रविवार, २६ ऑक्टोबर
देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.—याको. ४:६.
बायबलमध्ये अशा बऱ्याच स्त्रियांबद्दल सांगितलंय, ज्यांचं यहोवावर प्रेम होतं आणि ज्यांनी विश्वासूपणे त्याची सेवा केली. या स्त्रिया “संयमी” आणि “सर्व बाबतींत विश्वासू” होत्या. (१ तीम. ३:११) इतकंच नाही, तर तुम्हाला तुमच्या मंडळीतही अशा प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया दिसतील, ज्यांचं तुम्ही अनुकरण करू शकता. तरुण बहिणींनो, तुमच्या ओळखीच्या कोणी प्रौढ ख्रिस्ती बहिणी आहेत का, ज्यांच्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता? त्यांच्यातले सुंदर गुण ओळखायचा प्रयत्न करा आणि आपल्यालाही ते गुण कसे दाखवता येतील याचा विचार करा. नम्रतेचा गुण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जी बहीण नम्र असते, तिचं यहोवासोबत आणि इतरांसोबत चांगलं नातं असतं. (याको. ४:६) उदाहरणार्थ, ज्या बहिणीचं यहोवावर प्रेम आहे, ती नम्रतेने १ करिंथकर ११:३ मध्ये सांगितलेल्या तत्त्वाचं पालन करते. आणि मंडळीत व कुटुंबात ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्या ती अधीन राहते. टेहळणी बुरूज२३.१२ १८-१९ ¶३-५
सोमवार, २७ ऑक्टोबर
पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.—इफिस. ५:२८.
एका पतीकडून यहोवा अपेक्षा करतो, की त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम करावं आणि तिच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्यात. विचारशक्ती वाढवल्यामुळे, स्त्रियांचा आदर केल्यामुळे आणि भरवशालायक असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पती बनता येईल. तुमचं लग्न झाल्यावर कदाचित तुम्ही मुलं होऊ द्यायचा निर्णय घ्याल. एक चांगला पिता होण्यासाठी तुम्ही यहोवाकडून बरंच काही शिकू शकता. (इफिस. ६:४) यहोवाचं आपल्या मुलावर, येशूवर प्रेम आहे आणि तो त्याच्यावर खूश आहे हे त्याने त्याला उघडपणे सांगितलं. (मत्त. ३:१७) तुम्ही पुढे एक पिता बनला, तर तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे या गोष्टीची वेळोवेळी त्यांना खातरी करून द्या. तसंच, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं नेहमी कौतुक करा. जे वडील यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करतात, ते आपल्या मुलांना प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करत असतात. तुम्ही आत्तापासूनच या जबाबदारीसाठी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची काळजी घेऊ शकता. त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे आणि त्यांची तुम्ही कदर करता, हे त्यांना तुम्ही बोलून दाखवू शकता.—योहा. १५:९. टेहळणी बुरूज२३.१२ २८-२९ ¶१७-१८
मंगळवार, २८ ऑक्टोबर
[यहोवा] तुझं जीवन स्थिर करणारा आहे.—यश. ३३:६.
आपण यहोवाचे विश्वासू सेवक असलो तरीपण, या जगातल्या लोकांप्रमाणेच आपल्यावरही संकट येऊ शकतात. तसंच देवाच्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून आपल्याला छळ आणि विरोध सहन करावा लागू शकतो. यहोवा कदाचित आपल्याला अशा संकटांमधून वाचवणार नाही तरी तो आपल्याला मदत करण्याचं वचन मात्र देतो. (यश. ४१:१०) त्याच्या मदतीने आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थितीतसुद्धा त्याला एकनिष्ठ राहू शकतो. यहोवा आपल्याला एक खास गोष्ट द्यायचं वचन देतो. बायबलमध्ये याला “देवाची शांती” म्हटलंय. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवासोबतच्या अनमोल नात्यामुळे निर्माण होणारी शांती म्हणजेच देवाची शांती आहे. ही शांती “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” आहे. कारण या शांतीचा अनुभव आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतो. यहोवाला कळकळून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कधी एकदम शांत झाल्यासारखं वाटलंय का? यालाच “देवाची शांती” म्हटलंय. टेहळणी बुरूज२४.०१ २० ¶२; २१ ¶४