वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. २८-३१
  • नाही म्हणायचे धैर्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नाही म्हणायचे धैर्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नाही म्हणणे आज विशेष महत्त्वाचे
  • नाही म्हटलेल्या एका तरुणाकडून धडा
  • साथीदारांच्या दबावाला नाही म्हणणे
  • नाही म्हणणे—जीवन व मरणाचा प्रश्‍न
  • नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • दुसऱ्‍यांचा पापकर्मात सहभागी होऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. २८-३१

नाही म्हणायचे धैर्य

तिमथी म्हणाला, “मी अजूनही १५ वर्षांचाच होतो व एका किराणा मालाच्या दुकानात काम करत होतो तेव्हा माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या एकाने मला त्याच्या घरी बोलवलं. तो मला म्हणाला, की त्याचे आईवडील घरी नसतील, मुली आलेल्या असतील आणि आपल्याला लैंगिक संबंध ठेवायला मिळतील.” अशा आमंत्रणाला आज पुष्कळ तरुण लोक लागलीच होकार देतील. पण तिमथीची प्रतिक्रिया काय होती? “मी त्याला तिथल्या तिथं सांगितलं, की मी अजिबात येणार नाही आणि लग्न झालेलं नसताना कोणाबरोबरही लैंगिक संबंध ठेवण्याची माझा ख्रिस्ती विवेक मला परवानगी देणार नाही.”

तिमथीचे हे बोलणे त्याच दुकानात काम करणारी एक महिला कामगार ऐकत होती, हे तिमथीला माहीत नव्हते. तिला वाटले, की तो स्वतःला फार पवित्र समजतो तर आपण त्याला चांगला धडा शिकवू. तिने त्याला अनेक वेळा गळ घालण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिलाही नाही असेच उत्तर दिले होते. याविषयी जास्त आपण पुढे पाहणार आहोत.

अर्थातच आपल्या समोर आता मोहपाश येतात याचा अर्थ प्राचीन काळी कोणासमोर यायचे नाहीत असे नाही. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी राजा शलमोनाने लिहिले: “माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नको. . . . त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको.” (नीतिसूत्रे १:१०, १५) स्वतः यहोवाने इस्राएल राष्ट्राला आज्ञा दिली: “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्‍या बहुजनसमाजास अनुसरू नको.” (निर्गम २३:२) होय, आपल्या जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा एखादे वाईट कृत्य करण्याच्या मोहाला आपण स्पष्टपणे नाही म्हटलेच पाहिजे; बहुतेक लोक आपल्याशी सहमत नसतील तरीसुद्धा आपण असे केले पाहिजे.

नाही म्हणणे आज विशेष महत्त्वाचे

वाईट गोष्टीला नाही म्हणणे मुळातच सोपे नाही आणि आजकाल तर ते जास्तच कठीण झाले आहे, कारण बायबल ज्याला या व्यवस्थीकरणाचे ‘शेवटले दिवस’ म्हणते त्या काळात आपण जगत आहोत. बायबल भविष्यवाणीनुसार, जवळजवळ सर्वच लोक सुखविलासी, हिंसेची आवड धरणारे आणि आध्यात्मिकता व नैतिकता नसलेले झाले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) एका जेसुईट विद्यापीठाच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे: “परंपरेने चालत आलेले दर्जे आता लोकांना शंकास्पद, अयोग्य व जुने वाटतात. असे वाटते, की आता कसलेही नैतिक मार्गदर्शन उरलेले नाही.” एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे देखील असेच विचार आहेत; ते म्हणतात: “आता, सगळं काही अस्पष्ट आहे; अमुक गोष्ट बरोबर आहे आणि अमुक गोष्ट चुकीची आहे असं काही राहिलेलं नाही. . . . बरोबर आणि चूक यांतील फरक फार कमी लोकांना कळतो. आता, तुम्ही जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत पापी ठरत नाही.”

प्रेषित पौलाने लिहिले, की अशा लोकांची “बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्‍न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” (इफिसकर ४:१८, १९) पण पुढे त्यांच्यावर संकट ओढवते. यशयाने म्हटले: “जे वाईटाला बरे व बऱ्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, . . . त्यांस धिक्कार असो.” (यशया ५:२०) हे लोक जे पेरतात त्याची तर ते कापणी करतीलच शिवाय लवकरच ते ‘धिक्काराचा’ अर्थात यहोवाकडून प्रतिकूल न्यायदंडाचा अनुभव घेतील.—गलतीकर ६:७.

“दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच,” असे स्तोत्र ९२:७ म्हणते. दुसऱ्‍या शब्दांत, दुष्टाईचे हे उदंड पीक, कायम राहणार नाही, दुसऱ्‍यांचेही जीवन कष्टमय करणार नाही. खरे तर, या दुष्टाईला खतपाणी घालणाऱ्‍या ‘पिढीलाच’ यहोवा देव ‘मोठ्या संकटात’ नाहीसे करील. (मत्तय २४:३, २१, ३४) तेव्हा, येणाऱ्‍या संकटातून आपण वाचू इच्छितो तर देवाच्या दर्जांनुसार बरोबर काय किंवा चूक काय हे आपल्याला माहीत असले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या चूकीच्या गोष्टीला नाही म्हणण्याची आपल्यात नैतिक शक्‍ती हवी. हे इतके सोपे नसले तरी, यहोवाने आपल्याला, बायबल काळांतील किंवा आपल्या काळांतील काही उदाहरणे दिली आहेत जी आपल्याला असे करण्याचे धैर्य देतील.

नाही म्हटलेल्या एका तरुणाकडून धडा

जारकर्म किंवा व्यभिचार यांना नाही म्हणायला, काही लोकांना आणि ख्रिस्ती मंडळीतीलही काहींना कठीण वाटत आहे, असे दिसते. या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्या तिमथीने शास्त्रवचनांतील उत्पत्ति ३९:१-१२ मधील तरुण योसेफाचे उदाहरण अनुसरले. इजिप्शियन अधिकारी पोटीफरच्या बायकोने योसेफाला तिच्याबरोबर संबंध ठेवायला कितींदा तरी बोलावले होते पण त्याने त्याचे नैतिक धैर्य दाखवले. अहवाल म्हणतो, की तो कधीच ‘राजी झाला नाही व तो तिला म्हणत असे, की एवढी मोठी वाईट गोष्ट करुन मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करु?’

योसेफाने पोटीफरच्या पत्नीला पुन्हा पुन्हा नाही म्हणायचे नैतिक धैर्य कोठून प्राप्त केले होते? प्रथम म्हणजे, त्याने क्षणिक सुखापेक्षा यहोवाबरोबरच्या त्याच्या नातेसंबंधाला जास्त मौल्यवान समजले. शिवाय, तो ईश्‍वरी नियमशास्त्राधीन (मोशेचे नियमशास्त्र अद्याप यायचे होते) नव्हता तरी, त्याला नैतिक तत्त्वे स्पष्टपणे माहीत होती; आपल्याकडे आकर्षित झालेल्या पोटीफरच्या पत्नीबरोबर व्यभिचार करणे, केवळ तिच्या पतीविरुद्धच नव्हे तर देवाविरुद्ध एक पाप होते हे त्याला माहीत होते.—उत्पत्ति ३९:८, ९.

छोट्याशा ठिणगीमुळे लागणारी आग पाहता पाहता आटोक्याबाहेर जाते त्याचप्रकारे चुकीची इच्छा पाहता पाहता नियंत्रणाबाहेर जाऊन तीव्र कामवासनेत बदलू शकते आणि म्हणून ती इच्छाच उत्पन्‍न होऊ न देणे किती महत्त्वाचे आहे याची योसेफाला जाणीव होती. योसेफाच्या उदाहरणाचे अनुसरण करणारा ख्रिस्ती सुज्ञ आहे. जुलै १, १९५७ च्या टेहळणी बुरूजने (इंग्रजी), असे म्हटले: “त्याला आपल्या शारीरिक कमतरता माहीत असल्या पाहिजेत; शास्त्रवचनीय मर्यादा रेषापर्यंत आपण आपल्या कामुक इच्छांना जाऊ देऊ आणि मग तेथे थांबू असा त्याने कदापि विचार करू नये. आणि त्याने असे काही काळापुरते केले तरी कालांतराने तो त्या मर्यादा रेषेपलिकडे जाऊन पाप करील. हे अटळ आहे कारण, कामेच्छांना मनात राहू दिल्यास त्या प्रबळ होतात व एखाद्या व्यक्‍तीवरील पगडा आणखी घट्ट करतात. मग, या व्यक्‍तीला आपल्या मनांतून हे विचार काढणे अशक्य होते. तेव्हा, सुरवातीलाच अशा कामेच्छांचा प्रतिकार करणे सर्वात उत्तम संरक्षण आहे.”

जे बरोबर आहे त्याबद्दल प्रेम आणि जे चूक आहे त्याबद्दल घृणा विकसित केली तर सुरवातीलाच कामेच्छांचा प्रतिकार करायला आपल्याला सोपे जाते. (स्तोत्र ३७:२७) परंतु आपल्याला ते नेहमी, चिकाटीने करावे लागेल. असे केल्यास, यहोवाच्या मदतीने, चांगल्याबद्दल प्रेम आणि वाईटाबद्दलची घृणा आणखी वाढत राहील. पण तोपर्यंत आपण येशूने म्हटल्याप्रमाणे सतर्क असले पाहिजे; मोहापासून दूर राहण्यास मदत करावी व वाईटापासून आपल्याला मुक्‍त करावे म्हणून सतत प्रार्थना केली पाहिजे.—मत्तय ६:१३; १ थेस्सलनीकाकर ५:१७.

साथीदारांच्या दबावाला नाही म्हणणे

साथीदारांचा दबाव हा चूक करायला लावणारा आणखी एक प्रभाव आहे. एका युवकाने कबूल केले: “मी दुहेरी जीवन जगतो—शाळेत एक आणि घरी एक. शाळेत मी जगिक मुलांप्रमाणे वागतो. एक दोन शिव्या हाणल्याशिवाय या मुलांचे एकही वाक्य पूर्ण होत नाही आणि माझी भाषासुद्धा हळूहळू त्यांच्यासारखाच होऊ लागली आहे. मी काय करु?” इतरांपेक्षा वेगळे असण्याचे धैर्य आपल्यामध्ये असले पाहिजे; देवाचा एकनिष्ठ सेवक योसेफ याच्याविषयी आपल्याला सांगणारे बायबल अहवाल वाचल्याने व त्यांच्यावर मनन केल्याने आपल्याला धैर्य मिळवता येईल. दानीएल, शद्रख, मेशख व अबेद्‌नगो यांचीही उत्तम उदाहरणे आहेत—या चार पुरुषांमध्ये त्यांच्या साथीदारांपासून वेगळे राहण्याचे धैर्य होते.

बॅबिलोनच्या राजसी दरबारात इतर तरुण पुरुषांबरोबर शिक्षण प्राप्त करताना, “राजा खात असे त्या मिष्टान्‍नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून” या चार इस्राएली पुरुषांनी खावे व प्यावे अशी त्यांना अट होती. मोशेच्या नियमशास्त्रात भोजनाविषयी असलेल्या आज्ञांचे उल्लंघन करण्याची इच्छा नसल्यामुळे या चौघांनी हे अन्‍न खाण्यास नकार दिला. यासाठी धैर्याची आवश्‍यकता होती—कारण, ‘राजा खात असलेले मिष्टान्‍न’ कदाचित तोंडाला पाणी आणणारे होते. या तरुण पुरुषांनी, मोहात पडू शकणाऱ्‍या, मद्यपान करण्यास अथवा अंमली पदार्थ किंवा तंबाखू खाण्यास ज्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो अशा आजच्या ख्रिश्‍चनांसाठी किती छान कित्ता घालून दिला आहे!—दानीएल १:३-१७.

शद्रख, मेशख व अबेद्‌नगो यांनी, येशू ख्रिस्ताने नंतर जे म्हटले ते: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्कळाविषयीहि विश्‍वासू आहे,” हे किती सत्य आहे ते दाखवले. (लूक १६:१०) भोजनाविषयीच्या तुलनात्मकरीतीने क्षुल्लक असलेल्या गोष्टीबद्दलचा त्यांचा धैर्यशील पावित्रा आणि यहोवाने त्यांना दिलेले प्रतिफळ यांमुळे, नंतर एका आणखी गंभीर परीक्षेला तोंड देण्यास त्यांना शक्‍ती मिळाली. (दानीएल १:१८-२०) ही परीक्षा तेव्हा आली जेव्हा त्यांना, मूर्तिपूजेत भाग घेण्याची आज्ञा देण्यात आली; जे या आज्ञेचे पालन करणार नाहीत अशांना आगीत टाकून मृत्यूदंड दिला जाणार होता. धैर्याने या तीन पुरुषांनी केवळ यहोवाची उपासना करण्याचा ठामनिश्‍चय केला व परिणाम काही असो, त्याच्यावर आपला पूर्ण भरवसा ठेवला. पुन्हा एकदा यहोवाने त्यांचा विश्‍वास आणि धैर्य यांबद्दल त्यांना आशीर्वाद दिला—या वेळेस तर धगधगत्या भट्टीत त्यांना टाकले होते तरी, चमत्कारिकपणे त्यांना त्या आगीतून त्याने जिवंत वाचवले.—दानीएल ३:१-३०.

देवाच्या वचनात इतरही पुष्कळ उदाहरणे आहेत ज्यांनी चुकीच्या गोष्टी करण्यास नाही म्हटले. मोशेला ‘पापाचे क्षणिक सुख भोगण्याची’ पुष्कळ संधी होती तरीसुद्धा त्याने ‘फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे नाकारले.’ (इब्री लोकांस ११:२४-२६) संदेष्टा शमुवेल याने लाच स्वीकारण्याद्वारे आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेण्यास नाकारले. (१ शमुवेल १२:३, ४) येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना प्रचार कार्य थांबवण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी सरळ नाही म्हटले. (प्रेषितांची कृत्ये ५:२७-२९) स्वतः येशूने सर्व प्रकारच्या चुकांना—आपल्या मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत, म्हणजे सैनिकांनी जेव्हा त्याला “बोळ मिसळलेला द्राक्षारस” दिला त्या घटकेपर्यंत नाही म्हटले. तो द्राक्षारस घेतल्याने कदाचित त्या कठीण समयी त्याचा दृढनिश्‍चय कमी होऊ शकला असता.—मार्क १५:२३; मत्तय ४:१-१०.

नाही म्हणणे—जीवन व मरणाचा प्रश्‍न

येशूने म्हटले: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”—मत्तय ७:१३, १४.

रुंद मार्ग सर्वांना आवडतो कारण त्यावर प्रवास करणे सोपे आहे. त्यावरील प्रवासी स्वतःचे लाड पुरवणारे, जगिक विचारसरणी व मार्ग यांच्याकडे त्यांचा कल आहे; त्यांना वेगळे राहायला नव्हे तर सैतानाच्या जगाशी एकरुप व्हायला आवडते. देवाचे नियम व तत्त्व त्यांना नैतिकरीत्या बंधनकारक वाटतात. (इफिसकर ४:१७-१९) पण येशूने स्पष्टपणे म्हटले होते, की रुंद रस्ता “नाशाकडे” जातो.

तरीसुद्धा, अरुंद रस्त्यावर फार कमी लोक चालण्याचे निवडतील असे येशू का म्हणाला होता? प्रमुख कारण म्हणजे, असे फार कमी लोक आहेत जे, देवाचे नियम आणि तत्त्व यांना आपल्या जीवनावर वर्चस्व होऊ देतात व त्यांच्या सभोवती चूक करण्यासाठी असलेले अनेक लालूच व संधी यांचा प्रतिकार करण्यास मदतीची अपेक्षा करतात. शिवाय, तुलनात्मकरीतीने फार कमी लोक आहेत जे अनैतिक इच्छा, साथीदारांचा दबाव आणि त्यांनी जो मार्ग निवडला आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध होणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या थट्टेचे भय यांचा सामना करायला ते तयार आहेत.—१ पेत्र ३:१६; ४:४.

पाप करायला नाही म्हणावे लागताना कराव्या लागणाऱ्‍या झगड्याचे वर्णन करताना प्रेषित पौलाला कसे वाटले ते या लोकांना चांगल्याप्रकारे समजते. आजच्या जगाप्रमाणे, पौलाच्या काळातील रोमी व ग्रीक जगात चुका करण्यासाठी पुरेशा संधी होत्या. पौलाने म्हटले, की बरोबर काय हे माहीत असूनही, चुकीच्या गोष्टींकडे कल असलेल्या त्याच्या मनाने देहाबरोबर सतत ‘युद्ध’ केले. (रोमकर ७:२१-२४) होय, पौलाला माहीत होते, की त्याचे शरीर उत्तम चाकर होते परंतु वाईट धनी होते, त्यामुळेच तो नाही म्हणायला शिकला होता. त्याने लिहिले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथकर ९:२७) तो हे नियंत्रण कसे ठेवू शकला? स्वतःच्या शक्‍तीने तर नाही, कारण ती पुरेशी नव्हती, तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने.—रोमकर ८:९-११.

म्हणूनच, अपरिपूर्ण असूनही पौल शेवटपर्यंत यहोवाशी सचोटी राखू शकला. आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी तो असे लिहू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे.”—२ तीमथ्य ४:७, ८.

आपल्या अपरिपूर्णतांविरुद्ध आपण लढतो तेव्हा आपल्यापुढे कितीतरी उत्तेजनात्मक उदाहरणे असतात; फक्‍त पौलाचेच नव्हे तर पौलापुढेही असलेले—योसेफ, मोशे, दानीएल, शद्रख, मेशख, अबेद्‌नगी व आणखी इतरांचे उदाहरण आहे. हे सर्व अपरिपूर्ण होते तरीसुद्धा विश्‍वास असलेल्या या प्रत्येकाने चूक करायला नाही म्हटले; ताठरपणामुळे किंवा हेकटपणामुळे नव्हे तर यहोवाच्या आत्म्यातून मिळणाऱ्‍या नैतिक धैर्यामुळे. (गलतीकर ५:२२, २३) हे सर्व आध्यात्मिक लोक होते. यहोवाच्या मुखातून निघणारी प्रत्येक वाणी प्राप्त करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. (अनुवाद ८:३) त्याचे वचन त्यांच्यासाठी जीवन होते. (अनुवाद ३२:४७) या सर्वांहून अधिक म्हणजे यहोवावर त्यांचे प्रेम होते, त्याचे त्यांना भय होते आणि त्याच्या मदतीने त्यांनी चुकीच्या गोष्टीबद्दल घृणा विकसित केली.—स्तोत्र ९७:१०; नीतिसूत्रे १:७.

आपणही त्यांच्याप्रमाणे होऊ या. त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणत राहण्याकरता यहोवाच्या आत्म्याची गरज आहे. आपण प्रांजळपणे यहोवाकडे त्याच्या आत्म्याचे साहाय्य मागितले, त्याच्या वचनाचा अभ्यास केला व नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहलो तर तो सढळ हाताने आपल्याला त्याचा आत्मा देईल.—स्तोत्र ११९:१०५; लूक ११:१३; इब्री लोकांस १०:२४, २५.

सुरवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला त्या तिमथीला, आपल्या आध्यात्मिक गरजांकडे आपण दुर्लक्ष केले नाही याचा आनंद होतो. तिमथीचा पवित्रपणा पाहून, तिमथीचे बोलणे ऐकणाऱ्‍या त्या तरुण स्त्री कामगाराचा चुकीचा ग्रह झाला होता; नंतर तिने त्याला एकदा तिचा पती घरी नसताना बोलावले होते. पण तिमथीने नकार दिला. तिने काही त्याचा पिच्छा सोडला नाही; पोटीफरच्या बायकोप्रमाणे तिने अनेकदा त्याला बोलावले. आणि तिमथीने प्रत्येक वेळा ठामपणे परंतु नम्रतेने तिला नाही म्हटले. आणि देवाच्या वचनाविषयी त्याने तिला उत्तम साक्ष दिली. नाही म्हणायला आपल्याला नैतिक शक्‍ती दिल्याबद्दल तिमथी यहोवाचा खूप आभारी आहे; एका सुंदर सहख्रिस्तीबरोबर विवाह करून आज तो आनंदी आहे. चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याद्वारे आपली ख्रिस्ती सचोटी टिकवू इच्छिणाऱ्‍या सर्वांवर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल व त्यांना धैर्यही पुरवील.—स्तोत्र १:१-३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा