अभ्यास लेख ४
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे
‘यहोवा खूप करुणामय आहे.’—याको. ५:११.
या लेखात:
यहोवाचं प्रेम आपल्याला त्याच्या आणखी जवळ यायला कसं प्रवृत्त करतं, त्याला आपली काळजी आहे आणि आपण सुरक्षित आहोत हे आपल्याला कसं जाणवतं आणि त्याच्या प्रेमामुळे आपल्याला ताजंतवाणं कसं वाटतं ते पाहा.
१. तुम्ही यहोवाचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येतं?
यहोवा नेमका कसा असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? तुम्ही जेव्हा त्याला प्रार्थना करता तेव्हा तुमच्या डोळ्यांपुढे कसं चित्र उभं राहतं? यहोवा अदृष्य असला तरी बायबल बऱ्याच मार्गांनी त्याचं वर्णन करतं. यहोवा “सूर्यासारखा आणि ढालीसारखा” आहे असं बायबल म्हणतं. तसंच, तो “भस्म करणारा अग्नी आहे” असंही त्यात म्हटलंय. (स्तो. ८४:११; इब्री १२:२९) बायबलच्या एका लेखकाने त्याचं अस्तित्व जणू नीलमण्यासारखं, चमकणाऱ्या धातूसारखं आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या मेघधनुष्यासारखं आहे असं म्हटलं. (यहे. १:२६-२८) यांपैकी काही वर्णनांमुळे आपण थक्क होऊन जाऊ किंवा आपण त्याच्या समोर किती क्षुल्लक आहोत असं कदाचित आपल्याला वाटेल.
२. यहोवाच्या जवळ जायला काही लोकांना कशामुळे कठीण जाऊ शकतं?
२ आपण यहोवाला पाहू शकत नसल्यामुळे तो आपल्यावर प्रेम करतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं आपल्याला कदाचित कठीण जाईल. काही लोकांना आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना असं वाटतं, की यहोवा आपल्यासारख्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. कदाचित प्रेम करणारा एक पिता कसा असतो याचा त्यांनी कधी अनुभव घेतलाच नसेल. यहोवाला अशा भावना समजतात आणि त्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो हेही त्याला समजतं. आपल्याला मदत करण्यासाठी त्याने त्याच्या वचनात त्याचं सुंदर व्यक्तिमत्व स्पष्ट केलंय.
३. यहोवाच्या प्रेमाबद्दल आपण आणखी शिकून घेणं का गरजेचं आहे?
३ यहोवाचं सगळ्यात चांगलं वर्णन जर एकाच शब्दात करायचं झालं, तर तो शब्द आहे प्रेम. कारण बायबल म्हणतं, “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) प्रेमाने प्रवृत्त होऊनच यहोवा सर्वकाही करतो. यहोवा प्रेम दाखवण्याच्या बाबतीत इतका उदार आहे आणि त्याचं प्रेम इतकं गहिरं आहे, की जे त्याच्यावर प्रेम करत नाहीत त्यांच्यावरही तो प्रेम करतो. (मत्त. ५:४४, ४५) या लेखात आपण यहोवाबद्दल आणि ‘प्रेम’ या त्याच्या गुणाबद्दल आणखी माहिती घेऊ या. कारण जितकं जास्त आपण देवाबद्दल शिकून घेऊ तितकं जास्त आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढेल.
यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो
४. यहोवाच्या प्रेमामुळे तुम्हाला कसं वाटतं? (चित्रसुद्धा पाहा.)
४ ‘यहोवा खूप करुणामय आहे.’ (याको. ५:११) बायबलमध्ये यहोवाची तुलना आपल्या बाळाला माया दाखवणाऱ्या आईशी केली आहे. (यश. ६६:१२, १३) एक आई तिच्या बाळाची किती प्रेमळपणे काळजी घेते याची कल्पना करा. ती खूप प्रेमाने त्याला तिच्या मांडीवर खेळवते. तसंच ती खूप प्रेमाने आणि लाडाने त्याच्याशी बोलते. बाळ जेव्हा रडतं तेव्हा त्याला काय हवं, काय नको ते पाहते. तसंच आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा आपण ही खातरी ठेवू शकतो की यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे. स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं: “चिंतांनी मला सर्व बाजूंनी घेरलं, तेव्हा तू मला दिलासा आणि सांत्वन दिलंस.”—स्तो. ९४:१९.
“आई जसं आपल्या मुलाचं सांत्वन करते, तसं मी तुमचं सांत्वन करत राहीन” (परिच्छेद ४ पाहा)
५. यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
५ यहोवा आपल्याला एकनिष्ठ राहतो. (स्तो. १०३:८) आपण एखादी चूक केलेली असली तरी तो आपल्याला सोडून देत नाही. इस्राएल राष्ट्राने कितीतरी वेळा यहोवाला नाराज केलं. पण तरी, पश्चात्ताप करणाऱ्या लोकांवर तो प्रेम करत राहिला. तो म्हणाला: “तू माझ्या नजरेत मौल्यवान आहेस, मला तुझा आदर आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे.” (यश. ४३:४, ५) यहोवाचं हे प्रेम आजही बदललेलं नाही. त्याचं हे प्रेम आपल्यासोबत नेहमी राहील याची खातरी आपण बाळगू शकतो. आपण गंभीर चुका केल्या असल्या तरी यहोवा आपल्याला सोडून देत नाही. जेव्हा आपण पश्चात्ताप करतो आणि त्याच्याकडे परत येतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे. तो वचन देतो की तो आपल्याला “मोठ्या मनाने क्षमा करेल.” (यश. ५५:७) बायबल याबद्दल म्हणतं, की “खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.”—प्रे. कार्यं ३:१९.
६. जखऱ्या २:८ मधून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
६ जखऱ्या २:८ वाचा. यहोवा आपल्यावर प्रेम करतो, म्हणून त्याला आपल्या भावना लगेच कळतात. आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तो लगेच पावलंही उचलतो. आपल्याला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा त्यालाही वाईट वाटतं. म्हणूनच आपण अशी प्रार्थना करू शकतो: “तुझ्या डोळ्याच्या बाहुलीसारखं मला सांभाळ.” (स्तो. १७:८) डोळा हा आपल्या शरीराचा सगळ्यात नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे त्यामुळे जेव्हा यहोवा आपली तुलना त्याच्या डोळ्याच्या बुबुळाशी करतो, तेव्हा खरंतर तो असं म्हणत असतो, ‘माझ्या लोकांनो, जो तुमचं नुकसान करतो, तो माझ्या सर्वात मौल्यवान गोष्टीचं नुकसान करतो.’
७. यहोवाच्या प्रेमावरचा आपला भरवसा मजबूत करायची गरज का आहे?
७ यहोवा आपल्यावर प्रेम करतो याची आपल्याला खातरी असावी असं त्याला वाटतं. पण पूर्वी आलेल्या वाईट अनुभवांमुळे यहोवा खरंच आपल्यावर प्रेम करतो का, याची कदाचित आपल्याला शंका वाटेल. किंवा आपण सध्या ज्या समस्यांचा सामना करत आहोत त्यामुळे यहोवा खरंच आपल्यावर प्रेम करतो की नाही याची आपल्याला खातरी नसेल. पण मग हा भरवसा आपण कसा मजबूत करू शकतो? यहोवाने येशूबद्दल, अभिषिक्तांबद्दल, आणि आपल्या सगळ्यांबद्दल प्रेम कसं दाखवलं हे शिकून आपण आपला भरवसा मजबूत करू शकतो.
यहोवा आपल्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवतो
८. आपल्या पित्याचं आपल्यावर प्रेम आहे याची येशूला खातरी का होती?
८ यहोवा आणि त्याच्या प्रिय मुलाने जितका काळ सोबत घालवलाय तितका या विश्वात कोणीच घालवला नसेल. त्यांनी अब्जावधी वर्षं सोबत घालवली आहेत. म्हणून त्यांच्यातलं नातं खूप मजूबत आहे. यहोवाचं त्याच्या मुलावर, येशूवर किती प्रेम आहे हे त्याने मत्तय १७:५ मध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय. इथे यहोवा फक्त इतकंच म्हणू शकला असता, की येशूने ‘त्याचं मन आनंदीत केलंय.’ पण त्याचं येशूवर किती प्रेम आहे, हे आपल्याला कळावं म्हणून तो म्हणाला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे.” यावरून कळतं, की यहोवाला येशूचा आणि येशूने आपल्या जीवनाचं बलिदान देण्याची जी तयारी दाखवली त्याचा त्याला किती अभिमान आहे! (इफिस. १:७) आपल्या पित्याचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीची येशूलाही खातरी होती. इतकी, की ते प्रेम त्याला जाणवत होतं. आणि याबद्दल त्याने अगदी खातरीने पुन्हा-पुन्हा सांगितलं.—योहा. ३:३५; १०:१७; १७:२४.
९. यहोवाचं अभिषिक्त जणांवर किती प्रेम आहे हे रोमकर ५:५ मधून कसं कळतं?
९ यहोवा अभिषिक्त जणांवर त्याचं किती प्रेम आहे हेसुद्धा दाखवतो. (रोमकर ५:५ वाचा.) या वचनात म्हटलंय, की त्याने त्यांचं हृदय त्याच्या प्रेमाने “भरून टाकलंय.” एका पुस्तकात याचा अर्थ असा देण्यात आलाय, की यहोवा जणू त्याचं प्रेम त्यांच्यावर “पाण्याच्या प्रवाहासारखं” ओतत आहे. खरंच यहोवाचं अभिषिक्त जणांवर असलेल्या प्रेमाचं हे किती जबरदस्त वर्णन आहे! अभिषिक्त जणांना माहीत आहे, की ते “देवपित्याला प्रिय” आहेत. (यहू. १) त्यांना याबद्दल कसं वाटतं ते प्रेषित योहानने सांगितलं. तो म्हणाला: “पाहा, पित्याने आपल्यावर किती प्रेम केलं आहे! त्याने आपल्याला त्याची मुलं म्हटलं आहे.” (१ योहा. ३:१) पण यहोवाचं हे प्रेम फक्त अभिषिक्तांपुरतंच आहे का? नाही, त्याने आपल्या सगळ्यांनाही त्याचं प्रेम दाखवलंय.
१०. यहोवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा कोणता आहे?
१० यहोवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे खंडणी बलिदान. खंडणी बलिदान पुरवून यहोवाने आपल्यावर जे प्रेम केलंय, तसं आजपर्यंत कोणीच केलेलं नाही! (योहा. ३:१६; रोम. ५:८) यहोवाने संपूर्ण मानवजातीसाठी त्याच्या प्रिय मुलाचा मृत्यू होऊ दिला. त्यामुळे आपल्या पापांची क्षमा होऊ शकली आणि आपल्याला त्याच्याशी मैत्रीचं नातं जोडता आलं. (१ योहा. ४:१०) यहोवा आणि येशूने जी किंमत दिली, त्यावर आपण जितकं जास्त मनन करू तितकं त्यांचं आपल्या प्रत्येकावर किती प्रेम आहे ते आपल्याला समजेल. (गलती. २:२०) यहोवाने फक्त न्यायिक दृष्टिकोनातून खंडणीची गरज होती म्हणून ती दिली नाही. किंवा ही गोष्ट फक्त करायची म्हणून केली नाही. तर आपल्यावरच्या अपार प्रेमामुळे त्याने ती भेट म्हणून आपल्यासाठी दिली. यहोवाने त्याच्याकडे असलेल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टीचं म्हणजे येशूचं बलिदान देऊन आपल्यावर प्रेम असल्याचं दाखवून दिलं. त्याने आपल्या मुलाला वेदना सहन करून त्याचा मृत्यू होऊ दिला.
११. यिर्मया ३१:३ मधून आपण काय शिकतो?
११ आत्तापर्यंत आपणं पाहिलं, की यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो हे तो फक्त आपल्या मनातच ठेवत नाही, तर ते बोलूनही दाखवतो. (यिर्मया ३१:३ वाचा.) यहोवा आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच त्याने आपल्याला त्याच्याकडे आकर्षित केलंय आणि त्याच्याशी नातं जोडायची एक संधी दिली आहे. (अनुवाद ७:७, ८ सोबत तुलना करा.) कोणीही आणि कोणतीही गोष्ट आपल्याला यहोवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. (रोम. ८:३८, ३९) त्याने दाखवलेल्या या प्रेमाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? यासाठी स्तोत्र २३ वाचा आणि यहोवाच्या प्रेमाचा आणि त्याच्या प्रेमळ करुणेचा दावीदवर कसा परिणाम झाला आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो ते पाहा.
यहोवाच्या प्रेमाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
१२. स्तोत्र २३ मध्ये दाविदने जे म्हटलंय त्याबद्दल थोडक्यात सांगा.
१२ स्तोत्र २३:१-६ वाचा. स्तोत्र २३ मध्ये असलेल्या दावीदच्या गीतात, यहोवाच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या करुणेबद्दल दावीदला कशी खातरी होती याबद्दल सांगितलंय. या गीतात त्याने त्याच्यामध्ये आणि त्याचा मेंढपाळ, यहोवा याच्यामध्ये असलेल्या घट्ट नात्याबद्दल सांगितलंय. यहोवाचं मार्गदर्शन घ्यायला त्याला सुरक्षित वाटायचं आणि तो पूर्णपणे यहोवावर विसंबून होता. दावीदला हे माहीत होतं, की यहोवा आयुष्यभर त्याला असंच प्रेम दाखवत राहील. पण त्याला इतकी खातरी का होती?
१३. यहोवा आपली काळजी घेईल याची दावीदला खातरी का होती?
१३ “मला कशाचीच कमी नाही.” असं दावीद म्हणू शकला कारण ज्या गोष्टींची त्याला गरज होती, त्या गोष्टी यहोवाने त्याला नेहमी पुरवल्या. दावीदची यहोवासोबत एक चांगली मैत्री होती. आणि यहोवा त्याच्यावर खूश आहे, हेही त्याला माहीत होतं. म्हणूनच त्याला या गोष्टीची पक्की खातरी होती, की भविष्यात काहीही झालं तरी यहोवा त्याच्या सगळ्या गरजा पुरवेल आणि त्याची काळजी घेईल. त्याला असलेल्या कोणत्याही चिंतांपेक्षा यहोवाच्या प्रेमावर असलेला त्याचा भरवसा मोठा होतो. यामुळेच तो आनंदी आणि समाधानी राहू शकला.—स्तो. १६:११.
१४. आपण संकटात असतो तेव्हा यहोवा आपली काळजी कदाचित कशी घेईल?
१४ यहोवा प्रेमाने आपली काळजी घेतो, खासकरून आपल्यावर एखादं संकट कोसळतं तेव्हा. क्लेअरa नावाच्या एका बहिणीच्या बाबतीत काय झालं त्याचा विचार करा. तिने २० वर्षं बेथेलमध्ये सेवा केली. मग तिच्या कुटुंबावर अचानक एका पाठोपाठ एक अशी बरीच संकटं आली. यामुळे तिला खूप हतबल झाल्यासारखं वाटलं. तिच्या वडिलांना एक गंभीर आजार झाला. तिची एक बहीण बहिष्कृत झाली. आणि त्यांच्या कुटुंबाचा छोटा व्यवसायसुद्धा बुडाला. शिवाय त्यांच घरही गेलं. मग अशा परिस्थितीत यहोवाने त्याचं प्रेम कसं दाखवलं? क्लेअर म्हणते: “दर दिवशी आम्हाला ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टी यहोवा आम्हाला पुरवत होता. आम्ही कल्पनाही केली नव्हती अशा प्रकारे यहोवा आमच्या गरजा पुन्हा-पुन्हा पुरवत राहीला. यहोवाने त्याचं प्रेम आणि त्याचा दयाळूपणा आम्हाला कसा दाखवला, त्या क्षणांची मी नेहमी आठवण करते. संकटांचा धीराने सामना करण्यासाठी या आठवणींची मला खूप मदत झाली आहे.”
१५. दावीदला ताजंतवाणं असल्यासारखं का वाटलं? (चित्रसुद्धा पाहा.)
१५ “तो माझा जीव ताजातवाणा करतो.” कधीकधी समस्यांमुळे आणि परीक्षांमुळे दावीदला खूप निराश झाल्यासारखं वाटलं. (स्तो. १८:४-६) पण यहोवाच्या काळजीमुळे आणि त्याच्या प्रेमामुळे तो ताजातवाणा झाला. यहोवाने त्याच्या या थकलेल्या मित्राला “हिरव्यागार कुरणांत” आणि ‘भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी विश्रांतीसाठी नेलं.’ यामुळे दावीदला पुन्हा ताकद मिळाली आणि तो पुन्हा आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकला.—स्तो. १८:२८-३२.
दावीदच्या जीवाला धोका होता तेव्हासुद्धा यहोवाच्या काळजीमुळे आणि त्याच्या प्रेमामुळे तो ताजातवाणा झाला (परिच्छेद १५ पाहा)
१६. यहोवाच्या प्रेमामुळे तुम्हाला ताजंतवाणं कसं वाटलंय?
१६ त्याच प्रकारे आज जेव्हा आपल्या जीवनात संकटं आणि परीक्षा येतात तेव्हा “यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच” आपल्याला त्यात टिकून राहायला मदत होते. (विलाप. ३:२२; कलस्सै. १:११) रेचलच्या उदाहरणाचा विचार करा. जेव्हा तिचा नवरा कोव्हिड-१९ च्या महामारीत सत्य सोडून गेला आणि तिलाही सोडलं, तेव्हा ती खूप खचून गेली. मग यहोवाने तिच्यासाठी काय केलं? ती म्हणते: “त्याने मला नेहमी त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिली. त्याने मला नेहमी माझ्या भाऊबहिणींसोबत ठेवलं. भाऊबहीण कायम माझ्यासोबत असायचे, माझ्यासोबत वेळ घालवायचे, मला जेवण आणून द्यायचे, मला प्रोत्साहन मिळेल असे मेसेज करायचे, वचनं पाठवायचे. प्रेमाने माझी विचारपूस करायचे आणि सतत मला याची आठवण करून द्यायचे की यहोवाला माझी काळजी आहे. म्हणून मी यहोवाचे नेहमी आभार मानते, की त्याने माझी प्रेमाने काळजी घेणारं इतकं मोठं कुटुंब दिलं.”
१७. “मला कशाचीही भीती वाटत नाही” असं दावीदने का म्हटलं?
१७ “मला कशाचीही भीती वाटत नाही, कारण तू माझ्यासोबत असतोस.” दावीदला बऱ्याच वेळा अशा प्रसंगांचा सामना करावा लागला जेव्हा त्याचा जीव धोक्यात होता. त्याला बऱ्याच शक्तिशाली शत्रूंचाही सामना करावा लागला. पण यहोवाच्या प्रेमामुळे त्याला सुरक्षित असल्यासारखं वाटलं. दावीदला हे जाणवलं, की प्रत्येक परिस्थितीत यहोवा त्याच्यासोबत आहे. आणि त्यामुळे तो निश्चिंत होता. म्हणूनच तो म्हणू शकला: “माझ्या सर्व भयांपासून [यहोवाने] मला सोडवलं.” (स्तो. ३४:४) हे खरंय, की दावीदला कधीकधी खूप भीती वाटली, पण यहोवाचं प्रेम त्याच्या या भीतीपेक्षा कितीतरी पटीने मोठं होतं.
१८. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे याची खातरी असल्यामुळे भीतीदायक परिस्थितींचा सामना करायचं बळ आपल्याला कसं मिळतं?
१८ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे याची खातरी असल्यामुळे भीतीदायक परिस्थितींचा सामना करायचं बळ आपल्याला कसं मिळतं? सुझी नावाची एक पायनियर बहीण आहे. तिच्या मुलाने जेव्हा स्वतःचा जीव घेतला तेव्हा तिला आणि तिच्या पतीला कसं वाटलं हे ती सांगते. ती म्हणते: “जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक भयानक असं काहीतरी घडतं तेव्हा त्या धक्क्यातून सावरणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुम्ही खूप खचून जाता आणि तुम्हाला हतबल झाल्यासारखं वाटतं. पण यहोवाच्या प्रेमामुळे आम्हाला खूप सुरक्षित वाटलं.” आधी ज्या रेचलबद्दल सांगितलं होतं, ती म्हणते: “एक दिवशी रात्री मी झालेल्या गोष्टींचा विचार करून खूप अस्वस्थ झाले. आता पुढे काय होईल, कसं होईल याची चिंता मला वाटत होती. मी खूप घाबरले होते. मी मोठमोठ्याने रडून, कळकळून यहोवाला प्रार्थना केली. त्यानंतर लगेचच एक आई जशी आपल्या बाळाला शांत करते तसं यहोवाने मला शांत केलं. आणि मी झोपी गेले. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.” तासोस नावाच्या एका वडिलांना सैन्यात भाग घ्यायला नकार दिल्यामुळे चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा मिळाली होती. त्या वेळी त्यांनी यहोवाचं प्रेम आणि काळजी कशी अनुभवली? ते म्हणतात: “मला ज्या गोष्टींची गरज आहे त्यापेक्षा जास्त गोष्टी यहोवाने मला पुरवल्या. यामुळे त्याच्यावरचा माझा भरवसा आणखी मजबूत झाला. तसंच, एवढ्या कठीण परिस्थितीत असूनसुद्धा मी त्याच्या पवित्र शक्तीमुळे आनंदी राहू शकलो. यावरून मला याची खातरी झाली की मी जितकं जास्त त्याच्यावर भरवसा ठेवला, तितकं जास्त मला त्याचं प्रेम अनुभवता येईल. म्हणून मग मी तुरुंगात असतानाच पायनियर सेवा सुरू केली.”
आपल्या करुणामय पित्याच्या जवळ या
१९. (क) देवाचं आपल्यावर प्रेम आहे हे माहीत असल्यामुळे आपण कशी प्रार्थना करू? (ख) यहोवाच्या प्रेमाबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? (“यहोवाच्या प्रेमाची जाणीव करून देणारी वचनं” ही चौकट पाहा.)
१९ आपण आतापर्यंत जे अनुभव पाहिले, त्या सगळ्यांवरून दिसतं की ‘प्रेमाचा देव’ यहोवा आपल्यासोबत आहे! (२ करिंथ. १३:११) त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे. आणि आपल्याला या गोष्टीची खातरी आहे, की तो आपल्याला त्याच्या “एकनिष्ठ प्रेमाने वेढतो.” (स्तो. ३२:१०, तळटीप.) त्याने आपल्याला प्रेम कसं दाखवलंय यावर आपण मनन करत राहिलो, तर तो आपल्यासाठी आणखी खराखुरा होईल आणि आपल्याला त्याच्याजवळ असल्यासारखं वाटेल. तसंच आपण कोणताही संकोच न बाळगता त्याला मनमोकळेपणाने प्रार्थना करू शकतो. आणि आपल्याला त्याच्या प्रेमाची किती गरज आहे हे त्याला सांगू शकतो. शिवाय, आपण आपल्या चिंता त्याला सांगू शकतो. आणि आपण याची खातरी बाळगू शकतो की त्याला आपल्या भावना कळतात आणि तो आपल्याला मदत करायला आतुर आहे.—स्तो. १४५:१८, १९.
२०. यहोवाचं प्रेम आपल्याला त्याच्याजवळ कसं आणतं?
२० कडाक्याच्या थंडीत जसं आपण शेकोटीकडे ओढले जातो तसं या थंडावलेल्या जगात आपण यहोवाच्या उबदार प्रेमाकडे ओढले जातो. यहोवाच्या प्रेमात खूप ताकद असली तरी त्या प्रेमात ममतासुद्धा आहे. त्यामुळे आयुष्यात आनंदी राहा, कारण यहोवा तुमच्यावर प्रेम करतो! मग आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणता येईल: “माझं यहोवावर प्रेम आहे.”—स्तो. ११६:१.
तुमचं उत्तर काय असेल?
यहोवाच्या प्रेमाचं वर्णन तुम्ही कसं कराल?
यहोवा तुमच्यावर खूप प्रेम करतो याची तुम्ही खातरी का बाळगू शकता?
यहोवा तुमच्यावर प्रेम करतो यामुळे तुम्हाला कसं वाटतं?
गीत १०८ देवाचं एकनिष्ठ प्रेम
a काही नावं बदलण्यात आली आहेत.