तरुण लोक विचारतात. . . .
माझ्या जिवलग स्नेह्याने स्थलांतर का केले?
‘जिवलग मित्र सोडून गेल्यासारखा तुझा चेहरा का पडलाय?’ एखादी व्यक्ती थोडीफार उदास अथवा उद्विग्न दिसल्यास लोक अशा प्रकारचे वक्तव्य करतील. परंतु, तुमचा जिवलग स्नेही खरोखर तुम्हाला सोडून गेला असलाच तर मग हे वक्तव्य संपूर्णतः एक नवीनच अर्थ घेते.
शेवटी, एक खरी मैत्री खास तथा बहुमोल असे काहीतरी असते. बायबल म्हणते: “खरा मित्र नेहमीच एकनिष्ठ असतो; आणि गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठीच भावाचा जन्म असतो.” (नीतिसूत्रे १७:१७, सुबोध भाषांतर) उत्तम स्नेही आपल्याला संगती देतात व पाठबळ पुरवतात. भावनिक व आध्यात्मिकरित्या वृद्धिंगत होण्यास ते आपली मदत करतात. नावापुरते स्नेही व तोंड ओळख असणारे पुष्कळ असले तरी विश्वासार्ह तसेच ज्यांच्याजवळ आपले मन मोकळे केले जाऊ शकते असे लोक बहुधा नगण्य असतात.
तर मग, तुमच्या जिवलग स्नेह्याने स्थलांतर केले असल्यास तुम्हाला उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटेल हे समजण्याजोगे आहे. आपल्या जिवलग स्नेह्याने स्थलांतर केल्यावर ब्रायन नामक एका तरुणाला कसे वाटले याबद्दल तो आठवून सांगतो: “मी असुरक्षित, एकाकी आणि व्यथित झालो होतो.” कदाचित, तुमचीही गत अशीच असेल.
वास्तविकतेला तोंड देणे
आपल्या स्नेह्याने स्थलांतर का केले असावे त्या कारणांवर विचार करणे मदतगार ठरू शकेल. तुमच्या मैत्रीप्रती कृतज्ञतेचा अभाव हे नक्कीच त्याचे कारण नव्हते. स्थलांतरण हा आधुनिक जीवनाचा एक रूढीबद्ध भाग होऊन बसला आहे. एकट्या संयुक्त संस्थांनात दर वर्षी ३.६ कोटीपेक्षा अधिक लोक स्थलांतर करतात! अमेरिकेच्या जनगणना विभागानुसार अमेरिकेचा सर्वसाधारण रहिवासी आपल्या सबंध जीवितकालात १२ वेळा स्थलांतर करतो.
या स्थलांतरणाचे कारण काय असावे बरे? याची कारणे विविध असू शकतात. अनेक कुटुंबे उत्तम नोकरी अथवा निवासस्थाने प्राप्त करण्याच्या उद्देशाने स्थलांतर करतात. विकसनशील राष्ट्रांत, युद्ध आणि दारिद्र्य यांनी करोडो कुटुंबांना स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे. युवक प्रौढतेप्रत पोहंचतात तेव्हा स्थलांतर करण्यास व स्वावलंबी जीवन जगण्याची ते निवड करतात. काही जण विवाहानिमित्त घर सोडतात. (उत्पत्ति २:२४) आणि आणखी इतरजण, आध्यात्मिक आस्थांचा पाठपुरावा करण्याकरता स्थलांतर करतात. (मत्तय १९:२९) यहोवाच्या साक्षीदारांमधील पुष्कळ जण, ख्रिस्ती सेवकांची आत्यंतिक गरज असणाऱ्या क्षेत्रांत—कदाचित विलायती क्षेत्रांतही—सेवा करण्याकरता, परिचित परिसराच्या सुखांची आहुती देतात. काही तर बेथेलमध्ये अर्थात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची देखरेख करण्याची जी सुविधा आहे तेथे सेवा करण्याकरता आपापल्या मायदेशांतर्गत स्थलांतर करतात. होय, आपण आपल्या स्नेह्यांवर प्रीती करत असलो तरी जीवनातील एक सत्य म्हणून आपण ही बाब स्वीकारलीच पाहिजे, की जसजसा काळ उलटतो तसतसे ते बहुधा स्थलांतर करतील.
तुमच्या स्नेह्याच्या स्थलांतरणाचे कारण काही असो पण तो तुम्हाला सोडून गेल्याच्या दुःखातून तुम्ही स्वतःला कसे सावरू शकाल असा एक विचार तुमच्या मनात घर करून राहील. काही काळापर्यंत थोडेफार एकाकी व उद्विग्न वाटणे हे स्वाभाविक असले तरी तुम्हाला कदाचित याची जाणीव होईल, की फटकून राहून मन विषण्ण केल्याने परिस्थितींत काही एक बदल घडून येणार नाही. (नीतिसूत्रे १८:१) तर मग, आपल्याला मदत करू शकतील अशा काही गोष्टींवर आपण नजर टाकू या.
संपर्क राखा
तरुण ब्रायन असा सल्ला देतो, “याची जाणीव राखा, की तुमच्या मैत्रीवर पाणी पडलेले नाही.” होय, तुमच्या जिवलग स्नेह्याच्या स्थलांतरणामुळे तुमच्या नातेसंबंधात नक्कीच बदल घडून येईल पण याचा अर्थ, तुमच्या मैत्रीत एक कायमस्वरूपी खंड पडावा असा नाही. किशोरवयीनांची सल्लागार, डॉ. रोझमेरी व्हाईट यांनी अशाप्रकारे प्रतिपादन केले: “विलग होणे ही जीवनातील कोणत्याही वळणावरील अत्यंत कठीण गोष्ट आहे, पण त्यास शेवट नव्हे तर केवळ एक बदल म्हणून त्याकडे पाहिलं तर त्याला यशस्वीपणे तोंड देता येऊ शकते.”
मैत्रीचे प्रवेशद्वार सतत उघडे ठेवण्याकरता तुम्ही काय करू शकता? बायबलमधील दावीद आणि योनाथान यांचा वृत्तान्त विचारात घ्या. त्यांच्या वयोमानांत जमीन आस्मानाचा फरक असताही ते सर्वात अंतरंग स्नेही राहिले. जेव्हा परिस्थितीने दावीदास हद्दपार होण्यास भाग पाडले तेव्हा विलग होण्यापूर्वी एकमेकांना निरोप देण्याचे विस्मरण त्यांना झाले नाही. उलटपक्षी, त्यांनी आपल्या अक्षय मैत्रीची खात्री केली येथपर्यंत, की निरंतर स्नेही राहण्याचा त्यांनी आपसात करार केला अथवा तशी आणभाकही केली.—१ शमुवेल २०:४२.
त्याचप्रकारे, तुमचा मित्र अथवा मैत्रीण निघून जाण्यापूर्वी तुम्ही देखील त्यांच्याशी बोलू शकता. तुम्हाला ही मैत्री किती बहुमोल वाटते व दळणवळणाचा मार्ग खुला ठेवण्याची तुमची किती उत्कट इच्छा आहे हे त्यांना समजू द्या. अत्यंत जिवलग स्नेही असलेल्या पॅटी आणि मलीना ज्या सध्या एकमेकींपासून ८००० किलोमीटर दूर आहेत त्यांनी अगदी हेच केले. पॅटीने स्पष्टीकरण दिले: “आम्ही संपर्क राखण्याचे ठरवतो.” तुम्ही काही निश्चित व्यवस्था केली नाही तर अशा योजना निष्फळ ठरण्याची शक्यता असते.—पडताळा आमोस ३:३.
बायबल आपल्याला सांगते, की प्रेषित योहानाला आपला स्नेही गायस याला प्रत्यक्ष भेटणे अशक्य झाले तेव्हा ‘शाई व लेखणीने लिहून’ त्याने त्याच्याशी संपर्क राखला. (३ योहान १३) कदाचित आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून एकदा, तुम्ही देखील एकमेकांना एखादे पत्र अथवा एखादे कार्ड नियमितपणे पाठवण्याचे ठरवाल. तसेच, दीर्घपल्याच्या टेलिफोन बिलांसंबंधी तुमच्या पालकांची काही हरकत नसल्यास, वेळोवेळी या मार्गाने एकमेकांशी संपर्क साधून एकमेकांची विचारपूस करू शकता. अथवा, कॅसेटमध्ये किंवा व्हिडियो टेपमध्ये संग्रहित केलेले संदेश एकदुसऱ्याला पाठवण्याचे कदाचित तुम्ही ठरवाल. भावी काळात, एखादा सप्ताहांत अथवा एखादी सुटी एकत्र घालवण्याचा बेत करणेही शक्य असेल. अशाप्रकारे, ही मैत्री फुलत राहील.
पोकळी भरून काढणे
असे असले तरी, एखाद्या जिवलग स्नेह्याच्या निघून जाण्यामुळे तुमच्या जीवनात एक पोकळी निर्माण होणे साहजिक आहे. परिणामी, तुमच्या हाताशी अतिरिक्त वेळ असल्याचे तुम्हाला दिसून येईल. असे असल्यास, तो वेळ वाया घालवू नका. (इफिसकर ५:१६) काहीतरी फलदायी करण्यास त्याचा उपयोग करा—कदाचित तुम्ही एखादे संगीत वाद्य वाजवण्यास शिकू शकता, एखाद्या नवीन भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता अथवा एखाद्या छंद जोपासू शकता. गरजू लोकांसाठी लहानसहान कामे करणे हा देखील वेळेचा सदुपयोग करण्याचा आणखीन एक मार्ग आहे. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असल्यास जाहीर प्रचार कार्यातील आपला सहभाग तुम्ही अधिक वाढवू शकता. (मत्तय २४:१४) अथवा, एखादा मनोवेधक बायबल अभ्यासाचा प्रकल्प तुम्ही सुरू करू शकता.
शिवाय, प्रेषित पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना, “आपली अंतःकरणे विशाल” करण्याचा—अर्थात आपल्या स्नेह्यांच्या वर्तुळात इतरांनाही सामावून घेण्याचा सल्ला दिला. (२ करिंथकर ६:१३) कदाचित, तुम्ही एकाच स्नेह्याबरोबर इतका वेळ घालवला असेल, की इतर संभाव्य स्नेह्यांकडे तुम्ही डोळेझाक केली असेल. यहोवाच्या साक्षीदारांमधील युवकांना हे दिसून येते, की स्नेही जोडण्याच्या पुष्कळ संधी स्थानिक मंडळीतच उपलब्ध असतात. यास्तव, मंडळीच्या सभांना थोडे आधी जाण्याचा आणि सभा संपल्यावरही काही वेळ तेथे थांबण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने लोकांना जाणून घेण्यास तुमच्या हाताशी भरपूर वेळ असेल. ख्रिस्ती अधिवेशने व लहान सोशल गॅदरिंग नवनवीन स्नेही जोडण्याच्या इतर संधी पुरवतात.
तथापि, सावधगिरीचा एक इशारा उचित आहे: स्नेही जोडण्यास इतके देखील अधीर होऊ नका, की तुमच्या आध्यात्मिक ध्येयांचे व मूल्यांचे वाटेकरी नसणाऱ्या युवकांशी तुम्ही निकटचा सहवास राखू लागाल. असे जण तुमच्यावर प्रतिकूल प्रभाव पाडतील व तुमचे भले करण्याऐवजी वाईटच करतील. (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) आपल्या सदाचरणासाठी नाव मिळवलेल्या आध्यात्मिक मनोवृत्तीच्या युवकांशीच जडून राहा.
अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात आल्यास, एकजुटीने काही गोष्टी करण्याद्वारे तुमची मैत्री अधिक वृद्धिंगत करा. सोबत भोजन करा. एखाद्या संग्रहालयाला भेट द्या. एखादा फेरफटका मारायला जा. एखाद्या दिवशी ख्रिस्ती सेवेत एकत्र कार्य करून देव राज्याची सुवार्ता लोकांप्रत नेण्याची योजना आखा. वेळ आणि त्याच्या जोडीला प्रयत्न असल्यास नवीन मैत्री बहरत राहील. ख्रिस्ती प्रीती ही विस्तृत असल्यामुळे—ती “विशाल” होते आणि इतरांना त्यात सामावून घेते—तुम्ही नवे स्नेही जोडता तेव्हा स्थलांतर केलेल्या आपल्या आधीच्या स्नेह्यांप्रती तुम्ही बेइमानी करत असल्याचे वाटून घेऊ नका.
तुम्ही ज्यांच्यावर सर्वाधिक प्रीती करता—तुमचे पालक, यांच्या अधिक सान्निध्यात येण्याच्या संधीचा फायदाही तुम्ही घेऊ शकता. त्यांचा सहवास साधणे सुरवातीला तुम्हाला विचित्र वाटेल तरीसुद्धा ते तुमच्याकरता एक मोठी मदत ठरू शकतात. जॉश नामक एका युवकाने असे वक्तव्य केले: “मी त्यावेळी माझ्या आईबाबांच्या इतक्या निकट नसल्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला खास प्रयत्न करावे लागत होते. पण, आता मात्र ते माझे जीवश्चकंठश्च स्नेही बनले आहेत!”
लक्षात असू द्या, अद्यापही स्वर्गात तुमचा एक स्नेही आहे. १३ वर्षीय डॅनने कथित केले त्याप्रमाणे, “तुम्ही खरोखरच एकटे नाहीत कारण यहोवा अद्यापही तुमच्या निकट आहे.” प्रार्थनेमार्फत आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर केव्हाही संपर्क राखणे शक्य आहे. तुम्ही त्याच्यावर भाव ठेवल्यास या कठीण परिस्थितीला तोंड देण्यास तो तुमच्या पाठीशी असेल.—स्तोत्र ५५:२२.
एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
सुज्ञ राजा शलमोनाने सल्ला दिला: “‘सांप्रतच्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?’ असे म्हणू नको.” (उपदेशक ७:१०) दुसऱ्या शब्दांत, इतिहासजमा झालेल्या गोष्टींचा विचार करू नका; सर्व संधींसह उपलब्ध असलेल्या विद्यमान काळाचा फायदा घ्या. सध्या आपल्या विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिलने आपला जिवलग स्नेही निघून गेल्यावर हेच केले. तो आठवून सांगतो: “काही कालावधीनंतर मी नवनवीन स्नेही जोडू लागलो व इतिहासजमा झालेल्या गोष्टींवर चितैकाग्र करण्याचे मी टाळले. मी भविष्यासाठी स्वतःला सुसज्ज करण्यास व वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करू लागलो.”
ह्या सूचना कदाचित साहाय्य करू शकतील, तरीदेखील एखाद्या जिवलग स्नेह्याने स्थलांतरण केले असल्यास दुःख तर होतेच. तुम्ही एकत्र मिळून घालवलेल्या चांगल्या प्रसंगांचे विस्मरण होण्यास निश्चितच अधिक वेळ लागेल. लक्षात ठेवा, परिवर्तन जीवनाचा एक अविभाज्य भाग असून प्रौढ तथा वृद्धिंगत होण्याची एक संधी पुरवते. एका खास स्नेह्याची जागा दुसऱ्या एकाने पूर्णतः भरून काढणे कदाचित शक्य नसले तरी असे गुण तुम्ही विकसित करू शकता ज्यामुळे ‘यहोवा व मानव तुमच्यावर प्रसन्न होतील.’ (१ शमुवेल २:२६) तुम्ही तसे केल्यास, स्नेही म्हणण्याजोगा कोणीतरी तुमच्याजवळ नेहमीच असेल!
[२१ पानांवरील चित्र]
आपल्या जिवलग स्नेह्यास निरोप देणे हा खरोखर एक दुःखद अनुभव असतो