वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. ९५-१०८
  • ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • शुक्रवार, १ ऑगस्ट
  • शनिवार, २ ऑगस्ट
  • रविवार, ३ ऑगस्ट
  • सोमवार, ४ ऑगस्ट
  • मंगळवार, ५ ऑगस्ट
  • बुधवार, ६ ऑगस्ट
  • गुरुवार, ७ ऑगस्ट
  • शुक्रवार, ८ ऑगस्ट
  • शनिवार, ९ ऑगस्ट
  • रविवार, १० ऑगस्ट
  • सोमवार, ११ ऑगस्ट
  • मंगळवार, १२ ऑगस्ट
  • बुधवार, १३ ऑगस्ट
  • गुरुवार, १४ ऑगस्ट
  • शुक्रवार, १५ ऑगस्ट
  • शनिवार, १६ ऑगस्ट
  • रविवार, १७ ऑगस्ट
  • सोमवार, १८ ऑगस्ट
  • मंगळवार, १९ ऑगस्ट
  • बुधवार, २० ऑगस्ट
  • गुरुवार, २१ ऑगस्ट
  • शुक्रवार, २२ ऑगस्ट
  • शनिवार, २३ ऑगस्ट
  • रविवार, २४ ऑगस्ट
  • सोमवार, २५ ऑगस्ट
  • मंगळवार, २६ ऑगस्ट
  • बुधवार, २७ ऑगस्ट
  • गुरुवार, २८ ऑगस्ट
  • शुक्रवार, २९ ऑगस्ट
  • शनिवार, ३० ऑगस्ट
  • रविवार, ३१ ऑगस्ट
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. ९५-१०८

ऑगस्ट

शुक्रवार, १ ऑगस्ट

नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात, पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.—स्तो. ३४:१९.

या स्तोत्रात दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत: (१) नीतिमान लोकांना संकटांचा सामना करावा लागतो. आणि (२) यहोवा आपल्याला त्या संकटांमधून सोडवतो. पण यहोवा हे कसं करतो? एक मार्ग म्हणजे, या जगात जगत असताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य ठेवण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. त्याची सेवा करत असताना आपल्याला आनंद मिळेल असं वचन यहोवा आपल्याला देतो. पण आपल्या जीवनात समस्या येणारच नाहीत असं त्याने कधीच म्हटलेलं नाही. (यश. ६६:१४) यहोवाची इच्छा आहे, की आपण भविष्याचा, म्हणजे अशा काळाचा विचार करावा जेव्हा आपल्याला आनंदाने कायमचं जीवन जगता येईल. (२ करिंथ. ४:१६-१८) पण तोपर्यंत त्याची सेवा करत राहण्यासाठी तो आपल्याला दररोज मदत करतो. (विलाप. ३:२२-२४) बायबल काळातल्या आणि आपल्या काळातल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्यासमोर अनपेक्षित समस्या येऊ शकतात. पण आपण यहोवावर भरवसा ठेवतो, तेव्हा तो आपल्याला टिकून राहायला मदत करतो.—स्तो. ५५:२२. टेहळणी बुरूज२३.०४ १४-१५ ¶३-४

शनिवार, २ ऑगस्ट

वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहा.—रोम. १३:१.

आपण योसेफ आणि मरीयाच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी तसं केलं. (लूक २:१-६) मरीया जेव्हा नऊ महिन्यांची गरोदर होती तेव्हा आज्ञाधारक राहण्याच्या बाबतीत त्यांची खूप मोठी परीक्षा झाली. त्या वेळी रोमी सम्राट औगुस्तने जनगणना करण्याचं फर्मान काढलं होतं. त्यासाठी योसेफ आणि मरीयाला डोंगराळ प्रदेशातून १५० कि.मी. प्रवास करून बेथलेहेमला जावं लागणार होतं. हा प्रवास मरीयासाठी खूप कठीण असणार होता. कदाचित त्यांना मरीयाच्या पोटातल्या बाळाची काळजी वाटत असेल. त्यांच्या मनात कदाचित विचार आला असेल, की तिला जर रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तर? कारण तिच्या पोटात देवाने वचन दिलेला मसीहा होता. मग हे कारण देऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या आज्ञा मोडू शकत होते का? योसेफ आणि मरीयापुढे बऱ्‍याच अडचणी होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांची आज्ञा पाळली. त्यांनी आज्ञा पाळल्यामुळे यहोवाने त्यांना सांभाळलं. मरीया सुरक्षितपणे बेथलेहेमला पोहोचली, तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आणि यामुळे बायबलमधली एक भविष्यवाणी पूर्ण झाली.—मीखा ५:२. टेहळणी बुरूज२३.१० ८ ¶९-१०; ९ ¶११-१२

रविवार, ३ ऑगस्ट

एकमेकांना प्रोत्साहन देत राहा.—इब्री १०:२५.

जर उत्तर देण्याच्या विचारानेच तुम्हाला भीती वाटत असेल तर काय? तुम्ही अभ्यासाची चांगली तयारी करू शकता. (नीति. २१:५) तुम्ही जितकी चांगली तयारी कराल तितकं उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. तसंच, थोडक्यात उत्तर द्या. (नीति. १५:२३; १७:२७) उत्तर छोटं असेल तर ते द्यायला भीतीही वाटणार नाही. तुम्ही जर स्वतःच्या शब्दांत थोडक्यात उत्तर दिलं, तर त्यावरून दिसून येईल की तुम्ही अभ्यासाची चांगली तयारी केली आहे आणि ती माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली आहे. पण यांतले काही सल्ले लागू केल्यावरही तुम्हाला भीती वाटत असेल आणि जेमतेम एकदोनच उत्तरं देता येत असतील तर काय? तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की सभेत उत्तर देण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्याची यहोवा मनापासून कदर करतो. (लूक २१:१-४) आपण जितकं करू शकतो, तितकीच तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (फिलिप्पै. ४:५) म्हणून तुम्हाला किती जमेल हे ओळखा, त्यानुसार एक ध्येय ठेवा आणि मन शांत ठेवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. सुरवातीला तुम्ही एकच छोटंसं उत्तर द्यायचं ध्येय ठेवू शकता. टेहळणी बुरूज२३.०४ २१ ¶६-८

सोमवार, ४ ऑगस्ट

आपण कवच आणि टोप घालू या.—१ थेस्सलनी. ५:८.

प्रेषित पौल आपली तुलना युद्धासाठी सावध आणि तयार असलेल्या सैनिकाशी करतो. युद्धाच्या वेळी सैनिकाने लढण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. ही गोष्ट आपल्या बाबतीतही आहे. आपणसुद्धा विश्‍वासाचं आणि प्रेमाचं कवच आणि तारणाच्या आशेचा टोप घालून यहोवाच्या दिवसासाठी तयार असलं पाहिजे. जसं कवच एका सैनिकाच्या हृदयाचं रक्षण करतं, तसं विश्‍वास आणि प्रेम आपल्या लाक्षणिक हृदयाचं रक्षण करतं. त्यामुळे देवाची सेवा करत राहायला आणि येशूचं अनुकरण करायला आपल्याला मदत होते. पूर्ण मनाने यहोवाचा शोध केल्याने तो आपल्याला प्रतिफळ देईल याची खातरी आपल्याला विश्‍वासामुळे मिळते. (इब्री ११:६) तसंच कठीण परिस्थितीतही आपलं नेतृत्व करणाऱ्‍या येशूला एकनिष्ठ राहण्याची प्रेरणासुद्धा आपल्याला त्यामुळे मिळते. जीवनात येणाऱ्‍या कठीण परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण आपला विश्‍वास मजबूत करू शकतो. आणि त्यासाठी ज्यांनी आर्थिक अडचणींचा किंवा छळाचा सामना करत असतानाही एकनिष्ठा टिकवून ठेवली, अशा आजच्या काळातल्या भाऊबहिणींचा आपण विचार करू शकतो. तसंच राज्याच्या कामाला पहिलं स्थान देण्यासाठी ज्यांनी आपली जीवनशैली साधी ठेवली आहे, त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण धनसंपत्तीच्या मागे लागण्याच्या मोहापासूनसुद्धा दूर राहू शकतो. टेहळणी बुरूज२३.०६ १० ¶८-९

मंगळवार, ५ ऑगस्ट

जो ढगांकडे पाहत राहतो, तो कापणी करणार नाही.—उप. ११:४.

आत्मसंयम आपल्याला स्वतःच्या भावनांवर आणि वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवायला मदत करतो. आपलं ध्येयं गाठण्यासाठी ज्या गुणांची गरज आहे ते गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आत्मसंयम आपल्याला मदत करू शकतो; खासकरून एखादं ध्येय गाठणं कठीण असतं किंवा ते गाठण्याची प्रेरणाच मिळत नाही तेव्हा. लक्षात असू द्या की आत्मसंयम पवित्र शक्‍तीच्या पैलूंपैकी एक आहे. त्यामुळे स्वतःमध्ये पवित्र शक्‍तीचे फळ उत्पन्‍न करण्यासाठी यहोवाकडे पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३; गलती. ५:२२, २३) सगळं काही ठीक झाल्यावर सुरुवात करू असा कधीच विचार करू नका. या जगात तरी सगळं काही ठीक होण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. परिस्थिती ठीक होण्याची आपण वाट पाहत राहिलो तर आपण आपलं ध्येय कधीच गाठू शकणार नाही. एखादं ध्येयं गाठणं कठीण वाटत असल्यामुळे ते पूर्ण करण्याची इच्छाच कदाचित आपल्याला होत नसेल. तुमच्या बाबतीतही असंच होत असेल तर तुम्ही सुरुवातीला छोटी-छोटी ध्येयं ठेवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही जर स्वतःमध्ये एखादा गुण वाढवायचं ध्येय ठेवलं असेल, तर सुरुवातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्ही तो दाखवायचा प्रयत्न करू शकता का? तुम्ही जर पूर्ण बायबल वाचून काढायचं ध्येय ठेवलं असेल, तर सुरुवातीला तुम्ही त्यासाठी थोडा-थोडा वेळ काढू शकता का? टेहळणी बुरूज२३.०५ २९ ¶११-१३

बुधवार, ६ ऑगस्ट

नीतिमान माणसाचा मार्ग पहाटेच्या प्रकाशासारखा असतो; दिवस पूर्ण उगवेपर्यंत वाढत जाणाऱ्‍या उजेडासारखा तो असतो.—नीति. ४:१८.

या शेवटच्या काळात यहोवा आपल्याला ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहण्यासाठी त्याच्या संघटनेद्वारे नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. (यश. ३५:८; ४८:१७; ६०:१७) आपण असं म्हणू शकतो, की जेव्हा एक व्यक्‍ती बायबल अभ्यास करायला तयार होते तेव्हा तिला ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालायची संधी मिळते. पण काही जण त्यावर फक्‍त थोड्या अंतरापर्यंतच चालतात आणि मधूनच तो राजमार्ग सोडून देतात. तर काही जणांचा या मार्गावर शेवटपर्यंत चालत राहण्याचा पक्का निर्धार असतो. हा मार्ग शेवटी कुठे घेऊन जातो? ज्यांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे त्यांना हा “पवित्रतेचा मार्ग,” “देवाच्या सुंदर बागेत” म्हणजे स्वर्गात घेऊन जातो. (प्रकटी. २:७) आणि ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना हा मार्ग १,००० वर्षांच्या शेवटी मिळणाऱ्‍या परिपूर्णतेकडे घेऊन जातो. तेव्हा तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करत असाल तर मागे वळून पाहू नका. आणि नवीन जगापर्यंतचा तुमचा प्रवास पूर्ण होईपर्यंत या मार्गावर चालत राहायचं सोडू नका. टेहळणी बुरूज२३.०५ १७ ¶१५; १९ ¶१६-१८

गुरुवार, ७ ऑगस्ट

आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.—१ योहा. ४:१९.

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याचा तुम्ही विचार करता, तेव्हा आपोआपच तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पित करावसं वाटतं. (स्तो. ११६:१२-१४) बायबलमध्ये यहोवाला “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” देणारा असं म्हटलंय. (याको. १:१७) त्याने दिलेल्या देणग्यांमध्ये सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याच्या मुलाचं, येशूचं खंडणी बलिदान. विचार करा, या खंडणीमुळेच आपल्याला त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडता येतं आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. (१ योहा. ४:९, १०) त्याच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा असलेल्या या देणगीबद्दल आणि त्याने तुम्हाला दिलेल्या इतर आशीर्वादांबद्दल कदर दाखवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्याला आपलं जीवन समर्पित करणं.—अनु. १६:१७; २ करिंथ. ५:१५. टेहळणी बुरूज२४.०३ ५ ¶८

शुक्रवार, ८ ऑगस्ट

जो सरळपणे चालतो, तो यहोवाला भिऊन वागतो.—नीति. १४:२.

या जगातले नैतिक स्तर पाहून लोटला जसं वाटत होतं, तसंच आपल्यालाही वाटतं. त्याच्याबद्दल म्हटलंय, की “तो दुष्ट लोकांच्या निर्लज्ज वर्तनामुळे खूप दुःखी होता.” कारण त्याला माहीत होतं, की यहोवा अशा गोष्टींचा द्वेष करतो. (२ पेत्र २:७, ८) आपल्या मनात देवाबद्दल भीती आणि प्रेम असल्यामुळे लोटला त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या अनैतिक जीवनशैलीचा तिरस्कार वाटत होता. आजसुद्धा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना यहोवाच्या नैतिक स्तरांबद्दल खूप कमी कदर आहे किंवा त्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. पण आपण जर देवाबद्दल आपल्या मनात प्रेम टिकवून ठेवलं आणि त्याच्याबद्दलची भीती मनात उत्पन्‍न केली तर आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो. असं करण्यासाठी यहोवा आपल्याला नीतिवचनांच्या पुस्तकाद्वारे प्रोत्साहन आणि उत्तेजन देतो. प्रत्येक ख्रिस्ती स्त्री-पुरुषाला किंवा तरुण व वृद्ध व्यक्‍तीला या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांमुळे फायदा होऊ शकतो. आपल्या मनात यहोवाची भीती असते तेव्हा आपण वाईट कामं करणाऱ्‍या लोकांसोबत मैत्री करायचा प्रयत्न करत नाही. टेहळणी बुरूज२३.०६ २० ¶१-२; २१ ¶५

शनिवार, ९ ऑगस्ट

जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि दररोज आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.—लूक ९:२३.

कदाचित तुम्ही घरच्यांकडून विरोधाचा सामना केला असेल, किंवा राज्याच्या कामाला पहिलं स्थान देण्यासाठी तुम्ही पैसा आणि इतर गोष्टींचा त्याग केला असेल. (मत्त. ६:३३) तुम्ही असं केलं असेल तर यहोवाने तुमचा विश्‍वासूपणा नक्कीच पाहिलाय याची खातरी तुम्ही ठेवू शकता. (इब्री ६:१०) तसंच, येशूचे शब्द किती खरे आहेत हेही तुम्ही अनुभवलं असेल. त्याने म्हटलं: “ज्यांनी माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात छळासोबत शंभरपटीने घरंदारं, शेतीवाडी, बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.” (मार्क १०:२९, ३०) तुम्ही केलेल्या त्यागांच्या तुलनेत तुम्हाला मिळालेले आशीर्वाद कितीतरी पटीने मोठे आहेत.—स्तो. ३७:४. टेहळणी बुरूज२४.०३ ९ ¶५

रविवार, १० ऑगस्ट

खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.—नीति. १७:१७.

यहूदीयातल्या ख्रिश्‍चनांना एका मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला. अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी “आपापल्या ऐपतीप्रमाणे यहूदीयातल्या बांधवांना मदत पाठवायचा निश्‍चय केला.” (प्रे. कार्यं ११:२७-३०) दुष्काळाची झळ बसलेले यहूदीयातले भाऊबहीण जरी त्यांच्यापासून दूर राहत असले, तरीही अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी त्यांना मदत करायचा निश्‍चय केला होता. (१ योहा. ३:१७, १८) आपल्या भाऊबहिणींना एखाद्या विपत्तीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपणसुद्धा त्यांना करुणा दाखवू शकतो. मग आपण हे कसं करू शकतो? आपण त्यांना मदत करायला लगेच तयार राहू शकतो. विपत्ती येते त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्‍या मदतकार्यात आपणही सहभाग घेऊ शकतो का, याबद्दल आपण मंडळीतल्या वडिलांना विचारू शकतो. किंवा, आपण जगभरात केल्या जाणाऱ्‍या कामासाठी दान देऊ शकतो. तसंच, ज्या भाऊबहिणींना विपत्तीची झळ बसली आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आपल्या भाऊबहिणींनासुद्धा रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदतीची गरज पडेल. म्हणून आपण आतापासूनच करुणा दाखवत राहू या. म्हणजे, जेव्हा आपला राजा येशू ख्रिस्त न्यायदंड बजावण्यासाठी येईल, तेव्हा तो आपल्याला पाहील आणि “राज्याचा वारसा” घ्यायचं आमंत्रण देईल.—मत्त. २५:३४-४०. टेहळणी बुरूज२३.०७ ४ ¶९-१०; ६ ¶१२

सोमवार, ११ ऑगस्ट

तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.—फिलिप्पै. ४:५.

येशूनेसुद्धा दाखवलं की तो यहोवाप्रमाणेच समजूतदार आहे. त्याला पृथ्वीवर फक्‍त ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांना’ प्रचार करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. पण या कामातसुद्धा त्याने समजूतदारपणा दाखवला. एकदा एक इस्राएली नसलेली स्त्री त्याच्याकडे येऊन आपल्या मुलीला बरं करण्याची विनंती करू लागली. तिच्या मुलीला एका ‘दुष्ट स्वर्गदूताने पछाडलं’ होतं. येशूने तिची विनंती मान्य केली. आणि तिच्या मुलीबद्दल करुणा असल्यामुळे त्याने तिला बरं केलं. (मत्त. १५:२१-२८) आपण आणखी एक उदाहरण पाहू या. आपलं सेवाकार्य सुरू केल्याच्या काही काळानंतर, येशूने असं म्हटलं: “जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा . . . नाकारीन.” (मत्त. १०:३३) पण पेत्रने जेव्हा त्याला तीन वेळा नाकारलं तेव्हा येशूने त्याला नाकारलं का? नाही. पेत्रने जो विश्‍वास दाखवला आणि जो पश्‍चात्ताप केला तो येशूने लक्षात ठेवला. पुनरुत्थान झाल्यावर येशू जेव्हा पेत्रसमोर प्रकट झाला, तेव्हा त्याने त्याला नक्कीच माफ केल्याचं आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं असेल. (लूक २४:३३, ३४) यहोवा देव आणि येशू समजूतदार आहेत. मग आपल्याबद्दल काय? यहोवाची अशी अपेक्षा आहे की आपणसुद्धा समजूतदार असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०७ २१ ¶६-७

मंगळवार, १२ ऑगस्ट

यापुढे कोणीही मरणार नाही.—प्रकटी. २१:४.

आज बरेच लोक देवाच्या नंदनवनाच्या अभिवचनावर शंका घेतात. पण हे अभिवचन खरं ठरेल याची त्यांना खातरी करून देण्यासाठी आपण काय सांगू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे, हे अभिवचन स्वतः यहोवा देत आहे. म्हणूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं म्हटलंय: “राजासनावर बसलेला देव म्हणाला: ‘पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.’” यहोवाकडे त्याचं अभिवचन पूर्ण करण्याची बुद्धी आणि ताकद तर आहेच पण तसं करण्याची त्याची इच्छासुद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवा आपलं हे अभिवचन पूर्ण करेल ही गोष्ट इतकी निश्‍चित आहे की यहोवाच्या दृष्टिकोनातून ते जणू पूर्ण झाल्यासारखंच आहे. म्हणूनच तो म्हणतो: “ही वचनं विश्‍वसनीय आणि खरी आहेत. . . . ती वचनं पूर्ण झाली आहेत!” आणि तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा यहोवा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हीच गोष्ट त्याने, “अल्फा आणि ओमेगा मी आहे” असं जे म्हटलंय त्यातून दिसून येते. (प्रकटी. २१:६) सैतान खोटा आहे आणि तो अपयशी ठरला आहे हे यहोवा नक्कीच सिद्ध करेल. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी जर तुम्हाला असं म्हटलं की “हे तर फक्‍त ऐकायलाच चांगलं वाटतं, पण खरं होऊ शकत नाही” तर त्यांना प्रकटीकरण २१:५, ६ ही वचनं वाचून समजावून सांगा, की यहोवाने जणू आपलं हस्ताक्षर करून या गोष्टीची गॅरंटी दिली आहे.—यश. ६५:१६. टेहळणी बुरूज२३.११ ७ ¶१८-१९

बुधवार, १३ ऑगस्ट

मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन.—उत्प. १२:२.

अब्राहाम ७५ वर्षांचा होता आणि त्याला मूलबाळ नव्हतं, तेव्हा यहोवाने त्याला हे वचन दिलं होतं. पण अब्राहामने हे वचन पूर्ण होताना पाहिलं का? पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात नक्की पाहिलं. त्याने फरात नदी पार केल्याच्या २५ वर्षांनंतर, यहोवाने चमत्कार केला आणि इसहाकचा जन्म झाला. मग त्याच्या ६० वर्षांनंतर एसाव आणि याकोब या त्याच्या नातवंडांचा जन्म झाला. (इब्री ६:१५) पण अब्राहामने कधीच त्याच्या संततीला मोठं राष्ट्र होताना पाहिलं नाही आणि त्याने त्यांना वचन दिलेल्या देशाचा ताबा मिळवतानाही पाहिलं नाही. पण या विश्‍वासू माणसाची यहोवासोबत चांगली मैत्री असल्यामुळे तो आनंदी होता. (याको. २:२३) जेव्हा अब्राहामला पुन्हा उठवलं जाईल आणि जेव्हा त्याला कळेल, की आपल्या विश्‍वासामुळे आणि धीरामुळे सगळ्या राष्ट्रांना किती आशीर्वाद मिळाले आहेत तेव्हा तो किती खूश होईल! (उत्प. २२:१८) मग यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? यहोवाची वचनं पूर्ण होताना कदाचित आपण लगेच पाहू शकणार नाही, पण जर आपण अब्राहामसारखा धीर दाखवला, तर आपण ही खातरी बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला आता आशीर्वाद देईल आणि भविष्यात त्याच्या नवीन जगात आणखीन भरभरून आशीर्वाद देईल.—मार्क १०:२९, ३०. टेहळणी बुरूज२३.०८ २४ ¶१४

गुरुवार, १४ ऑगस्ट

त्याने यहोवाची सेवा केली त्या संपूर्ण काळात, खऱ्‍या देवाच्या आशीर्वादाने त्याची भरभराट झाली.—२ इति. २६:५.

उज्जीया राजा जेव्हा अगदी तरुण होता, तेव्हा तो नम्र होता. तो “खऱ्‍या देवाचं भय बाळगायला” शिकला. आणि ६८ वर्षांच्या त्याच्या आयुष्यात यहोवाने बरीच वर्षं त्याला आशीर्वादित केलं. (२ इति. २६:१-४) उज्जीयाने अनेक शत्रू राष्ट्रांचा पराभव केला आणि यरुशलेमचं संरक्षण करण्यासाठीही त्याने बऱ्‍याच गोष्टी केल्या. (२ इति. २६:६-१५) नक्कीच, या गोष्टी करण्यासाठी यहोवाने उज्जीयाला जी मदत केली त्यामुळे तो खूप आनंदी होता. (उप. ३:१२, १३) उज्जीया राजा असल्यामुळे, तो सगळ्यांना काय करायचं आणि काय नाही ते सांगायचा आणि सूचना द्यायचा. आणि त्यामुळेच आपण हवं ते करू शकतो असं त्याला वाटलं असेल का? कदाचित. एक दिवस उज्जीयाने यहोवाच्या मंदिराच्या आत जायचं ठरवलं. आणि गर्वाने फुगून त्याने धूपवेदीवर धूप जाळायचा प्रयत्न केला. खरंतर मंदिरातलं हे काम राजांनी मुळीच करायचं नव्हतं. (२ इति. २६:१६-१८) त्यामुळे महायाजक अजऱ्‍याने त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण उज्जीया त्याच्यावर खूप भडकला आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत उज्जीयाने विश्‍वासूपणे सेवा करून जे चांगलं नाव कमावलं होतं ते त्याने गमावलं. त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी यहोवाने त्याला शिक्षा केली आणि तो कुष्ठरोगी बनला. (२ इति. २६:१९-२१) उज्जीया जर शेवटपर्यंत नम्र राहिला असता तर त्याच्या आयुष्याचा शेवट नक्कीच वेगळा झाला असता. टेहळणी बुरूज२३.०९ १० ¶९-१०

शुक्रवार, १५ ऑगस्ट

सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे तो त्यांच्यापासून वेगळा राहू लागला.—गलती. २:१२.

पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त झाल्यानंतरसुद्धा प्रेषित पेत्रला त्याच्या कमतरतांशी झगडावं लागलं. इ.स. ३६ मध्ये जेव्हा सुंता न झालेल्या कर्नेल्यला पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात आलं तेव्हा पेत्र तिथे होता. यावरून स्पष्ट झालं, की देव लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा “भेदभाव करत नाही” आणि आता यहुदी नसलेले लोकसुद्धा ख्रिस्ती मंडळीचा भाग बनू शकत होते. (प्रे. कार्यं १०:३४, ४४, ४५) या घटनेनंतर पेत्र विदेशी लोकांसोबत वेळ घालवू लागला आणि त्यांच्यासोबत जेवू लागला. ही गोष्ट त्याने आधी कधीच केली नसती. पण ख्रिस्ती बनलेल्या काही यहुद्यांना वाटायचं की यहुद्यांनी आणि विदेश्‍यांनी सोबत जेवणं योग्य नाही. आणि असा विचार करणारे लोक जेव्हा अंत्युखियाला आले तेव्हा पेत्रने विदेशी लोकांसोबत जेवायचं थांबवलं. त्याला कदाचित अशी भीती वाटली, की त्याने विदेश्‍यांसोबत जेवणं हे यहुदी ख्रिश्‍चनांना आवडणार नाही. पेत्रचा हा ढोंगीपणा पौलच्या लक्षात आला आणि त्याने सगळ्यांसमोर पेत्रची चूक दाखवून दिली. (गलती. २:१३, १४) इतकी मोठी चूक होऊनसुद्धा पेत्र निराश न होता यहोवाची सेवा करत राहिला. टेहळणी बुरूज२३.०९ २२ ¶८

शनिवार, १६ ऑगस्ट

तो तुम्हाला स्थिर उभं राहायला मदत करेल.—१ पेत्र ५:१०.

स्वतःचं परीक्षण केल्यानंतर तुम्हाला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे लक्षात येईल. पण तरी निराश होऊ नका. कारण ‘आपला प्रभू प्रेमळ आहे’ आणि तो आपल्याला सुधारणा करण्यासाठी मदत करेल. (१ पेत्र २:३) पेत्रने आपल्याला अशी खातरी दिली आहे, की “देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल. . . . तो तुम्हाला दृढ करेल.” आपण देवाच्या मुलासमोर उभं राहायच्यासुद्धा लायकीचे नाही आहोत असं एकदा पेत्रला वाटलं होतं. (लूक ५:८) पण यहोवा आणि येशूने प्रेमळपणे मदत केल्यामुळे पेत्रला येशूचं अनुकरण करत राहण्यासाठी मदत झाली. आणि अशा प्रकारे पेत्र, ‘आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्या सर्वकाळाच्या राज्यात प्रेवश’ मिळवायला पात्र ठरला. (२ पेत्र १:११) पेत्रसाठी हे खरंच किती मोठं बक्षीस होतं! आपणसुद्धा पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहिलो आणि यहोवाकडून प्रशिक्षण घेत राहिलो, तर आपल्यालाही सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळेल, म्हणजेच ‘विश्‍वासामुळे आपल्याला तारणाचं प्रतिफळ मिळेल.’—१ पेत्र १:९. टेहळणी बुरूज२३.०९ ३१ ¶१६-१७

रविवार, १७ ऑगस्ट

ज्याने आकाश, पृथ्वी निर्माण केली त्याची उपासना करा.—प्रकटी. १४:७.

उपासना मंडपात एक अंगण असायचं. हे कुंपण असलेलं एक मोठं मैदान होतं. इथे याजक आपली कामं करायचे. या अंगणात होमार्पण देण्यासाठी तांब्याची एक मोठी वेदी होती. त्यासोबत याजकांना आपली पवित्र सेवा करता यावी म्हणून स्वतःला शुद्ध करण्याकरता तांब्याचं एक मोठं भांडंही होतं. (निर्ग. ३०:१७-२०; ४०:६-८) आज पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍त जन आध्यात्मिक मंदिराच्या आतल्या अंगणात विश्‍वासूपणे सेवा करतात. उपासना मंडपात असलेल्या पाण्याच्या मोठ्या भांड्यामुळे त्यांना आणि सर्व ख्रिश्‍चनांना नैतिक रितीने आणि आध्यात्मिक रितीने शुद्ध राहण्याची आठवण होते. पण “मोठा लोकसमुदाय” यहोवाची कुठे उपासना करतो? प्रेषित योहानने म्हटलं, की मोठा लोकसमुदाय ‘राजासनासमोर उभं राहून मंदिरात रात्रंदिवस यहोवाची पवित्र सेवा करत आहे.’ मोठा लोकसमुदाय ही सेवा पृथ्वीवर असलेल्या आध्यात्मिक मंदिराच्या बाहेरच्या अंगणात करतो. (प्रकटी. ७:९, १३-१५) शुद्ध उपासनेच्या यहोवाच्या व्यवस्थेत आपला सहभाग असणं हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे! टेहळणी बुरूज२३.१० २८ ¶१५-१६

सोमवार, १८ ऑगस्ट

देवाने वचन दिलं असल्यामुळे . . . त्याच्या विश्‍वासामुळे त्याला सामर्थ्य मिळालं.—रोम. ४:२०.

यहोवा आपल्याला आणखी एका मार्गाने बळ देतो. तो म्हणजे मंडळीतल्या वडिलांद्वारे. (यश. ३२:१, २) म्हणून जेव्हा तुम्ही चिंतेत असता, तेव्हा तुमच्या समस्यांबद्दल वडिलांशी बोला. आणि जेव्हा ते तुम्हाला मदत करतात तेव्हा आनंदाने ती मदत स्वीकारा. कारण त्यांच्याद्वारेच यहोवा आपल्याला मजबूत करतो. बायबलमधल्या सर्वकाळाच्या जीवनाच्या आशेमुळेही मग ते स्वर्गातलं जीवन असो किंवा पृथ्वीवरच्या नंदनवनातलं जीवन असो, आपल्याला ताकद मिळते. (रोम. ४:३, १८, १९) या आशेमुळे आपल्याला परीक्षांचा सामना करण्यासाठी, आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी बळ मिळतं. (१ थेस्सलनी. १:३) याच आशेमुळे प्रेषित पौललासुद्धा मदत झाली. प्रेषित पौलवर सगळ्या बाजूंनी “दबाव” होता. त्याच्यावर अशी परिस्थिती आली की तो ‘गोंधळात’ पडला, त्याचा “छळ” करण्यात आला आणि त्याला जणू “खाली पाडलं” गेलं. इतकंच काय तर त्याचा जीवसुद्धा धोक्यात होता. (२ करिंथ. ४:८-१०) पौलने त्याच्या आशेवर लक्ष दिल्यामुळे त्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळालं. (२ करिंथ. ४:१६-१८) पौलने स्वर्गातल्या जीवनाच्या आशेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याची मनोवृत्ती “दिवसेंदिवस नवीन” होत गेली. टेहळणी बुरूज२३.१० १५-१६ ¶१४-१७

मंगळवार, १९ ऑगस्ट

यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देईल. यहोवा आपल्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल.—स्तो. २९:११.

प्रार्थना करताना विचार करा, ‘यहोवाच्या दृष्टिकोनातून, माझ्या प्रार्थनांचं उत्तर देण्याची ही योग्य वेळ आहे का?’ कधीकधी आपल्याला असं वाटेल की आपल्या प्रार्थनेचं यहोवाने आपल्याला लगेच उत्तर द्यावं. पण आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्याची योग्य वेळ यहोवाला माहीत आहे. (१ पेत्र ५:६, ७) आपल्या प्रार्थनेचं लगेच उत्तर मिळत नाही, तेव्हा कदाचित आपण असा विचार करू की माझ्या प्रार्थनेला यहोवाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. पण यहोवाला कदाचित ‘आत्ताच नाही’ असं म्हणायचं असेल. उदाहरणार्थ, एका तरुण भावाने आपला आजार बरा व्हावा म्हणून यहोवाला प्रार्थना केली होती. यहोवाने जर त्याला चमत्कारिकपणे बरं केलं असतं, तर सैतान असा दावा करू शकला असता की तो भाऊ, त्याला बरं केलं म्हणून यहोवाची सेवा करत आहे. (ईयो. १:९-११; २:४) यासोबतच आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की सगळे आजार बरे करण्यासाठी यहोवाने एक वेळ ठरवली आहे. (यश. ३३:२४; प्रकटी. २१:३, ४) आणि तोपर्यंत यहोवाने आपल्याला चमत्कारिकपणे बरं करावं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. म्हणून त्या भावाने खरंतर यहोवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे होती, की यहोवाने हे आजारपण सहन करायला आणि विश्‍वासूपणे त्याची सेवा करत राहायला त्याला बळ द्यावं आणि मनाची शांती द्यावी. टेहळणी बुरूज२३.११ २४ ¶१३

बुधवार, २० ऑगस्ट

त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही आणि आपल्या अपराधांच्या मानाने आपल्याला मोबदला दिला नाही.—स्तो. १०३:१०.

शमशोनने गंभीर चूक केली होती पण त्याने हार मानली नाही. पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो संधी शोधत राहिला. (शास्ते १६:२८-३०) ‘मला पलिष्टी लोकांचा बदला घेऊ दे’ अशी विनंती त्याने यहोवाकडे केली. यहोवाने शमशोनच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्याला त्याची शक्‍ती परत दिली. त्यामुळे त्याने आतापर्यंत जितक्या पलिष्टी लोकांना मारलं होतं त्यापेक्षा जास्त लोकांना या वेळी ठार मारलं. शमशोनला त्याच्या चुकीच्या निर्णयाचे जरी वाईट परिणाम भोगावे लागले, तरी त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करायचं सोडलं नाही. आपल्या हातूनपण जेव्हा चूक होते आणि आपल्याला ताडनाची गरज पडते किंवा एखादी जबाबदारी आपण गमावतो, तेव्हा आपण हार मानली नाही पाहिजे. लक्षात ठेवा की यहोवा आपल्याबद्दल आशा सोडत नाही. (स्तो. १०३:८, ९) आपल्याकडून चुका झाल्या तरी शमशोनप्रमाणे यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करून घेऊ शकतो. टेहळणी बुरूज२३.०९ ६ ¶१५-१६

गुरुवार, २१ ऑगस्ट

धीरामुळे आपल्याला देवाची मान्यता मिळते; देवाची मान्यता मिळाल्यामुळे आशा निर्माण होते.—रोम. ५:४.

धीरामुळे आपल्याला देवाची मान्यता मिळते. याचा अर्थ असा होत नाही, की आपल्याला संकटांचा किंवा परीक्षांचा सामना करावा लागतो म्हणून यहोवा खूश होतो. तर त्या वेळी आपण धीराने आणि विश्‍वासूपणे त्यांचा सामना करतो म्हणून यहोवा आपल्यावर खूश होतो. आपण धीर दाखवून यहोवाला आनंदित करतो, ही गोष्ट खरंच किती प्रोत्साहन देणारी आहे! (स्तो. ५:१२) अब्राहामने धीराने आणि विश्‍वासूपणे संकटांचा सामना केला आणि त्यामुळे देवाची मान्यता त्याला मिळाली. देवाने त्याला आपला मित्र समजलं आणि त्याला नीतिमान ठरवलं. (उत्प. १५:६; रोम. ४:१३, २२) हीच गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. आपण त्याच्या सेवेत किती काम करतोय किंवा आपण किती जबाबदाऱ्‍या सांभाळतोय या गोष्टींमुळे आपल्याला देवाची मान्यता मिळत नाही. तर संकटं असतानासुद्धा आपण जेव्हा त्याला विश्‍वासू राहतो, तेव्हा आपल्याला देवाची मान्यता मिळते. त्यामुळे आपलं वय, परिस्थिती, क्षमता काहीही असली, तरी आपण सर्वच जण धीराने संकटाचा सामना करू शकतो. तुम्ही आजसुद्धा विश्‍वासूपणे आणि धीराने एखाद्या संकटाचा सामना करत आहात का? जर करत असाल, तर या गोष्टीची खातरी बाळगा की तुम्हाला देवाची मान्यता आहे. आपल्याला देवाची मान्यता आहे ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्या गोष्टीचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आपली आशा आणखी मजबूत होऊ शकते. टेहळणी बुरूज२३.१२ ११ ¶१३-१४

शुक्रवार, २२ ऑगस्ट

प्रौढांसारखं व्हा.—१ करिंथ. १४:२०.

प्रत्येक खिस्ती भावाने चांगल्या प्रकारे बोलायचं कौशल्य शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याने इतरांचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि त्यांचे विचार आणि भावना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:५) त्याने समोरच्या व्यक्‍तीचे विचार आणि भावना समजून घेण्यासाठी त्याची बोलायची लकब, त्याचे हावभाव, त्याचं एकंदरीत व्यक्‍तिमत्त्व कसं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण यासाठी त्याला इतरांसोबत वेळ घालवावा लागेल. तुम्ही जर इतरांशी बोलायला नेहमीच इलेक्ट्रॉनिक साधनांचा जसं की, ई-मेल, मेसेज यांसारख्या गोष्टींचा वापर करत राहिलात, तर इतरांसोबत प्रत्यक्ष बोलायला तुम्हाला अवघड जाईल. म्हणून इतरांशी समोरासमोर भेटून बोलायचा प्रयत्न करा. (२ योहा. १२) ख्रिस्ती भावाला स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजाही भागवता आल्या पाहिजेत. (१ तीम. ५:८) एखादं कौशल्य शिकून घ्या. त्यामुळे पुढे एक चांगली नोकरी मिळवता येईल. (प्रे. कार्यं १८:२, ३; २०:३४; इफिस. ४:२८) तेव्हा काम करण्यासाठी मेहनत घ्या आणि जे काम तुम्हाला सोपवण्यात आलंय, ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे तुमचे प्रयत्न लोकांच्या लक्षात येतील आणि तुमचं चांगलं नाव होईल. शिवाय, तुम्हाला चांगली नोकरी शोधता येईल आणि ती टिकवून ठेवता येईल. टेहळणी बुरूज२३.१२ २७ ¶१२-१३

शनिवार, २३ ऑगस्ट

रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा दिवस येत आहे.—१ थेस्सलनी. ५:२.

बायबलमध्ये “यहोवाचा दिवस” अशा काळाला म्हटलं आहे जेव्हा यहोवा त्याच्या शत्रूंचा न्याय करेल आणि त्याच्या लोकांना वाचवेल. पूर्वीसुद्धा यहोवाने काही राष्ट्रांवर त्याचा न्यायदंड बजावला आहे. (यश. १३:१, ६; यहे. १३:५; सफ. १:८) आपल्या काळात “यहोवाचा दिवस” मोठ्या बाबेलवर होणाऱ्‍या हल्ल्याने सुरू होईल आणि हर्मगिदोनच्या युद्धाने संपेल. त्या ‘दिवसातून’ वाचण्यासाठी आपण आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. येशूने आपल्याला जे सांगितलं, त्यावरून त्याला असं म्हणायचं होतं, की ‘मोठ्या संकटासाठी’ आपण फक्‍त तयार असून चालणार नाही तर कायम तयार असलं पाहिजे. (मत्त. २४:२१; लूक १२:४०) प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने थेस्सलनीकाकरांना पहिलं पत्र लिहिलं. या पत्रात, यहोवाच्या न्यायाच्या महान दिवसासाठी तयार राहायला ख्रिश्‍चनांनी काय करणं गरजेचं आहे हे त्यांना समजून सांगायला त्याने बरीच उदाहरणं वापरली. त्या काळात यहोवाचा दिवस येणार नाही हे पौलला माहीत होतं. (२ थेस्सलनी. २:१-३) तरीसुद्धा तो दिवस जणू उद्याच येणार आहे असं समजून भाऊबहिणींनी त्या दिवसासाठी तयार असावं अशी विनंती त्याने केली. आणि आज आपणसुद्धा त्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०६ ८ ¶१-२

रविवार, २४ ऑगस्ट

माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर आणि स्थिर राहा.—१ करिंथ. १५:५८.

१९७८ मध्ये जपानच्या टोकियो शहरात एक ६० मजली बिल्डिंग बांधण्यात आली. टोकियो शहरात नेहमी भूकंप होत राहतात. त्यामुळे या बिल्डिंगकडे बघणाऱ्‍यांच्या मनात असा प्रश्‍न यायचा, की ‘या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये ही बिल्डिंग कशी काय टिकून राहील?’ पण मग, ही बिल्डिंग टिकून राहण्यामागचं रहस्य काय होतं? ते म्हणजे, त्या बिल्डिंगची धक्के सहन करायची क्षमता. बिल्डिंग बांधणाऱ्‍यांनी ती अशा प्रकारे बांधली होती, की ती मजबूत तर राहिलच, पण भूकंपाचे धक्के सहन करण्यासाठी लवचीकताही तिच्यामध्ये असेल. यहोवाचे सेवकसुद्धा त्या बिल्डिंगसारखेच आहेत. ते कसं? त्या बिल्डिंगप्रमाणेच यहोवाच्या सेवकांनीसुद्धा खंबीर राहायच्या बाबतीत आणि लवचीकता हा गुण दाखवायच्या बाबतीत समतोल राखला पाहिजे. लवचीकता म्हणजे बदल करायला तयार असणं. जेव्हा यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि त्याच्या स्तरांप्रमाणे चालण्याची गोष्ट येते, तेव्हा त्यांनी खंबीर आणि स्थिर म्हणजे ठाम असलं पाहिजे. त्यांनी नेहमी “आज्ञाधारक” असलं पाहिजे आणि यहोवाच्या नियमांच्या बाबतीत तडजोड केली नाही पाहिजे. यासोबतच, परिस्थितीप्रमाणे आणि गरज पडते तेव्हा त्यांनी ‘समजूतदारपणा’ दाखवला पाहिजे. (याको. ३:१७) जी ख्रिस्ती व्यक्‍ती अशा प्रकारे समतोल राखते, ती कधीही टोकाची भूमिका घेत नाही आणि ‘सगळं काही चालतं’ असाही विचार करत नाही. टेहळणी बुरूज२३.०७ १४ ¶१-२

सोमवार, २५ ऑगस्ट

तुम्ही त्याला कधीच पाहिलेलं नसूनही तुमचं त्याच्यावर प्रेम आहे.—१ पेत्र. १:८.

सैतानाने येशूला बऱ्‍याच वेळा मोहात पाडायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर देवाविरुद्ध बंड करण्यासाठीसुद्धा सैतानाने त्याच्यावर सरळसरळ दबाव टाकला. (मत्त. ४:१-११) येशूला खंडणी बलिदानाची किंमत देता येऊ नये म्हणून सैतानाने जणू त्याला पाप करायला लावायचा ठाम निश्‍चयच केला होता. येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यात, त्याला आणखी बऱ्‍याच परीक्षांचा सामना करावा लागला. लोकांनी त्याचा छळ केला. इतकंच नाही तर त्यांनी त्याला ठार मारायचासुद्धा प्रयत्न केला. (लूक ४:२८, २९; १३:३१) तसंच त्याला आपल्या शिष्यांच्या कमतरता सहन कराव्या लागल्या. (मार्क ९:३३, ३४) जेव्हा त्याला न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं, तेव्हा त्याचा खूप छळ करण्यात आला आणि त्याची थट्टा करण्यात आली. आणि त्यानंतर त्याला अतिशय वेदनादायक आणि अपमानास्पद मृत्यू सहन करावा लागला. (इब्री १२:१-३) त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकांमध्ये तर त्याला यहोवाच्या संरक्षणाशिवाय सगळं काही एकट्यानेच सहन करावं लागलं. (मत्त. २७:४६) हे स्पष्टच आहे, की येशूला खंडणी देण्यासाठी खूप काही सहन करावं लागलं. आपल्यासाठी तो स्वतःहून खंडणी द्यायला तयार झाला, या गोष्टीवर मनन केल्यामुळे त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढत नाही का? टेहळणी बुरूज२४.०१ १०-११ ¶७-९

मंगळवार, २६ ऑगस्ट

जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.—नीति. २१:५.

धीर धरल्यामुळे आपल्याला इतरांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवता येतं. आपल्यात जर धीर असेल तर दुसरे जेव्हा बोलत असतील तेव्हा आपण त्यांचं लक्ष देऊन ऐकू. (याको. १:१९) धीरामुळे शांती टिकून राहते. तसंच, धीरामुळे आपण तणावात असताना इतरांचं मन दुखावेल असं काहीही बोलत नाही किंवा करत नाही. आपल्यात धीर असेल तर जेव्हा कोणी आपल्या भावना दुखावतं तेव्हा आपण लगेच रागवणार नाही. बदला घेण्याच्या भावनेने काही करण्याऐवजी आपण ‘एकमेकांचं सहन करत राहू आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत राहू.’ (कलस्सै. ३:१२, १३) धीर धरल्यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील. आपण घाईगडबडीत किंवा भावनेच्या भरात निर्णय न घेता आपल्यापुढे जे पर्याय आहेत त्यांचा विचार करून, संशोधन करण्यासाठी वेळ काढून निर्णय घेऊ. उदाहरणार्थ, जर आपण नोकरी शोधत असू तर कदाचित आपल्याला मिळालेली पहिली नोकरी करण्याचा आपण विचार करू. पण जर आपल्यात धीर असला तर या नोकरीचा आपल्या कुटुंबावर आणि यहोवासोबतच्या नात्यावर काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू. धीर धरल्यामुळे कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून आपण दूर राहू. टेहळणी बुरूज२३.०८ २२ ¶८-९

बुधवार, २७ ऑगस्ट

माझ्या शरीरात मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातल्या नियमाशी लढतो आणि मला माझ्या शरीरात असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी बनवतो.—रोम. ७:२३.

जर तुमच्यातल्या पापी मनोवृत्तीमुळे तुम्ही निराश होत असाल तर समर्पणाच्या वचनावर विचार केल्यामुळे मोहांचा प्रतिकार करायचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल. ते कसं? जेव्हा तुम्ही यहोवाला समर्पण करता तेव्हा स्वतःला नाकारत असता. म्हणजेच यहोवाला न आवडणाऱ्‍या इच्छांना आणि ध्येयांना तुम्ही ‘नाही’ म्हणता. (मत्त. १६:२४) जेव्हा तुमच्यावर परीक्षा येतात तेव्हा काय करायचं यावर तुम्ही विचार करत बसत नाही. कारण यहोवाला विश्‍वासू राहण्याशिवाय इतर सर्व पर्यायांकडे तुम्ही पाठ फिरवलेली असते. यहोवाला खूश करायचा तुमचा निर्धार पक्का असतो. आणि या बाबतीत तुम्ही ईयोबसारखेच वागत असता. जेव्हा त्याच्यावर खूप कठीण समस्या आल्या, तेव्हा त्याने अगदी ठामपणे असं म्हटलं: “मी माझा खरेपणा सोडणार नाही!”—ईयो. २७:५. टेहळणी बुरूज२४.०३ ९ ¶६-७

गुरुवार, २८ ऑगस्ट

यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे; प्रामाणिकपणे त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.—स्तो. १४५:१८.

‘प्रेमाचा देव’ यहोवा आपल्यासोबत आहे! (२ करिंथ. १३:११) त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे. आणि आपल्याला या गोष्टीची खातरी आहे, की तो आपल्याला त्याच्या “एकनिष्ठ प्रेमाने वेढतो.” (स्तो. ३२:१०, तळटीप.) त्याने आपल्याला प्रेम कसं दाखवलंय यावर आपण मनन करत राहिलो, तर तो आपल्यासाठी आणखी खराखुरा होईल आणि आपल्याला त्याच्याजवळ असल्यासारखं वाटेल. तसंच आपण कोणताही संकोच न बाळगता त्याला मनमोकळेपणाने प्रार्थना करू शकतो. आणि आपल्याला त्याच्या प्रेमाची किती गरज आहे हे त्याला सांगू शकतो. शिवाय, आपण आपल्या चिंता त्याला सांगू शकतो. आणि आपण याची खातरी बाळगू शकतो की त्याला आपल्या भावना कळतात आणि तो आपल्याला मदत करायला आतुर आहे. (स्तो. १४५:१९) कडाक्याच्या थंडीत जसं आपण शेकोटीकडे ओढले जातो तसं या थंडावलेल्या जगात आपण यहोवाच्या उबदार प्रेमाकडे ओढले जातो. यहोवाच्या प्रेमात खूप ताकद असली तरी त्या प्रेमात ममतासुद्धा आहे. त्यामुळे आयुष्यात आनंदी राहा, कारण यहोवा तुमच्यावर प्रेम करतो! मग आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणता येईल: “माझं यहोवावर प्रेम आहे.”—स्तो. ११६:१. टेहळणी बुरूज२४.०१ ३१ ¶१९-२०

शुक्रवार, २९ ऑगस्ट

मी तुझं नाव प्रकट केलंय.—योहा. १७:२६.

येशूने लोकांना फक्‍त देवाचं नाव सांगितलं नाही, कारण यहुद्यांना देवाचं नाव यहोवा आहे हे आधीपासूनच माहीत होतं. येशूने त्यांना आपल्या “पित्याला प्रकट” करण्यातसुद्धा चांगलं उदाहरण मांडलं. (योहा. १:१७, १८) उदाहरणार्थ, हिब्रू शास्त्रवचनांत यहोवा दयाळू आणि करुणामय असल्याचं म्हटलंय. (निर्ग. ३४:५-७) येशूने एका पित्याचं आणि त्याच्या हरवलेल्या मुलाचं उदाहरण देऊन हे सत्य आणखी स्पष्ट केलं. या उदाहरणातला पिता जेव्हा आपल्या पश्‍चात्तापी मुलाला “दूर असतानाच” पाहतो तेव्हा तो त्याच्याकडे धावत जातो, त्याला मिठी मारतो आणि त्याला मनापासून क्षमा करतो. यहोवा किती दयाळू आणि कनवाळू आहे याचं चित्र या उदाहरणामुळे आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. (लूक १५:११-३२) येशूने आपला पिता जसा आहे अगदी तसंच त्याला प्रकट केलं. टेहळणी बुरूज२४.०२ १० ¶८-९

शनिवार, ३० ऑगस्ट

देवाकडून मिळणाऱ्‍या सांत्वनाद्वारे इतरांचं सांत्वन करा.—२ करिंथ. १:४.

दुःखात असलेल्यांचं यहोवा सांत्वन करतो आणि त्यांना ताजंतवानं करतो. आपण यहोवाचं अनुकरण करून इतरांबद्दल सहानुभूती कशी दाखवू शकतो आणि त्यांचं सांत्वन कसं करू शकतो? एक मार्ग म्हणजे, इतरांचं सांत्वन करण्यासाठी जे गुण वाढवणं गरजेचं आहे ते आपण विकसित करू शकतो. ते गुण कोणते आहेत? दररोज ‘एकमेकांचं सांत्वन करत राहण्यासाठी’ आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. ते प्रेम आपण कसं टिकवून ठेवू शकतो? (१ थेस्सलनी. ४:१८) आपण स्वतःमध्ये सहानुभूती, बंधुप्रेम आणि प्रेमळपणा यांसारखे गुण विकसित केले पाहिजेत. (कलस्सै. ३:१२; १ पेत्र ३:८) या गुणांमुळे आपल्याला कशी मदत होईल? जेव्हा हे गुण आपल्या स्वभावाचा भाग बनतात, तेव्हा दुःखात असलेल्या व्यक्‍तीचं सांत्वन करण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात उत्पन्‍न होते. येशूने म्हटलं होतं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो.” (मत्त. १२:३४, ३५) खरंच, भाऊबहिणींचं सांत्वन करणं हा प्रेम दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. टेहळणी बुरूज२३.११ १० ¶१०-११

रविवार, ३१ ऑगस्ट

सखोल समज असलेल्यांना मात्र या गोष्टी समजतील.—दानी. १२:१०.

बायबलमधल्या भविष्यवाण्या नीट समजून घ्यायच्या असतील, तर आपण कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही एका अनोळखी ठिकाणी गेला आहात. हे ठिकाण तुमच्या ओळखीचं नाही, पण तुमच्यासोबत आलेल्या मित्राला त्या ठिकाणाची चांगली माहिती आहे. तुम्ही सध्या कुठे आहात, तिथून प्रत्येक रस्ता कुठे जातो, हे त्याला चांगलं माहीत आहे. साहजिकच, तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्याचप्रमाणे, काळाच्या ओघात आपण सध्या कुठे आहोत आणि पुढे आपलं भविष्य काय असेल, हे यहोवाला चांगलं माहीत आहे. म्हणून, बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी आपण नम्रपणे यहोवाची मदत घेतली पाहिजे. (दानी. २:२८; २ पेत्र १:१९, २०) सगळ्या पालकांप्रमाणेच, यहोवालाही असं वाटतं की आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळावं. (यिर्म. २९:११) पण मानवी पालकांना एक गोष्ट शक्य नाही, जी यहोवाला शक्य आहे. ती म्हणजे, भविष्यात काय होईल हे तो अचूकपणे सांगू शकतो. भविष्यात होणाऱ्‍या महत्त्वाच्या घटना आपल्याला आधीच समजाव्यात असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याने त्या घटनांबद्दलच्या भविष्यवाण्या आपल्या वचनात लिहून ठेवल्या आहेत.—यश. ४६:१०. टेहळणी बुरूज२३.०८ ८ ¶३-४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा