तुम्ही तुमच्या वेळापत्रकात फेरफार करू शकता का?
१. प्रचार करण्यासाठी आपण आपल्या वेळापत्रकात फेरफार का केला पाहिजे?
१ खरे ख्रिस्ती या नात्याने आपण “माणसे धरणारे” होण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. (मत्त. ४:१९) मासे धरणारा कोळी जसा, ठराविक वेळी मासे धरण्यासाठी गेल्यामुळे त्याच्या हाती भरपूर मासे लागतात तसेच आपणही लोक घरी असतात त्यावेळेला जर प्रचारासाठी गेलो तर माणसे धरण्याच्या कामात आपल्यालाही उत्तम परिणाम मिळतील. अनेक देशांत येणाऱ्या महिन्यांत दिवस मोठा असल्यामुळे अधिक वेळ उजेड असेल. ऊन उतरल्यावर व संध्याकाळी पुष्कळ लोक घरी असतात. सहसा ते निश्चिंत असतात आणि घरी आलेल्या पाहुण्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत असतात. अशावेळी प्रचार करण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकात फेरफार करू शकता का?—१ करिंथ. ९:२३.
२. अधिकाधिक लोकांपर्यंत सुवार्ता नेण्याचे आणखी कोणते मार्ग आहेत?
२ संध्याकाळचे साक्षकार्य: संध्याकाळी प्रचारासाठी जाण्याची आधीच योजना केल्यास आपल्याला अधिक लोकांना सुवार्ता सांगता येईल. (नीति. २१:५) मुले शाळेनंतर प्रचार करू शकतात. इतर जण कामानंतर करू शकतात. काही पुस्तक अभ्यास गट साप्ताहिक पुस्तक अभ्यासाच्या आधी एक तास प्रचार करण्याची योजना करू शकतात.
३. ऊन उतरल्यावर व संध्याकाळी कोणकोणत्या मार्गांनी तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रचारकार्य करू शकता?
३ ऊन उतरल्यावर व संध्याकाळी घरोघरी प्रचारकार्य केल्यास, आपण सहसा जे घरी सापडत नाहीत अशा लोकांबरोबर बोलू शकतो. अनेक क्षेत्रांत संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरील साक्षकार्य किंवा इतर प्रकारचे सार्वजनिक साक्षकार्य देखील केले जाऊ शकते. संध्याकाळची वेळ पुनःभेटी व बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे असे पुष्कळांच्या पाहण्यात आले आहे.
४. संध्याकाळचे साक्षकार्य करताना विवेकबुद्धीने व विचारीपणे वागणे महत्त्वाचे का आहे?
४ विवेकबुद्धीची आवश्यकता: संध्याकाळचे साक्षकार्य करताना विवेकबुद्धीची गरज आहे. घरमालक रात्री झोपायची तयारी करत असतात अशा वेळापेक्षा अंधार पडण्याआधीच्या काही तासांमध्ये प्रचार कार्य करणे उत्तम आहे. (फिलिप्पै. ४:५) तुम्ही दार वाजवता तेव्हा, तुम्ही घरमालकाला दिसाल असे उभे राहा आणि स्वतःची स्पष्ट ओळख द्या. तुमच्या भेटीचा उद्देश काय आहे हे पटकन सांगा. तुम्ही कदाचित योग्य वेळी गेला नसाल म्हणजे घरातील सर्वजण जेवायला बसले असतील. अशा वेळी, तुम्ही दुसऱ्या वेळेला याल असे सांगा. नेहमी इतरांचा विचार करा.—मत्त. ७:१२.
५. प्रचार कार्य करताना आपण संभाव्य धोके कसे टाळू शकतो?
५ संभाव्य धोकेदायक परिस्थितींविषयी देखील तुम्ही जागृत असले पाहिजे. अंधार पडू लागतो किंवा अंधार पडल्यावर तुम्ही साक्षकार्य करत असाल तर जोडी-जोडीने किंवा गटात जाणे इष्ट ठरेल. दिवे असलेल्या रस्त्यांवरच राहा, कारण दिवे असलेल्या रस्त्यांवर लोकांची रहदारी असते. तुम्हाला जिथे सुरक्षित वाटते तेथेच प्रचार कार्य करा. अंधार पडल्यावर सुरक्षित नसलेल्या क्षेत्रात जाणे टाळा.—नीति. २२:३.
६. ऊन उतरल्यावर व अंधार पडायच्याआधी साक्षकार्य केल्यामुळे आपल्याला आणखी कोणते फायदे मिळू शकतात?
६ ऊन उतरल्यावर व अंधार पडायच्याआधी आपण साहाय्यक व सामान्य पायनियरांबरोबर साक्षकार्य करू शकतो. (रोम १:१२) सेवेच्या या पैलूमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकात फेरफार करू शकता का?