वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१५ पृ. ५-७
  • आपण देवाला प्रार्थना कशी करावी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण देवाला प्रार्थना कशी करावी?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र मानले जावे असे नाव
  • प्रार्थनेसाठी उचित विषय
  • प्रार्थनेसंबंधाने अतिरिक्‍त सल्ला
  • देव ऐकत असलेल्या प्रार्थना
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • तुम्ही येशूला प्रार्थना करावी का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१५ पृ. ५-७

आपण देवाला प्रार्थना कशी करावी?

एका अनुयायाने प्रार्थनेसंबंधी मार्गदर्शन देण्याची विनंती केली तेव्हा येशूने ती विनंती धुडकावून लावली नाही. लूक ११:२-४ प्रमाणे, त्याने उत्तर दिले: “तुम्ही प्रार्थना करताना म्हणा, हे पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो; तुझं राज्य येवो. आम्हाला अवश्‍य ते अन्‍न रोज दे. आमच्या पातकांबद्दल क्षमा कर, कारण आम्हीदेखील आमचा अपराध करणाऱ्‍या प्रत्येकाला क्षमा करीत असतो. आम्हाला मोहात पडू देऊ नकोस.” (मराठी कॉमन लँग्वेज बायबल) यास सामान्यपणे प्रभूची प्रार्थना म्हणतात. या प्रार्थनेत बरेच काही ज्ञान दडलेले आहे.

सुरवातीलाच, अगदी पहिलाच शब्द आपल्या प्रार्थना कोणास संबोधण्यास हव्यात ते सांगतो, अर्थातच आपल्या पित्यास. येशूने, दुसरी एखादी व्यक्‍ती, प्रतिमा, “संत” यांपैकी कोणालाही, एवढेच नव्हे तर त्याला स्वतःला देखील प्रार्थना करण्याची सूट दिली नाही याकडे लक्ष द्या. काही झाले तरी, देवाने आधीच जाहीर केले होते: “इतर कोणाला माझा महिमा मिळावा, किंवा माझा सन्मान कोरीव मूर्तीला प्राप्त व्हावा असे मी घडू देणार नाही!” (यशया ४२:८, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) यास्तव, आपल्या स्वर्गीय पित्याखेरीज कोणाही व्यक्‍तीला किंवा वस्तूला संबोधलेल्या प्रार्थना, उपासक कितीही प्रांजळ असला तरीसुद्धा, देवाद्वारे ऐकल्या जात नाहीत. बायबलमध्ये, केवळ यहोवा देवालाच ‘प्रार्थना ऐकणारा’ असे म्हणण्यात आले आहे.—स्तोत्र ६५:२.

काही जण असे म्हणतात की, “संत” देवासोबत निव्वळ मध्यस्थांची भूमिका बजावतात. परंतु येशूने स्वतः शिकविले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.” (योहान १४:६, १३) येशूने असे म्हटल्यामुळे, संत म्हणविणारा कोणीही मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतो याबद्दल प्रश्‍नच उरला नाही. ख्रिस्ताबद्दल प्रेषित पौलाने काय म्हटले ते पाहा: “जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीहि करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.” ‘ह्‍यामुळे ह्‍याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्‍यांसाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.’—रोम ८:३४; इब्री लोकांस ७:२५.

पवित्र मानले जावे असे नाव

येशूच्या प्रार्थनेचे पुढील शब्द होते: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” तथापि, एखाद्यास हे नाव माहीत नसेल अथवा तो हे उच्चारत नसेल, तर तो यास पवित्र कसे मानील बरे? “जुना करार” यात ६,००० पेक्षा अधिक वेळा यहोवा, या देवाच्या वैयक्‍तिक नावाने त्याची ओळख करून देण्यात आली आहे.

कॅथलिक डूवे व्हर्शन यात निर्गम ६:३ या वचनाबद्दल एका तळटिपेत देवाच्या नावासंबंधाने असे म्हटलेले आहे: “आधुनिक विचारांच्या काही पुरस्कर्त्यांनी जेहोवा चे नाव कल्पिलेले आहे . . . , कारण इब्री आलेखातील, [देवाच्या] नावाचे मूळ उच्चारण पुष्कळ काळापासून वापरात नसल्यामुळे लोप पावले आहे.” याच कारणास्तव कॅथलिकांचे मराठी कॉमन लँग्वेज बायबल याहवे हे नाव वापरते. काही विद्वानांना हा उच्चार अधिक पसंत असला तरीसुद्धा, इंग्रजी भाषेत ईश्‍वरी नावाचे योग्य व जुन्या काळापासून प्रस्थापित असलेले उच्चारण “जेहोवा,” हेच आहे. इतर भाषांमध्ये ईश्‍वरी नाव उच्चारण्याच्या आपापल्या पद्धती आहेत. या नावास पवित्र मानता यावे म्हणून ते उपयोगात आणणे हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे. तुमच्या चर्चने तुम्हाला प्रार्थनेत यहोवा हे नाव उपयोगात आणण्यास शिकविले आहे का?

प्रार्थनेसाठी उचित विषय

पुढे येशूने आपल्या शिष्यांना, “तुझे राज्य येवो” अशी प्रार्थना करण्यास शिकविले. मत्तयाचे शुभवर्तमान यासोबत, “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” हे शब्द देखील जोडते. (मत्तय ६:१०) देवाचे राज्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या देखरेखीतील एक सरकार. (यशया ९:६, ७) बायबल भविष्यवादाप्रमाणे, हे सरकार लवकरच सर्व मानवी सरकारांची जागा घेईल व जागतिक शांतीचे एक युग आणील. (स्तोत्र ७२:१-७; दानिएल २:४४; प्रकटीकरण २१:३-५) यास्तव, खरे ख्रिस्ती आपल्या प्रार्थनांमध्ये राज्य या विषयाचा वारंवार उल्लेख करतात. तुमच्या चर्चने तुम्हाला असे करण्यास शिकविले आहे का?

मनोवेधकपणे, येशूने हे देखील स्पष्ट केले की आपल्या प्रार्थनांमध्ये आपल्याकरता चिंतेचे विषय असलेल्या व्यक्‍तिगत बाबींचा समावेश होऊ शकतो. त्याने म्हटले: “आम्हाला अवश्‍य ते अन्‍न रोज दे. आमच्या पातकांबद्दल क्षमा कर, कारण आम्हीदेखील आमचा अपराध करणाऱ्‍या प्रत्येकाला क्षमा करीत असतो. आम्हाला मोहात पडू देऊ नकोस.” (लूक ११:३, ४, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बाबींविषयी यहोवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो; एवढेच नव्हे तर आपल्याला चिंताक्रांत करणारी किंवा आपली मानसिक शांती हिरावून घेणारी कोणतीही बाब आपण यहोवापुढे ठेवू शकतो हे येशूच्या शब्दांवरून सूचित होते. अशा प्रकारे देवापुढे नियमितपणे याचना केल्याने, आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहण्याचे महत्त्व पटते. परिणामी आपल्या जीवनात त्याचा प्रभाव आपल्याला अधिक जाणवतो. तसेच देवाकडे दररोज आपल्या चुकांबद्दल क्षमा मागणे देखील फायद्याचे आहे. असे केल्यामुळे आपल्याला आपल्या उणीवांची अधिक जाणीव होते व आपण इतरांच्या त्रुटींबद्दलही अधिक सहनशील बनतो. शिवाय, या जगातील अवनत होत जाणाऱ्‍या नैतिक स्तरांचा विचार करता, परीक्षेत पडण्यापासून बचावासाठी प्रार्थना करण्याबद्दल येशूचा आग्रह उचितच आहे. त्या प्रार्थनेनुरूप, आपल्याला अपराध करण्यास भाग पाडतील अशा परिस्थिती व असे प्रसंग टाळण्यासाठी आपण सतत सावध असतो.

निश्‍चितच प्रभूची प्रार्थना आपल्याला प्रार्थना सादर करण्याबद्दल खूप काही सांगते याविषयी कोणतेही दुमत नाही. तथापि, आपण या प्रार्थनेची वेळोवेळी निव्वळ घोकंपट्टी करावी अशी येशूची इच्छा होती का?

प्रार्थनेसंबंधाने अतिरिक्‍त सल्ला

येशूने प्रार्थनेसंबंधी आणखीन सूचना दिल्या. मत्तय ६:५, ६ येथे आपण वाचतो: “तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका; कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. . . . तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.” कोणावर छाप पाडण्यासाठी, आपण दिखाऊपणे अर्थात दांभिकपणे प्रार्थना करू नये हे या शब्दांतून शिकण्यासारखे आहे. बायबल प्रोत्साहित करते त्याप्रमाणे तुम्ही यहोवापुढे एकांतात आपले मन मोकळे करता का?—स्तोत्र ६२:८.

येशूने ताकीद देऊन म्हटले: “प्रार्थना करताना परजातीयांप्रमाणे उगाच बडबड करीत बसू नका; त्यांना वाटतं, लांबलचक प्रार्थना केल्यावर देव ऐकेल!” (मत्तय ६:७, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) निःसंशये, प्रार्थना तोंडपाठ करण्यास किंवा त्या एखाद्या पुस्तकातून वाचण्यास येशूची संमती नव्हती. त्याचे शब्द जपमाळेचा उपयोग देखील अयोग्य ठरवतात.

“आपण कृतज्ञपणे किंवा गरजवंत असताना, खिन्‍नावस्थेत अथवा रोजची नियमित भक्‍ती करताना आपले स्वयंस्फूर्त विचार व्यक्‍त करतो तेव्हा, तीच आपली सर्वोत्तम प्रार्थना असू शकते,” असे एक कॅथलिक प्रार्थनापुस्तक कबूल करते. स्वतः येशूच्या प्रार्थना पाठ केलेल्या नव्हे तर स्वयंस्फूर्त होत्या. उदाहरणार्थ, योहानाच्या १७ व्या अध्यायात अभिलिखित असलेली येशूची प्रार्थना वाचून पाहा. ती यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण होताना पाहण्याच्या येशूच्या इच्छेवर जोर देते याअर्थी ती आदर्श प्रार्थनेलाच जडून आहे. येशूची प्रार्थना स्वयंस्फूर्त व मनाच्या गाभाऱ्‍यातून येणारी अर्थात कळकळीची होती.

देव ऐकत असलेल्या प्रार्थना

तुम्हाला पाठ केलेल्या प्रार्थना करण्यास, “संतांना” अथवा प्रतिमांपुढे प्रार्थना करण्यास किंवा जपमाळेसारख्या धार्मिक वस्तूंचा वापर करण्यास शिकविण्यात आले असल्यास, येशूने दिलेल्या रूपरेषेप्रमाणे प्रार्थना करताना कदाचित सुरवातीला तुम्हाला भीती वाटेल. तथापि, या समस्येचा तोडगा म्हणजे देवाची ओळख होणे, अर्थात त्याचे नाव, उद्देश व व्यक्‍तिमत्त्व यांची ओळख होणे. तुम्ही बायबलच्या सखोल अभ्यासाद्वारे हे साध्य करू शकता. (योहान १७:३) यहोवाचे साक्षीदार या बाबतीत तुम्हाला मदत पुरवण्यास स्वेच्छेने तयार आहेत. त्यांनी तर जगभरात लाखो लोकांना, “देव किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव” घेण्यास मदत केली आहे! (स्तोत्र ३४:८) जसजशी तुम्हाला देवाची अधिक ओळख होते, तसतसे तुम्ही प्रार्थनेकरवी त्याची स्तुती करण्यास अधिकाधिक प्रेरित व्हाल. तुम्ही श्रद्धापूर्ण प्रार्थनेद्वारे यहोवाच्या जितके जवळ येता, तितकाच त्याच्यासोबतचा तुमचा नातेसंबंध अधिक घनिष्ट होईल.

यास्तव, देवाच्या सर्व खऱ्‍या उपासकांना “निरंतर प्रार्थना” करत राहण्याचा आग्रह करण्यात आला आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) तुमच्या प्रार्थना खरोखरच, बायबलच्या व येशू ख्रिस्ताने दिलेल्या सूचनांच्या संगनमतात आहेत याची मात्र खात्री करा. असे केल्याने, तुमच्या प्रार्थनांना देवाची संमती मिळेल याबद्दल तुम्ही विश्‍वस्त राहू शकता.

[७ पानांवरील चित्रं]

जसजसे आपण यहोवाबद्दल अधिक शिकतो तसतसे त्याला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करण्यास आपण प्रेरित होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा