संतोषाने पुढे होणे
१ स्तोत्रकर्त्या दावीदाने भाकीत केले की यहोवाचे लोक ‘संतोषाने पुढे होतील’, “तत्पर स्वयंसेवक” या नात्याने. (स्तोत्र ११०:३, तळटीप, NW) हे आपल्या बांधवांच्या जागतिक संघटनेत निश्चितच पूर्ण होत आहे. गतकाळातील चार सेवा वर्षांमधील प्रत्येक वर्षात, यहोवाच्या लोकांनी राज्याची सुवार्ता प्रसारित करण्यात एक अब्जापेक्षा अधिक तास खर्ची घातले. त्याचप्रमाणे, प्रचार आणि शिष्य बनवण्याच्या कार्याव्यतिरिक्त असे अनेक मार्ग आहेत ज्यांद्वारे इतरांना मदत करण्यासाठी आपण संतोषाने पुढे होऊ शकतो.
२ आपली स्वेच्छा दाखवण्याचे मार्ग: मंडळीतील काहींना सभांना येण्याकरता कदाचित मदत लागेल. त्यांना आपल्यासोबत नेण्याची इच्छा का दाखवू नये? इतरजण आजारी, दुर्बल अथवा इस्पितळांत असतील. त्यांची भेट घेण्यास किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांचे साहाय्य करण्यात तुम्ही पुढाकार घेऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला उत्तेजनाची गरज असेल. अशा लोकांना एखाद्या प्रसंगी तुमच्या कौटुंबिक अभ्यासात सामील होण्याचे आमंत्रण देण्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? एखाद्या पायनियरला किंवा प्रचारकाला सेवेत साथीदाराची गरज असेल. मग एकत्र मिळून सेवाकार्य करण्यासाठी का पुढे येऊ नये? हे काही मार्ग आहेत ज्यांद्वारे ‘विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करण्यासाठी’ आपण आपखुशीने काम करू शकतो.—गलती. ६:१०.
३ वडील आणि सेवा सेवकांच्या पात्रता गाठण्याचा प्रयत्न करून बांधव यहोवाच्या संघटनेत उपयुक्त ठरण्याची आपली स्वेच्छा दाखवू शकतात. (१ तीम. ३:२-१०, १२, १३; तीत १:५-९) आपली संख्या वाढत जाते तसे, प्रचार आणि शिकवण्याच्या आणि मंडळ्यांची देखरेख करण्यास इच्छुक असलेल्या पात्र बांधवांची गरज भासते.—१ तीम. ३:१.
४ कदाचित सहायक पायनियर म्हणून अधूनमधून सेवा करून आपल्यातील काही जण मोठ्या प्रमाणात यहोवाच्या सेवेकरता स्वतःला उपलब्ध करू शकतात. तसेच आपल्या आराखड्यात काही वाजवी फेरफार करून आपण असे करत राहू शकतो अथवा नियमित पायनियर सेवा देखील करू शकतो. अधिक गरज असलेल्या ठिकाणी मदत करण्यासाठी आपण जाऊ शकतो अशी आपली परिस्थिती आहे का? बेथेलमधील सेवेकरता स्वतःला उपलब्ध करून आपण जागतिक कार्याच्या प्रगतीला थेट हातभार लावू शकतो का? जगभरातील राज्य सभागृहे, संमेलन सभागृहे आणि शाखा सुविधांच्या बांधकामात देखील पुष्कळ काही केले जात आहे जेथे स्वेच्छेने काम करण्याची अधिक मागणी आहे. या उत्तम कार्यांसाठी ज्यांनी स्वतःला सादर केले आहे त्यांची अतिशय प्रशंसा केली जाते आणि त्यांना समृद्ध आशीर्वाद लाभले आहेत!—लूक ६:३८.
५ हा रोमहर्षक समय आहे. यहोवा आपल्या आत्म्याच्या साहाय्याने आपल्या ऐच्छिक लोकांकरवी पृथ्वीवर एक अद्भुत कार्य पार पाडत आहे! यहोवा आपल्या संघटनेद्वारे वाढलेल्या राज्य कार्यहालचालीत सहभाग घेण्याचे आमंत्रण देतो त्या प्रत्येक वेळी, ‘मी अद्यापही संतोषाने पुढे होत आहे का?’ असा प्रश्न स्वतःला विचारून आपण बरे करतो. मग आपण आपले अंतःकरण आणि परिस्थिती यांचे प्रार्थनापूर्वक परीक्षण करावे. आपली ईश्वरी भक्ती आपल्याला पवित्र सेवेत होता होईल तितके करण्यास प्रवृत्त करील व अशाप्रकारे यहोवाचे अंतःकरण संतुष्ट होईल!—सफ. ३:१७.