मार्कने सांगितलेला संदेश
५ मग ते समुद्रापलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले.+ २ येशू नावेतून उतरताच, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याच्याकडे आला. ३ तो कबरस्तानातच राहायचा आणि त्याला बांधून ठेवणं कोणालाही शक्य नव्हतं; अगदी साखळीनेसुद्धा कोणी त्याला बांधून ठेवू शकत नव्हतं. ४ कितीतरी वेळा त्याला बेड्यांनी आणि साखळ्यांनी बांधण्यात आलं होतं, पण तो साखळ्या तोडून टाकायचा आणि बेड्यांचे तुकडेतुकडे करायचा; आणि कोणाकडेही त्याला आवरायची ताकद नव्हती. ५ तो रात्रंदिवस कबरस्तानात आणि डोंगरांमध्ये ओरडत राहायचा आणि स्वतःला दगडांनी मारून जखमी करायचा. ६ पण, दुरून येशूला पाहताच तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पाया पडला.+ ७ मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”+ ८ कारण येशू त्याला असं म्हणत होता: “अरे दुष्ट स्वर्गदूता, या माणसातून बाहेर निघ.”+ ९ मग येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तेव्हा तो म्हणाला: “माझं नाव ‘सैन्य’ आहे, कारण आम्ही बरेच जण आहोत.” १० तेव्हा तो येशूला विनंती करू लागला, की आम्हाला या प्रदेशातून घालवू नको.+
११ त्याच वेळी, डुकरांचा+ एक मोठा कळप डोंगरावर चरत होता.+ १२ त्यामुळे त्या दुष्ट स्वर्गदूतांनी त्याला अशी विनवणी केली: “आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवून दे म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये शिरू.” १३ त्याने त्यांना परवानगी दिली तेव्हा ते दुष्ट स्वर्गदूत त्या माणसातून निघून डुकरांमध्ये शिरले. आणि जवळजवळ २,००० डुकरांचा तो कळप धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि बुडून मेला. १४ पण, कळप चारणारे तिथून पळाले आणि शहरात आणि शेतांत जाऊन त्यांनी ही बातमी लोकांना सांगितली. तेव्हा काय घडलं हे पाहायला लोक तिथे आले.+ १५ ते येशूकडे आले तेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला तो माणूस, म्हणजे ज्याच्यामध्ये आधी ‘सैन्य’ होतं, तो त्यांना बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. त्याला पाहून ते घाबरले. १६ तसंच, दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्या माणसाची आणि डुकरांची ती घटना ज्यांनी पाहिली होती, त्यांनी त्याबद्दल त्यांना सांगितलं. १७ तेव्हा, ते येशूला त्यांचा प्रदेश सोडून जायची विनंती करू लागले.+
१८ मग येशू नावेत चढू लागला तेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला तो माणूस त्याच्यासोबत जायची विनंती करू लागला.+ १९ पण येशूने त्याला आपल्यासोबत येऊ दिलं नाही. तो त्याला म्हणाला: “घरी आपल्या नातेवाइकांकडे जा आणि यहोवाने* तुझ्यासाठी जे काही केलंय आणि तुला कशी दया दाखवली आहे, ते सगळं त्यांना सांग.” २० तेव्हा तो माणूस तिथून निघाला आणि येशूने त्याच्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल तो दकापलीसमध्ये* सांगू लागला. ते ऐकून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं.
२१ त्यानंतर, येशू नावेतून पुन्हा पलीकडच्या किनाऱ्यावर गेला आणि तो समुद्राजवळ असतानाच लोकांचा मोठा समुदाय त्याच्याकडे आला.+ २२ त्या वेळी, याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी तिथे आला आणि येशूला पाहताच त्याच्या पाया पडला.+ २३ तो वारंवार येशूला अशी विनंती करू लागला: “माझी लहान मुलगी खूप आजारी आहे.* कृपा करून चला आणि तिच्यावर हात ठेवा,+ म्हणजे ती बरी होईल आणि जगेल.” २४ तेव्हा येशू त्याच्यासोबत गेला आणि लोकांचा समुदाय त्याच्या मागेमागे जाऊ लागला आणि त्याच्याभोवती गर्दी करू लागला.
२५ तिथे अशी एक स्त्री होती, जिला १२ वर्षांपासून रक्तस्रावाचा+ आजार होता.+ २६ बऱ्याच वैद्यांकडून उपचार घेताना तिचे खूप हाल झाले होते आणि तिच्याजवळ होते नव्हते ते सगळे पैसे तिने खर्च केले होते. तरीसुद्धा ती बरी झाली नव्हती. उलट, तिची स्थिती आणखीनच वाईट झाली होती. २७ तिने येशूबद्दल ऐकलं, तेव्हा तिने गर्दीतून त्याच्या मागून येऊन त्याच्या कपड्यांना हात लावला.+ २८ कारण ती म्हणत होती: “मी फक्त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.”+ २९ आणि त्याच क्षणी तिचा रक्तस्राव थांबला आणि त्या त्रासदायक आजारापासून मुक्त झाल्याचं तिला जाणवलं.
३० त्याच वेळी, आपल्यामधून शक्ती+ निघाल्याचं येशूला जाणवलं. तेव्हा, त्याने गर्दीत मागे वळून पाहिलं आणि विचारलं: “माझ्या कपड्यांना कोणी हात लावला?”+ ३१ पण, त्याचे शिष्य त्याला म्हणाले: “तुझ्या आजूबाजूला लोकांची किती गर्दी आहे, हे पाहतोस ना, मग ‘मला कोणी हात लावला’ असं कसं विचारतोस?” ३२ तरीसुद्धा, हे कोणी केलं असावं हे जाणून घेण्यासाठी तो इकडे-तिकडे पाहू लागला. ३३ तेव्हा, आपण बरं झालो आहोत हे ओळखून ती स्त्री घाबरत आणि थरथर कापत त्याच्याजवळ आली आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून तिने त्याला सगळं काही खरंखरं सांगितलं. ३४ तो तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. जा, काळजी करू नकोस,*+ तुझा त्रासदायक आजार बरा झालाय.”+
३५ तो बोलत होता इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही माणसं आली आणि म्हणाली: “तुमची मुलगी वारली! आता गुरुजींना त्रास का देता?”+ ३६ पण त्यांचं बोलणं ऐकून येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला: “घाबरू नकोस, फक्त विश्वास ठेव.”+ ३७ मग, त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही आपल्यामागे येऊ दिलं नाही.+
३८ सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर त्याने पाहिलं, की तिथे बराच गोंधळ माजला आहे आणि लोक मोठमोठ्याने रडत आहेत आणि आक्रोश करत आहेत.+ ३९ आत गेल्यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही रडून असा गोंधळ का माजवता? मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ ४० तेव्हा लोक त्याची थट्टा करत हसू लागले. पण त्याने त्या सगळ्यांना बाहेर पाठवलं. मग मुलीच्या आईवडिलांना आणि त्याच्यासोबत असलेल्यांना घेऊन तो आत मुलीजवळ गेला. ४१ मुलीचा हात धरून तो तिला म्हणाला: “तलिथा कूमी.” म्हणजेच, “मुली, मी तुला सांगतो, ‘ऊठ!’”+ ४२ आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली. (ती १२ वर्षांची होती.) हे पाहून त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. ४३ पण, येशूने त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितलं,* की त्यांनी याबद्दल कोणालाही सांगू नये.+ मग मुलीला काहीतरी खायला द्या असं तो म्हणाला.