पुढाकार घेणारे पर्यवेक्षक—सेवा पर्यवेक्षक
१ सेवा पर्यवेक्षकांना, मंडळीच्या नियुक्त क्षेत्रातील सुवार्तिक कार्याच्या प्रगतीशी निगडित प्रत्येक गोष्टीविषयी गाढ आस्था आहे. म्हणूनच, सुवार्तेचा प्रचार करण्याची आपली जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून आपल्याला साह्य करण्यात ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एक आवेशी सुवार्तिक या नात्याने सेवेसंबंधित सर्व बाबींचे संघटन करण्यात ते पुढाकार घेतात. एक कार्यक्षम शिक्षक या नात्याने सेवेतील प्रचारकांची कुशलता सुधारण्यात ते वैयक्तिक पातळीवर साह्य करतात.—इफिस. ४:११, १२.
२ साहित्य, नियतकालिके आणि क्षेत्र हाताळण्यासाठी नियुक्त केलेल्या सेवा सेवकांच्या कार्यावर या वडिलांची थेट देखरेख असते. प्रत्येक महिन्यासाठी लागणारे साहित्य, नियतकालिके आणि सेवा फॉर्म्स यांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते जबाबदार आहेत. वर्षातून एकदा, क्षेत्राच्या फाईलमधून ते अशा लोकांच्या नावपत्त्यांची उजळणी करतात जेथे भेट देण्यास पूर्वी मनाई करण्यात आली होती; आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी ते कार्यक्षम बांधवांना नियुक्त करतील.
३ व्यापारी क्षेत्रातील साक्षीकार्य, मार्ग साक्षीकार्य आणि टेलिफोन साक्षीकार्य यांसोबतच प्रचार कार्याच्या निरनिराळ्या पैलूंचे पर्यवेक्षण करणे ही सेवा पर्यवेक्षकाची जबाबदारी आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच सबंध आठवड्यादरम्यान सेवेसाठी व्यावहारिक योजना आखण्यासंबंधी ते जागरूक असतात. बायबल अभ्यास कार्याविषयी ते प्रांजळ आस्था दाखवतात. सेवेत अनियमित अथवा निष्क्रिय होणाऱ्यांना आध्यात्मिक साह्य कसे दिले जाऊ शकते याचा विचार ते करतात. पायनियरांचे कार्य सुरळीत चालावे म्हणून ते खटपट करतात व पायनियर साह्य कार्यक्रमावर देखरेख ठेवतात.
४ मंडळीच्या सेवा समितीचे सदस्य या नात्याने मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटांमध्ये आवश्यक फेरबदल करण्याचा प्रस्ताव सेवा पर्यवेक्षक मांडतात. ते तुमच्या गटाला भेट देतात तेव्हा हमखास उपस्थित राहा व क्षेत्र सेवेत त्यांच्यासोबत कार्य करा.
५ सेवा पर्यवेक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाशी मंडळीतील सर्वांनी स्वेच्छेने सहकार्य करावे. यामुळे शिष्य बनविण्याच्या कार्यातील आपली कुशलता वाढवण्यास तसेच सेवेत अधिक आनंद प्राप्त करण्यास आपल्याला मदत होईल.