तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करून पाहिले आहे काय?
१ आपणा सर्वांना आपल्या कामात फलदायी असल्यावर आनंद होतो. दुसऱ्या बाजूला पाहता, आपल्याला सकारात्मक परिणाम न दिसल्यास कार्य नीरस आणि पूर्ण न करण्याजोगे वाटू शकते. अर्थपूर्ण श्रम व्यक्तिगतरित्या प्रतिफलदायी असते, आणि ते एक आशीर्वादच आहे. (पडताळा उपदेशक ३:१०-१३.) आपण हेच तत्त्व आपल्या प्रचार कार्याला लागू करू शकतो. आपल्याला अनुभवानिशी ठाऊक आहे, की आपण दारोदारी जातो व लोकांशी बायबलविषयी बोलतो तेव्हा आध्यात्मिकरित्या ताजेतवाने होऊन घरी परततो. खरोखरच काही साध्य केल्याचे आपल्याला जाणवते.
२ काही भागांमध्ये, दिवसाच्या विशिष्ट समयी लोकांचे घरी भेटणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. अहवाल असे दाखवतात, की काही ठिकाणी आपण सकाळच्या वेळी भेटी देतो तेव्हा ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक घरी नसतात. अनेक मंडळ्यांनी सायंकाळच्या साक्षकार्यासाठी योजना करून ही समस्या सोडवली आहे व त्यांना अतिशय चांगले यश प्राप्त झाले आहे. प्रचारक असा अहवाल देतात, की संध्याकाळच्या वेळी भेटी देत असताना जास्त लोक घरात असतात, व सामान्यपणे लोक अधिक मोकळे व राज्याच्या संदेशाकडे कान देण्यास अधिक इच्छुक असतात. तुमच्या क्षेत्रात तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करून पाहिले आहे का?—पडताळा मार्क १:३२-३४.
३ वडील सायंकाळचे साक्षकार्य आयोजित करतात: काही भागांमध्ये, दुपार टळल्यावर अथवा तिन्हीसांजेच्या वेळी क्षेत्र सेवेच्या सभांना चांगला पाठिंबा देण्यात आला आहे. दुपारी शाळेतून सुटणाऱ्या युवा प्रचारकांचा व जवळजवळ सायंकाळच्याच वेळी प्रापंचिक कामावरून सुटी मिळणाऱ्या प्रौढांचा विचार केला जाऊ शकतो. जे प्रचारक सप्ताहांती क्षेत्र सेवेत जाऊ शकत नाहीत त्यांना सप्ताहादरम्यान सायंकाळचे साक्षकार्य करणे हा प्रचार कार्यात नियमितपणे भाग घेण्याचा व्यावहारिक मार्ग असल्याचे आढळते.
४ तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करत असताना विविध कार्यहालचालींमध्ये भाग घेऊ शकता. तुम्ही नियतकालिके घेऊन घरोघरी प्रचार करू शकता अथवा त्या महिन्याची साहित्य सादरता वापरू शकता. प्रचारकांनी सकाळच्या वेळी किंवा सप्ताहांती भेट दिली असताना जे लोक घरी नव्हते अशांना भेटी देण्याकरता सायंकाळची वेळ ही उत्तम आहे. मार्ग साक्षकार्यासाठी सुद्धा फलदायी क्षेत्र असेल, ज्यामुळे कामावरून घरी येणाऱ्या लोकांना तुम्ही भेटू शकता. आस्था प्रदर्शित केलेल्यांना पुनर्भेटी देण्याकरता सायंकाळची वेळ सर्वोत्तम आहे असे अनेकांना आढळते.
५ सावध व सुज्ञ असा: काही भागांमध्ये अंधार पडत असताना किंवा अंधार पडल्यावर जाणे धोक्याचे असू शकते. चांगली प्रकाश व्यवस्था असलेल्या रस्त्यांवरून जोडी-जोडीने किंवा गटाने जाणे व तुम्ही सुरक्षित असाल अशी खात्री असलेल्या घरांना व निवास इमारतींनाच भेटी देणे सुज्ञतेचे असेल. दार वाजवल्यावर, तुम्ही दिसू शकाल अशा ठिकाणी उभे राहा व स्पष्टपणे स्वतःची ओळख करून द्या. सुज्ञ असा. तुम्ही अयोग्य वेळी, जसे की, कुटुंब जेवत असताना भेट दिली आहे असे पाहिल्यास, पुन्हा येऊन भेट द्याल असे सांगा. सामान्यपणे, उशिरा म्हणजेच घरमालक रात्री झोपी जाण्याची तयारी करत असतात तेव्हा भेट देण्याऐवजी तुमचे साक्षकार्य केवळ संध्याकाळी करणे उत्तम आहे.
६ उन्हाळ्यातील दीर्घ संध्या विशेषतः सायंकाळच्या साक्षकार्यासाठी उचित आहेत. आपण देवाची ‘अहोरात्र पवित्र सेवा करत असताना’ यहोवा आपले परिश्रम निश्चितच आशीर्वादित करील.—प्रकटी. ७:१५.