देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
१. “आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा” या प्रांतीय अधिवेशनात पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत करण्याकरता कोणते नवीन माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले?
१ “आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा” या प्रांतीय अधिवेशनात आपल्याला, पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत करण्याकरता तयार करण्यात आलेले नवीन माहितीपत्रक मिळाले तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता! देवाकडून आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक अपेक्षा या माहितीपत्रकाच्या बदल्यात तयार करण्यात आले आहे, कारण या माहितीपत्रकातील अध्याय लहान आहेत. यामुळे आपण दारात उभ्याउभ्याच सहजपणे बायबल अभ्यास सुरू करू शकतो. अपेक्षा माहितीपत्रकात ख्रिश्चनांकडून काय अपेक्षित आहे याबद्दल जास्तकरून सांगण्यात आले आहे व ते नवीन बायबल विद्यार्थ्यांना लागू करण्यास कठीण जात असे. पण या नवीन माहितीपत्रकात बायबलमध्ये असलेल्या आनंदाच्या बातमीवर अधिक जोर देण्यात आला आहे.—प्रे. कृत्ये १५:३५.
२. आनंदाची बातमी हे माहितीपत्रक का तयार करण्यात आले आहे?
२ हे का तयार करण्यात आले आहे? आपल्या जगभरातील बंधुभगिनींची अशी अपेक्षा होती की लोकांना सत्याकडे आकर्षित करण्याकरता व आपण बायबल अभ्यास प्रामुख्याने ज्यातून घेतो त्या बायबल काय शिकवते पुस्तकाकडे त्यांचे लक्ष वेधण्याकरता त्यांना एक सोपे साधन मिळाले असते तर बरे झाले असते. जे लोक पुस्तक पाहून बिचकतात ते एखाद्या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास घेण्यास सहजपणे तयार होतात. तसेच, एखाद्या माहितीपत्रकाचे भाषांतर बऱ्याच भाषांमध्ये अगदी सहजपणे केले जाऊ शकते.
३. हे माहितीपत्रक इतर अभ्यास प्रकाशनांपेक्षा वेगळे कसे आहे?
३ त्याची रचना कशी आहे? ज्यांतून अभ्यास केला जाऊ शकतो अशी आपली बरीच प्रकाशने सोप्या भाषेत लिहिण्यात आली आहेत; एखादी व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय ती सहज वाचू शकते व त्यांतील सत्ये समजू शकते. पण हे प्रकाशन वेगळे आहे. बायबल अभ्यास शिक्षकाविना या माहितीपत्रकाचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. यास्तव, तुम्ही हे माहितीपत्रक एखाद्याला देता त्या वेळी त्यातील एक किंवा दोन परिच्छेद वाचून त्यांवर चर्चा करा. यातील परिच्छेद छोटे-छोटे असल्यामुळे दारात उभ्याउभ्या किंवा काम करत असलेल्या ठिकाणीही आपण त्यांवर चर्चा करू शकतो. माहितीपत्रकातील पहिल्या अध्यायापासून अभ्यास सुरू करणे योग्य असले तरी, आपण कोणत्याही अध्यायाचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करू शकतो.
४. या माहितीपत्रकामुळे आपण सरळ बायबलमधून कसे शिकवू शकतो?
४ आपल्या बऱ्याच प्रकाशनांमध्ये छापील प्रश्नांची उत्तरे परिच्छेदातच आपण शोधू शकतो. पण, या प्रकाशनातील प्रश्नांची उत्तरे मुख्यतः बायबलमध्येच सापडतील. अनेक लोक आपल्या प्रकाशनांऐवजी बायबलमधून शिकण्याची इच्छा बाळगतात. म्हणूनच, उल्लेखण्यात आलेली बहुतेक वचने उद्धृत केलेली नाहीत. कारण ती थेट बायबलमधून वाचायची असतात. असे केल्याने बायबल विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव होईल की ते जे काही शिकत आहेत ते सर्व देवाकडूनच आहे.—यश. ५४:१३.
५. बायबल अभ्यासाच्या प्रत्येक भागासाठी बायबल शिक्षकाने चांगली तयारी करणे महत्त्वाचे का आहे?
५ या माहितीपत्रकात सर्वच वचनांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. बायबल विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याची चालना मिळावी व अभ्यास घेणाऱ्या शिक्षकाने त्याचे शिकवण्याचे कौशल्य वापरावे, म्हणून सर्व वचनांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यासाठी, प्रत्येक अभ्यासाच्या भागासाठी चांगली तयारी करणे महत्त्वाचे आहे. प्रचारकांसाठी सावधानतेचा इशारा: जास्त बोलू नका. वचनांवर स्पष्टीकरण द्यायला आपल्या सर्वांना फार आवडते. पण वचन वाचल्यावर बायबल विद्यार्थ्याला त्यातून काय समजले आहे ते विचारल्यावर त्याचा जास्त फायदा होतो. कुशलतेने प्रश्न विचारून आपण विद्यार्थ्याला त्या वचनावर तर्क करून त्याचा अर्थ समजण्यास मदत करू शकतो.—प्रे. कृत्ये १७:२.
६. आपण या माहितीपत्रकाचा उपयोग (क) देव आणि बायबलवर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर बोलताना, (ख) घरोघरच्या साक्षकार्यात, (ग) सरळ बायबल अभ्यास सुरू करताना आणि (घ) पुनर्भेटी घेताना कसा करू शकतो?
६ बायबल अभ्यास ज्यातून घेतला जाऊ शकतो अशा इतर प्रकाशनांप्रमाणे हेही माहितीपत्रक आपण, त्या महिन्याची सादरता इतर कोणतेही प्रकाशन असले तरीसुद्धा सादर करू शकतो. पुष्कळांना या माहितीपत्रकाचा उपयोग करून दारातच उभ्याउभ्या बायबल अभ्यास सुरू करण्यास आनंद होईल. त्याचबरोबर, जसे प्रांतीय अधिवेशनात सांगण्यात आले होते की आवड दाखवलेल्या व्यक्तींची पुनर्भेट घेताना या माहितीपत्रकाचा उपयोग केल्यास आपली “पुनर्भेट खरोखरच अर्थपूर्ण होऊ शकेल!”—पृष्ठे ६-८ वरील चौकट पाहा.
७. माहितीपत्रकाचा उपयोग करून तुम्ही बायबल अभ्यास कसा सुरू करू शकता?
७ बायबल अभ्यास कसा घ्यावा? अंक घालून ठळक अक्षरांत दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करून आपण चर्चा सुरू करू शकतो. नंतर परिच्छेद आणि तिरप्या वळणातील वचने वाचा. घरमालकाला वचन समजले आहे की नाही हे माहीत करून घेण्यास त्याला कुशलतेने प्रश्न विचारा. नंतर, पुढील भाग वाचण्याआधी घरमालकाला वाचलेला भाग समजला आहे की नाही हे जाणून घेण्यास ठळक अक्षरात दिलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला विचारा. सुरुवातीच्या काही भेटींमध्ये ठळक अक्षरात दिलेल्या एकाच प्रश्नावर चर्चा करणे चांगले राहील. त्यानंतरच्या भेटींमध्ये मग एका पूर्ण अध्यायावर चर्चा केली जाऊ शकते.
८. शास्त्रवचनांचा उल्लेख कसा करावा आणि का?
८ “वाचा” या शब्दाच्या आधी असलेल्या शास्त्रवचनांत, ठळक अक्षरातील प्रश्नांची सरळ उत्तरे असतात. शास्त्रवचनांबद्दल सांगताना, “प्रेषित पौल असे लिहितो” किंवा, “यिर्मयाने काय सांगितले ते विचारात घ्या” असे बोलण्याचे टाळा. घरमालकाला वाटेल की आपण सामान्य माणसांनी लिहिलेली वचने वाचत आहोत. त्यापेक्षा, “देवाचे वचन असे म्हणते,” किंवा, “बायबलमध्ये असे सांगण्यात आले होते,” असे बोलणे चांगले राहील.
९. अभ्यासादरम्यान सर्वच वचने वाचणे गरजेचे आहे का?
९ अध्यायात दिलेली सर्वच वचने वाचावीत की फक्त “वाचा” म्हणून उल्लेख केलेली वचनेच वाचावीत? ते तुम्ही परिस्थितीनुसार ठरवू शकता. तेथे दिलेली जी वचने आहेत त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. प्रत्येक वचनात अर्थपूर्ण माहिती दडलेली आहे ज्यावर चर्चा केल्यास फायदाच होईल. पण काही वेळा, विद्यार्थ्याकडे कमी वेळ असल्यामुळे, त्याला जास्त आवड नसल्यामुळे किंवा त्याला भरभर वाचता येत नसल्यामुळे, आपल्याला फक्त “वाचा” अशी उल्लेख केलेली वचने वाचावी लागतील.
१०. आपण कोणत्या वेळी घरमालकाचा अभ्यास बायबल काय शिकवते या पुस्तकातून सुरू करू शकतो?
१० बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास घेण्यास कधी सुरू करावे? घरमालकाबरोबर बऱ्याच वेळा चर्चा केल्यानंतर आणि नियमितपणे अभ्यास केल्यावर, आपण एकतर बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास सुरू करू शकतो किंवा मग आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचा शेवटपर्यंत अभ्यास करू शकतो. पण हे केव्हा करायचे ते प्रचारक परिस्थिती पाहून ठरवू शकतो. आणि बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास सुरू करायचा असेल तर तो सुरुवातीपासून केला पाहिजे का? याबद्दलही नियम नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते. बायबल काय शिकवते पुस्तकातून पुन्हा त्याच विषयांवर चर्चा होणार असली तरी, विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच होईल.
११. या नवीन माहितीपत्रकाचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग का केला पाहिजे?
११ या जगात आनंदाची बातमी फार कमी वेळा ऐकायला मिळते. पण आपल्याला जगातील सर्वात चांगली बातमी, अर्थात देवाचे राज्य या पृथ्वीवर राज्य करणार आहे आणि लवकरच येणाऱ्या नवीन जगात नीतिमत्त्व असेल ही बातमी सांगण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. (मत्त. २४:१४; २ पेत्र ३:१३) जे कोणी ही आनंदाची बातमी ऐकतील ते या गोष्टीशी सहमत असतील: “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.” (यश. ५२:७) चला तर मग, आध्यात्मिक रीत्या तहानलेल्या लोकांपर्यंत ही आनंदाची बातमी पोहचवण्यासाठी या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग करण्यास सज्ज होऊ या!
[६ पानांवरील चित्र]
“देव” व “बायबल” हे शब्द ऐकल्याबरोबर संभाषण थांबवणाऱ्यांबरोबर बोलताना:
● काही भागांमध्ये “देव,” “येशू” आणि “बायबल” या शब्दांचा उल्लेख केला तर संवाद तिथल्या तिथेच थांबण्याची शक्यता आहे असे प्रचारकांना जाणवले आहे. अशा वेळी, पहिल्या भेटीत तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या गोष्टींबद्दल काळजी वाटते त्यावर त्यांच्याशी चर्चा करू शकता. जसे की, एका चांगल्या सरकारची गरज का आहे, सुखी कुटुंबासाठी व्यावहारिक मदत कोठे मिळू शकेल आणि आपले भविष्य कसे असणार आहे, यांसारख्या विषयांवर आपण बोलू शकतो. देव अस्तित्वात आहे हे आपल्याला कसे माहीत होते आणि बायबलवर आपण का भरवसा ठेवू शकतो यांवर अनेकदा चर्चा केल्यानंतर आपण आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करू शकतो.
[७ पानांवरील चित्र]
घरोघरचे साक्षकार्य करताना:
● “देव आपली दुःखातून सुटका करेल असं तुम्हाला वाटतं का?” [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत मी तुम्हाला शास्त्रवचनांतून काही सांगू शकतो का? [घरमालकाला आवड असल्यास संभाषण सुरू ठेवा.] या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बायबलमध्ये कोठे मिळेल याबद्दल या माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे. [माहितीपत्रक घरमालकाच्या हातात द्या आणि पहिल्या अध्यायातील पहिला परिच्छेद आणि यिर्मया २९:११ हे वचन वाचा.] हे वचन वाचल्यावर आता तुम्हाला वाटते का, की देवाने खरेच आपल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य ठेवले आहे? [उत्तरासाठी थांबा.] तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे माहितीपत्रक ठेवू शकता. पुढच्या वेळी आपण, मानवजातीला ज्या गोष्टींमुळे दुःख होते त्यांपासून तो तिची सुटका कशी करणार आहे? या प्रश्नाचे बायबलमध्ये काय उत्तर दिले आहे ते जाणून घेण्यासाठी दुसऱ्या परिच्छेदावर चर्चा करू या. पहिल्या भेटीत घरमालकाकडे वेळ असेल तर तुम्ही दुसरा परिच्छेद आणि तेथे दिलेली तीन बायबलची वचने वाचून त्यांवर चर्चा करू शकता. नंतर त्या अध्यायात दिलेल्या दुसऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
● “लोकांना प्रार्थना करायला आवडतं व खासकरून त्यांच्यावर संकटं येतात तेव्हा ते देवाचा धावा करतात. तुम्हीपण कधीकधी प्रार्थना करता का? [उत्तरासाठी थांबा.] देव सर्वांच्या प्रार्थना ऐकतो का, किंवा काही प्रार्थना त्याच्या इच्छेनुसार नसतात असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत मी तुम्हाला शास्त्रवचनांतून काही माहिती सांगितली तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास संभाषण सुरू ठेवा.] बायबल या प्रश्नाचं उत्तर काय देतं याबद्दल या माहितीपत्रकात सांगण्यात आलं आहे. [त्याच्या हातात माहितीपत्रक द्या आणि अध्याय १२ मधील पहिला परिच्छेद आणि “वाचा” ही वचने वाचा.] देव आपल्या प्रार्थना ऐकतो ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे, नाही का? पण प्रार्थनेचा पुरेपूर फायदा मिळवायचा असेल तर सर्वात आधी आपण देवाला जाणून घेतलं पाहिजे. [आता दुसरा अध्याय उघडा आणि त्यातील पोटमथळे दाखवा.] तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे माहितीपत्रक घेऊ शकता, आणि पुढील महत्त्वाच्या प्रश्नांची बायबल काय उत्तरं देतं याबद्दल आपण पुढच्या वेळी पाहू या.”
● “हे जग कुठं चाललं आहे याबद्दल अनेक लोकांना काळजी वाटत आहे. या जगाची अवस्था सुधारेल असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत मी तुम्हाला शास्त्रवचनांतून काही माहिती सांगितली तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास पुढे बोला.] आपल्याला आशा देणारी आनंदाची बातमी बायबलमध्ये आहे, हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटतं. इथं काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं बायबलमध्ये आहेत.” त्याच्या हातात माहितीपत्रक द्या आणि शेवटच्या पानावर दिलेल्या प्रश्नांमध्ये त्याला कोणता प्रश्न आवडला ते विचारा. त्यानुसार अध्याय निवडा आणि अभ्यास कसा घेतला जातो ते दाखवा. त्या अध्यायातील पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
[८ पानांवरील चित्र]
(ज्यांना बायबलबद्दल आदर आहे त्यांच्याशी) सरळसरळ बायबल अभ्यासाविषयी बोला:
● “आज आम्ही लोकांना बायबलचा अभ्यास करण्याच्या एका नवीन पद्धतीविषयी सांगायला आलो आहोत. या माहितीपत्रकात १५ अध्याय आहेत जे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बायबलमध्ये कुठं मिळतील ते सांगतात. [त्याला सुरुवातीचे आणि शेवटचे पान दाखवा.] तुम्ही कधी बायबल समजण्याचा प्रयत्न केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] यातील अध्याय किती सोपे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. [अध्याय ३ मधील तिसऱ्या प्रश्नाचा पहिला परिच्छेद आणि प्रकटीकरण २१:४, ५ हे वचन वाचा. शक्य असल्यास, पुढील परिच्छेद आणि “वाचा” असा उल्लेख केलेली वचने वाचा.] तुमची हरकत नसल्यास हे माहितीपत्रक मी तुम्हाला देऊ इच्छितो. अशा प्रकारे, तुम्ही हा बायबल अभ्यास एकदा तरी सुरू करायचा प्रयत्न करावा असं आम्हाला वाटतं. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढे सुरू ठेवू शकता. पुढच्या वेळी आपण पहिल्या अध्यायावर चर्चा करू या. पाहा, अध्याय फक्त एकच पानाचा आहे.”
[८ पानांवरील चित्र]
माहितीपत्रकाचा वापर पुनर्भेट घेताना:
● “तुम्हाला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. या वेळी मी तुमच्यासाठी हे माहितीपत्रक घेऊन आलो आहे ज्यात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बायबलमध्ये कुठं मिळतील ते सांगण्यात आलं आहे. [त्याच्या हातात माहितीपत्रक द्या आणि त्याला शेवटचे पान दाखवा.] तुम्हाला यातील कोणता विषय आवडला? [उत्तरासाठी थांबा. आणि त्याने निवडलेला अध्याय उघडा.] या माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबलमधील प्रश्नांची उत्तरं कशी शोधू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो.” अभ्यास कसा घेतला जातो हे दाखवण्यासाठी एक किंवा दोन परिच्छेद वाचून “वाचा” असा उल्लेख केलेली वचने वाचा. पाहा, तुम्ही बायबल अभ्यास सुरूही केला! घरमालकाला माहितीपत्रक द्या आणि पुनर्भेटीची व्यवस्था करा. एका पूर्ण अध्यायावर चर्चा केल्यानंतर, तुम्ही हवे तर घरमालकाने निवडलेल्या अध्यायावर चर्चा करू शकता किंवा मग माहितीपत्रकाच्या पहिल्या अध्यायापासून अभ्यास सुरू करू शकता.