देवाच्या नावाचा महिमा गाणारे धन्य
“[ते] तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.”—स्तोत्र ८६:९.
१. अचेतन गोष्टी करू शकतात त्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ अशा मार्गांनी आपण देवाचा महिमा का वर्णू शकतो?
यहोवा त्याच्या सर्व निर्मितीच्या गौरवास पात्र आहे. निसर्गातील अचेतन गोष्टी त्याचा मूकपणे महिमा वर्णितात; पण मानव या नात्याने आपल्याजवळ मात्र कारणमीमांसा करण्याची, आकलन करण्याची, कृतज्ञता दाखवण्याची व उपासना करण्याची क्षमता आहे. तेव्हा स्तोत्रकर्त्याचे हे पुढील शब्द खरे तर आपल्याला उद्देशून आहेत: “अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुति करा.”—स्तोत्र ६६:१, २.
२. देवाच्या नावाला गौरव देण्याच्या आज्ञेला कोणी प्रतिसाद दिला आहे आणि का?
२ मानवजातीतील बहुसंख्य लोक देवाचे अस्तित्व नाकारतात व त्याला गौरव देत नाहीत. पण २३५ देशांत ६० लाख पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आपल्या कार्यांद्वारे दाखवतात की देवाने निर्मिलेल्या वस्तूंवरून त्याचे ‘अदृश्य गुण’ ते पाहू शकतात आणि निर्मितीची मूक ग्वाही त्यांनी ‘ऐकली’ आहे. (रोमकर १:२०; स्तोत्र १९:२, ३) बायबलचा अभ्यास करण्याद्वारे त्यांना यहोवाची ओळख घडली आहे व ते त्याच्यावर प्रेम करू लागले आहेत. स्तोत्र ८६:९, १० यात भाकीत केले होते: “हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.”
३. “मोठा लोकसमुदाय” कशाप्रकारे ‘अहोरात्र सेवा करतो’?
३ त्याचप्रकारे प्रकटीकरण ७:९, १५ यात उपासकांच्या एका ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ वर्णन केले आहे जे “अहोरात्र [देवाच्या] मंदिरात त्याची सेवा करितात.” देव आपल्या सेवकांकडून शाब्दिक अर्थाने अहोरात्र सेवा करण्याची अपेक्षा करत नाही; पण त्याच्या उपासकांची एक जगव्याप्त संघटना आहे. त्यामुळे काही देशांत रात्र असली तरीही पृथ्वीच्या दुसऱ्या भागांत मात्र देवाचे सेवक प्रचार कार्यात व्यस्त असतात. त्यामुळे यहोवाचे गौरव करणाऱ्यांवर सूर्य कधी मावळतच नाही. लवकरच तो दिवस येईल जेव्हा “प्रत्येक प्राणी” यहोवाचे गुणगान करेल. (स्तोत्र १५०:६) तोपर्यंत मात्र आपण देवाचे गौरव करण्याकरता वैयक्तिकदृष्ट्या काय करू शकतो? आपल्यासमोर कोणती आव्हाने येऊ शकतात? आणि जे देवाचे गौरव करतात त्यांच्याकरता कोणते आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत? याच्या उत्तराकरता आपण इस्राएल राष्ट्राच्या गाद या गोत्राविषयीचा बायबलमधील एक अहवाल लक्षात घेऊ.
एक प्राचीन आव्हान
४. गादाच्या वंशाला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागले?
४ वचनयुक्त देशात प्रवेश करण्याआधी इस्राएल राष्ट्राच्या गाद या गोत्राच्या सदस्यांनी अशी विनंती केली की त्यांना यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेल्या गुराढोरांकरता उत्तम अशा प्रदेशात स्थायिक होण्याची परवानगी देण्यात यावी. (गणना ३२:१-५) तेथे राहणे म्हणजे कठीण आव्हानांना आमंत्रण देण्यासारखे होते. पश्चिमेकडील गोत्रांना यार्देन खोऱ्याचे संरक्षण लाभणार होते, कारण येथून आक्रमण करणे तितके सोपे नव्हते. (यहोशवा ३:१३-१७) पण जॉर्ज ॲडम स्मिथ यांच्या पवित्र भूमीचे ऐतिहासिक भूशास्त्र (इंग्रजी) या ग्रंथात यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेशांबद्दल असे म्हटले आहे: “[हे] ग्रेट अरेबियन पठारावरील सपाट प्रदेश आहेत ज्यांच्या अखंड विस्ताराला कसलाही अटकाव नाही. त्यामुळे या प्रदेशांवर सतत, कुरणांच्या शोधात असलेल्या भटक्या जमातींचे हल्ले होत असत; काही जमाती तर दर वर्षी येथे मोठ्या संख्येने आक्रमण करीत.”
५. आक्रमण झाल्यास, प्रतिकार करण्याकरता याकोबाने गादाच्या वंशजांना कशाप्रकारे उद्युक्त केले?
५ गादाचे वंशज अशा निरंतर दबावाला कशाप्रकारे तोंड देणार होते? कित्येक शतकांआधी त्यांच्या मरणासन्न पित्याने त्यांच्याविषयी असे भाकीत केले होते: “गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील; तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.” (उत्पत्ति ४९:१९) हे शब्द थोडे निराशावादी वाटतात. पण खरे पाहता, गादी वंशजांना त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांचा प्रतिकार करण्याची येथे आज्ञा देण्यात आली आहे. याकोबाने त्यांना हमी दिली की त्यांनी प्रतिकार केल्यास हल्लेखोर घाबरून पळून जातील आणि गाद त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.
आज आपल्या उपासनेच्या मार्गातील आव्हाने
६, ७. ख्रिश्चनांची स्थिती आज गाद वंशजांसारखी कशाप्रकारे आहे?
६ गादाच्या वंशाप्रमाणे आज ख्रिश्चनांना सैतानाच्या व्यवस्थीकरणातील दबावांना व ताणतणावांना तोंड द्यावे लागते; हा संघर्ष आपल्याला करावाच लागतो, त्यातून चमत्कारिकपणे सुटका होऊ शकत नाही. (ईयोब १:१०-१२) काहींना शालेय जीवनाच्या दबावांना तर इतरांना रोजगार कमवण्याच्या किंवा मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या दबावांना तोंड द्यावे लागते. तसेच काही दबाव वैयक्तिक किंवा आंतरिक असतात. काहींना गंभीर अपंगत्वाच्या किंवा आरोग्य समस्येच्या रूपात “शरीरात एक काटा” सहन करावा लागतो. (२ करिंथकर १२:७-१०) इतरांना न्यूनगंडाच्या भावनांनी पछाडलेले असते. वयस्क ख्रिश्चनांना म्हातारपणाचे ‘अनिष्ट दिवस’ आल्यामुळे एकेकाळी ते यहोवाच्या सेवेत करत होते तितके आता करता येत नाही.—उपदेशक १२:१.
७ प्रेषित पौल आपल्याला आणखी एका गोष्टीची आठवण करून देतो, ती म्हणजे, “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) आपल्याला सतत ‘जगाच्या आत्म्याचा’ अर्थात सैतान व त्याच्या दुरात्म्यांनी पसरवलेल्या विद्रोहाच्या व अनैतिकतेच्या प्रवृत्तींचा सामना करावा लागतो. (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२, ३) देवाला भिणाऱ्या लोटाप्रमाणे आपल्यालाही जगातील लोकांची अनैतिक बोलाचाल व कृत्ये यांमुळे दुःख होत असेल. (२ पेत्र २:७) सैतानाच्या थेट हल्ल्याचाही आपल्याला सामना करावा लागू शकतो. सैतान ‘देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या व येशूविषयी साक्ष देणाऱ्या’ अभिषिक्त जनांच्या शेषवर्गासोबत लढाई करत आहे. (प्रकटीकरण १२:१७) येशूच्या ‘दुसऱ्या मेंढरांनाही’ प्रतिबंध व छळाच्या रूपात सैतानाच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागते.—योहान १०:१६.
हात टेकायचे की प्रतिकार करायचा?
८. सैतानाच्या हल्ल्यांना आपण कशाप्रकारे तोंड द्यावे आणि का?
८ सैतानाच्या हल्ल्यांना आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी? प्राचीन काळातील गाद वंशजांप्रमाणे आपण देवाच्या निर्देशनांनुसार, आध्यात्मिकरित्या बळकट राहून प्रतिकार केला पाहिजे. दुःखाने म्हणावे लागते, की काहीजण जीवनाच्या दबावांपुढे हात टेकून आध्यात्मिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. (मत्तय १३:२०-२२) एका मंडळीतील सभांची उपस्थिती कमी का होती याविषयी त्याच मंडळीतील एका साक्षीदाराने असे म्हटले: “बांधव थकून जात आहेत. जीवनाच्या ताणतणावांनी सगळे बेजार झाले आहेत.” लोकांना आज अनेक कारणांमुळे थकून गेल्यासारखे वाटते हे कबूल आहे. त्यामुळे देवाची उपासनाही आणखी एक दबाव, एक अतिरिक्त ओझे आहे असा विचार करण्याची प्रवृत्ती सहज येऊ शकते. पण हा एक निकोप अथवा योग्य दृष्टिकोन आहे का?
९. ख्रिस्ताचे जू स्वीकारल्यामुळे विसावा कशाप्रकारे मिळू शकतो?
९ येशूच्या काळातील लोक देखील जीवनाच्या दबावांनी जर्जर झाले होते; त्यांना येशूने काय म्हटले हे विचारात घ्या: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” देवाच्या सेवेत काही तडजोड करून एका व्यक्तीला विसावा मिळू शकतो असे त्याने सुचवले का? उलट येशूने म्हटले: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” जू म्हणजे लाकडापासून अथवा धातूपासून बनवलेला दांडा ज्याच्या साहाय्याने माणूस अथवा पशू एक जड ओझे वाहून नेऊ शकतो. मग कोणालाही असे जू का स्वीकारावेसे वाटेल? आधीच आपण “भाराक्रांत” नाही का? होय, पण मूळ ग्रीकमध्ये हे वाक्य असेही वाचता येते: “माझ्यासोबत माझ्या जुवाखाली या.” विचार करा, येशू आपले ओझे वाहण्यास आपली मदत करण्याचे सुचवत आहे! आपल्याला ही ओझी एकट्याने वाहण्याची गरज नाही.—मत्तय ९:३६; ११:२८, २९, NW, तळटीप; २ करिंथकर ४:७.
१०. देवाला गौरव देण्याच्या आपल्या प्रयत्नांमुळे काय परिणाम होतो?
१० आपण शिष्यत्वाचे हे जू स्वीकारतो तेव्हा खरे तर सैतानाचा प्रतिकार करत असतो. याकोब ४:७ आपल्याला आश्वासन देते: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.” अर्थात, हे अगदी सोपे आहे असे नाही. देवाची सेवा करण्याकरता बरेच परिश्रम करावे लागतात. (लूक १३:२४) पण स्तोत्र १२६:५ येथे बायबल हे आश्वासन देते: “जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करितात ते हर्षाने कापणी करितील.” होय, आपण ज्याची उपासना करतो तो एक कृतघ्न देव नाही. तर “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा” आणि त्याचे गौरव करणाऱ्यांना आशीर्वाद देणारा आहे.—इब्री लोकांस ११:६.
राज्य प्रचारक या नात्याने देवाचे गौरव करणे
११. क्षेत्र सेवाकार्य हे सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास कशाप्रकारे सहायक ठरते?
११ येशूने आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” देवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे आपले प्रचार कार्य होय. (मत्तय २८:१९; इब्री लोकांस १३:१५) सैतानाच्या हल्ल्यांविरुद्ध आपल्या प्रतिकारयंत्रणेत, अर्थात आपल्या ‘शस्त्रसामग्रीत’ ‘शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता चढवलेले पाय’ अविभाज्यपणे सामील आहेत. (इफिसकर ६:११-१५) क्षेत्र सेवाकार्यात देवाची स्तुती करणे हा आपल्या विश्वासाला पुष्टी देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. (२ करिंथकर ४:१३) यामुळे नकारात्मक विचारांपासून आपण मुक्त राहू शकतो. (फिलिप्पैकर ४:८) क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळे आपल्याला सह उपासकांसोबत उभारणीकारक संगतीचा आनंद घेण्याची संधी मिळते.
१२, १३. क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेतल्याने कुटुंबांना कोणता फायदा मिळू शकतो? उदाहरण द्या.
१२ प्रचार कार्य हे सबंध कुटुंबाने मिळून करण्यासारखे आनंददायक काम आहे. लहान मुलांना समतोल प्रमाणात विरंगुळ्याची गरज ही असतेच. पण क्षेत्र सेवेत सर्वांनी मिळून काम करताना ते त्रासदायक अथवा कंटाळवाणे काम असण्याची गरज नाही. आईवडील आपल्या मुलांना सेवाकार्यात अधिक परिणामकारक होण्याचे प्रशिक्षण देण्याद्वारे हे कार्य त्यांच्याकरता अधिक आनंददायक बनवू शकतात. एखादी गोष्ट चांगली जमली की मुले आपोआपच त्यात रस घेतात, नाही का? तेव्हा समजूतदारपणा दाखवून, लहान मुलांना त्यांच्या मर्यादेपलीकडे झटायला न लावण्याद्वारे आईवडील त्यांना सेवाकार्यातून आनंद मिळवण्यास मदत करू शकतात.—उत्पत्ति ३३:१३, १४.
१३ यासोबतच, एकत्र मिळून देवाचे गुणगान करणाऱ्या कुटुंबात आपसांतील नाती बळकट होतात. एका बहिणीचे उदाहरण पाहा. विश्वासात नसणाऱ्या तिच्या पतीने तिला सोडून दिले, तेव्हा त्यांच्या पाच मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर आली. तिच्यासमोर नोकरी शोधून आपल्या मुलांचे पोट भरण्याचे आव्हान उभे ठाकले. या कठीण परिस्थितीमुळे हतबल होऊन तिने आपल्या मुलांच्या आध्यात्मिक हिताकडे दुर्लक्ष केले का? ती सांगते: “मी बायबल व बायबल आधारित प्रकाशनांचा मनःपूर्वक अभ्यास करून जे वाचले त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असे. सभांना व घरोघरच्या सेवाकार्यात मी त्यांना न चुकता घेऊन जात असे. या सर्व मेहनतीचे काय फळ मिळाले? माझ्या पाचही मुलांचा बाप्तिस्मा झाला आहे.” याचप्रकारे सेवाकार्यात पुरेपूर सहभाग घेतल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्यास मदत मिळेल.—इफिसकर ६:४.
१४. (अ) लहान मुले शाळेत देवाचे गौरव कसे करू शकतात? (ब) “सुवार्तेची लाज” वाटू नये म्हणून तरुणांनी काय केले पाहिजे?
१४ मुलांनो, तुमच्या देशात कायद्यानुसार शाळेत प्रचार करण्यास परवानगी असल्यास तुम्ही आपल्या शाळासोबत्यांना साक्ष देण्याद्वारे देवाचे गौरव करता का, की मनुष्याच्या भयाला स्वतःवर प्रबल होऊ देता? (नीतिसूत्रे २९:२५) प्वेर्त रिको येथे एका १३ वर्षांच्या साक्षीदार मुलीने लिहिले: “मला शाळेत प्रचार करण्याची कधीच लाज वाटली नाही कारण हेच सत्य आहे हे मला माहीत आहे. वर्गात नेहमी हात वर करून बायबलमधून मी काय शिकले हे सांगते. कधी फावला वेळ असल्यास मी लायब्ररीत जाऊन तरुण लोक विचारतात हे पुस्तक वाचते.”a यहोवाने तिच्या परिश्रमांवर आशीर्वाद दिला का? ती सांगते: “कधीकधी माझे वर्गसोबती मला प्रश्न विचारतात आणि या पुस्तकाची प्रतही मागतात.” या बाबतीत पाऊल उचलण्यास जर आतापर्यंत तुम्ही कचरत असाल, तर कदाचित तुम्हाला परिश्रमपूर्वक वैयक्तिक अभ्यास करण्याद्वारे “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे” याची स्वतःला खात्री पटवणे आवश्यक असेल. (रोमकर १२:२) आपण जे शिकलो तेच सत्य आहे याची खात्री पटल्यावर तुम्हाला कधीही “सुवार्तेची लाज” वाटणार नाही.—रोमकर १:१६.
सेवेचे “कार्य साधण्याजोगे द्वार”
१५, १६. काही ख्रिश्चनांनी कोणत्या ‘कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ प्रवेश केला आहे, आणि यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
१५ प्रेषित पौलाने लिहिले की त्याच्याकरता “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार . . . उघडले आहे.” (१ करिंथकर १६:९) तुमची परिस्थिती देखील तुम्हाला अशाच कार्य साधण्याजोग्या द्वारातून प्रवेश करण्यास परवानगी देते का? उदाहरणार्थ, सामान्य अथवा सहायक पायनियर सेवाकार्यात सहभागी होण्याकरता दर महिन्यात ७० किंवा ५० तास प्रचार कार्यात खर्च करावे लागतात. साहजिकच पायनियरांच्या या विश्वासू सेवेबद्दल सह ख्रिस्ती बांधव त्यांचे कौतुक करतात. पण सेवाकार्यात आपण इतरांपेक्षा अधिक वेळ खर्च करतो म्हणून आपण आपल्या बंधूभगिनींपेक्षा श्रेष्ठ आहोत असा ते कधीही विचार करत नाहीत. त्याऐवजी ते येशूने प्रोत्साहन दिल्याप्रमाणे अशी वृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करतात, की “आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे.”—लूक १७:१०.
१६ पायनियर सेवा करण्याकरता आत्मानुशासन, वैयक्तिक समायोजन, आणि आत्मत्यागी वृत्तीची गरज आहे. पण यामुळे मिळणारे आशीर्वाद मात्र या सर्व त्यागांपेक्षा वरचढ आहेत. तामीका नावाची एक तरुण पायनियर बहीण म्हणते की “देवाच्या सत्य वचनाचा नीट उपयोग करण्यात मला निपुण होता आले हा खरोखर एक आशीर्वाद आहे. पायनियर कार्य करताना सतत बायबलचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे आता जेव्हा मी घरोघरच्या कार्यात जाते तेव्हा प्रत्येक घरमालकासाठी योग्य असे शास्त्रवचन मला चटकन सुचते.” (२ तीमथ्य २:१५) मायका नावाची आणखी एक पायनियर बहीण म्हणते: “सत्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम पाहता येणे हा आणखी एक अद्भुत आशीर्वाद आहे.” मॅथ्यू नावाचा एक तरुण देखील “एखादी व्यक्ती सत्यात येते हे पाहण्याच्या” आनंदाविषयी सांगतो. तो म्हणतो, “यापरता दुसरा आनंद नाही.”
१७. एका ख्रिस्ती व्यक्तीने पायनियरींगविषयी असलेल्या नकारात्मक भावनांवर कशाप्रकारे मात केली?
१७ तुम्ही पायनियर सेवा हाती घेण्याचा विचार करू शकता का? कदाचित तुम्हाला इच्छा असेल पण आपल्याला जमेल का असे वाटत असेल. केन्याटे नावाच्या एका तरुण बहिणीने कबूल केले, की “पायनियरींगविषयी माझा सुरवातीला नकारात्मक दृष्टिकोन होता. आपण या कार्याकरता योग्य आहोत असे मला वाटत नव्हते. प्रस्तावना कशा तयार करायच्या किंवा शास्त्रवचनांतून कशाप्रकारे चर्चा करायची हे मला माहीत नव्हते.” पण वडिलांनी एका अनुभवी पायनियर बहिणीला तिच्यासोबत कार्य करण्यास नेमले. केन्याटे सांगते: “तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. यानंतर मलाही पायनियर सेवा करावी असे वाटू लागले.” थोडे प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळाल्यास कदाचित तुम्हालाही पायनियर सेवा करावी असे वाटू लागेल.
१८. मिशनरी सेवेत पदार्पण करणाऱ्यांना कोणते आशीर्वाद मिळू शकतात?
१८ पायनियर सेवा केल्यामुळे तुम्हाला सेवेचे इतर विशेषाधिकार देखील मिळू शकतील. उदाहरणार्थ, काही विवाहित जोडपी विदेशात प्रचार करण्याकरता पाठवले जाण्यासाठी, मिशनरी प्रशिक्षण मिळवण्याकरता योग्य ठरू शकतात. मिशनऱ्यांना नव्या देशातील जीवन, नवी भाषा, नवी संस्कृती, नव्या खाण्यापिण्याच्या सवयी या सर्व गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. पण या कार्यातून मिळणाऱ्या आशीर्वादांच्या तुलनेत या गैरसोयी नगण्य वाटतात. मेक्सिको येथे एक अनुभवी मिशनरी असणाऱ्या मिल्ड्रेड नावाच्या भगिनी म्हणतात: “मिशनरी होण्याच्या माझ्या निर्णयाचा मला कधीही पस्तावा झाला नाही. अगदी लहान होते तेव्हापासून हे माझे स्वप्न होते.” त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत? “घरी असताना, एक बायबल अभ्यासही मिळवणे कठीण वाटायचे. पण इथे, एकाच वेळी चार विद्यार्थ्यांनी एकदाच प्रचार कार्यास सुरवात केल्याचे मला आठवते!”
१९, २०. बेथेल सेवा, आंतरराष्ट्रीय सेवा आणि सेवा प्रशिक्षण सेवा यामुळे अनेकांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
१९ यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरांत बेथेल सेवा करणाऱ्यांनाही अनेक समृद्ध आशीर्वाद अनुभवण्यास मिळतात. जर्मनी येथे सेवा करणाऱ्या स्वेन नावाच्या एक तरुण बांधवाने बेथेल सेवेविषयी असे म्हटले: “आपण चिरस्थायी मोलाचे असे काहीतरी करत आहोत अशी जाणीव होते. मी जगातही माझ्या कौशल्यांचा उपयोग करू शकलो असतो. पण असे करणे, लवकरच दिवाळखोर होणार असलेल्या बँकेत पैसा साठवण्यासारखे झाले असते.” अर्थात, बिनपगारी स्वयंसेवक होऊन सेवा करणे हा एक त्यागच आहे. पण स्वेन म्हणतो: “घरी आल्यावर, आपण आज दिवसभर जे काही केलं ते सर्व यहोवाकरता केल्याचं समाधान मनात असतं. हा आनंद ‘निराळाच’ आहे.”
२० काही बांधवांना वेगवेगळ्या देशांत जाऊन शाखा दप्तरांच्या बांधकामात आंतरराष्ट्रीय सेवा करण्याचा आशीर्वाद अनुभवण्यास मिळाला आहे. एक जोडपे ज्यांनी आठ विदेशी नेमणुकांमध्ये सेवा केली आहे त्यांनी असे लिहिले: “इथले बांधव खूप चांगले आहेत. त्यांना सोडून जाताना खूप कठीण जाईल—आता आठ वेळा हा हृदयद्रावक अनुभव आम्ही सहन केला आहे. पण काय अद्भुत अनुभव होता हा!” याशिवाय सेवा प्रशिक्षण प्रशाला देखील आहे. ही प्रशाला सुयोग्य अविवाहित बांधवांना आध्यात्मिक प्रशिक्षण देते. या प्रशालेतून पदवीधर झालेल्या एका बांधवाने लिहिले: “या विलक्षण प्रशिक्षणाबद्दल तुमचे कोणत्या शब्दात आभार मानावे हेच मला कळत नाही. दुसरी कोणती संघटना अशाप्रकारचे प्रशिक्षण देऊ शकते?”
२१. देवाची सेवा करत असताना सर्व ख्रिश्चनांना कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते?
२१ होय, कार्य साधण्याजोगे अनेक द्वार आहेत. अर्थात, आपल्यापैकी बहुतेकजण बेथेलमध्ये किंवा विदेशात सेवा करू शकत नाहीत. येशूने स्वतःच सांगितले होते की ख्रिस्ती वेगवेगळ्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रमाणात “फळे” उत्पन्न करतील. (मत्तय १३:२३) तर मग ख्रिस्ती या नात्याने, आपल्या परिस्थितीचा सदुपयोग करून—आपल्याला शक्य होईल तितक्या उत्तमप्रकारे यहोवाच्या सेवेत सहभागी होण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. असे आपण करतो तेव्हा आपण यहोवाचे गौरव करत असतो; आणि यामुळे त्याला आनंद होईल याची खात्री आपण बाळगू शकतो. एका नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या एथेल नावाच्या वृद्ध भगिनीचे उदाहरण पाहा. त्या नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या सह निवाशांना नियमितपणे साक्ष देतात आणि टेलिफोन साक्षकार्य देखील करतात. बऱ्याच असमर्थता असूनही त्या पूर्ण मनाने सेवा करत आहेत.—मत्तय २२:३७.
२२. (अ) आणखी कोणत्या मार्गांनी आपण देवाचे गौरव करू शकतो? (ब) आपल्यासमोर कोणत्या अद्भुत काळाची प्रत्याशा आहे?
२२ पण प्रचार कार्य हा यहोवाचे गौरव करण्याचा केवळ एक मार्ग आहे हे विसरू नका. कामाच्या ठिकाणी, शाळेत व घरी उत्तम आचरण व पेहराव राखण्याद्वारे देखील आपण यहोवाचे मन आनंदित करतो. (नीतिसूत्रे २७:११) नीतिसूत्रे २८:२० आपल्याला हे आश्वासन देते: “स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते.” म्हणूनच देवाच्या सेवेत आपण “सढळ हाताने” पेरणी केली पाहिजे कारण असे केल्यास आपल्याला भरपूर आशीर्वादांची कापणी करता येईल हे आपल्याला माहीत आहे. (२ करिंथकर ९:६) असे केल्यास आपण तो अद्भुत काळ आपल्या डोळ्यांनी पाहू जेव्हा “प्रत्येक प्राणी” यहोवाचे गौरव करील, ज्याकरता तो अगदी पात्र आहे!—स्तोत्र १५०:६.
[तळटीप]
a तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.
तुम्हाला आठवते का?
• यहोवाचे सेवक कशाप्रकारे “अहोरात्र” त्याची सेवा करतात?
• गाद वंशाच्या लोकांसमोर कोणते आव्हान होते आणि यावरून ख्रिस्ती आज कोणता धडा घेऊ शकतात?
• सेवाकार्यामुळे आपल्याला सैतानाच्या हल्ल्यांपासून संरक्षण कशाप्रकारे मिळते?
• काहींनी कोणत्या ‘खुल्या द्वारांतून’ प्रवेश केला आहे आणि असे केल्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
[१५ पानांवरील चित्र]
गादाच्या वंशजांनी हल्लेखोरांचा सामना केला त्याप्रमाणे ख्रिश्चनांनी देखील सैतानाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे
[१७ पानांवरील चित्र]
क्षेत्र सेवाकार्यात आपण उभारणीकारक सहवासाचा आनंद घेऊ शकतो
[१८ पानांवरील चित्रे]
पायनियर सेवेमुळे इतर प्रकारच्या सेवेचे द्वार खुले होऊ शकते, उदाहरणार्थ:
१. आंतरराष्ट्रीय सेवा
२. बेथेल सेवा
३. मिशनरी सेवा