यशया
५४ यहोवा म्हणतो: “हे स्त्री! मुलांना जन्म न दिलेल्या वांझ स्त्री! तू आनंदाने जयजयकार कर;+
प्रसूतीच्या वेदना माहीत नसलेली स्त्री,+ तू हर्षाने जयघोष कर!+
कारण नवरा* असलेल्या स्त्रीपेक्षा, सोडून दिलेल्या स्त्रीची मुलं जास्त आहेत.+
तुझ्या महान उपासना मंडपाचं कापड आणखी पसरव.
मागेपुढे पाहू नकोस, तुझ्या तंबूचे दोर आणखी लांब कर,
आणि तुझ्या तंबूच्या खुंट्या पक्क्या कर.+
३ कारण तुझ्या सीमा उजवीकडे आणि डावीकडे पसरतील.
तुझी संतती राष्ट्रांचा ताबा घेईल,
आणि ती ओसाड पडलेल्या शहरांमध्ये वस्ती करेल.+
४ घाबरू नकोस,+ कारण तू लज्जित होणार नाहीस.+
अपमानित झाल्यासारखं वाटून घेऊ नकोस, कारण तुझी निराशा होणार नाही.
तरुणपणी झालेली तुझी बदनामी तू विसरून जाशील,
आणि विधवा असल्यामुळे लागलेला कलंक तुला पुन्हा कधीही आठवणार नाही.”
५ “कारण तुझा महान निर्माणकर्ता+ तुला पतीसारखा* आहे,+
त्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे,
आणि इस्राएलचा पवित्र देव तुझा सोडवणारा आहे.+
त्याला संपूर्ण पृथ्वीचा देव म्हटलं जाईल.”+
६ तुझा देव म्हणतो: “सोडून दिलेल्या आणि मनातून फार दुःखी असलेल्या स्त्रीला जसं बोलावतात;+
तरुणपणी लग्न झालेल्या आणि नाकारलेल्या बायकोला जसं बोलावतात, तसं यहोवाने तुला बोलावलंय.
७ क्षणभरासाठी मी तुला सोडून दिलं होतं,
पण आता मोठ्या दयेने मी तुला परत आणीन.”+
८ तुझा सोडवणारा देव यहोवा म्हणतो:+ “मी रागाच्या भरात क्षणभरासाठी तुझ्यापासून तोंड फिरवलं होतं.+
पण आता मी तुझ्यावर दया करीन, कारण माझं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकणारं आहे.+
९ ही गोष्ट माझ्यासाठी नोहाच्या दिवसांसारखीच आहे.+
नोहाच्या काळात मी शपथ घेऊन म्हटलं होतं, की पुन्हा कधीच पृथ्वी जलप्रलयाने बुडणार नाही;+
तसं आताही मी शपथ घेऊन सांगतो, की पुन्हा कधीच माझा राग तुझ्यावर भडकणार नाही किंवा पुन्हा कधीच मी तुला शिक्षा करणार नाही.+
१० डोंगर नाहीसे होतील
आणि टेकड्या हादरतील.
पण तुझ्यावर असलेलं माझं एकनिष्ठ प्रेम कधीही नाहीसं होणार नाही,+
आणि मी केलेला शांतीचा करार कधीही मोडणार नाही,”+ असं तुझ्यावर दया करणारा देव यहोवा म्हणतो.+
११ “हे दुःखात असलेली,+ वादळाने झोडपलेली आणि सांत्वन न मिळालेली स्त्री,+
मी तुझे दगड कठीण चुन्याने* बसवीन,
आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन.+
१२ मी तुझ्या शहराच्या भिंतींचे बुरूज माणकांचे बनवीन.
मी तुझे दरवाजे चमकणाऱ्या रत्नांचे,*
आणि तुझ्या सीमा मौल्यवान दगडांच्या बनवीन.
१४ नीतिमत्त्वाच्या मजबूत पायावर तुझी स्थापना होईल.+
जाच-जुलमापासून तू फार दूर असशील.+
तुला कसलीच भीती वाटणार नाही आणि कोणीही तुला घाबरवणार नाही,
कारण भीती तुझ्या जवळपासही फिरकणार नाही.+
१५ कोणी तुझ्यावर हल्ला केला,
तर तो माझ्या आज्ञेवरून नसेल.
जो कोणी तुझ्यावर हल्ला करेल, त्याचा पराभव होईल.”+
१६ “पाहा! फुंकर मारून विस्तव पेटवणाऱ्या
आणि हत्यार घडवणाऱ्या लोहाराला मीच निर्माण केलंय.
नाश करणाऱ्या घातकी माणसालाही मीच निर्माण केलंय.+
१७ म्हणून तुझ्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही,+
आणि तुझ्यावर आरोप लावणारी प्रत्येक जीभ तू दोषी ठरवशील.
हाच यहोवाच्या सेवकांचा वारसा आहे.
माझ्या नजरेत ते नीतिमान आहेत,” असं यहोवा म्हणतो.+