वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१५ पृ. १२-१५
  • बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यश आणि नैतिक शुद्धता—कसे?
  • सुज्ञांसाठी नीतिसूत्रे
  • ध्येयाकडे नेणारी सुरवात
  • “गळ्याला हार”
  • “ते आपल्या मालकांचा जीव घेते”
  • बुद्धीची वाणी कोण ऐकेल?
  • ‘बुद्धीमुळे आपले दिवस बहुगुणित होतील’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१५ पृ. १२-१५

बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा

यहोवा देव आपल्या लोकांचा महान शिक्षक आहे. तो त्यांना केवळ स्वतःविषयीच नव्हे तर जीवनाविषयी शिक्षण देतो. (यशया ३०:२०; ५४:१३; स्तोत्र २७:११) उदाहरणार्थ, यहोवा देवाने इस्राएल राष्ट्राला शिकवण्यासाठी संदेष्ट्यांना, लेवीयांना—खासकरून याजकांना—आणि इतर बुद्धिमान लोकांना शिक्षक म्हणून पाठवले. (२ इतिहास ३५:३; यिर्मया १८:१८) संदेष्ट्यांनी लोकांना देवाच्या उद्देशांबद्दल, त्याच्या गुणांबद्दल शिकवले आणि उचित मार्ग निवडण्यास स्पष्टपणे सांगितले. याजक आणि लेवी यांच्यावर यहोवाचे नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी होती. आणि बुद्धिमान लोक किंवा वडील दररोजच्या जीवनासंबंधी उचित सल्ला द्यायचे.

दाविदाचा पुत्र शलमोन हा इस्राएलामधील एक अतिशय बुद्धिमान पुरूष होता. (१ राजे ४:३०, ३१) त्याला भेटायला आलेली एक प्रख्यात व्यक्‍ती, शबाची राणी हिने त्याचे वैभव आणि त्याची संपत्ती पाहून म्हटले: “आता पाहत्ये तो माझ्या कानी आले ते अर्धेहि नव्हते. आपले शहाणपण व समृद्धि ह्‍यांची कीर्ति झाली आहे तीहून ती अधिक आहेत.” (१ राजे १०:७) शलमोनाच्या बुद्धीचे रहस्य काय होते? सा.यु.पू. १०३७ मध्ये तो इस्राएलचा राजा झाला तेव्हा त्याने “बुद्धी व ज्ञान” मिळण्यासाठी प्रार्थना केली. ही विनंती ऐकून यहोवाला आनंद झाला आणि त्याने त्याला ज्ञान, बुद्धी आणि समजंस अंतःकरण दिले. (२ इतिहास १:१०-१२, पं.र.भा.; १ राजे ३:१२) म्हणूनच तर शलमोनाने “तीन हजार नीतिसूत्रे” रचली! (१ राजे ४:३२) यांतील काही नीतिसूत्रे, ‘आगूरची वचने’ आणि “लमुएल राजाची वचने” यांच्यासह नीतिसूत्रे नामक बायबलच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. (नीतिसूत्रे ३०:१; ३१:१) यहोवाचे ज्ञान दाखवणारी नीतिसूत्रांतील ही सत्ये त्रिकालाबाधित आहेत. (१ राजे १०:२३, २४) आनंदी आणि यशस्वी जीवन जगू इच्छिणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तीला, ती उच्चारली तेव्हा जितकी महत्त्वपूर्ण होती तितकीच आजही आहेत.

यश आणि नैतिक शुद्धता—कसे?

नीतिसूत्र पुस्तकाचा उद्देश, त्याच्या सुरवातीच्या शब्दांतून दिसतो: “इस्राएलाचा राजा दावीद याचा मुलगा शलमोन याच्या म्हणी [नीतिसूत्रे]: ज्ञान [बुद्धी] व विद्या जाणण्यासाठी, बुद्धीची वचने समजण्यासाठी, सुज्ञतेची वर्तणूक, न्यायीपण, न्याय व सरळपण यांविषयी शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी, भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व विवेक देण्यासाठी ह्‍या म्हणी लिहिल्या आहेत.”—नीतिसूत्रे १:१-४, पं.र.भा.

‘शलमोनाच्या नीतिसूत्रांच्या’ मागचा उद्देश किती चांगला आहे! ती एखाद्याला “ज्ञान [बुद्धी] व विद्या [शिस्त]” देण्यासाठी आहेत. बुद्धी म्हणजे कोणत्याही गोष्टीचे खरे स्वरूप समजून घेणे, आणि मग या ज्ञानाच्या आधारावर समस्या सोडवणे, ध्येये गाठणे, धोकेदायक परिस्थिती टाळणे किंवा इतरांना असे करण्यास मदत करणे. एका संदर्भ पुस्तकानुसार, “नीतिसूत्राच्या पुस्तकात ‘बुद्धी’ ही कौशल्यपूर्ण जीवनशैली अर्थात सुज्ञ निर्णय घेण्याची आणि यशस्वी जीवन जगण्याची क्षमता, यांना चित्रित करते.” तेव्हा, बुद्धी प्राप्त करणे किती महत्त्वाचे आहे!—नीतिसूत्रे ४:७.

शलमोनाची नीतिसूत्रे एखाद्याला शिस्त देखील लावतात. आपल्याला त्याची गरज आहे का? शास्त्रवचनांत, शिस्त या शब्दावरून, सुधारणूक, शिक्षा किंवा शासन हा अर्थबोध होतो. एका बायबल विद्वानानुसार, तो शब्द, “नीतिचे शिक्षण देण्याला व एखाद्याच्या चूक करण्याच्या प्रवृत्तीत सुधारणा करण्याला” सूचित करतो. स्वतःकडून किंवा दुसऱ्‍यांकडून मिळणारी शिस्त आपल्याला चूक करण्यापासून फक्‍त अडवतच नाही तर स्वतःत सुधारणा करण्याची आपल्याला प्रेरणा देते. होय, नैतिकरीत्या आपल्याला शुद्ध राहायचे आहे तर आपल्याला शिस्तीची गरज आहे.

अशाप्रकारे, नीतिसूत्रांचे दोन मुख्य उद्देश आहेत—बुद्धी देणे व शिस्त लावणे. नैतिक शिस्त आणि मानसिक क्षमता यांचे नाना पैलू आहेत. उदाहरणार्थ, नीतिमत्ता आणि न्याय हे नैतिक गुण आहेत व हे गुण आपल्याला यहोवाच्या उच्च दर्जांचे अनुसरण करण्यास मदत करतात.

समज, सूक्ष्मदृष्टी, चातुर्य आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या मनुष्याला बुद्धिमान म्हटले जाते. समज याचा अर्थ, एखादी गोष्ट जवळून पाहणे व तिच्यात असलेल्या भागांचा आणि संपूर्ण गोष्टीचा संबंध काय ते ग्रहण करण्याद्वारे त्या गोष्टीची रचना व तिचा अर्थ समजून घेणे, असा होतो. सूक्ष्मदृष्टी, यासाठी कारणांचे ज्ञान व एखादे विशिष्ट काम बरोबर किंवा चूक का आहे ते समजून घ्यावे लागते. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य चुकीच्या मार्गाने चालला आहे हे समज असलेल्या मनुष्याला कळते व तो लागलीच त्या मनुष्याला सावध करतो. परंतु, तो मनुष्य चुकीच्या मार्गाने का वाहवत आहे व तो त्याला सर्वात प्रभावशाली मार्गाने कसा वाचवू शकेल हे समजण्यासाठी त्याच्याकडे सूक्ष्मदृष्टी असावयास हवी.

चतुर लोक भोळे नसतात तर हुशार असतात. (नीतिसूत्रे १४:१५) संकटाची त्यांना आधीच चाहूल लागते व त्यासाठी ते तयार असतात. आणि बुद्धी, जीवनाला उद्देशपूर्ण मार्गदर्शन देणारे हितकारक विचार व कल्पना सुचवण्यास आपल्याला साहाय्य करते. बायबलमधील नीतिसूत्रांचा अभ्यास खरोखरच प्रतिफलदायी आहे कारण आपल्याला ज्ञान आणि शिस्त मिळावी म्हणूनच ते लिहून ठेवण्यात आले आहेत. या नीतिसूत्रांकडे ‘भोळ्यांनी’ सुद्धा लक्ष दिले तर ते शहाणे होतील व “तरुणाला” ज्ञान आणि विचार करण्याची क्षमता प्राप्त होईल.

सुज्ञांसाठी नीतिसूत्रे

परंतु बायबलमधील नीतिसूत्रे फक्‍त भोळ्यांसाठी व तरुणांसाठीच नाहीत. ऐकणाऱ्‍या सर्व सुज्ञ लोकांसाठी ती आहेत. राजा शलमोन म्हणतो: “ज्ञानी [सुज्ञ] पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा; बोधवचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्‍ति व गुढवचने समजावी; यासाठी ही आहेत.” (नीतिसूत्रे १:५, ६) आधीच बुद्धी प्राप्त केलेला मनुष्य, नीतिसूत्रांकडे लक्ष देण्याद्वारे आपले ज्ञान वाढवतो आणि समज असलेला मनुष्य, आपले जीवन यशस्वी बनवण्यासाठी आपली क्षमता वाढवतो.

नीतिसूत्रात नेहमी, कमी शब्दात गहन सत्य असते. बायबलमधील नीतिसूत्र कदाचित कोड्यासारखे असू शकते. (नीतिसूत्रे १:१७-१९) काही नीतिसूत्रे कोड्यात—जटील व गुंतागुंतीच्या वाक्यात असतात ज्यांचा उलघडा करावा लागतो. एका नीतिसूत्रात उपमा, रुपके आणि इतर भाषालंकार असतात. हे समजण्यासाठी वेळ लागतो, मनन करावे लागते पण पुष्कळ नीतिसूत्रांची रचना करणाऱ्‍या शलमोनाने असे करण्याचा मार्ग नक्कीच शोधून काढला होता. नीतिसूत्राच्या पुस्तकाद्वारे तो आपल्या वाचकांना ही क्षमता देण्याचे काम हाती घेतो; एखाद्या सुज्ञ मनुष्याला नक्कीच याकडे लक्ष द्यावेसे वाटेल.

ध्येयाकडे नेणारी सुरवात

बुद्धी आणि शिस्त मिळवण्यास एखादा कोठून सुरू करतो? शलमोन उत्तर देतो: “परमेश्‍वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण [शिस्त] तुच्छ मानितात.” (नीतिसूत्रे १:७) यहोवाचे भय हे ज्ञानाचा आरंभ आहे. ज्ञानाविना, बुद्धी किंवा शिस्त असू शकत नाही. तेव्हा यहोवाचे भय, बुद्धी आणि शिस्तीचा आरंभ आहे.—नीतिसूत्रे ९:१०; १५:३३.

देवाचे भय म्हणजे त्याच्याबद्दलचे अस्वस्थकारी भय नव्हे. तर, ते गाढ आणि दरारायुक्‍त आदर भय आहे. या भयाविना खरे ज्ञान असू शकत नाही. जीवन यहोवाकडूनच आहे, आणि ज्ञान मिळवायचे आहे तर आपण जिवंत असणे जरूरीचे आहे. (स्तोत्र ३६:९; प्रेषितांची कृत्ये १७:२५, २८) शिवाय, देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्यामुळे सर्व मानवी ज्ञान देवाच्या हस्तकृतीच्या अभ्यासावर आधारित आहे. (स्तोत्र १९:१, २; प्रकटीकरण ४:११) देवाच्या प्रेरणेने त्याचे वचन लिहिण्यात आले; ते वचन “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६, १७) यास्तव, सर्व खऱ्‍या ज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू यहोवा आहे व हे खरे ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्‍याला त्याच्याबद्दल आदरयुक्‍त भय असले पाहिजे.

देवाचे भय नसले तर मानवी ज्ञान आणि जगिक बुद्धी यांना काही महत्त्व राहील का? प्रेषित पौलाने लिहिले: “ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? ह्‍या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही?” (१ करिंथकर १:२०) ईश्‍वरी भय नसल्यामुळे एक जगिक मनुष्य, त्याला माहीत असलेल्या गोष्टींवरून चुकीचा निर्णय काढतो व शेवटी तो एक ‘मूर्ख’ ठरतो.

“गळ्याला हार”

सुज्ञ राजा पुढे तरुणांना म्हणतो: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.”—नीतिसूत्रे १:८, ९.

प्राचीन इस्राएलमध्ये, पालकांवर आपल्या मुलांना शिकवण्याची देव-प्रदत्त जबाबदारी होती. मोशेने पित्यांना म्हटले: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) मातांनाही काही प्रमाणात अधिकार होते. आपल्या पतीच्या अधिकाराच्या चौकटीत राहून एक इब्री पत्नी कौटुंबिक नियम अंमलात आणू शकत होती.

खरे तर संपूर्ण बायबलमध्ये, कुटुंब हे शिक्षण देणारे मूलभूत माध्यम आहे. (इफिसकर ६:१-३) मुले, सत्यात असलेल्या आपल्या पालकांच्या अधीन राहिले, तर लाक्षणिक अर्थाने जणू ते, शिराचे भूषण व गळ्याचा हार यांनी सजतील.

“ते आपल्या मालकांचा जीव घेते”

आपल्या १६ वर्षीय मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याआधी एका आशियाई पित्याने त्याला वाईट लोकांची संगत न करण्याचा सल्ला दिला. त्याचा सल्ला शलमोनाच्या चेतावनीचे पडसाद होते: “माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नको.” (नीतिसूत्रे १:१०) पण, हे वाईट लोक कोणते आमिष दाखवतात त्याबद्दल शलमोन म्हणतो: “ते म्हणतील, ‘आम्हाबरोबर ये, आपण रक्‍तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू; त्यास जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्‍यांप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. आपणास सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू.’”—नीतिसूत्रे १:११-१४.

हे आमिष स्पष्टपणे धनसंपत्तीचे आहे. झटपट नफा मिळवण्यासाठी “पापी” लोक इतरांना त्यांच्या हिंसक किंवा गैर कामात भाग घेण्यास फसवतात. पैसा मिळवण्यासाठी हे दुष्ट लोक कोणाचीही हत्या करायला मागे पुढे पाहत नाहीत. ते आपल्या भक्ष्याला ‘जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करतात;’ कबर जशी सर्व शरीराला गिळंकृत करते त्याचप्रमाणे हे लोक, त्याच्याकडे आहे ते सर्व हिसकावून घेतात. गुन्हेगारीत भाग घेण्यास त्यांना बोलावतात—आपली ‘घरे लुटीने भरवावीत,’ कमी अनुभव असलेल्यांनी त्यांचे ‘भागीदार व्हावे’ असे त्यांना वाटते. आपल्यासाठी ही किती समयोचित चेतावनी! युवकांच्या टोळ्या आणि अंमली पदार्थ विकणारे लोक, इतरांना आपल्यात सामील करण्यासाठी अशाच प्रकारच्या पद्धतींचा वापर करीत नाही का? झट-की-पट श्रीमंत व्हायची आशा, अनेक अवैध व्यापारी प्रस्तावांचा मोह नाही का?

सुज्ञ राजा सल्ला देतो: “तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नको; त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको. कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्‍तपात करण्यास त्वरा करितात.” त्यांच्या भयानक अंताविषयी भाकीत करून तो पुढे म्हणतो: “एकाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्‍तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्‍या सर्वांची गति अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.”—नीतिसूत्रे १:१५-१९.

“धनाचा लोभ धरणाऱ्‍या” प्रत्येकाचा नाश होणार आहे. दुष्ट लोक इतरांसाठी जे जाळे पसरवतात त्यात ते स्वतःच अडकतील. मुद्दामहून दुष्कृत्ये करणारे लोक आपला मार्ग बदलतील का? नाही. ‘पक्षांना’ जाळे दिसते तरीपण ते सरळ उडत जातात आणि अडकतात. तसेच, लोभामुळे अंधळे झालेले दुष्ट लोक, गुन्हेगारी करत राहतात, पण आज ना उद्या ते पकडले जातीलच.

बुद्धीची वाणी कोण ऐकेल?

आपण ज्या मार्गावर आहोत तो मार्ग नाशाकडे जातो हे पापी लोकांना खरे तर माहीत आहे का? त्यांच्या कार्याच्या परिणामाबद्दल त्यांना चेतावनी मिळालेली आहे का? आम्ही अज्ञानी आहोत अशी सबब ते देऊ शकणार नाहीत, कारण सार्वजनिक ठिकाणी एक जोरदार संदेश घोषित केला जातो.

शलमोनाने म्हटले: “ज्ञान [खरी बुद्धी] रस्त्यावर पुकारा करिते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारिते; गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यावर, वेशीच्या दारांत, घोषणा करिते, नगरात आपले हे शब्द उच्चारिते.” (नीतिसूत्रे १:२०, २१) आपल्या सर्वांना ऐकू येईल अशा मोठ्या व स्पष्ट आवाजात बुद्धी वाणी उच्चारते. प्राचीन इस्राएलमध्ये, वृद्ध लोक शहराच्या फाटकापाशी सुज्ञ सल्ला व न्यायिक निर्णय देत असत. आज आपल्यासाठी, यहोवाने खरी बुद्धी सर्वत्र उपलब्ध असलेले त्याचे वचन अर्थात बायबलमध्ये लिहून ठेवले आहे. आणि त्याचे सेवक आज त्यातील संदेश सर्वत्र घोषित करण्यात मग्न आहेत. खरोखरच देवाने आपल्या सर्वांपुढे बुद्धी घोषित केली आहे.

खरी बुद्धी काय म्हणते? ती म्हणते: “अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कोठवर आवडणार? धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेत कोठवर आनंद पावणार? . . . मी हाक मारिली पण तुम्ही आला नाही; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही.” मूर्ख लोक बुद्धीच्या वाणीकडे लक्ष देत नाहीत. परिणामतः, “ते आपल्या वर्तनाचे फळ भोगितील.” त्यांचे ‘भलतीकडे वळणे आणि भरभराट त्यांचा नाश करिते.’—नीतिसूत्रे १:२२-३२.

पण, बुद्धीची वाणी ऐकण्यासाठी जो वेळ काढतो त्याच्याबद्दल काय? “तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.” (नीतिसूत्रे १:३३) बायबलमधील नीतिसूत्रांकडे लक्ष देण्याद्वारे बुद्धी व शिस्त जाणून घेणाऱ्‍यांपैकी तुम्हीही असा!

[१५ पानांवरील चित्र]

खरी बुद्धी सर्वत्र उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा