वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 मार्च पृ. २६-३१
  • यहोवाचा हात कधीच तोकडा नसतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा हात कधीच तोकडा नसतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोशे आणि इस्राएली लोकांकडून शिका
  • पैशांची चणचण भासते तेव्हा
  • म्हातारपणासाठी पैशांची सोय करताना
  • विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 मार्च पृ. २६-३१

अभ्यास लेख १३

गीत ४ “यहोवा माझा मेंढपाळ”

यहोवाचा हात कधीच तोकडा नसतो

“यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?”—गण. ११:२३.

या लेखात:

यहोवा नेहमी आपल्या गरजा पुरवेल हा भरवसा आणखी कसा वाढवता येईल ते पाहा.

१. इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर नेताना मोशेने यहोवावर विश्‍वास कसा ठेवला?

इब्री लोकांना या पुस्तकात अशा बऱ्‍याच लोकांबद्दल सांगितलंय, ज्यांचा यहोवावर विश्‍वास होता. त्यांच्यापैकी एक म्हणजे मोशे. त्याचा यहोवावर जबरदस्त विश्‍वास होता. (इब्री ३:२-५; ११:२३-२५) तो इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणत होता तेव्हा त्याने विश्‍वास असल्याचं दाखवलं. तो फारो आणि त्याच्या सैन्याला घाबरला नाही. त्याला पूर्ण भरवसा होता की यहोवा त्यांना तांबड्या समुद्रातून आणि नंतर ओसाड रानातून सुरक्षित बाहेर नेईल. (इब्री ११:२७-२९) त्या वेळी, बऱ्‍याच इस्राएली लोकांना अशी शंका होती की यहोवा त्यांच्या रोजच्या गरजा पुरवेल की नाही. पण मोशेने नेहमी यहोवावर विश्‍वास ठेवला. यहोवानेही ओसाड रानात इस्राएली लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्यांना सांभाळलं. आणि यामुळे मोशेचा यहोवावरचा विश्‍वास डळमळला नाही.a—निर्ग. १५:२२-२५; स्तो. ७८:२३-२५.

२. “यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?” असं यहोवाने मोशेला का म्हटलं? (गणना ११:२१-२३)

२ मोशेचा यहोवावर जबरदस्त विश्‍वास असला तरी इस्राएली लोकांच्या सुटकेच्या जवळपास एका वर्षानंतर त्याच्या मनात एक प्रश्‍न निर्माण झाला. तो म्हणजे, यहोवा इस्राएली लोकांना खरंच मांस देऊ शकेल का? कारण इस्राएली लोकांची संख्या लाखोंच्या घरात होती आणि ओसाड रानात पुरेसं अन्‍न नव्हतं. मग अशा परिस्थितीत यहोवा त्या सगळ्यांना पुरेसं मांस कसं पुरवेल, असं मोशेच्या मनात आलं. त्यावर मोशेला उत्तर देत यहोवाने म्हटलं: “यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?” (गणना ११:२१-२३ वाचा.) इथे “यहोवाचा हात” असं जे म्हटलंय ते त्याच्या पवित्र शक्‍तीला सूचित करतं. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा मोशेला म्हणत होता की ‘तुला खरंच असं वाटतं का, की मी जे म्हटलंय ते पूर्ण करू शकणार नाही?’

३. आपण मोशे आणि इस्राएली लोकांच्या उदाहरणावर विचार का केला पाहिजे?

३ यहोवा आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवेल का, याबद्दल तुमच्या मनात कधी शंका आली आहे का? कदाचित तुमच्या मनात अशी शंका आली असेल किंवा नसेलही, पण तरी आपण मोशे आणि इस्राएली लोकांच्या उदाहरणावर विचार करू या. यहोवा आपल्या गरजा पुरवू शकतो का, याबद्दल त्यांच्या मनात शंका आली होती. ही चर्चा करत असताना आपल्याला जी बायबल तत्त्वं सापडतील, त्यांमुळे यहोवाचा हात तोकडा नाही यावरचा आपला भरवसा आणखी वाढेल.

मोशे आणि इस्राएली लोकांकडून शिका

४. यहोवा आपल्या गरजा पुरवेल का, अशी बऱ्‍याच इस्राएली लोकांना शंका का येऊ लागली?

४ यहोवा आपल्या गरजा पुरवेल का, अशी बऱ्‍याच इस्राएली लोकांना शंका का येऊ लागली? इजिप्तमधून वचन दिलेल्या देशाकडे प्रवास करत असताना ते काही काळ ओसाड रानात होते. या प्रवासात त्यांच्यासोबत “विदेश्‍यांचा एक मोठा समूहसुद्धा” होता. (निर्ग. १२:३८; अनु. ८:१५) या विदेश्‍यांना आणि त्यांच्यासोबत बऱ्‍याच इस्राएली लोकांनाही मान्‍ना खाऊन कंटाळा येऊ लागला. त्यामुळे ते कुरकुर करू लागले. (गण. ११:४-६) इजिप्तमध्ये त्यांना ज्या गोष्टी खायला मिळायच्या, त्यांची त्यांना आठवण येऊ लागली. लोक कुरकुर करू लागल्यामुळे मोशेला असं वाटलं की त्यांच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी त्याचीच आहे.—गण. ११:१३, १४.

५-६. विदेशी लोकांचा बऱ्‍याच इस्राएली लोकांवर जो प्रभाव पडला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

५ यहोवाने दिलेल्या गोष्टींबद्दल विदेशी लोकांना अजिबात कदर नव्हती. आणि याचाच प्रभाव काही इस्राएली लोकांवरसुद्धा झाला. आपल्या बाबतीतसुद्धा असंच होऊ शकतं. आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर नसते, तेव्हा याचा प्रभाव आपल्यावर होऊ शकतो. आणि यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या गोष्टींबद्दलची आपली कदरही कमी होऊ शकते. आपल्याकडे पूर्वी ज्या गोष्टी होत्या, त्यांची जर आपण आठवण करत राहिलो किंवा इतरांकडे असलेल्या गोष्टींमुळे त्यांचा हेवा करू लागलो तर असं होऊ शकतं. याउलट आपण जर कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहायला शिकलो, तर आपण आनंदी राहू शकतो.

६ यहोवाने इस्राएली लोकांना अशी खातरी दिली होती, की वचन दिलेल्या देशात गेल्यावर तो त्यांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी देईल. पण ही गोष्ट ओसाड रानात नाही तर वचन दिलेल्या देशात गेल्यावर पूर्ण होईल हे इस्राएली लोकांनी लक्षात ठेवायला हवं होतं. त्याच प्रकारे, या जगात आपल्याला कोणत्या गोष्टी मिळू शकत नाही यावर विचार करण्याऐवजी, यहोवा नवीन जगात आपल्याला कायकाय देणार आहे यावर आपण विचार केला पाहिजे. तसंच, यहोवावरचा आपला भरवसा वाढवण्यासाठी आपण बायबलमधल्या काही वचनांवरसुद्धा मनन केलं पाहिजे.

७. यहोवाचा हात तोकडा नाही यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?

७ तरीही कदाचित तुमच्या मनात एक प्रश्‍न येईल. तो म्हणजे, यहोवाने मोशेला असं का म्हटलं, की “यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?” कदाचित यहोवा मोशेला दोन गोष्टींवर विचार करायला मदत करत असेल. (१) यहोवाच्या शक्‍तीला मर्यादा नाही आणि (२) त्याचे सेवक कुठेही असले, अगदी दूरदूरच्या ठिकाणीही तरी तो त्यांच्यासाठी त्याची शक्‍ती वापरू शकतो. म्हणून इस्राएली लोक ओसाड रानासारख्या दूरच्या ठिकाणी असले, तरी यहोवा त्यांना भरपूर प्रमाणात मांस पुरवू शकत होता. बायबलमध्ये म्हटलंय: यहोवाने “आपल्या महान सामर्थ्याने [किंवा, आपला हात पुढे करून] त्यांना बाहेर आणलं.” असं करून यहोवाने त्यांना दाखवून दिलं की त्याचे सेवक कुठेही असले तरी तो त्यांना मदत करू शकतो. (स्तो. १३६:११, १२) त्यामुळे आपल्यावर समस्या येते तेव्हा यहोवा आपल्याला मदत करेल का, अशी शंका आपण येऊ देऊ नये. आपण कुठेही असलो तरी यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाला मदत करू शकतो.—स्तो. १३८:६, ७.

८. ओसाड रानात बऱ्‍याच जणांनी जी चूक केली ती आपण कशी टाळू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

८ यहोवाने जे वचन दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं. त्याने मोठ्या प्रमाणात लावे पाठवले. इस्राएली लोकांनी याबद्दल यहोवाचे आभार मानले पाहिजे होते. पण याउलट, त्यांना हाव सुटली. ते दिवसरात्र मोठ्या प्रमाणात लावे गोळा करत राहिले. “खायची हाव सुटलेल्या” या लोकांचा यहोवाला खूप राग आला. आणि त्यामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली. (गण. ११:३१-३४) या उदाहरणातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. आपणसुद्धा सावध राहिलो नाही, तर आपण लोभीपणाला बळी पडू शकतो. आपण श्रीमंत असो किंवा गरीब, आपण सगळ्यांनी “स्वर्गात संपत्ती” साठवण्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. यासाठी आपण यहोवा आणि येशूसोबत जवळचं नातं जोडलं पाहिजे. (मत्त. ६:१९, २०; लूक १६:९) आपण जर असं केलं तर आपण याची खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्या गरजा नक्की पूर्ण करेल.

इस्राएली लोक ओसाड रानात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लावे गोळा करत आहेत.

ओसाड रानात बऱ्‍याच जणांनी कशी वृत्ती दाखवली आणि त्यातून आपण काय शिकू शकतो? (परिच्छेद ८ पाहा)


९. आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

९ यहोवा आजही त्याच्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करतो. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधीच पैशांची चणचण किंवा खाण्यापिण्याची कमी भासणार नाही.b पण यहोवा आपल्याला कधीच सोडून देणार नाही. आपण वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतो तेव्हा तो आपली काळजी घेईल. पण यहोवा आपल्या गरजा पुरवेल यावर आपला भरवसा असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? आता आपण दोन परिस्थितींचा विचार करू या: (१) पैशांची चणचण भासते तेव्हा, आणि (२) म्हातारपणासाठी पैशांची सोय करायची असते तेव्हा.

पैशांची चणचण भासते तेव्हा

१०. आपल्याला कोणत्या प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो?

१० आपल्याला माहीत आहे की जसजसा या जगाचा अंत जवळ येतोय तसतसं आपल्याला आणखी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. सरकारं बदलतील, युद्धं होतील, नैसर्गिक विपत्ती आणि नवनवीन महामाऱ्‍या येतील. त्यामुळे कदाचित आपल्याला आपली नोकरी, आपल्याकडे असलेल्या गोष्टी गमवाव्या लागतील. किंवा कदाचित, आपलं राहतं ठिकाण सोडून जावं लागेल किंवा नोकरी शोधायला दुसऱ्‍या ठिकाणी जावं लागेल. मग अशा वेळी, आपल्या निर्णयांवरून यहोवावरचा आपला भरवसा कसा दिसून येईल?

११. पैशांची चणचण भासते तेव्हा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते? (लूक १२:२९-३१)

११ सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चिंतांबद्दल यहोवाशी बोला. त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल. (नीति. १६:३) चांगले निर्णय घेता यावे म्हणून त्याच्याकडे बुद्धी मागा. तसंच, तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला खूप जास्त चिंता वाटू नये, म्हणून त्याच्याकडे शांत मन मागा. (लूक १२:२९-३१ वाचा.) जे आहे त्यात समाधानी राहता यावं म्हणून त्याला सतत विनंती करा. (१ तीम. ६:७, ८) पैशांची चणचण भासते तेव्हा त्याचा सामना कसा करता येऊ शकतो याबद्दल आपल्या साहित्यांमध्ये संशोधन करा. jw.org वरच्या साहित्यांमुळे बऱ्‍याच जणांना अशा समस्यांचा सामना करण्यासाठी मदत मिळाली आहे.

१२. आपल्या कुटुंबासाठी निर्णय घेताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीला कोणत्या प्रश्‍नांमुळे मदत होऊ शकते?

१२ बऱ्‍याच जणांनी अशी नोकरी निवडली आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबापासून लांब राहावं लागलं आहे. पण नंतर त्यांना जाणवलं की त्यांचा हा निर्णय चुकीचा होता. कोणतीही नोकरी निवडण्याआधी त्यातून किती पैसे मिळतील याचा विचार करण्यासोबतच, त्या नोकरीमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची आध्यात्मिकता टिकवून ठेवता येईल का, याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. (लूक १४:२८) त्यामुळे तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. ते म्हणजे: ‘माझ्या जोडीदारापासून लांब राहिल्यामुळे आमच्या नात्यावर काय परिणाम होईल? मला प्रत्येक सभेला आणि प्रचारकार्याला जाता येईल का? तसंच मला भाऊबहिणींसोबत वेळ घालवता येईल का?’ शिवाय, जर तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही स्वतःला आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारू शकता. तो म्हणजे: ‘जर मी माझ्या मुलांसोबत नसलो तर मी त्यांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” वाढवू शकेन का?’ (इफिस. ६:४) अशा परिस्थितीत निर्णय घेताना, बायबलच्या तत्त्वांचा आदर न करणाऱ्‍या तुमच्या नातेवाइकांचा किंवा मित्रांचा सल्ला लागू करण्याऐवजी, यहोवाचे विचार लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घ्या.c पश्‍चिम आशियात राहणाऱ्‍या टोनी नावाच्या भावाला परदेशात नोकरी करायच्या बऱ्‍याच चांगल्या संधी आल्या होत्या. पण याबद्दल त्याने प्रार्थना केली आणि त्याच्या पत्नीसोबत चर्चा केली. मग त्याने काय करायचं ठरवलं? त्याने या नोकऱ्‍या न करायचं ठरवलं. उलट, त्याने त्यांचा खर्च कमी करायचा प्रयत्न केला. मागे वळून पाहताना टोनी म्हणतो: “या निर्णयामुळे मला बऱ्‍याच जणांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला मदत करता आली आणि आता आमची मुलंही आनंदाने यहोवाची सेवा करत आहेत. आमच्या कुटुंबाला हे समजलंय की जर आम्ही मत्तय ६:३३ मधला सल्ला लागू करत राहिलो तर यहोवा आमची नेहमी काळजी घेईल.”

म्हातारपणासाठी पैशांची सोय करताना

१३. भविष्यात आपल्या गरजा भागाव्यात म्हणून आपण आता काय करू शकतो?

१३ भविष्यासाठी पैशांची योजना करतानाही आपण यहोवावर भरवसा असल्याचं दाखवू शकतो. भविष्यात आपल्या गरजा भागाव्यात म्हणून मेहनत करायचं बायबल आपल्याला प्रोत्साहन देतं. (नीति. ६:६-११) त्यामुळे आपल्याला भविष्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवता येत असेल तर चांगलंच आहे. कारण बायबल म्हणतं की पैशांमुळे काही प्रमाणात सुरक्षा मिळते. (उप. ७:१२) असं असलं तरी पैसे साठवणं हाच आपल्या जीवनातला मुख्य उद्देश नसला पाहिजे.

१४. भविष्यासाठी पैसे साठवताना आपण इब्री लोकांना १३:५ या वचनाचा विचार का केला पाहिजे?

१४ येशूने एका उदाहरणातून समजावून सांगितलं की “देवाच्या दृष्टीने श्रीमंत” असणं किती महत्त्वाचं आहे. असं न करता आपण पैसे साठवत राहिलो तर ते मूर्खपणाचं ठरेल. (लूक १२:१६-२१) कारण उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. (नीति. २३:४, ५; याको. ४:१३-१५) तसंच येशूने हेही म्हटलं होतं की ज्यांना त्याचे शिष्य होण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा “त्याग” करायला तयार असलं पाहिजे. (लूक १४:३३, तळटीप) पहिल्या शतकात, यहूदीयामधल्या भाऊबहिणींनीसुद्धा आनंदाने अशा प्रकारचा त्याग केला. (इब्री १०:३४) आजच्या काळातसुद्धा राजकीय पक्षांना पाठिंबा न दिल्यामुळे बऱ्‍याच भाऊबहिणींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. (प्रकटी. १३:१६, १७) मग त्यांना कशामुळे मदत झाली? त्यांना यहोवाने दिलेल्या अभिवचनावर पूर्ण भरवसा आहे. यहोवाने म्हटलं: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री लोकांना १३:५ वाचा.) भविष्यासाठी काही पैसे साठवता यावेत म्हणून आपण जमेल ते करतो. पण त्यासोबतच आपल्याला याची खातरी आहे, की काही अनपेक्षित गोष्टी घडल्या तर यहोवा आपल्याला नक्की सांभाळेल.

१५. ख्रिस्ती आईवडिलांनी मुलांबद्दल कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ काही संस्कृतींमध्ये जोडपी सहसा असा विचार करतात की त्यांची मुलं त्यांना म्हातारपणी आर्थिक मदत करतील. आणि म्हणून ते आपलं कुटुंब वाढवतात. एका अर्थी ते त्यांच्या मुलांकडे “म्हातारपणाची काठी” म्हणून पाहतात. पण बायबल म्हणतं की आईवडिलांनी आपल्या मुलांच्या गरजा भागवल्या पाहिजेत. (२ करिंथ. १२:१४) हे खरं आहे की आईवडील म्हातारे होतात तेव्हा त्यांना काही प्रमाणात पैशांची किंवा इतर गोष्टींची गरज पडू शकते, आणि मुलंसुद्धा आनंदाने ती मदत करायला तयार असतात. (१ तीम. ५:४) पण ख्रिस्ती आईवडिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, मुलं आपल्याला म्हातारपणात आर्थिक मदत करतील या उद्देशाने त्यांनी मुलांना वाढवू नये. उलट, त्यांनी मुलांना यहोवाचे सेवक बनण्यासाठी मदत केली पाहिजे. जर आईवडिलांनी असं केलं, तर त्यांना खूप आनंद मिळेल.—३ योहा. ४.

एक जोडपं त्यांच्या मुलीसोबत आणि जावयासोबत आनंदाने व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. त्यांच्या मुलीने आणि जावयाने बांधकामाचे कपडे घातले आहेत.

यहोवावर भरवसा असलेलं जोडपं बायबल तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेतं. (परिच्छेद १५ पाहा) d


१६. आईवडील आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला कशी मदत करू शकतात? (इफिसकर ४:२८)

१६ आईवडिलांनो, मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करत असताना, तुमच्या उदाहरणातून त्यांना यहोवावर भरवसा ठेवायला शिकवा. लहानपणापासूनच त्यांना मेहनत करायचं महत्त्व शिकवा. (नीति. २९:२१; इफिसकर ४:२८ वाचा.) मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना शाळेत चांगला अभ्यास करायला शिकवा. पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं हे ठरवताना संशोधन करून बायबल तत्त्वं शोधून काढा आणि तुमच्या मुलांना योग्य निर्णय घ्यायला मदत करा. तुमच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला, प्रचारात जास्तीत जास्त वेळ घालवायला किंवा मग पायनियर बनायलाही मदत करायचं ध्येय ठेवा.

१७. आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

१७ ज्यांचा यहोवावर भरवसा असतो त्यांना याची पूर्ण खातरी असते की यहोवाकडे त्यांच्या गरजा पूर्ण करायची ताकद आणि इच्छाही आहे. जसजसा या जगाचा अंत जवळ येतोय, तसतसं यहोवावरच्या आपल्या भरवशाची परीक्षा होऊ शकते. पण काहीही झालं तरी यहोवावर आपला पूर्ण भरवसा असला पाहिजे. हा भरवसा, की तो आपल्या सामर्थ्याचा वापर करून आपल्या गरजा पुरवेल. तसंच, आपण ही खातरी बाळगली पाहिजे, की आपण कुठेही असलो तरी यहोवा त्याचा शक्‍तिशाली हात पुढे करून आपल्याला नेहमी मदत करत राहील. कारण यहोवाचा हात तोकडा नाही!

तुमचं उत्तर काय असेल?

  • मोशे आणि इस्राएली लोकांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

  • पैशांची चणचण भासते तेव्हा आपण यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतो?

  • म्हातारपणासाठी पैशांची सोय करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवू शकतो?

गीत १५० आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा

a ऑक्टोबर २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

b १५ सप्टेंबर २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

c “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही” हा १५ एप्रिल २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकातला लेख पाहा.

d चित्राचं वर्णन: यहोवावर भरवसा असलेलं एक जोडपं आपल्या मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलतंय. त्यांची मुलगी तिच्या पतीसोबत बांधकाम प्रकल्पावर काम करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा