इफिसकर यांना पत्र
१ देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा एक प्रेषित असलेल्या पौलकडून, इफिसमध्ये+ असलेल्या आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात राहणाऱ्या विश्वासू पवित्र जनांना:
२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
३ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता याची स्तुती असो. कारण आपण ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे त्याने आपल्याला स्वर्गात पवित्र शक्तीचं* प्रत्येक दान देऊन आशीर्वादित केलं आहे.+ ४ आपण देवावर प्रेम करावं आणि त्याच्यासमोर पवित्र आणि निष्कलंक असावं,+ म्हणून त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत ऐक्यात असण्याकरता जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं. ५ कारण त्याला चांगलं वाटलं, तसं त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे+ आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे त्याची स्वतःची मुलं म्हणून दत्तक घेण्यासाठी+ पूर्वीच नेमलं होतं.+ ६ हे यासाठी, की त्याच्या प्रिय मुलाद्वारे+ ज्या वैभवी अपार कृपेचा त्याने आपल्यावर प्रेमळपणे वर्षाव केला, त्या कृपेबद्दल त्याची स्तुती केली जावी.+ ७ त्याच्याच महान अशा अपार कृपेमुळे, आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या रक्ताद्वारे खंडणी देऊन मुक्त करण्यात आलं आहे.+ म्हणजेच, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+
८ त्याने आपल्याला सर्व बुद्धी आणि समजशक्ती* देऊन आपल्यावर मोठ्या प्रमाणात अपार कृपा केली आहे. ९ हे त्याने त्याच्या इच्छेचं पवित्र रहस्य आपल्याला कळवण्याद्वारे केलं.+ त्याला चांगलं वाटलं त्याप्रमाणे त्याने स्वतः असं ठरवलं, १० की सगळ्या गोष्टी, म्हणजेच स्वर्गातल्या गोष्टी आणि पृथ्वीवर असलेल्या गोष्टी, ख्रिस्तामध्ये एकत्र करण्यासाठी ठरलेल्या काळांच्या समाप्तीला एक व्यवस्था करावी.*+ हो, त्याच ख्रिस्तामध्ये ११ ज्याच्यासोबत आम्ही ऐक्यात आहोत आणि ज्याच्यासोबत वारस होण्यासाठी आम्हाला नेमण्यात आलं होतं.+ देव, जो सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे ठरवून पूर्ण करतो, त्याने आपल्या उद्देशाप्रमाणे आम्हाला याकरता पूर्वीच नेमलं होतं. १२ हे यासाठी, की आम्ही जे ख्रिस्तावर आशा ठेवणारे पहिले होतो, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. १३ पण, तुम्हीसुद्धा सत्याचं वचन म्हणजेच तुमच्या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश ऐकल्यावर त्याच्यावर आशा ठेवली. तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र शक्तीचा शिक्का मारण्यात आला.+ १४ ही पवित्र शक्ती आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी* आहे.+ देवाने ती यासाठी दिली, की खंडणीद्वारे+ त्याच्या स्वतःच्या लोकांची* सुटका केली जावी+ आणि याद्वारे त्याचा गौरव आणि स्तुती व्हावी.
१५ म्हणूनच, मीसुद्धा प्रभू येशूमध्ये असलेल्या तुमच्या विश्वासाबद्दल आणि सगळ्या पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकल्यापासून, १६ सतत तुमच्याबद्दल देवाचे आभार मानत असतो. मी नेहमी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमचा उल्लेख करतो. १७ हे यासाठी, की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, म्हणजे आपला गौरवी पिता तुम्हाला ज्या गोष्टी प्रकट करतो, त्या समजून घेण्याची त्याने तुम्हाला बुद्धी द्यावी. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल अचूक ज्ञान मिळेल.+ १८ त्याने तुमच्या मनाचे डोळे उघडले आहेत. हे यासाठी, की त्याने तुम्हाला कोणत्या आशेसाठी बोलावलं आहे आणि पवित्र जनांसाठी कोणत्या वैभवी आशीर्वादांचा वारसा राखून ठेवला आहे, हे तुम्हाला समजावं.+ १९ तसंच, विश्वास ठेवणाऱ्या आपल्याबद्दल त्याचं सामर्थ्य किती महान आहे,+ हेसुद्धा तुम्हाला समजावं. त्याच्या या शक्तिशाली सामर्थ्याचं कार्य, २० ख्रिस्ताच्या बाबतीत दिसून आलं. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवलं.+ २१ त्याने त्याला असं स्थान दिलं आहे, जे फक्त सध्याच्याच नाही, तर येणाऱ्या व्यवस्थेतल्या* कोणत्याही सरकारापेक्षा, अधिकारापेक्षा, सत्तेपेक्षा आणि शासनापेक्षा; तसंच आजपर्यंत घेतलेल्या कोणत्याही नावापेक्षा कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे.+ २२ यासोबतच, त्याने सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून त्याच्या पायांखाली ठेवल्या आहेत+ आणि मंडळीच्या बाबतीत सर्व गोष्टींवर त्याला मस्तक केलं आहे.+ २३ मंडळी त्याचं शरीर आहे.+ तिच्यात त्याचे गुण पूर्णपणे सामावलेले आहेत आणि तोच सगळ्या गोष्टींना पूर्ण करतो.