वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१५ पृ. १९-२४
  • आपल्या नावासारखेच जेरुसलेम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या नावासारखेच जेरुसलेम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक भव्य संमेलन
  • आणखी एक आनंदमय संमेलन
  • आपण देवाचे मंदिर सोडू नये
  • आनंदमय समर्पण
  • सदासर्वदा आनंद
  • जेरुसलेम—तुमच्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यरुशलेमच्या भिंती
    बायबलमधून शिकू या!
  • जेरूसलेमच्या वेशी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१५ पृ. १९-२४

आपल्या नावासारखेच जेरुसलेम

“जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय . . . करितो.”—यशया ६५:१८.

१. देवाच्या निवडलेल्या शहराविषयी एज्राच्या कशा भावना होत्या?

यहुदी याजक एज्रा याला देवाच्या वचनाबद्दल मोठी आस्था होती; आणि त्यामुळे एकेकाळी यहोवाच्या खऱ्‍या उपासनेचे मुख्य स्थान असणाऱ्‍या जेरुसलेमविषयीही त्याच्या मनात गाढ श्रद्धा होती. (अनुवाद १२:५; एज्रा ७:२७) देवाच्या शहराविषयी त्याला वाटणारे हे प्रेम त्याने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या बायबलमधील पुस्तकांतून अगदी स्पष्टपणे व्यक्‍त होते. पहिले आणि दुसरे इतिहास व एज्रा, ही ती पुस्तके आहेत. पूर्ण बायबलमध्ये जेरुसलेम या शहराचा उल्लेख ८०० पेक्षा जास्त वेळा येतो, पण एज्राच्या या ऐतिहासिक लेखांत मात्र हे नाव जवळजवळ २०० वेळा आढळते.

२. जेरुसलेमच्या नावात कोणत्या प्रकारची भविष्यवाणी गोवलेली आहे?

२ बायबलमध्ये वापरलेल्या हिब्रू भाषेतील “यरुशलेम” हे नाव द्विवचनात लिहिण्यात आले आहे, हे आपण समजू शकतो. या द्विवचनाचा डोळे, कान, हात आणि पाय यांसारख्या जोडीने आढळणाऱ्‍या गोष्टींचा उल्लेख करण्याकरता बहुतेकवेळा उपयोग करण्यात येतो. हे द्विवचनी रूप एका अर्थाने जेरुसलेमविषयी एक भविष्यवाणी आहे; ती अशी की देवाच्या लोकांना भवितव्यात दोन प्रकारची शांती लाभेल—आध्यात्मिक आणि शब्दशः अर्थानेही. एज्राला ही गोष्ट पूर्णपणे समजली होती किंवा नाही, याविषयी शास्त्रवचनामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. पण देवासोबत शांतीचे संबंध राखण्यात यहुदी लोकांना मदत करण्याकरता एज्राने याजक म्हणून आपली जबाबदारी जिवाभावाने पार पाडली. आणि जेरुसलेम शहराला स्वतःच्या नावाप्रमाणे अर्थात “दुहेरी शांतीचे ठिकाण [किंवा, आधार]” होण्याकरता त्याने खरोखरच प्रयत्नांची पराकाष्टा केली.—एज्रा ७:६.

३. किती वर्षांनी एज्राच्या कामांविषयी पुन्हा उल्लेख आला आहे आणि यावेळेस तो आपल्याला काय करताना आढळतो?

३ एज्रा जेरुसलेमला आला त्यानंतर १२ वर्षांनी नहेम्या येथे आला, पण या दरम्यान एज्रा कोठे होता याविषयी बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेले नाही. अर्थात त्या काळादरम्यान इस्राएल देश आध्यात्मिकरीत्या फार वाईट स्थितीत होता त्यामुळे एज्रा त्याकाळात तेथे हजर नसावा असे वाटते. पण जेरुसलेम शहराची तटबंदी पूर्ण झाल्यानंतर काही काळातच एज्रा पुन्हा एकदा याजक म्हणून विश्‍वासूपणे सेवा करत असल्याचे आढळते.

एक भव्य संमेलन

४. इस्राएलच्या सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसाचे काय महत्त्व होते?

४ इस्राएलच्या धार्मिक दिनदर्शिकेनुसार येणाऱ्‍या तिशरी या सातव्या महिन्यात एका महत्त्वाच्या सणाच्या अगदी आधी जेरुसलेमच्या तटबंदीचे काम पूर्ण झाले. तिशरी महिन्याच्या पहिल्या दिवशी नव्या चंद्राचा खास सण साजरा केला जायचा, त्या सणाला कर्णे वाजवण्याचा सण असेही म्हटले जात असे. त्यादिवशी, यहोवाला अर्पण चढवण्याच्यावेळी याजक कर्णे वाजवत. (गणना १०:१०; २९:१) या दिवसापासून इस्राएली लोक तिशरी महिन्यातील १० तारखेला येणाऱ्‍या वार्षिक प्रायश्‍चित्त दिनाकरता आणि याच महिन्यातील १५ ते २१ तारखेपर्यंत चालणाऱ्‍या संग्रहाच्या सणाच्या तयारीला लागत.

५. (अ) एज्राने आणि नहेम्याने ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी’ कोणते चांगले कार्य केले? (ब) इस्राएली लोक का रडले?

५ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी’ “सर्व लोक” एकत्र आले; नहेम्या आणि एज्रा यांनीच कदाचित त्यांना असे करण्याकरता उत्तेजन दिले असावे. स्त्री-पुरुष आणि “ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते” असे सर्वजण तेथे उपस्थित होते. त्याअर्थी लहान मुलेही तेथे होती आणि “पहाटपासून दोन प्रहरपर्यंत” एज्रा मंचावरून नियमशास्त्राचे वाचन करत होता तेव्हा ही मुले अगदी मनापासून लक्ष देऊन ऐकत होती. (नहेम्या ८:१-४) वाचन सुरू असताना लेवीय अधूनमधून लोकांना अर्थ समजावून सांगत होते. आपल्या वाडवडिलांप्रमाणे आपण देवाच्या नियमशास्त्रापासून किती दूर गेलो होतो हे समजल्यानंतर इस्राएल लोक रडू लागले.—नहेम्या ८:५-९.

६, ७. यहुदी लोकांनी रडणे थांबवावे म्हणून नहेम्याने जे केले त्यातून ख्रिस्ती काय शिकू शकतात?

६ पण दुःखी होऊन रडत बसण्याची ही वेळ नव्हती. कारण हा सणाचा दिवस होता शिवाय नुकतेच जेरुसलेमच्या तटबंदीचे बांधकामही पूर्ण झाले होते. त्यामुळे नहेम्याने त्यांना असे सांगितले: “जा, मिष्टान्‍नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांस वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्‍वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्‍वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.” त्याच्या आज्ञेनुसार, “सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांस ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांस वाचून दाखविली होती ती त्यांस समजली होती.”—नहेम्या ८:१०-१२.

७ आज देवाचे लोक या अहवालातून पुष्कळ काही शिकू शकतात. सभांमध्ये आणि संमेलनांमध्ये शिकवण्याची ज्यांना सुसंधी मिळते त्यांनी वरील उदाहरण लक्षात ठेवण्यास हवे. या सभांतून, आवश्‍यकतेनुसार चुका सुधारण्याकरता सल्ला तर मिळतोच, पण त्यासोबत या प्रसंगी देवाच्या अपेक्षेप्रमाणे वागल्यामुळे किती आशीर्वाद आणि लाभ मिळतात हे सर्वांच्या लक्षात आणून दिले जाते. बांधवांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली जाते आणि त्यांना धीर धरण्याकरता उत्तेजनही दिले जाते. अशा प्रसंगी देवाच्या वचनातून दिले जाणारे मार्गदर्शन उभारणीकारक असावे, ज्यामुळे या सभांतून ते आनंदी होऊन परततील.—इब्री लोकांस १०:२४, २५.

आणखी एक आनंदमय संमेलन

८, ९. सातव्या महिन्याच्या दुसऱ्‍या दिवशी कोणती खास सभा भरवण्यात आली आणि देवाच्या लोकांवर या सभेचा कसा परिणाम झाला?

८ त्या खास महिन्याच्या दुसऱ्‍या दिवशी “सर्व लोकांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री याच्याजवळ जमा झाले.” (नहेम्या ८:१३) आणि अशाप्रकारची सभा चालवण्याकरता लागणारी योग्यता एज्राजवळ होती कारण त्याने “नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा . . . निश्‍चयच केला होता.” (एज्रा ७:१०) देवाच्या लोकांनी नियमशास्त्राच्या कराराचे पालन करताना कोणत्या गोष्टींवर खास लक्ष देण्याची गरज आहे हे या सभेदरम्यान स्पष्ट झाले असावे. खासकरून मांडवांचा सण अगदी तोंडाशी आला असल्यामुळे, त्याकरता आवश्‍यक ती तयारी करण्याची गरज होती.

९ आठवडाभर चालणारा हा सण योग्यप्रकारे साजरा करण्यात आला आणि सर्व लोक झाडांच्या फांद्यापासून आणि पानांपासून तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या मांडवांत राहिले. कोणी हे मांडव आपल्या घराच्या छतावर, तर कोणी घराच्या किंवा मंदिराच्या अंगणात तर इतरांनी जेरुसलेम शहराच्या चौकांत घातले होते. (नहेम्या ८:१५, १६) लोकांना एकत्र आणून देवाचे नियमशास्त्र त्यांना वाचून दाखवण्याची ही किती उत्तम संधी! (पडताळा अनुवाद ३१:१०-१३.) आणि सणाच्या अगदी “पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत” हेच करण्यात आले; साहजिकच त्यामुळे देवाच्या लोकांना “आनंदच आनंद झाला.”—नहेम्या ८:१७, १८.

आपण देवाचे मंदिर सोडू नये

१०. सातव्या महिन्यातील २४ तारखेला एका खास सभेचे आयोजन का करण्यात आले?

१० देवाच्या लोकांच्या गंभीर चुका त्यांच्या लक्षात आणून देण्याची योग्य वेळ आणि जागा असते. असे करण्याची ही योग्य वेळ आहे याची एज्राला आणि नहेम्याला निश्‍चितच जाणीव झाली असावी, म्हणूनच त्यांनी तिशरी महिन्यातील २४ वा दिवस उपवास करण्याकरता ठरवला. पुन्हा एकदा देवाच्या नियमशास्त्राचे वाचन करण्यात आले आणि लोकांनी आपल्या पापांची कबुली दिली. त्यानंतर लेवीयांनी मार्गभ्रष्ट झालेल्या आपल्या लोकांसोबत देवाच्या प्रेमळ वागणुकीचे स्मरण करून दिले, अगदी सुंदर शब्दांत यहोवाची स्तुती केली तसेच अधिपती, लेवीय आणि याजकांनी मोहर लावलेला एक ‘दृढ करारही’ केला.—नहेम्या ९:१-३८.

११. यहुद्यांनी कोणता “दृढ करार” पूर्ण करण्याची शपथ घेतली?

११ आपण हा “दृढ करार” पूर्ण करू, अशी सर्व लोकांनी शपथ घेतली. ‘खऱ्‍या देवाच्या नियमाप्रमाणे’ वागण्याचा त्यांनी निश्‍चय केला. तसेच “या देशातल्या” मुलामुलींसोबत लग्न न करण्याचेही त्यांनी कबूल केले. (नहेम्या १०:२८-३०) याशिवाय, शब्बाथ पाळण्याची, खऱ्‍या उपासनेकरता दरवर्षी आर्थिक मदत करण्याची, अर्पणाकरता लाकूड देण्याची, आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथम जन्मलेले अर्पणाकरता देण्याची आणि शेतातील पहिले पीक मंदिराच्या कोठड्यांत आणण्याची यहुद्यांनी शपथ घेतली. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांनी ‘आपल्या देवाचे मंदिर न सोडण्याचा’ ठाम निर्णय घेतला होता.—नहेम्या १०:३२-३९.

१२. आज देवाच्या मंदिराचा त्याग न करण्यात काय समाविष्ट आहे?

१२ आज यहोवाच्या लोकांनी देवाच्या महान आध्यात्मिक मंदिराच्या अंगणात ‘सेवा करण्याचा’ आपला सुहक्क सोडू नये. (प्रकटीकरण ७:१५) यहोवाच्या उपासनेचा प्रसार व्हावा यासाठी नियमितपणे मनःपूर्वक प्रार्थना करण्याचाही यात समावेश होतो. या आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने आपण जगलेही पाहिजे; त्यासाठी ख्रिस्ती सभांची तयारी करणे आणि त्यांत सहभाग घेणे, सुवार्तेच्या प्रचारासाठी करण्यात येणाऱ्‍या योजनांमध्ये हिरीरीने भाग घेणे व आस्था दाखवणाऱ्‍यांकडे परत जाणे तसेच शक्य असल्यास त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू करणे आवश्‍यक आहे. यहोवाचे मंदिर सोडण्याची इच्छा नसलेले अनेक लोक प्रचाराच्या कामासाठी आणि खऱ्‍या उपासनेच्या जागांकरता होणारा खर्च भागवण्यासाठी आर्थिक साहाय्य पुरवतात. राज्य सभागृह बांधण्याची जेथे नितान्त आवश्‍यकता आहे अशा ठिकाणी होणाऱ्‍या बांधकामात आणि ती ठिकाणे स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यात आपणही हातभार लावू शकतो. देवाच्या आध्यात्मिक घराविषयी वाटणारे प्रेम दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपल्या सहविश्‍वासू बांधवांमध्ये शांतीचे आणि सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे तसेच भौतिक आणि आध्यात्मिक मदतीची आवश्‍यकता असलेल्या कोणत्याही व्यक्‍तीला साहाय्य करणे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; इब्री लोकांस १३:१५, १६.

आनंदमय समर्पण

१३. जेरुसलेमच्या तटबंदीच्या समर्पणाच्याआधी कोणत्या अत्यावश्‍यक गोष्टीकडे लक्ष देण्याचे बाकी राहिले होते आणि अनेक लोकांनी कोणते उत्तम उदाहरण मांडले?

१३ नहेम्याच्या दिवसांत ‘दृढ करारावर’ मोहर लावण्यात आली तेव्हा देवाचे हे प्राचीन काळातील लोक जरुसलेमच्या तटबंदीचे समर्पण करण्याच्या तयारीत होते. पण अद्यापही एका अत्यावश्‍यक गोष्टीकडे लक्ष देण्याचे बाकी होते. आता जेरुसलेम १२ वेशींच्या तटबंदीमुळे पूर्णपणे सुरक्षित तर होते, पण तेथे म्हणावे तितके लोक अद्यापही नव्हते. काही इस्राएली लोक तेथे वास्तव्यास असले तरी, त्या ‘विस्तीर्ण व मोठ्या नगराच्या’ मानाने ‘त्यात थोडे लोक होते.’ (नहेम्या ७:४) ही समस्या सोडवण्यासाठी ‘दर दहातल्या एकाने पवित्र नगर येरुशलेम येथे राहावे’ म्हणून या लोकांनी ‘चिठ्या टाकल्या.’ असे करण्यास अनेक लोकांनी मोठ्या आनंदाने आपली सहमती दर्शवली त्यामुळे “जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांस लोकांनी धन्य म्हटले.” (नहेम्या ११:१, २) प्रौढ ख्रिश्‍चनांच्या मदतीची जेथे अधिक आवश्‍यकता आहे तेथे जाण्यास शक्य असलेल्या प्रौढ ख्रिश्‍चनांकरता हे किती उत्तम उदाहरण!

१४. जेरुसलेमच्या तटबंदीचे समर्पण होण्याच्या दिवशी काय झाले?

१४ जेरुसलेमच्या तटबंदीच्या समर्पणासंबंधित आवश्‍यक त्या तयारीला लवकरच सुरवात झाली. यहुदाच्या आसपासच्या शहरांतील संगीतकारांना आणि गायकांना गोळा करण्यात आले. स्तुतिगीते गाण्याकरता त्यांचे दोन गट तयार करण्यात आले. या गटांच्या मागून मिरवणूक निघणार होती. (नहेम्या १२:२७-३१, ३६, ३८) मंदिरापासून सर्वात दूर असलेल्या तटबंदीच्या वेशीपासून कदाचित खोरेवेशीपासून या गायकांनी मिरवणुकीला सुरवात केली आणि मग या दोन्ही मिरवणुकी वेगवेगळ्या दिशेने जाऊन देवाच्या मंदिरापाशी येऊन मिळाल्या. “त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण देवाने त्यांस आनंदाने परिपूरित केले होते; बायकामुलांनीहि आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनि दूर जाऊन पोहोंचला.”—नहेम्या १२:४३.

१५. जेरुसलेमच्या तटबंदीच्या समर्पणामुळे झालेला आनंद फार काळ का टिकला नाही?

१५ या आनंदी घटनेची तारीख बायबलमध्ये देण्यात आलेली नाही. जेरुसलेमच्या पुनर्वसनातला हा सर्वात महत्त्वाचा टप्पा नसला तरीसुद्धा ही निश्‍चितच एक अतिशय विशेष अशी घटना होती. अर्थात, शहराच्या आत अद्यापही पुष्कळ बांधकाम करायचे बाकी होते. पण जेरुसलेमच्या रहिवाशांचा आध्यात्मिक गोष्टींबद्दल असलेला उत्साह फार काळ कायम राहिला नाही. उदाहरणार्थ, नहेम्या जेव्हा दुसऱ्‍यांदा या शहरात आला तेव्हा त्याला असे आढळले की इस्राएली लोकांनी देवाच्या मंदिराला पुन्हा एकदा सोडून दिले आहे आणि ते परत मूर्तिपूजक स्त्रियांशी लग्न करू लागले आहेत. (नहेम्या १३:६-११, १५, २३) भविष्यवक्‍ता मलाखी यानेही या वाईट परिस्थितींविषयी आपल्या पुस्तकात सांगितले आहे. (मलाखी १:६-८; २:११; ३:८) अशा रितीने जेरुसलेमच्या तटबंदीच्या समर्पणामुळे झालेला आनंद फार काळ टिकला नाही.

सदासर्वदा आनंद

१६. देवाचे लोक कोणती महत्त्वाची घटना होण्याची वाट पाहत आहेत?

१६ देव त्याच्या शत्रूंवर केव्हा विजय मिळवतो, हे पाहण्यास यहोवाचे लोक आज फार आतुर झाले आहेत. या कार्याची सुरवात सर्व खोट्या धर्मांचा समावेश असलेल्या लाक्षणिक शहराच्या—‘मोठ्या बाबेलच्या’ विनाशाने होईल. (प्रकटीकरण १८:२, ८) खोट्या धर्मांचा विनाश हे येणाऱ्‍या मोठ्या संकटाचे पहिले पाऊल असेल. (मत्तय २४:२१, २२) याशिवाय, आपल्यासमोर आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडणार आहे—‘नव्या यरुशलेमच्या’ १,४४,००० नागरिकांनी मिळून बनलेल्या नवरीसोबत प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वर्गातील विवाह. (प्रकटीकरण १९:७; २१:२) हा विवाह केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही, पण ही एक आनंदमय घटना असेल हे नक्की.—ऑगस्ट १५, १९९० या अंकाचे टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठे ३०-१ पाहा.

१७. नव्या जेरुसलेमच्या पूर्ण होण्याविषयी आपल्याला काय माहीत आहे?

१७ नव्या जेरुसलेममधील नागरिकांची संख्या लवकरच पूर्ण होईल हे आपल्याला निश्‍चित माहीत आहे. (मत्तय २४:३, ७-१४; प्रकटीकरण १२:१२) हे शहर पृथ्वीवरील जेरुसलेमप्रमाणे नसल्याने आपली केव्हाही निराशा होणार नाही. याचे कारण म्हणजे या शहराचे नागरिक आत्म्याने अभिषिक्‍त झालेले, पारख झालेले आणि शुद्ध करण्यात आलेले येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहून त्यांपैकी प्रत्येक जण विश्‍वाच्या सार्वभौम राजाला आपली संपूर्ण एकनिष्ठता शाबीत करू शकेल. याचा इतर मानवजातीकरता फार मोठा अर्थ होतो मग ते मेलेले असोत अथवा जिवंत!

१८. आपण ‘सदा आनंदित आणि उल्लासित’ का होण्यास हवे?

१८ येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांकडे नवीन जेरुसलेम आपले लक्ष वळवील तेव्हा काय होईल याविषयी जरा विचार करा. प्रेषित योहानाने असे लिहिले: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:२-४) याशिवाय, मानवजातीला परिपूर्णतेप्रत पोहंचवण्याकरताही देव या शहराचा उपयोग करेल. (प्रकटीकरण २२:१, २) ‘देव जे उत्पन्‍न करतो त्यात सदा आनंदी राहण्यास व उल्लासित होण्यास’ किती मोठे कारण!—यशया ६५:१८.

१९. ख्रिश्‍चनांना कोणत्या आत्मिक परादीसमध्ये एकत्रित करण्यात आले आहे?

१९ पण पश्‍चात्तापी लोकांना देवाची मदत प्राप्त करण्याकरता तोपर्यंत थांबावे लागेल असा याचा अर्थ होत नाही. १९१९ मध्ये यहोवाने १,४४,००० लोकांपैकी अखेरच्या सदस्यांना आत्मिक परादीसमध्ये एकत्रित करण्यास सुरवात केली. या आत्मिक परादीसमध्ये देवाच्या आत्म्याच्या फळांची—प्रेम, आनंद आणि शांती—विपुलता आहे. (गलतीकर ५:२२, २३) या आत्मिक परादीसचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे यातील अभिषिक्‍त सदस्यांचा विश्‍वास. या अभिषिक्‍त जनांनी संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात पुढाकार घेतला आणि यामुळे विलक्षण परिणाम घडून आले आहेत. (मत्तय २१:४३; २४:१४) त्यामुळे पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या जवळजवळ साठ लाख ‘दुसऱ्‍या मेंढरांनासुद्धा’ या परादीसमध्ये येण्यास आणि आपल्या कामात फलदायी होण्यास शक्य झाले आहे. (योहान १०:१६) यहोवा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवून स्वतःचे समर्पण केल्यामुळे ते या कामास लायक ठरले आहेत. नव्या जरुसलेमच्या भावी सदस्यांसोबत सहवास राखल्यामुळे त्यांना खरोखरच आशीर्वाद मिळाला आहे. अशाप्रकारे, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा उपयोग करून यहोवाने ‘नव्या पृथ्वीचा’ भक्कम पाया घातला आहे, अर्थात देवाला भिऊन वागणाऱ्‍या मानवांचा एक समाज निर्माण केला आहे आणि हे सर्व लोक स्वर्गीय शासनाखाली या पृथ्वीवर राहतील.—यशया ६५:१७; २ पेत्र ३:१३.

२०. नवे जेरुसलेम आपल्या नावाप्रमाणे कसे होईल?

२० यहोवाचे लोक सध्या त्यांच्या ज्या आत्मिक परादीसमध्ये शांती अनुभवत आहेत तीच शांती शब्दशः अर्थाने लवकरच त्यांना या पृथ्वीवरील परादीसमध्ये अनुभवण्यास मिळेल. जेव्हा नवे जेरुसलेम मानवजातीला आशीर्वादित करण्याकरता स्वर्गातून उतरेल तेव्हा हे घडेल. यशया ६५:२१-२५ येथे अभिवचन देण्यात आलेल्या शांतिमय परिस्थितींचा आनंद देवाचे लोक दोन प्रकारे घेतील. ज्या अभिषिक्‍त लोकांनी स्वर्गीय नव्या जेरुसलेममधील आपले स्थान अद्याप प्राप्त केलेले नाही ते आणि ‘दुसऱ्‍या मेंढराचे’ सदस्य आध्यात्मिक परादीसमध्ये एकजुटीने यहोवाची उपासना करत आहेत आणि देवापासून मिळणारी शांती ते आजही अनुभवत आहेत. आणि ‘देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवरही होईल’ तेव्हा ही शांती संपूर्ण पृथ्वीवरील परादीस व्यापून टाकेल. (मत्तय ६:१०) होय, ‘दुहेरी शांतीचा आधार’ या अर्थाने देवाचे स्वर्गातील वैभवी जेरुसलेम शहर आपल्या नावाप्रमाणेच खरे ठरेल. हे शहर आपला महान निर्माणकर्ता यहोवा देव आणि आपला वर म्हणजेच राजा येशू ख्रिस्त यांना कायम गौरव देत राहील.

तुम्हाला आठवते का?

◻ नहेम्याने जेरुसलेममध्ये लोकांना एकत्र केल्यामुळे काय साध्य झाले?

◻ देवाचे मंदिर न त्यागण्यासाठी प्राचीन यहुद्यांना काय करायचे होते आणि आपल्याकडून काय करण्याची अपेक्षा केली जाते?

◻ ‘यरुशलेममुळे’ सदा सर्वदाची शांती आणि सुख कसे मिळेल?

[२३ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

जेरुसलेमच्या वेशी

आज या जागांची उंची मीटरमध्ये दाखवण्यात आली आहे

मत्स्य वेस

जुनी वेस

एफ्राईम वेस

कोपऱ्‍यावरील वेस

रुंद कोट

चौक

खोरे वेस

दुसरी पेठ

आरंभीचा उत्तरेचा कोट

दावीदपूर

उकिरडा वेस

हिन्‍नोमचे खोरे

राजवाडा

मेंढेवेस

गारद्यांची वेस

मंदिराचे क्षेत्र

निरीक्षण वेस

घोडे वेस

ओफेल

चौक

पाणी वेस

गीहोन नदी

झरा वेस

राजाची बाग

एनरोगेल

टाइरोपियोन (मध्य भागातील) खोरे

किद्रोन ओहळ

७४०

७३०

७३०

७५०

७७०

७७०

७५०

७३०

७१०

६९०

६७०

६२०

६४०

६६०

६८०

७००

७२०

७४०

७३०

७१०

६९०

६७०

जेव्हा जेरुसलेम शहराचा विनाश झाला आणि नहेम्याने त्या शहराची तटबंदी परत बांधण्यास पुढाकार घेतला तेव्हा या शहराची तटबंदी कदाचित इतकी होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा