पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
१ “मी दुसरे काहीही करण्याची कल्पना करू शकत नाही. खरंच दुसऱ्या कशानेही मला असाच आनंद मिळेल अशी कल्पनासुद्धा करवत नाही.” हे कोणाचे उद्गार आहेत? पूर्ण-वेळेच्या सेवेस आपले आनंदी जीवन ध्येय बनविलेल्या लक्षावधी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाचे. तुम्हाला पायनियर सेवा जमेल की नाही याचा तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? यहोवाला पूर्णपणे समर्पण केले असल्यामुळे राज्याच्या सुवार्तेचा फैलाव करण्यात अधिकाधिक सहभाग कसा घेता येईल याचा आपण निश्चितच विचार करण्यास हवा. हे ध्येय लक्षात ठेवून पायनियर सेवेसंबंधी अनेकांच्या मनात सहसा उपस्थित होतात ते प्रश्न कृपया विचारात घ्या.
प्रश्न १: “काहीजण म्हणतात, पायनियरींग सगळ्यांनाच जमण्यासारखं नाही. मला ते जमेल की नाही हे मी कसं ठरवू शकतो?”
२ याचे उत्तर तुमच्या परिस्थितींवर व शास्त्रीय जबाबदाऱ्यांवर अवलंबून आहे. असे अनेकजण आहेत ज्यांना आपल्या आरोग्यामुळे किंवा सद्यःस्थितींमुळे प्रत्येक महिन्याला ९० तास सेवेत खर्च करणे शक्य होत नाही. ख्रिस्ती पत्नी व माता असलेल्या अनेकानेक विश्वासू बहिणींचेच उदाहरण घ्या. आपापल्या परिस्थितींनुसार त्या सगळ्या जणी होता होईल तितक्यांदा सेवेत सहभाग घेतात. जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा दर वर्षी एखाददोन महिने सहायक पायनियरींग करून सेवेतील आपला सहभाग वाढवल्यामुळे पदरी पडणाऱ्या आनंदाचा त्या आस्वाद घेतात. (गलती. ६:९) आपल्या परिस्थितींमुळे सध्या तरी पूर्ण-वेळेचे पायनियर म्हणून सेवा करणे त्यांना शक्य नसले, तरीही या बहिणी पायनियर आत्म्याला बढावा देतात व सुवार्तेचे आवेशी प्रचारक या नात्याने त्या मंडळीसाठी आशीर्वाद ठरल्या आहेत.
३ दुसऱ्या बाजूला पाहता, ज्या बंधूभगिनींवर अधिक जबाबदाऱ्या नाहीत त्यांनी खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हे ठरवून पायनियर सेवेसाठी स्वतःला देऊ केले आहे. तुमच्याबाबत काय? तुम्ही शालेय शिक्षण अलीकडेच पूर्ण केलेली तरुण व्यक्ती आहात का? पतीच्या कमाईतून घरखर्च सुरळीत चालू शकेल, अशा परिस्थितीत असणारी तुम्ही एक पत्नी आहात का? तुम्ही विवाहित असून मुलांच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहात का? तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात का? पायनियरींग करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. तरी प्रश्न असा आहे, की पायनियरींग करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात काही व्यवस्था करू शकता का?
४ आपल्या जीवनात विकर्षणे आणण्यासाठी व एका स्वार्थी जीवनक्रमाने आपल्याला वेढून टाकण्यासाठी सैतान त्याच्या जगीक व्यवस्थीकरणाचा उपयोग करतो. जगाचे भाग नसण्याचा दृढ संकल्प केल्यास राज्य आस्थांना प्रथमस्थानी ठेवण्यास तसेच ईश्वरशासित सेवेत उपलब्ध असलेले सर्व विशेषाधिकार प्रयत्न करून प्राप्त करण्यास यहोवा आपली मदत करील. पायनियर या नात्याने सेवा करण्यासाठी तुम्हाला काही व्यवस्था करता येत असतील तर तसे का करू नये बरे?
प्रश्न २: “पूर्ण-वेळेच्या सेवेत मी स्वतःचा आर्थिक भार उचलू शकेल याची काय शाश्वती?”
५ हे खरे, की अलीकडील काही काळात अनेक देशांत केवळ ज्यांना आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो त्या मिळविण्यासाठी दर आठवडी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक तास काम करावे लागते. तथापि, कित्येकांनी दशकानुदशके पायनियर सेवा केली आहे आणि आजही यहोवा त्यांचा सांभाळ करत आहे. एक यशस्वी पायनियर होण्यासाठी विश्वास व आत्मत्यागी प्रवृत्ती बाळगण्याची गरज आहे. (मत्त. १७:२०) स्तोत्र ३४:१० आश्वासन देते की, ‘यहोवाला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तुची वाण पडणार नाही.’ पायनियर सेवा हाती घेणाऱ्या प्रत्येकाने पूर्ण विश्वास बाळगला पाहिजे, की यहोवा आपल्या गरजा पूर्ण करील. कारण जगभरातील विश्वासू पायनियरांसाठी तो नेमके हेच तर करत आहे! (स्तोत्र ३७:२५) अर्थात, २ थेस्सलनीकाकर ३:८, १० व १ तीमथ्य ५:८ येथे दिलेल्या सिद्धान्तांनुसार, इतरांनी आपला आर्थिक भार उचलावा अशी अपेक्षा पायनियर करत नाहीत.
६ पायनियरींग करण्याचा विचार करणाऱ्यांनी येशूने सांगितल्याप्रमाणे करावे: ‘अगोदर बसून खर्चाचा अंदाज करा.’ (लूक १४:२८) असे करणे शहाणपणाचे आहे. अनेक वर्षे यशस्वीरीत्या पायनियरींग केलेल्यांशी याबद्दल बोला. यहोवाने कशाप्रकारे त्यांचा सांभाळ केला आहे याविषयी त्यांना विचारा. तुमचे विभागीय पर्यवेक्षक स्वतः एक अनुभवी पायनियर असल्यामुळे पूर्ण-वेळेच्या सेवेत यशस्वी कसे व्हावे यावर ते आनंदाने तुमचे मार्गदर्शन करतील.
७ जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःला यहोवाच्या हातांत सोपवून देत नाही तोपर्यंत मत्तय ६:३३ मधील येशूच्या प्रतिज्ञेच्या सत्यतेचा तिला प्रत्यय येणारच नाही. एका विश्वासू पायनियरने म्हटले: “मी आणि माझी पायनियर साथीदार नेमलेल्या क्षेत्रात आलो त्या दिवशी थोड्याशा भाज्या, मार्जरीनचं एक लहानसं पाकीट याव्यतिरिक्त आमच्याजवळ काहीच नव्हतं.” आमच्याजवळ असलेलं हे थोडंसं अन्न संध्याकाळी संपवल्यावर आम्ही म्हणालो, “आता उद्यासाठी आपल्यापाशी काहीच नाही.” आम्ही याविषयी प्रार्थना केली आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच एक स्थानिक साक्षीदार बहीण घरी आली आणि आपली ओळख करून देत म्हणाली, ‘यहोवानं आमच्याकडे पायनियरांना पाठवावं अशी प्रार्थना मी केली होती. आता दिवसभराचा अधिकतर वेळ मी तुमच्यासोबत कार्य करू शकेन; पण मी दूर गावात राहात असल्यामुळे मला तुमच्यासोबतच दुपारचं जेवण करावं लागेल, म्हणून मग मी आपल्या सर्वांसाठीच हे जेवण आणलं आहे.’ तिनं भरपूर मांस व भाज्या आणल्या होत्या.” खरेच, “आपल्या जीवाविषयी . . . चिंता करीत बसू नका,” असे जे येशूने म्हटले त्यात आश्चर्य ते काय! त्याने असेही म्हटले: “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?”—मत्त. ६:२५, २७.
८ आपल्या सभोवतालचे जग अधिकाधिक भौतिकवादी होत चालले आहे. आपलीही प्रवृत्ती अशीच व्हावी म्हणून आपल्यावर अत्याधिक दबाव पाडला जातो. तथापि, पूर्ण-वेळेच्या सेवेसंबंधी नम्रतापूर्वक कदर असल्यास, आहे त्यात तृप्त राहण्यास आपल्याला मदत मिळते. (१ तीम. ६:८) आपले जीवन साधेसुधे व सुव्यवस्थित राखणाऱ्या पायनियरांना सेवेकरता अधिक वेळ तर मिळतोच मिळतो, पण त्यासोबतच इतरांना सत्य शिकवल्यामुळे निष्पन्न होणारा अपरिमित आनंद व आध्यात्मिक सामर्थ्यही प्राप्त होते. वैराग्यासारखे जीवन व्यतीत करण्याचा ते प्रयत्न करत नसले तरी आपल्या आर्थिक परिस्थितीसंबंधी एक संतुलित दृष्टिकोन बाळगल्याने पायनियरींगमुळे निष्पन्न होणाऱ्या आशीर्वादांचा आस्वाद घेणे त्यांना शक्य झाले आहे.
९ आपण शेवटल्या काळात जगत आहोत व या दुष्ट जगाचा अंत उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे अशी प्रकर्षाने तुम्हाला जाणीव होत असल्यास प्रत्येक प्रसंगी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आवश्यक ते त्याग करण्यास तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रेरित व्हाल. आपल्या परिस्थितीचा नव्या दृष्टिकोनातून विचार केल्याने आणि ही बाब यहोवाच्या हातांत सोपवून दिल्याने तुम्ही पूर्ण-वेळ त्याची सेवा करू शकता याची जाणीव तुम्हाला होईल. पायनियरींग करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशा भौतिक इच्छांचा त्याग करावा लागला तरी तुम्ही यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांचा आनंद लुटाल.—स्तोत्र १४५:१६.
प्रश्न ३: “मी तर एक किशोरवयीन आहे, मग पायनियर सेवेस आपले करियर म्हणून मी का निवडावे?”
१० शालेय शिक्षण संपत येते तेव्हा, स्वाभाविकपणे तुम्ही भवितव्याचा विचार करता. तुम्हाला एक सुरक्षित, आनंदी व समाधानी भविष्य हवेहवेसे वाटते. व्यवसाय मार्गदर्शक कदाचित एखाद्या किफायतशीर कारकीर्दीकडे तुमचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील ज्यासाठी कित्येक वर्षांच्या कॉलेज शिक्षणाची गरज असेल. उत्तमप्रकारे प्रशिक्षित केलेला तुमचा ख्रिस्ती विवेक मात्र तुम्हाला हे सांगत असेल, की तुम्ही होता होईल तितक्या पूर्णार्थाने यहोवाची सेवा करण्याची तयारी करावी. (उप. १२:१) कालांतराने विवाह करून कुटुंब वाढवण्याचा विचारही कदाचित तुमच्या मनात येईल. अशावेळी तुम्ही काय कराल?
११ आयुष्याच्या या वळणावर तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा कदाचित तुमच्या सबंध आयुष्यावर प्रभाव पडू शकेल. तुम्ही एक समर्पित, बाप्तिस्माप्राप्त यहोवाचे साक्षीदार असल्यास तुम्ही स्वतःला जिवेभावे यहोवाच्या हातात सोपवून दिले आहे. (इब्री. १०:७) पहिली संधी मिळताच, एखाददोन महिने सहायक पायनियरींग करून पाहा. असे केल्यास, नियमित पायनियरींगमुळे निष्पन्न होणारा आनंद व आपल्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचा पूर्वानुभव घेण्यास मदत होईल; शिवाय आता पुढे काय करावे हे देखील तुमच्या मनात स्पष्ट होत जाईल यात शंका नाही. यास्तव, शालेय शिक्षण संपल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी एखादी पूर्ण-वेळेची नोकरी करण्याऐवजी नियमित पायनियरींग करण्यात काय हरकत आहे? ज्या काहींनी अनेक वर्षे थांबून पायनियर सेवा हाती घेतली त्यांना आधीच पायनियरींग सुरू न केल्याचा आता पस्तावा होतो.
१२ एक युवक या नात्याने तुम्हाला अविवाहित स्थिती कायम ठेवणे शक्य आहे तोवर या स्थितीचा फायदा घेऊन पूर्ण-वेळेच्या प्रचार कार्यातून मिळणाऱ्या लाभांचा आनंद लुटा. आज ना उद्या विवाह करण्याची तुमची इच्छा असल्यास प्रथम नियमित पायनियर सेवा करून विवाहासाठी एक उत्तम पाया घालण्याचा याशिवाय दुसरा कोणता उत्तम मार्ग असू शकतो? तुम्ही प्रौढ होत जाता व आध्यात्मिकरित्या परिपक्व होत जाता तसे तुमच्यासारखेच ध्येय असणारा विवाहसाथी निवडून पायनियर कारकीर्द सुरू करण्याचा विचार तुम्ही करू शकता. ज्या दांपत्यांनी जोडीने पायनियर सेवा केली आहे त्यांनी पुढे विभागीय कार्यात पदार्पण केले किंवा मग ते खास पायनियर बनले. खरेच, किती समाधानकारक जीवन!
१३ तुम्ही कितीही वर्षे पायनियरींग करत राहिलात तरीही दुसऱ्या कोणत्याही कार्यातून प्राप्त झाले नसते असे बहुव्यापक शिक्षण व बहुमोल प्रशिक्षण तुम्हाला मिळालेले असेल. पायनियरींगमुळे अधिक जबाबदाऱ्या पेलण्यास सुसज्ज करणारे गुण—शिस्त, वैयक्तिक संघटन, लोकांशी योग्य व्यवहार करणे, यहोवावर विसंबून राहणे तसेच धीर व दया—आपण शिकतो.
१४ या पूर्वी मानवाचे जीवन कधीच इतके अनिश्चित नव्हते. यहोवाने अभिवचन दिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त मोजक्याच गोष्टी खरोखर शाश्वत आहेत. आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करायचा असल्यामुळे आगामी काळात काय करावे याचा गांभीर्याने विचार करण्याचा हाच योग्य समय आहे. पायनियरींग करण्याच्या विशेषाधिकाराचा काळजीपूर्वक विचार करा. जीवन ध्येय म्हणून पायनियर सेवा निवडल्याचा आयुष्यात कधीच तुम्हाला पस्तावा होणार नाही.
प्रश्न ४: “पण तास भरून काढण्याचे सतत दडपण नसते का? मला माझे तास पूर्ण करता आले नाहीत तर?”
१५ तुम्ही नियमित पायनियर सेवेचा अर्ज भरता तेव्हा तुम्हाला पुढील प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते: “वर्षभरात, अगदी व्यवस्थितपणे १,००० तास भरून काढण्याच्या हेतूने तुम्ही तुमच्या वैयक्तिक बाबींचे संघटन केले आहे का?” इतके तास भरून काढायचे असल्यास तुम्हाला दररोज सरासरी तीन तास कार्य करावे लागेल. अर्थात, यासाठी वेळेचे उत्तम नियोजन व स्वयंशिस्त यांची गरज आहे. अनेक पायनियर केवळ काही महिन्यांतच एक व्यावहारिक, यशस्वी होणारा नित्यक्रम विकसित करतात.
१६ तथापि उपदेशक ९:११ यथोचितपणे म्हणते, “सर्व कालवश व दैववश आहेत.” गंभीर स्वरूपाच्या आजारामुळे किंवा सांगून न येणाऱ्या इतर प्रसंगांमुळे एखादा पायनियर आपले तास भरून काढण्यात मागे पडू शकतो. समस्या दीर्घ पल्ल्याची नसल्यास व सेवा वर्षाच्या सुरवातीलाच ती निर्माण झालेली असल्यास उर्वरित तास भरून काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या आराखड्यात सरासरीपेक्षा अधिक तासांची भर घालणे आवश्यक असेल. पण, जर सेवा वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ काही महिनेच उरले असताना एखादी गंभीर समस्या उद्भवल्यास एखाद्या पायनियरला आपले तास भरून काढणे कसे काय शक्य होईल बरे?
१७ काही महिने आजारी असल्यामुळे किंवा तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या एखाद्या निकडीच्या कारणामुळे आवश्यक ते तास पूर्ण करणे तुम्हाला शक्य नसल्यास मंडळीतील सेवा समितीच्या एखाद्या सदस्याला भेटून त्याला तुमची समस्या सांगा. तुम्हाला भरून काढता आले नाही त्या तासांची चिंता न करता पायनियर सेवा करत राहण्याची तुम्हाला अनुमती देणे उचित आहे असे या वडिलांना वाटल्यास ते तसा निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला बाकीचे तास पूर्ण करण्याची गरज नाही अशी खूण मंडळीचा सचीव मंडळीच्या प्रचारक नोंदणी कार्डावर करील. पण, ही रजा नसून तुमच्या परिस्थितीची घेतलेली खास दखल आहे.—पाहा ऑक्टोबर १९८६ आमची राज्य सेवा (इंग्रजी) पुरवणी, परिच्छेद १८.
१८ अनुभवी पायनियर सेवा वर्षाच्या सुरवातीला होताहोईल तितके तास भरून काढतात. त्यांच्यासाठी पायनियर सेवा अतिमहत्त्वपूर्ण असल्यामुळे कधीकधी इतर अनावश्यक कार्यहालचालींत कपात करण्याची आवश्यकता त्यांना भासेल. वेळेचे चांगले नियोजन न केल्यामुळे किंवा स्वयंशिस्तीच्या अभावामुळे एखादा पायनियर आपले तास भरून काढण्यात मागे पडल्यास खास दखल घेतली जाण्याची अपेक्षा न करता उरलेले तास भरून काढण्याची जबाबदारी त्याने पेलली पाहिजे.
१९ कधीकधी टाळता न येणाऱ्या परिस्थिती देखील एखाद्या पायनियरवर ओढवतात. सतत आजारी असल्यामुळे, वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अथवा इतर काही कारणांमुळे आपल्याला बऱ्याच काळापर्यंत आपले तास भरून काढणे शक्य नाही असे कदाचित त्याला आढळेल. अशा परिस्थितीत, प्रचारक बनून शक्य तेव्हा सहायक पायनियर सेवा करणे सगळ्यात सुज्ञतेचे ठरेल. परिस्थितीमुळे एखाद्याला आपले तास भरून काढणे नेहमीच शक्य नसल्यास अशाला पायनियर सेवेत टिकून ठेवण्यासाठी कोणतीही नियमित स्वरूपाची तरतूद नाही.
२० आमची आशा आहे, की कार्यक्षम असलेल्यांची खास दखल घेण्याची ही तरतूद अकारण चिंता न करता पायनियर सेवा हाती घेण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित करेल. याशिवाय जे आधीपासूनच पायनियर सेवेत आहेत त्यांनाही टिकून राहण्याचे प्रोत्साहन या तरतुदीमुळे मिळेल. पायनियरांनी आपल्या पूर्ण-वेळेच्या सेवेत यशस्वी व्हावे अशी आमची इच्छा आहे.
प्रश्न ५: “मला काहीतरी साध्य करून त्यातून आनंद मिळवायचा आहे. पायनियर सेवेत मला हे समाधान मिळेल का?”
२१ खरा आनंद मोठ्या प्रमाणावर यहोवासोबतच्या घनिष्ठ, वैयक्तिक नातेसंबंधावर तसेच आपण विश्वासूपणे त्याची सेवा करत आहोत या दृढ विश्वासावर अवलंबून आहे. येशूने “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” वधस्तंभ सहन केला. (इब्री. १२:२) देवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे तो आनंदी होता. (स्तोत्र ४०:८) आपल्या जीवनातील अधिकांश गोष्टींची नाळ यहोवाच्या आपल्या उपासनेशी जुंपलेली असल्यास सद्य व्यवस्थीकरणात आपणही खरा आनंद मिळवू शकतो. आध्यात्मिक ध्येये राखल्यामुळे एक उद्देश असल्याची भावना आपल्यामध्ये असते कारण आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे याची आपल्याला पूर्ण खात्री असते. इतरांना देण्यात आनंद असल्यामुळे देवाच्या नवीन जगात सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करावे याचे शिक्षण इतरांना देणे हा दुसऱ्यांसाठी स्वतःला सर्वस्वी वाहून देण्याचा एक सर्वोत्तम मार्ग होय.—प्रे. कृत्ये २०:३५.
२२ सुरवातीला उल्लेखिलेल्या पायनियरने स्पष्टीकरण दिले: “तुम्ही ज्याच्याबरोबर अभ्यास केला त्याला यहोवाचा कार्यशील स्तुतीकर्ता होताना पाहून मिळणाऱ्या आनंदासारखा दुसरा आनंद असू शकतो का? देवाचे वचन, यहोवाला संतुष्टी आणण्याकरता आपल्या जीवनात परिवर्तन करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यात किती शक्तिशाली आहे हे पाहणे किती मनोरंजक व विश्वास बळकट करणारे आहे.” (पाहा ऑक्टोबर १५, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे १८-२३.) तर मग, तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो? जग देऊ करत असलेल्या क्षणभंगूर मौजमजेपेक्षा तुम्ही शाश्वत, अर्थपूर्ण प्रयासांना मौल्यवान समजत असल्यास पायनियरींगमुळे तुम्हाला तृप्तीची विलक्षण भावना प्राप्त होईल आणि परिणामी तुम्ही खरोखरीच आनंदी व्हाल.
प्रश्न ६: “सार्वकालिक जीवनासाठी जर पायनियरींग एक आवश्यकता नाही तर पायनियरींग करणे अथवा न करणे हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही का?”
२३ हे खरे, की पायनियरींग करणे अथवा न करणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे. केवळ यहोवाच तुमच्या जीवनातील वैयक्तिक परिस्थितीचा न्याय करू शकतो. (रोम. १४:४) तुम्ही संपूर्ण मनाने, जिवाने व बुद्धीने त्याची सेवा करावी अशी यथायोग्यपणे तो अपेक्षा करतो. (मार्क १२:३०; गलती. ६:४, ५) कुरकूर करून देणारा अथवा द्यायचे म्हणून देणारा नव्हे तर संतोषाने, स्वखुषीने देणारा देवाला प्रिय आहे. (२ करिंथ. ९:७; कलस्सै. ३:२३) यहोवावरील व क्षेत्रातील लोकांवरील तुमची प्रीती, पूर्ण-वेळ सेवा करण्यामागील तुमचे कारण असावे. (मत्त. ९:३६-३८; मार्क १२:३०, ३१) तुमची भावना अशी असल्यास पायनियर सेवेचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा.
२४ आमची आशा आहे, की येथे सांगितलेल्या गोष्टींवरून पायनियरींग करण्याची संभावना तोलून पाहण्यास तुमची मदत होईल. नियमित पायनियरींग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिस्थितींत काही फेरबदल करता येईल का? “माझा साप्ताहिक पायनियर सेवा आराखडा” अशा शीर्षकाचे एक कॅलेंडर खाली दिले आहे. प्रत्येक आठवडी सेवेत सरासरी २३ तास खर्च करणे तुम्हाला शक्य आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील एखादा आराखडा तुम्ही भरून काढू शकता का ते पाहा. मग आपला पूर्ण विश्वास व भरवसा यहोवावर टाका. त्याच्या मदतीने तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकता! त्याने अभिवचन दिले आहे: ‘पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता मी वर्षवील.’—मला. ३:१०.
२५ तर मग आम्ही विचारतो, “पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?” तुमचे उत्तर “होय” असल्यास लवकरात लवकर नियमित पायनियरींग सुरू करण्याची एक तारीख ठरवून टाका आणि मग एका आनंदी जीवनानिशी यहोवा तुम्हाला आशीर्वादित करील याविषयी विश्वस्त राहा!
[६ पानांवरील चार्ट]
(For fully formatted text, see publication)
माझा साप्ताहिक पायनियर सेवा आराखडा
सोमवार सकाळी
मंगळवार सकाळी
बुधवार सकाळी
गुरुवार सकाळी
शुक्रवार सकाळी
शनिवार सकाळी
रविवार सकाळी
सोमवार क्षेत्र सेवा
मंगळवार क्षेत्र सेवा
बुधवार क्षेत्र सेवा
गुरुवार क्षेत्र सेवा
शुक्रवार क्षेत्र सेवा
शनिवार क्षेत्र सेवा
रविवार क्षेत्र सेवा
सोमवार दुपारी
मंगळवार दुपारी
बुधवार दुपारी
गुरुवार दुपारी
शुक्रवार दुपारी
शनिवार दुपारी
रविवार दुपारी
सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही किती तास करणार त्याची पेन्सिलीने नोंद करा.
प्रत्येक आठवडी क्षेत्र सेवेत एकूण २३ तास खर्च करण्याचे ठरवा. एकूण साप्ताहिक तास आराखडा ____________________