इफिसकर यांना पत्र
६ मुलांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण असं करणं योग्य आहे. २ “आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,”+ ही पहिली आज्ञा आहे. तिच्यासोबत असं अभिवचन देण्यात आलं आहे: ३ “म्हणजे तुमचं भलं होईल* आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्य लाभेल.” ४ आणि वडिलांनो, आपल्या मुलांना चीड आणू नका,+ तर त्यांना यहोवाच्या* शिस्तीत+ आणि शिक्षणात* वाढवत राहा.+
५ दासांनो, जसं तुम्ही ख्रिस्ताच्या आज्ञेत राहता तसंच भीतभीत आणि थरथर कापत, प्रामाणिक मनाने आपल्या मालकांच्याही आज्ञेत राहा.+ ६ फक्त माणसांना खूश करण्यासाठी ते पाहत असतानाच नाही,*+ तर संपूर्ण मनाने देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांप्रमाणे आज्ञेत राहा.+ ७ आपण माणसांची नाही, तर यहोवाची* सेवा करत आहोत असं समजून चांगल्या मनोवृत्तीने+ आपल्या मालकांची सेवा करा. ८ कारण प्रत्येक जण जे काही चांगलं करतो, त्याचं प्रतिफळ त्याला यहोवाकडून* मिळेल,+ मग तो दास असो किंवा स्वतंत्र माणूस. ९ मालकांनो, तुम्हीसुद्धा त्यांच्याशी तसंच वागा; त्यांना धमकावू नका. कारण जो त्यांचा आणि तुमचाही मालक आहे, तो स्वर्गात असून+ भेदभाव करत नाही.
१० शेवटी, प्रभूकडून त्याच्या महान सामर्थ्याद्वारे ताकद मिळवत जा.+ ११ सैतानाच्या* डावपेचांविरुद्ध* तुम्हाला स्थिर उभं राहता यावं, म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.+ १२ कारण आपली लढाई*+ हाडामांसाच्या माणसांबरोबर नाही, तर सरकारांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, अंधारात असलेल्या या जगाच्या शासकांबरोबर आणि आकाशातल्या दुष्ट स्वर्गदूतांच्या* सैन्याबरोबर आहे.+ १३ त्यामुळे देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा,+ म्हणजे तुम्हाला दुष्ट काळाचा सामना करता येईल आणि सर्वकाही साध्य केल्यावर तुम्हाला स्थिर उभं राहता येईल.
१४ म्हणून, आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा+ आणि नीतिमत्त्वाचं कवच* घालून स्थिर उभे राहा.+ १५ तसंच, शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी तुमची तयारी दाखवणारे जोडे पायांत घाला आणि स्थिर उभे राहा.+ १६ याशिवाय, विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या.+ तिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे* सगळे जळते बाण विझवू शकाल.+ १७ तसंच, तारणाचा टोप+ आणि पवित्र शक्तीची तलवार, म्हणजे देवाचं वचन स्वीकारा.+ १८ यासोबतच, प्रत्येक प्रसंगी पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रकारच्या प्रार्थना+ आणि याचना करत राहा.+ तसंच, जागे राहा आणि सगळ्या पवित्र जनांसाठी सतत याचना करा. १९ माझ्यासाठीही अशी प्रार्थना करा, की मी बोलण्यासाठी तोंड उघडेन तेव्हा मला शब्द सुचावेत; म्हणजे, आनंदाच्या संदेशाचं पवित्र रहस्य जाहीर करण्यासाठी मी धैर्याने बोलू शकेन.+ २० या संदेशासाठीच, मी साखळ्यांमध्ये जखडलेला राजदूत म्हणून सेवा करत आहे.+ माझ्यासाठी प्रार्थना करा, की त्याबद्दल मला जसं बोललं पाहिजे तसं धैर्याने बोलता यावं.
२१ आता, मी कसा आहे आणि माझं कसं चाललं आहे, हे तुम्हाला समजावं म्हणून आपला प्रिय भाऊ आणि प्रभूचा विश्वासू सेवक असलेला तुखिक+ तुम्हाला याबद्दल सर्वकाही सांगेल.+ २२ याच उद्देशाने मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे. म्हणजे आम्ही कसे आहोत हे तुम्हाला कळावं आणि त्याने तुम्हाला दिलासा द्यावा.
२३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून मिळणारी शांती आणि विश्वासासोबत असलेलं प्रेम बांधवांना मिळो. २४ आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अनंत प्रेम करणाऱ्यांना अपार कृपा लाभो.