ज्ञानात वाढत जा
“तुमच्या विश्वासात . . . ज्ञानाची भर घाला.”—२ पेत्र १:५.
१, २. (अ) आकाशात पाहण्याद्वारे तुम्ही काय शिकू शकता? (रोमकर १:२०) (ब) मनुष्याची ज्ञानात वाढण्याची खरी मर्यादा किती आहे?
एका अंधाऱ्या रात्री बाहेर जाऊन प्रकाशमान चंद्र व अगणित ताऱ्यांकडे पाहून तुम्ही काय शिकू शकता? ज्याने हे सर्व निर्माण केले त्याच्याविषयी तुम्ही काहीतरी शिकू शकता.—स्तोत्रसंहिता १९:१-६; ६९:३४.
२ तुम्हाला त्या ज्ञानात वाढ करायची असल्यास, तुम्ही तुमच्या घराच्या धाब्यावर जाऊन तेथून पाहण्याद्वारे ते करु शकता का? कदापि नाही. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी, शास्त्रज्ञांनी विश्वाच्या ज्ञानात खरेपणाने वाढ केली नाही व ज्याने त्याला (विश्वाला) निर्माण केले त्याविषयी त्यांना फारच कमी माहिती आहे. अशाप्रकारच्या उदाहरणाचा उपयोग केला.a डॉ. लुईस थॉमस यांनी लिहिले: वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त असलेल्या शतकातील विज्ञानाची प्रत्येक मोठी कामगिरी, शोध ही आहे, ज्याविषयी आम्ही पूर्ण अज्ञानी होतो; आम्हाला निसर्गाविषयी फार कमी माहिती आहे व आम्ही अगदीच अल्प त्याविषयी समजतो.”
३. वाढलेले ज्ञान कोणत्या अर्थाने अधिक दुःख वाढवते?
३ या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी तुम्ही जीवनमानातील उरलेली सर्व वर्षे घालवली, तरी जीवन किती कमी आहे याची जाणीव तुम्हाला होईल आणि अपरिपूर्णता व या जगाच्या ‘कुटिलपणा’मुळे मनुष्य उपयोगात आणीत असलेले ज्ञान मर्यादित आहे हे तुम्हाला कळून येईल. लिहिताना शलमोनाने हा मुद्दा मांडला: “जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक.” (उपदेशक १:१५, १८) होय, देवाच्या उद्देशाशी कसल्याही प्रकारचा संपर्क टाळून, ज्ञान आणि बुद्धी यांची प्राप्ती करणे हे बहुधा पीडादायक व व्यर्थकारक आहे.—उपदेशक १:१३, १४; १२:१२; १ तीमथ्य ६:२०.
४. कोणते ज्ञान आम्ही संपादन केले पाहिजे?
४ आमच्या ज्ञानात आम्ही वाढ करण्याविषयी आस्थेवाईक नसावे अशी पवित्र शास्त्र आम्हाला शिफारस करते का? प्रेषित पेत्राने लिहिले: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो.” (२ पेत्र ३:१८) आपल्या ज्ञानात वाढत जाण्यासाठी आर्जवणारे व आपल्याला लागू होणाऱ्या आर्जवाचा आपण स्वीकार करु शकतो आणि केला पाहिजे. परंतु कोणत्या प्रकारचे ज्ञान? आम्ही यात वाढ कशी करु शकतो? आणि आम्ही खरोखरी असे करीत आहोत का?
५, ६. आम्हाला ज्ञान मिळवण्याची गरज आहे हे पेत्राने कसे स्पष्ट केले आहे?
५ विश्वाच्या निर्माणकर्त्याचे व येशूविषयीच्या अचूक ज्ञानात वाढ करणे ही पेत्राच्या दुसऱ्या पत्रातील केंद्रिय कल्पना होती. त्याच्या आरंभास त्याने लिहिले: “देव व आपला प्रभु येशू ह्यांच्या ओळखीने [अचूक ज्ञानाने, न्यू.व.] तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्याद्वारे [अचूक ज्ञानाने, न्यू.व.], त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीत [ईश्वरी भक्ती, न्यू.व.] आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.” (२ पेत्र १:२, ३) यास्तव देव आणि त्याच्या पुत्राविषयीच्या आमच्या वाढत असणाऱ्या अचूक ज्ञानाबरोबर कृपा आणि शांतीचा तो मेळ घालतो. हे अगदी उचित आहे कारण आमचा निर्माणकर्ता यहोवा खऱ्या ज्ञानाचा केंद्रिय बिंदू आहे. देवाचे भय बाळगणारा या गोष्टींना ज्ञानचक्षूंनी पाहतो व योग्य समाप्तीला पोहचतो.—नीतीसूत्रे १:७.
६ नंतर पेत्राने आर्जवले: “ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करुन आपल्या विश्वासांत सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरांत सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला; कारण हे गुण तुम्हांमध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.” (२ पेत्र १:५-८)b पुढील अध्यायात आम्ही वाचतो की ज्ञान प्राप्त केल्यामुळे लोकांना जगाच्या घाणीपासून ते वाचवते. (२ पेत्र २:२०) अशाप्रकारे पेत्राने हे स्पष्ट केले की ख्रिश्चन होऊ इच्छिणाऱ्यांनी, यहोवाची सेवा करीत असलेल्यांसारखे ज्ञान घेण्याची गरज आहे. तुम्ही त्यांच्यातील एक आहात का?
शिका, पुनरावृत्ती करा व उपयोग करा
७. पवित्र शास्त्राच्या प्राथमिक सत्याचे अचूक ज्ञान अनेकांनी कशारितीने संपादन केले आहे?
७ तुम्ही कदाचित यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करीत असाल कारण त्यांच्या संदेशात तुम्ही सत्याची स्पष्टता ओळखली असेल. आठवड्यातून एकदा, एका तासाभरासाठी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या साहित्याचा वापर करुन पवित्र शास्त्रातील मुद्यांचा विचार करीत असाल. अतिउत्तम! यहोवाच्या साक्षीदारांसोबत अनेकांनी असा अभ्यास केल्यामुळे त्यांना अचूक ज्ञान मिळाले आहे. तर मग तुम्ही वैयक्तिकपणे जे शिकत आहात त्यात वाढ करण्यासाठी काय करु शकता? येथे काही सल्ले दिले आहेत.c
८. अभ्यासाची तयारी करताना, अधिक शिकण्यासाठी विद्यार्थी काय करु शकतो?
८ तुम्ही तुमच्या अभ्यासाची तयारी करण्यापूर्वीच, जे साहित्य हाताळले जाणार आहे त्याचा आढावा घ्या. याचा अर्थ अध्यायाचे शिर्षक, पोटमथळे व साहित्य समजण्यासाठी ज्या चित्राचा उपयोग केला आहे त्याची वरवर पाहणी करणे होय. नंतर परिच्छेद किंवा प्रकाशनाचा एखादा विभाग वाचताना, मुख्य कल्पना व दुजोरा देणारी शास्त्रवचने शोधून त्यांना रेखांकित किंवा ठळक करा. तुम्ही सत्य पूर्णपणे शिकला आहात ते पाहण्यासाठी, विविध परिच्छेदांवर प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असे करताना मनात योजलेली उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दात देण्याचा प्रयत्न करा. शेवटी, मुख्य मुद्दे आणि दुजोरा देणाऱ्या वादाचे स्मरण करुन धड्याचा पुनर्विचार करा.
९. अभ्यासाच्या बाबतीत सल्ल्यांचा अवलंब करण्याने शिकण्यासाठी एखाद्याला कशी मदत होऊ शकते?
९ या सल्ल्यांचा अवलंब केल्यास तुमच्या ज्ञानात वाढ होण्याची तुम्ही अपेक्षा करु शकता. का बरे? एक कारण म्हणजे शिकण्याच्या तुमच्या उत्कट इच्छेमुळे साहित्य तुम्ही बारकाईने हाताळाल, व जणू काही तुम्ही जमीन तयार करणार. वरवर दृष्टी टाकल्यावर व नंतर मुख्य मुद्दे व तर्काच्या सहमताने पाहण्याने तुम्हाला दिसेल की तपशीलाचा संबंध विषय किंवा समाप्तीबरोबर कसा आहे. अंतिम पुनर्विचार तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे ते लक्षात ठेवण्यास तुम्हाला मदत करील. तुमच्या पवित्र शास्त्र अभ्यासात नंतर तुम्हाला काय मदत करील?
१०. (अ) वस्तुस्थिती किंवा नवीन माहितीचा फक्त पुनर्विचार करण्याचे मूल्य मर्यादित का आहे? (ब) “प्रगतीच्या धोरणाने लांबच्या मध्यांतराच्याकाळात नवीन गोष्टींचा पुनर्विचार” करण्यात काय समाविष्ट आहे? (क) पुनरावृत्ती केल्यामुळे इस्राएली मुलांना कसा फायदा झाला असेल?
१० शैक्षणिक क्षेत्रातील विद्वानांना, समयोचित आणि उद्देशयुक्त पुनरावृत्तीचे मूल्य माहीत आहे. हे पोपटासारखे काही शब्द पाठ करण्यासारखे नाही, कदाचित त्याचा तुम्ही शाळेत शिकत असताना काही नावे किंवा वस्तुस्थिती, कल्पना पाठ करण्याद्वारे प्रयत्न केला असेल. तर मग तुम्ही जे काही पाठ म्हणून दाखवले होते ते आता तुमच्या स्मरणातून लगेच नाहीसे झाले आहे हे तुम्हाला कळले आहे का? का बरे? नवे शब्द किंवा वस्तुस्थितीचे पाठांतर करणे कंटाळवाणे वाटू शकते, व याचे परिणाम अल्पकालीन असतात. त्याच्यात कोणती गोष्ट बदल करु शकते? तुमची खरेपणाने शिकण्याची इच्छा मदत करील. उद्देशयुक्त पुनरावृत्ती ही दुसरी गुरूकिल्ली आहे. तुम्ही एखादा मुद्दा शिकल्याच्या काही मिनिटानंतर, तुमच्या स्मरणातून निघून जाण्यापूर्वी, तुम्ही जे काही शिकला आहात त्याची आठवण करा. हे “प्रगतीच्या धोरणाने लांबच्या मध्यांतराच्याकाळात नवीन गोष्टींचा पुनर्विचार” करण्याला सुचित करते. तुमची उत्साहवर्धक स्मरणशक्ती कोमेजून जाण्याआधी धारणाशक्तीची लांबी तुम्ही वाढवू शकता. इस्राएलमध्ये, पालकांनी त्यांच्या मुलांवर देवाच्या आज्ञा बिंबवावयाच्या होत्या. (अनुवाद ६:६, ७) “बिंबवणे” याचा अर्थ पुनरावृत्तीद्वारे शिकवणे होय. बहुधा, त्या अनेक पालकांनी प्रथम त्यांच्या मुलांना नियम सांगितले असावेत; व नंतर माहितीची पुनरावृत्ती केली असावी; मग त्यांनी त्यांच्या मुलांना शिकलेल्या गोष्टींची विचारणा केली असावी.
११. पवित्र शास्त्र अभ्यासात, शिकण्यात वाढ करण्यासाठी काय केले जाऊ शकते?
११ एखादा साक्षीदार तुमच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत असल्यास, अभ्यासाच्या वेळेदरम्यान तो किंवा ती तुम्हाला प्रगतशील तपशीलाद्वारे शिकण्यास मदत करील. ही बालिश स्थिती नाही. हे शिकून घेण्यामध्ये सुधारणा करणारे तंत्र आहे, त्यामुळे नियमित उजळणीत आनंदाने सहभाग घ्या. नंतर, अभ्यासाच्या समाप्तीस, तुमच्या स्मरणात असलेले उत्तर देण्याद्वारे तुम्ही अंतिम उजळणीत भाग घ्या. दुसऱ्या व्यक्तिला शिकवण्यासाठी जसे तुम्ही मुद्याचे स्पष्टीकरण देता त्याप्रमाणे तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या शब्दात सांगू शकता. (१ पेत्र ३:१५) हे तुम्हाला, शिकलेल्या गोष्टीचा तुमच्या दीर्घ-मुदतीच्या स्मरणशक्तीचा भाग होण्यास मदत करील.—पडताळा स्तोत्रसंहिता ११९:१, २, १२५; २ पेत्र ३:१.
१२. विद्यार्थी त्याच्या स्मरणशक्तीत सुधारणा करण्यासाठी काय करु शकतो?
१२ तुमच्यासाठी आणखी एक पायरी असेल व ती, शिकलेल्या गोष्टी एक किंवा दोन दिवसात कोणालातरी म्हणजे, शाळासोबती, सहकर्मचारी किंवा शेजाऱ्यांना सांगू शकता ही आहे. तुम्ही विषय सांगू शकता व मग तर्क करण्याचे मुख्य मुद्दे किंवा पवित्र शास्त्रातील दुजोरा देणारे वचन आठवते का हे तुम्हाला पाहायचे आहे असे म्हणा. यामुळे इतरांची आस्था चेतवली जाऊ शकते. तसे झाले नाही तरी, एक किंवा दोन दिवसानंतर नव्या माहितीची केलेली पुनरावृत्ती तुमच्या स्मरणात ठेवली जाईल. मग तुम्ही २ पेत्र ३:१८ या वचनात आर्जविलेले आहे ते खरोखर शिकलेले असाल.
सक्रियपणे शिकत राहणे
१३, १४. माहिती संपादन करणे व लक्षात ठेवण्याव्यतिरिक्त आम्ही काय केले पाहिजे?
१३ शिकत राहण्यात, वस्तुस्थिती पाहणे किंवा माहिती पुन्हा आठवणे यापेक्षा अधिक गोवलेले असते. येशूच्या दिवसातील धार्मिक लोकांनी त्यांच्या पुनरावृत्ती केलेल्या प्रार्थनांद्वारे ते केले. (मत्तय ६:५-७) परंतु माहितीमुळे त्यांच्यावर कसा प्रभाव पडला? ते धार्मिकतेची फळे जोपासत होते का? जवळजवळ नाहीच. (मत्तय ७:१५-१७; लूक ३:७, ८) समस्यातील एक गोष्ट, ज्ञान त्यांच्या हृदयात खोलवर गेलेले नव्हते आणि लाभदायक परिणामासाठी त्याने त्यांच्या हृदयावर प्रभाव केला नाही ही होती.
१४ पेत्राच्या सांगण्याप्रमाणे तेव्हा आणि आता ख्रिश्चनांच्याबाबतीत ते वेगळे असले पाहिजे. तो आमच्या विश्वासात ज्ञानाची भर घालण्याचे आर्जवतो, ते आम्हाला अक्रियाशील किंवा अविश्वासू होण्याचे टाळण्यासाठी मदत करील. (२ पेत्र १:५, ८) आमच्या बाबतीत हे खरे शाबीत करण्यासाठी, आम्ही त्या ज्ञानात वाढ केली पाहिजे व आमच्या आंतरिक मनापर्यंत खोल जाऊन त्याचा प्रभाव आमच्यावर झाला पाहिजे. तसे सर्वदाच घडणार नाही.
१५. काही इब्री ख्रिश्चनांच्या बाबतीत कोणती समस्या उद्भवली होती?
१५ पौलाच्या दिवसात इब्री ख्रिश्चनांना याबाबतीत समस्या होती. यहुदी असल्यामुळे, शास्त्रवचनांचे त्यांना काही प्रमाणात ज्ञान होते. त्यांना यहोवा आणि त्याच्या काही आवश्यकतांविषयी माहिती होती. नंतर त्यांनी मशीहाविषयी ज्ञानात भर टाकली, विश्वास प्रदर्शित केला, आणि ख्रिश्चन या नात्याने बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कृत्ये २:२२, ३७-४१; ८:२६-३६) ते अनेक महिने आणि वर्षे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिले असतील, ते तेथे शास्त्रवचनांचे वाचन आणि विवेचन मांडण्यात भाग घेऊ शकत होते. तरीदेखील, काहींनी त्यांच्या ज्ञानात वाढ केली नाही. पौलाने लिहिले: “वास्तविक इतक्या काळापर्यंत तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात.” (इब्रीयांस ५:१२) पण हे कसे होऊ शकते? आमच्याबाबतीत देखील तसेच होऊ शकते?
१६. गोठण्याची स्थिती काय आहे, व वनस्पतींवर तिचा काय परिणाम होतो?
१६ उदाहरणादाखल, आर्कटिक आणि इतर भागातील सरासरी तापमान गोठण्याच्या खाली असते अशा कायम गोठलेल्या जमिनीचा विचार करा. जमीन, खडक आणि जमिनीतील पाणी घनरुपात गोठतात, कधीकधी ते ९०० मीटर खोलीपर्यंत गोठते. उन्हाळ्यात, पृष्ठभागावरील मातीत (सक्रिय थर म्हटलेली) उष्णता वाढल्यामुळे बर्फ वितळला जातो. तथापि, बर्फाच्या जमिनीतील हे विरळ थर गढूळ असतात कारण दमटपणामुळे ते कायम गोठलेल्या तापमानाच्या खाली असल्यामुळे ओतले जाऊ शकत नाही. वरील विरळ थरात अनेकदा वाढणाऱ्या वनस्पती लहान असतात किंवा त्यांची वाढ खुंटलेली असते. त्यांची मुळे कायम गोठलेल्या जमिनीत जाऊ शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मी पवित्र शास्त्रीय सत्याच्या ज्ञानात वाढत आहे की नाही हे पाहायचे आहे तर मला गोठलेल्या जमिनीशी काय करायचे?’
१७, १८. काही इब्री ख्रिश्चनांमध्ये जी वाढ झाली होती ती समजण्यासाठी, गोठण्याची स्थिती व तिच्या सक्रिय थराचा उपयोग, कशी स्पष्टता देतो?
१७ गोठलेली जमीन, ज्यांचे मनःचक्षू सक्रियपणे गोष्टी ग्रहण करीत नाहीत, आठवणीत ठेवीत नाहीत व अचूक ज्ञानाचा वापर करीत नाहीत त्यांच्या परिस्थितीचे स्पष्टीकरण देते. (पडताळा मत्तय १३:५, २०, २१.) विविध विषय तसेच पवित्र शास्त्र शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तिठायी योग्यता असण्याची शक्यता असते. त्याने “देवाच्या वचनांची मुळाक्षरे” यांचा अभ्यास केला असेल व इब्री ख्रिश्चनांप्रमाणे तो बाप्तिस्मा घेण्यासाठी पात्र देखील बनला असेल. तरीसुद्धा, कदाचित, ‘ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीच्या पलिकडे’ “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” त्याने केला नसेल.—इब्रीयांस ५:१२; ६:२.
१८ पहिल्या शतकातील, सभेमध्ये असलेल्या त्या काही ख्रिश्चनांचा विचार करा. ते उपस्थित व जागृत होते, परंतु त्यांची मने शिकण्यात गोवलेली होती का? ते सक्रियपणे आणि मनःपूर्वकपणे ज्ञानात वाढत होते का? कदाचित नाही. अप्रौढांसाठी सभेतील कोणताही भाग म्हणजे जणू गोठलेल्या भागाखालील कोणत्याही विरळ सक्रिय थराप्रमाणे होता. त्यांच्या मानसिक गोठलेल्या भागात सत्याची मजबूत किंवा गुंतागुंतीचे मुळे आत शिरू शकली नाहीत.—यशया ४०:२४.
१९. आज एखादा अनुभवी ख्रिस्ती कशारितीने इब्री ख्रिश्चनांसारखा होऊ शकतो?
१९ आज देखील एखाद्या ख्रिश्चनाच्या बाबतीत हे खरे असू शकते. सभेत उपस्थित असताना त्या प्रसंगाचा उपयोग ज्ञानात वाढ करण्यासाठी तो करीत नसेल. त्यांच्यात सक्रियपणे सहभाग घेण्याविषयी काय? स्वेच्छेने एखादे शास्त्रवचन वाचणे किंवा परिच्छेदातील एखाद्या शब्दावर विवेचन देण्याद्वारे नव्या किंवा तरुण जणाला पुरेसा प्रयत्न करावा लागू शकतो, व यामुळे त्याच्या पात्रतेचा चांगला व प्रशंसनीय वापर करीत असल्याचे दिसून येते. परंतु इतरांच्याबाबतीत पौलाने दाखविले की, काळाच्या अनुषंगाने ते ख्रिस्ती होते, त्यांना ज्ञानात वाढ करण्यासाठी त्यांनी सहभाग घेण्याच्या मुळ स्थितीपासून प्रगती केली पाहिजे.—इब्रीयांस ५:१४.
२०. आम्ही प्रत्येकाने कोणते स्वपरीक्षण केले पाहिजे?
२० जर एखादा अनुभवी ख्रिस्ती प्रगती करीत नाही, केवळ तो पवित्र शास्त्राची वचने वाचतो किंवा परिच्छेदातून मुलभूत गोष्टींवर विवेचन मांडीत असल्यास त्याचा सहभाग त्याच्या मनातील वरील “सक्रिय थरा”तून आला आहे असे दिसून येते. आमच्या कायम गोठणाऱ्या स्थितीच्या दृष्टांतानुसार आणखी पुढे, अनेक सभांनंतरही गोठणारी मनाची स्थिती तशीच टिकून राहते. आम्ही व्यक्तिगतपणे स्वतःस विचारले पाहिजे: ‘असेच माझ्याही बाबतीत आहे का? मी मानसिक गोठणारी स्थिती माझ्यात ठेवली आहे का? शिकण्यासाठी, मानसिकरीत्या मी किती उत्सुक आणि आस्थेवाईक आहे?’ आम्ही आमच्या प्रामाणिक उत्तराने अस्वस्थ असलो तर ज्ञानात वाढ करण्यासाठी आम्ही आता पाऊल उचलण्यास सुरवात केली पाहिजे.
२१. सभेची तयारी करण्यासाठी किंवा सभेला उपस्थित राहण्यासाठी आधी चर्चा केलेल्या कोणत्या गोष्टींचे तुम्ही अवलंबन कराल?
२१ वैयक्तिपणे आम्ही ८ व्या परिच्छेदातील सल्ल्याचा अवलंब केला पाहिजे. आमची मंडळीसोबत कितीही काळापासून संगती असली तरी, आम्ही प्रौढतेप्रत जाण्याचा व अधिक ज्ञानात वाढ करण्याचा नेटाने निश्चय केला पाहिजे. याचा अर्थ, काहींनी सभेची परिश्रमपूर्वक तयारी करणे, कदाचित अनेक वर्षांआधी अनुकरणात आणीत असलेल्या परंतु हळूवारपणे लोप पावलेल्या चेतनाशील सवया पुनरुत्जीवित करणे असा होतो. तयारी करताना, मुख्य मद्दे कोणते आहेत, ते ठरविण्याचा आणि तर्क करण्यासाठी वापरलेली अपरिचित शास्त्रवचने समजण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाच्या साहित्यात नवीन दृष्टिकोन व बाजूचा शोध घ्या. अशाचप्रकारे, सभेच्यावेळी, परिच्छेद १० आणि ११ मध्ये दिलेल्या सल्ल्यांचा अवलंब स्वतःत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनाचे तापमान उष्ण ठेवण्याप्रमाणे मानसिकरीत्या दक्ष राहण्याचा जोराचा प्रयत्न करा. ते “गोठण्याच्या स्थिती”ची कोणतीही प्रवृत्ती आत येण्यापासून प्रतिकार करील; आधी वाढ झालेल्या कोणत्याही “गोठलेल्या” परिस्थितीला हे सतत केलेले प्रयत्न वितळवतील.—नीतीसूत्रे ८:१२, ३२-३४.
ज्ञान साफल्याकडील साधन
२२. आमचे ज्ञान वाढविण्यासाठी कार्य करीत राहिलो तर आम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
२२ आमचा प्रभु व तारणकर्ता येशू ख्रिस्ताच्या विपुल दयेत आणि ज्ञानात वाढ करण्यासाठी आम्ही कार्य करीत राहिल्यास वैयक्तिकपणे आम्हाला कसा फायदा होऊ शकतो? आमच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांद्वारे, ज्ञानचक्षूंना दक्ष ठेवण्यासाठी, पवित्र शास्त्राच्या नवीन आणि अधिक गुंतागुंतीच्या सत्याच्या बीजांचे ज्ञान घेण्यासाठी तयार असण्यामुळे आमची समज वाढू शकते व कायम टिकून राहू शकते. येशूने अंतःकरणाच्या बाबतीत दिलेल्या वेगळ्या दृष्टांतासारखेच हे आहे. (लूक ८:५-१२) चांगल्या मातीत पडलेले बी वाढून झाडाला आधार देण्यासाठी मूळ धरते व फळ देते.—मत्तय १३:८, २३.
२३. आम्ही २ पेत्र ३:१८ आमच्या अंतःकरणात घेतले तर कोणते परिणाम होऊ शकतात? (कलस्सैकर १:९-१२)
२३ येशूचा दृष्टांत काहीसा वेगळा होता, तथापि पेत्राने अभिवचन दिल्याप्रमाणे त्याचे चांगले परिणाम सारखेच आहेत: “ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करुन आपल्या विश्वासांत सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात . . . कारण हे गुण तुम्हांमध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.” (२ पेत्र १:५-८) होय, ज्ञानात वाढ केल्याने आम्हाला फलदायी होण्यास मदत होऊ शकेल. आम्हाला दिसेल की, अधिक ज्ञान घेणे आम्हाला अधिक आनंददायक वाटू लागेल. (नीतीसूत्रे २:२-५) तुम्ही जे शिकाल त्याची तुम्हाला आठवण राहील व शिष्य बनविण्यासाठी इतरांना शिकवताना ते तुम्हाला उपयुक्त ठरेल. अशाप्रकारे देखील तुम्ही अधिक फलदायी होऊ शकता व आमच्या देवाची आणि त्याच्या पुत्राची महिमा करु शकता. पेत्र त्याच्या दुसऱ्या पत्राची समाप्ती करतो: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो.”—२ पेत्र ३:१८.
[तळटीपा]
a “ज्ञानातील आमच्या वाढीची तुलना, चंद्राविषयी अधिक शिकण्याची इच्छा असलेला एक मनुष्य, त्या ज्योतीला जवळून पाहण्यासाठी तो त्याच्या घराच्या धाब्यावर जातो याच्याशी करता येऊ शकते.”
b विश्वास आणि सात्त्विकता, या उताऱ्यातील पहिल्या दोन्ही गुणांची चर्चा आमच्या जुलै, १९९३ च्या अंकात केली आहे.
c हे सल्ले अनेक वर्षांपासून ख्रिश्चन असलेल्यांना देखील, वैयक्तिक अभ्यास व सभेत भाग घेण्याद्वारे अधिक प्राप्त करण्यासाठी त्यांना मदत करु शकतात.
तुम्ही आठवू शकाल का?
▫ तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी तुम्ही आस्थेवाईक का असले पाहिजे?
▫ अभ्यासाद्वारे एका नव्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला अधिक फायदा कसा होऊ शकतो?
▫ गोठणाऱ्या स्थितीच्या दृष्टांतानुसार, कोणता धोका तुम्ही टाळला पाहिजे?
▫ तुम्ही ज्ञान वाढविण्याच्या क्षमतेत प्रगती करण्यासाठी जोराचा प्रयत्न का केला पाहिजे?
[२३ पानांवरील चित्रं]
माझ्यात मानसिक गोठण्याची समस्या आहे का?