अभ्यास लेख २६
गीत १२३ देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला
आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
“सर्वशक्तिमान देवाला पूर्णपणे समजून घेणं आपल्या आवाक्याबाहेर आहे.”—ईयो. ३७:२३.
या लेखात:
पुढे काय होणार आहे याबद्दल आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत नसल्या, तरी आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्यावर लक्ष लावून आणि यहोवावर भरवसा ठेवून आपण समस्यांचा सामना कसा करू शकतो, ते पाहा.
१. यहोवाने आपल्याला कशा प्रकारे बनवलंय आणि का?
यहोवाने आपल्याला अद्भुत रितीने बनवलंय. त्यामुळे आपण विचार करू शकतो, नवीन गोष्टी शिकू शकतो, आपली समजशक्ती वाढवू शकतो आणि आपल्या बुद्धीचा वापर करून त्या गोष्टी लागू करू शकतो. मग यहोवाने आपल्याला अशा प्रकारे का बनवलं? कारण त्याची इच्छा आहे की आपल्याला “देवाचं ज्ञान” मिळावं आणि आपण तर्कबुद्धीचा वापर करून त्याची सेवा करावी.—नीति. २:१-५; रोम. १२:१.
२. (क) आपल्याला कोणत्या मर्यादा आहे? (ईयोब ३७:२३, २४) (चित्रसुद्धा पाहा.) (ख) आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असल्यामुळे कसा फायदा होतो?
२ आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्यायची क्षमता असली, तरी आपल्याला काही मर्यादा आहेत. आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत. (ईयोब ३७:२३, २४ वाचा.) ईयोबचा विचार करा. यहोवाने त्याला काही प्रश्न विचारले, तेव्हा त्याला याची जाणीव झाली की त्याला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत. या अनुभवामुळे त्याला नम्र राहायला आणि आपला चुकीचा दृष्टिकोन सुधारायला मदत झाली. (ईयो. ४२:३-६) आपणसुद्धा जर हे नम्रपणे कबूल केलं की आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत नाहीत, तर आपल्यालासुद्धा फायदा होऊ शकतो. नम्रतेमुळे आपल्याला यहोवावर भरवसा ठेवायला मदत होऊ शकते. तसंच, या गोष्टीची खातरीही पटते की योग्य निर्णय घेण्यासाठी ज्या गोष्टी माहीत असण्याची गरज आहे, त्या तो आपल्याला नक्की सांगेल.—नीति. २:६.
आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे मान्य केल्यामुळे आपल्यालाही ईयोबसारखाच फायदा होऊ शकतो (परिच्छेद २ पाहा)
३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ या लेखात आपण पाहू, की आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत नाहीत. तसंच, त्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्यावर ज्या समस्या येऊ शकतात त्यावरसुद्धा आपण चर्चा करू. शिवाय, आपण हेसुद्धा पाहू की काही गोष्टी माहीत नसणंच आपल्यासाठी चांगलं का आहे. या गोष्टींवर चर्चा करत असताना “परिपूर्ण ज्ञान असलेल्या” यहोवा देवावरचा आपला भरवसा आणखी वाढेल आणि ही खातरी पटेल की ज्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्या तो आपल्याला सांगेल.—ईयो. ३७:१६.
अंत कधी येईल हे आपल्याला माहीत नाही
४. मत्तय २४:३६ प्रमाणे आपल्याला काय माहीत नाही?
४ मत्तय २४:३६ वाचा. या जगाच्या व्यवस्थेचा अंत कधी येईल हे आपल्याला माहीत नाही. येशूलासुद्धा पृथ्वीवर असताना “त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल” माहीत नव्हतं.a अचूक वेळ पाळणाऱ्या यहोवा देवाबद्दल येशूने नंतर प्रेषितांना असं सांगितलं, की तो त्याच्या “इच्छेप्रमाणे” काही गोष्टींची वेळ ठरवतो. कारण त्यालाच तसं करायचा अधिकार आहे. (प्रे. कार्यं १:६, ७) यहोवाने आधीच ठरवलंय की या जगाच्या व्यवस्थेचा अंत कधी होईल, पण आपण त्याची नेमकी वेळ सांगू शकत नाही.
५. अंत कधी येईल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे काय होऊ शकतं?
५ अंत कधी येईल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला किती वेळ वाट पाहावी लागेल, हेसुद्धा आपल्याला माहीत नाही. त्यामुळे कदाचित आपला धीर सुटू शकतो किंवा आपण निराश होऊ शकतो. आणि जर आपण बऱ्याच वर्षांपासून यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असलो, तर याचा आपल्याला आणखी जास्त त्रास होऊ शकतो. किंवा असंही होऊ शकतं, की आपल्या कुटुंबातले किंवा इतर जण आपली थट्टा करत असतील आणि त्याचा सामना करणं आपल्याला कठीण जात असेल. (२ पेत्र ३:३, ४) कदाचित आपल्याला असंही वाटू शकतं, की अंत नेमका कधी येईल हे आपल्याला माहीत असतं, तर आपल्याला धीर धरायला आणि थट्टेचा धीराने सामना करायला सोपं गेलं असतं.
६. अंत कधी येणार हे आपल्याला माहीत नाही ही चांगली गोष्ट का आहे?
६ खरंतर अंताची तारीख न सांगून यहोवाने चांगलंच केलंय. कारण असं केल्यामुळे आपल्याला हे दाखवायची संधी मिळते की त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आणि त्याच्यावर भरवसा असल्यामुळे आपण त्याची सेवा करतो. अमुक दिवशी अंत येईल असा विचार करून आपण यहोवाची सेवा करत नाही, तर आपण कायमसाठी त्याची सेवा करतो. म्हणून ‘यहोवाचा दिवस’ कधी येणार यावर लक्ष लावण्याऐवजी त्या वेळी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडतील, यावर आपण लक्ष लावलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या आणखी जवळ जाता येईल, त्याच्यावर आपला भरवसा वाढवता येईल आणि त्याला आनंदी करता येईल.—२ पेत्र ३:११, १२.
७. आपल्याला काय माहीत आहे?
७ आपल्याला जी गोष्ट माहीत आहे, त्यावर आपण लक्ष लावलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की शेवटचे दिवस १९१४ मध्ये सुरू झाले. शेवटच्या दिवसांची सुरुवात १९१४ मध्येच झाली होती हे दाखवण्यासाठी यहोवाने आपल्याला बायबलमध्ये बऱ्याच भविष्यवाण्या दिल्या आहेत. तसंच त्या काळानंतर परिस्थिती कशी असेल हे समजून घेण्यासाठी त्याने आपल्याला बरीचशी चिन्हंसुद्धा दिली आहेत. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची खातरी आहे, की “यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे!” (सफ. १:१४) तसंच, या शेवटच्या काळात यहोवाने आपल्याला कोणतं काम करायला सांगितलं हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ सांगणं. (मत्त. २४:१४) आज हा संदेश जवळपास २४० देशांमध्ये आणि १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये सांगितला जातोय. या महत्त्वाच्या कामात आवेशाने भाग घेण्यासाठी, अंत कधी येणार याचा ‘दिवस आणि वेळ’ माहीत असण्याची गरज नाही.
यहोवा कशा प्रकारे पाऊल उचलेल हे आपल्याला माहीत नाही
८. “खऱ्या देवाचं कार्य” कशाला सूचित करतं? (उपदेशक ११:५)
८ “खऱ्या देवाचं कार्य” आपण नेहमीच समजू शकत नाही. (उपदेशक ११:५ वाचा.) यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी घडू देईल याला हे सूचित करतं. यहोवा आपल्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडू देईल किंवा तो आपल्या वतीने कशा प्रकारे काम करेल हे आपण नक्की सांगू शकत नाही. (स्तो. ३७:५) बायबलमध्ये म्हटलंय, की जसं एका आईच्या पोटात बाळ कसं वाढतं हे आपण समजू शकत नाही, तसंच खऱ्या देवाचं कार्यही आपण समजू शकत नाही. आज वैज्ञानिकांनासुद्धा ही गोष्ट पूर्णपणे समजलेली नाही. तसंच आपणसुद्धा यहोवा एखादी गोष्ट कशा प्रकारे करेल हे पूर्णपणे समजू शकत नाही.
९. यहोवा आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करेल हे माहीत नसल्यामुळे आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो?
९ यहोवा आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करेल हे माहीत नसल्यामुळे, कदाचित आपण महत्त्वाचे निर्णय घ्यायला कचरू. आपली सेवा वाढवायला आपल्याला त्याग करावे लागतात. जसं की, आपलं जीवन साधं करणं आणि प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणं. पण यहोवा आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करेल हे माहीत नसल्यामुळे आपण असे निर्णय घ्यायला कदाचित मागेपुढे पाहू. किंवा मग असं होऊ शकतं, की आपल्याला आपली आध्यात्मिक ध्येयं गाठता येत नाहीत. किंवा आपण प्रचारात खूप मेहनत घेतोय, पण आपल्याला त्याचे परिणाम दिसत नाही. किंवा आपण एका बांधकाम प्रकल्पावर काम करतोय, पण आपल्यापुढे बऱ्याच समस्या आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित आपल्याला वाटू शकतं की यहोवा आपल्यावर खूश नाही.
१०. यहोवा आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करेल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला कोणते चांगले गुण वाढवता येतात?
१० यहोवा आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करतो हे माहीत नसल्यामुळे आपल्याला फायदाच होतो. आपल्याला नम्रतेसारखे चांगले गुण वाढवायला आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवायला मदत होते. आपल्याला हे समजायला मदत होते, की यहोवाचे विचार आपल्या विचारांपेक्षा उच्च आहेत. (यश. ५५:८, ९) तसंच यश मिळवण्यासाठी आपण यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे हेसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. तसंच जेव्हा आपल्याला प्रचारात चांगले परिणाम पाहायला मिळतात, किंवा बांधकाम प्रकल्पात यश येतं, तेव्हा आपण त्याचं सगळं श्रेय यहोवा देवाला दिलं पाहिजे. (स्तो. १२७:१; १ करिंथ. ३:७) जरी गोष्टी आपल्याला हव्या तशा घडल्या नाहीत तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत. (यश. २६:१२) त्यामुळे आपल्याला जे शक्य आहे ते आपण केलं पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी यहोवावर सोपवून दिल्या पाहिजेत. यहोवाने आधीच्या काळात त्याच्या सेवकांना चमत्कार करून मार्गदर्शन दिलं तसं तो आता देत नाही. तरी आपण याची खातरी ठेवू शकतो की जेव्हा आपल्याला मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा तो आपल्याला ते नक्की देईल.—प्रे. कार्यं १६:६-१०.
११. आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत आहेत?
११ आपल्याला माहीत आहे, की यहोवा प्रेमळ देव आहे. तो न्यायाने वागतो आणि तो बुद्धिमान आहे. तसंच, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की आपण त्याच्यासाठी आणि आपल्या भाऊबहिणींसाठी जे काही करतो त्याची त्याला खूप कदर आहे. शिवाय, आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की जे यहोवाला विश्वासू राहतात त्यांना तो नेहमी आशीर्वाद देतो.—इब्री ११:६.
उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नाही
१२. याकोब ४:१३, १४ प्रमाणे आपल्याला कोणती गोष्ट माहीत नाही?
१२ याकोब ४:१३, १४ वाचा. उद्या आपल्या जीवनात काय होईल हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. या व्यवस्थेत “वेळ आणि अनपेक्षित घटना” सगळ्यांसोबतच घडतात. (उप. ९:११) त्यामुळे आपल्या योजना पूर्ण होतील की नाही किंवा त्या पूर्ण होताना पाहण्यासाठी आपण जिवंत असू की नाही हेसुद्धा आपल्याला माहीत नाही.
१३. भविष्यात काय होईल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?
१३ भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला चिंता वाटू शकते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसू शकतो. अचानक आलेल्या कठीण प्रसंगांमुळे आपल्याला दुःख आणि मनस्ताप होऊ शकतो. जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपलं मन निराश होऊ शकतं.—नीति. १३:१२.
१४. आपल्याला कायम टिकणारा आनंद कसा मिळू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१४ जेव्हा आपल्यावर समस्या किंवा परीक्षा येतात तेव्हा आपल्याला हे दाखवायची संधी मिळते, की आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याची सेवा स्वार्थापोटी नाही तर प्रेमापोटी करतोय. बायबलमधून आपल्याला समजतं की यहोवाने आपल्याला सगळ्या समस्यांपासून सोडवावं अशी आपण त्याच्याकडून अपेक्षा करू नये. तसंच आपल्याला हेसुद्धा समजतं, की पुढे आपल्यासोबत काय घडणार हे तो आधीच ठरवून ठेवत नाही. त्याला हे माहीत आहे, की भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे माहीत असण्यावर आपला आनंद अवलंबून नाही. तर, त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यावर आणि त्याचं पालन करण्यावर आपला आनंद अवलंबून आहे. (यिर्म. १०:२३) निर्णय घेताना आपण त्याच्यावर अवलंबून राहतो तेव्हा एका अर्थाने आपण असं म्हणत असतो: “जर यहोवाची इच्छा असेल तर आपण जिवंत राहू आणि अमुक किंवा तमुक करू.”—याको. ४:१५.
यहोवाचं मार्गदर्शन घेतल्यामुळे आणि ते लागू केल्यामुळे आपलं संरक्षण होतं (परिच्छेद १४-१५ पाहा)b
१५. आपल्याला भविष्याबद्दल काय माहीत आहे?
१५ उद्याचा दिवस काय घेऊन येईल हे आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला हे माहीत आहे की यहोवाने आपल्याला सर्वकाळाचं जीवन देण्याचं वचन दिलंय, मग ते स्वर्गात असो किंवा पृथ्वीवर. तो कधीच खोटं बोलत नाही आणि त्याचं अभिवचन पूर्ण करण्यापासून कोणतीच गोष्ट त्याला रोखू शकत नाही हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. (तीत. १:२) फक्त तोच, “शेवट काय असेल हे सांगतो, आणि ज्या गोष्टी अजून घडल्याही नाहीत, त्यांविषयी . . . फार आधीच सांगतो.” भूतकाळाबद्दल ही गोष्ट खरी होती आणि भविष्यकाळाबद्दलसुद्धा ही गोष्ट खरी आहे. (यश. ४६:१०) आपल्याला याची खातरी आहे की कोणतीच गोष्ट आपल्याला यहोवा देवाच्या प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. (रोम. ८:३५-३९) आपल्यापुढे कोणतीही समस्या आली तरी तिचा सामना करण्यासाठी तो आपल्याला बुद्धी, ताकद आणि सांत्वन देईल. आपण या गोष्टीची खातरी ठेवू शकतो की तो आपल्याला मदत करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल.—यिर्म. १७:७, ८
यहोवा आपल्याला किती चांगल्या प्रकारे ओळखतो हे आपण पूर्णपणे समजू शकत नाही
१६. स्तोत्र १३९:१-६ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाला आपल्याबद्दल असं काय माहीत आहे जे आपण पूर्णपणे समजू शकत नाही?
१६ स्तोत्र १३९:१-६ वाचा. आपल्या निर्माणकर्त्याला आपल्याबद्दल सगळं काही माहीत आहे. आपण एखाद्या गोष्टीबद्दल कसा विचार करतो आणि तो का करतो हे त्याला माहीत आहे. तसंच, आपण काय बोलतो आणि त्यामागे आपला काय उद्देश असतो हेसुद्धा त्याला माहीत आहे. शिवाय, आपण जे काही करतो ते का करतो हेसुद्धा यहोवाला माहीत आहे. दावीदने असं म्हटलं की यहोवा सर्व बाजूंनी आपलं रक्षण करतो. आपण कुठेही असलो तरी यहोवा आपल्याला मदत करू शकतो. स्वर्ग आणि पृथ्वी घडवणारा सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आणि या संपूर्ण विश्वाचा अधिकारी आपल्याकडे इतकं जवळून लक्ष देतो ही खरंच किती विशेष गोष्ट आहे. म्हणूनच कदाचित दावीदने म्हटलं: “हे ज्ञान माझ्या समजण्यापलीकडे; माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.”—स्तो. १३९:६.
१७. यहोवा आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो हे स्वीकारणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?
१७ आपण ज्या कुटुंबात वाढलो किंवा ज्या संस्कृतीत वाढलो त्यामुळे, किंवा आपल्या आधीच्या विश्वासामुळे यहोवा एक प्रेमळ पिता आहे आणि त्याला आपली काळजी आहे, असा विचार करणं कदाचित आपल्याला कठीण जाऊ शकतं. किंवा आपल्याला असंही वाटू शकतं की आपण आधी इतक्या गंभीर चुका केल्या आहेत त्यामुळे यहोवाला आपल्याला जाणून घ्यावं असं कधीच वाटणार नाही. आणि तो आपल्यापासून खूप दूर आहे. दावीद राजालाही काही वेळा असंच वाटलं. (स्तो. ३८:१८, २१) किंवा कदाचित यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला असं वाटू शकतं, की ‘जर यहोवा मला खरंच ओळखतो, तर मी जसा आहे तसा तो माझा स्वीकार का करत नाही? मला बदल करायला का सांगतो?’
१८. आपण स्वतःला जितकं ओळखत नाही तितकं यहोवा आपल्याला ओळखतो हे मान्य केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१८ आपण हे मान्य करायला शिकलं पाहिजे, की आपण स्वतःला जितक्या चांगल्या प्रकारे ओळखत नाही तितकं यहोवा आपल्याला ओळखतो. आणि आपल्याला आपल्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत त्या यहोवा पाहू शकतो. त्याला आपल्यातले दोष दिसत असले आणि आपण असं का वागलो किंवा आपल्याला काय वाटतं हे त्याला माहीत असलं, तरी आपण बदल करू शकतो हे त्याला माहीत आहे. त्यामुळे तो आपल्याला मदत करायला तयार असतो. (रोम. ७:१५) आपण पुढे कोणत्या प्रकारची व्यक्ती बनू शकतो याकडे यहोवा लक्ष देतो हे माहीत असल्यामुळे आपल्याला त्याची आनंदाने आणि विश्वासूपणे सेवा करत राहायला मदत होते.
नवीन जगात आपलं जीवन कसं असेल यावरचा भरवसा वाढवून, यहोवा आपल्याला या जगात येणाऱ्या समस्यांचा सामना करायला मदत करतो (परिच्छेद १८-१९ पाहा)c
१९. आपल्याला यहोवाबद्दल कोणत्या गोष्टी पक्क्या माहीत आहेत?
१९ आपल्याला माहीत आहे की यहोवा प्रेम आहे. आणि यात कोणतंच दुमत नाही. (१ योहा. ४:८) आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की यहोवा आपल्याला जे काही सांगतो ते आपल्यावर असलेल्या प्रेमापोटीच असतं. आणि त्याची इच्छा आहे की आपलं नेहमी भलं व्हावं. आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं असं त्याला वाटतं. आणि त्यामुळेच त्याने आपल्याला खंडणीची भेट दिली आहे. आपण अपरिपूर्ण असलो तरी या भेटीमुळेच आपण त्याला खूश करू शकतो, याची आपल्याला खातरी मिळते. (रोम. ७:२४, २५) आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की “देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे आणि त्याला सर्वकाही माहीत आहे.” (१ योहा. ३:१९, २०) यहोवाला आपल्याबद्दल सगळं काही माहीत आहे. आणि त्याला याची खातरी आहे, की त्याची इच्छा पूर्ण करण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ.
२०. अवाजवी चिंता टाळायला आपल्याला कशामुळे मदत होईल?
२० आपल्याला ज्या गोष्टी खरंच माहीत असण्याची गरज आहे, त्यांपैकी कोणतीच गोष्ट यहोवाने आपल्यापासून लपवून ठेवलेली नाही. त्यामुळे, आपण जेव्हा ही गोष्ट नम्रपणे मान्य करतो, तेव्हा ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांबद्दल आपण अवाजवी चिंता करत नाही. उलट, ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत त्यावर आपण लक्ष लावतो. असं करून आपण हे दाखवतो, की ‘परिपूर्ण ज्ञान असलेल्या’ यहोवा देवावर आपला पूर्ण भरवसा आहे. (ईयो. ३६:४) आज जरी आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल समज नसली, तरी लवकरच नवीन जगात आपल्याला आपल्या महान देवाकडून बऱ्याच गोष्टी शिकत राहायची संधी मिळेल.—उप. ३:११.
गीत १०४ तुझी पवित्र शक्ती दे!
a सैतानाच्या दुष्ट जगाविरुद्ध लढण्यासाठी येशू पुढाकार घेणार आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हर्मगिदोन कधी होईल आणि तो ‘पूर्णपणे विजयी’ कधी होईल याची तारीख आता त्याला माहीत आहे.—प्रकटी. ११:२; १९:११-१६.
b चित्राचं वर्णन: एक वडील आणि त्यांचा मुलगा तातडीच्या प्रसंगासाठी गो बॅग तयार करत आहेत.
c चित्राचं वर्णन: समस्यांचा सामना करत असलेला एक भाऊ नवीन जगात त्याचं जीवन कसं असेल याचा विचार करतोय.