वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w23 मे पृ. ८-१३
  • यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्याला वाटतं त्या मार्गाने कदाचित यहोवा उत्तर देणार नाही
  • आज यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो?
  • यहोवा प्रार्थनेचं उत्तर कसं देतो हे ओळखण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी विश्‍वास लागतो
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
w23 मे पृ. ८-१३

अभ्यास लेख २१

यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?

‘आपण जे मागितलं ते आपल्याला मिळेल हे आपल्याला माहीत आहे, कारण आपण त्याच्याजवळ ते मागितलं आहे.’​—१ योहा. ५:१५.

गीत ४१ यहोवा माझी प्रार्थना ऐक

सारांशa

१-२. प्रार्थनांच्या बाबतीत काही वेळा आपल्याला काय वाटू शकतं?

‘मला माझ्या प्रार्थनेचं उत्तरच मिळत नाही,’ असं कधी तुम्हाला वाटलंय का? तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. बऱ्‍याच भाऊबहिणींना असं वाटतं खासकरून कठीण परिस्थितींचा सामना करत असताना. तुम्हीसुद्धा एखाद्या समस्येतून जात असाल, तर यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देत आहे हे ओळखणं कदाचित तुम्हाला कठीण जात असेल.

२ यहोवा आपल्या उपासकांच्या प्रार्थनांचं उत्तर देतो, असं आपण खातरीने का म्हणू शकतो, ते आता आपण पाहू या. (१ योहा. ५:१५) यासोबतच आपण या प्रश्‍नांची उत्तरंही पाहू या: यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देत नाही असं काही वेळा आपल्याला का वाटू शकतं? आणि आज यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो?

आपल्याला वाटतं त्या मार्गाने कदाचित यहोवा उत्तर देणार नाही

३. आपण यहोवाला प्रार्थना करावी असं त्याला का वाटतं?

३ बायबलमधून आपल्याला अशी खातरी मिळते, की यहोवाचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे आणि आपण त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहोत. (हाग्ग. २:७; १ योहा. ४:१०) आणि त्यामुळेच आपण प्रार्थनेत यहोवाकडे मदत मागावी असा आर्जव तो आपल्याला करतो. (१ पेत्र ५:६, ७) आपल्याला त्याच्या जवळ जाता यावं आणि कठीण परिस्थितींचा यशस्वीपणे सामना करता यावा म्हणून तो आपल्याला मदत करायला नेहमी तयार आहे.

दावीद वीणा वाजवत असताना आपल्या दिशेने येणारा भाला चुकवत आहे.

यहोवाने शत्रूंपासून दावीदला वाचवून त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं (परिच्छेद ४ पाहा)

४. यहोवा आपल्या उपासकांच्या प्रार्थनांचं उत्तर देतो असं आपण का म्हणू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

४ यहोवाने आपल्या उपासकांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं याची कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये आहेत. तुम्हाला कोणाचं उदाहरण आठवतं? कदाचित तुम्हाला दावीद राजाचं उदाहरण आठवत असेल. त्याच्या आयुष्यात असे बरेच शत्रू होते, जे त्याच्या जिवावर उठले होते. आणि त्या वेळी बऱ्‍याचदा त्याने यहोवाकडे मदत मागितली. उदाहरणार्थ, एकदा त्याने यहोवाला अशी विनंती केली, की “हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे. तुझ्या विश्‍वासूपणामुळे आणि नीतिमत्त्वामुळे मला उत्तर दे.” (स्तो. १४३:१) यहोवाने शत्रूंच्या हातून त्याला वाचवलं आणि त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. (१ शमु. १९:१०, १८-२०; २ शमु. ५:१७-२५) म्हणूनच दावीद खातरीने म्हणू शकला: “यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे.” आपणही हीच खातरी बाळगू शकतो.​—स्तो. १४५:१८.

प्रेषित पौल यहोवाला विनंती करत आहे.

यहोवाने पौलला त्याच्या समस्यांचा धीराने सामना करायची ताकद देऊन त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं (परिच्छेद ५ पाहा)

५. प्राचीन काळातल्या यहोवाच्या उपासकांना त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर, त्यांनी नेहमीच अपेक्षा केली होती त्या मार्गाने मिळालं का? उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)

५ आपल्याला वाटतं त्याच मार्गाने कदाचित यहोवा उत्तर देणार नाही. प्रेषित पौलनेसुद्धा हीच गोष्ट अनुभवली. त्याच्या ‘शरीरातला काटा’ काढून टाकावा अशी त्याने देवाला विनंती केली. आपल्या या समस्येबद्दल त्याने तीन वेळा यहोवाला प्रार्थना केली. मग यहोवाने त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं का? हो, पण त्याने अपेक्षा केली होती त्या मार्गाने नाही. कारण, यहोवाने ती समस्या काढून टाकली नाही, तर त्याला विश्‍वासूपणे सेवा करत राहायची ताकद दिली.​—२ करिंथ. १२:७-१०.

६. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देत नाही असं काही वेळा आपल्याला का वाटू शकतं?

६ आपल्या बाबतीतही असंच होऊ शकतं. आपण अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने आपल्याला आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळू शकतं. पण एका गोष्टीची आपण खातरी बाळगू शकतो, ती म्हणजे आपल्याला योग्य ती मदत कशी पुरवायची हे यहोवाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. तो तर “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.” (इफिस. ३:२०) आणि त्यामुळे आपण अपेक्षाही केली नव्हती त्या वेळी किंवा त्या मार्गाने आपल्याला आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळू शकतं.

७. काही वेळा आपल्याला आपल्या प्रार्थनेत बदल करायची गरज का पडू शकते? उदाहरण द्या.

७ यहोवाची इच्छा काय आहे याबद्दल जेव्हा आपल्याला स्पष्टपणे समजतं, तेव्हा आपण आधी ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतो, त्यात बदल करायची आपल्याला गरज पडू शकते. ब्रदर मार्टिन पोएट्‌जिंगर यांचाच विचार करा. त्यांचं लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांना नात्झी छळ छावणीत टाकण्यात आलं. आपल्या पत्नीची काळजी घेता यावी आणि पुन्हा प्रचार करता यावा म्हणून आपली सुटका करावी अशी त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. पण दोन आठवड्यांपर्यंत प्रार्थना करूनसुद्धा आपल्या सुटकेचं काहीच चिन्ह त्यांना दिसत नव्हतं. मग ते अशी प्रार्थना करू लागले, “हे यहोवा तुझी काय इच्छा आहे, हे मला कळू दे.” त्यानंतर छावणीत असलेले भाऊ कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचा ते विचार करू लागले. त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या बायका-मुलांची काळजी वाटत होती. त्या वेळी यहोवाची काय इच्छा आहे, हे त्यांना कळलं आणि त्यांनी अशी प्रार्थना केली, की “यहोवा या नवीन जबाबदारीबद्दल तुझे मनापासून आभार. माझ्या या बांधवांना प्रोत्साहन आणि धीर देण्यासाठी मला मदत कर.” मग पुढची नऊ वर्षं ब्रदर पोएट्‌जिंगर छळ छावण्यांमध्ये हेच काम करत राहिले!

८. प्रार्थना करताना आपण कोणती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

८ आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की यहोवाचा एक उद्देश आहे आणि त्याने ठरवलेल्या वेळी तो आपला उद्देश नक्की पूर्ण करेल. आणि त्याच्या या उद्देशामध्ये मानवजातीला ज्या समस्यांमुळे खूप दुःख सहन करावं लागलं आहे, त्या कायमच्या आणि पूर्णपणे काढून टाकणं सामील आहे. जसं की, नैसर्गिक विपत्ती, आजारपण आणि मृत्यू. यहोवा त्याच्या राज्याद्वारे हा उद्देश पूर्ण करेल. (दानी. २:४४; प्रकटी. २१:३, ४) पण तोपर्यंत यहोवाने सैतानाला या जगावर राज्य करायची परवानगी दिली आहे.b (योहा. १२:३१; प्रकटी. १२:९) यहोवाने जर मानवजातीच्या समस्या आत्ताच सोडवल्या तर असं वाटेल, की सैतान काही प्रमाणात जगावर राज्य करण्यात यशस्वी होत आहे. यहोवाची अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत असली, तरी याचा असा अर्थ होत नाही, की यहोवा आपल्याला काहीच मदत करत नाही. तर चला यहोवा आपल्याला कोणत्या काही मार्गांनी मदत करतो, ते आता आपण पाहू या.

आज यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो?

९. जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करू शकतो? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

९ तो आपल्याला बुद्धी देतो.  यहोवा आपल्याला वचन देतो, की तो योग्य निर्णय घ्यायला आपल्याला बुद्धी देईल. खासकरून असे निर्णय ज्यांचा आपल्या पुढच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. जसं की, लग्न करायचं की नाही हा निर्णय. (याको. १:५) मरीयाc नावाच्या एका अविवाहित बहिणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. ती पायनियर म्हणून आनंदाने सेवा करत होती, तेव्हा तिची ओळख एका ब्रदरशी झाली. याबद्दल ती म्हणते: “जसजशी आमची मैत्री वाढत गेली, तसतसं आम्ही एकमेकांना आवडू लागलो. आता निर्णय घ्यावा लागेल हे मला माहीत होतं. याबद्दल मी यहोवाला कळकळीने खूप प्रार्थना केली. मला यहोवाचं मार्गदर्शन हवं होतं. पण तो माझ्यासाठी निर्णय घेणार नाही तर निर्णय मलाच घ्यावा लागेल, हे मला माहीत होतं.” तिला जाणवलं, की तिने बुद्धीसाठी केलेल्या प्रार्थनांचं यहोवाने उत्तर दिलं. कसं? आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करत असताना तिला असे काही लेख सापडले, ज्यात तिला तिच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळत गेली. तसंच यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या तिच्या आईचा सल्लाही तिने घेतला. त्या सल्ल्यामुळे मरीयाला तिच्या भावना नीट समजून घ्यायला मदत झाली. आणि शेवटी ती एक योग्य निर्णय घेऊ शकली.

शरणार्थ्यांसाठी असलेल्या एका छावणीत एक भाऊ बायबल वाचत आहे.

समस्यांचा धीराने सामना करायला यहोवा आपल्याला कशी ताकद देतो? (परिच्छेद १० पाहा)

१०. फिलिप्पैकर ४:१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा त्याच्या उपासकांना मदत करण्यासाठी काय करेल? एक उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)

१० तो धीराने सहन करायला सामर्थ्य देतो.  यहोवाने प्रेषित पौलला धीराने समस्यांचा सामना करायची ताकद दिली, तशीच तो आपल्यालाही मदत करतो. (फिलिप्पैकर ४:१३ वाचा.) बेन्जामीन नावाच्या एका बांधवाला यहोवाने कठीण परिस्थितीचा धीराने सामना करायला कशी मदत केली याचा विचार करा. तो आणि त्याचं कुटुंब बरीच वर्षं आफ्रिकेमध्ये शरणार्थींसाठी असलेल्या छावण्यांमध्ये राहत होतं. त्या बांधवाचं जवळजवळ अख्खं तरुणपण त्या छावण्यांमध्ये गेलं होतं. तो म्हणतो: “मी यहोवाला नेहमी प्रार्थना करायचो आणि त्याला आवडेल अशाच गोष्टी करण्याची ताकद त्याने मला द्यावी अशी विनंती त्याला करायचो. आणि माझ्या या प्रार्थनेचं यहोवाने उत्तर दिलं. त्याने मला मनाची शांती दिली, प्रचार करायचं धैर्य दिलं आणि त्याच्यासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी प्रकाशनं पुरवली.” तो पुढे म्हणतो: “भाऊबहिणींचे अनुभव वाचल्यामुळे आणि यहोवाने त्यांना धीराने समस्यांचा सामना करायला कशी मदत केली, हे समजल्यामुळे माझाही विश्‍वासू राहण्याचा निर्धार आणखी पक्का झाला.”

तुम्ही भाऊबहिणींकडून यहोवाची मदत कशी अनुभवली आहे? (परिच्छेद ११-१२ पाहा)d

११-१२. यहोवा आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करून आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

११ तो भाऊबहिणींचा उपयोग करून आपल्याला मदत करतो.  आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने खूप मनापासून यहोवाला प्रार्थना केली. देवाची निंदा करण्याचा खोटा आरोप त्याच्यावर लागू नये आणि त्यासाठी त्याला दोषी ठरवलं जाऊ नये, अशी कळकळून विनंती त्याने यहोवाकडे केली. पण यहोवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर वेगळ्या प्रकारे दिलं. त्याने स्वर्गातल्या त्याच्या भावांपैकी एकाला म्हणजे एका स्वर्गदूताला त्याला धीर देण्यासाठी पाठवलं. (लूक २२:४२, ४३) आजसुद्धा यहोवा आपल्या भाऊबहिणींचा उपयोग करून आपल्याला मदत करतो. आपल्याला धीर देण्यासाठी ते एखादा फोन करतील किंवा आपल्याला येऊन भेटतील. आपण सगळेच, आपल्या भाऊबहिणींना ‘दिलासा देणाऱ्‍या शब्दांनी’ धीर कसा देता येईल याची संधी शोधू शकतो.​—नीति. १२:२५.

१२ मिरियम नावाच्या एका बहिणीचं उदाहरण घ्या. तिच्या पतीचा मृत्यू होऊन काही आठवडेच झाले होते. त्यामुळे ती खूप निराश आणि दुःखी होती. आणि तिला घरात खूप एकटं-एकटं वाटत होतं. पतीच्या आठवणीने ती सतत रडत होती आणि तिला कोणाशीतरी बोलावसं वाटत होतं. ती म्हणते: “कोणाला फोन करावा एवढीसुद्धा ताकद माझ्यात उरली नव्हती. त्यामुळे मी यहोवाला प्रार्थना केली. मी अजून रडत होते आणि प्रार्थना करतच होते इतक्यात माझा फोन वाजला. तो मंडळीतल्या एका वडिलांचा कॉल होता.” त्या प्रेमळ वडिलांशी आणि त्यांच्या पत्नीशी बोलल्यामुळे मिरियमला खूप धीर आणि सांत्वन मिळालं. तिला खातरी पटली, की यहोवानेच त्या भावाला फोन करायला प्रवृत्त केलं.

डॉक्टर एका जोडप्याला कागदावर प्रींट केलेली माहिती दाखवत आहे.

आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा इतरांना कशी प्रेरणा देऊ शकतो? (परिच्छेद १३-१४ पाहा)

१३. आपल्या लोकांची मदत करायला यहोवा त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांचा उपयोग कसा करू शकतो याचं एक उदाहरण द्या.

१३ मदत करण्यासाठी यहोवा त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांचाही उपयोग करू शकतो.  (नीति. २१:१) यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी काही वेळा त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांचाही उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, नहेम्याने अर्तहशश्‍त राजाकडे जाऊन यरुशलेमला जायची आणि ते शहर पुन्हा बांधायची विनंती केली, तेव्हा यहोवाने ती विनंती मान्य करायला राजाला प्रवृत्त केलं. (नहे. २:३-६) आजसुद्धा यहोवा आपल्या लोकांची मदत करण्यासाठी त्याची उपासना न करणाऱ्‍या लोकांना प्रवृत्त करू शकतो.

१४. सू हिंगच्या अनुभवातली कोणती गोष्ट तुम्हाला खासकरून प्रोत्साहन देणारी वाटली? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ यहोवाने एका डॉक्टरद्वारे आपल्याला कशी मदत केली, हे सू हिंग नावाच्या एका बहिणीला जाणवलं. तिच्या मुलाला मानसिक आरोग्याच्या बऱ्‍याच समस्या आहेत. त्याच्यासोबत एक भयंकर अपघात झाला तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी तिला आणि तिच्या पतीला आपलं काम सोडावं लागलं. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर आर्थिक समस्या आल्या. आपली बहीण म्हणते, की हे सगळं आता तिच्या सहनशक्‍तीच्या पलीकडे आहे, असं तिला वाटत होतं. तिने यहोवाकडे मन मोकळं केलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. ज्या डॉक्टरांकडे ते उपचार घेत होते, ते या कुटुंबाची मदत करायला तयार झाले. यामुळे त्यांना सरकारकडून मदत मिळाली आणि राहण्यासाठी परवडेल अशी जागासुद्धा मिळाली. यानंतर सू हिंग म्हणते: “हे सगळं यहोवानेच घडवून आणलं होतं, हे आम्हाला जाणवलं. तो खरंच ‘प्रार्थना ऐकणारा देव’ आहे.”​—स्तो. ६५:२.

यहोवा प्रार्थनेचं उत्तर कसं देतो हे ओळखण्यासाठी आणि ते स्वीकारण्यासाठी विश्‍वास लागतो

१५. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देत आहे हे समजायला एका बहिणीला कशामुळे मदत झाली?

१५ आपल्या प्रार्थनांचं उत्तर नेहमीच आश्‍चर्यकारक रीतीने मिळेल असं नाही. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर ज्या प्रकारे देतो त्यामुळे त्याला विश्‍वासू राहायला आपल्याला मदत होते. म्हणून तो कशा प्रकारे आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो याकडे नेहमी लक्ष असू द्या. योको नावाच्या एका बहिणीला वाटत होतं, की यहोवा तिच्या प्रार्थनांचं उत्तरच देत नाही. पण मग तिने आपण यहोवाकडे कोणत्या गोष्टी मागतो, हे एका वहीत लिहायला सुरू केलं. काही काळ गेल्यानंतर तिने आपल्या वहीत लिहिलेल्या गोष्टी पाहिल्या आणि तिच्या लक्षात आलं, की यहोवाने तिच्या बऱ्‍याचशा प्रार्थनांचं उत्तर दिलं होतं. अशा गोष्टींचंसुद्धा ज्या ती विसरून गेली होती. आपणसुद्धा वेळोवेळी थोडं थांबू शकतो आणि यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देत आहे, यावर विचार करू शकतो.​—स्तो. ६६:१९, २०.

१६. प्रार्थनेच्या बाबतीत आपण विश्‍वास असल्याचं कसं दाखवू शकतो? (इब्री लोकांना ११:६)

१६ आपण फक्‍त प्रार्थना करूनच नाही, तर यहोवा ज्या कोणत्या पद्धतीने त्या प्रार्थनांचं उत्तर देतो, ते स्वीकारूनसुद्धा त्यावर विश्‍वास असल्याचं दाखवत असतो. (इब्री लोकांना ११:६ वाचा.) माईक आणि त्याची पत्नी क्रिसी यांच्या उदाहरणाचाच विचार करा. त्यांचं बेथेलमध्ये सेवा करायचं ध्येय होतं. माईक म्हणतो: “आम्ही बरीच वर्षं बेथेलचा फॉर्म भरत राहिलो आणि आमच्या ध्येयाबद्दल वारंवार यहोवाला प्रार्थना करत राहिलो. पण आम्हाला कधीच बेथेलला बोलवण्यात आलं नाही.” पण सेवेत आपला सगळ्यात चांगला वापर कुठे करून घेता येईल, हे यहोवाला माहीत आहे या गोष्टींवर त्यांचा पूर्ण भरवसा होता. त्यामुळे ते गरज असलेल्या ठिकाणी पायनियर म्हणून सेवा करत राहिले आणि बांधकाम प्रकल्पात मदत करत राहिले. आणि आता ते प्रवासी कार्यात आहेत. माईक म्हणतो: “यहोवाने नेहमीच आम्हाला वाटलं होतं, त्याप्रमाणे आमच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नाही. पण आम्हाला प्रार्थनांचं उत्तर मिळालं नाही असं कधीच झालं नाही. उलट, आम्ही कल्पनाही केली नाही, इतक्या चांगल्या मार्गाने त्याने उत्तर दिलं.”

१७-१८. स्तोत्र ८६:६, ७ प्रमाणे आपण कोणत्या गोष्टीची खातरी ठेवू शकतो?

१७ स्तोत्र ८६:६, ७ वाचा. दावीदला पूर्ण भरवसा होता, की यहोवाने त्याच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि त्यांचं उत्तरही दिलं आहे. तुम्हीसुद्धा असाच भरवसा ठेवू शकता. या लेखात आपण जी उदाहरणं पाहिलीत, त्यावरून आपण खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला परीक्षांचा धीराने सामना करण्यासाठी बुद्धी आणि ताकद देईल. तो आपल्या भाऊबहिणींचा किंवा जे सध्या त्याची उपासना करत नाहीत त्यांचा उपयोग करूनही आपल्याला मदत करू शकतो.

१८ आपल्याला वाटलं होतं, त्या मार्गाने जरी यहोवाने आपल्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नाही तरी तो त्या प्रार्थनांचं उत्तर नक्की देईल, हे आपल्याला माहीत आहे. तो अगदी योग्य वेळी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी पुरवेल. यामुळे प्रार्थना करत राहा आणि हा भरवसा ठेवा, की यहोवा आत्तासुद्धा तुमची काळजी घेईल आणि येणाऱ्‍या नवीन जगातही ‘प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करेल.’​—स्तो. १४५:१६.

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपल्याला वाटलं होतं त्या प्रकारे कदाचित यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर का देणार नाही?

  • यहोवा कशा प्रकारे आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल याची काही उदाहरणं द्या.

  • यहोवाकडून प्रार्थनेच्या उत्तराची वाट बघत असताना आपण विश्‍वास कसा दाखवू शकतो?

गीत ४६ यहोवा, तुझे आभार मानतो

a आपण जर यहोवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली, तर यहोवा आपल्याला अशी खातरी देतो, की तो तिचं नक्की उत्तर देईल. कठीण परीक्षांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला विश्‍वासू राहायला मदत करेल असा आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. तो आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो, ते या लेखात आपण पाहू या.

b यहोवाने सैतानाला या जगावर राज्य करायची परवानगी का दिली आहे हे जाणून घेण्यासाठी, जून २०१७ च्या टेहळणी बुरूज अंकातला, “महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा” हा लेख पाहा.

c काही नावं बदलण्यात आली आहेत.

d चित्राचं वर्णन: एक आई आणि तिची मुलगी शरणार्थी म्हणून एका देशात आले आहेत. तिथले भाऊबहीण त्यांचं आनंदाने स्वागत करत आहेत आणि त्यांना मदत करत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा