वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. ८२-९५
  • जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • मंगळवार, १ जुलै
  • बुधवार, २ जुलै
  • गुरुवार, ३ जुलै
  • शुक्रवार, ४ जुलै
  • शनिवार, ५ जुलै
  • रविवार, ६ जुलै
  • सोमवार, ७ जुलै
  • मंगळवार, ८ जुलै
  • बुधवार, ९ जुलै
  • गुरुवार, १० जुलै
  • शुक्रवार, ११ जुलै
  • शनिवार, १२ जुलै
  • रविवार, १३ जुलै
  • सोमवार, १४ जुलै
  • मंगळवार, १५ जुलै
  • बुधवार, १६ जुलै
  • गुरुवार, १७ जुलै
  • शुक्रवार, १८ जुलै
  • शनिवार, १९ जुलै
  • रविवार, २० जुलै
  • सोमवार, २१ जुलै
  • मंगळवार, २२ जुलै
  • बुधवार, २३ जुलै
  • गुरुवार, २४ जुलै
  • शुक्रवार, २५ जुलै
  • शनिवार, २६ जुलै
  • रविवार, २७ जुलै
  • सोमवार, २८ जुलै
  • मंगळवार, २९ जुलै
  • बुधवार, ३० जुलै
  • गुरुवार, ३१ जुलै
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. ८२-९५

जुलै

मंगळवार, १ जुलै

तो चांगली कामं करत आणि लोकांना बरं करत संपूर्ण देशभर फिरला.—प्रे. कार्यं १०:३८.

येशू जे काही बोलला आणि त्याने जे काही केलं, तसंच त्याने जे चमत्कार केले, त्यांवरून त्याच्या पित्याचे विचार आणि भावना दिसून आल्या. (योहा. १४:९) येशूने केलेल्या चमत्कारांवरून काय शिकायला मिळतं? येशूचं आणि त्याच्या पित्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. पृथ्वीवर असताना येशूने आपल्या चमत्कार करायच्या शक्‍तीचा वापर करून लोकांचं दुःख हलकं केलं. त्यावरून लोकांबद्दल त्याला किती प्रेम आहे हे दिसून आलं. उदाहरणार्थ, एकदा दोन आंधळ्यांनी मोठ्याने ओरडून त्याच्याकडे मदत मागितली. (मत्त. २०:३०-३४) त्या वेळी येशूला त्यांचा “कळवळा” आला आणि त्याने त्यांना बरं केलं. इथे ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “कळवळा” असं करण्यात आलंय त्या शब्दाचा अर्थ ‘मनात अगदी आतून वाटणारी हळहळ’ असा होतो. याच कोमल भावनेने त्याने भुकेल्यांना जेवू घातलं आणि एका कुष्ठरोग्याला बरं केलं. आणि अशा प्रकारे त्याने लोकांवर आपलं प्रेम दाखवलं. (मत्त. १५:३२; मार्क १:४१) यावरून आपण याची खातरी बाळगू शकतो, की ‘कोमल दया’ दाखवणाऱ्‍या यहोवा देवाचं आणि त्याच्या मुलाचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा त्यांनासुद्धा दुःख होतं. (लूक १:७८; १ पेत्र ५:७) खरंच मानवजातीच्या सगळ्या समस्या काढून टाकण्यासाठी यहोवा आणि येशू किती आतुरतेने वाट पाहत असतील! टेहळणी बुरूज२३.०४ ३ ¶४-५

बुधवार, २ जुलै

यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्व लोकांनो, वाईट गोष्टींचा द्वेष करा. तो आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या जिवांचं रक्षण करतो; तो त्यांना दुष्टांच्या हातून सोडवतो.—स्तो. ९७:१०.

सैतानाच्या या दुष्ट जगात प्रचलित असलेले चुकीचे विचार आणि कल्पना यांपासून दूर राहायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्याऐवजी बायबलचं वाचन आणि अभ्यास करून आपण आपल्या मनात चांगले विचार पेरले पाहिजेत. तसंच सभांना गेल्यामुळे आणि सेवाकार्यात भाग घेतल्यामुळे आपले विचार शुद्ध राहू शकतात. आपण जर असं केलं तर यहोवासुद्धा आपल्याला वचन देतो की आपण सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो आपल्यावर येऊ देणार नाही. (१ करिंथ. १०:१२, १३) या शेवटच्या कठीण काळात यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने खूप जास्त प्रार्थना करण्याची गरज आहे. आपण यहोवासमोर “आपलं मन मोकळं” करावं अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ६२:८) तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल त्याचे आभार माना आणि त्याची स्तुती करा. धैर्याने सेवाकार्य करण्यासाठी त्याच्याकडे मदत मागा. समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी आणि मोहांचा प्रतिकार करण्यासाठी त्याच्याकडे मदतीची याचना करा. यहोवाला नियमितपणे प्रार्थना करा आणि त्यासाठी कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्‍तीला आड येऊ देऊ नका. टेहळणी बुरूज२३.०५ ७ ¶१७-१८

गुरुवार, ३ जुलै

एकमेकांचा विचार करून एकमेकांना प्रोत्साहन देत राहा.—इब्री १०:२४, २५.

आपण सभांना का जातो? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला यहोवाची स्तुती करायची असते म्हणून. (स्तो. २६:१२; १११:१) तसंच, या कठीण काळात एकमेकांना उत्तेजन देण्यासाठीसुद्धा आपण सभेला जातो. (१ थेस्सलनी. ५:११) जेव्हा आपण आपला हात वर करून उत्तर देतो तेव्हा आपण या दोन्ही गोष्टी करत असतो. पण दोन गोष्टींमुळे आपल्याला हे करणं कठीण जाऊ शकतं. कदाचित आपल्याला उत्तर द्यायला भीती वाटत असेल, किंवा उत्तर द्यायची आपली खूप इच्छा असेल, पण आपल्याला जेव्हा-जेव्हा उत्तर द्यायचं असतं तेव्हा कदाचित संधी मिळत नसेल. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? प्रेषित पौलने म्हटलं, की आपण ‘एकमेकांना प्रोत्साहन देण्याकडे’ लक्ष दिलं पाहिजे. आपल्या साध्याशा उत्तरानेसुद्धा आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळू शकतं हे समजून घेतल्यामुळे आपल्याला उत्तरं द्यायला जास्त भीती वाटणार नाही. आणि आपल्याला उत्तरं द्यायची जरी पुन्हा पुन्हा संधी मिळत नसेल, तरी मंडळीतल्या इतर भाऊबहिणींना ती संधी मिळत आहे याबद्दल आपण आनंद मानू शकतो.—१ पेत्र ३:८. टेहळणी बुरूज२३.०४ २० ¶१-३

शुक्रवार, ४ जुलै

यरुशलेमला जा आणि इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधा.—एज्रा १:३.

राजाकडून घोषणा झाली होती. जवळजवळ ७० वर्षं बंदिवासात असलेले यहुदी, मायदेशी म्हणजे इस्राएलला जाऊ शकत होते. (एज्रा १:२-४) हे फक्‍त यहोवाच घडवून आणू शकत होता. कारण बाबेल आपल्या गुलामांना सहसा बंदिवासातून मुक्‍त करत नव्हतं. (यश. १४:४, १७) पण बाबेलची सत्ता पलटली होती. आणि आता नवीन राजाने यहुद्यांना आपल्या मायदेशी जाण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे प्रत्येक यहुदी व्यक्‍तीला आणि खासकरून कुटुंबप्रमुखांना आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तो म्हणजे आपल्या मायदेशी जायचं की बाबेलमध्येच राहायचं. आणि हा निर्णय घेणं नक्कीच सोपं नव्हतं. कारण वयस्कर लोकांना हा खडतर प्रवास झेपण्यासारखा नव्हता. तसंच यहुद्यांपैकी बऱ्‍याच लोकांचा जन्म बाबेलमध्येच झाल्यामुळे तोच त्यांचा मायदेश होता. आणि इस्राएल हा त्यांच्यासाठी फक्‍त त्यांच्या पूर्वजांचा देश होता. याशिवाय काही यहुद्यांनी बाबेलमध्ये चांगली धनसंपत्ती मिळवली होती. त्यामुळे तिथलं ऐशआरामाचं जीवन सोडून आणि व्यवसाय सोडून एका परक्या देशात जाऊन राहणं त्यांना कठीण वाटलं असेल. टेहळणी बुरूज२३.०५ १४ ¶१-२

शनिवार, ५ जुलै

तयार राहा.—मत्त. २४:४४.

देवाचं वचन आपल्याला धीर, करुणा आणि प्रेम हे गुण वाढवत राहायचं उत्तेजन देतं. जसं की लूक २१:१९ मध्ये म्हटलंय: “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.” तसंच, कलस्सैकर ३:१२ मध्ये म्हटलंय: ‘करुणेचं वस्त्र घाला.’ आणि १ थेस्सलनीकाकर ४:९, १० मध्ये म्हटलंय: “देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे. . . . पण बांधवांनो, आम्ही तुम्हाला ते जास्तीत जास्त करण्याचं प्रोत्साहन देतो.” हा सल्ला अशा शिष्यांना देण्यात आला होता जे आधीपासूनच धीर, करुणा आणि प्रेम दाखवत होते. पण त्यांना हे गुण वाढवत राहणं गरजेचं होतं. आणि आज आपणही तेच करणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी यांतला प्रत्येक गुण कसा दाखवला याकडे लक्ष द्या. आणि आपल्याला त्यांचं अनुकरण कसं करता येईल ते पाहा. त्यामुळे मोठ्या संकटासाठी आपल्यालासुद्धा तयार राहता येईल. पुढे जेव्हा मोठं संकट सुरू होईल, तेव्हा धीर कसा दाखवायचा हे तुम्हाला माहीत असेल आणि धीर दाखवायचा तुमचा निश्‍चयसुद्धा आणखी मजबूत झालेला असेल. टेहळणी बुरूज२३.०७ ३ ¶४, ८

रविवार, ६ जुलै

एक राजमार्ग, ‘पवित्रतेचा मार्ग’ तिथे असेल.—यश. ३५:८.

‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे; मग आपण अभिषिक्‍तांपैकी असो किंवा ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असो. कारण “पवित्रतेचा मार्ग” आपल्याला आध्यात्मिक नंदनवनातून भविष्यात देवाच्या राज्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांकडे घेऊन जाणार आहे. (योहा. १०:१६) इ.स. १९१९ पासून लाखो स्त्री-पुरुष आणि मुलं खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी या लाक्षणिक राजमार्गावर प्रवास सुरू केला आहे. बाबेलमधून मायदेशी परतणाऱ्‍या यहुद्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये याची यहोवाने काळजी घेतली. (यश. ५७:१४) मग आजच्या काळातल्या ‘पवित्रतेच्या मार्गाबद्दल’ काय? १९१९ च्या बऱ्‍याच शतकांआधीपासून यहोवाने त्याची भीती बाळगणाऱ्‍या लोकांचा वापर करून, मोठ्या बाबेलमधून बाहेर पडायचा मार्ग तयार करायला सुरुवात केली. (यशया ४०:३ सोबत तुलना करा.) हा लाक्षणिक मार्ग तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि त्यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांना मोठी बाबेल सोडून आध्यात्मिक नंदनवनात येणं आणि तिथं येऊन यहोवाची शुद्ध उपासना करणं शक्य झालं. टेहळणी बुरूज२३.०५ १५-१६ ¶८-९

सोमवार, ७ जुलै

आनंदाने यहोवाची सेवा करा. जल्लोष करत त्याच्यासमोर या.—स्तो. १००:२.

आपण आनंदाने आणि स्वखुशीने यहोवाची उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे. (२ करिंथ. ९:७) मग प्रश्‍न आहे, की एखादं आध्यात्मिक ध्येय गाठायची आपल्याला इच्छाच होत नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यासाठी मेहनत करत राहावी का? प्रेषित पौलचंच उदाहरण घ्या. तो म्हणाला: “मी आपल्या शरीराला कठोरपणे शिस्त लावतो आणि त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथ. ९:२५-२७, तळटीप.) योग्य ते करायची इच्छा नसतानाही पौलने स्वतःला ते करण्यासाठी भाग पाडलं. मग यहोवाने पौलची सेवा स्वीकारली का? नक्कीच! आणि त्याने केलेल्या प्रयत्नांचं त्याला प्रतिफळही दिलं. (२ तीम. ४:७, ८) पौलसारखंच आपणही इच्छा नसताना आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहतो, तेव्हा यहोवा खूश होतो. कारण ती गोष्ट करायला आपल्याला आवडत नसलं तरी त्याच्यावरच्या प्रेमापोटी आपण ती गोष्ट करतो, हे त्याला माहीत आहे. आणि त्याने जसं पौलच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिले, तसं तो आपल्या प्रयत्नांवरही आशीर्वाद देईल. (स्तो. १२६:५) आणि यहोवा कशा प्रकारे आपल्याला आशीर्वाद देतो, हे पाहून आपलं ध्येय गाठायची आपल्याला प्रेरणा मिळते. टेहळणी बुरूज२३.०५ २९ ¶९-१०

मंगळवार, ८ जुलै

यहोवाचा दिवस येत आहे.—१ थेस्सलनी. ५:२.

प्रेषित पौल यहोवाच्या दिवसातून न वाचणाऱ्‍या लोकांची तुलना झोपेत असलेल्या लोकांशी करतो. झोपेत असलेल्या व्यक्‍तीला आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे आणि वेळ कसा निघून चालला आहे, हे कळत नाही. त्यामुळे जेव्हा महत्त्वाच्या घडामोडी घडतात तेव्हा त्याला त्या समजत नाहीत आणि काही करताही येत नाही. आज बरेच लोक आध्यात्मिक रितीने झोपेत आहेत. (रोम. ११:८) आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत आणि मोठं संकट आता लवकरच सुरू होणार आहे या गोष्टींच्या पुराव्यांवर ते विश्‍वास ठेवत नाहीत. (२ पेत्र ३:३, ४) त्यामुळे सावध राहण्याबद्दल आपल्याला जो सल्ला देण्यात आलाय, तो जसजसे दिवस जातील तसतसा जास्तच महत्त्वाचा बनत चालला आहे. (१ थेस्सलनी. ५:६) त्यामुळे आपली शांत आणि स्थिर मनःस्थिती असली पाहिजे. पण का? कारण अशी मनोवृत्ती ठेवल्यामुळे आपण सामाजिक आणि राजकीय वादविषयांमध्ये गुरफटून जाणार नाही. जसजसा यहोवाचा दिवस जवळ येत जाईल तसतशी कोणाची तरी बाजू घेण्याचा दबाव आपल्यावर वाढत जाईल. पण ती परिस्थिती आपण कशी हाताळू याबद्दल आपल्याला जास्त चिंता करत बसण्याची गरज नाही. कारण देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला शांत आणि स्थिर मन ठेवून योग्य निर्णय घ्यायला मदत करेल.—लूक १२:११, १२. टेहळणी बुरूज२३.०६ १० ¶६-७

बुधवार, ९ जुलै

हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर, मला शक्‍ती दे.—शास्ते १६:२८.

शमशोन हे नाव ऐकलं तर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं? तुमच्या मनात नक्कीच एका अतिशय शक्‍तिशाली माणसाचं चित्र उभं राहत असेल. आणि तो तसाच होता. पण त्याने त्याच्या जीवनात एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागेल. तरी त्याने त्याच्या एकंदरीत आयुष्यात विश्‍वासूपणाचं जे चांगलं उदाहरण मांडलं त्याकडे यहोवाने पाहिलं. आणि आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी ते बायबलमध्ये लिहूनही ठेवलं. यहोवाने त्याच्या निवडलेल्या इस्राएली लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मोठमोठ्या अद्‌भुत गोष्टी करण्यासाठी शमशोनचा उपयोग केला. शमशोनच्या मृत्यूच्या बऱ्‍याच शतकांनंतर, यहोवाने विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या यादीत त्याच्याही नावाचा उल्लेख करण्यासाठी प्रेषित पौलला प्रेरित केलं. (इब्री ११:३२-३४) त्याच्या उदाहरणातून आपल्यालाही प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्या जीवनात बऱ्‍याच कठीण समस्या आल्या तेव्हासुद्धा तो यहोवावर विसंबून राहिला. शमशोनच्या उदाहरणातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्या उदाहरणातून आपल्याला इतरही व्यावहारिक धडे शिकायला मिळतात. टेहळणी बुरूज२३.०९ २ ¶१-२

गुरुवार, १० जुलै

आपल्या विनंत्या देवाला कळवा.—फिलिप्पै. ४:६.

आपण आपल्या चिंतांसाठी सतत यहोवाला कळकळून प्रार्थना केली, तर आपल्याला धीर दाखवत राहायला मदत होईल. (१ थेस्सलनी. ५:१७) सध्या कदाचित तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देत नसाल. पण आज जेव्हा तुम्ही निराश होता, गोंधळून जाता किंवा चिंतेने भारावून जाता तेव्हाही तुम्ही यहोवाकडे मदत मागता का? जर तुम्ही आतापासूनच दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांबद्दल यहोवाकडे नियमितपणे मदत मागत राहिलात, तर पुढे येणाऱ्‍या मोठ्या संकटामध्ये यहोवाकडे मदत मागायला तुम्हाला संकोच वाटणार नाही. यामुळे तुम्हाला या गोष्टीची खातरी पटेल की तुम्हाला केव्हा आणि कशी मदत करायची हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (स्तो. २७:१, ३) आपण जर आज येणाऱ्‍या समस्यांमध्ये धीर दाखवला तर मोठ्या संकटादरम्यान धीर दाखवायलासुद्धा आपल्याला जास्त सोपं जाईल. (रोम. ५:३) असं आपण का म्हणू शकतो? बऱ्‍याच भाऊबहिणींना असं दिसून आलंय की विश्‍वासाच्या प्रत्येक परीक्षेत धीर दाखवल्यामुळे, पुढे येणाऱ्‍या परीक्षांमध्येसुद्धा टिकून राहायला मदत होते. धीर दाखवल्यामुळे त्यांच्या विश्‍वासाची पारख झाली आहे. आणि यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार आहे या गोष्टीवरचा त्यांचा भरवसा आणखी वाढला आहे. आणि या विश्‍वासामुळेच, पुढे येणाऱ्‍या समस्यांना धीराने तोंड द्यायला त्यांना मदत झाली आहे.—याको. १:२-४. टेहळणी बुरूज२३.०७ ३ ¶७-८

शुक्रवार, ११ जुलै

मी तुझी विनंती मान्य करतो.—उत्प. १९:२१.

यहोवामध्ये नम्रता आणि करुणा हे गुण असल्यामुळे तो समजूतदारपणा दाखवतो. उदाहरणार्थ, जेव्हा यहोवाने सदोमच्या दुष्ट लोकांचा नाश करायचं ठरवलं तेव्हा त्याची नम्रता दिसून आली. यहोवाने स्वर्गदूताद्वारे लोटला डोंगराळ प्रदेशाकडे पळून जायला सांगितलं होतं. पण लोटला तिथे जायची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने यहोवाला विनंती केली, की त्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सोअर शहरात जाऊ द्यावं. यहोवा देवाने सोअर शहराचासुद्धा नाश करायचं ठरवलं होतं. तो लोटला म्हणू शकला असता की त्याने त्याची आज्ञा जशीच्या तशी पाळावी. पण त्याने तसं केलं नाही. उलट त्याने लोटची विनंती मान्य केली आणि त्यामुळे त्याने सोअरचा नाश केला नाही. (उत्प. १९:१८-२२) याच्या काही शतकांनंतर यहोवाने निनवेच्या लोकांनासुद्धा करुणा दाखवली. त्याने योना संदेष्ट्याला तिथल्या लोकांचा आणि शहराचा नाश करण्याबद्दलची घोषणा करायला पाठवलं होतं. पण जेव्हा निनवेच्या लोकांनी पश्‍चात्ताप केला, तेव्हा यहोवाला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं आणि त्याने त्या शहराचा नाश केला नाही.—योना ३:१, १०; ४:१०, ११. टेहळणी बुरूज२३.०७ २१ ¶५

शनिवार, १२ जुलै

त्यांनी यहोआशला ठार मारलं. पण राजांच्या कबरेत मात्र त्याला दफन केलं नाही.—२ इति. २४:२५.

यहोआशच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? तो अशा एका झाडासारखा होता ज्याची मुळं खोलवर गेलेली नव्हती आणि ज्याला आधाराची गरज होती. जेव्हा तो आधार म्हणजे यहोयादा गेला आणि यहोआश खोटी उपासना करणाऱ्‍या प्रमुखांचं ऐकू लागला, तेव्हा जणू तो वाऱ्‍याने झुकला आणि यहोवाला एकनिष्ठ राहू शकला नाही. या जबरदस्त उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं की फक्‍त आपल्या भाऊबहिणींचं किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं आपल्यासमोर चांगलं उदाहरण आहे म्हणून आपण यहोवाची भीती बाळगली नाही पाहिजे. तर, आध्यात्मिक रीतीने मजबूत राहण्यासाठी, नियमितपणे अभ्यास, मनन आणि प्रार्थना करून यहोवाबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम आणि आदर वाढवला पाहिजे. (यिर्म. १७:७, ८; कलस्सै २:६, ७) यहोवा आपल्याकडून खूप जास्त गोष्टींची अपेक्षा करत नाही. तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो याचा सारांश उपदेशक १२:१३ मध्ये सांगितला आहे. तिथे म्हटलं आहे: “खऱ्‍या देवाचं भय मान आणि त्याच्या आज्ञा पाळ; हेच माणसाचं कर्तव्य आहे.” आपण यहोवाची भीती बाळगली तर पुढे येणाऱ्‍या परीक्षांमध्ये आपण टिकून राहू शकू. आणि कोणत्याही गोष्टीमुळे आपली यहोवासोबतची मैत्री धोक्यात येणार नाही. टेहळणी बुरूज२३.०६ १९ ¶१७-१९

रविवार, १३ जुलै

पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.—प्रकटी. २१:५.

पाचव्या वचनाच्या सुरुवातीला, “राजासनावर बसलेला देव म्हणाला: . . . ” असं लिहिलंय. (प्रकटी. २१:५क) यावरून कळतं की इथे यहोवा बोलतोय. तसंच, प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या दृष्टान्तांमध्ये यहोवा फक्‍त तीन वेळा बोलला आहे. आणि हे त्यांपैकी एक वचन आहे. त्यामुळे ही गॅरंटी कोणी शक्‍तिशाली स्वर्गदूताने नाही किंवा पुनरुत्थान झालेल्या येशूने नाही, तर स्वतः यहोवाने दिली आहे, हे आपल्याला समजतं. आणि ही गोष्टच, यहोवा नंतर पुढे दिलेल्या वचनात जे म्हणतो, त्यावर भरवसा ठेवायला आपल्याला आधार देते. का बरं? कारण तिथे म्हटलंय की यहोवा “कधीही खोटं बोलू शकत नाही.” (तीत १:२) त्यामुळे प्रकटीकरण २१:५, ६ मध्ये आपण जे काही वाचतो त्यावर आपण नक्कीच भरवसा ठेवू शकतो. “पाहा!” या शब्दावर थोडंसं लक्ष द्या “पाहा!” या शब्दासाठी जो मूळ ग्रीक शब्द आहे, त्याचा प्रकटीकरण या पुस्तकात वारंवार वापर करण्यात आला आहे. मग या शब्दानंतर काय सांगण्यात आलं? पुढे देव असं म्हणतो: “मी सर्वकाही नवीन करत आहे.” इथे यहोवा भविष्यात होणाऱ्‍या बदलांबद्दल बोलत आहे. पण त्याच्यासाठी हे अभिवचन इतकं खरं आहे, की ते जणू काही घडतच आहे.—यश. ४६:१०. टेहळणी बुरूज२३.११ ३-४ ¶७-८

सोमवार, १४ जुलै

तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.—मत्त. २६:७५.

प्रेषित पेत्र बऱ्‍याच वेळा चुकला. याची काही उदाहरणं पाहा. येशू जेव्हा शिष्यांना सांगत होता, की त्याला बायबल भविष्यवाणीनुसार कशा प्रकारे छळलं जाईल आणि मारलं जाईल, तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि रागवला. (मार्क ८:३१-३३) तसंच सगळ्यात श्रेष्ठ कोण, याबद्दल पेत्र आणि इतर शिष्यांमध्ये नेहमी वाद व्हायचा. (मार्क ९:३३, ३४) आणि येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा पेत्रने रागाच्या भरात एका माणसाचा कान कापला. (योहा. १८:१०) शिवाय त्याच रात्री पेत्रने येशूला ओळखत असल्याचं तीन वेळा नाकारलं. (मार्क १४:६६-७२) आणि त्यामुळे तो नंतर ढसाढसा रडला. पण निराश आणि दुःखी झालेल्या आपल्या या प्रेषिताला येशूने सोडलं नाही. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने पेत्रला त्याचं येशूवर अजूनही प्रेम आहे हे सिद्ध करायची संधी दिली. शिवाय, मेंढपाळ या नात्याने आपल्या मेंढरांची काळजी घ्यायची जबाबदारीसुद्धा येशूने त्याच्यावर सोपवली. (योहा. २१:१५-१७) पेत्रनेसुद्धा आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये असताना पवित्र शक्‍तीने ज्या लोकांचा अभिषेक करण्यात आला त्यात पेत्रसुद्धा होता. टेहळणी बुरूज२३.०९ २२ ¶६-७

मंगळवार, १५ जुलै

माझ्या लहान मेढरांची काळजी घे.—योहा. २१:१६.

पेत्रने आपल्यासोबत सेवा करणाऱ्‍या वडिलांना, ‘देवाच्या कळपाचा सांभाळ करायचं’ प्रोत्साहन दिलं. (१ पेत्र ५:१-४) तुम्हीसुद्धा एक वडील असाल तर तुमचं भाऊबहिणींवर प्रेम आहे आणि मेंढपाळ म्हणून सेवा करायची तुमची इच्छा आहे हे आम्हाला माहीत आहे. पण कधीकधी खूप व्यस्त असल्यामुळे किंवा थकून गेल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं, की आपल्याला आपली जबाबदारी पूर्ण करता येणार नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला भाऊबहिणींबद्दल वाटणारी काळजी तुम्ही यहोवाला बोलून दाखवू शकता. पेत्रने म्हटलं: “जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.” (१ पेत्र ४:११) तुमच्या भाऊबहिणींना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्या समस्या या सैतानाच्या जगात पूर्णपणे काढून टाकता येणार नाहीत. पण लक्षात असू द्या की तुम्ही जितकं करू शकता, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपला “प्रमुख मेंढपाळ” येशू ख्रिस्त करू शकतो. आणि तो हे आज आणि येणाऱ्‍या नवीन जगातही करू शकतो. म्हणून यहोवा वडिलांकडून फक्‍त इतकीच अपेक्षा करतो, की त्यांनी आपल्या मेंढरांवर प्रेम करावं, मेंढपाळ म्हणून त्यांची काळजी घ्यावी आणि ‘कळपासाठी उदाहरण बनावं.’ टेहळणी बुरूज२३.०९ २९-३० ¶१३-१४

बुधवार, १६ जुलै

बुद्धिमानांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला माहीत आहे.—१ करिंथ. ३:२०.

माणसांच्या विचाराने चालू नका. आपण जर कोणत्याही गोष्टीकडे मानवी दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला तर आपण कदाचित यहोवाला आणि त्याच्या स्तरांना विसरून जाऊ. (१ करिंथ. ३:१९) “जगाची बुद्धी” ही आपल्याला नेहमी स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला प्रवृत्त करते. पहिल्या शतकातल्या पर्गम आणि थुवतीरा या शहरांमधले लोक मूर्तिपूजक आणि अनैतिक होते. त्यामुळे या शहरांमध्ये राहणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव झाला होता. या दोन्ही शहरांतल्या मंडळ्यांनी लैंगिक अनैतिकतेला खपवून घेतल्यामुळे येशूने कडक शब्दांत त्यांना सल्ला दिला होता. (प्रकटी. २:१४, २०) आजसुद्धा आपल्यावर जगाची चुकीची विचारसरणी स्वीकारायचा दबाव येत असतो. आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या ओळखीचे लोक कदाचित आपल्याला हे पटवून द्यायचा प्रयत्न करतील, की यहोवाचे नियम खूप कडक आहेत आणि आपल्याला नेहमीच ते पाळायची गरज नाही. उदाहरणार्थ, कदाचित ते आपल्याला असं सांगतील, की बायबलचे नैतिक स्तर आता जुने झाले आहेत आणि त्यामुळे स्वतःची इच्छा पूर्ण करणं ही काही वाईट गोष्ट नाही. कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की यहोवाने दिलेलं मार्गदर्शन पुरेसं नाही. त्यामुळे “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे” जाण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो.—१ करिंथ. ४:६. टेहळणी बुरूज२३.०७ १६ ¶१०-११

गुरुवार, १७ जुलै

खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.—नीति. १७:१७.

येशूची आई मरीयाला बळाची गरज होती. तिचं लग्न झालं नव्हतं तरीही ती गरोदर राहणार होती. तिला मुलं वाढवण्याचा काहीच अनुभव नव्हता. पण तरी तिला अशा एका बाळाला वाढवायचं होतं, जे पुढे जाऊन मसीहा बनणार होतं. तिने कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते, पण तरी ती आई बनणार होती. आणि आता ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्या योसेफला हे सगळं कसं समजावून सांगायचं, हा प्रश्‍नसुद्धा तिच्यासमोर होता. (लूक १:२६-३३) मरीयाला कुठून बळ मिळालं? यासाठी तिने इतरांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तिने गब्रीएल स्वर्गदूताला तिच्यावर असलेल्या या जबाबदारीबद्दल आणखी माहिती विचारली. (लूक १:३४) याच्या काही काळानंतर ती तिची नातेवाईक अलीशिबा हिला “डोंगराळ प्रदेशातल्या यहूदाच्या एका शहरात” भेटायला गेली. अलीशिबाने मरीयाचं कौतुक केलं आणि मरीयाच्या होणाऱ्‍या बाळाबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी यहोवाने तिला प्रेरित केलं. (लूक १:३९-४५) यामुळे मरीयाला आनंद झाला आणि तिने म्हटलं, की यहोवाने “आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवलाय.” (लूक १:४६-५१) अशा प्रकारे गब्रीएल स्वर्गदूताद्वारे आणि अलीशिबाद्वारे यहोवाने मरीयाला बळ दिलं. टेहळणी बुरूज२३.१० १४-१५ ¶१०-१२

शुक्रवार, १८ जुलै

त्याचा देव आणि पिता याच्यासाठी [त्याने] आपल्याला एक राज्य आणि याजक असं केलं.—प्रकटी. १:६.

ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी फक्‍त मोजक्याच लोकांना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात येतं. यामुळे यहोवासोबत त्यांचं एक खास नातं तयार होतं. हे १,४४,००० जण येशूसोबत स्वर्गात याजक म्हणून सेवा करतील. (प्रकटी. १४:१) देवाच्या या मुलांना पृथ्वीवर असताना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात येतं. उपासना मंडपातलं पवित्र स्थान हे त्यांच्या या अभिषिक्‍त असण्याच्या स्थितीला सूचित करतं. (रोम. ८:१५-१७) उपासना मंडपातलं परमपवित्र स्थान हे स्वर्गाला सूचित करतं, जिथे यहोवाचं अस्तित्व आहे. पवित्र आणि परमपवित्र स्थानाला विभाजित करणारा “पडदा” हा येशूच्या हाडामांसाच्या शरीराला सूचित करतो. या शरीरामुळे आध्यात्मिक मंदिराचा श्रेष्ठ महायाजक म्हणून त्याला स्वर्गात जाता येणार नव्हतं. आपलं हाडामांसाचं शरीर मानवजातीसाठी बलिदान दिल्यामुळे सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी स्वर्गातल्या जीवनाचा मार्ग येशूने मोकळा केला. पण यासाठी त्यांना स्वतःच्या हाडामांसाच्या शरीराचा त्याग करणंही गरजेचं आहे.—इब्री १०:१९, २०; १ करिंथ. १५:५०. टेहळणी बुरूज२३.१० २८ ¶१३

शनिवार, १९ जुलै

जर मी गिदोन संदेष्ट्याबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.—इब्री ११:३२.

एफ्राईमच्या लोकांनी जेव्हा गिदोनची टीका केली, तेव्हा त्याने सौम्यपणे उत्तर दिलं. (शास्ते ८:१-३) तो त्यांच्याशी रागाने बोलला नाही. उलट, ते लोक जी तक्रार करत होते, ती त्याने नम्रपणे ऐकून घेतली आणि तो त्यांच्याशी सौम्यपणे बोलला. अशा प्रकारे त्याने त्यांचा राग शांत केला. वडिलांची टीका केली जाते तेव्हा तेसुद्धा गिदोनप्रमाणे समोरच्याचं लक्ष देऊन ऐकू शकतात आणि सौम्यपणे उत्तर देऊ शकतात. (याको. ३:१३) असं करून ते मंडळीतली शांती टिकवून ठेवू शकतात. मिद्यानी लोकांवर विजय मिळवल्यानंतर गिदोनची स्तुती होऊ लागली तेव्हा त्याने लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याऐवजी यहोवाची स्तुती होऊ दिली. (शास्ते ८:२२, २३) आज जबाबदार बांधव गिदोनचं अनुकरण कसं करू शकतात? ते जे काही करतात त्याचं श्रेय ते यहोवाला देऊ शकतात. (१ करिंथ. ४:६, ७) उदाहरणार्थ, आपल्या शिकवण्याच्या कौशल्यासाठी जेव्हा एखाद्या वडिलांची प्रशंसा केली जाते, तेव्हा ते सांगू शकतात की त्यांनी जे काही शिकवलं ते देवाच्या वचनातून होतं. किंवा संघटनेकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणामुळेच त्यांना चांगल्या प्रकारे शिकवता आलं. तसंच, आपण इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधायचा प्रयत्न करत आहोत का याबद्दल वडिलांनी स्वतःचं परीक्षण करणंही गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२३.०६ ४ ¶७-८

रविवार, २० जुलै

माझे विचार तुमच्या विचारांसारखे नाहीत.—यश. ५५:८.

आपल्याला जेव्हा आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही तेव्हा आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘मी योग्य गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे का?’ बऱ्‍याचदा आपल्याला असं वाटतं, की ‘माझ्यासाठी योग्य काय हे मला माहीत आहे.’ पण आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतोय त्यांचा जास्त काळ कदाचित आपल्याला फायदा होणार नसेल. आपण कदाचित यहोवाने एका विशिष्ट मार्गाने आपली समस्या सोडवावी म्हणून त्याला प्रार्थना करत असू. पण त्या समस्येवर यापेक्षाही चांगला उपाय असू शकतो. शिवाय असंही होऊ शकतं, की आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय, ती कदाचित यहोवाच्या इच्छेप्रमाणे नसेल. (१ योहा. ५:१४) उदाहरणार्थ, एका आईवडिलांचाच विचार करा. त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली होती, की त्यांच्या मुलाने सत्यात टिकून राहावं. त्यांनी यहोवाकडे केलेली ही प्रार्थना योग्य आहे, असं कदाचित आपल्याला वाटेल. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की यहोवा कोणावरही त्याची सेवा करायची जबरदस्ती करत नाही. तर आपण सर्वांनी, यात आपली मुलंसुद्धा येतात, स्वतःहून त्याची उपासना करण्याचं निवडावं असं त्याला वाटतं. (अनु. १०:१२, १३; ३०:१९, २०) म्हणून आईवडिलांनी खरंतर यहोवाला अशी प्रार्थना करायला पाहिजे, की त्याने त्यांच्या मुलाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करावी, म्हणजे यहोवावर प्रेम करायला आणि त्याचा मित्र बनायला ते त्याला प्रोत्साहन देऊ शकतील.—नीति. २२:६; इफिस. ६:४. टेहळणी बुरूज२३.११ २१ ¶५; २३ ¶१२

सोमवार, २१ जुलै

एकमेकांना सांत्वन देत जा.—१ थेस्सलनी. ४:१८.

एकमेकांना सांत्वन देणं हा प्रेम दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग का आहे? एका बायबल संदर्भानुसार, पौलने “सांत्वन” यासाठी जो शब्द वापरला त्याचा अर्थ “एखादी व्यक्‍ती जेव्हा खूप कठीण परीक्षांमधून जात असते तेव्हा तिच्या बाजूला उभं राहून तिला धीर देणं,” असा होतो. अशा प्रकारे आपण जेव्हा सांत्वन देतो, तेव्हा परीक्षेतून जाणाऱ्‍या एखाद्या भावाला किंवा बहिणीला सावरायला आणि यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहायला आपण मदत करत असतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या भावाला किंवा बहिणीला रडण्यासाठी खांदा देतो, तेव्हा त्यांच्यावर आपलं प्रेम आहे हे आपण दाखवत असतो. (२ करिंथ. ७:६, ७, १३) इतरांबद्दल सहानुभूती वाटणं आणि त्यांना सांत्वन देणं यांचा खूप जवळचा संबंध आहे. तो कसा? दुःखातून जाणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल आपल्याला जेव्हा सहानुभूती वाटते, तेव्हा आपण त्याचं सांत्वन करतो. आणि त्याचं दुःख कमी करण्यासाठी त्याला मदत करतो. याचा अर्थ, आधी आपल्याला सहानुभूती वाटते आणि नंतर आपण एखाद्याचं सांत्वन करतो. यहोवाला वाटणारी सहानुभूती आणि तो इतरांचं ज्या प्रकारे सांत्वन करतो, यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे याबद्दल पौलने जे म्हटलं, त्याकडे लक्ष द्या. पौलने यहोवाबद्दल म्हटलं: तो “खूप करुणामय असा पिता आहे, आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे.”—२ करिंथ. १:३. टेहळणी बुरूज२३.११ ९-१० ¶८-१०

मंगळवार, २२ जुलै

संकटांत असतानाही आपण आनंदी होऊ या.—रोम. ५:३.

ख्रिस्ताच्या सर्वच अनुयायांना संकटं सोसावी लागणार आहेत. प्रेषित पौलचंच उदाहरण घ्या. त्याने थेस्सलनीका मंडळीला म्हटलं, “आपल्याला संकटं सोसावी लागतील हे तुमच्यासोबत असताना आम्ही तुम्हाला आधीच सांगत होतो आणि अगदी तसंच घडलं.” (१ थेस्सलनी. ३:४) आणि करिंथकरांना त्याने म्हटलं, “आम्हाला जे संकट सोसावं लागलं, त्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असं आम्हाला वाटतं. . . . आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती.” (२ करिंथ. १:८; ११:२३-२७) म्हणून आज आपल्यालाही कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल याची आपण अपेक्षा करू शकतो. (२ तीम. ३:१२) येशूवर विश्‍वास ठेवल्यामुळे आणि त्याने जे काही सांगितलं त्याप्रमाणे केल्यामुळे कदाचित मित्रांनी आणि नातेवाइकांनी तुम्हाला खूप वाईट वागवलं असेल. किंवा असं कधी झालंय का, की कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत प्रामाणिक असण्याच्या तुमच्या निर्धारामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागलाय? (इब्री १३:१८) किंवा आपल्या आशेबद्दल इतरांना सांगितल्यामुळे सरकारकडून तुम्हाला कधी विरोधाचा सामना करावा लागला आहे का? यांपैकी कोणत्याही संकटाचा तुम्हाला सामना करावा लागला तरी पौल म्हणतो, की आपण आनंदी असलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.१२ १०-११ ¶९-१०

बुधवार, २३ जुलै

तुम्ही मला मोठ्या संकटात टाकलं आहे.—उत्प. ३४:३०.

याकोबला त्याच्या आयुष्यात बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्याची दोन मुलं शिमोन आणि लेवी यांनी त्याच्या घराण्याची बदनामी केली आणि यहोवाच्या नावाला कलंक लावला. तसंच, याकोबचं जिच्यावर प्रेम होतं, त्या राहेलचाही दुसऱ्‍या मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. आणि जेव्हा अतिशय भयानक दुष्काळ पडला होता, तेव्हा त्याला त्याच्या म्हातारपणी स्वतःचा देश सोडून जावं लागलं. (उत्प. ३५:१६-१९; ३७:२८; ४५:९-११, २८) या सबंध काळात याकोबने यहोवावरचा आणि त्याच्या अभिवचनावरचा विश्‍वास जराही कमी होऊ दिला नाही. आणि यहोवानेही याकोबवर त्याची कृपा असल्याचं दाखवून दिलं. उदाहरणार्थ, यहोवाने याकोबला आशीर्वाद दिला आणि त्याची भरभराट झाली. शिवाय याकोबला वाटत होतं, की आपला मुलगा योसेफ मेलाय. पण विचार करा की जेव्हा योसेफशी त्याची पुन्हा भेट झाली असेल, तेव्हा त्याने यहोवाचे किती आभार मानले असतील! खरंच, यहोवाशी याकोबचं जवळचं नातं असल्यामुळे त्याला सगळ्या समस्यांचा यशस्वीपणे सामना करता आला. (उत्प. ३०:४३; ३२:९, १०; ४६:२८-३०) आपणसुद्धा यहोवासोबत असलेलं आपलं जवळचं नातं टिकवून ठेवलं, तर जीवनात येणाऱ्‍या अनपेक्षित समस्यांना आपल्यालाही यशस्वीपणे तोंड देता येईल. टेहळणी बुरूज२३.०४ १५ ¶६-७

गुरुवार, २४ जुलै

यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीच कमी नाही.—स्तो. २३:१.

स्तोत्र २३ मध्ये असलेल्या दावीदच्या गीतात, यहोवाच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या करुणेबद्दल दावीदला कशी खातरी होती याबद्दल सांगितलंय. या गीतात त्याने त्याच्यामध्ये आणि त्याचा मेंढपाळ, यहोवा याच्यामध्ये असलेल्या घट्ट नात्याबद्दल सांगितलंय. यहोवाचं मार्गदर्शन घ्यायला त्याला सुरक्षित वाटायचं आणि तो पूर्णपणे यहोवावर विसंबून होता. दावीदला हे माहीत होतं, की यहोवा आयुष्यभर त्याला असंच प्रेम दाखवत राहील. पण त्याला इतकी खातरी का होती? कारण ज्या गोष्टींची त्याला गरज होती, त्या गोष्टी यहोवाने त्याला नेहमी पुरवल्या. दावीदची यहोवासोबत एक चांगली मैत्री होती. आणि यहोवा त्याच्यावर खूश आहे, हेही त्याला माहीत होतं. म्हणूनच त्याला या गोष्टीची पक्की खातरी होती, की भविष्यात काहीही झालं तरी यहोवा त्याच्या सगळ्या गरजा पुरवेल आणि त्याची काळजी घेईल. त्याला असलेल्या कोणत्याही चिंतांपेक्षा यहोवाच्या प्रेमावर असलेला त्याचा भरवसा मोठा होतो. यामुळेच तो आनंदी आणि समाधानी राहू शकला.—स्तो. १६:११. टेहळणी बुरूज२४.०१ २९ ¶१२-१३

शुक्रवार, २५ जुलै

जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.—मत्त. २८:२०.

दुसऱ्‍या महायुद्धापासून बऱ्‍याच देशांमध्ये यहोवाचे लोक शांतीने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रचार करू शकले. आणि आज तर हे काम आणखीनच वाढलंय. आजही नियमन मंडळाचे सदस्य मार्गदर्शनासाठी येशूवर अवलंबून राहतात. त्यांची अशी इच्छा आहे, की ते जे मार्गदर्शन देत आहेत त्यातून यहोवा आणि येशूचा दृष्टिकोन दिसून यावा. यानंतर विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतले वडील हे मार्गदर्शन मंडळ्यांना पुरवतात. अभिषिक्‍त वडील आणि एका अर्थाने मंडळीतले सगळेच वडील ख्रिस्ताच्या “उजव्या हातात” आहेत. (प्रकटी. २:१) हे खरं आहे, की हे वडील अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात. मोशे, यहोशवा आणि प्रेषितांकडूनही काही वेळा चुका झाल्या. (गण. २०:१२; यहो. ९:१४, १५; रोम. ३:२३) असं असलं तरी येशू ख्रिस्त विश्‍वासू दासाचं आणि या वडिलांचं काळजीपूर्वक मार्गदर्शन करत आहे. आणि तो हे पुढेही करत राहील. त्यामुळे पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांकडून येशू आपल्याला जे मार्गदर्शन देतोय, त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. टेहळणी बुरूज२४.०२ २३-२४ ¶१३-१४

शनिवार, २६ जुलै

देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा.—इफिस. ५:१.

आजही इतरांशी बोलताना यहोवाबद्दलची कदर आणि त्याच्याबद्दलचं प्रेम आपल्या बोलण्यातून दिसून येतं तेव्हा यहोवाला आनंद होतो. प्रचारकार्यात आपण हे नेहमी लक्षात ठेवतो, की आपला उद्देश लोकांना यहोवाच्या जवळ आणणं आणि आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल जसं वाटतं तसंच त्यांनाही वाटावं म्हणून त्यांची मदत करणं हा आहे. (याको. ४:८) बायबल यहोवाचं कसं वर्णन करतं, त्याच्या प्रेमाबद्दल, न्यायाबद्दल, बुद्धीबद्दल, शक्‍तीबद्दल आणि इतर चांगल्या गुणांबद्दल ते काय सांगतं हे लोकांना दाखवायला आपल्याला आनंद होतो. तसंच, आपण होता होईल तितकं त्याचं अनुकरण करून त्याची स्तुती करतो आणि त्याचं मन आनंदित करतो. असं केल्यामुळे आपण या दुष्ट जगापेक्षा वेगळे असल्याचं दिसून येतं. लोकांच्याही ते लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल की आपण असे का आहोत. (मत्त. ५:१४-१६) आपण जेव्हा आपल्या दररोजच्या जीवनात त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपण याचं कारण त्यांना सांगू शकतो. त्यामुळे प्रामाणिक मनाचे लोक यहोवाकडे आकर्षित होतील. अशा प्रकारे आपण जेव्हा यहोवाची स्तुती करतो तेव्हा त्याच्या मनाला आनंद होतो.—१ तीम. २:३, ४. टेहळणी बुरूज२४.०२ १० ¶७

रविवार, २७ जुलै

त्याला इतरांना प्रोत्साहन आणि ताडनही देता आलं पाहिजे.—तीत १:९.

एक प्रौढ खिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी तुम्हाला काही व्यावहारिक कौशल्यंही शिकून घ्यावी लागतील. त्यामुळे तुम्हाला मंडळीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या सांभाळायला मदत होईल आणि इतरांसोबतचं तुमचं नातं चांगलं होईल. तसंच स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला चांगली नोकरी शोधून ती टिकवून ठेवता येईल. उदाहरणार्थ, चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिका. बायबल सांगतं, की जी व्यक्‍ती दररोज देवाचं वचन ऐकते आणि त्यावर मनन करते ती आनंदी असते आणि प्रत्येक कामात यशस्वी होते. (स्तो. १:१-३) दररोज बायबल वाचल्यामुळे देव कशा प्रकारे विचार करतो हे तिला समजेल आणि त्याप्रमाणे विचार करायला तिला मदत होईल. त्यासोबतच बायबलची तत्त्वं कशी लागू करायची हेसुद्धा तिला कळेल. (नीति. १:३, ४) कारण, भाऊबहिणींना बायबलमधून सूचना आणि सल्ला देऊ शकतील अशा भावांची गरज आहे. तुम्हाला जर चांगलं लिहिता-वाचता येत असेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे भाषण देण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठी तयारी करता येईल. तसंच, तुम्हाला चांगल्या प्रकारे नोट्‌स घेता येतील. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा विश्‍वास वाढवायला आणि इतरांना प्रोत्साहन द्यायला मदत होईल. टेहळणी बुरूज२३.१२ २६-२७ ¶९-११

सोमवार, २८ जुलै

जो तुमच्यासोबत ऐक्यात आहे, तो जगासोबत ऐक्यात असणाऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ आहे.—१ योहा. ४:४.

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा भविष्यात सैतानाचा नाश केल्यावर यहोवा आपल्यासाठी काय करणार आहे, यावर मनन करा. याबद्दल २०१४ च्या प्रांतीय अधिवेशनात एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यात एका वडिलांनी आपल्या कुटुंबासोबत चर्चा केली होती. आणि चर्चेत २ तीमथ्य ३:१-५ या वचनांत नंदनवनाबद्दल जर सांगितलं असतं तर त्यातले शब्द कसे असते ते बोलून दाखवलं होतं. ते म्हणाले होते: “नवीन जगात आनंदच आनंद असेल. कारण तेव्हा माणसं इतरांवर प्रेम करणारी आणि आध्यात्मिक गोष्टींवर प्रेम करणारी, मर्यादा असलेली, नम्र, देवाचा गौरव करणारी, आईवडिलांचं ऐकणारी, उपकारांची जाणीव ठेवणारी, एकनिष्ठ, कुटुंबासाठी माया ममता असलेली, एकमेकांशी सहमत असलेली, इतरांबद्दल चांगलं बोलणारी, संयमी, सौम्य, चांगल्याबद्दल प्रेम असणारी, भरवशालायक, ऐकून घेणारी, मनाने लीन असलेली, चैनीच्या गोष्टींची आवड धरण्यापेक्षा देवावर प्रेम करणारी, देवाची भक्‍ती करण्याचा फक्‍त दिखावा न करता त्याची मनापासून भक्‍ती करणारी असतील. अशा लोकांसोबत मिळून राहा.” नवीन जग कसं असेल याबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांशी किंवा भाऊबहिणींशी चर्चा करता का? टेहळणी बुरूज२४.०१ ६¶१३-१४

मंगळवार, २९ जुलै

तू माझं मन आनंदित केलं आहेस.—लूक ३:२२.

यहोवाची त्याच्या लोकांना एक गट या नात्याने स्वीकृती आहे या गोष्टीम़ुळे आपल्याला किती उत्तेजन मिळतं! बायबल म्हणतं: “यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.” (स्तो. १४९:४) पण कधीकधी काही लोक इतके निराश होऊ शकतात की ‘यहोवा माझ्यावर खूश आहे का?’ अशी शंका त्यांना वाटू शकते. बायबल काळातल्या यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं. (१ शमु. १:६-१०; ईयो. २९:२, ४; स्तो. ५१:११) बायबल स्पष्टपणे दाखवतं, की आपण अपरिपूर्ण असलो तरी आपण यहोवाचं मन आनंदी करू शकतो आणि त्याच्या नजरेत एक चांगलं नाव कमावू शकतो. कसं? त्यासाठी आपण येशूवर विश्‍वास ठेवून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (योहा. ३:१६) अशा प्रकारे सर्वांसमोर बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण हे दाखवत असतो, की आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केलाय आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी त्याला वचन दिलंय. (प्रे. कार्यं २:३८; ३:१९) आपण जेव्हा त्याच्यासोबत नातं जोडण्यासाठी अशा प्रकारे पाऊल उचलतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. आणि आपण जर आपल्या समर्पणाच्या वचनाप्रमाणे जगत राहिलो तर यहोवा आपल्यावर खूश होईल आणि आपल्याला त्याचे जवळचे मित्र समजेल.—स्तो. २५:१४. टेहळणी बुरूज२४.०३ २६ ¶१-२

बुधवार, ३० जुलै

ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.—प्रे. कार्यं ४:२०.

सरकारी अधिकाऱ्‍यांनी आपल्याला प्रचारकार्य बंद करायला सांगितलं तरी प्रचारकार्य करत राहून आपण शिष्यांचं अनुकरण करू शकतो. आपणसुद्धा अशी खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला सेवाकार्य करत राहण्यासाठी मदत करेल. आपणही धैर्य आणि बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. तसंच, समस्यांचा सामना करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोणाला आजाराचा तर कोणाला भावनिक समस्यांचा. काहींच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे, कोणाला कौटुंबिक समस्या आहेत, तर कोणाला छळ किंवा इतर काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातच महामाऱ्‍या आणि युद्धं यांमुळे या समस्यांचा सामना करणं आणखीनच कठीण झालं आहे. पण अशा वेळी यहोवाजवळ आपलं मन मोकळं करा. एखाद्या जवळच्या मित्राला जसं तुम्ही सांगाल तसं तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं काही यहोवाला सांगा. आणि याची खातरी बाळगा की ‘तो तुमच्या वतीने कार्य करेल.’ (स्तो. ३७:३, ५) आपण जर यहोवाला प्रार्थना करत राहिलो तर “संकटात धीर” धरायला आपल्याला मदत होईल. (रोम. १२:१२) आपले सेवक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे यहोवाला माहीत आहे आणि ‘तो त्यांच्या मदतीची याचना’ ऐकतो.—स्तो. १४५:१८, १९. टेहळणी बुरूज२३.०५ ५-६ ¶१२-१५

गुरुवार, ३१ जुलै

प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.—इफिस. ५:१०.

एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी आपण “यहोवाची इच्छा काय आहे” हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. (इफिस. ५:१७) एखाद्या परिस्थितीबद्दल जेव्हा आपण बायबलचं तत्त्व शोधतो, तेव्हा खरंतर त्या गोष्टीविषयी यहोवा काय विचार करतो हे आपण जाणून घेत असतो. मग जेव्हा आपण बायबलचं तत्त्व लागू करतो तेव्हा आपल्याला चांगले निर्णय घेता येतात. सैतान खूप ‘दुष्ट’ आहे आणि त्याला आपल्याला या जगातल्या गोष्टींमध्ये इतकं गुंतवून ठेवायचं आहे की आपल्याला यहोवाच्या सेवेसाठी वेळच मिळणार नाही. (१ योहा. ५:१९) एखादी व्यक्‍ती भौतिक गोष्टींमध्ये, शिक्षणामध्ये किंवा करिअर करण्यामध्ये इतकी व्यस्त होऊन जाईल, की यहोवाची सेवा करायची संधी गमावून बसेल. आणि जर असं झालं, तर त्या व्यक्‍तीवर जगाचा प्रभाव आहे असं दिसून येईल. हे खरं आहे की या गोष्टी चुकीच्या नाहीत. पण, आपण या गोष्टींना आपल्या जीवनात कधीच पहिली जागा नाही दिली पाहिजे. टेहळणी बुरूज२४.०३ २४ ¶१६-१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा