वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 नोव्हेंबर पृ. ८-१३
  • विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल’
  • “तुला यश मिळेल”
  • ‘इतका आनंद दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही’
  • विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून फायदा मिळवा
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा “जिवंत देव” आहे हे विसरू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाचा हात कधीच तोकडा नसतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 नोव्हेंबर पृ. ८-१३

अभ्यास लेख ४५

गीत १३८ नीती ही वृद्धांची शोभा!

विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे

“म्हाताऱ्‍या माणसांजवळ बुद्धी नसते का? आणि बरंच आयुष्य जगल्यावर समजशक्‍ती येत नाही का?”—ईयो. १२:१२.

या लेखात

आपण जर यहोवाची आज्ञा पाळत राहिलो, तर आत्ता आपल्याला आशीर्वाद आणि येणाऱ्‍या भविष्यात कायमचं जीवन कसं मिळेल हे पाहा.

१. आपण वयाने मोठे असलेल्या भाऊबहिणींकडून का शिकलं पाहिजे?

जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असते. बऱ्‍याचदा हे मार्गदर्शन आपल्याला वडिलांकडून आणि मंडळीतल्या प्रौढ भाऊबहिणींकडून मिळू शकतं. ते आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत म्हणून त्यांचा सल्ला जुन्या काळातला आहे आणि आता काही उपयोगाचा नाही असं आपण म्हणून नये. आपण मोठ्यांकडून शिकावं अशी यहोवाची इच्छा आहे. कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त अनुभव, समजशक्‍ती आणि बुद्धी आहे.—ईयो. १२:१२.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२ बायबल काळात, यहोवाने आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी विश्‍वासू असलेल्या आपल्या वृद्ध सेवकांचा उपयोग केला. उदाहरणार्थ, मोशे, दावीद आणि प्रेषित योहान यांचा त्याने वापर केला. ते वेगवेगळ्या काळात जगत होते आणि त्यांची परिस्थिती एकमेकांपेक्षा खूप वेगळी होती. त्यांच्या जीवनाचा शेवट जवळ असताना त्यांनी तरुणांना खूप मोलाचा सल्ला दिला. या विश्‍वासू सेवकांनी देवाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे या गोष्टीवर जोर दिला. यहोवाने त्यांचे सुज्ञ शब्द आज आपल्यासाठी जपून ठेवले आहेत. आपण तरुण असलो किंवा वृद्ध असलो, तरी त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर विचार करू शकतो. त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल. (रोम. १५:४; २ तीम. ३:१६) तर मग या लेखात, आपण यहोवाच्या या तीन वृद्ध सेवकांनी त्यांच्या मृत्यूच्या वेळी काय म्हटलं आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या.

‘तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल’

३. मोशेने कोणकोणत्या मार्गांनी यहोवाची सेवा केली?

३ मोशेने आयुष्यभर यहोवाची मनापासून सेवा केली. त्याने एक संदेष्टा, न्याय करणारा, सेनापती आणि इतिहासकार म्हणून काम केलं. मोशेला त्याच्या आयुष्यात खूप अनुभव आले. त्याने इस्राएल राष्ट्राला इजिप्तमधल्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि यहोवाच्या अनेक चमत्कारांचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. बायबलची पहिली पाच पुस्तकं, स्तोत्र ९० आणि कदाचित स्तोत्र ९१ लिहिण्यासाठी यहोवाने त्याचा उपयोग केला. त्याने ईयोबचं पुस्तकही लिहिलं असावं.

४. मोशेने कोणाला आपल्याकडे बोलवलं आणि का?

४ आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी, म्हणजे वयाच्या १२० व्या वर्षी मोशेने सगळ्या इस्राएली लोकांना एकत्र बोलवलं. त्यांनी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी त्याने त्यांना बोलवलं होतं. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या तारुण्यात यहोवाने केलेली अनेक चिन्हं आणि चमत्कार, तसंच इजिप्तविरुद्ध देवाने बजावलेला न्यायदंड स्वतः पाहिला होता. (निर्ग. ७:३, ४) देवाने तांबड्या समुद्राचे दोन भाग केले तेव्हा त्यांनी ते पाहिलं होतं, आणि त्यातून ते चालत गेले होते. आणि त्यांनी फारोच्या सैन्याचा नाश होतानाही पाहिला होता. (निर्ग. १४:२९-३१) ओसाड रानात त्यांनी यहोवाचं संरक्षण आणि काळजी अनुभवली होती. (अनु. ८:३, ४) आणि आता ते वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. म्हणून मोशेने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शेवटच्या संधीचा फायदा घेतला.a

५. अनुवाद ३०:१९, २० मध्ये असलेल्या मोशेच्या शेवटच्या शब्दांमुळे इस्राएली लोकांना कोणत्या गोष्टीची खातरी पटली?

५ मोशे काय म्हणाला? (अनुवाद ३०:१९, २० वाचा.) इस्राएल राष्ट्राला एका सुंदर भविष्याची आशा होती. यहोवाच्या आशीर्वादाने इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात खूप मोठं आयुष्य जगू शकणार होते. तो देश अतिशय सुंदर होता आणि तिथली जमीन सुपीक होती. मोशेने तिथे काय-काय असेल याबद्दल सांगताना म्हटलं: “तिथली मोठी आणि सुंदर शहरं जी तुम्ही बांधली नाहीत, सर्व प्रकारच्या चांगल्या वस्तूंनी भरलेली घरं ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत केली नाही, पाण्याचे हौद जे तुम्ही खोदले नाहीत आणि द्राक्षमळे व जैतुनाची झाडं जी तुम्ही लावली नाहीत.”—अनु. ६:१०, ११.

६. देवाने इतर राष्ट्रांना इस्राएली लोकांवर विजय का मिळवू दिला?

६ मोशेने इस्राएली लोकांना एक इशाराही दिला. त्याने त्यांना सांगितलं, की त्यांना जर त्या सुंदर देशात राहायचं असेल, तर त्यांना यहोवाच्या आज्ञांचं पालन करावं लागेल. मोशेने त्यांना म्हटलं, की त्यांना जर ‘जीवन निवडायचं’ असेल, तर त्यांनी यहोवाचं ऐकून ‘त्याला धरून राहावं.’ पण इस्राएली लोकांनी यहोवाला नाकारलं. त्यामुळे काही काळानंतर यहोवाने अश्‍शूरी आणि नंतर बॅबिलोनी लोकांना त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना बंदिवासात नेऊ दिलं.—२ राजे १७:६-८, १३, १४; २ इति. ३६:१५-१७, २०.

७. मोशेच्या शेवटच्या शब्दांमधून आपण काय शिकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

७ यातून आपण काय शिकतो? आज्ञा पाळल्यामुळे जीवन मिळतं. इस्राएली लोक ज्याप्रमाणे वचन दिलेल्या देशाच्या उंबरठ्यावर होते, तसं आज आपणही देवाने वचन दिलेल्या नवीन जगाच्या उंबरठ्यावर आहोत. लवकरच या पृथ्वीचं नंदनवनात रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. (यश. ३५:१; लूक २३:४३) तिथे सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत यांचं नामोनिशाण नसेल. (प्रकटी. २०:२, ३) खोटा धर्म यापुढे लोकांना यहोवापासून दूर नेणार नाही. (प्रकटी. १७:१६) यापुढे मानवी सरकारं लोकांवर आत्याचार करणार नाहीत. (प्रकटी. १९:१९, २०) नंदनवनात बंडखोरांसाठी जागा नसेल. (स्तो. ३७:१०, ११) सगळीकडे लोक यहोवाच्या नीतिमान नियमांचं पालन करतील आणि त्यामुळे ऐक्य आणि शांती वाढत जाईल. तसंच लोक एकमेकांवर प्रेम करतील आणि एकमेकांवर भरवसा ठेवतील. (यश. ११:९) खरंच, ही किती सुंदर आशा आहे! एवढंच काय, आपण जर यहोवाची आज्ञा पाळली, तर आपण पृथ्वीवर नंदनवनात शेकडो वर्षंच नाही तर अनंतकाळ जगू.—स्तो. ३७:२९; योहा. ३:१६.

कोलाज: १. एक जोडपं ट्रॉलीवरचं साक्षकार्य करत आहे. बहीण ट्रॉलीजवळ उभ्या असलेल्या एका स्त्रीला मोबाईलवर काहीतरी दाखवत आहे. २. एक जोडपं नंदनवनात इतरांसोबत जेवणाचा आनंद घेत आहे.

आपण यहोवाची आज्ञा पाळली तर आपण पृथ्वीवर नंदनवनात शेकडो वर्षंच नाही तर अनंतकाळ जगू (परिच्छेद ७ पाहा)


८. कायमच्या जीवनाच्या आशेमुळे एका मिशनरी भावाला कशी मदत झाली? (यहूदा २०, २१)

८ नंदनवनात कायम जगण्याचं देवाने दिलेलं अभिवचन आपण जर नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवलं, तर कितीही संकटं आली तरी आपण त्याला जडून राहू शकतो. (यहूदा २०, २१ वाचा.) या आशेमुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या कमतरतांशी लढण्याची शक्‍ती मिळते. आफ्रिकेत अनेक वर्षांपासून मिशनरी म्हणून सेवा करणाऱ्‍या एका भावाला आपल्या एका कमतरतेशी सतत झगडावं लागत होतं. तो म्हणतो: “माझ्या लक्षात आलं की मी जर यहोवाचं ऐकलं नाही, तर मला नंदनवनात कायमचं जीवन जगता येणार नाही. म्हणून मी यहोवाला कळकळीने प्रार्थना केली आणि त्यामुळे माझ्या कमतरतेशी लढण्याचा माझा निश्‍चय आणखी पक्का झाला. त्याच्या मदतीमुळेच मी या कमतरतेवर मात करू शकलो.”

“तुला यश मिळेल”

९. दावीदने त्याच्या आयुष्यात कोणकोणत्या समस्यांचा सामना केला?

९ दावीद एक महान राजा होता. तो संगीतकार, कवी, योद्धा आणि संदेष्टाही होता. त्याने अनेक संकटांचा सामना केला. शौल राजा त्याचा द्वेष करत असल्यामुळे त्याला बरीच वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी पळून जावं लागलं. राजा झाल्यानंतरसुद्धा त्याचा मुलगा अबशालोम त्याचं राजासन बळकावण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हासुद्धा दावीदला पुन्हा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. या सगळ्या अडचणी आणि त्याच्या स्वतःच्या काही चुका असूनसुद्धा दावीद त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला. यहोवाने त्याच्याबद्दल, “माझ्या मनासारखा माणूस” असं म्हटलं. म्हणूनच दावीदचा सल्ला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.—प्रे. कार्यं १३:२२; १ राजे १५:५.

१०. दावीदने त्याच्या मुलाला, म्हणजे इस्राएलचा पुढचा राजा शलमोन याला सल्ला का दिला?

१० दावीदने इस्राएलच्या पुढच्या राजाला, म्हणजे त्याचा मुलगा शलमोनला जो सल्ला दिला त्याबद्दल विचार करा. शुद्ध उपासनेला पाठिंबा देण्यासाठी आणि देवाच्या सन्मानात मंदिर बांधण्यासाठी यहोवाने त्याची निवड केली होती. (१ इति. २२:५) आणि हे खरंच खूप मोठं काम होतं. शिवाय शलमोनला संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करायचं होतं आणि त्यासाठी त्याला यहोवाच्या मदतीची गरज होती. मग दावीदने त्याला काय सल्ला दिला? चला पाहू या.

११. १ राजे २:२, ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे दावीदने शलमोनला कोणत्या गोष्टीची खातरी दिली आणि ती गोष्ट खरी असल्याचं कसं सिद्ध झालं? (चित्रसुद्धा पाहा.)

११ दावीद काय म्हणाला? (१ राजे २:२, ३ वाचा.) दावीदने आपल्या मुलाला सांगितलं की त्याने यहोवाचं ऐकलं तर तो आयुष्यात यशस्वी होईल. आणि ही गोष्ट केल्यामुळे शलमोनला बरीच वर्षं जबरदस्त यश मिळालं. (१ इति. २९:२३-२५) त्याने भव्य मंदिर बांधलं आणि बायबलची अनेक पुस्तकं लिहिली. इतकंच नाही, तर त्याने लिहिलेले शब्द बायबलच्या इतर पुस्तकांमध्येसुद्धा पाहायला मिळतात. तो त्याच्या बुद्धीसाठी आणि संपत्तीसाठी खूप प्रसिद्ध झाला. (१ राजे ४:३४) पण दावीदने स्पष्ट केल्याप्रमाणे, शलमोन जोपर्यंत देवाची आज्ञा पाळणार होता तोपर्यंत त्याला यश मिळणार होतं. पण दुखाची गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात पुढे तो इतर देवी-देवतांकडे वळला. यहोवाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यामुळे शलमोनने नीतिने आणि न्यायाने शासन करण्यासाठी लागणारी बुद्धी गमावली.—१ राजे ११:९, १०; १२:४.

कोलाज: १. मृत्यूच्या आधी दावीद, त्याचा हात धरून बसलेल्या शलमोनशी बोलत आहे. २. भाऊबहीण पायनियर सेवा प्रशालेत उपस्थित आहेत. एक बहिणीने उत्तर द्यायला हात वर केला आहे.

दावीदने आपल्या मुलाला, शलमोनला शेवटी जे म्हटलं त्यामुळे आपल्याला हे समजतं, की आपण जर यहोवाची आज्ञा पाळली तर तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी देईल (परिच्छेद ११-१२ पाहा)b


१२. दावीदच्या शेवटच्या शब्दांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१२ यातून आपण काय शिकतो? आज्ञा पाळल्यामुळे यश मिळतं. (स्तो. १:१-३) यहोवाने आपल्याला शलमोनसारखी संपत्ती आणि वैभव द्यायचं वचन दिलेलं नाही. पण आपण जर यहोवाची आज्ञा पाळली तर तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी नक्की देईल. (नीति. २:६, ७; याको. १:५) त्याची तत्त्वं आपल्याला नोकरी, शिक्षण, मनोरंजन आणि पैसा यांसारख्या गोष्टींच्या बाबतीत चांगले निर्णय घ्यायला मदत करू शकतात. यहोवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीप्रमाणे चालल्यामुळे आपलं कधीच कायमचं नुकसान होणार नाही. (नीति. २:१०, ११) त्यासोबतच इतरांसोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होईल आणि एक चांगलं कौटुंबिक जीवन जगण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल.

१३. कार्मेनला तिच्या जीवनात यश कसं मिळालं?

१३ मोझंबिकमध्ये राहणाऱ्‍या कार्मेनला वाटायचं की उच्च शिक्षण ही यशाची गुरूकिल्ली आहे. तिने विद्यापीठात प्रवेश घेतला आणि बिल्डिंगच्या रचना कशा करायच्या याचा अभ्यास केला. ती म्हणते, “मी जे शिकत होते ते मला खूप आवडायचं. पण यासाठी माझा बराच वेळ आणि शक्‍ती खर्च होत होती. मी सकाळी ७:३० पासून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत विद्यापीठातच असायचे. त्यामुळे सभांना जाणं खूप कठीण व्हायचं आणि याचा माझ्या आध्यात्मिकतेवर परिणाम होत होता. मला मनात कुठेतरी हे जाणवत होतं, की मी दोन मालकांची सेवा करायचा प्रयत्न करत आहे.” (मत्त. ६:२४) मग तिने तिच्या परिस्थितीबद्दल यहोवाला प्रार्थना केली आणि आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन केलं. ती पुढे म्हणते: “मंडळीतल्या काही प्रौढ भावांनी आणि माझ्या आईने मला चांगला सल्ला दिला. आणि त्यामुळे मी यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्यासाठी विद्यापीठातलं शिक्षण सोडायचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की हा माझ्या जीवनातला सगळ्यात चांगला निर्णय होता. आणि याचा मला जरासुद्धा पस्तावा होत नाही.”

१४. मोशे आणि दावीद या दोघांनी कोणता महत्त्वाचा सल्ला दिला?

१४ मोशे आणि दावीदचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याच्या आज्ञांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांच्या शेवटच्या शब्दांमध्ये त्यांनी इतरांना त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करायचं आणि यहोवाला जडून राहायचं प्रोत्साहन दिलं. यासोबतच त्यांनी असा इशाराही दिला, की जे यहोवाला सोडून जातील ते त्याची मर्जी आणि आशीर्वादसुद्धा गमावतील. त्यांचा हा सल्ला आज आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. पुढे अनेक शतकांनंतर यहोवाच्या आणखी एका सेवकानेसुद्धा यहोवाला विश्‍वासू राहणं किती महत्त्वाचंय ते सांगितलं.

‘इतका आनंद दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही’

१५. प्रेषित योहानने त्याच्या जीवनात कोणत्या गोष्टी अनुभवल्या?

१५ योहान हा येशूचा सगळ्यात आवडता प्रेषित होता. (मत्त. १०:२; योहा. १९:२६) योहान येशूच्या संपूर्ण सेवाकार्यात त्याच्यासोबत होता. आणि त्याने येशूला अनेक चमत्कार करतानासुद्धा पाहिलं होतं. यासोबतच अतिशय कठीण काळातसुद्धा तो त्याच्यासोबत राहिला होता. त्याने येशूला खिळलं जात असताना आणि त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतरसुद्धा पाहिलं होतं. तसंच, पहिल्या शतकात विश्‍वासू लोकांच्या एका छोट्याशा गटापासून “आकाशाखालच्या सबंध सृष्टीत” आनंदाच्या संदेशाची घोषणा होईपर्यंत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार कसा होत गेला हेही त्याने पाहिलं होतं.—कलस्सै. १:२३.

१६. योहानने लिहिलेल्या पत्रांचा कोणाकोणाला फायदा झाला आहे?

१६ योहान खूप मोठं आयुष्य जगला. त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाच्या प्रेरणेने अतिशय रोमांचक असलेलं “येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण” लिहिलं. (प्रकटी. १:१) तसंच, त्याने त्याच्या नावाने ओळखलं जाणारं शुभवर्तमानसुद्धा लिहिलं. यासोबतच, योहानने देवाच्या प्रेरणेने तीन पत्रंही लिहिली. त्याने तिसरं पत्र गायस नावाच्या एका विश्‍वासू ख्रिश्‍चनाला लिहिलं. त्याला तो आध्यात्मिक अर्थाने आपला मुलगाच समजायचा. (३ योहा. १) त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याची अशी बरीच आध्यात्मिक मुलं असावीत. या विश्‍वासू वृद्ध सेवकाने जे लिहिलं त्यामुळे आजपर्यंत येशूच्या सर्वच अनुयायांना प्रोत्साहन मिळालंय.

१७. ३ योहान ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कशामुळे आनंद मिळतो?

१७ योहानने काय लिहिलं? (३ योहान ४ वाचा.) योहानने देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे जो आनंद मिळतो त्याबद्दल लिहिलं. योहानने आपलं तिसरं पत्र लिहिलं तोपर्यंत काही लोक खोट्या शिकवणी पसरवत होते आणि मंडळीत फूट पाडायचा प्रयत्न करत होते. पण इतर विश्‍वासू लोक मात्र “सत्याच्या मार्गावर चालत” राहिले. त्यांनी यहोवाची आज्ञा पाळली आणि ‘त्याच्या आज्ञांप्रमाणे ते चालले.’ (२ योहा. ४, ६) या विश्‍वासू ख्रिश्‍चनांमुळे योहानला तर आनंद झालाच, पण त्यासोबत यहोवालाही आनंद झाला.—नीति. २७:११.

१८. योहानच्या शेवटच्या शब्दांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१८ यातून आपण काय शिकतो? विश्‍वासू राहिल्यामुळे आनंद मिळतो. (१ योहा. ५:३) उदाहरणार्थ, आपल्यामुळे यहोवाला आनंद होतो हे जाणून आपल्यालाही आनंद होतो. आपण जगातल्या मोहांचा प्रतिकार करतो आणि यहोवाच्या आज्ञा पाळतो हे पाहून तो खूश होतो. (नीति. २३:१५) यामुळे स्वर्गदूतही खूश होतात. (लूक १५:१०) आपले भाऊबहीण परीक्षांचा आणि मोहांचा सामना करताना यहोवाला विश्‍वासू आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. (२ थेस्सलनी. १:४) शेवटी या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा आपल्याला या गोष्टीचं समाधान असेल, की सैतानाचं वर्चस्व असलेल्या या जगात आपण यहोवाला विश्‍वासू राहिलो.

१९. रेचल नावाच्या बहिणीने इतरांना सत्य शिकवण्याबद्दल काय म्हटलं? (चित्रसुद्धा पाहा.)

१९ जेव्हा आपण इतरांना सत्य सांगतो, तेव्हा आपल्याला खासकरून आनंद होतो. डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये राहणाऱ्‍या रेचलला असं वाटतं, की आपण ज्या महान देवाची सेवा करतो त्याबद्दल एखाद्याला शिकवणं हा एक असा बहुमान आहे ज्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आपल्या आध्यात्मिक मुलांचा विचार करताना ती म्हणते: “मी ज्यांना सत्य शिकायला मदत केली ते यहोवावर प्रेम करायला, त्याच्यावर भरवसा ठेवायला शिकतात आणि त्याचं मन आनंदित करण्यासाठी स्वतःच्या जीवनात फेरबदल करतात हे जेव्हा मी बघते, तेव्हा मला इतका आनंद होतो की मी तो शब्दात सांगू शकत नाही. त्यांना शिकवण्यासाठी मी जी मेहनत घेतली आणि त्याग केले यांपेक्षा हा आनंद खूप मोठा आहे.”

कोलाज: १. एक बहीण तिच्या बायबल विद्यार्थ्यासोबत आनंदाने बायबल अभ्यास चालवत आहे. २. नंतर ती बहीण आणि बायबल विद्यार्थी आनंदाने प्रचारकार्य करत आहेत.

आपण जसं यहोवावर प्रेम करतो आणि त्याची आज्ञा पाळतो तसं इतरांनाही करायला शिकवतो तेव्हा आपल्याला आनंद होतो (परिच्छेद १९ पाहा)


विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून फायदा मिळवा

२०. मोशे, दावीद आणि योहान यांच्यामध्ये आणि आज आपल्यामध्ये कोणत्या बाबतीत सारखेपणा आहे?

२० मोशे, दावीद आणि योहान हे आपल्यापेक्षा खूप वेगळ्या काळात आणि परिस्थितींमध्ये जगले. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बऱ्‍याच गोष्टींच्या बाबतीत सारखेपणा आहे. त्यांनी खऱ्‍या देवाची सेवा केली आणि आपणही करतो. त्यांच्याप्रमाणेच आपणही यहोवाला प्रार्थना करतो, त्याच्यावर विसंबून राहतो आणि मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे पाहतो. जुन्या काळातल्या या विश्‍वासू सेवकांप्रमाणे आपल्यालाही या गोष्टीची खातरी आहे, की यहोवा त्याच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना भरपूर आशीर्वाद देतो.

२१. मोशे, दावीद आणि योहान यांच्यासारख्या विश्‍वासू सेवकांच्या सल्ल्याचं पालन करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

२१ तर चला, आपण यहोवाच्या आज्ञांचं पालन करून या वृद्ध विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांकडे लक्ष देऊ या. मग आपण जे काही करतो त्यात आपल्याला खरं यश मिळेल आणि ‘मोठं आयुष्य लाभेल,’ तेही कायमचं! (अनु. ३०:२०) तसंच, यहोवा त्याची सगळी अभिवचनं आपल्या अपेक्षेच्या किंवा कल्पनेच्याही पलिकडे पूर्ण करेल. आणि त्यामुळे आपल्या स्वर्गातल्या प्रेमळ पित्याचं मन खूश करायचा आनंदही आपल्याला अनुभवायला मिळेल.—इफिस. ३:२०.

पुढे सांगितलेल्या विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून आपण काय शिकू शकतो?

  • मोशे

  • दावीद

  • योहान

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

a तांबड्या समुद्रात यहोवाने केलेले चमत्कार पाहिलेले बहुतेक इस्राएली लोक वचन दिलेला देश पाहण्यासाठी जिवंत राहिले नाहीत. (गण. १४:२२, २३) यहोवाने सांगितलं होतं, की नोंदणी झालेले २० आणि त्याहून जास्त वयाचे इस्राएली लोक ओसाड रानातच मरतील. (गण. १४:२९) पण जेव्हा इस्राएली लोकांनी यार्देन नदी पार करून कनान देशात प्रवेश केला, तेव्हा यहोवाने दिलेलं वचन पूर्ण झालंय हे पाहण्यासाठी यहोशवा, कालेब आणि तरुण पिढीतले, तसंच लेवी वंशातले बरेच जण जिवंत राहिले.—अनु. १:२४-४०.

b चित्रांचं वर्णन: डावीकडून: दावीदने मृत्यूच्या आधी आपल्या मुलाला, शलमोनला मोलाचा सल्ला दिला. उजवीकडून: पायनियर सेवा प्रशालेमध्ये विद्यार्थी संघटनेकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाचा फायदा घेत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा