एज्रा
१ यहोवाने यिर्मयाद्वारे बोललेले शब्द+ पूर्ण व्हावेत म्हणून, पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी, यहोवाने त्याचं मन प्रेरित केलं. तेव्हा, राजाने आपल्या संपूर्ण राज्यात एक घोषणा केली आणि त्याने ती लेखी रूपातही+ पाठवली. ती घोषणा अशी होती:
२ “पर्शियाचा राजा कोरेश म्हणतो, ‘स्वर्गाचा देव यहोवा याने पृथ्वीवरची सगळी राज्यं माझ्या हातात दिली आहेत+ आणि त्याने मला यहूदा इथल्या यरुशलेममध्ये त्याच्यासाठी एक मंदिर* बांधण्याची आज्ञा दिली आहे.+ ३ म्हणून, त्याच्या लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल, त्याचा देव त्याच्यासोबत असो. त्याने यहूदा इथल्या यरुशलेमला जावं आणि इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधावं. तोच खरा देव आहे आणि त्याचं मंदिर यरुशलेममध्ये होतं.* ४ या सबंध राज्यात जो विदेशी म्हणून कोणत्याही ठिकाणी राहत असेल,+ त्याच्या शेजाऱ्यांनी* त्याला सोनंचांदी, गुरंढोरं आणि सामानसुमान देऊन मदत करावी. तसंच, यरुशलेम इथे असलेल्या खऱ्या देवाच्या मंदिरासाठी त्यांनी स्वेच्छेने अर्पणंही द्यावीत.’”+
५ तेव्हा यहूदा आणि बन्यामीन यांच्या कुळांचे प्रमुख, तसंच याजक व लेवी, म्हणजे खऱ्या देवाने ज्यांचं मन प्रेरित केलं ते सगळे, यरुशलेममध्ये असलेलं यहोवाचं मंदिर पुन्हा बांधायला जाण्यासाठी तयारीला लागले. ६ त्यांच्या आसपास राहणाऱ्या सर्व लोकांनी त्यांना सोन्याचांदीची भांडी, सामानसुमान, गुरंढोरं आणि इतर मौल्यवान वस्तू देऊन मदत केली.* तसंच, त्यांनी स्वेच्छेने पुष्कळ अर्पणंही दिली.
७ नबुखद्नेस्सर याने यरुशलेममधल्या यहोवाच्या मंदिरातून जी भांडी आणून आपल्या देवाच्या मंदिरात ठेवली होती, तीही कोरेश राजाने बाहेर काढली.+ ८ कोरेश राजाने खजिनदार असलेल्या मिथ्रदाथ याच्या देखरेखीखाली ती भांडी बाहेर आणली. त्याने यहूदाचा प्रधान, शेशबस्सर*+ याच्यासाठी त्या सर्व भांड्यांची यादी बनवली.
९ ती यादी अशी होती: सोन्याच्या ३० पराती, चांदीच्या १,००० पराती, २९ इतर पात्रं, १० सोन्याच्या ३० वाट्या, चांदीच्या ४१० वाट्या आणि १,००० इतर भांडी. ११ सोन्याचांदीची एकूण ५,४०० भांडी होती. बाबेलमध्ये* बंदिवासात असलेल्यांना+ यरुशलेमला परत आणण्यात आलं, तेव्हा शेशबस्सरने ही सगळी भांडीही आपल्यासोबत आणली.