११३ याहची स्तुती करा!
यहोवाच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा,
यहोवाच्या नावाचं गुणगान करा.
२ आतापासून सर्वकाळापर्यंत,
यहोवाच्या नावाची स्तुती होवो!+
३ सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत,
यहोवाच्या नावाचं गुणगान होवो!+
४ यहोवा सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च स्थानावर आहे;+
त्याचा गौरव आकाशाहून उंच आहे.+
५ आमचा देव यहोवा, याच्यासारखा कोण आहे?+
तो उच्च स्थानावर राहतो.
६ आकाश आणि पृथ्वी यांना पाहण्यासाठी तो खाली वाकतो.+
७ तो दीनदुबळ्याला धुळीतून उठवतो;
तो गरिबाला राखेच्या ढिगाऱ्यातून उचलतो.+
८ तो त्याला उच्च घराण्यातल्या लोकांसोबत बसवतो,
तो त्याला आपल्या प्रतिष्ठित लोकांसोबत बसवतो.
९ तो वांझ स्त्रीला आई होण्याचं सुख देतो,
ती आपल्या घरात मुलाबाळांसोबत आनंदाने राहते.+
याहची स्तुती करा!