वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९६ पृ. ३
  • सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • रस्त्यावरील परिणामकारक साक्षकार्याद्वारे आस्थेवाईकांचा शोध घेणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत
    आमची राज्य सेवा—२०१४
  • व्यापारी क्षेत्रात प्रचार कसा करावा
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ११/९६ पृ. ३

सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा

१ आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी सर्वत्र सुवार्तेचा प्रचार केला. ते इतके आवेशी होते की येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरच्या ३० वर्षांतच राज्याच्या संदेशाचा ‘प्रचार आकाशाखालच्या सर्व सृष्टीत’ करण्यात आला.—कलस्सै. १:२३.

२ यहोवाच्या आधुनिक दिवसीय आवेशी सेवकांचे उद्दिष्ट हेच आहे—राज्याची सुवार्ता शक्य तितक्या सर्व लोकांप्रत नेणे. हे ध्येय साध्य करण्याकरता कोणती गोष्ट आपली मदत करू शकेल? अधिकाधिक लोक पूर्ण वेळेची नोकरी करत आहे व आपण त्यांना भेटी देतो तेव्हा बहुतेक वेळा ते घरी नसतात. ही बाब, घरी नसलेल्यांची उत्तम नोंद ठेवण्याच्या व त्यांची पुन्हा भेट घेण्यासंबंधी कर्तव्यनिष्ठ असण्याच्या गरजेवर भर देते. तथापि, कधीकधी वारंवार भेटी दिल्यानंतरही काही घरांमध्ये आपल्याला कोणीही भेटत नाही. ते कोठे असतात? ते कामावर नसतात तेव्हा ते कदाचित प्रवास करत असतील, खरेदी करत असतील अथवा मनोरंजनात मग्न असतील. यांपैकी पात्र असलेल्यांप्रत राज्याचा संदेश कसा पोहंचवला जात आहे?—मत्त. १०:११.

३ काहींशी त्यांच्या कार्यस्थळी संपर्क साधला जात आहे. लहान नगरांमध्ये देखील उद्योगधंद्याचा एक विभाग असतो जेथे बहुसंख्य लोक दिवसातील आपला अधिकतर वेळ घालवत असतात. शहरांमध्ये, औद्योगिक क्षेत्रांत अथवा कार्यालयांमध्ये नोकरी करणारे आणि अतिसुरक्षा निवासी इमारतींत किंवा वसाहतीत राहणाऱ्‍यांना साक्ष दिली जाते—बहुतेक जण तर पहिल्यांदाच ती ऐकत असतात. सप्ताहांती, उद्यानात, समुद्रकाठावर, चित्रपट गृहांबाहेर निवांत वेळ घालवत असता अथवा वाहन तळांवर किंवा खरेदी करण्याच्या ठिकाणी उभे असता ज्यांच्याशी संपर्क साधला गेला आहे, ते सुवार्तेला अनुकूल प्रतिसाद देण्याच्या स्थितीत असल्याचे आढळून आले आहेत.

४ जेथे कोठे लोक भेटू शकतील अशा सार्वजनिक स्थळी साक्ष देण्याचा अनेक प्रचारक प्रयत्न करत आहेत. अधिक औपचारिक परिस्थितीत, जसे की घरोघरी प्रचार करण्याची सवय पडल्यामुळे सुरवातीला हे साक्षीदार साशंक होते आणि काहीसे घाबरतही होते. परंतु, आता त्यांना कसे वाटते?

५ एक अनुभवी बांधव म्हणतो: “या कार्याने माझ्या सेवेला संजीवन दिले आहे!” दुसरा एक म्हणतो: “ते चित्तैकाग्र ठेवण्यास माझी मदत करते.” एक वृद्ध पायनियर असे निरीक्षितो: “ते मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या उत्साहवर्धक आहे, . . . आणि मी त्यांत अजूनही वृद्धिंगत होत आहे. ”तरुण लोकही या आनंदायी कार्यात उत्साहाने सहभागी होत आहेत. एक युवक स्वतःबाबत असे अभिव्यक्‍त करतो: “ही खरोखरच एक मौज आहे कारण तुम्हाला कित्येक लोकांशी संभाषण करण्याची संधी लाभते.” दुसरा एक म्हणतो: “मी आता पूर्वीपेक्षा अधिक साहित्यांचे वाटप करत आहे.” हे सर्व अशा क्षेत्रात घडत आहे जे वारंवार उरकले जात आहे.

६ प्रवासी पर्यवेक्षक पुढाकार घेत आहेत: “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे” हे ओळखून संस्थेने अलीकडेच असे सुचवले आहे की, प्रवासी पर्यवेक्षकांनी सप्ताहागणिक आपल्या आराखड्यात तडजोड करावी जेणेकडून शक्य तितक्या लोकांप्रत सुवार्ता पोहंचवली जाईल. (१ करिंथ. ७:३१) कित्येक वर्षांपर्यंत विभागीय पर्यवेक्षक सप्ताहाच्या दिवसांतील सकाळची वेळ घरोघरच्या कार्यात घालवण्याकरता राखून ठेवत होते, तर दुपारची वेळ ही पुनर्भेटी देण्याकरता आणि बायबल अभ्यास संचालित करण्याकरता राखली जात असे. या देशाच्या अनेक भागांत हा आराखडा कदाचित अद्यापही व्यावहारिक असेल. इतर क्षेत्रांत, सप्ताहाच्या दिवशी सकाळी, घरोघरच्या कार्यामार्फत अधिक काही साध्य होत नाही. असे असल्यास, सकाळच्या वेळी दुकाना-दुकानातले कार्य अथवा रस्त्यावरील साक्षकार्य करणे उत्तम असेल असे प्रवासी पर्यवेक्षक ठरवतील. किंवा कार्यालयांच्या इमारतींत, खरेदी करण्याच्या ठिकाणी, वाहन तळांवर अथवा इतर सार्वजनिक स्थळी साक्ष देण्याकरता ते एका लहान गटास नेमतील. क्षेत्र सेवेकरता उपलब्ध असलेल्या समयाचा प्रचारकांनी जर सर्वात प्रभावी उपयोग केला तर बहुविध लोकांशी संपर्क साधता येईल.

७ अहवाल दाखवून देतात, की ह्‍या फेरबदलाप्रति प्रवासी पर्यवेक्षकांनी व प्रचारकांनी देखील अनुकूल प्रतिक्रिया दर्शविली आहे. अनेक वडीलवर्गांनी विभागीय पर्यवेक्षकांना, कार्याच्या अशा पैलूंत प्रचारकांची मदत करण्यास आमंत्रित केले आहे जेथे स्थानिकरित्या लक्ष घालणे आवश्‍यक आहे. प्रवासी पर्यवेक्षक कार्यांच्या अशा एका पैलूत कार्य करत असता त्यांना साथ देणे या प्रचारकांना मदतगार ठरले आहे. त्यामुळे आता ते इतरांना प्रशिक्षित करू शकले आहेत. (२ तीम. २:२) परिमाणस्वरुपी, अधिकतर लोकांप्रत सुवार्ता पोहंचवली जात आहे.

८ तथापि, प्रचाराच्या ह्‍या इतर मार्गांचा प्रयोग करण्याकरता, विभागीय पर्यवेक्षक येईपर्यंत थांबू नका. तुमच्या क्षेत्रांत व्यवहार्य ठरू शकतील अशा विविध संकल्पना येथे पुरवल्या आहेत:

९ रस्त्यावरील साक्षकार्य: सप्ताहाच्या दिवशी सकाळी निर्मनुष्य असलेल्या अशा एखाद्या निवासी क्षेत्रात भेट देत असता आपण कदाचित विचारात पडू की: “सर्व लोक गेलेत तरी कोठे?” काहीजण कदाचित बाहेरची लहानसहान कार्ये किंवा खरेदी करत असतील. यांना रस्त्यावरील साक्षकार्याकरवी भेटण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? हे उचितपणे केल्यास सेवेचा हा पैलू अत्यंत उत्पादक ठरू शकतो. नियतकालिके घेऊन एके ठिकाणी उभे राहण्यापेक्षा, पुढाकार घेऊन लोकांशी संभाषण सुरू करणे सर्वोत्तम आहे. प्रत्येक वाटसरुला साक्ष देणे अगत्याचे नाही. जे लोक घाईत नसतात, जसे की दुकानांत मांडून ठेवलेल्या चीजवस्तू केवळ पाहणारे, पार्क केलेल्या कारमध्ये बसलेले अथवा सार्वजनिक वाहनाकरता थांबलेले लोक यांच्याशी बोला. सुरवातीला तुम्ही केवळ स्नेहपूर्ण अभिवादन करू शकता व प्रतिसाद मिळण्याकरता थांबा. एखादी व्यक्‍ती बोलण्यास इच्छुक असल्यास तिला ज्या विषयात आस्था वाटेल असे तुम्हाला वाटते त्यावरील तिचे मत विचारा.

१० एका प्रवासी पर्यवेक्षकाने व त्यांच्या पत्नीने सहा प्रचारकांना आपल्यासह रस्त्यावरील साक्षकार्य करण्याचे निमंत्रण दिले. कोणत्या परिणामांसह? “आमचे सकाळचे कार्य खरोखर उत्साहवर्धक होते!” असा अहवाल ते देतात. “लोक घरी न भेटणे ही समस्या आता नव्हती. ऐंशी नियतकालिके व अनेक हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. उद्दीपित करणारी पुष्कळ संभाषणे आम्ही अनुभवली. पहिल्यांदाच रस्त्यावरील कार्यात सहभाग घेणाऱ्‍या एका प्रचारकाने असे सांगितले: ‘मी इतकी वर्षे सत्यात असूनही आपण काय चुकवत आहोत याची जाणीव मला झाली नव्हती!’ मंडळीचा नियतकालिकांचा अत्याधिक साठा सप्ताहांती कमी झाला होता.”

११ दुसऱ्‍या एका मंडळीत सेवा करत असता ह्‍याच प्रवासी पर्यवेक्षकांना समजले की, एके दिवशी सकाळी अनेक प्रचारक रस्त्यावरील साक्षकार्यात सहभागी झाले होते; परंतु, त्यांना त्यात विशेष यश मिळाले नाही. इतर सर्व लोक कामावर जाण्याच्या घाईत असल्यामुळे सबंध साक्षकार्याच्या वेळेदरम्यान एक बहीण केवळ दोनच व्यक्‍तींसोबत बोलू शकली. प्रवासी पर्यवेक्षकांनी सर्वांना पुन्हा त्याच रस्त्यावर सकाळच्या वेळी पण थोडे उशिरा जाण्याचे सुचवले. त्यांनी तसेच केले आणि दुपारपर्यंत त्यांनी कार्य केले. ज्या भगिनीने आधी केवळ दोघांबरोबरच संभाषण केले होते तिने मात्र पुन्हा जाऊन खूपच उत्तम कार्य केले. तिने ३१ नियतकालिकांचे व १५ महितीपत्रकांचे वाटप केले, सात जणांची नावे व त्यांचे पत्ते प्राप्त केले व दोन गृह बायबल अभ्यास सुरू केले! गटातील इतरांनीही असेच परिणाम अनुभवले.

१२ आस्था दाखवणारी एखादी व्यक्‍ती भेटल्यास तिचे नाव, पत्ता किंवा तिचा दूरध्वनी क्रमांक प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. ही माहिती थेट विचारण्याऐवजी तुम्ही असे म्हणू शकता: “मला आपल्यामध्ये झालेले हे संभाषण खूप आवडले. ते दुसऱ्‍या एखाद्या वेळीही चालू ठेवण्याचा काही मार्ग आहे का?” किंवा विचारा: “मला तुमच्या घरी तुम्हाला भेट देता येईल असा काही मार्ग आहे का?” ज्यांच्याशी अशा प्रकारे संपर्क साधले जातात ते पुनर्भेटीसाठी राजी होतात. उपयोगात आणण्याकरता हस्तपत्रिकांचा भरपूर साठा असल्याची खात्री करा आणि जे आस्था दाखवतात त्यांना सभांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्याकरता सभेचे सर्वात निकटचे स्थान आणि सभांच्या वेळा, कदाचित एखाद्या हस्तपत्रिकेवर त्वरित लिहिण्यासाठी तयार असा.

१३ दुसऱ्‍या एका मंडळीला नेमून दिलेल्या क्षेत्रातील एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीशी तुम्ही बोलला असल्यास ही माहिती तुम्ही त्या मंडळीस पाठवावी जेणेकडून तेथील बांधव त्या आस्थेचा मागोवा घेऊ शकतील. तुमच्या क्षेत्रात सुवार्तेचा प्रसार करण्याकरता रस्त्यावरील साक्षकार्य प्रभावकारी ठरू शकेल का? असल्यास, जुलै १९९४ ची आमची राज्य सेवा यातील “रस्त्यावरील परिणामकारक साक्षकार्याद्वारे आस्थेवाईकांचा शोध घेणे” ह्‍या लेखाची उजळणी करा. मग, दिवसातील एखाद्या उचित समयी जेव्हा शक्य तितक्या अधिक लोकांना आपल्याला भेटता येईल त्यावेळी रस्त्यावरील साक्षकार्य करण्याची योजना आखा.

१४ सार्वजनिक वाहनात साक्षकार्य करणे: एके दिवशी सकाळी अनेक पायनियरांनी, एका स्थानिक कॉलेजजवळ बससाठी उभ्या असलेल्या लोकांना साक्ष देण्याचे ठरवले. त्यांना काही सुखद संवाद राखता आले परंतु एक समस्या होती. चर्चा रंगात आल्यानंतर बस आल्यामुळे मात्र या चर्चेत आकस्मिक खंड पडत असे. पायनियर बसमध्ये चढत व नगरातून प्रवास करत असता उतारुंना साक्ष देत अशाप्रकारे त्यांनी या समस्येचे निरसन केले. प्रवासमार्गाच्या शेवटी परतणाऱ्‍या बसने पायनियर प्रवास करत असत व माघारी येत असताही साक्ष देत असत. येऊन जाऊन अशा अनेक फेऱ्‍या करून त्यांनी आपल्या प्रयत्नांचा एकूण हिशेब केला: २०० पेक्षा अधिक नियतकालिकांचे वाटप करण्यात आले होते व सहा बायबल अभ्यास सुरू करण्यात आले होते. काही उतारुंनी, त्यांची घरी भेट घेतली जावी याकरता स्वेच्छेने आपले पत्ते व दूरध्वनी क्रमांक दिले. दुसऱ्‍या आठवडी पायनियर त्या बस थांब्याकडे परतले व तीच पद्धत त्यांनी अनुसरली. त्यांनी १६४ नियतकालिकांचे वाटप करून आणखी एक बायबल अभ्यास सुरू केला. एका थांब्यावर तर एक उतारु बसमध्ये चढला व उपलब्ध असलेल्या एकमात्र सीटवर—पायनियरच्या शेजारीच बसला. त्याने त्या बांधवाकडे पाहिले व स्मित करून म्हटले: “मला माहीत आहे तुमच्याजवळ माझ्याकरता एक टेहळणी बुरूज आहे.”

१५ बस अथवा ट्रेनने प्रवास करत असता अनेक पायनियर प्रभावशाली साक्ष देतात. तुमच्या शेजारी बसलेल्या एखाद्या उतारुसोबत तुम्ही संभाषण कसे सुरू करू शकता? एक १२ वर्षीय प्रचारक बसमध्ये आपल्या शेजारीच बसलेल्या एका किशोरवयीन मुलीची उत्सुकता जागृत करण्याच्या आशेने सहज, सावध राहा! याची एक प्रत वाचू लागला. हे परिणामकारक ठरले. तो काय वाचत आहे हे त्या मुलीने त्याला विचारले असता त्याने उत्तर दिले की तो, तरुण लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यांवरील उपायाबद्दल वाचत आहे. त्याने पुढे असेही म्हटले की त्या लेखापासून त्याला स्वतःला पुष्कळ फायदा झाला आहे आणि ते तिचीही मदत करू शकेल. तिने आनंदाने नियतकालिकांचा स्वीकार केला. त्यांचे संभाषण दुसऱ्‍या दोन युवकांनी ऐकले व त्यांनीही नियतकालिकांच्या प्रती प्राप्त केल्या. यावर बस चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली व ही नियतकालिके इतकी आस्थेची का होती हे विचारले. ते समजल्यावर त्याने देखील त्यांच्या प्रती स्वीकारल्या. साहजिकच, आस्था प्रदर्शित केलेल्या सर्वांना देण्याकरता त्या तरुण प्रचारकाजवळ नियतकालिकांचा भरपूर पुरवठा नसता तर हे सर्व शक्यच झाले नसते!

१६ उद्यानांत आणि वाहन तळांवर साक्ष देणे: उद्यानांत व वाहन तळांवर साक्ष देणे हा लोकांप्रत पोहंचण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. शॉपिंग सेंटरच्या वाहन तळावर साक्षकार्य करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? नेहमी, आपल्या परिसराचे प्रथम क्षणभर अवलोकन करा. घाईत नसलेली, पार्क केलेल्या कारमध्ये बसलेली अथवा स्कुटरशेजारी उभी असलेली एखादी व्यक्‍ती पाहा आणि एक स्नेहपूर्ण संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करा. संभाषण पुढे चालू राहिल्यास त्यात राज्याचा संदेश समाविष्ट करा. वेगवेगळे राहून कार्य करा परंतु, जवळपास एक प्रचारक असल्याची देखील खात्री करा. एखादी भलीमोठी अवजड बॅग घेऊन जाणे अथवा इतर कोणत्याही मार्गांनी आपल्या कार्याकडे लक्ष वेधण्याचे टाळा. सुज्ञ असा. एका वाहन तळावर केवळ थोडाच वेळ घालवून त्यानंतर दुसऱ्‍या ठिकाणी जाणे उत्तम असेल. जर कोणी तुमचे ऐकू इच्छित नाही तर सभ्यपणे तेथून निघा व दुसऱ्‍या कोणाची भेट घेण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीचा अवलंब करून, एका बांधवाने वाहन तळावर एका महिन्यात ९० नियतकालिकांचे वाटप केले.

१७ काही लोक विश्रांतीकरता एखाद्या उद्यानात जातात; इतर तेथे एखादा खेळ खेळण्याकरता जात असतात किंवा आपल्या मुलांसह वेळ घालवण्याकरता जात असतात. त्यांच्या कार्यहालचालींमध्ये अविचारीपणे हस्तक्षेप करण्याऐवजी साक्ष देण्याची संधी पाहा. एका बांधवाने उद्यानाच्या एका माळ्याशी संभाषण सुरू केले आणि मादक पदार्थ व आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल तो चिंतातुर असल्याचे त्याला आढळून आले. एक गृह बायबल अभ्यास सुरू करण्यात आला व उद्यानात त्याच्याशी नियमितपणे संपर्क साधण्यात आला.

१८ खरेदीच्या क्षेत्रांत अनौपचारिक साक्षकार्य: अशा कार्यांवर निर्बंध असल्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकाना-दुकानात औपचारिकपणे प्रचार करणे नेहमीच शक्य नसल्यामुळे काही प्रचारक अनौपचारिकपणे तेथे साक्ष देण्याकरता संधी शोधत असतात. ते एखाद्या बाकावर बसतात आणि विश्रांती घेण्याकरता तेथे थांबणाऱ्‍याबरोबर संभाषण सुरू करतात. आस्था दाखवल्यास ते अतिदक्षतेने हस्तपत्रिका किंवा एखादे नियतकालिक सादर करण्याचा प्रयत्न करून पुनर्भेटीची व्यवस्था करतात. खरेदीच्या क्षेत्रांत एके ठिकाणी काही मिनिटे साक्षकार्य केल्यानंतर ते दुसऱ्‍या ठिकाणी जातात व दुसऱ्‍या एखाद्याशी संभाषण सुरू करतात. अर्थात, अशाप्रकारे अनौपचारिकरित्या साक्षकार्य करत असता अवाजवीपणे लोकांचे लक्ष आकर्षित न करण्याची काळजी घेण्यास हवी.

१९ एखाद्या व्यक्‍तीला अभिवादन करतेवेळी स्नेहपूर्ण संभाषण सुरू करा. तुमचे ऐकणाऱ्‍याने प्रतिसाद दिल्यास प्रश्‍न विचारा, मग तो स्वतःस अभिव्यक्‍त करत असता त्याचे लक्षपूर्वक ऐका. तो जे काही सांगत आहे त्यात व्यक्‍तिगत आस्था घ्या. तुम्ही त्याच्या अभिप्रायाची कदर करता हे दाखवून द्या. शक्य तेथे त्याच्याशी सहमत व्हा.

२० एका भगिनीने एका वयोवृद्ध स्त्रीबरोबर, राहणी खर्च किती वाढला आहे ह्‍याचा उल्लेख करून एक सुखकारक संवाद साधला. त्या स्त्रीने त्वरित सहमती दर्शवली आणि याचा परिणाम एका उत्साहपूर्ण संभाषणात झाला. त्या भगिनीला त्या स्त्रीचे नाव आणि तिचा पत्ता प्राप्त करता आला व त्याच सप्ताहात तिची पुनर्भेट घेण्यात आली.

२१ दुकाना-दुकानात कार्य करणे: अनेक मंडळ्यांकडे, आपल्या नियुक्‍त क्षेत्राचा भाग म्हणून व्यापारी क्षेत्रेही असतात. क्षेत्राचे नियोजन करणारा बांधव अगदी दाट असलेल्या व्यापारी आणि खरेदी क्षेत्रांकरता खास नकाशा कार्ड तयार करील. अशा क्षेत्रांना व्यापणाऱ्‍या कोणत्याही निवासी नकाशा कार्डाने हे स्पष्टपणे सूचित करावे की हे व्यापारी विभाग आपल्या क्षेत्राचा भाग म्हणून उरकले जाऊ नयेत. इतर क्षेत्रांमध्ये व्यापारी क्षेत्रे ही निवासी इमारतींसह उरकली जाऊ शकतात. दुकाना-दुकानातले कार्य वगळले जाऊ नये म्हणून व्यापारी क्षेत्रे उरकण्याकरता वडील, कार्यक्षम प्रचारकांना निमंत्रित करतील.

२२ तुम्हाला या कार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिल्यास, आणि तुम्ही हे पूर्वी कधीही केले नसेल तर प्रथम काही लहान दुकानांत बोलणे हा ‘धैर्य एकवटण्याचा’ एक उत्तम मार्ग आहे; मग तुम्हाला अधिक आत्मविश्‍वास वाटल्यास मोठ्या दुकानांतून बोला. (१ थेस्सलनी. २:२) राज्य सभागृहातील सभांना उपस्थित राहण्याकरता तुम्ही जो पेहराव करता तसाच दुकाना-दुकानातले साक्षकार्य करत असताही करा. शक्यतो, ग्राहक सेवा प्राप्त करावयास थांबलेले नसतात अशावेळी दुकानात जा. व्यवस्थापक अथवा तेथील कारभार पाहणाऱ्‍या व्यक्‍तीबरोबर बोलण्याची इच्छा व्यक्‍त करा. स्नेहपूर्ण असा आणि त्याहून अधिक म्हणजे संक्षिप्त असा. क्षमा मागण्याची गरज नाही. अनेक व्यापार, ग्राहकाभिमूख असतात आणि व्यत्ययांची त्यांनी अपेक्षा केलेली असते.

२३ दुकानदाराला अभिवादन केल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “व्यापार करणारे लोक इतके व्यग्र असतात की आम्ही क्वचितच त्यांना घरी भेटू शकतो, त्यामुळे एक विचार-प्रवर्तक असा लेख तुम्हाला देण्याकरता आम्ही या व्यापारी क्षेत्रात तुमची भेट घेत आहोत.” मग सादर केलेल्या नियतकालिकांबद्दल एखाद दोन विवेचने मांडा.

२४ किंवा एखाद्या व्यवस्थापकाची भेट घेत असता तुम्ही हे उपयोगात आणू शकता: “आम्ही हे पाहिले आहे की व्यापार करणारे लोक अद्ययावत माहिती प्राप्त करण्याला अधिक महत्त्व देत असतात. टेहळणी बुरूज (किंवा सावध राहा!) याचा अलीकडील अंक असा एक लेख प्रस्तुत करतो जो आपणा सर्वांवर वैयक्‍तिकपणे प्रभाव पाडत असतो.” ते कोणते आहे सांगा आणि “तुम्हाला ते वाचण्यास आवडेल अशी आमची खात्री आहे” असे म्हणून समारोप करा.

२५ तेथे कर्मचारी असल्यास आणि उचित असल्यास तुम्ही पुढे म्हणू शकता: “हीच संक्षिप्त प्रस्तुती मी तुमच्या कर्मचाऱ्‍यांना दिल्यास तुमची काही हरकत आहे का?” अनुमती दिल्यास, लक्षात ठेवा संक्षिप्त असण्यास तुम्ही वचनभाक केली आहे आणि तुम्ही त्या वचनाचे पक्के असाल अशी अपेक्षा व्यवस्थापक तुमच्याकडून करील. अधिक चर्चा करण्याची कर्मचाऱ्‍यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे सर्वोत्तम असेल.

२६ अलीकडेच, दुकाना-दुकानातले साक्षकार्य करण्यात एका लहानशा नगरातील काही प्रचारक विभागीय पर्यवेक्षकांसोबत सहभागी झाले. असे कार्य पूर्वी कधीही न केल्यामुळे काही प्रचारक सुरवातीला साशंक होते; परंतु, लवकरच यातून मुक्‍त होऊन ते त्याचा आनंद घेऊ लागले. एका तासाच्या आत ते ३७ लोकांशी बोलले आणि २४ नियतकालिके व ४ माहितीपत्रकांचे वाटप त्यांनी केले. एका बांधवाने निरीक्षिले की, दुकाना-दुकानातले कार्य करत असता ते त्या अल्पावधीत जितक्या लोकांशी संपर्क साधू शकले तितक्या लोकांशी ते एका महिन्यात घरोघरच्या कार्यात सहसा संपर्क साधू शकणार नाहीत.

२७ प्रचार करण्याच्या संधी निर्माण करणे: येशूने आपले साक्षकार्य औपचारिक कार्यापर्यंतच मर्यादित ठेवले नाही. त्याने हरएक उचित प्रसंगी सुवार्तेचा प्रचार केला. (मत्त. ९:९; लूक १९:१-१०; योहा. ४:६-१५) प्रचार करण्याच्या काही संधी काही प्रचारक कशा निर्माण करत असतात याकडे लक्ष द्या.

२८ पालक आपल्या मुलांकरता शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असतात तेव्हा त्यांना साक्ष देण्याचा काही जणांनी सराव करून घेतला आहे. अनेक पालक जवळजवळ २० मिनिटे लवकर तेथे येत असल्यामुळे एका शास्त्रवचनीय विषयावरील उद्दीपित संभाषणात त्यांना गोवून घेणे शक्य होते.

२९ आपल्या नियतकालिकांत चर्चिलेल्या एखाद्या विशिष्ट विषयात ज्यांना खास आस्था असेल अशा लोकांप्रत पोहंचण्याची अनेक पायनियर जाणीव राखून आहेत. उदाहरणार्थ, डिसेंबर २२, १९९५ चे सावध राहा! (इंग्रजी) यात आलेल्या “शाळा अरिष्टांत आहेत” या श्रुंखलांचा उपयोग करून आपल्या मंडळीच्या क्षेत्रांतील सहा शाळांना भेटी दिल्याने एका भगिनीला उत्तम प्रतिसाद मिळाले. तिने कौटुंबिक जीवन आणि मुलांना देण्यात येणारी गैरवागणूक यावरील नियतकालिकांचा उपयोग करून आरोग्य केंद्रांना देखील भेटी दिल्या आणि अशाच प्रकारचे विषय हाताळणारे पुढील अंक घेऊन परतण्याचे एक स्थायी निमंत्रण तिला देण्यात आले. बेकारी यावरील एप्रिल-जून १९९६ चे सावध राहा! यासंबंधी सेवायोजन कार्यालयात तिला जो प्रतिसाद मिळाला तो “रोमहर्षक” होता असे याचे वर्णन केले गेले.

३० एक प्रांतीय पर्यवेक्षक असा अहवाल देतात, की आपल्या किराणा मालाची खरेदी करत असता ते आणि त्यांची पत्नी नियमितपणे अनौपचारिक साक्ष देत असतात. ते दिवसातील अशा एका वेळी खरेदी करतात जेव्हा दुकानांत अधिक गर्दी नसते आणि ग्राहकही अगदी निवांत चालत असतात. अनेक उत्तम संभाषणांचे ते अहवाल देतात.

३१ अनेक प्रचारकांना, चित्रपट गृहे, चिकित्सालये किंवा रुग्णालयांच्या बाहेर अथवा आसपास साक्षकार्य केल्याने उत्तम परिणाम लाभले आहेत. रुग्णालय व चिकित्सालयाबाबत स्वागत कक्षात ते केवळ हस्तपत्रिका किंवा जुनी नियतकालिके देऊन जात नाहीत. लोकांप्रत सुवार्ता पोहंचवणे हे त्यांचे ध्येय असल्यामुळे उचित असेल तेथे, अर्थात जे लोक व्यग्र नाहीत अथवा संभाषण करण्यास इच्छुक असतील त्यांच्याशी वैयक्‍तिकपणे बोलण्याचा ते प्रयत्न करतात.

३२ काही वसतीस्थानांत प्रचारक, रेल्वे स्थानकाजवळ किंवा बस थांब्याजवळ असलेल्या लोकांसोबत बोलत असतात. अशा क्षेत्रांत अनावश्‍यक प्रवेश करण्यास किंवा दीर्घकाल थांबण्यास कायदा निर्बंधित करतो शिवाय, प्लॅटफॉर्मवर नियतकालिके सादर करणे बेकायदेशीर असू शकते यामुळे स्थानकाबाहेर, कदाचित ट्रेन आल्यावर कोणाचीतरी प्रतिक्षा करत थांबलेले लोक जे पुष्कळसे स्वस्थ व निश्‍चिंत असतात अशा लोकांची प्रचारक व्यवहारचातुर्याने भेट घेत असतात.

३३ तुमच्या मंडळीच्या क्षेत्रांतील अतिसुरक्षा इमारतींत अथवा वसाहतींत राहणाऱ्‍या भाडेकरुंना वैयक्‍तिकपणे साक्ष देण्याची अनुमती नसल्यास, काहींनी कामावर असणाऱ्‍या सुरक्षा रक्षकांस अथवा वसाहतीच्या व्यवस्थापकास व्यवहारचातुर्याने साक्ष देण्याचा सराव करून घेतला आहे. हीच पद्धत खासगी किंवा सुरक्षित कंपनी निवासी क्षेत्रांत देखील, जेथे सुरक्षा द्वारांमुळे सामान्य जनतेचा प्रवेश निर्बंधित असतो तेथे अनुसरली जाते. एका विभागीय पर्यवेक्षकाने व काही प्रचारकांनी अशा प्रकारे सात कॉम्प्लेक्सला भेटी दिल्या. प्रत्येक प्रसंगी त्यांनी व्यवस्थापकाला सांगितले, की आपल्या नेहमीच्या मार्गाने लोकांच्या भेटी घेण्याची त्यांना अनुमती नसली तरी या अलीकडील नियतकालिकांतील माहिती त्याने चुकवू नये अशी त्यांची इच्छा आहे. या सात कॉम्प्लेक्सच्या सर्व व्यवस्थापकांनी आनंदाने नियतकालिके स्वीकारली आणि पुढील अंक देखील मागवले! या कॉम्प्लेक्सच्या रहिवाश्‍यांशी नंतर पत्राद्वारे अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जातो.

३४ सर्वांना प्रचार करण्याचा यत्न करा: आपल्या समर्पणाला जागणे यात, राज्याचा प्रचार करण्याच्या आपल्या नेमणुकीची निकड जाणून घेणे समाविष्ट आहे. या देशात आपल्याला अनेक लोक घरी भेटत असले तरी त्यांना सोयीस्कर असेल अशा वेळी अधिकतर लोकांची भेट घेण्याकरता आपल्या व्यक्‍तिगत आवडीनिवडी बाजूला सारण्याची गरज आहे ज्यामुळे आपल्याला ‘सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधता येईल.’ प्रेषित पौलाने म्हटले त्याप्रमाणेच यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांचीही, असे म्हणण्याची इच्छा असावी: “मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.”—१ करिंथ. ९:२२, २३.

३५ पौलाने पुढे लिहिले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्‍तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. . . . कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथ. १२:९, १०) दुसऱ्‍या शब्दांत बोलायचे तर, आपणापैकी कोणीही स्वतःच्या बळावर हे कार्य साध्य केले नसते. आपल्याला यहोवाच्या सामर्थ्यवान पवित्र आत्म्याकरता त्याच्याकडे प्रार्थना करण्याची गरज आहे. आपण सामर्थ्याकरता यहोवाकडे प्रार्थना केल्यास तो आपल्या प्रार्थनांची जरूर उत्तरे देईल याबद्दल आपण विश्‍वस्त असू शकतो. मग, लोकांप्रति असणारे आपले प्रेम, ते जेथे कोठे भेटतील तेथे त्यांना सुवार्तेचा प्रचार करण्याच्या संधी शोधण्याची आपल्याला प्रेरणा देईल. येत्या सप्ताहात, या पुरवणीत दिलेल्या एखाद्या सूचनेचा अवलंब करण्याचा प्रयत्न का करू नये?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा