दिलेल्या वचनाला का जगले पाहिजे?
“कमी वचनं देणाऱ्या मनुष्याला निवडून द्या; तो तुम्हाला कमी निराश करेल,” असे दिवंगत अध्यक्षीय सल्लागार बर्नाड बरुक यांनी म्हटले. असे वाटते, की आजच्या जगात, वचने, मोडण्यासाठीच दिली जातात. ती कदाचित, विवाह वचने, व्यवसाय करार किंवा मुलांबरोबर जास्त वेळ घालवण्यासंबंधीची वचने असू शकतात. आजकाल आपण कोणाही मनुष्याच्या बाबतीत, तो दिलेल्या वचनाला जागणारा मनुष्य आहे, असे म्हणू शकत नाही.
अर्थातच पुष्कळ लोक जाणूनबुजून खोटी वचने देतात. पण काही लोक, विचार न करता शब्द देतात आणि नंतर त्यांना जाणीव होते की त्यांना तो पाळता येणार नाही; शिवाय काही लोकांना दिलेले वचन पाळणे कठीण जाते तेव्हा सर्वात सोपा मार्ग म्हणून ते आपला शब्द खुशाल मोडून टाकतात.
अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत दिलेले वचन पाळणे कठीण जाऊ शकते हे मान्य आहे. पण वचन न पाळल्याने खरोखरच खूप हानी होते का? वचन देण्याबाबतीत तुम्ही गंभीर असले पाहिजे का? याबाबतीत यहोवा देवाने घालून दिलेला आदर्श लक्षात घेतला तर, ही गोष्ट इतकी गंभीर का आहे ते समजण्यासाठी मदत होईल.
यहोवा दिलेली वचने पूर्ण करतो
आपण अशा देवाची उपासना करतो ज्याच्या नावाचा, त्याच्या वचनांच्या पूर्णतांशी जवळून संबंध आहे. बायबल लिहिले त्या काळात, नावावरून माणसाचे वर्णन व्हायचे. यहोवा या नावाच्याबाबतीतही ही गोष्ट खरी आहे; त्याच्या नावाचा अर्थ “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो. यास्तव ईश्वरी नावात, देव आपली वचने पाळील व आपले उद्देश पूर्ण करील हा विचार येतो.
आपल्या नावाप्रमाणे यहोवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेले प्रत्येक वचन पाळले. त्याच्या वचनांविषयी राजा शलमोनाने कबूल केले: “ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांस विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एकहि शब्द व्यर्थ गेला नाही.”—१ राजे ८:५६.
यहोवा इतका भरवसालायक आहे, की प्रेषित पौल असा तर्क करू शकला: “देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ [वाहिली].” (इब्री लोकांस ६:१३) यहोवाचे नाव आणि त्याचे व्यक्तित्व, त्याचे गुण आपल्याला या गोष्टीची खात्री देतात, की तो आपल्या वचनापासून मागे वळणार नाही, भले त्याला त्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी. (रोमकर ८:३२) यहोवा आपली वचने पूर्ण करतो ही वस्तुस्थिती आपल्याला आशा देते; ही आशा “आपल्या जीवाचा नांगर” आहे.—इब्री लोकांस ६:१९.
यहोवाची वचने आणि आपले भवितव्य
आपली आशा, आपला विश्वास आणि आपले जीवन हे सर्व यहोवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेवर अवलंबून आहेत. आपल्याला कोणती आशा आहे? “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान” होणार यावर विश्वास ठेवण्यासाठीही शास्त्रवचने आपल्याला आधार पुरवतात. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) हे सद्य जीवन इतकेच नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. प्रेषित योहान ज्याला “अभिवचन” म्हणतो ते आहे “सार्वकालिक जीवन.” (१ योहान २:२५) पण यहोवाच्या शास्त्रवचनांतील त्याची वचने फक्त भवितव्याविषयीच मर्यादित नाहीत. आत्ताचे आपले दररोजचे जीवनही त्यांनी अर्थपूर्ण केले आहे.
“जे कोणी त्याचा धावा करितात, . . . त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो . . . त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले. (स्तोत्र १४५:१८, १९) देव आपल्याला अशीही हमी देतो, की तो “भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.” (यशया ४०:२९) आणि देव ‘आपली परीक्षा आपल्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील,’ हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते! (१ करिंथकर १०:१३) वरील वचनांपैकी कोणत्याही वचनाची पूर्णता आपण व्यक्तिगतरीत्या अनुभवली असेल तर, आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो हे आपल्याला माहीत आहे. देव जी वचने देतो व पूर्ण करतो त्यातून आपल्याला होणाऱ्या लाभाच्या दृष्टिने आपण, त्याला दिलेल्या वचनांना कसे लेखले पाहिजे?
देवाला आपण दिलेली वचने पाळणे
देवाला केलेले समर्पण हे, आपले सर्वात महत्त्वपूर्ण वचन आहे यात काही शंका नाही. याद्वारे आपण अनंतकाळसाठी यहोवाची सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित करतो. देवाच्या आज्ञा पाळणे कठीण नसले तरी, या दुष्ट व्यवस्थीकरणात आपण राहात असल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्यास सर्वच वेळी आपल्याला सोपे जात नाही. (२ तीमथ्य ३:१२; १ योहान ५:३) पण “नांगराला हात घातल्यावर” व यहोवाचा समर्पित सेवक आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचा शिष्य झाल्यावर आपण जगातील ज्या गोष्टी सोडून दिल्या आहेत त्यांच्याकडे पुन्हा कधीही मागे वळून पाहू नये.—लूक ९:६२.
आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा, आपण एखाद्या कमतरतेवर मात करू, एखादा ख्रिस्ती गुण विकसित करू किंवा आपल्या ईश्वरशासित कार्यातील एखाद्या पैलूत आपण प्रगती करू, अशी वचने त्याला द्यावयास प्रवृत्त होऊ. तर ही वचने पाळण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करील?—पडताळा उपदेशक ५:२-५.
प्रांजळ वचने ही केवळ भावनांच्याच नव्हे तर विचारशक्तीच्या आधारावर दिलेली असतात. यास्तव, प्रार्थनेत त्याच्यापुढे आपले अंतःकरण खुले करून आपण आपल्याला वाटत असलेली भीती, आपल्या इच्छा आणि कमतरता व्यक्त करण्याद्वारे दाखवू शकतो की आपण दिलेले वचन खरे आहे. प्रार्थना केल्याने, ते वचन पाळण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होईल. देवाला आपण दिलेली वचने जणू कर्ज आहे, असे आपण समजले पाहिजे. कर्ज मोठे असते तेव्हा आपल्याला ते हळूहळू फेडावे लागते. तसेच, आपण यहोवाला दिलेली बरीच वचने पूर्ण करायला वेळ लागेल. पण आपल्याला होईल तसे आपण त्याला नियमितरीत्या देत राहतो त्यावरून, आपण जे बोलतो ते करतो हे दाखवत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला आशीर्वाद देईल.
नेहमी, कदाचित दररोज त्यांच्याविषयी प्रार्थना करून आपण दाखवून देऊ, की आपण गंभीर मनाने वचने दिली आहेत. आपण प्रामाणिक आहोत हे आपल्या स्वर्गीय पित्याला आपण दाखवून देऊ. शिवाय यामुळे आपल्याला नेहमी त्यांची आठवणही राहील. याबाबतीत दावीदाने आपल्यापुढे छान उदाहरण गिरवले आहे. एका गीतात त्याने यहोवाला अशी विनंती केली: “हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. . . . तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडीत राहीन.”—स्तोत्र ६१:१, ८.
वचने पाळल्याने भरवसा वाढतो
देवाला आपण देत असलेली वचने आपण क्षुल्लक समजू नयेत; सह ख्रिश्चनांना आपण जी वचने देतो त्यांच्याबाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. यहोवाबरोबर एक आणि आपल्या बांधवांबरोबर दुसरी वागणूक असू नये. (पडताळा १ योहान ४:२०.) येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात म्हटले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) “विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करण्याचा एक मार्ग म्हणजे, आपले बोलणे होय तर होय किंवा नाही तर नाही असले पाहिजे. (गलतीकर ६:१०) दिलेले प्रत्येक वचन पाळल्याने आपण भरवसालायक व्यक्ती होतो.
पैशाच्या बाबतीत दिलेले वचन न पाळण्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. लोन भरून काढणे असो, एखादे काम करणे असो किंवा एखादा व्यवसाय करार पूर्ण करणे असो, ख्रिश्चनांनी आपले वचन पाळलेच पाहिजे. यामुळे देव संतुष्ट होतो आणि बंधुंना “ऐक्याने एकत्र” राहण्याकरता आवश्यक असलेला आपापसातील भरवसा आणखी पक्का होतो.—स्तोत्र १३३:१.
परंतु, दिलेले शब्द न पाळल्याने मंडळीवर आणि संबंधित व्यक्तींवर वाईट परिणाम होऊ शकतो. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी म्हटले: “व्यवसायात होणारे वाद—एका पार्टीला वाटते, की दुसऱ्या पार्टीने दिलेले वचन पाळले नाही, यांमुळे उद्भवणारे वाद—बहुतेकदा चव्हाट्यावर येतात. यामुळे मग, बांधवांमध्ये फूटी पडू लागतात आणि राज्य सभागृहातील वातावरण तंग होते.” यास्तव, आपण कोणताही करार करतो तेव्हा त्याचा काळजीपूर्वक विचार करून लेखी करार करणे किती महत्त्वाचे आहे बरे!a
किंमती वस्तू विकताना किंवा पैशाची गुंतवणूक करण्याची शिफारस देताना खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे; खासकरून तेव्हा, जेव्हा त्या व्यवहारातून आपल्याला काहीतरी फायदा होणार असतो. तसेच, विशिष्ट वस्तूंपासून मिळणाऱ्या लाभाबद्दल किंवा औषधांबद्दल फुगवून न सांगण्याची किंवा गुंतवणूकीच्या अवास्तव नफ्याविषयीची हमी न देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे. प्रीतीने प्रवृत्त होऊन ख्रिश्चनांनी, असतील त्या धोक्यांविषयी सांगितले पाहिजे. (रोमकर १२:१०) बहुतेक बांधवांना व्यवसायात कमी अनुभव असल्यामुळे, ते आपल्या सल्ल्यावर फक्त, आपला आणि त्यांचा विश्वास एक आहे म्हणून भरवसा करतील. त्यांच्या या विश्वासाला तडा गेला तर हे किती मोठे दुर्दैव ठरेल!
आपण ख्रिस्ती असल्यामुळे, ज्यात बेईमानी चालते किंवा इतरांच्या उचित हिताकडे दुर्लक्ष केले जाते असा व्यवसाय करू शकत नाही. (इफिसकर २:२, ३; इब्री लोकांस १३:१८) यहोवाच्या ‘मंडपात वस्ती’ करायला आपल्याला त्याची संमती हवी असेल तर आपण भरवसालायक असले पाहिजे. “वाहिलेल्या शपथेने स्वःतचे अहित झाले तरी” आपण ती मोडत नाही.—स्तोत्र १५:१, ४.
अम्मोनी लोकांवर विजय दिल्यास, युद्ध करून घरी गेल्यावर जी व्यक्ती मला पहिली भेटेल तिला मी हवन करीन, असे इस्राएलचा शास्ता इफ्ताहाने यहोवाला वचन दिले होते. इफ्ताहाची एकुलती एक मुलगीच त्याला पहिल्यांदा भेटायला आली; पण त्याने आपले वचन मोडले नाही. आपल्या मुलीच्या संमतीने त्याने तिला देवाच्या निवासमंडपात सेवा करायला कायमचे पाठवून दिले—हे बलिदान निश्चितच अनेक प्रकारे दुःखदायक व मोठे होते.—शास्ते ११:३०-४०.
मंडळीच्या पर्यवेक्षकांवर खासकरून, आपले वचन पाळण्याची जबाबदारी आहे. १ तीमथ्य ३:२ नुसार, पर्यवेक्षकाने “अदूष्य” असले पाहिजे. हे एका ग्रीक वाक्यांशाचे भाषांतर आहे ज्याचा अर्थ “ज्याला कशातही पकडता येत नाही, निर्दोष, निष्पाप” असा होतो. त्यावरून “चांगला नावलौकिक असलेला” केवळ हाच अर्थ सूचित होत नाही तर “चांगल्या नावलौकिकास पात्र असलेला मनुष्य” हाही अर्थ सूचित होतो. (अ लिंग्वीस्टिक की टू द ग्रीक न्यू टेस्टमेंट) जर पर्यवेक्षकाने अदूष्य असले पाहिजे तर त्याची वचने देखील नेहमी विश्वासयोग्य असली पाहिजेत.
दिलेली वचने पाळण्याचे इतर मार्ग
सहख्रिश्चन नसलेल्या लोकांना आपण दिलेल्या वचनांना कसे लेखले पाहिजे? येशू म्हणाला होता: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) आपण दिलेले वचन पूर्ण करतो हे सिद्ध केल्यामुळे आपल्या ख्रिस्ती संदेशाकडे आपण इतरांना आकर्षित करू शकतो. आज संपूर्ण जगभरात ईमानदारीचा दर्जा खालावत चालला असला तरी बहुतेक लोक प्रामाणिकपणाला महत्त्व देतात. दिलेले वचन पूर्ण करणे हा, देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम दाखवण्याचा आणि धार्मिकतेची आवड बाळगणाऱ्यांना आकर्षित करण्याचा एक मार्ग आहे.—मत्तय २२:३६-३९; रोमकर १५:२.
यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या १९९८ सेवा वर्षादरम्यान, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा जाहीरपणे प्रचार करण्यात एक अरब पेक्षा जास्त तास खर्च केले. (मत्तय २४:१४) व्यवसायांत किंवा इतर कामांत, आपण दिलेले वचन पूर्ण केले नाही तर लोक आपल्या प्रचाराकडे लक्ष देणार नाहीत. आपण सत्य देवाचे प्रतिनिधी असल्यामुळे, लोक उचितपणे आपल्याकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करतात. भरवसालायक व प्रामाणिक असण्याद्वारे आपण “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणतो.—तीत २:१०.
सेवा करताना, राज्य संदेशात आस्था दाखवणाऱ्या लोकांना पुनर्भेट देऊन आपल्याला, दिलेले वचन पाळण्याच्या संधी मिळू शकतात. आम्ही पुन्हा येऊ, असे आपण म्हणत असलो तर आपण गेले पाहिजे. दिलेले वचन पाळल्याने आपण हे दाखवून देतो, की आपण ‘ज्यांचे बरे केले पाहिजे अशांचे बरे करण्यापासून’ माघार घेत नाही. (नीतिसूत्रे ३:२७) एका भगिनीने याचे स्पष्टीकरण अशाप्रकारे दिले: “मला पुष्कळ वेळा आस्थेवाईक लोक भेटले आहेत ज्यांनी मला सांगितलं, की अमुक साक्षीदारानं पुन्हा येण्याचं वचन दिलं होतं, पण तो काही आला नाही. अर्थातच, मला माहीत आहे, की साक्षीदाराला घरमालक कदाचित घरी सापडला नसेल किंवा कदाचित साक्षीदाराला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पुन्हा जाता आलं नाही. पण माझ्याविषयी असं कोणी बोललेलं मला आवडणार नाही, म्हणून मी त्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याचा प्रयत्नच करते. मी कोणाला निराश केल्यास, माझ्या एकटीमुळे यहोवाचं आणि माझ्या सर्व बंधूभगिनींचं नाव खराब होईल, हे मला माहीत आहे.”
कधीकधी आपल्याला वाटेल, की त्या व्यक्तीला काही आस्था नाही म्हणून परत जाण्याची काही गरज नाही. तीच भगिनी पुढे म्हणते: “लोकांनी किती आस्था दाखवली त्यावरून मी जायचं की नाही हे ठरवत नाही. पहिली छाप बऱ्याचदा चुकीची असते हे मी अनुभवावरून शिकले आहे. म्हणून मी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते; प्रत्येक व्यक्तीला मी भावी बंधू किंवा भगिनी समजते.”
ख्रिस्ती सेवेत आणि इतर कार्यांत, आपले वचन भरवसालायक आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे. हे खरे, की करण्यापेक्षा बोलणे सोपे असते. एका सुज्ञ मनुष्याने लिहिले: “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?” (नीतिसूत्रे २०:६) तेव्हा, दिलेल्या वचनाच्या बाबतीत आपण विश्वासू व भरवसालायक होण्याचा निश्चय करू या.
देवाकडून बहुत आशीर्वाद
मुद्दामहून पोकळ वचन देणे अप्रामाणिकपणा आहे व ते, बँकेतील खात्यात पैसे नसताना चेक लिहून देण्याप्रमाणे होईल. परंतु, दिलेला शब्द पाळल्यास आपल्याला किती प्रतिफळे आणि आशीर्वाद मिळतील! भरवसालायक होण्याचा एक आशीर्वाद आहे, चांगला विवेक. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २४:१६.) आपल्यामध्ये दुःखामुळे सलत राहणाऱ्या भावना उत्पन्न होण्याऐवजी, आपण संतुष्ट व शांत राहू. शिवाय, दिलेला शब्द पाळल्याने, आपण परस्पर भरवशावर अवलंबून असलेली मंडळीतील एकता टिकवून ठेवू. ‘सत्याच्या वचनामुळे’ आपण सत्याच्या देवाचे सेवक आहोत याची लायकी पटवून देतो.—२ करिंथकर ६:३, ४, ७.
यहोवा आपल्या वचनाचा पक्का आहे; ‘लबाड बोलणाऱ्या जिव्हेचा’ त्याला तिटकारा आहे. (नीतिसूत्रे ६:१६, १७) आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण केल्याने आपण त्याच्या जवळ जातो. तेव्हा, दिलेले वचन पाळण्यासाठी आपल्याकडे निश्चितच चांगले कारण आहे.
[तळटीपा]
a सावध राहा! फेब्रुवारी ८, १९८३, पृष्ठे १३-१५ वरील (इंग्रजी), “लेखी करार करा” हा लेख पाहा.
[१० पानांवरील चित्रं]
इफ्ताहाने आपला शब्द पाळला; त्याला तो फार भारी पडला तरीसुद्धा
[११ पानांवरील चित्रं]
तुम्ही पुन्हा येण्याचे वचन दिले असेल तर जाण्याची चांगली तयारी करा