तरुण बांधवांनो, जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येऊ शकता का?
१. तरुण बांधवांनी, १ तीमथ्य ३:१ मध्ये देण्यात आलेल्या सल्ल्याचे पालन कधीपासून केले पाहिजे?
१ “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो.” (१ तीम. ३:१) हे शब्द, बांधवांना मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे येण्याचे प्रोत्साहन देतात. पण त्यासाठी तुम्हाला वयाने मोठे असण्याची गरज आहे का? खरेतर, तरुण असतानाच या दिशेने प्रयत्न करणे चांगले आहे. कारण त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण मिळेल आणि पुढे सेवा सेवक म्हणून नियुक्त होण्यास तुम्ही पात्र आहात हे दाखवू शकाल. (१ तीम. ३:१०) तुम्ही जर बाप्तिस्माप्राप्त तरुण बांधव असाल तर मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे कसे येऊ शकता?
२. तुम्ही स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी विकसित करू शकता व ती कशी दाखवू शकता?
२ स्वार्थत्याग: हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही मंडळीत एखादी पदवी मिळवण्यासाठी नव्हे तर चांगल्या कामासाठी पुढे येत आहात. म्हणून, बंधुभगिनींना मदत करण्याची मनस्वी इच्छा विकसित करा. त्यासाठी येशूच्या सर्वोत्तम उदाहरणावर मनन करा. (मत्त. २०:२८; योहा. ४:६, ७; १३:४, ५) इतरांबद्दल तुम्हाला आस्था वाटावी म्हणून यहोवाला प्रार्थना करा. (१ करिंथ. १०:२४) मंडळीतील वयोवृद्ध व आजारी लोकांना तुम्ही व्यावहारिक रीत्या मदत करू शकता का? राज्य सभागृहात साफसफाईची आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी तुम्ही पुढे येता का? ईश्वरशासित सेवा प्रशालेत आयत्यावेळी भाषण देण्यासाठी तुम्ही तयार असू शकता का? इतरांची सेवा करण्यात स्वतःला झोकून दिल्यास तुम्ही खरा आनंद अनुभवाल.—प्रे. कृत्ये २०:३५.
३. आध्यात्मिकता महत्त्वाची का आहे, आणि तुम्ही ती कशी वाढवू शकता?
३ आध्यात्मिकता: मंडळीतील एखाद्या सेवकात विशिष्ट कलागुण किंवा कौशल्य असणे यापेक्षा तो आध्यात्मिक असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. एक आध्यात्मिक व्यक्ती नेहमी यहोवा आणि येशू यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करते. (१ करिंथ. २:१५, १६) ती आत्म्याचे फळ विकसित करते. (गलती. ५:२२, २३) ती एक आवेशी सुवार्तिक असते आणि राज्यासंबंधित गोष्टींना नेहमी प्रथम स्थान देते. (मत्त. ६:३३) आध्यात्मिक गुण वाढवण्यासाठी स्वतःला वैयक्तिक अभ्यासाची चांगली सवय लावणे महत्त्वाचे आहे. यात दररोज बायबलचे वाचन करणे आणि टेहळणी बुरूज व अवेक! या नियतकालिकांच्या प्रत्येक अंकाचे वाचन करणे समाविष्ट आहे. यासोबतच, मंडळीच्या सभांची तयारी करणे आणि त्यांस उपस्थित राहणेही महत्त्वाचे आहे. (स्तो. १:१, २; इब्री १०:२४, २५) तरुण तीमथ्याला आध्यात्मिक प्रगती करत राहण्याचे उत्तेजन देताना पौलाने लिहिले: “आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.” (१ तीम. ४:१५, १६) तेव्हा, ईश्वरशासित सेवा प्रशालेत मिळालेल्या भाषणांची मनापासून तयारी करा. नियमितपणे क्षेत्र सेवेला जा आणि त्यासाठी चांगली तयारी करा. तुमच्या पुढे काही आध्यात्मिक ध्येये ठेवा आणि ती गाठण्याचा प्रयत्न करा. पायनियर सेवा करणे, बेथेल सेवा करणे किंवा अविवाहित बांधवांकरता असलेल्या बायबल प्रशालेला उपस्थित राहणे यांसारखी ध्येये तुम्ही ठेवू शकता. आध्यात्मिकता तुम्हाला “तरुणपणाच्या वासनांपासून दूर” पळण्यास मदत करेल. —२ तीम. २:२२.
४. भरवशालायक व विश्वासू असणे महत्त्वाचे का आहे?
४ भरवशालायक व विश्वासू: पहिल्या शतकातील काही बांधवांवर जेवणाचे वाटप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे बांधव “पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण” असे होते. ते विश्वासू व भरवशालायक होते. म्हणून त्यांच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण होईल की नाही याची प्रेषितांना मुळीच काळजी नव्हती आणि यामुळे प्रेषितांना आपले लक्ष महत्त्वपूर्ण बाबींकडे लावणे शक्य झाले. (प्रे. कृत्ये ६:१-४) पहिल्या शतकातील त्या बांधवांप्रमाणेच, तुम्हाला जेव्हा मंडळीत काही जबाबदाऱ्या देण्यात येतात तेव्हा त्या मनापासून पूर्ण करा. या बाबतीत नोहाचे अनुकरण करा. तारू बांधण्यासंबंधी देवाने त्याला ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या त्याने तंतोतंत पाळल्या. (उत्प. ६:२२) तुमचा विश्वासूपणा यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहे व त्यावरून तुम्ही आध्यात्मिक रीत्या प्रौढ आहात हे दिसून येते.—१ करिंथ. ४:२; “प्रशिक्षणाचे फायदे” ही चौकट पाहा.
५. तरुण बांधवांनी जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे का आले पाहिजे?
५ भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे आज यहोवा लोकांना एकत्रित करण्याचे काम मोठ्या वेगाने करत आहे. (यश. ६०:२२) दरवर्षी सरासरी दोन लाख पन्नास हजार लोक बाप्तिस्मा घेतात. सत्यात येणाऱ्या या नवीन लोकांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्याकरता मंडळीत आध्यात्मिक रीत्या प्रौढ बांधवांची गरज आहे. यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त करण्याची हीच वेळ आहे. (१ करिंथ. १५:५८) तेव्हा, तरुण बांधवांनो मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात का? असल्यास, तुम्ही नक्कीच चांगल्या कामाची आकांक्षा बाळगणारे आहात.
[५ पानांवरील चित्र]
सत्यात येणाऱ्या नवीन लोकांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्याकरता मंडळीत आध्यात्मिक रीत्या प्रौढ बांधवांची गरज आहे
[६ पानांवरील चित्र]
प्रशिक्षणाचे फायदे
मंडळीतील वडील जेव्हा तरुण बांधवांना जबाबदारी देऊन प्रशिक्षण देतात तेव्हा त्या बांधवांना याचा खूप फायदा होतो. याचे एक उदाहरण विचारात घ्या. एक विभागीय पर्यवेक्षक एका प्रचारकाला सभेनंतर स्टेजवर बसून उत्तेजन देत होते. त्याच वेळी त्यांनी पाहिले की एक मुलगा त्यांच्याजवळ उभा आहे. त्यांना वाटले की तो त्यांच्याशीच बोलण्यासाठी थांबला आहे. पण त्या मुलाने त्यांना सांगितले की सभेनंतर स्टेजची साफसफाई करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले आहे आणि म्हणून तो थांबला आहे. खरेतर, त्याचे आईवडील घरी जायला निघाले होते, पण दिलेले काम पूर्ण केल्याशिवाय त्याला घरी जायचे नव्हते. हे ऐकल्यावर विभागीय पर्यवेक्षक स्टेजवरून उतरले. त्यांनी असे म्हटले: “त्या मंडळीतले वडील तरुण बांधवांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन चांगलं प्रशिक्षण द्यायचे. त्यामुळे मी जेव्हा-जेव्हा त्या मंडळीला भेट द्यायचो तेव्हा-तेव्हा ते निदान एकातरी तरुण बांधवाची सेवा सेवक म्हणून शिफारस करायचे.”