्या कार्यांची व तो कशाप्रकारची व्यक्‍ती होता केवळ यांचीच माहिती मिळत नाही तर कोणत्या विचारशैलीने त्याला अशी कार्ये करण्यास प्रवृत्त केले तेही आपल्याला समजू शकेल. तेव्हा मग आपलेही “ख्रिस्ता[सारखे] मन” होईल.—१ करिंथकर २:१६.

८. जीवनाच्या शर्यतीत धीराने धावण्यास ख्रिस्ती सभा आपल्याला कशाप्रकारे मदतदायी ठरतात?

८ पौलाने आपल्या सहविश्‍वासूंना सल्ला दिला: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ती सभा या खरोखरच उत्तेजनाचा स्रोत आहेत! आपली काळजी घेणाऱ्‍या व आपण शेवटपर्यंत धीर धरून राहावे म्हणून आपल्याला मदत करणाऱ्‍या आपल्या प्रेमळ बंधूभगिनींबरोबर असणे किती तजेला देणारे आहे! यहोवाकडून आलेल्या या प्रेमळ तरतुदीला आपण कधीही हलके समजू नये. काटेकोर व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे व सभांना नियमित उपस्थित राहण्याद्वारे आपण “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” होऊ या.—१ करिंथकर १४:२०.

आपल्याला प्रोत्साहन देणारे प्रेक्षक

९, १०. (अ) धीराच्या शर्यतीत प्रेक्षक उत्तेजनाचा स्रोत कसे ठरू शकतात? (ब) इब्री लोकांस १२:१ मध्ये उल्लेखण्यात आलेले ‘मेघरूपी साक्षीदार’ कोण आहेत?

९ एखादा धावपटू कितीही चांगल्याप्रकारे तयार असला तरी, तो धावत असताना अशा काही गोष्टी घडू शकतात ज्या त्याच्यापुढे अडखळण ठरू शकतात. “तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?” असे पौलाने विचारले. (गलतीकर ५:७) यावरून कळून येते, की काही गलतीकर ख्रिश्‍चनांना वाईट लोकांची संगत जडल्यामुळे, जीवनाच्या शर्यतीत धावताना त्यांचे मन विचलित झाले होते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, इतरांकडून पाठिंबा आणि उत्तेजन मिळाल्याने या शर्यतीत धीराने धावत राहण्यास सोपे जाते. एखाद्या खेळात प्रेक्षक, खेळाडूंवर पाडत असलेल्या प्रभावाप्रमाणेच हे आहे. उत्साही प्रेक्षक, खेळाडूंना सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रेरणा देण्यासाठी उत्साह वाढवत राहतात. प्रेक्षकांचा जयजयकार आणि बऱ्‍याच वेळा त्याबरोबर जोराने लावलेले संगीत व टाळ्यांचा गजर खेळाडूंना, खेळाच्या शेवटी जसजसे ते येतात तसतसे त्यांना ज्यादा हिरहीरी देते. होय, खेळाडूंचे चाहते खेळाडूंवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात.

१० ख्रिश्‍चन जीवनाच्या ज्या शर्यतीत धावत आहेत त्यात प्रेक्षक कोण आहेत? इब्री लोकांस पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात ख्रिस्त-पूर्व काळातील यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांची यादी सांगितल्यावर पौलाने लिहिले: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” (इब्री लोकांस १२:१) पौलाने मेघ यासारख्या रूपकाचा उपयोग केला तेव्हा त्याने, ठराविक विस्ताराच्या व आकाराच्या मेघाचे वर्णन करणाऱ्‍या ग्रीक शब्दाचा उपयोग केला नाही. तर, कोशकार डब्लू. ई. वाईन यांच्यानुसार त्याने, “आकाशातील ढगाळ दिसणाऱ्‍या व असंख्य मेघांना” सूचित होणारा शब्द वापरला. स्पष्टतः, पौलाच्या मनात साक्षीदारांचा मोठा समूह होता; हा समूह इतका मोठा होता की तो मेघांप्रमाणे वाटत होता.

११, १२. (अ) ख्रिस्त-पूर्व काळातील विश्‍वासू साक्षीदार आपल्याला धीराने शर्यतीत धावत राहण्यास प्रोत्साहन कसे देतील? (ब) ‘मेघरूपी साक्षीदारांकडून’ आपण पूर्ण फायदा कशाप्रकारे मिळवू शकतो?

११ ख्रिस्त-पूर्व काळातील विश्‍वासू ख्रिस्ती आजचे खरोखरचे प्रेक्षक होऊ शकतात का? ते शक्य नाही. ते तर मृत्यूत निद्रा घेत आहेत व पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत. परंतु, ते जिवंत होते तेव्हा यशस्वी धावपटू होते; त्यांचे उदाहरण बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहे. आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करतो तेव्हा जणू हे विश्‍वासू जन आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः उभे राहतात व शेवटपर्यंत शर्यतीत टिकून राहण्यास आपल्याला जणू काय प्रोत्साहन देत राहतात.—रोमकर १५:४.a

१२ उदाहरणार्थ, आपल्याला जगात मोठे स्थान मिळवण्याच्या संधी मिळतात तेव्हा, मोशेने इजिप्तमधील ऐश्‍वर्याचा त्याग कसा केला यावर विचार केल्याने कदाचित आपणही शर्यतीत धावत राहण्यास प्रवृत्त होणार नाही का? आपल्यावर आलेली परीक्षा खूपच कठीण वाटते तेव्हा, आपल्या पुत्राला बलिदान करण्याची अब्राहामाला आज्ञा देण्यात आली तेव्हा त्याला किती कठीण गेले असेल याचा विचार केल्याने आपल्याला निश्‍चितच विश्‍वासाच्या स्पर्धेत हार न मानण्याचे उत्तेजन मिळू शकेल. हे ‘मेघरूपी’ साक्षीदार अशाप्रकारे आपल्याला कितपत प्रेरणादायक ठरणार आहेत ते, आपण आपल्या ज्ञानचक्षुंनी त्यांना किती स्पष्टपणे पाहतो त्यावर अवलंबून आहे.

१३. आधुनिक दिवसांतील यहोवाचे साक्षीदार आपल्याला जीवनाच्या शर्यतीत प्रेरणा कशी देत राहतात?

१३ या आधुनिक दिवसांतही आपल्या सभोवती यहोवाचे अनेक साक्षीदार आहेत. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी व स्त्रीपुरुषांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाने’ विश्‍वासाची कितीतरी उत्तम उदाहरणे मांडली आहेत! (प्रकटीकरण ७:९) या मासिकात आणि वॉच टावर प्रकाशनांत आपण वेळोवेळी त्यांच्या जीवन कथा वाचू शकतो.b त्यांच्या विश्‍वासावर आपण मनन करतो तेव्हा शेवटपर्यंत धीर धरण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळते. शिवाय, विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्‍या आपल्या जवळच्या मित्रजनांचा व आप्तजनांचा पाठिंबा असणे किती सुखदायक आहे! होय, जीवनाच्या शर्यतीत आपल्याला प्रोत्साहन देणारे अनेकजण आहेत.

वेग सुज्ञपणे ठरवा

१४, १५. (अ) आपण आपल्या धावण्याचा वेग सुज्ञपणे ठरवणे महत्त्वाचे का आहे? (ब) ध्येय ठेवताना आपण समजदार का असले पाहिजे?

१४ लांब पल्ल्याच्या शर्यतीत म्हणजे मॅरेथॉन शर्यतीत धावताना धावपट्टूने त्याचा वेग सुज्ञपणे ठरवला पाहिजे. न्यू यॉर्क रनर नावाच्या एका मासिकाने म्हटले, “सुरवातीलाच वेगाने धावण्यास सुरू केल्याने तुम्हाला कदाचित यश मिळणार नाही. तुम्हाला एकतर शेवटचे अनेक मैल जोराचा यत्न करावा लागेल किंवा शर्यत मध्येच सोडावी लागेल.” मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या एकाने म्हटले: “शर्यतीच्या तयारीनिमित्त असलेल्या एका भाषणाला मी उपस्थित राहिलो होतो तेव्हा वक्‍त्‌याने स्पष्टपणे ताकीद दिली होती: ‘वेगाने धावणाऱ्‍यांबरोबर तुम्हीही धावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जमेल त्या वेगाने धावा. नाहीतर तुम्ही थकाल आणि कदाचित तुम्हाला शर्यत मध्येच सोडून द्यावी लागेल.’ या सल्ल्याचे पालन केल्यामुळे मी माझी शर्यत पूर्ण करू शकलो.”

१५ जीवनाच्या शर्यतीत, देवाच्या सेवकांना जोराचा यत्न करावा लागेल. (लूक १३:२४) पण शिष्य याकोबाने लिहिले: “वरून येणारे ज्ञान . . . समजूत होण्याजोगे . . . आहे.” (याकोब ३:१७) इतरांची सुंदर उदाहरणे आपल्याला आणखी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देत असली तरी, समजूतदारपणा आपल्याला, आपल्या क्षमता आणि परिस्थिती यांच्या सुसंगतेत वास्तविक ध्येये ठेवण्यास मदत करील. शास्त्रवचने आपल्याला आठवण करून देतात: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:४, ५.

१६. नम्रता आपल्याला वेग ठरवण्यास मदत कशी करू शकते?

१६ मीखा ६:८ मध्ये आपल्याला एक प्रश्‍न विचारण्यात आला आहे जो विचारप्रवर्तक आहे: “देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?” नम्रतेत, आपल्या मर्यादांची आपल्याला जाण असणे समाविष्ट आहे. आपली ढासळत चाललेली तब्येत किंवा वाढते वय यांमुळे देवाच्या आपल्या सेवेवर काही मर्यादा आल्या आहेत का? असल्यास, निराश होऊ नका. आपल्याजवळ ‘जे नाही त्यानुसार नव्हे तर जे आहे त्यानुसार’ यहोवा आपले परिश्रम व त्याग स्वीकारतो.—२ करिंथकर ८:१२; पडताळा लूक २१:१-४.

प्रतिफळाकडे दृष्टी लावा

१७, १८. कशावर लक्ष केंद्रित ठेवल्याने येशूला मृत्यू सहन करण्यास मदत मिळाली?

१७ जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत राहण्याच्या आवश्‍यकतेवर करिंथमधील ख्रिश्‍चनांचे लक्ष वेधताना पौलाने इस्थमियन खेळांतील आणखी एका पैलूचा उल्लेख केला ज्याचा त्यांनी विचार करणे महत्त्वाचे होते. त्या खेळांतील स्पर्धकांबद्दल पौलाने लिहिले: “ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी [धावतात], आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी [धावतो]. म्हणून मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्‍यावर मुष्टिप्रहार करीत नाही.” (१ करिंथकर ९:२५, २६) त्या प्राचीन काळच्या खेळांमध्ये विजेत्याला एक मुकुट किंवा पाईन अथवा दुसऱ्‍या कोणत्याही पानांचे बनवलेले डोक्यावर घालण्याचे पुष्पचक्र बक्षीस म्हणून दिले जात असे; पण हे बक्षीस निश्‍चितच एक “नाशवंत मुगूट” होते. पण, शेवटपर्यंत धीर धरणाऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी काय राखून ठेवण्यात आले आहे?

१८ आपल्यापुढे ज्याचे उदाहरण आहे त्या येशू ख्रिस्ताविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री लोकांस १२:२) येशूने आपल्या मानवी जीवनाच्या शेवटापर्यंत धीर धरला; त्याने आपले लक्ष मृत्यूनंतर मिळणाऱ्‍या प्रतिफळावर केंद्रित केले; हे प्रतिफळ म्हणजे, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण केल्यावर, मानवजातीला मृत्यूपासून सुटका केल्यावर आणि राजा व महायाजक या नात्याने शासन करून आज्ञाधारक मानवांना परादीस पृथ्वीवर अनंत जीवन पुन्हा मिळवून दिल्यावर मिळणारा आनंद होय.—मत्तय ६:९, १०; २०:२८; इब्री लोकांस ७:२३-२६.

१९. ख्रिस्ती शिष्यत्वाच्या मार्गावर धावत असताना आपण कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे?

१९ ख्रिस्ती शिष्यत्वाच्या मार्गावर चालत राहिल्याने आपल्यापुढे असलेल्या आनंदाचा विचार करा. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे व इतरांना बायबलमधील जीवन-रक्षक ज्ञान सांगण्याचे मनाला संतुष्ट करणारे काम यहोवाने आपल्याला दिले आहे. (मत्तय २८:१९, २०) खऱ्‍या देवाला जाणून घेण्याची आवड असलेली एखादी व्यक्‍ती आपल्याला भेटते व आपण तिला जीवनाच्या शर्यतीत प्रवेश करण्यास मदत करतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! आपण प्रचार करतो त्या लोकांचा प्रतिसाद कसाही असला तरी, यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाशी संबंधित असलेल्या कार्यात आपलाही भाग असणे एक विशेषाधिकार आहे. आपण ज्या भागात साक्षीकार्य करतो तेथील लोक उदासीनता दाखवत असले तरी किंवा विरोध करीत असलेतरी आपण धीराने सेवा करतो तेव्हा, यहोवाला संतुष्ट करीत असल्याचा आनंद आपल्याला होतो. (नीतिसूत्रे २७:११) आणि त्याने आपल्याला ज्या प्रतिफळाचे अभिवचन दिले आहे ते आहे, सार्वकालिक जीवन. तो हर्षाचा समय असेल! या आशीर्वादांवर आपण आपले लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे व शर्यतीत टिकून राहिले पाहिजे.

अंत जवळ येत असता

२०. अंत जसजसा जवळ येतो तसतसे जीवनाची शर्यत आणखी कठीण कशी होऊ शकते?

२० जीवनाच्या शर्यतीत धावताना आपल्याला आपला प्रमुख शत्रू, दियाबल सैतान याचाही सामना करावा लागतो. आपण अंताच्या जसजसे जवळ जात आहोत तसतसे तो आपला वेग कमी करण्याचा किंवा आपल्यासमोर अडथळे निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) ‘अंतसमयाला’ चित्रित करणारी युद्धे, दुष्काळ, रोगराई आणि इतर कष्टमय गोष्टींनी वेढलेले असता, विश्‍वासू, राज्याचे समर्पित उद्‌घोषक म्हणून आपले काम चालू ठेवणे इतके सोपे नाही. (दानीएल १२:४; मत्तय २४:३-१४; लूक २१:११; २ तीमथ्य ३:१-५) शिवाय, कधीकधी आपण अपेक्षा करतो त्यापेक्षाही कितीतरी दूर अंत आहे असे आपल्याला वाटेल; आपण जीवनाच्या शर्यतीत खूप वर्षांपूर्वी प्रवेश केला असल्यास असे वाटणे साहजिक आहे. तरीपण, अंत हा येणारच याची देवाचे वचन आपल्याला हमी देते. त्याला विलंब होणार नाही, असे यहोवा म्हणतो. अंत आपल्या दृष्टीसमोर आहे.—हबक्कूक २:३; २ पेत्र ३:९, १०.

२१. (अ) जीवनाच्या शर्यतीत आपण धावत राहतो तसे कोणती गोष्ट आपल्याला दृढ करील? (ब) अंत जवळ येत असता आपला काय दृढ निश्‍चय असला पाहिजे?

२१ तेव्हा, जीवनाच्या शर्यतीत विजयी होण्याकरता आपण यहोवा प्रेमळपणे आपल्याला पुरवत असलेल्या आध्यात्मिक भरणपोषणातून शक्‍ती मिळवली पाहिजे. शिवाय, आपल्याबरोबर धावणाऱ्‍या आपल्या सहविश्‍वासूंसोबत नियमित संगती केल्यामुळे मिळणाऱ्‍या उत्तेजनाचीही आपल्याला आवश्‍यकता आहे. कडक छळ व अचानक ओढवणाऱ्‍या परिस्थितींमुळे शर्यतीत धावणे आपल्याला कठीण जात असले तरी, यहोवा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देत असल्यामुळे आपण शेवटपर्यंत धीर धरू शकतो. (२ करिंथकर ४:७) आपण या शर्यतीत विजयी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे हे माहीत होणे किती दिलासा देणारे आहे! “आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल,” हा भरवसा ठेवून आपण “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने” धावत राहण्याचा दृढ निश्‍चय करू या.—इब्री लोकांस १२:१; गलतीकर ६:९.

[तळटीपा]

a इब्री लोकांस ११:१–१२:३ वचनावरील चर्चेसाठी टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९८८, पृष्ठे २१-२६ पाहा.

b अशा प्रोत्साहनदायक अनुभवांची अलिकडील उदाहरणे जून १, १९९८, पृष्ठे २८-३१; सप्टेंबर १, १९९८, पृष्ठे २४-८; फेब्रुवारी १, १९९९, पृष्ठे २५-९ टेहळणी बुरूज नियतकालिकात मिळतील.

तुम्हाला आठवते का?

◻ आपण शेवटपर्यंत धीर का धरला पाहिजे?

◻ यहोवाकडून येणाऱ्‍या कोणत्या तरतुदींकडे आपण दुर्लक्ष करू नये?

◻ आपण धावण्याचा आपला वेग सुज्ञपणे का ठरवला पाहिजे?

◻ आपण शर्यतीत शेवटपर्यंत धावत राहिल्यानंतर आपल्यापुढे कोणता आनंद आहे?

[१८ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती सभांद्वारे उत्तेजन मिळवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा