वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 जानेवारी पृ. १७-२१
  • सर्वकाही देणाऱ्‍याला आपण काय द्यावं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वकाही देणाऱ्‍याला आपण काय द्यावं?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण यहोवाला भेटवस्तू का देतो?
  • प्राचीन काळात सेवकांनी दिलेलं दान
  • आज आपण दान कसं देऊ शकतो?
  • दिलेल्या दानाचा उपयोग
  • यहोवाला दिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • आम्हाला काही मदत द्यायची असेल तर ती कशी देता येईल?
    आमची राज्य सेवा—२००५
  • समृद्धीतून भागवलेली गरज
    तुमच्या दानाचा वापर
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 जानेवारी पृ. १७-२१
एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत पैसे मोजते आणि आपल्या आईला एक भेट देताना

सर्वकाही देणाऱ्‍याला आपण काय द्यावं?

“आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो.”—१ इति. २९:१३.

गीत क्रमांक: १, ४८

तुम्हाला काय वाटतं?

  • आपल्या मौल्यवान वस्तूंचा उपयोग आपण दान देण्यासाठी करावा अशी अपेक्षा यहोवा का करतो?

  • प्राचीन काळातल्या सेवकांनी उपासनेच्या व्यवस्थेला आर्थिक रीत्या हातभार कसा लावला?

  • आज आपण देत असलेल्या दानाचा उपयोग संघटना कशी करते?

१, २. यहोवा आपल्याला उदारतेने देतो असं का म्हणता येईल?

यहोवा हा उदार देव आहे. आपल्याजवळ आज जे काही आहे ते यहोवामुळेच आहे. पृथ्वीवरच्या सर्व मौल्यवान गोष्टींवर त्याचा हक्क आहे आणि तो त्यांचा उपयोग पृथ्वीवरचं जीवन टिकवून ठेवण्यासाठी करतो. (स्तो. १०४:१३-१५; हाग्ग. २:८) काही वेळा या गोष्टींचा उपयोग करून यहोवाने चमत्कारिक रीतीने आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. बायबल अहवालांवरून आपल्याला हे दिसून येतं.

२ उदाहरणार्थ, इस्राएली लोक जेव्हा ४० वर्षं अरण्यात होते, तेव्हा यहोवाने त्यांना मान्‍ना आणि पाणी पुरवलं. (निर्ग. १६:३५) यामुळे आपण म्हणू शकतो की यहोवाने त्यांना गरजेच्या सर्व गोष्टी पुरवल्या. (नहे. ९:२०, २१) तसंच, एका विश्‍वासू विधवेला मदत करण्यासाठी यहोवाने अलीशाला चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. तिच्याकडे खूप कमी तेल होतं, पण अलीशाने केलेल्या चमत्कारामुळे त्या तेलाचं प्रमाण खूप वाढलं आणि ते विकून तिला भरपूर पैसे मिळाले. यामुळे तिला तिचं सर्व कर्ज फेडता आलं आणि ती आपल्या कुटुंबाच्या गरजाही भागवू शकली. (२ राजे ४:१-७) शिवाय, येशूने यहोवाच्या मदतीने लोकांना अन्‍न पुरवलं आणि एक वेळ तर पैसेही.—मत्त. १५:३५-३८; १७:२७.

३. आपण या लेखात काय पाहणार आहोत?

३ यहोवा आपल्या सृष्टीला मदत करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा उपयोग करू शकतो. असं असलं तरी तो त्याच्या उपासकांना उत्तेजन देतो की त्यांनी आपल्या क्षमतेनुसार संघटनेच्या कामाला हातभार लावावा. (निर्ग. ३६:३-७; नीतिसूत्रे ३:९ वाचा.) यहोवा आपल्याकडून अशी अपेक्षा का करतो की आपण त्याला आपल्या मौल्यवान वस्तू द्याव्यात? प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांनी त्याच्या कामाला आर्थिक रीत्या हातभार कसा लावला? आज आपण जे दान देतो त्याचा उपयोग संघटना कशी करते? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील.

आपण यहोवाला भेटवस्तू का देतो?

४. यहोवाला भेटवस्तू देऊन आपण काय दाखवत असतो?

४ आपण यहोवाला भेट देतो कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याची कदर आहे. यहोवाने आपल्यासाठी आजपर्यंत जे काही केलं आहे त्यावर आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपलं मन कृतज्ञतेने भरून येतं. मंदिराची बांधणी करण्यासाठी लागणाऱ्‍या गोष्टींबद्दल सांगताना राजा दावीदलाही असंच वाटलं. त्याने म्हटलं की आपल्याजवळ जे काही आहे ते यहोवानेच दिलं आहे आणि त्याने दिलेल्या गोष्टींमधूनच आपण त्याला देतो.—१ इतिहास २९:११-१४ वाचा.

५. मनापासून दान देणं हा खऱ्‍या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे हे बायबल कसं सांगतं?

५ यहोवाला भेटवस्तू देण्याचं आणखी एक कारण म्हणजे, हा त्याची उपासना करण्याचा एक मार्ग आहे. योहानने एका दृष्टांतात यहोवाच्या स्वर्गातील सेवकांना असं म्हणताना ऐकलं: “यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.” (प्रकटी. ४:११) आपण गौरव आणि सन्मान फक्‍त यहोवालाच दिला पाहिजे. यामुळे आपण त्याला सर्वोत्तम देऊ इच्छितो. मोशेद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना वर्षातून तीन वेळा सण साजरा करण्यासाठी सांगितलं. या सणांमध्ये उपासना करण्यात यहोवाला काही भेटवस्तू देणंही सामील होतं. लोकांना सांगण्यात आलं होतं की त्यांनी “परमेश्‍वरासमोर रिक्‍त हस्ते येऊ नये.” (अनु. १६:१६) आजदेखील मनापासून दान देणं, हा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं करून आपण दाखवतो की यहोवाची संघटना जे काम करत आहे त्याची आपण कदर करतो आणि त्याला हातभार लावण्याची आपली इच्छा आहे.

६. इतरांना देण्याची वृत्ती चांगली का आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

६ यहोवा आपल्याला उदारतेने देतो. म्हणून आपणही त्याला उदारतेने दिलं पाहिजे. (प्रेषितांची कार्ये २०:३५ वाचा.) एका लहान मुलीची कल्पना करा. तिला तिचे आईवडील नेहमी खाऊसाठी काही पैसे देतात. पण त्या साठवलेल्या पैशातून ती तिच्या आईवडिलांसाठी एक भेट आणते. हे पाहून आईवडिलांना कसं वाटेल? किंवा कल्पना करा की एक तरुण पायनियर आपल्या आईवडिलांना घरखर्चासाठी किंवा घरभाडं भरण्यासाठी थोडीफार मदत करतो. कदाचित त्याचे आईवडील त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत नसतील. पण तरी त्याने प्रेमाने दिल्यामुळे ते त्याची मदत स्वीकारतील. असं का? कारण त्या तरुण पायनियरच्या मनात त्याच्या आईवडिलांसाठी कदर आहे आणि म्हणून मदत करायची त्याची इच्छा आहे. या उदाहरणांवरून आपण समजू शकतो की यहोवाला आपल्या मौल्यवान वस्तू देऊन आपण त्याचं मन आनंदित करत असतो.

प्राचीन काळात सेवकांनी दिलेलं दान

७, ८. प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांनी दान देण्याच्या बाबतीत पुढील क्षेत्रात चांगलं उदाहरण कसं मांडलं, (क) विशिष्ट कामांसाठी? (ख) यहोवाच्या सेवेसाठी?

७ बायबलमध्ये आपल्याला अशा सेवकांबद्दल वाचायला मिळतं, ज्यांनी यहोवाने केलेल्या उपासनेच्या व्यवस्थेसाठी दान दिलं. काही वेळा त्यांनी विशिष्ट कामांसाठी दान दिलं. उदाहरणार्थ, निवासमंडपाच्या बांधकामासाठी इस्राएली लोकांनी दान द्यावं असं प्रोत्साहन मोशेने त्यांना दिलं. पुढे, मंदिराच्या बांधकामासाठी दावीद राजानेही लोकांना असंच प्रोत्साहन दिलं. (निर्ग. ३५:५; १ इति. २९:५-९) यहोआश राजाच्या कारकिर्दीत लोकांनी दिलेल्या पैशांचा वापर याजकांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी केला. (२ राजे १२:४, ५) तसंच, पहिल्या शतकात यहूदीयामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि तिथल्या बांधवांना मदतीची गरज होती. हे जेव्हा इतर बांधवांना कळलं तेव्हा त्यांनी आपआपल्या ऐपतीनुसार तिथल्या बांधवांसाठी मदत पाठवली.—प्रे. कार्ये ११:२७-३०.

८ यहोवाच्या सेवेत पुढाकार घेणाऱ्‍यांना आर्थिक मदत करण्यासाठीही सेवकांनी दान दिलं. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमशास्त्रात लेवी गोत्राला इतर गोत्रांसारखा जमिनीचा वाटा देण्यात आला नव्हता. त्यामुळे इस्राएली लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती की त्यांनी त्यांच्या उत्पन्‍नातून लेवींसाठी दशमांश द्यावा. यामुळे त्यांना निवासमंडपातल्या कामावर लक्ष द्यायला मदत झाली. (गण. १८:२१) पहिल्या शतकातही उदार मनाच्या विश्‍वासू स्त्रियांनी त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा उपयोग येशू आणि त्याच्या शिष्यांना मदत करण्यासाठी केला.—लूक ८:१-३.

९. प्राचीन काळात दान देण्यासाठी लोकांनी पैशाची योजना कशी केली?

९ प्राचीन काळात सेवकांना मौल्यवान वस्तू किंवा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी मिळाला आणि त्यांनी याचा उपयोग दान देण्यासाठी केला. जसं की, निवासमंडप बनवण्यासाठी इस्राएली लोकांनी जे दान दिलं, त्या मौल्यवान गोष्टी कदाचित त्यांना इजिप्तमधून निघताना मिळाल्या होत्या. (निर्ग. ३:२१, २२; ३५:२२-२४) पहिल्या शतकात काही ख्रिश्‍चनांनी आपलं घर, जमीन विकून तो पैसा प्रेषितांना दान म्हणून दिला. प्रेषितांनी या पैशाचा उपयोग गरजू बांधवांना मदत करण्यासाठी केला. (प्रे. कार्ये ४:३४, ३५) इतर ख्रिश्‍चन दान देण्यासाठी आपल्या उत्पन्‍नातून एक विशिष्ट रक्कम नेहमी बाजूला काढून ठेवायचे. (१ करिंथ. १६:२) यावरून आपल्याला कळतं की प्राचीन काळातल्या सेवकांनी मग ते गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाने आपआपल्या ऐपतीप्रमाणे दान दिलं.—लूक २१:१-४.

आज आपण दान कसं देऊ शकतो?

१०, ११. (क) बायबल काळातील सेवकांच्या उदार वृत्तीचं आपण अनुकरण कसं करू शकतो? (ख) राज्याच्या कामाला आर्थिक हातभार लावण्याचा सुहक्क आपल्याजवळ आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

१० आज आपल्यालादेखील एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी दान देण्याचं उत्तेजन दिलं जाऊ शकतं. जसं की, तुमच्या मंडळीसाठी नवीन राज्य सभागृह बांधण्याचा किंवा दुरुस्तीचा प्रकल्प. किंवा मग आपल्या शाखा कार्यालयाच्या दुरुस्तीचा प्रकल्प. आपण अधिवेशनामध्ये होणाऱ्‍या खर्चासाठीही दान देऊ शकतो. एखाद्या नैसर्गिक विपत्तीमुळे आपल्या बंधुभगिनींचं खूप नुकसान झालं असेल, अशा वेळी त्यांना मदत व्हावी म्हणूनही आपण दान देऊ शकतो. आपण दिलेल्या दानाचा उपयोग मिशनरी, खास पायनियर, विभागीय पर्यवेक्षक आणि जागतिक मुख्यालयात व शाखा कार्यालयात काम करणाऱ्‍या बांधवांच्या गरजा भागवण्यासाठीही केला जातो. जगभरात संमेलनगृह आणि राज्य सभागृह बांधण्यासाठीही तुमची मंडळी नियमितपणे दान पाठवत असेल.

११ शेवटल्या काळात संघटनेच्या कामाला हातभार लावण्यासाठी आपण दान देऊ शकतो. सहसा दान कोण देतं हे इतरांना माहीत नसतं. आपण राज्य सभागृहाच्या दानपेटीत दान टाकतो किंवा मग jw.org वर ऑनलाईन दान देतो तेव्हा आपण त्याबद्दल इतरांना सांगत नाही. पण आपण दिलेलं दान खूप कमी आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर काय? खरं पाहिलं तर अशा छोट्याछोट्या दानांनी मिळून जी रक्कम बनते त्यानेच संघटनेचा खर्च भागवला जातो. फार कमी वेळा असं होतं की मोठी रक्कम दान म्हणून मिळते. आज खूप गरिबीत असलेले बांधवही मासेदोनियातल्या बांधवांचं अनुकरण करून दान देतात. तिथले बांधव “कमालीच्या दारिद्र्‌यात” होते तरी आपलं दान स्वीकारलं जावं अशी विनंती त्यांनी केली आणि मग उदारतेने दान दिलं.—२ करिंथ. ८:१-४.

१२. मिळालेल्या दानाचा उपयोग योग्य प्रकारे करण्यासाठी संघटना काय करते?

१२ दानाचा उपयोग करण्याच्या बाबतीत नियमन मंडळ विश्‍वासू आणि बुद्धिमान आहे. (मत्त. २४:४५) त्यातील सदस्य योग्य निर्णय घेण्यासाठी प्रार्थना करतात आणि मग विचारपूर्वक पैशाचा वापर करतात. (लूक १४:२८) प्राचीन काळात दानांवर देखरेख करण्यासाठी काही लोकांना नेमण्यात आलं होतं. त्या दानांचा उपयोग यहोवाच्या उपासनेसाठीच केला जाईल याची खात्री ते करायचे. उदाहरणार्थ, पारसच्या राजाकडून मौल्यवान भेटवस्तू घेऊन एज्रा यरुशलेमला आला. या मौल्यवान भेटवस्तूंमध्ये सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान रत्नं होती. आज त्यांची किंमत जवळपास ६४० कोटी रुपये इतकी असती. या सर्व गोष्टी यहोवासाठी दान होत्या. यामुळे एज्राने त्यांची देखरेख करणाऱ्‍यांना विशिष्ट सूचना दिल्या. कारण या मौल्यवान गोष्टी यरुशलेमला आणताना लुटारूंपासून त्यांचं संरक्षण करण्याची गरज होती. (एज्रा ८:२४-३४) बऱ्‍याच वर्षांनंतर यहूदीयातल्या बांधवांना मदत करण्यासाठी प्रेषित पौलने बांधवांकडून पैसे गोळा केले. हे पैसे सुरक्षितपणे बांधवांपर्यंत पोहोचावेत याची खात्री पौलने केली. त्याने म्हटलं: “आम्ही केवळ यहोवाच्याच नाही, तर माणसांच्या नजरेतही सर्व गोष्टी अगदी प्रामाणिकपणे करू इच्छितो.” (२ करिंथकर ८:१८-२१ वाचा.) आज संघटनेतील जबाबदार बांधव एज्रा आणि पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून मिळालेल्या दानाचा योग्य वापर करतात.

१३. मागच्या काही वर्षांत संघटनेने काही फेरबदल का केले आहेत?

१३ आपला खर्च मिळकतीपेक्षा जास्त तर नाही, याबद्दल सहसा कुटुंबातील सदस्य सोबत मिळून विचार करतात. किंवा यहोवाची सेवा जास्त प्रमाणात करता यावी म्हणून ते आपली जीवनशैली साधी ठेवण्याचा प्रयत्न करतात. यहोवाच्या संघटनेच्या बाबतीतही हेच खरं आहे. मागच्या काही वर्षांत आपण बरेच नवीन प्रकल्प हाती घेतले आणि काही वेळा या प्रकल्पांवर, आपल्याला जे दान मिळतं त्यापेक्षा जास्त पैसा खर्च करण्यात आला. यामुळे एका कुटुंबाप्रमाणे, संघटनेनेही पैसे वाचवण्याचे मार्ग शोधले. यासाठी काम करण्याच्या पद्धतींत काही फेरबदल करण्यात आले. असं केल्यामुळे आपण उदारपणे जे दान देतो त्याचा सर्वोत्तम उपयोग करणं शक्य झालं आहे.

दिलेल्या दानाचा उपयोग

राज्य सभागृह बांधकाम प्रकल्प; मोठ्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशन

तुम्ही दिलेल्या दानामुळे जगभरातल्या कामाला हातभार लागतो (परिच्छेद १४-१६ पाहा)

१४-१६. (क) दिलेल्या दानाचा उपयोग कसा केला जातो? (ख) संघटना जे प्रकल्प आणि उपक्रम आयोजित करते त्याचा तुम्हाला वैयक्‍तिक रीत्या फायदा कसा झाला आहे?

१४ बऱ्‍याच वर्षांपासून सत्यात असलेले अनेक बांधव म्हणतात की आधीच्या तुलनेत आता संघटनेकडून आपल्याला अनेक आध्यात्मिक भेटी मिळत आहेत. आपल्यासाठी संघटनेने jw.org आणि JW ब्रॉडकास्टिंग तयार केलं आहे. आपल्याजवळ आता बऱ्‍याच भाषांमध्ये पवित्र शास्त्राचे नवे जग भाषांतर उपलब्ध आहे. २०१४-१५ साली “पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटा!” हे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. हे अधिवेशन जगभरात १४ ठिकाणी मोठ्या स्टेडियम्समध्ये भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनाला उपस्थित राहून बंधुभगिनी खूप आनंदी होते.

१५ यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या या सर्व चांगल्या गोष्टींसाठी बऱ्‍याच बंधुभगिनींनी कदर व्यक्‍त केली आहे. उदाहरणार्थ, आशिया खंडात सेवा करणाऱ्‍या एका जोडप्याने म्हटलं: “आम्हाला एका छोट्या शहरात नेमणूक मिळाली आहे. यामुळे आम्हाला कधीकधी एकटं वाटतं, आणि यहोवाचं कार्य किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे याचा आम्हाला विसर पडतो. पण आम्ही JW ब्रॉडकास्टिंगमध्ये वेगवेगळे व्हिडिओ पाहतो, तेव्हा आम्हाला जाणवतं की आपण सर्व एका जगव्याप्त बंधुसमाजाचा भाग आहोत. आमच्या मंडळीतले बंधुभगिनी ब्रॉडकास्टिंग पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. महिन्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सहसा ते म्हणतात की त्यांना नियमन मंडळाचे सदस्य आता आणखी जवळचे वाटू लागले आहेत. आता या बंधुभगिनींना देवाच्या संघटनेचा भाग असण्याचा जास्त अभिमान वाटतो.”

१६ जगभरात सध्या २,५०० राज्य सभागृहांच्या बांधकामाचे किंवा दुरुस्तीचे प्रकल्प चालू आहेत. हाँड्यूरस देशातल्या एका मंडळीतले बांधव म्हणतात की आपलं स्वतःचं राज्य सभागृह असावं असं आमचं स्वप्न होतं. आता ते स्वप्न खरं होत आहे. त्यांनी शाखा कार्यालयाला असं लिहिलं: “आम्ही यहोवाच्या कुटुंबाचा भाग आहोत याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि बंधुसमाजातील प्रेमाची, एकतेची आम्ही कदर करतो.” आपल्या मातृभाषेत बायबल आणि इतर प्रकाशनं मिळाल्यावर बऱ्‍याच बंधुभगिनींनी अशाच भावना व्यक्‍त केल्या आहेत. तसंच, नैसर्गिक विपत्तीनंतर बंधुभगिनींना मदत पुरवली जाते तेव्हादेखील ते खूप आभारी असतात. यासोबतच मोठ्या शहरात प्रचाराचे उपक्रम आणि सार्वजनिक साक्षकार्य यात मिळणारे चांगले अनुभव पाहून बरेच बंधुभगिनी या सर्व प्रयत्नांसाठी कदर व्यक्‍त करतात.

१७. यहोवा त्याच्या संघटनेला मदत करत आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१७ आपण फक्‍त स्वेच्छेने मिळणाऱ्‍या दानाच्या आधारावर हे सर्व काम करतो, हे पाहून बऱ्‍याच लोकांना खूप आश्‍चर्य वाटतं. एकदा एका मोठा कंपनीचा अधिकारी आपल्या शाखा कार्यालयाची प्रींटरी पाहण्यासाठी आला. तिथलं सर्व काम स्वयंसेवक करतात हे पाहून त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. पैसे उभारण्यासाठी कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता, फक्‍त स्वेच्छेने मिळणाऱ्‍या दानावर आपण हे काम करतो याचं त्याला खूप नवल वाटलं. तो म्हणाला की आपण जे करतो ते अशक्य आहे. आपल्यासाठी हे खरंच अशक्य आहे. यहोवा आपल्याला मदत करत असल्यामुळेच खरंतर हे सर्व काम शक्य झालं आहे.—ईयो. ४२:२.

यहोवाला दिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

१८. (क) राज्याच्या कामाला हातभार लावल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात? (ख) आपण आपल्या मुलांना आणि नवीन लोकांना दान देण्याबद्दल कसं शिकवू शकतो?

१८ राज्याच्या कामाला हातभार लावण्याचा बहुमान आणि संधी यहोवा आपल्याला देतो. आपण दान दिलं तर तो आपल्याला आशीर्वाद देईल असं अभिवचन त्याने दिलं आहे. (मला. ३:१०) यहोवा खात्रीने सांगतो की उदारतेने दिल्यामुळे आपलं कधीच नुकसान होणार नाही. (नीतिसूत्रे ११:२४, २५ वाचा.a) तो हेदेखील सांगतो की उदारतेने दिल्यामुळे आपल्याला आनंद होईल, कारण “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्ये २०:३५) आपण आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून मुलांना आणि नवीन लोकांना दान देण्याबद्दल शिकवू शकतो. यामुळे त्यांनादेखील यहोवाकडून आशीर्वाद मिळतील.

१९. या लेखामुळे तुम्हाला कसं उत्तेजन मिळालं आहे?

१९ आपल्याजवळ जे काही आहे ते यहोवानेच दिलं आहे. आपण त्यातून त्याला जेव्हा दान देतो, तेव्हा आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींची आपल्याला कदर आहे हे दाखवत असतो. (१ इति. २९:१७) मंदिराचं बांधकाम करण्यासाठी इस्राएली लोकांनी दान दिलं तेव्हा त्यांना “फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्‍न होऊन खऱ्‍या मनाने व स्वच्छेने परमेश्‍वराप्रीत्यर्थ ती अर्पणे केली होती.” (१ इति. २९:९) यहोवाने दिलेल्या सर्व गोष्टींतून आपण त्याला नेहमी देत राहू या. असं करण्याद्वारे आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळेल.

a नीतिसूत्रे ११:२४, २५ (ईझी-टू-रीड व्हर्शन): “जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्‍यांना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा