वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 ऑक्टोबर पृ. २४-२९
  • शंकांवर मात कशी कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शंकांवर मात कशी कराल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शंका कशा दूर करता येतील?
  • ‘यहोवाला खरंच माझी काळजी आहे का?’ अशी शंका येते तेव्हा . . .
  • आधी घेतलेल्या निर्णयांबद्दल शंका वाटते तेव्हा . . .
  • आपण यहोवाच्या कामी येऊ शकतो का, अशी शंका असते तेव्हा . . .
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा “दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 ऑक्टोबर पृ. २४-२९

अभ्यास लेख ४३

गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव

शंकांवर मात कशी कराल?

“सगळ्या गोष्टींची खातरी करा.”—१ थेस्सलनी. ५:२१.

या लेखात:

यहोवाच्या सेवेवर परिणाम करणाऱ्‍या शंकांचं वादळ आपण कसं शांत करू शकतो ते पाहू या.

१-२. (क) यहोवाच्या सेवकांच्या मनात कदाचित कोणत्या काही शंका येऊ शकतील? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

प्रत्येकाच्या मनात कधी-ना-कधी शंकाa येत असतातच; मग ती व्यक्‍ती वयाने लहान असो किंवा मोठी. उदाहरणार्थ, एका तरुण प्रचारकाची कल्पना करा. त्याला शंका आहे की यहोवाला खरंच त्याची काळजी आहे का? आणि त्यामुळे आपण बाप्तिस्मा घ्यावा की नाही, असं त्याला वाटतं. किंवा अशा एका भावाची कल्पना करा ज्याने तरुण असताना भरपूर पैसे कमवण्याच्या मागे लागण्याऐवजी यहोवाची सेवा करायचं निवडलं होतं. पण आता त्याचं वय झालंय आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे त्याला शंका वाटू शकते की तरुणपणी त्याने जो निर्णय घेतला होता, तो योग्य होता का? किंवा एका वयस्कर बहिणीचा विचार करा जिचं शरीर आता तिला साथ देत नाही. यहोवाच्या सेवेत ती आधी ज्या गोष्टी करू शकत होती त्या आता तिला करता येत नाहीत. आणि त्यामुळे ती निराश आहे. या भाऊबहिणींसारखंच तुमच्याही मनात कधी असे प्रश्‍न आलेत का, जसं की ‘यहोवाचं खरंच माझ्याकडे लक्ष आहे का? मी त्याच्या सेवेसाठी केलेले त्याग योग्य होते का? मी आजही यहोवाच्या कामी येऊ शकतो का?’

२ आपण जर या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला नाही तर याचा आपल्या उपासनेवर परिणाम होऊ शकतो. आपल्या मनात जर (१) यहोवाला खरंच आपली काळजी आहे का, (२) आपण घेतलेले निर्णय योग्य होते का किंवा (३) आपण आजही यहोवाच्या कामी येऊ शकतो का, यांबद्दल शंका असतील तर बायबलच्या तत्त्वांवर लक्ष दिल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते. या लेखात आपण यावरच चर्चा करणार आहोत.

शंका कशा दूर करता येतील?

३. आपल्या शंका दूर करण्याचा एक मार्ग कोणता?

३ आपल्या शंका दूर करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी देवाच्या वचनाकडे वळणं. असं केल्यामुळे आपण विश्‍वासात मजबूत होऊ, आध्यात्मिक प्रगती करू आणि “विश्‍वासात स्थिर” राहायला तयार असू.—१ करिंथ. १६:१३.

४. आपण “सगळ्या गोष्टींची खातरी” कशी करू शकतो? (१ थेस्सलनीकाकर ५:२१)

४ १ थेस्सलनीकाकर ५:२१ वाचा. लक्ष द्या की बायबल आपल्याला “सगळ्या गोष्टींची खातरी” करायला सांगतं. आपण हे कसं करू शकतो? आपण जे मानतो त्याची बायबलसोबत तुलना करून ते खरंय का, याची आपण खातरी करू शकतो. उदाहरणार्थ, ‘देवाच्या नजरेत माझी खरंच काही किंमत आहे का?’ अशी शंका असणाऱ्‍या एका तरुणाचा विचार करा. त्याने हा प्रश्‍न तसाच सोडून द्यावा का? नाही. उलट याबद्दल यहोवाचे विचार काय आहेत हे जाणून घेऊन त्याने “सगळ्या गोष्टींची खातरी” केली पाहिजे.

५. आपल्या शंकांबद्दल असलेलं यहोवाचं उत्तर आपण कसं “ऐकू” शकतो?

५ जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो तेव्हा आपण यहोवाचं “ऐकत” असतो. पण एका विशिष्ट गोष्टीच्या बाबतीत त्याचं मत जाणून घेण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला ज्या गोष्टीची शंका आहे ते लक्षात ठेवून आपण बायबल वाचलं पाहिजे. त्यासाठी आपण यहोवाच्या संघटनेने पुरवलेल्या संशोधनाच्या साधनांचा वापर करून संशोधन करू शकतो. (नीति. २:३-६) आपण संशोधन करत असताना यहोवाने आपलं मार्गदर्शन करावं आणि आपल्या मनात असलेल्या शंकांबद्दल त्याला काय वाटतं, हे आपल्याला समजावं म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो. मग आपण आपल्या परिस्थितीला लागू होतील अशी बायबल तत्त्वं आणि व्यावहारिक माहिती शोधू शकतो. आपल्यासारखीच परिस्थिती असलेल्या लोकांबद्दल बायबलमध्ये जे अहवाल आहेत, त्यांचा अभ्यास केल्यामुळेसुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो.

६. आपल्या शंका दूर करण्यासाठी सभांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

६ सभांमधूनसुद्धा यहोवा आपल्याशी बोलतो तेव्हा आपण “ऐकत” असतो. आपण नियमितपणे सभांना जातो, तेव्हा एखाद्या भाषणातून किंवा उत्तरातून आपल्याला असं काहीतरी ऐकायला मिळेल, ज्यामुळे आपल्याला आपल्या शंका दूर करायला मदत होईल. (नीति. २७:१७) आता आपण काही विशिष्ट शंका कशा दूर करायच्या ते पाहू या.

‘यहोवाला खरंच माझी काळजी आहे का?’ अशी शंका येते तेव्हा . . .

७. काही जणांच्या मनात कदाचित कोणती शंका येऊ शकते?

७ ‘यहोवाला खरंच माझी काळजी आहे का?’ अशी शंका कधी तुमच्या मनात आली आहे का? तुम्ही जर स्वतःला खूप कमी समजत असाल, तर या विश्‍वाच्या निर्माणकर्त्याशी मैत्री करण्याचा विचार कदाचित तुम्हाला अशक्य वाटेल. दावीद राजालाही कदाचित असंच वाटलं असावं. आपल्यासारख्या क्षुल्लक माणसांकडे यहोवा लक्ष देतो, या गोष्टीचं त्याला खूप आश्‍चर्य वाटत होतं. म्हणून त्याने यहोवाला विचारलं: “हे यहोवा, शेवटी माणूस काय आहे, की तू त्याच्याकडे पाहावं? नाशवंत मानव काय आहे, की तू त्याच्याकडे लक्ष द्यावं?” (स्तो. १४४:३) मग तुम्ही तुमच्या मनात असलेली ही शंका कशी दूर करू शकता?

८. १ शमुवेल १६:६, ७, १०-१२ प्रमाणे यहोवा लोकांमध्ये काय पाहतो?

८ ज्यांच्याकडे इतरांचं लक्षसुद्धा जात नाही अशा लोकांकडे यहोवा लक्ष देतो, हे आपल्याला बायबलमधून शिकायला मिळतं. उदाहरणार्थ, इस्राएलचा भावी राजा म्हणून इशायच्या एका मुलाचा अभिषेक करण्यासाठी यहोवा शमुवेलला त्याच्याकडे पाठवतो, तेव्हा काय झालं याचा विचार करा. इशायला आठ मुलं होती. पण त्याने फक्‍त आपल्या सात मुलांनाच शमुवेलकडे आणलं. त्याने सर्वात लहान असणाऱ्‍या दावीदला बोलवलं नाही.b पण यहोवाने मात्र दावीदला निवडलं होतं. (१ शमुवेल १६:६, ७, १०-१२ वाचा.) कारण यहोवाने दावीदचं मन पाहिलं होतं आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याला माहीत होतं.

९. यहोवाला तुमची काळजी आहे याबद्दल तुम्ही खातरी का बाळगू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

९ यहोवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, हे त्याने आत्तापर्यंत तुम्हाला कसं दाखवून दिलंय यावर विचार करा. तो तुमची गरज ओळखून तुम्हाला सल्ला देतो. (स्तो. ३२:८) विचार करा, जर तो तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखत नसता, तर त्याला हे करता आलं असतं का? (स्तो. १३९:१) जर तुम्ही यहोवाचा सल्ला लागू केला आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय हे पाहिलं, तर तुम्हाला याची खातरी पटेल, की यहोवाला तुमची काळजी आहे. (१ इति. २८:९; प्रे. कार्यं १७:२६, २७) तुम्ही करत असलेले प्रयत्न आणि तुमच्यातले चांगले गुण तो पाहतो, आणि त्यामुळे तो तुमच्याशी मैत्री करायला पुढे येतो. (यिर्म. १७:१०) तुमच्याशी मैत्री करण्यासाठी तो जे काही करत आहे, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा अशी त्याची इच्छा आहे.—१ योहा. ४:१९.

एक तरुण बहीण वैयक्‍तिक अभ्यास करत आहे. तिने बायबल उघडलंय आणि ती तिच्या टॅबवर बोर्डवरचे कार्टून या मालिकेतला एक व्हिडिओ बघत आहे.

“तू [यहोवाला] शोधलंस तर तो तुला सापडेल.”—१ इति. २८:९ (परिच्छेद ९ पाहा)c


आधी घेतलेल्या निर्णयांबद्दल शंका वाटते तेव्हा . . .

१०. आधी घेतलेल्या निर्णयांचा विचार केल्यामुळे कदाचित कोणते प्रश्‍न निर्माण होऊ शकतात?

१० आधी घेतलेल्या निर्णयांबद्दल काही जण कदाचित असा विचार करत असतील, की ‘मी घेतलेले निर्णय योग्य होते का?’ त्यांनी कदाचित यहोवाची आणखी सेवा करण्यासाठी चांगलं करिअर किंवा चांगला व्यवसाय सोडून द्यायचा निर्णय घेतला असेल. पण आता याला बराच काळ गेला असेल किंवा दशकंही गेली असतील. शिवाय त्यांच्या ओळखीच्या काही लोकांनी भरपूर पैसे कमवले असतील आणि आता ते सुखसोयीचं आयुष्य जगत असतील. आणि त्यामुळे त्यांच्या मनात कदाचित असे प्रश्‍न येतील: ‘मी यहोवासाठी केलेले त्याग योग्य होते का? की त्यामुळे मी एक चांगली संधी गमावली?’

११. ७३ व्या स्तोत्राचा लेखक कशामुळे निराश होता?

११ तुमच्याही मनात जर असे प्रश्‍न येत असतील, तर ७३ वं स्तोत्र लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. त्याने अशा लोकांना पाहिलं जे निरोगी, समृद्ध आणि तणावापासून मुक्‍त असल्याचे वाटत होते. (स्तो. ७३:३-५, १२) जेव्हा त्याने त्यांचं आणि त्यांच्या वरवर दिसणाऱ्‍या यशाचं परीक्षण केलं तेव्हा त्याला वाटलं की तो यहोवाच्या सेवेत करत असलेले प्रयत्न व्यर्थ आहेत. निराश करणाऱ्‍या या विचाराने तो “दिवसभर चिंतेत” असायचा. (स्तो. ७३:१३, १४) मग त्याने अशा निराश करणाऱ्‍या भावनांना कसं तोंड दिलं?

१२. स्तोत्र ७३:१६-१८ प्रमाणे स्तोत्रकर्त्याने निराश करणाऱ्‍या विचारांचा सामना कसा केला?

१२ स्तोत्र ७३:१६-१८ वाचा. निराश असलेला हा स्तोत्रकर्ता यहोवाच्या उपासना मंडपाच्या शांत वातावरणात गेला. तिथे तो स्पष्टपणे विचार करू शकत होता. त्याला हे कळलं, की काही लोकांचं जीवन जरी सोपं वाटत असलं तरी त्यांना भविष्याची काहीच आशा नाही. यामुळे त्याला मनाची शांती मिळाली आणि यहोवाची सेवा करायचा आपण घेतलेला निर्णयच सगळ्यात चांगला आहे हे त्याला समजलं. याचा परिणाम म्हणजे यहोवाची सेवा करत राहायचा त्याचा निश्‍चय आणखी पक्का झाला.—स्तो. ७३:२३-२८.

१३. आधी घेतलेल्या निर्णयांबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्हाला मनाची शांती कशी मिळू शकते? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ देवाच्या वचनाच्या मदतीने तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे मनाची शांती मिळवू शकता. कसं? तुमच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींवर विचार करा. यात तुम्ही स्वर्गात साठवत असलेली संपत्तीसुद्धा येते. आणि या आशीर्वादांची तुलना देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांना शेवटी जे मिळतं त्याच्याशी करा. भविष्याची काहीच आशा नसल्यामुळे या जीवनात त्यांनी जे काही मिळवलंय फक्‍त त्याच गोष्टींवर त्यांना विसंबून राहावं लागतं. याउलट, तुमच्यासाठी भविष्यात असे आशीर्वाद ठेवलेत ज्यांची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. (स्तो. १४५:१६) तसंच, याचाही विचार करा, की तुम्ही जर तुमच्या जीवनात वेगळे निर्णय घेतले असते तर तुमचं जीवन कसं असतं, हे तुम्हाला खरंच कळलं असतं का? एक गोष्ट अगदी पक्की आहे: जे देवावर आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमाच्या आधारावर निर्णय घेतात ते आनंदी असतात आणि त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडत नाही.

एक भाऊ दुकानाची काच साफ करत असताना स्वतः नंदनवनात असल्याची कल्पना करतोय. तो कल्पना करतोय, की तो त्याच्या बायकोसोबत आहे आणि फळांनी भरलेली एकचाकी गाडी नेतोय. बाजूलाच हरणं चरत आहेत.

यहोवाने वचन दिलेल्या आशीर्वादांचा विचार करत राहा (परिच्छेद १३ पाहा)d


आपण यहोवाच्या कामी येऊ शकतो का, अशी शंका असते तेव्हा . . .

१४. काही जणांचा आत्मविश्‍वास कोणत्या गोष्टीमुळे कमी होऊ शकतो आणि त्यांच्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो?

१४ यहोवाच्या काही सेवकांना वाढत्या वयामुळे होणाऱ्‍या परिणामांचा, आजारपणाचा किंवा अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘यहोवाच्या नजरेत खरंच माझी काही किंमत आहे का?’ अशी शंका त्यांच्या मनात येऊ शकते. त्यामुळे त्यांना कदाचित असा प्रश्‍न पडेल, की ‘मी अजूनही यहोवाच्या कामी येऊ शकतो का?’

१५. ७१ व्या स्तोत्राच्या लेखकाला कशाची खातरी होती?

१५ ७१ व्या स्तोत्राच्या लेखकालाही असंच वाटत होतं. त्याने प्रार्थना केली: “माझं शरीर थकल्यावर मला टाकून देऊ नकोस.” (स्तो. ७१:९, १८) पण तरीसुद्धा स्तोत्रकर्त्याला खातरी होती, की जर त्याने यहोवाची एकनिष्ठपणे सेवा केली, तर तो त्याचं मार्गदर्शन करेल आणि त्याला पाठिंबा देईल. स्तोत्रकर्त्याला कळलं, की मर्यादा असूनही जे त्याची सेवा करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल यहोवाला आनंद वाटतो.—स्तो. ३७:२३-२५.

१६. वयस्कर भाऊबहीण यहोवासाठी काय-काय करू शकतात? (स्तोत्र ९२:१२-१५)

१६ वयस्कर भाऊबहिणींनो, तुमच्या परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा. तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसलं तरी यहोवा विश्‍वासूपणे त्याची सेवा करायला तुम्हाला मदत करेल. (स्तोत्र ९२:१२-१५ वाचा.) त्यामुळे तुम्हाला जे करता येत नाही अशा गोष्टींवर नाही, तर तुम्ही जे करू शकता त्या गोष्टींवर लक्ष द्या. उदाहरणार्थ, तुम्ही विश्‍वासू राहून इतरांसमोर आपलं उदाहरण मांडू शकता आणि इतरांबद्दल तुम्हाला किती काळजी आहे हे दाखवू शकता. असं केल्यामुळे तुम्ही त्यांना धीर देऊ शकता. आत्तापर्यंत यहोवाने तुम्हाला कसं सांभाळलंय आणि भविष्यात पूर्ण होणाऱ्‍या कोणत्या अभिवचनांची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय याबद्दल इतरांना सांगा. हे कधीच विसरू नका, की तुम्ही इतरांसाठी जी प्रार्थना करताय त्यात खूप ताकद असते. (१ पेत्र ३:१२) आपली परिस्थिती कशीही असली, तरी आपण सगळेच यहोवाला आणि इतरांना काही-ना-काही नक्कीच देऊ शकतो.

१७. आपण इतरांसोबत स्वतःची तुलना का करू नये?

१७ जर तुम्हाला यहोवाच्या सेवेत जास्त काही करता येत नाही या विचाराने निराश झाल्यासारखं वाटत असेल, तर याची खातरी बाळगा की तुम्ही त्याच्या सेवेत जे काही करता, ते यहोवा मौल्यवान समजतो. तुम्ही कदाचित स्वतःची तुलना इतरांशी कराल. पण तसं करू नका. यहोवा कधीच अशी तुलना करत नाही. (गलती. ६:४) उदाहरणार्थ, मरीयाने येशूला सुगंधी तेल भेट म्हणून दिलं. (योहा. १२:३-५) याउलट, एका गरजू विधवेने मंदिराच्या दानपेटीत अतिशय कमी किंमतीची दोन लहान नाणी टाकली. (लूक २१:१-४) तरीसुद्धा, येशूने या दोन्ही गोष्टींकडे विश्‍वासाने दिलेली भेट म्हणूनच पाहिलं. येशूने त्याच्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. त्यामुळे तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की तुम्ही जे काही करताय ते त्याच्यावर असलेल्या विश्‍वासामुळे आणि प्रेमामुळेच करताय, हे यहोवाला माहीत आहे. आणि ते तुम्हाला अगदी छोटसं जरी वाटत असलं, तरी ते त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे.

१८. शंकांवर मात करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? (“यहोवाचं वचन तुम्हाला शंकांवर मात करायला मदत करू शकतं” ही चौकटसुद्धा पाहा.)

१८ सगळ्यांच्याच मनात कधी-ना-कधी शंका येत असतात. पण आपण पाहिल्याप्रमाणे देवाच्या भरवशालायक वचनामुळे, म्हणजेच बायबलमुळे आपल्याला त्या दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शंका दूर करण्यासाठी मेहनत घ्या आणि तुमच्या शंकांची जागा आत्मविश्‍वासाला घेऊ द्या. यहोवा आपल्या प्रत्येकाला वैयक्‍तिकपणे ओळखतो आणि आपण केलेल्या त्यागांची त्याला कदर आहे. त्यामुळे तो आपल्याला त्याचं प्रतिफळ नक्की देईल. म्हणून खातरी ठेवा, की यहोवा त्याच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना त्याच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या लायक समजतो.

यहोवाचं वचन तुम्हाला शंकांवर मात करायला मदत करू शकतं

  • यहोवाला तुमची काळजी आहे

    “भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन; हो, मी तुला मदत करीन. नीतिमत्त्वाच्या माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन.”—यश. ४१:१०.

    “मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.”—यश. ४८:१७.

  • यहोवाच्या सेवेसाठी तुम्ही घेतलेल्या निर्णयाची यहोवा कदर करतो

    “माझ्या मुला, तू बुद्धिमान झालास, तर माझं मन आनंदी होईल.”—नीति.२३:१५.

    “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा. कारण त्याने म्हटलं आहे: ‘मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.’”—इब्री १३:५.

  • तुम्ही यहोवासाठी जे काही करू शकता त्याबद्दल यहोवाला कदर आहे

    “प्रत्येकाने आपला देव यहोवा याने दिलेल्या आशीर्वादाच्या प्रमाणात त्याच्यासाठी अर्पण आणावं.”—अनु. १६:१७.

    “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम विसरून जायला देव अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाला आपली काळजी आहे हे आपल्याला कसं कळतं?

  • आधी घेतलेल्या निर्णयांबद्दल शंका असतील, तर आपण त्यांचा सामना कसा करू शकतो?

  • आपण यहोवाच्या कामी येऊ शकतो का, याबद्दल शंका असेल तर आपण काय केलं पाहिजे?

गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!

a शब्दाचा अर्थ: या लेखात आपण अशा शंकांवर चर्चा करत आहोत, ज्यांमुळे यहोवाला आपली खरंच काळजी आहे का किंवा आपण घेतलेले निर्णय योग्य होते का, याबद्दल खातरी वाटत नाही. बायबलमध्ये सांगितलेल्या या अशा शंका नाहीत, ज्या यहोवा आणि त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास नसल्यामुळे निर्माण होतात.

b यहोवाने दावीदला कोणत्या वयात राजा म्हणून निवडलं होतं याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं नसलं तरी तो कदाचित अगदी तरुण वयातच असावा.—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती, क्र. ४, २०१६, पान ९ पाहा.

c चित्रांचं वर्णन: एक तरुण बहीण आपल्या परिस्थितीबद्दल यहोवाला कसं वाटतंय हे समजून घेण्यासाठी बायबल वाचत आहे.

d चित्राचं वर्णन: एक भाऊ त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काम करतोय आणि त्याच वेळी तो येणाऱ्‍या नंदनवनात स्वतः असल्याची कल्पना करतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा