वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 एप्रिल पृ. १४-१९
  • भाऊबहिणींसोबत जवळचं नातं जोडणं आपल्यासाठी चांगलंय!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाऊबहिणींसोबत जवळचं नातं जोडणं आपल्यासाठी चांगलंय!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण एकमेकांसोबतचं नातं घट्ट का केलं पाहिजे?
  • एकमेकांचा आदर करा
  • “तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत”
  • “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम” करा
  • यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • “देवाच्या जवळ जाणं” हेच आपल्या हिताचं आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • इतरांना दिल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 एप्रिल पृ. १४-१९

अभ्यास लेख १६

गीत ८७ या आणि ताजेतवाने व्हा

भाऊबहिणींसोबत जवळचं नातं जोडणं आपल्यासाठी चांगलंय!

“पाहा! भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं, किती चांगलं आणि आनंददायक आहे!”—स्तो. १३३:१.

या लेखात:

आपण भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं आणखी घट्ट कसं करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील ते पाहू.

१-२. (क) यहोवासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? (ख) आपण काय करावं अशी त्याची इच्छा आहे?

आपण लोकांशी कसं वागतो ही गोष्ट यहोवासाठी खूप महत्त्वाची आहे. येशूने आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखं प्रेम करायला शिकवलं. (मत्त. २२:३७-३९) आपल्या शेजाऱ्‍यांमध्ये आपल्या भाऊबहिणींसोबतच यहोवाची सेवा न करणारे लोकसुद्धा येतात. जेव्हा आपण त्यांच्याशी दयेने वागतो, तेव्हा आपण यहोवासारखं वागत असतो. “तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.”—मत्त. ५:४५.

२ यहोवाचं सर्व मानवजातीवर प्रेम असलं, तरी योग्य ते करणाऱ्‍यांवर त्याचं विशेष प्रेम असतं. (योहा. १४:२१) त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं वागावं. म्हणून तो आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या भाऊबहिणींवर “अगदी मनापासून प्रेम” करावं आणि त्यांना “आपुलकी” दाखवावी. (१ पेत्र ४:८; रोम. १२:१०) या वचनांमध्ये ज्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल सांगण्यात आलंय, त्या प्रकारचं प्रेम आणि आपुलकी आपण सहसा आपल्या घरातल्या लोकांना आणि जवळच्या मित्रांना दाखवतो.

३. आपण प्रेमाबद्दल कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

३ जसं एखादं झाड चांगल्या प्रकारे वाढावं, म्हणून आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच प्रकारे भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवण्यासाठीसुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “बांधवांप्रमाणे एकमेकांवर प्रेम करत राहा.” (इब्री १३:१) यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण इतरांवरचं आपलं प्रेम वाढवत राहावं. म्हणूनच या लेखात आपण दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्या म्हणजे, आपण भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं घट्ट का केलं पाहिजे? आणि आपण ते सतत कसं करत राहू शकतो?

आपण एकमेकांसोबतचं नातं घट्ट का केलं पाहिजे?

४. स्तोत्र १३३:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या ख्रिस्ती एकतेबद्दलची कदर टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

४ स्तोत्र १३३:१ वाचा. स्तोत्रकर्त्याने म्हटलं होतं की जे देवावर प्रेम करतात त्यांच्याशी मैत्री करणं “चांगलं आणि आनंददायक” आहे. आपणही या गोष्टीशी सहमत आहोत. जेव्हा आपल्याला एखादं मोठं, हिरवंगार झाड रोज दिसतं, तेव्हा आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही. ख्रिस्ती एकतेबद्दलसुद्धा आपल्याला असंच वाटू शकतं. आपण आपल्या भाऊबहिणींना आठवड्यातून बऱ्‍याचदा भेटतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आपली कदर कमी होऊ शकते. मग अशा वेळी आपण ही कदर कशी टिकवून ठेवू शकतो? प्रत्येक भाऊ आणि बहीण मंडळीसाठी आणि आपल्यासाठी किती मौल्यवान आहे या गोष्टीवर जर आपण विचार केला, तर त्यांच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढेल आणि आपल्याला त्यांच्याबद्दलची कदर टिकवून ठेवता येईल.

कोलाज: १. एक बहीण एका सुंदर झाडाकडे कौतुकाने बघत आहे २. नंतर, अधिवेशनात भेटलेल्या बहिणीला ती प्रेमाने मिठी मारते. अधिवेशनात आलेले इतर भाऊबहीण आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत आहेत.

आपली ख्रिस्ती एकता खूप खास आहे; तिचं महत्त्व कधीच विसरू नका (परिच्छेद ४ पाहा)


५. आपल्यातल्या प्रेमाचा इतरांवर कसा प्रभाव पडू शकतो?

५ जे लोक पहिल्यांदा आपल्या सभेला येतात, त्यांच्यापैकी काहींना आपल्यामधलं प्रेम पाहून खूप छान वाटतं. फक्‍त या एकाच गोष्टीमुळे कदाचित त्यांना याची खातरी पटेल, की आपण खरे ख्रिस्ती आहोत. कारण येशूनेही म्हटलं होतं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) चैत्राच्या अनुभवाचा विचार करा. ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करत होती. एकदा तिला एका अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला उपस्थित राहिल्यानंतर ती बायबल अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीला असं म्हणाली: “माझ्या आईवडिलांनी कधीच मला मिठी मारली नाही. पण इथे पहिल्याच दिवशी ५२ जणांनी मला प्रेमाने मिठी मारली. खरंच असं वाटलं, की यहोवा त्याच्या लोकांचा वापर करून मला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देतोय. मला असंच कुटुंब हवंय.” चैत्रा पुढे प्रगती करत राहिली आणि २०२४ मध्ये तिने बाप्तिस्मा घेतला. खरंच, जेव्हा नवीन लोक आपली चांगली कामं आणि आपल्यातलं प्रेम पाहतात, तेव्हा बऱ्‍याचदा त्यांना यहोवाची सेवा करावीशी वाटते.—मत्त. ५:१६.

६. भाऊबहिणींसोबतचं नातं घट्ट केल्यामुळे आपलं संरक्षण कसं होऊ शकतं?

६ भाऊबहिणींसोबतचं नातं घट्ट केल्यामुळे आपलं संरक्षण होतं. पौलने पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींना असं म्हटलं: “एकमेकांना प्रोत्साहन देत राहा. हे यासाठी, की तुमच्यापैकी कोणीही पापाच्या फसव्या शक्‍तीमुळे कठोर बनू नये.” (इब्री ३:१३) कधीकधी आपण इतके निराश होतो की आपल्याला यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागणं कठीण जातं. ही गोष्ट एखाद्या भावाच्या किंवा बहिणीच्या लक्षात येऊ शकते आणि यहोवा त्याला किंवा तिला आपल्याला मदत करायला प्रवृत्त करू शकतो. (स्तो. ७३:२, १७, २३) अशा प्रकारची मदत खरंच आपल्या खूप फायद्याची असू शकते.

७. प्रेमाचा एकतेशी कसा संबंध आहे? (कलस्सैकर ३:१३, १४)

७ आपण ज्या संघटनेचा भाग आहोत, तिच्यातले लोक एकमेकांवर प्रेम करण्यासाठी मेहनत घेतात. त्यामुळे आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात. (१ योहा. ४:११) उदाहरणार्थ, प्रेमामुळे आपण ‘एकमेकांचं सहन करत राहायला’ प्रवृत्त होतो आणि यामुळे ख्रिस्ती एकता वाढते. (कलस्सैकर ३:१३, १४ वाचा; इफिस. ४:२-६) म्हणून आपल्या सभांमध्ये खूप सुंदर वातावरण असतं. असं वातावरण जगातल्या कुठल्याच संघटनेत पाहायला मिळत नाही.

एकमेकांचा आदर करा

८. आपल्याला एकतेच्या बंधनात बांधण्यासाठी यहोवा काय करतो?

८ आपण अपरिपूर्ण असूनसुद्धा आपल्यामध्ये एकता आहे. जगभरातल्या भाऊबहिणींमधली ही एकता हा खरंच खूप मोठा चमत्कार आहे! फक्‍त यहोवाच हा चमत्कार घडवून आणू शकतो. (१ करिंथ. १२:२५) बायबल म्हणतं, की “देवाने स्वतः [आपल्याला] एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे.” (१ थेस्सलनी. ४:९) दुसऱ्‍या शब्दांत, आपल्याला जर एकमेकांसोबतचं नातं घट्ट करायचं असेल तर नेमकं काय करायची गरज आहे, याबद्दल यहोवा त्याच्या वचनातून आपल्याला शिकवतो. आपल्याला जर यहोवाकडून शिकून घ्यायचं असेल, तर आपण त्याच्या शिकवणींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि त्या लागू केल्या पाहिजेत. (इब्री ४:१२; याको. १:२५) आणि यहोवाचे साक्षीदार अगदी हेच करायचा प्रयत्न करतात.

९. एकमेकांचा आदर करण्याबद्दल रोमकर १२:९-१३ मधून आपण काय शिकतो?

९ एकमेकांसोबतचं नातं घट्ट करण्याबद्दल देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं? रोमकर १२:९-१३ (वाचा.) मध्ये पौलने या बाबतीत काय म्हटलं होतं याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं होतं की “एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.” याचा काय अर्थ होतो? आपण एकमेकांना “आपुलकी” दाखवण्यात पुढाकार घेतला पाहिजे. जसं की आपण इतरांना माफ केलं पाहिजे, पाहुणचार केला पाहिजे आणि उदारता दाखवली पाहिजे. (इफिस. ४:३२) नातं घट्ट करण्यासाठी आधी भाऊबहिणींनी पावलं उचलावीत याची आपण वाट पाहू नये. तर आपण स्वतः यासाठी ‘पुढाकार घेतला’ पाहिजे. येशूनेसुद्धा म्हटलं होतं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) आपण जर असं केलं तर आपण आनंदी होऊ.

१०. ‘एकमेकांचा आदर करण्याच्या’ बाबतीत आपण मेहनती कसं असू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१० एक विशेष गोष्ट म्हणजे, “एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या,” असं सांगितल्यानंतर, पौलने लगेच आपल्याला ‘मेहनती असण्याबद्दल आणि आळशी नसण्याबद्दल’ सांगितलं. मेहनत करणारी व्यक्‍ती आवेशी असते आणि ती कष्ट करायला तयार असते. जेव्हा तिला एखादं काम दिलं जातं तेव्हा ती व्यक्‍ती ते काम अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करते. नीतिवचनं ३:२७, २८ मध्ये आपल्याला असं प्रोत्साहन दिलंय: “ज्यांचं भलं केलं पाहिजे, त्यांचं भलं करण्याची तुझ्यात ताकद असेल, तर तसं करण्यापासून मागे हटू नकोस.” या वचनातलं तत्त्व आपण पाळतो. आपण जेव्हा एखाद्याला मदतीची गरज असल्याचं पाहतो, तेव्हा त्याला मदत करायला आपण शक्य ते सगळं करतो. त्याला मदत करायला आपण उशीर करत नाही किंवा दुसरं कोणीतरी त्याला मदत करेल असा आपण विचार करत नाही.—१ योहा. ३:१७, १८.

एक तरुण भाऊ शिडीवर चढून एका वयस्कर भावाच्या घराचं छत साफ करतोय.

ज्या भाऊबहिणींना गरज आहे त्यांना मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे (परिच्छेद १० पाहा)


११. एकमेकांसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

११ एकमेकांचा आदर करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, भाऊबहीण जेव्हा आपलं मन दुखावतात तेव्हा त्यांना लगेच क्षमा करणं. इफिसकर ४:२६ मध्ये असं म्हटलंय: “सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये.” का राहू नये? कारण २७ व्या वचनात सांगितल्याप्रमाणे, आपण जर आपल्या मनात राग राहू दिला, तर यामुळे ‘सैतानाला संधी मिळेल.’ यहोवा वारंवार त्याच्या वचनांतून आपल्याला एकमेकांना क्षमा करण्याबद्दल सांगतो. कलस्सैकर ३:१३ मध्ये आपल्याला असं प्रोत्साहन देण्यात आलंय: “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” एकमेकांसोबतचा नातेसंबंध घट्ट करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, एकमेकांना माफ करणं. जेव्हा आपण असं करतो, तेव्हा “एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्‍या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारी एकता टिकवून ठेवायचा” आपण प्रयत्न करत असतो. (इफिस. ४:३) थोडक्यात सांगायचं तर, क्षमा केल्यामुळे आपल्या एकतेला आणि शांतीला हातभार लागतो.

१२. यहोवा आपल्याला एकमेकांना माफ करायला कशी मदत करतो?

१२ हे खरं आहे की ज्यांनी आपलं मन दुखावलं आहे त्यांना क्षमा करणं आपल्याला कठीण वाटेल. पण देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने आपण ते करू शकतो. “एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा” आणि “मेहनती असा” असं म्हटल्यानंतर, वचनात पुढे म्हटलंय: “पवित्र शक्‍तीद्वारे आवेशी असा.” याचा अर्थ देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे आपण आवेशी आणि उत्साही बनू शकतो. (रोम. १२:११) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं तर, देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे आपल्याला इतरांबद्दल आपुलकी बाळगायला आणि त्यांना मोठ्या मनाने क्षमा करायला मदत होऊ शकते. म्हणूनच आपण मदतीसाठी यहोवाला कळकळून विनंती केली पाहिजे.—लूक ११:१३.

“तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत”

१३. कोणत्या गोष्टीमुळे आपल्यात फुटी पडू शकतात?

१३ मंडळी ‘सर्व प्रकारच्या लोकांनी’ मिळून बनते, म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक तिच्यात असतात. (१ तीम. २:३, ४) त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत, तयार होण्याच्या बाबतीत, उपचार घेण्याच्या बाबतीत, मनोरंजनाच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. पण आपण काळजी घेतली नाही, तर या गोष्टींमुळे आपल्यात फुटी पडू शकतात. (रोम. १४:४; १ करिंथ. १:१०) देवाने स्वतः आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे. त्यामुळे आपल्याच आवडीनिवडी इतरांपेक्षा चांगल्या आहेत असा आपण विचार करणार नाही आणि त्या इतरांवर लादणार नाही.—फिलिप्पै. २:३.

१४. आपण नेहमी काय करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?

१४ आपण नेहमी एकमेकांना तजेला आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळेसुद्धा आपण आपली एकता टिकवून ठेवू शकतो. (१ थेस्सलनी. ५:११) उदाहरणार्थ, जे अक्रियाशील झाले होते आणि ज्यांना मंडळीतून काढून टाकण्यात आलं होतं असे बरेच जण अलीकडेच मंडळीत परत आले आहेत. आपण त्यांचं प्रेमाने स्वागत करतो! (२ करिंथ. २:८) दहा वर्षांपासून अक्रियाशील असलेली एक बहीण मंडळीत परत येते, तेव्हा तिच्यासोबत काय घडतं याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “सगळ्यांनी माझ्याकडे बघून स्माइल केलं आणि माझ्यासोबत हात मिळवला.” (प्रे. कार्यं ३:१९) या छोट्याछोट्या गोष्टींचा तिच्यावर कसा प्रभाव पडला? ती म्हणते: “यहोवा मला माझा आनंद परत मिळवायला मदत करतोय याची मला जाणीव झाली.” आपण जर एकमेकांना प्रोत्साहन दिलं तर “कष्ट करणाऱ्‍या आणि ओझ्याने दबलेल्या” लोकांना तजेला देण्यासाठी येशू आपला वापर करू शकतो.—मत्त. ११:२८, २९.

१५. एकतेला हातभार लावण्याचा आणखी एक मार्ग कोणता? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ आपण आपल्या बोलण्यातूनसुद्धा एकतेला हातभार लावू शकतो. ईयोब १२:११ मध्ये म्हटलंय: “जसं जिभेला चव कळते, तसंच कान शब्दांची पारख करत नाहीत का?” एक चांगला आचारी दुसऱ्‍यांना जेवण वाढण्याआधी स्वतः ते चाखून पाहतो. त्याच प्रकारे, इतरांना काहीही बोलण्याआधी आपण काय बोलणार याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. (स्तो. १४१:३) आपण नेहमी याची खातरी केली पाहिजे की आपण जे काही बोलतो त्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल, तजेला मिळेल आणि त्यांना “फायदा होईल.”—इफिस. ४:२९.

एक भाऊ पाहुण्यांना जेवण वाढण्याआधी स्वतः ते चाखून बघतोय.

बोलण्याआधी काय बोलायचं याचा काळजीपूर्वक विचार करा (परिच्छेद १५ पाहा)


१६. आपलं बोलणं नेहमी प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे याची काळजी कोणीकोणी घेतली पाहिजे?

१६ पतींनी आणि आईवडिलांनीसुद्धा त्यांचं बोलणं नेहमी प्रोत्साहन देणारं असेल याची काळजी घेतली पाहिजे. (कलस्सै. ३:१९, २१; तीत २:४) मंडळीतल्या वडिलांनीसुद्धा यहोवाच्या कळपातल्या मेंढरांना तजेला आणि सांत्वन दिलं पाहिजे. (यश. ३२:१, २; गलती. ६:१) बायबलमधल्या एका नीतिवचनात आपल्याला या गोष्टीची आठवण करून देण्यात आली आहे. त्यात म्हटलंय: “योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!”—नीति. १५:२३.

“कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम” करा

१७. भाऊबहिणींवर आपलं मनापासून प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१७ प्रेषित योहानने आपल्याला असं प्रोत्साहन दिलं, की “आपण शब्दांनी किंवा फक्‍त तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने प्रेम केलं पाहिजे.” (१ योहा. ३:१८) मग भाऊबहिणींवर मनापासून प्रेम करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्यांच्यासोबत जितका जास्त वेळ घालवू, तितकं आपल्यातलं प्रेम मजबूत होईल. म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी संधी शोधत राहा. सभांमध्ये आणि प्रचारात एकमेकांसोबत जास्त वेळ घालवा. इतर वेळीही भाऊबहिणींसोबत वेळ घालवायचा प्रयत्न करा. असं करून आपण दाखवून देऊ, की ‘देवाने स्वतः आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे.’ (१ थेस्सलनी. ४:९) अशा प्रकारे आपण स्वतः हे अनुभवू, की “भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं, किती चांगलं आणि आनंददायक आहे!”—स्तो. १३३:१.

तुमचं उत्तर काय असेल?

  • एकमेकांसोबतचं आपलं नातं घट्ट करणं महत्त्वाचं का आहे?

  • आपण एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार कसा घेऊ शकतो?

  • आपण एकतेला हातभार कसा लावू शकतो?

गीत ८५ एकमेकांचा स्वीकार करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा