“हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर”
“अलिकडील महिन्यात मला सेवेचा कंटाळा आला आहे व मी दुःखी असते,” असे नॅन्सीचे म्हणणे आहे.a गेल्या दहा वर्षांपासून ती पायनियर अर्थात, सुवार्तेची पूर्ण वेळेची प्रचारक म्हणून सेवा करत आहे. तरीपण ती म्हणते: “माझ्याबाबतीत जे होतंय ते मला आवडत नाही. मी राज्य संदेश सादर करायचा म्हणून करते आहे, माझ्यात उत्साहच राहिलेला नाही. मी काय करू?”
यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत वडील या नात्याने कार्य करीत असलेल्या कीथची गोष्ट घ्या. “तुम्ही नक्कीच कसला तरी खूप विचार करताय. तुम्ही आताच जी प्रार्थना केली त्यामध्ये, तुम्ही अन्नासाठी आभार मानले, पण आपली ही जेवणाची वेळ नाहीए!” असे जेव्हा कीथची पत्नी त्याला म्हणाली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. कीथ कबूल करतो: “विचार न करताच मी प्रार्थना करतो हे मला जाणवतंय.”
तुम्ही यहोवा देवाची करत असलेली स्तुती भावनाशून्य व विचार न करता केलेली असावी असे तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. तर, तुम्हाला मनापासून, बेंबीच्या देठापासून कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटेल. परंतु, भावना वस्त्राप्रमाणे काढघाल करता येत नाहीत. त्या एखाद्याच्या आतून व्यक्त झाल्या पाहिजेत. एखाद्याला मनापासून कृतज्ञता कशी वाटेल? १०३ स्तोत्र याबाबतीत आपल्याला काही समज देते.
प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने १०३ स्तोत्र रचले. तो या स्तोत्राची अशाप्रकारे सुरवात करतो: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.” (स्तोत्र १०३:१) “देवासाठी लागू होणाऱ्या धन्यवाद या शब्दाचा अर्थ, स्तुती करणे, त्याच्याबद्दल गाढ प्रेम तसेच कृतज्ञता व्यक्त करणे, असा होतो,” असे एका पुस्तकात म्हटले आहे. प्रेम आणि कृतज्ञता यांनी ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणाने यहोवाची स्तुती करण्याची इच्छा असल्यामुळे दावीद आपल्या जिवाला—स्वतःला—‘यहोवाचा धन्यवाद’ करण्यास आर्जवतो. दावीद ज्या देवाची उपासना करतो त्याच्याबद्दल त्याच्या मनात इतके गाढ प्रेम कशामुळे उत्पन्न झाले?
दावीद पुढे म्हणतो: “यहोवाने केलेली कार्ये विसरू नको.” (स्तोत्र १०३:२, NW) यहोवाचे आभार मानण्याचा संबंध, ‘त्याने केलेल्या कार्यांवर’ कृतज्ञतापूर्वक मनन करण्याशी आहे. यहोवाने केलेली नक्की कोणती कार्ये दावीदाच्या मनात आहेत? एका निरभ्र रात्री ताऱ्यांनी मढलेले आकाश, ही यहोवा देवाची सृष्टी पाहून निर्माणकर्त्याबद्दल आपले अंतःकरण कृतज्ञतेने ओतप्रोत भरते. तारांगण पाहून दावीद भारावून गेला. (स्तोत्र ८:३, ४; १९:१) पण, १०३ स्तोत्रात, दावीद यहोवाच्या दुसऱ्या एका कार्याची आठवण करतो.
यहोवा “तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो”
या स्तोत्रात दावीद देवाच्या प्रेमळ कृपेच्या कार्यांची आठवण करतो. यांतील पहिल्यावहिल्या कार्याबद्दल तो गातो: ‘यहोवा तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो.’ (स्तोत्र १०३:३) दावीदाला स्वतःच्या पापमय अवस्थेची जाणीव होती. बथशेबाबरोबर त्याने केलेल्या व्यभिचाराबद्दल नाथान संदेष्टा त्याला सांगायला आल्यानंतर त्याने, “तुझ्याविरुद्ध, [यहोवा] तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे,” असे कबूल केले. (स्तोत्र ५१:४) व्याकूळ मनाने त्याने विनंती केली: “तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.” (स्तोत्र ५१:१, २) दाविदाला क्षमा मिळाली तेव्हा त्याला किती कृतज्ञ वाटले असावे! तो अपरिपूर्ण मनुष्य असल्यामुळे त्याने आपल्या जीवनात अनेकदा पाप केले असावे, परंतु त्याने प्रत्येक वेळा पश्चात्ताप केला, दोष कबूल केला व आपला मार्ग सुधारला. त्याच्याप्रती देवाच्या कृपायुक्त कार्यांवर मनन केल्याने दावीद यहोवाला धन्यवाद देण्यास प्रवृत्त झाला.
आपणही पापीच आहोत ना? (रोमकर ५:१२) प्रेषित पौलानेही दुःखाने म्हटले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” (रोमकर ७:२२-२४) यहोवा आपल्या पापांचा हिशेब ठेवत नाही याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! आपण पश्चात्ताप करून त्याची क्षमा मागतो तेव्हा तो आनंदाने आपले पाप खोडून टाकतो.
“[यहोवा] तुझे सर्व रोग बरे करितो,” अशी दावीद स्वतःला आठवण करून देतो. (स्तोत्र १०३:३) बरे करणे हे सुधारणेचे एक कृत्य असल्यामुळे, यात फक्त पापांची क्षमा इतकेच गोवलेले नाही. त्यात, “रोग” अर्थात आपल्या कार्यांतील चुकांचे वाईट परिणाम काढून टाकणे समाविष्ट आहे. यहोवा त्याच्या नवीन जगात पापाच्या शारीरिक परिणामांना, जसे की आजारपण व मृत्यू देखील काढून टाकणार आहे. (यशया २५:८; प्रकटीकरण २१:१-४) पण आजही देव आपल्याला आध्यात्मिक रोगांपासून बरे करत आहे. जसे की, काहींचा सदोष विवेक असतो व त्यांनी देवाबरोबर आपला नातेसंबंध तोडलेला असतो. याबाबतीत, यहोवाने आपल्यासाठी व्यक्तिगत रूपाने जे काही केले आहे ते आपण ‘विसरता कामा नये.’
तो “तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरितो”
“[यहोवा] तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरितो,” असे दावीदाने गायिले. (स्तोत्र १०३:४) ‘विनाशगर्तता’ म्हणजे मानवजातीची सर्वसाधारण कबर—शिओल अथवा हेडीज. इस्राएलचा राजा होण्याआधीसुद्धा दावीद मृत्यूच्या विळख्यात होता. उदाहरणार्थ, इस्राएलचा राजा शौल याने दावीदाचा इतका द्वेष केला, की त्याने त्याला अनेक प्रसंगी ठार मारण्याचा प्रयत्न केला. (१ शमुवेल १८:९-२९; १९:१०; २३:६-२९) पलिष्टी लोकांनासुद्धा दावीदाला ठार मारायचे होते. (१ शमुवेल २१:१०-१५) पण प्रत्येक वेळा यहोवाने त्याला “विनाशगर्तेतून” वाचवले. यहोवाचे हे कार्य आठवल्यावर दावीदाला किती कृतज्ञ वाटत असावे!
तुमच्याबद्दल काय? तणावाच्या किंवा दुःखाच्या वेळी यहोवाने तुम्हालाही आधार दिला आहे का? किंवा तुम्हाला अशा काही घटना माहीत आहेत का, की जेव्हा त्याने आपल्या या दिवसांत त्याच्या काही विश्वासू सेवकांना ठार होण्यापासून वाचवले? या नियतकालिकात, मुक्ततेच्या त्यांच्या कृत्यांबद्दलचे अहवाल वाचून तुम्ही कदाचित प्रभावित झाला असाल. खऱ्या देवाच्या या कार्यांवर कृतज्ञापूर्वक मनन करण्याकरता वेळ काढायला काही हरकत आहे का? शिवाय, पुनरुत्थानाच्या आशेबद्दल आपल्या सर्वांकडे यहोवा देवाचे आभार मानण्यासाठी कारण आहे.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
यहोवा आपल्याला जीवन देतो; शिवाय ते आनंदी व अर्थपूर्ण बनण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे तेही तो देतो. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, यहोवा “तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालितो.” (स्तोत्र १०३:४) आपल्याला यहोवाची आवश्यकता असते तेव्हा तो आपल्याला त्यागत नाही तर त्याची दृश्य संघटना व मंडळीतील नियुक्त वडील किंवा मेंढपाळ यांच्याद्वारे तो आपल्या साहाय्यास धावून येतो. अशाप्रकारचे साहाय्य आपल्याला, आपला स्वाभिमान व आपली प्रतिष्ठा न गमावता एखाद्या कठीण समस्येवर मात करावयास मदत करते. ख्रिस्ती वडिलांना मेंढरांची खूप काळजी असते. ते रोग्यांना व निराश झालेल्यांना उत्तेजन देतात व जे बहकले आहेत अशांना होता होईल तितका पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतात. (यशया ३२:१, २; १ पेत्र ५:२, ३; यहुदा २२, २३) कळपाप्रती दयाळू व प्रेमळ असण्यास यहोवाचा आत्मा या मेंढपाळांना प्रवृत्त करतो. खरोखरच त्याची “दया व करुणा,” आपल्याला सुशोभित करणाऱ्या व आपला आदर करणाऱ्या मुकुटासारखे आहेत. त्याच्या कार्यांचा केव्हाही विसर न पाडता आपण यहोवाचा आणि त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद करू या.
स्वतःला सल्ला देताना स्तोत्रकर्ता दावीद पुढे असे गातो: “[यहोवा] तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करितो; म्हणून तुझे तारूण्य गरुडासारखे नवे होते.” (स्तोत्र १०३:५) यहोवा देत असलेले जीवन समाधानाचे व आनंदाचे आहे. एवढेच नव्हे तर, सत्याचे ज्ञानच एक अतुल्य ठेवा आणि बहुत आनंदाचा स्रोत आहे. शिवाय यहोवाने दिलेले कार्य, अर्थात प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य कितीतरी समाधान देणारे आहे. खऱ्या देवाविषयी शिकण्याची कोणाला आस्था असलेली पाहून व त्याला यहोवाची ओळख करून घेऊन त्याला धन्यवाद देण्यास मदत केल्यावर आपल्याला किती आनंद होतो! आपल्या क्षेत्रात कोणी ऐकोत अगर न ऐकोत, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन याजशी संबंधित असलेल्या कार्यात भाग घेणे किती मोठा सुहक्क आहे!
देवाच्या राज्याचा प्रचार करण्याच्या कामात कोण थकत नाही वा कंटाळत नाही? पण यहोवा त्याच्या सेवकांना शक्ती देत राहतो, शक्तिशाली पंख असलेल्या व आकाशात उंच भरारी मारू शकणाऱ्या “गरुडांप्रमाणे” तो त्यांना बनवतो. आपण आपली सेवा दररोज विश्वासूपणे पार पाडावी म्हणून आपल्याला “विपुल बल” देणाऱ्या आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे आपण किती आभार मानले पाहिजेत.—यशया ४०:२९-३१.
एक उदाहरण घ्या: क्लेर पूर्णवेळची नोकरी करते आणि त्याबरोबरच दर महिन्याला क्षेत्र सेवेत सुमारे ५० तास खर्च करते. ती म्हणते: “कधीकधी मी इतकी थकलेली असते, तरी मी क्षेत्र सेवेत जाते फक्त कशासाठी तर, कुणासोबत तरी मी कार्याला जाण्याची व्यवस्था केलेली असते म्हणून. पण एकदा बाहेर पडल्यावर माझ्यात तरारी येते.” ख्रिस्ती सेवेत ईश्वरी आधारामुळे तुम्हालाही अशाप्रकारच्या आवेशाची अनुभूती आली असेल. तुम्हीही, या स्तोत्राच्या सुरवातीला दावीदाने जे म्हटले त्याप्रमाणे असे म्हणावयास प्रवृत्त व्हावे: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.”
यहोवा त्याच्या लोकांना मुक्त करतो
“जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करितो; त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली,” असेही स्तोत्रकर्ता गातो. (स्तोत्र १०३:६, ७) दावीद कदाचित मोशेच्या दिवसांत जुलूम करणाऱ्या ईजिप्शियन लोकांखाली असलेल्या इस्राएलांच्या ‘जाचाविषयी’ विचार करीत असावा. यहोवाने मोशेला मुक्ततेचे मार्ग कसे विदित केले यावर मनन केल्यामुळे दावीदाचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले असावे.
इस्राएलांबरोबरच्या देवाच्या व्यवहारांवर मनन केल्याने आपलेही मन असेच कृतज्ञतेने भरू शकते. यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) नामक पुस्तकातील २९ व ३० अध्यायातील यहोवाच्या आधुनिक दिवसांतील सेवकांच्या अनुभवांवर मनन करण्याचे आपण विसरू नये. हे आणि वॉच टावर संस्थेच्या इतर प्रकाशनांतील इतर अहवाल आपल्याला, यहोवाने आधुनिक दिवसांतील त्याच्या लोकांना तुरुंगवास, जमावाद्वारे होणाऱ्या हल्ल्यांत, बंदीच्या काळात, छळछावण्यांत आणि गुलामगिरीच्या कामगार छावण्यांत टिकून राहण्यास कशी मदत केली ते पाहण्यास मदत करतात. बुरुंडी, लायबेरिया, रुवांडा आणि भूतपूर्व युगोस्लाव्हिया यांसारख्या युद्धग्रस्त देशांत परिक्षा आल्या. जेव्हा जेव्हा छळ झाला तेव्हा तेव्हा यहोवाने आपल्या विश्वासू सेवकांना आधार दिला आहे. ईजिप्तहून मुक्तता मिळाल्याच्या अहवालावर मनन केल्याने दावीदाला जो फायदा झाला तोच फायदा, आपला महान देव यहोवा याच्या कृत्यांवर विचार केल्याने आपल्याला होईल.
यहोवा आपल्याला पापाच्या ओझ्याखालून किती कोमलतेने मुक्त करतो त्याचाही विचार करा. ‘आपला विवेक निर्जीव कृत्यांपासून शुद्ध’ करण्याकरता त्याने “ख्रिस्ताचे रक्त” दिले आहे. (इब्री लोकांस ९:१४) आपण आपल्या पापांचा पश्चात्ताप करून ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्ताच्या आधारावर क्षमा मागतो तेव्हा देव “पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,” तितकी आपली पातके आपल्यापासून दूर नेतो व पुन्हा आपण यहोवाचा लोभ संपादू शकतो. ख्रिस्ती सभा, उभारणीकारक सहवास, मंडळीतील मेंढपाळ आणि ‘विश्वासू व बुद्धीमान दासाकरवी’ येणारी बायबल आधारित प्रकाशने, या यहोवाच्या तरतुदींचा विचार करा. (मत्तय २४:४५) यहोवाची ही सर्व कार्ये आपल्याला त्याच्याबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास मदत करीत नाहीत का? दावीद म्हणतो: “परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. . . . आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही.” (स्तोत्र १०३:८-१४) यहोवाच्या प्रेमळ काळजीवर मनन केल्याने आपण त्याची स्तुती करण्यास व त्याच्या पवित्र नामाची थोरवी गाण्यास नक्कीच प्रवृत्त होऊ.
‘परमेश्वराचे सृष्टपदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा’
‘युगानुयुगाचा देव’ यहोवा याच्या अमरत्वाच्या तुलनेत, “मानवप्राण्याचे आयुष्य गवतासारखे,” क्षणिक आहे. पण दावीद कृतज्ञतेने म्हणतो: “परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो; म्हणजे त्याचा करार जे पाळितात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.” (उत्पत्ति २१:३३, NW तळटीप; स्तोत्र १०३:१५-१८) यहोवाचे भय बाळगणाऱ्यांना तो विसरून जात नाही. त्याच्या नियुक्त समयी तो त्यांना सार्वकालिक जीवन बहाल करील.—योहान ३:१६; १७:३.
यहोवाच्या राजत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दावीद म्हणाला: “परमेश्वराने आपले राजासन स्वर्गांत स्थापिले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे.” (स्तोत्र १०३:१९) यहोवाचे राजत्व काही काळापर्यंत इस्राएल राज्याद्वारे दृश्यमान झाले होते तरी त्याचे सिंहासन खरे तर स्वर्गात आहे. यहोवा निर्माणकर्ता असल्यामुळे तोच विश्वाचा सार्वभौम शासक आहे व तो आपल्या उद्देशांनुसार स्वर्गात अथवा पृथ्वीवर आपली ईश्वरी इच्छा पूर्ण करतो.
स्वर्गीय देवदूतांनाही दावीद आर्जवतो. तो गातो: “अहो परमेश्वराच्या दुतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहा आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्टपदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.” (स्तोत्र १०३:२०-२२) आपल्याप्रती यहोवा करत असलेल्या प्रेमळ-कृपेच्या कार्यांवर मनन केल्यावर आपणही त्याचा धन्यवाद करण्यास प्रवृत्त होऊ नये का? जरूर झाले पाहिजे. आणि आपण याची खात्री बाळगू शकतो, की आपण व्यक्तिगतरित्या करीत असलेली यहोवाची स्तुती, धार्मिक देवदूतांसह स्तुती करणाऱ्या इतरांच्या आवाजात नाहीशी होणार नाही. तेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याची मनःपूर्वक स्तुती करू या, त्याच्याबद्दल नेहमी बोलत राहू या. “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर” या दावीदाच्या शब्दांकडे आपण लक्ष देऊ या.
[तळटीपा]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.
[२३ पानांवरील चित्र]
दाविदाने यहोवाच्या प्रेमळ-कृपेच्या कार्यांवर मनन केले. तुम्ही करता का?