जीवनाच्या धावेवर हार मानू नका!
“आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—इब्री लोकांस १२:१.
१, २.या शेवटल्या काळात यहोवाचे सेवक कोणत्या घटनांमुळे रोमांचित झाले आहेत?
आपण आणीबाणीच्या आणि कठीण काळात जगत आहोत. सन १९१४ मध्ये देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने येशू ख्रिस्त सिंहासनाधिष्ठ झाला आहे, या गोष्टीला आता ८० पेक्षा अधिक वर्षे उलटून गेली आहेत. ‘प्रभूच्या दिवसासोबत’ या व्यवस्थीकरणाच्या ‘अंतसमयास’ सुरवात झाली. (प्रकटीकरण १:१०; दानीएल १२:९) तेव्हापासून जीवनाकरता असलेली ख्रिश्चनांची धाव आणखीन निकडीची बनली आहे. यहोवाच्या स्वर्गीय रथासोबत राहण्याकरता देवाच्या सेवकांनी मोठ्या आवेशाने प्रयत्न केले आहेत; हा रथ त्याची स्वर्गीय संघटना असून ती यहोवाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अग्रेसर आहे.—यहेज्केल १:४-२८; १ करिंथकर ९:२४.
२ सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या या ‘धावेवर धावत’ असताना देवाच्या लोकांना आनंद मिळाला आहे का? होय, अर्थातच! येशूच्या बांधवांच्या शेष जणांचे एकत्रिकरण पाहून ते रोमांचित झाले आहेत तसेच १,४४,००० जणांच्या शेषांवर अखेरचा शिक्का मारण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे, हे जाणल्याने ते हर्षित होतात. (प्रकटीकरण ७:३, ४) याशिवाय, त्यांना हे जाणून फार आनंद होतो, की यहोवाने नियुक्त केलेल्या राजाने “पृथ्वीचे पीक” काढण्यासाठी विळा चालवला आहे. (प्रकटीकरण १४:१५, १६) आणि पीक खरोखरच फार आहे! (मत्तय ९:३७) अद्याप ५० लाखांपेक्षा अधिक जणांना एकत्रित करण्यात आले आहे—“सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय.” (प्रकटीकरण ७:९) हा समुदाय कोणालाही मोजता येणे शक्य नसल्यामुळे अखेरीस त्याचा विस्तार किती होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.
३.कोणत्या प्रकारचे अडथळे असतानाही आपण आनंदी आत्मा विकसित करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे?
३ हे खरे आहे, की आपण जीवनाच्या धावेवरील वेग वाढवतो तेव्हा सैतान आपल्यासमोर अडथळा आणण्याचा किंवा आपल्याला मंद करण्याचा प्रयत्न करतो. (प्रकटीकरण १२:१७) शेवटल्या काळाला चिन्हित करणारी युद्धे, दुष्काळ, मरी आणि यांसारख्या इतर कठीण परिस्थितींत तग धरणे इतके सोपे नाही. (मत्तय २४:३-९; लूक २१:११; २ तीमथ्य ३:१-५) तरी देखील, ही धाव समारोपास येत असता आपल्याला आनंद होतो. पौलाने त्याच्या समकालीन सहख्रिश्चनांना आर्जवल्याप्रमाणे आपणही तशाच प्रकारचा आत्मा दाखविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४.
४. फिलिप्पैकर ख्रिश्चनांनी कोणत्या प्रकारचा आत्मा प्रदर्शित केला?
४ यामध्ये कोणतीही शंका नाही, की पौलाने ज्या ख्रिश्चनांना वरीलप्रमाणे सल्ला दिला ते त्यांच्या विश्वासात आनंद करत होते कारण पौलाने त्यांना म्हटले: “प्रभूमध्ये आनंद [“करीत राहा,” NW] करा.” (फिलिप्पैकर ३:१) फिलिप्पैकरांची मंडळी उदार तसेच प्रेमळ होती आणि तिने मोठ्या आवेशाने व उत्साहाने सेवाकार्य पार पाडले. (फिलिप्पैकर १:३-५; ४:१०, १४-२०) पण पहिल्या शतकातील सर्वच ख्रिश्चनांकडे तशा प्रकारचा आत्मा नव्हता. उदाहरणार्थ, इब्री लोकांस या पुस्तकात पौलाने ज्या यहुदी ख्रिश्चनांना लिहिले त्यांपैकी काही लोकांची त्याला चिंता लागली होती.
‘विशेष लक्ष द्या’
५.(अ) पहिल्या ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हा हिब्रू ख्रिश्चनांचा कोणता आत्मा होता? (ब) सा.यु. ६० च्या दरम्यान असलेल्या काही हिब्रू ख्रिश्चनांच्या अवस्थेचे वर्णन करा.
५ जगाच्या इतिहासातील सर्वात पहिली मंडळी शारीरिक यहुदी आणि यहूदीय मतानुसारी यांची मिळून बनली होती आणि तिची स्थापना सा.यु. ३३ मध्ये जेरूसलेम शहरात झाली. तिच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आत्मा होता? छळ असतानाही त्या मंडळीचा उत्साह आणि आनंद कशा प्रकारचा होता, याची कल्पना प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या अगदी सुरवातीच्या अध्यायांचे वाचन केल्यामुळे एखाद्याला येते. (प्रेषितांची कृत्ये २:४४-४७; ४:३२-३४; ५:४१; ६:७) पण काळाच्या ओघात परिस्थितीमध्ये बदल झाला आणि कित्येक यहुदी ख्रिश्चनांची जीवनाच्या धावेवरील धाव मंदावली. एक संदर्भ पुस्तक सा.यु. ६० च्या दरम्यान त्यांच्या स्थितीविषयी असे म्हणते: “आळस आणि कंटाळा, पूर्ण न झालेल्या अपेक्षा, लांबणीवर पडलेली आशा, हेतुतः अयशस्वी होण्याची आणि पदोपदी अविश्वासाची अवस्था. ते ख्रिस्ती होते, तरी देखील बोलावणे आल्यामुळे त्यांना मिळालेल्या मोठेपणाची त्यांनी इतकी कदर बाळगली नाही.” अभिषिक्त ख्रिश्चनांची अशी अवस्था कशामुळे झाली? इब्री लोकांस (सुमारे सा.यु. ६१ मध्ये लिहिण्यात आले) पौलाद्वारे लिहिण्यात आलेल्या पत्रातील काही भागाचा विचार केल्याने आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होते. या विचारामुळे आज आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या दुर्बळ आध्यात्मिक अवस्थेत बुडण्याचे टाळण्यास मदत होईल.
६.मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन असलेली उपासना आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासावर आधारित उपासना यांमधील काही फरक कोणते आहेत?
६ हिब्रू ख्रिस्ती, यहुदी धर्मातून बाहेर पडले होते; यहोवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रानुसार चालण्याचा दावा करणारी ही व्यवस्था होती. असे वाटत होते, की या नियमशास्त्राची अद्यापही अनेक यहुदी ख्रिश्चनांवर पकड होती, कदाचित यामुळे की अनेक शतकांपर्यंत यहोवाची उपासना करण्याची हीच एकमेव पद्धत राहिली होती आणि ही उपासनेची एक परिणामकारक पद्धत होती; याजकपद, नियमित अर्पण आणि जगप्रसिद्ध जेरूसलेमचे मंदिर, हे या पद्धतीचे भाग होते. पण ख्रिस्ती विश्वास निराळाच होता. तो मोशेप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाची अपेक्षा करतो, “त्याची दृष्टी [भवितव्यातील] प्रतिफळावर होती” आणि “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२६, २७) हे स्पष्ट आहे, की अनेक यहुदी ख्रिश्चनांकडे अशा प्रकारच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाची उणीव होती. उद्देशपूर्ण पद्धतीने धावण्याऐवजी ते दोन विचारांमध्ये लटपटत होते.
७.आपण जीवनाची धाव ज्याप्रकारे धावतो त्यावर आपण बाहेर पडलेल्या या व्यवस्थीकरणाचा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो?
७ आजही अशा प्रकारची परिस्थिती आहे का? आजची परिस्थिती अगदीच तशी नाही. तरी देखील, पुष्कळ काही साध्य केल्याची फुशारकी मारणाऱ्या या व्यवस्थीकरणातून ख्रिस्ती बाहेर पडतात. हे जग रोमांचकारी संधी पुरवते, पण त्यासोबत ते लोकांवर अवजड जबाबदारी देखील लादते. याखेरीज, आपल्यांपैकी अनेक जण अशा देशांत राहतात जेथे संशयखोर मनोवृत्ती अगदी सामान्य आहे आणि स्वार्थी, मी-पणा, अशी तेथील लोकांची प्रवृत्ती आहे. जर आपण अशा व्यवस्थीकरणामुळे स्वतःला प्रभावित होऊ दिले तर आपले ‘अंतःचक्षू’ अगदी सहजगत्या निस्तेज होऊ शकतात. (इफिसकर १:१८) आपण कोठे जात आहोत हे स्पष्टपणे दिसत नसले तर आपण जीवनाची धाव तरी कशी धावणार?
८.ख्रिस्ती विश्वास, नियमशास्त्राच्या अधीन उपासनेपेक्षा कोणत्या काही प्रकारे श्रेष्ठ आहे?
८ यहुदी ख्रिश्चनांना उत्तेजन देण्यासाठी पौलाने मोशेच्या नियमशास्त्राऐवजी ख्रिस्ती व्यवस्थेच्या श्रेष्ठत्वाकडे त्यांचे लक्ष वेधले. हे खरे आहे, की जेव्हा नियमशास्त्राच्या अधीन असलेले शारीरिक इस्राएलाचे राष्ट्र यहोवाच्या लोकांनी बनले होते तेव्हा यहोवा प्रेरित संदेष्ट्यांद्वारे त्या राष्ट्राशी बोलला. पण पौल म्हणतो, की आज तो त्याच्या ‘पुत्राच्याद्वारे बोलतो, त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले.’ (इब्री लोकांस १:२) याशिवाय, येशू दावीदाच्या वंशावळीतील सर्व राजांपेक्षा, आपल्या “सोबत्यापेक्षा” श्रेष्ठ आहे. तो देवदूतांपेक्षाही उच्च आहे.—इब्री लोकांस १:५, ६, ९.
९.पौलाच्या दिवसांतील यहुदी ख्रिश्चनांप्रमाणे, जे यहोवा म्हणतो त्याकडे आपल्यालाही ‘विशेष लक्ष देण्याची’ आवश्यकता का आहे?
९ यामुळे पौलाने यहुदी ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.” (इब्री लोकांस २:१) खरे तर, ख्रिस्ताविषयी जाणून घेणे, हा एक महान आशीर्वादच होता तरी देखील आणखी पुष्कळ काही करायचे होते. सभोवतालच्या यहुदी जगाच्या प्रभावाला शह देण्यासाठी त्यांना देवाच्या वचनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता होती. जगाच्या मतप्रसाराचा आपल्यावर सतत भडिमार होत असल्यामुळे यहोवा जे सांगत आहे त्याकडे आपण “विशेष लक्ष” देण्याची गरज आहे. अभ्यासाची चांगली सवय विकसित करणे आणि बायबल वाचनाचे चांगले वेळापत्रक राखणे असा याचा अर्थ होतो. जसे पौल इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात नंतर असे म्हणतो, की नियमितपणे सभांना उपस्थित राहणे आणि इतरांना आपल्या विश्वासाविषयी सांगणेही त्यात अंतर्भूत आहे. (इब्री लोकांस १०:२३-२५) असे केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिकरीत्या जागरूक राहण्यास मदत होईल जेणेकरून आपली वैभवी आशा आपल्या दृष्टिआड होणार नाही. आपण आपले मन यहोवाच्या विचारांनी भरत राहिल्यास, हे जग आपल्याशी कसेही वागत असले तरी आपण दडपून जाणार नाही किंवा डगमगणार नाही.—स्तोत्र १:१-३; नीतिसूत्रे ३:१-६.
‘एकमेकांना बोध करत राहा’
१०.(अ) एखादा यहोवाच्या वचनाकडे विशेष लक्ष देत नसल्यास त्याला काय होऊ शकते? (ब) ‘एकमेकांना बोध करणे’ आपल्याला कसे शक्य आहे?
१० आपण आध्यात्मिक गोष्टींकडे चांगल्याप्रकारे लक्ष दिले नाही, तर देवाची अभिवचने आपल्याला काल्पनिक वाटू लागतील. असे पहिल्या शतकात देखील झाले होते जेव्हा मंडळ्या पूर्णपणे अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मिळून बनल्या होत्या आणि काही प्रेषित तेव्हा हयात देखील होते. पौलाने इब्री लोकांना असा इशारा दिला: “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये म्हणून जपा. जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतु हा की, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये.” (इब्री लोकांस ३:१२, १३) “जपा,” ही पौलाने वापरलेली अभिव्यक्ती सावध राहण्याच्या गरजेवर जोर देते. धोका अद्यापही आहे! आपल्या अंतःकरणात अल्पविश्वास—‘पाप’—निर्माण होऊ शकते आणि आपण देवाच्या जवळ जाण्याऐवजी देवापासून दूर जाऊ शकतो, हा तो धोका आहे. (याकोब ४:८) ‘एकमेकांना बोध करत राहा,’ अशी आठवण पौल आपल्याला करून देतो. आपल्याला बंधुभावाच्या संगतीत स्नेहाची आवश्यकता आहे. “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” (नीतिसूत्रे १८:१) अशा प्रकारच्या सहवासाची आवश्यकता ख्रिश्चनांना मंडळीच्या सभांकरता, संमेलनांकरता आणि अधिवेशनांकरता उपस्थित राहण्यास चालना देते.
११, १२. केवळ मूलभूत ख्रिस्ती तत्त्वे जाणून घेण्यात आपण समाधान का मानू नये?
११ त्यानंतर पौल आपल्या पत्रात पुढील अनमोल सल्ला देतो: “वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरूरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहा. . . . ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.” (इब्री लोकांस ५:१२-१४) हे स्पष्ट आहे, की काही यहुदी ख्रिश्चनांनी त्यांची समज वाढवली नव्हती. ते नियमशास्त्राविषयी आणि सुंतेविषयी वाढत्या प्रकाशाचा स्वीकार करण्यात मंद झाले होते. (प्रेषितांची कृत्ये १५:२७-२९; गलतीकर २:११-१४; ६:१२, १३) काही जण कदाचित अद्यापही रूढीपरंपरांना जसे, की प्रत्येक आठवडी होणाऱ्या शब्बाथाला आणि वार्षिक प्रायश्चित्त दिनाला फार महत्त्व देत होते.—कलस्सैकर २:१६, १७; इब्री लोकांस ९:१-१४.
१२ यास्तव, पौलाने म्हटले: “आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.” (इब्री लोकांस ६:२) मॅरेथॉनचा धावपट्टू आपल्या आहाराकडे चांगल्याप्रकारे लक्ष देतो ज्यामुळे त्याला दूर पल्ल्याची आणि थकवा आणणारी शर्यत पूर्ण करणे शक्य होते. त्याचप्रमाणे एखादा ख्रिश्चन जो आध्यात्मिक पोषणाकडे चांगल्याप्रकारे लक्ष देतो—स्वतःला केवळ मूलभूत, ‘प्राथमिक बाबींपर्यंतच’ मर्यादित ठेवत नाही—जेणेकरून त्याला धाव कायम राखण्यास आणि ती पूर्ण करण्यास शक्य होईल. (पडताळा २ तीमथ्य ४:७.) म्हणजेच, सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” यांविषयी आस्था निर्माण करणे आणि अशा प्रकारे प्रौढतेप्रत वाटचाल करणे.—इफिसकर ३:१८.
“तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे”
१३.हिब्रू ख्रिश्चनांनी गतकाळात त्यांचा विश्वास कशा प्रकारे प्रकट केला?
१३ सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर लगेचच, कडा विरोध असतानाही यहुदी ख्रिस्ती दृढ राहिले. (प्रेषितांची कृत्ये ८:१) पौलाने पुढीलप्रमाणे लिहिले तेव्हा कदाचित त्याच्या मनामध्ये ही गोष्ट असावी: “पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” (इब्री लोकांस १०:३२) अशा प्रकारच्या विश्वासू सहनशक्तीमुळे देवाप्रती त्यांचे प्रेम प्रकट झाले आणि त्यांना त्याच्यासमोर धिटाईने बोलता आले. (१ योहान ४:१७) पौलाने त्यांना प्रोत्साहन दिले, की विश्वासाच्या उणिवेमुळे त्यांनी ती धिटाई सोडू नये. तो त्यांना आर्जवतो: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही.”—इब्री लोकांस १०:३५-३७.
१४.अनेक वर्षे यहोवाची सेवा केल्यानंतरही कोणत्या वास्तविकतांनी आपल्याला धीर धरण्यास मदत करावी?
१४ आज आपल्याबद्दल काय? जेव्हा आपण पहिल्यांदा ख्रिस्ती सत्य शिकलो तेव्हा आपल्यांपैकी बहुतेक जण फार आवेशी होते. आपल्याकडे अद्यापही तोच आवेश आहे का? किंवा आपण ‘आपली पहिली प्रीती सोडून दिली’ आहे? (प्रकटीकरण २:४) कदाचित हर्मगिदोनाची वाट पाहून काहीसे वैतागून आपण मंद झालो आहोत का? पण अंमळ थांबा आणि विचार करा. सत्य पहिल्यांदा जितके नवलाईचे होते तितकेच आज देखील आहे. येशू अद्यापही आपला स्वर्गीय राजा आहे. आजही, परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आपली आशा आहे आणि आजही आपला यहोवासोबत ऋणानुबंध आहे. ही गोष्ट कधीही विसरू नका: “तो येईल, उशीर करणार नाही.”
१५.येशूप्रमाणे, काही ख्रिश्चनांनी भयंकर छळ कशा प्रकारे सहन केला आहे?
१५ यास्तव, इब्री लोकांस १२:१, २ येथील पौलाचे शब्द अगदी उचित आहेत: “आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप [अल्पविश्वास] टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाच्या सेवकांनी या शेवटल्या काळात सहन केल्या आहेत. यातनामय मृत्यू सहन करेपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या येशूप्रमाणे आपल्या काही बंधुभगिनींनी भयंकर छळही विश्वासूपणे सहन केला आहे—तुरुंग छावणी, हालअपेष्टा, बलात्कार आणि मृत्यू सुद्धा. (१ पेत्र २:२१) आपण त्यांच्या सचोटीचा विचार करतो तेव्हा आपले अंतःकरण दाटून येत नाही का?
१६, १७.(अ) बहुतेक ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासाप्रती कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (ब) काय लक्षात ठेवल्याने आपल्याला जीवनाच्या धावेवर धावत राहण्यास मदत होईल?
१६ तथापि, बहुतेकांना पौलाचे शब्द लागू होतात: “तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.” (इब्री लोकांस १२:४) तरी देखील, या व्यवस्थीकरणामध्ये सत्याचा मार्ग आपल्यांपैकी कोणासाठीही इतका सोपा नाही. काही जण कामाच्या ठिकाणी किंवा शाळांमध्ये ‘पातक्यांच्या विरोधामुळे,’ त्यांची थट्टा केल्यामुळे अथवा पाप करण्याच्या दबावाला विरोध केल्यामुळे निराश झाले आहेत. (इब्री लोकांस १२:३) देवाच्या उच्च दर्जांना कायम ठेवण्याचा काही लोकांचा निर्धार तीव्र मोहामुळे नाहीसा झाला आहे. (इब्री लोकांस १३:४, ५) धर्मत्यागी लोकांनी अशा लोकांचे आध्यात्मिक संतुलन बिघडवले आहे ज्यांनी त्यांच्या विषारी मतप्रसाराकडे लक्ष दिले होते. (इब्री लोकांस १३:९) व्यक्तिमत्त्वातील विभिन्नतेमुळे देखील अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मनोरंजन आणि रिकामपणाच्या कार्यहालचालींवर अनावश्यक जोर दिल्याने काही ख्रिश्चनांचा उत्साह कमी झाला आहे. आणि या व्यवस्थीकरणात जगत असताना येणाऱ्या समस्यांच्या दबावाला बहुतेक लोक बळी पडत आहेत.
१७ हे खरे आहे, की यांपैकी कोणत्याही परिस्थितींत ‘रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार’ समाविष्ट नाही. काही परिस्थितींचा संबंध आपण केलेल्या चुकीच्या निर्णयांशी जोडला जाऊ शकतो. पण यांमुळे आपल्या विश्वासासमोर आव्हान उभे ठाकते. यामुळे आपण आपली दृष्टी सहनशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या येशूकडे लावली पाहिजे. आपण आपली आशा किती वैभवी आहे हे कधीही विसरू नये. ‘आपला शोध झटून करणाऱ्यांना यहोवा प्रतिफळ देतो,’ ही खात्री आपण केव्हाही गमावता कामा नये. (इब्री लोकांस ११:६) तेव्हा आपल्याकडे जीवनाच्या धावेवरून धावत राहण्यासाठी आध्यात्मिक शक्ती असेल.
आपण धीर धरू शकतो
१८, १९. कोणत्या ऐतिहासिक घटना हे दाखवून देतात, की जेरूसलेममधील हिब्रू ख्रिश्चनांनी पौलाच्या प्रेरित सल्ल्याकडे लक्ष दिले होते?
१८ पौलाच्या पत्राला यहुदी ख्रिश्चनांनी कसा प्रतिसाद दिला? इब्री लोकांना पत्र लिहिल्यानंतर सुमारे सहा वर्षांनी, यहुदामध्ये युद्ध चालू होते. सा.यु. ६६ मध्ये रोमी सैन्याने जेरूसलेमला वेढा घातला, ज्यामुळे येशूच्या पुढील शब्दांची पूर्णता झाली: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.” (लूक २१:२०) तथापि, त्यावेळी जेरूसलेममध्ये असतील अशा ख्रिस्ती लोकांच्या लाभास्तव येशूने म्हटले: “त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे येरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२१) यास्तव, रोमसोबतच्या युद्धामुळे एक पेचप्रसंग निर्माण झाला: यहुदी उपासना केंद्र आणि वैभवी मंदिराचे स्थान असलेले जेरूसलेम शहर ते यहुदी ख्रिस्ती सोडतील का?
१९ अचानक, कोणत्याही कारणाविना रोमी लोक परत गेले. देव आपल्या पवित्र शहराचे संरक्षण करत आहे, ही गोष्ट कदाचित धार्मिक यहुदी लोकांनी पुरावा म्हणून मानली असावी. ख्रिस्ती लोकांबद्दल काय? त्यांनी पलायन केले, असे इतिहास आपल्याला सांगतो. तेव्हा, सा.यु. ७० मध्ये रोमी परत आले आणि त्यांनी जेरूसलेमचा पूर्णपणे नाश करून अनेकांची हत्या केली. योएलने भाकीत केलेला ‘यहोवाचा दिवस’ जेरूसलेमवर आला होता. परंतु त्यावेळी विश्वासू ख्रिस्ती तेथे नव्हते. ते ‘निभावले होते.’—योएल २:३०-३२; प्रेषितांची कृत्ये २:१६-२१.
२०.‘यहोवाचा महान दिवस’ जवळ आहे, हे समजल्यामुळे आपल्याला काय करण्यास चालना मिळण्यास हवी?
२० आज, आपल्याला हे माहीत आहे, की ‘यहोवाचा महान दिवस’ या संपूर्ण व्यवस्थीकरणावर लवकरच येईल. (योएल ३:१२-१४) तो दिवस केव्हा येईल, हे आपल्याला माहीत नाही. पण देवाचे वचन आपल्याला अशी खात्री देते, की तो दिवस नक्की येईल! विलंब लागावयाचा नाही, असे यहोवा म्हणतो. (हबक्कूक २:३; २ पेत्र ३:९, १०) यामुळे “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष” देऊ या. अल्पविश्वास, अर्थात ‘आपल्याला गुंतवणारे पाप’ टाळू या. कितीही उशीर झाला तरी धीर धरण्याची आपण खूणगाठ बांधावी. हे लक्षात असू द्या, रथाप्रमाणे असणारी यहोवाची स्वर्गीय संघटना पुढे वाटचाल करत आहे. ही संघटना आपला उद्देश नक्की पूर्ण करील. या कारणास्तव आपण सर्वांनी जीवनाच्या धावेवर धावत राहावे आणि कधीही हार मानू नये!
तुम्हाला आठवते का?
◻ पौलाने फिलिप्पैकरांना दिलेल्या कोणत्या उत्तेजनाकडे लक्ष दिल्याने जीवनाच्या धावेवर धीराने धावण्यास आपल्याला मदत होईल?
◻ विचलित करणाऱ्या जगाच्या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आपल्याला काय मदत करील?
◻ धावेवरून धीराने धावण्यास आपण एकमेकांना कशा प्रकारे मदत करू शकतो?
◻ एखाद्या ख्रिश्चनाला मंद करू शकतील, अशा काही कोणत्या गोष्टी आहेत?
◻ धीर धरण्यास येशूचे उदाहरण आपल्याला कशी मदत करू शकते?
[९ पानांवरील चित्र]
धावपट्टूंप्रमाणे ख्रिश्चनांनी स्वतःला कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ देऊ नये
[१० पानांवरील चित्र]
यहोवाच्या महान वैभवी रथाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यात कोणतीही गोष्ट अडथळा आणू शकत नाही