पायनियर साह्य कार्यक्रम
१ येशूने म्हटले: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” पहिल्या शतकातील कामकरी अल्पसंख्याक होते शिवाय त्यांना अफाट क्षेत्रही उरकायचे होते, त्यामुळे शक्य तितक्या अधिकांप्रत सुवार्ता पोहंचवण्यासाठी त्याला एकेकट्याला पाठवता आले असते. पण, त्याने ‘दोघे दोघे असे त्यांना पाठवले.’ (लूक १०:१, २) दोघे दोघे का बरे?
२ त्याचे शिष्य नवोदित व अल्पानुभवी होते. एकजुटीने कार्य केल्यास ते एकमेकांकडून शिकू शकत होते शिवाय एकमेकांना उत्तेजनही देऊ शकत होते. शलमोनाने लिहिले त्याप्रमाणे, “एकट्यापेक्षा दोघे बरे.” (उप. ४:९, १०) सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या दिवशी पवित्र आत्मा ओतला गेला त्याच्या नंतर देखील पौल, बर्णबा आणि इतरांनी सेवेत सहविश्वासूंना सोबत दिली. (प्रे. कृत्ये १५:३५) अशा कार्यक्षम पुरुषांच्या हाताखाली व्यक्तिगत प्रशिक्षण प्राप्त करणे काहींसाठी किती मोठा विशेषाधिकार असला असेल!
३ प्रशिक्षणाचा उत्तम कार्यक्रम: पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीप्रमाणेच आधुनिक ख्रिस्ती मंडळी देखील प्रचार कार्याची एक संघटना आहे. ती आपल्याला प्रशिक्षणही देते. शक्य तितक्या कुशलतेने सुवार्ता सादर करणे ही आपल्यातील प्रत्येकाची मनस्वी इच्छा असावी. अधिकाधिक प्रचारकांना आपली कुशलता सुधारता यावी म्हणून साह्य उपलब्ध आहे.
४ अलीकडेच झालेल्या राज्य सेवा प्रशालेत संस्थेने असा एक कार्यक्रम जाहीर केला ज्यात पायनियर, क्षेत्र सेवेत इतरांना साह्य करतात. याची खरोखरच गरज आहे का? होय, निश्चितच. मागील तीन वर्षांत दहा लाखांहून अधिक प्रचारकांचा बाप्तिस्मा झाला असून यांच्यातील अनेकांना प्रचार कार्यात कुशल होण्याकरता प्रशिक्षणाची गरज आहे. ही गरज कोण भागवू शकेल?
५ पूर्ण-वेळेचे पायनियर साह्य करू शकतात. यहोवाच्या संघटनेतून त्यांना मोठ्या प्रमाणात सल्ला आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या दोन सप्ताहांच्या पायनियर सेवा प्रशालेत या पायनियरांना त्यांच्या गरजा लक्षात ठेवून खास त्यांच्यासाठीच तयार केलेले शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे, विभागीय आणि प्रांतीय पर्यवेक्षकांसोबत झालेल्या सभांपासून तसेच वडिलांच्या मार्गदर्शनापासूनही त्यांना लाभ होतो. सर्वच पायनियर, पौल आणि बर्णबाप्रमाणे अनुभवी नसले तरीही त्यांना उपयुक्त प्रशिक्षण मिळालेले असते आणि हे प्रशिक्षण इतरांना देण्यात त्यांना आनंद होतो.
६ कोणाला लाभ होईल? या कार्यक्रमात केवळ नवीन प्रचारक किंवा नवीन बाप्तिस्माप्राप्त सदस्यच सहभाग घेऊ शकतात का? मुळीच नाही! कित्येक वर्षांपासून सत्यात असणाऱ्या अबालवृद्धांनाही सेवेतील विशिष्ट पैलूंमध्ये साह्य मिळाल्यास निश्चितच आवडेल. साहित्याचे वाटप करण्यात काहींचा हातखंडा असतो पण याच लोकांना पुनर्भेट करणे किंवा बायबल अभ्यास सुरू करणे अडचणीचे वाटते. इतरजण कदाचित सफाईदारपणे बायबल अभ्यास सुरू करतील पण आपले विद्यार्थी प्रगती करत नसल्याचे त्यांना दिसून येते. कोणती गोष्ट प्रगती करण्यापासून यांना वंचित ठेवते बरे? या क्षेत्रांत साह्य पुरवण्याकरता अनुभवी पायनियरांना विनंती केली जाऊ शकते. विशिष्ट पायनियर आस्था निर्माण करण्यात, बायबल अभ्यास सुरू करण्यात आणि विद्यार्थ्यांना संघटनेत समावून घेण्यात कुशल असतात. या नवीन कार्यक्रमात त्यांचा अनुभव नक्कीच मदतगार ठरेल.
७ मंडळीने क्षेत्र सेवेसाठी आयोजित केलेल्या नियमित सभांना पाठबळ देण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाही असे तुम्हाला आढळते का? इतर प्रचारक नसतात तेव्हा एखादा पायनियर तुमच्यासह कार्य करू शकेल.
८ चांगल्या सहकार्याची गरज: पायनियर साह्य कार्यक्रमापासून वैयक्तिक साह्य मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी वडीलजन वर्षातून दोनदा योजना करतील. तुम्हालाही ही मदत हवी असल्यास तुम्हाला साह्य करण्यासाठी नेमून दिलेल्या पायनियर प्रचारकासोबत बसून सेवेचे एक व्यावहारिक वेळापत्रक तयार करा. वेळेचे पालन करा. तुम्ही एकत्र मिळून कार्य करता तेव्हा सुवार्ता सादर करण्याच्या प्रभावी पद्धतींचे निरीक्षण करा. विशिष्ट प्रस्तावना इतक्या प्रभावी का ठरतात याचे विश्लेषण करा. तुमची प्रस्तावना सुधारण्यासाठी पायनियर प्रचारक देईल त्या सल्ल्यांचे पालन करा. शिकलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करता तेव्हा सेवेतील तुमची प्रगती तुम्हा स्वतःला आणि इतरांनाही दिसून येईल. (पाहा १ तीमथ्य ४:१५.) शक्य तितके अधिक एकत्र मिळून कार्य करा; अनौपचारिक साक्षीकार्यासोबतच सेवेच्या हरएक पैलूत सहभागी व्हा, पण असे करत असताना तुम्हाला वैयक्तिक साह्याची गरज आहे त्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा.
९ होणाऱ्या प्रगतीबद्दल सेवा पर्यवेक्षकांना आस्था असते. सदर कार्यक्रमापासून तुम्हाला कितपत लाभ होतो याची विचारपूस ते वेळोवेळी मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकाकडे करतील. विभागीय पर्यवेक्षक मंडळीला भेट देतात तेव्हा ते देखील अशाच प्रकारे तुम्हाला साह्य करतील.
१० आपले लोक प्रशिक्षित असून ‘प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावेत’ अशी यहोवाची इच्छा आहे. (२ तीम. ३:१७) वचनाचा प्रचार करण्यातील आपली कुशलता सुधारू इच्छिणाऱ्यांना साह्य करण्यासाठी पायनियर साह्य कार्यक्रम एक उत्तम तरतूद असल्याचे समजा. त्यात सहभागी होण्याचा सुहक्क तुम्हाला लाभल्यास कृतज्ञतेने, नम्रतेने आणि आनंदाने त्यात सहभागी व्हा.