अभ्यास लेख १७
गीत ९९ लाखो आपण भाऊबहिणी
आपण कधीच एकटे नाही!
“मी तुला मदत करीन.”—यश. ४१:१०.
या लेखात:
यहोवा कोणत्या चार मार्गांनी आपली काळजी घेतो ते पाहा.
१-२. (क) समस्यांचा सामना करताना आपण एकटे नाही असं आपण का म्हणू शकतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
कल्पना करा की एका वादळी समुद्रात तुम्ही एका छोट्याश्या बोटीवर एकटेच आहात. त्या वेळी तुम्हाला कसं वाटेल? जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपल्याला कदाचित असंच एकटं असल्यासारखं वाटू शकतं. पण खरंतर आपण एकटे नसतो. आपला स्वर्गातला पिता यहोवा आपल्या समस्या फक्त पाहतच नाही, तर तो आपल्याला वचनही देतो की तो आपल्याला आपल्या समस्यांचा सामना करायला मदत करेल. त्याच्या एकनिष्ठ सेवकांना तो अशी खातरी देतो: “मी तुला मदत करीन.”—यश. ४१:१०.
२ या लेखात आपण पाहू की यहोवा (१) आपलं मार्गदर्शन करून, (२) आपल्या गरजा पुरवून, (३) आपलं संरक्षण करून आणि (४) आपलं सांत्वन करून आपल्याला कशी मदत करतो. यहोवा आपल्याला अशी खातरी देतो, की आपल्या जीवनात कितीही समस्या आल्या तरी तो आपल्याला कधीच विसरणार नाही. तो आपल्याला कधीच सोडून देणार नाही. त्यामुळे आपण कधीच एकटे नाही.
यहोवा आपलं मार्गदर्शन करतो
३-४. यहोवा आपलं मार्गदर्शन कसं करतो? (स्तोत्र ४८:१४)
३ स्तोत्र ४८:१४ वाचा. यहोवाला माहीत आहे की आपण स्वतःचं मार्गदर्शन स्वतः करू शकत नाही आणि आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मग आज यहोवा त्याच्या एकनिष्ठ सेवकांचं मार्गदर्शन कसं करतो? एक मार्ग म्हणजे, बायबलमधून. (स्तो. ११९:१०५) यहोवा त्याच्या वचनाचा वापर करून आपल्याला चांगले निर्णय घ्यायला आणि स्वतःमध्ये चांगले गुण वाढवायला मदत करतो.a उदाहरणार्थ, तो आपल्याला राग सोडून द्यायला, सर्व बाबतींत प्रामाणिक राहायला आणि इतरांवर मनापासून प्रेम करायला शिकवतो. (स्तो. ३७:८; इब्री १३:१८; १ पेत्र १:२२) जेव्हा आपण स्वतःमध्ये असे चांगले गुण वाढवतो तेव्हा आपण चांगले आईवडील, चांगले पती-पत्नी आणि चांगले मित्र बनतो. यामुळे आपण आता आनंदी जीवन जगू शकतो आणि भविष्यात आपल्याला सर्वकाळाचं जीवनही मिळेल.
४ त्यासोबतच यहोवाने त्याच्या वचनात आपल्याला आपल्यासारख्याच समस्या आणि भावना असलेल्या लोकांबद्दल सांगितलंय. (१ करिंथ. १०:१३; याको. ५:१७) जेव्हा आपण त्यांच्याबद्दल वाचतो आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करतो, तेव्हा आपल्याला दोन फायदे होतात. पहिला म्हणजे, आपल्याला समजतं की आपण एकटे नाही. असे इतरही काही लोक होते ज्यांना आपल्यासारख्याच समस्या होत्या आणि त्यांनी यशस्वीपणे त्यांचा सामना केला. (१ पेत्र ५:९) आणि दुसरा म्हणजे, आपल्या समस्यांचा सामना कसा करायचा हेसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं.—रोम. १५:४.
५. आपलं मार्गदर्शन करण्यासाठी यहोवा कोणाचा वापर करतो?
५ यहोवा भाऊबहिणींचा वापर करूनसुद्धा आपलं मार्गदर्शन करतो.b उदाहरणार्थ, आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय पर्यवेक्षक नियमितपणे मंडळ्यांना भेटी देतात. त्यांच्या भाषणांमधून आपला विश्वास मजबूत होतो आणि आपली मौल्यवान एकता टिकवून ठेवायला आपल्याला मदत होते. (प्रे. कार्यं १५:४०–१६:५) तसंच, मंडळीतले वडीलसुद्धा प्रत्येक भावाला आणि बहिणीला यहोवासोबतचं नातं मजबूत करायला मदत करतात. (१ पेत्र ५:२, ३) शिवाय, आईवडीलसुद्धा त्यांच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला, चांगले निर्णय घ्यायला आणि चांगल्या सवयी लावायला मदत करतात. (नीति. २२:६) तसंच, प्रौढ बहिणी तरुण बहिणींसमोर एक चांगलं उदाहरण ठेवतात, त्यांना रोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्ले देतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात. असं करून त्या त्यांना मदत करतात.—तीत २:३-५.
६. यहोवाच्या मार्गदर्शनातून फायदा मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
६ यहोवाने आपल्याला चांगले निर्णय घेण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी लागणारं मार्गदर्शन दिलंय. मग त्याने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? नीतिवचनं ३:५, ६ मध्ये असं म्हटलंय: “यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्तीवर अवलंबून राहू नकोस.” जर आपण असं केलं, तर ‘तो आपले मार्ग मोकळे करेल.’ म्हणजे तो आपल्याला समस्या टाळायला आणि आनंदी जीवन जगायला मदत करेल. यहोवाचं आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम आहे आणि त्यामुळे तो आपल्याला लागणारं मार्गदर्शन देतो. यासाठी आपण खरंच त्याचे किती आभारी आहोत!—स्तो. ३२:८.
यहोवा आपल्या गरजा पुरवतो
७. यहोवा आपल्याला आणखी कोणत्या मार्गाने मदत करतो? (फिलिप्पैकर ४:१९)
७ फिलिप्पैकर ४:१९ वाचा. यहोवा आपलं मार्गदर्शन करतो. शिवाय, आपण जेव्हा अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा तो आपल्याला मदतही करतो. (मत्त. ६:३३; २ थेस्सलनी. ३:१२) आपल्याला आपल्या रोजच्या गरजांबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. असं असलं तरी, तो आपल्याला प्रोत्साहन देतो की आपण या गोष्टींबद्दल जास्त चिंता करू नये. (मत्तय ६:२५ हिंदी अध्ययन नोट पाहा.) तो आपल्याला असं प्रोत्साहन का देतो? कारण आपला पिता त्याच्या विश्वासू सेवकांना गरजेच्या वेळी कधीच एकटं सोडत नाही. (मत्त. ६:८; इब्री १३:५) जेव्हा तो आपल्याला म्हणतो की तो आपल्या गरजा पुरवेल तेव्हा आपण त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे.
८. यहोवाने दावीदसाठी काय केलं?
८ यहोवाने दावीदला कशी मदत केली याचा विचार करा. जेव्हा दावीद शौलपासून पळत होता तेव्हा यहोवाने त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना जिवंत राहण्यासाठी गरजेच्या गोष्टी पुरवल्या. यहोवाने त्या वर्षांमध्ये दावीदला कशी मदत केली हे आठवून तो म्हणतो: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय, पण आजपर्यंत मी एकाही नीतिमान माणसाला निराधार झालेलं, किंवा त्याच्या मुलाबाळांना अन्नासाठी भीक मागत असलेलं पाहिलं नाही.” (स्तो. ३७:२५) दावीदप्रमाणे, यहोवाने आपल्याला आणि भाऊबहिणींना कठीण काळात कशी मदत केली हे आपणही नक्कीच अनुभवलं असेल.
९. विपत्तीच्या काळात यहोवा त्याच्या लोकांच्या गरजा कशा पुरवतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
९ विपत्ती येते तेव्हासुद्धा यहोवा त्याच्या लोकांच्या गरजा पुरवतो. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणच्या भाऊबहिणींनी दुष्काळग्रस्त भागातल्या भाऊबहिणींना गरजेच्या गोष्टी पुरवल्या. (प्रे. कार्यं ११:२७-३०; रोम. १५:२५, २६) आजसुद्धा देवाचे लोक अशाच प्रकारची उदारता दाखवतात. जेव्हा एखादी विपत्ती येते तेव्हा यहोवा त्याच्या लोकांना विपत्तीग्रस्त लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे त्या लोकांना जेवण, पाणी, कपडे आणि औषधांसारख्या गरजेच्या गोष्टी मिळतात. तसंच, भाऊबहीण तिथल्या लोकांची घरं आणि राज्य सभागृहंसुद्धा दुरुस्त करतात. शिवाय, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना यहोवाचे सेवक लगेच भावनिक आणि आध्यात्मिक मदत पुरवतात.c
विपत्तीच्या काळात यहोवा आपल्याला सांत्वन कसं देतो? (परिच्छेद ९ पाहा)e
१०-११. बोरिसच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१० जे लोक अजून यहोवाची उपासना करत नाहीत त्यांच्यासुद्धा गरजा तो उदारतेने पुरवतो. आपणसुद्धा यहोवासारखं वागून अशा लोकांशी दयेने वागायच्या संधी शोधतो. (गलती. ६:१०) जेव्हा आपण असं करतो तेव्हा त्यांना एक चांगली साक्ष मिळते. युक्रेनमध्ये राहणाऱ्या बोरिस नावाच्या एका व्यक्तीचा विचार करा. तो एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. तो यहोवाचा साक्षीदार नसला तरी त्याच्या शाळेतल्या साक्षीदार मुलांशी तो दयेने वागायचा आणि त्यांच्या विश्वासाचा आदर करायचा. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा बोरिसने ठरवलं की तो एका सुरक्षित ठिकाणी पळून जाईल. आणि त्यासाठी भाऊबहिणींनी त्याला खूप मदत केली. नंतर बोरिस, येशूच्या स्मारकविधीलासुद्धा उपस्थित राहिला. भाऊबहिणींनी त्याला कशी मदत केली याबद्दल सांगताना तो म्हणतो: “साक्षीदार माझ्याशी खूप प्रेमाने वागले. त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. मी यहोवाच्या साक्षीदारांचा खूप आभारी आहे.”
११ आपणसुद्धा आपल्या दयाळू पित्यासारखं वागून गरज असलेल्या लोकांना प्रेम दाखवतो; मग ते यहोवाला मानत असले किंवा नसले तरीही. (लूक ६:३१, ३६) त्यांच्याशी प्रेमाने वागल्यामुळे तेही ख्रिस्ताचे शिष्य बनतील अशी आपली आशा असते. (१ पेत्र २:१२) पण असं झालं नाही तरी इतरांना दिल्यामुळे मिळणारा आनंद आपण अनुभवू शकतो.—प्रे. कार्यं २०:३५.
यहोवा आपलं संरक्षण करतो
१२. यहोवाने त्याच्या लोकांना एक गट म्हणून कशा प्रकारचं संरक्षण पुरवायचं वचन दिलंय? (स्तोत्र ९१:१, २, १४)
१२ स्तोत्र ९१:१, २, १४ वाचा. यहोवा आज त्याच्या लोकांचं आध्यात्मिक संरक्षण करायचं वचन देतो. म्हणजेच, त्याच्यासोबतची त्यांची मैत्री धोक्यात येईल अशा गोष्टींपासून तो त्यांचं संरक्षण करतो. तो सैतानाला कधीच शुद्ध उपासना भ्रष्ट करू देणार नाही. (योहा. १७:१५) आणि जेव्हा ‘मोठं संकट’ येईल तेव्हा यहोवा त्याच्या लोकांचं आध्यात्मिक रितीने संरक्षण तर करेलच, शिवाय त्यांना त्या संकटातूनही सोडवेल.—प्रकटी. ७:९, १४.
१३. यहोवा वैयक्तिकरीत्या आपलं संरक्षण कसं करतो?
१३ यहोवा एक गट म्हणून आपलं संरक्षण करतो. पण तो आपल्या प्रत्येकाचं वैयक्तिकरीत्या संरक्षण कसं करतो? त्याच्या वचनातून तो आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला मदत करतो. (इब्री ५:१४) जेव्हा आपण त्याच्या वचनात दिलेल्या तत्त्वांनुसार जीवन जगतो तेव्हा आपलं आध्यात्मिक आणि शारीरिक संरक्षण होतं. (स्तो. ९१:४) यासोबतच, यहोवा त्याच्या मंडळीचा वापर करूनसुद्धा आपलं संरक्षण करतो. (यश. ३२:१, २) यहोवावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या तत्त्वांनुसार जीवन जगणाऱ्या लोकांच्या संगतीत राहून आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि वाईट गोष्टींचा प्रतिकार करायला ताकद मिळते.—नीति. १३:२०.
१४. (क) यहोवा सगळ्याच समस्यांपासून आपलं संरक्षण का करत नाही? (ख) स्तोत्र ९:१० मधून आपल्याला कशाची खातरी मिळते? (तळटीपसुद्धा पाहा.)
१४ पूर्वी यहोवाने काही वेळा त्याच्या सेवकांना दुखापत होण्यापासून किंवा मरणापासून वाचवलं. पण त्याने असं प्रत्येक वेळी केलं नाही. बायबलमध्ये सांगितलंय की ‘अनपेक्षित घटना’ कोणासोबतही घडू शकतात. (उप. ९:११) तसंच, यहोवाने सैतानाला खोटं सिद्ध करण्यासाठी आपल्या काही सेवकांना छळ, इतकंच काय तर मृत्यूसुद्धा सोसू दिला. (ईयो. २:४-६; मत्त. २३:३४) आजसुद्धा असंच घडतं. आज यहोवा कदाचित आपल्या समस्या काढून टाकणार नाही, पण आपण याची खातरी ठेवू शकतो, की जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना तो कधीच सोडणार नाही.d—स्तो. ९:१०.
यहोवा आपलं सांत्वन करतो
१५. आपल्याला प्रार्थनेमुळे, बायबलमुळे आणि भाऊबहिणींमुळे सांत्वन कसं मिळतं? (२ करिंथकर १:३, ४)
१५ २ करिंथकर १:३, ४ वाचा. कधीकधी आपणसुद्धा दुःखाचा, चिंतेचा किंवा निराशेचा सामना करतो. तुम्हीसुद्धा सध्या अशा परिस्थितीतून जात आहात का? आणि त्यामुळे तुम्हाला एकटं वाटतंय का? आपल्या भावना कोणीच समजून घेऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? यहोवा तुमच्या भावना समजून घेऊ शकतो. त्याला आपल्या वेदना तर कळतातच, शिवाय तो ‘आपल्या सगळ्या संकटांमध्ये आपलं सांत्वनही करतो.’ ते कसं? जेव्हा आपण त्याला प्रार्थना आणि याचना करतो तेव्हा तो आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” देतो. (फिलिप्पै. ४:६, ७) जेव्हा आपण बायबलमधून त्याचे शब्द वाचतो, तेव्हासुद्धा आपल्याला सांत्वन मिळतं. बायबल वाचल्यावर आपल्याला समजतं की यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे. त्यामधून तो आपल्याला चांगले निर्णय कसे घेता येतील ते शिकवतो आणि आपल्याला एक सुंदर आशासुद्धा देतो. तसंच, जेव्हा आपण सभांमध्ये जातो तेव्हा आपल्या प्रेमळ भाऊबहिणींमुळे आणि बायबलमधून शिकलेल्या गोष्टींमुळे आपल्याला सांत्वन मिळतं.
१६. नेथन आणि प्रिसिल्लाच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१६ यहोवा त्याच्या वचनातून आपल्याला सांत्वन आणि प्रोत्साहन कसं देतो हे समजून घ्यायला अमेरिकेत राहणाऱ्या नेथन आणि प्रिसिल्ला या जोडप्याच्या अनुभवाचा विचार करा. काही वर्षांपूर्वी, त्यांनी प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जायचा निर्णय घेतला. नेथन म्हणतात: “आम्हाला पूर्ण भरवसा होता की यहोवा आमच्या मेहनतीवर आशीर्वाद देईल.” पण त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना अचानक आरोग्याच्या समस्यांचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. काही काळाने या जोडप्याला त्यांच्या घरी परत जावं लागलं. पण घरी गेल्यावरसुद्धा त्यांच्या आर्थिक समस्या सुटल्या नाहीत. नेथन म्हणतात: “आम्हाला वाटलं होतं त्या प्रकारे यहोवाने आमच्या मेहनतीवर आशीर्वाद का नाही दिला, याचा मी नेहमी विचार करायचो. मला असंसुद्धा वाटू लागलं की ‘माझ्या हातूनच एखादी चूक घडली असेल.’” पण काही काळाने नेथन आणि प्रिसिल्लाला जाणवलं की त्यांच्या गरजेच्या वेळी देवाने त्यांना सोडून दिलं नव्हतं. नेथन म्हणतात: “त्या कठीण काळात बायबल आमच्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देणाऱ्या मित्रासारखं होतं. त्या काळात आलेल्या समस्यांवर लक्ष देण्याऐवजी यहोवाने आम्हाला कसं सांभाळलं याचा आम्ही विचार करतो. यामुळे पुढे येणाऱ्या समस्यांचा विश्वासाने सामना करायला आम्ही तयार आहोत.”
१७. हेल्गा नावाच्या बहिणीला सांत्वन कसं मिळालं? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ आपले भाऊबहीण आपलं सांत्वन कसं करतात? हंगेरीमध्ये राहणाऱ्या हेल्गा नावाच्या बहिणीचा विचार करा. बऱ्याच दशकांपासून तिच्यावर वेगवेगळ्या समस्या आल्या. त्यामुळे तिला तणावाचा सामना करावा लागला आणि आपण काहीच कामाचे नाही असं तिला वाटू लागलं. पण आज जेव्हा ती मागे वळून पाहते, तेव्हा यहोवाने मंडळीकडून तिला कसं सांत्वन दिलं हे ती स्पष्टपणे पाहू शकते. ती म्हणते: “मला नोकरीवर जावं लागायचं, माझ्या आजारी मुलाची काळजी घ्यावी लागायची. आणि मला इतरही समस्या होत्या. त्यामुळे कधीकधी वाटायचं माझ्यात ताकदच उरली नाही. पण यहोवा हे सगळं पाहायचा आणि मला मदत करायचा. मागच्या ३० वर्षांत असा एकही दिवस गेला नाही, ज्यात यहोवाने मला सांत्वन द्यायचं त्याचं वचन पाळलं नाही. भाऊबहिणींचा वापर करून त्याने मला खूप मदत केली आणि अजूनही करतोय. भाऊबहीण माझ्याशी खूप प्रेमाने बोलतात आणि यामुळे मला हिंमत मिळते. मला आठवतंय, मला जेव्हा सगळ्यात जास्त गरज असायची नेमकं तेव्हाच कोणीतरी मला मेसेज करायचं, कार्ड पाठवायचं किंवा माझं कौतुक करायचं.”
यहोवा तुमचा वापर करून इतरांचं सांत्वन कसं करू शकतो? (परिच्छेद १७ पाहा)
१८. आपण इतरांचं सांत्वन कसं करू शकतो?
१८ इतरांचं सांत्वन करून आपल्याकडे आपल्या देवासारखं वागायची चांगली संधी आहे. आपण हे कसं करू शकतो? आपण इतरांचं धीराने ऐकतो, त्यांच्याशी प्रेमाने बोलतो आणि त्यांना व्यावहारिक मार्गांनी मदत करतो, तेव्हा आपण असं करू शकतो. (नीति. ३:२७) समस्यांचा सामना करणाऱ्या सगळ्या लोकांना आपण सांत्वन द्यायचा प्रयत्न करतो; मग ते यहोवाची उपासना करत नसले तरीही. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुःखाचा, आजारपणाचा किंवा चिंतेचा सामना करताना पाहतो, तेव्हा आपण त्यांना भेटतो, त्यांचं लक्ष देऊन ऐकतो आणि बायबलमधले प्रोत्साहन देणारे शब्द त्यांना दाखवतो. ‘सगळ्या प्रकारचं सांत्वन’ देणाऱ्या यहोवा देवासारखं वागून आपण आपल्या भाऊबहिणींना संकटांचा सामना करायला मदत करतो. इतकंच नाही, तर विश्वासात नसलेल्या लोकांची मनंसुद्धा आपण शुद्ध उपासनेकडे वळवतो.—मत्त. ५:१६.
यहोवा नेहमी आपल्याला मदत करेल
१९. यहोवा आपल्यासाठी काय करतो आणि आपण त्याच्यासारखं कसं वागू शकतो?
१९ यहोवाला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची खूप काळजी आहे. आपल्यावर समस्या येतात, तेव्हा तो आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. प्रेमळ आईवडिलांना आपल्या मुलांची जशी काळजी असते तशीच यहोवाला त्याच्या विश्वासू सेवकांची काळजी असते. तो त्यांचं मार्गदर्शन करतो, त्यांच्या गरजा पुरवतो, त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांना सांत्वन देतो. जेव्हा आपण समस्येत असलेल्या लोकांना मदत करतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो तेव्हा आपण आपल्या प्रेमळ पित्यासारखं वागत असतो. आपल्यावर कितीही समस्या आल्या आणि दुःखं आली, तरी आपण याची खातरी ठेवू शकतो की यहोवा नेहमी आपल्यासोबत राहील. कारण त्याने असं वचन दिलंय: “भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे.” (यश. ४१:१०) या शब्दांमुळे आपण पूर्ण खातरीने हे म्हणू शकतो की ‘आपण कधीच एकटे नाही!’
गीत १०० पाहुणचार करू या!
a १५ एप्रिल २०११ च्या टेहळणी बुरूज अंकातला “देवाचा सन्मान होईल असे निर्णय घ्या” हा लेख पाहा.
b फेब्रुवारी २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहा” या लेखातले परिच्छेद ११-१४ पाहा.
c jw.org वर “विपत्ती मदतकार्य” असं टाईप करून तुम्हाला याबद्दलचे काही अलीकडचे अनुभव वाचायला मिळतील.
d फेब्रुवारी २०१७ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.
e चित्राचं वर्णन: नैसर्गिक विपत्तीचा सामना केल्यानंतर मलावीमधल्या भाऊबहिणींना गरजेच्या गोष्टी आणि आध्यात्मिक मदत मिळत आहे.