ऑक्टोबर
बुधवार, १ ऑक्टोबर
वरून येणारी बुद्धी ही आज्ञाधारक असते.—याको. ३:१७.
आज्ञाधारक राहणं कठीण आहे असं कधी तुम्हाला वाटलंय का? दावीद राजालाही असंच वाटलं होतं. त्यामुळे त्याने देवाला प्रार्थना केली: “तुझ्या आज्ञा पाळण्याची इच्छा माझ्यात जागृत कर.” (स्तो. ५१:१२) दावीदचं यहोवावर खूप प्रेम होतं. पण तरी त्याला कधीकधी त्याच्या आज्ञेत राहायला कठीण गेलं. आणि साहजिकच आपल्यालाही तसं वाटू शकतं. का बरं? पहिली गोष्ट म्हणजे, आज्ञा मोडण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये जन्मापासूनच असते. दुसरी गोष्ट म्हणजे, सैतानाने जसं देवाविरुद्ध बंड केलं, तसं आपणही देवाविरुद्ध बंड करावं म्हणून तो आपल्याला नेहमी प्रवृत्त करत असतो. (२ करिंथ. ११:३) तिसरी गोष्ट म्हणजे, आपण अशा जगात राहतोय जिथे बंडखोर प्रवृत्ती सर्रास पाहायला मिळते. आणि जसं बायबलमध्ये म्हटलंय, की ही प्रवृत्ती “आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे.” (इफिस. २:२) त्यामुळे पाप करायला लावणाऱ्या प्रवृत्तीशी झगडत राहण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. पण त्यासोबतच दियाबल आणि हे जग, देवाची आज्ञा मोडायला लावण्यासाठी आपल्यावर जो दबाव टाकतं, त्याचाही प्रतिकार करण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. तसंच, आपण यहोवाच्या आणि त्याने ज्यांना अधिकार पदावर नियुक्त केलंय त्यांच्या आज्ञेत राहण्यासाठी खास परिश्रम घेतले पाहिजेत. टेहळणी बुरूज२३.१० ६ ¶१
गुरुवार, २ ऑक्टोबर
तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.—योहा. २:१०.
येशूने पाण्यापासून द्राक्षारस बनवायचा जो चमत्कार केला त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्यातून आपल्याला नम्रतेचा एक धडा शिकायला मिळतो. येशूने केलेल्या या चमत्काराबद्दल त्याने बढाई मारली नाही. खरंतर आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्याने कधीच बढाई मारली नाही. उलट, त्याने नम्रपणे सगळं श्रेय आणि गौरव आपल्या पित्याला दिला. (योहा. ५:१९, ३०; ८:२८) आपणही जर येशूप्रमाणे नम्र असू, तर आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल बढाई मारणार नाही. आपण स्वतःबद्दल नाही तर आपल्या महान देवाची सेवा करायचा जो सन्मान आपल्याला मिळालाय त्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. (यिर्म. ९:२३, २४) म्हणून जो गौरव आणि सन्मान आपल्या देवाला मिळाला पाहिजे तो आपण त्याला देत राहू या. कारण त्याच्या मदतीशिवाय आपण कोणतीच गोष्ट साध्य करू शकत नाही. (१ करिंथ. १:२६-३१) आपण जर नम्र असू, तर आपण इतरांसाठी करत असलेल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वतः कधीच घेणार नाही. उलट आपण यातच समाधान मानू, की आपण करत असलेल्या गोष्टी यहोवा पाहतो आणि त्याला त्याची कदर आहे. (मत्तय ६:२-४ सोबत तुलना करा; इब्री १३:१६) खरंच, आपण येशूसारखी नम्रता दाखवतो, तेव्हा यहोवा आपल्यावर खूश होतो.—१ पेत्र ५:६. टेहळणी बुरूज२३.०४ ४ ¶९; ५ ¶११-१२
शुक्रवार, ३ ऑक्टोबर
फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.—फिलिप्पै. २:४.
प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने ख्रिश्चनांना असं प्रोत्साहन दिलं, की त्यांनी स्वतःचाच नाही तर इतरांचाही विचार करावा. सभेदरम्यान आपण हा सल्ला कसा लागू करू शकतो? सभेत आपल्याप्रमाणेच इतरांनाही उत्तरं द्यायची इच्छा असते हे आपण नेहमी लक्षात ठेवू शकतो. विचार करा, आपण आपल्या मित्रांशी बोलत असतो तेव्हा आपण स्वतःच इतकं बोलत राहतो का, की त्यांना बोलायची संधीच मिळत नाही? मुळीच नाही, आपण त्यांनाही बोलू देतो. अगदी तसंच, सभेमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना उत्तरं द्यायची संधी दिली पाहिजे. खरंतर आपल्या भाऊबहिणींना त्यांचा विश्वास व्यक्त करायची संधी देणं हा त्यांना प्रोत्साहन देण्याचा खूप चांगला मार्ग आहे. (१ करिंथ. १०:२४) म्हणून थोडक्यात उत्तर द्या. त्यामुळे बऱ्याच लोकांना उत्तर द्यायची संधी मिळेल. आणि थोडक्यात उत्तर देतानाही सगळेच मुद्दे सांगू नका. नाहीतर इतरांना सांगण्यासाठी काहीच उरणार नाही. टेहळणी बुरूज२३.०४ २२-२३ ¶११-१३
शनिवार, ४ ऑक्टोबर
मी आनंदाच्या संदेशासाठी सर्वकाही करतो. हे यासाठी, की मला तो इतरांना सांगता यावा.—१ करिंथ. ९:२३.
आपण इतरांना मदत करणं खूप महत्त्वाचं आहे; खासकरून आपल्या सेवाकार्याद्वारे. प्रचार करतानासुद्धा आपण बदल करायला तयार असलं पाहिजे. आपल्याला प्रचारात वेगवेगळ्या स्वभावांचे आणि वेगवेगळा विश्वास असलेले लोक भेटतात. तसंच त्यांची पार्श्वभूमीसुद्धा वेगळी असते. याबाबतीत आपण प्रेषित पौलचं अनुकरण करू शकतो. कारण तोसुद्धा बदल करायला तयार होता. येशूने त्याला ‘विदेश्यांसाठी प्रेषित म्हणून’ नेमलं होतं. (रोम. ११:१३) आपली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पौलने यहुद्यांना, ग्रीक लोकांना, शिकलेल्या लोकांना, गावातल्या लोकांना, शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजांनासुद्धा प्रचार केला. इतक्या वेगवेगळ्या लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी पौल “सर्व लोकांसाठी सर्वकाही” झाला. (१ करिंथ. ९:१९-२२) लोक कोणत्या संस्कृतीचे आहेत, कोणत्या पार्श्वभूमीचे आहेत, त्यांचे विश्वास काय आहेत या गोष्टींकडे त्याने लक्ष दिलं. आणि त्या आधारावर त्याने आपल्या प्रचाराच्या पद्धतीत बदल केला. आपणसुद्धा आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल विचार केला पाहिजे. तसंच, संदेश सांगण्याच्या आपल्या पद्धतीत बदल केला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपलं प्रचारकार्य आणखी चांगल्या प्रकारे करता येईल. टेहळणी बुरूज२३.०७ २३ ¶११-१२
रविवार, ५ ऑक्टोबर
प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने वागणारा असावा.—२ तीम. २:२४.
सौम्यता ही एखाद्या व्यक्तीची कमजोरी नसून खरंतर तिची ताकद आहे! एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करत असताना शांत राहण्यासाठी मनोबल भक्कम असावं लागतं. शिवाय, सौम्यता हा गुण ‘पवित्र शक्तीच्या फळाचाच’ एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “सौम्यता” असं करण्यात आलंय, तो शब्द काही वेळा अशा जंगली घोड्यासाठी वापरण्यात आलाय, ज्याला पाळीव प्राणी बनवण्यात येतं. म्हणजे त्याच्यावर ताबा मिळवून त्याला शांत केलं जातं. पण तो शांत जरी दिसत असला तरी तो खूप शक्तिशाली असतो. सौम्यतेने वागणारी व्यक्तीसुद्धा अशीच असते. मग सौम्यता हा गुण आपण कसा वाढवू शकतो आणि त्याच वेळी स्थिर आणि खंबीर कसं राहू शकतो? ही गोष्ट आपण फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करावी लागेल आणि हा सुंदर गुण वाढवण्यासाठी त्याच्याकडे मदत मागावी लागेल. आपल्या बऱ्याच भाऊबहिणींनी हा गुण स्वतःमध्ये वाढवलाय. जेव्हा-जेव्हा विरोधकांनी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा-तेव्हा त्यांनी अतिशय सौम्यतेने उत्तर दिलं. त्यामुळे इतरांवर त्यांचा खूप चांगला प्रभाव पडला.—२ तीम. २:२४, २५. टेहळणी बुरूज२३.०९ १५ ¶३
सोमवार, ६ ऑक्टोबर
मी प्रार्थना केली होती आणि यहोवाने माझी विनंती पूर्ण केली आहे.—१ शमु. १:२७.
प्रेषित योहानने एक अद्भुत दृष्टान्त पाहिला होता. त्यात त्याने पाहिलं की २४ वडील स्वर्गात यहोवाची उपासना करत आहेत. यहोवा “गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी” योग्य आहे असं म्हणून ते यहोवाची स्तुती करत होते. (प्रकटी. ४:१०, ११) विश्वासू स्वर्गदूतांकडेसुद्धा यहोवाची स्तुती आणि सन्मान करायची असंख्य कारणं आहेत. ते स्वर्गात त्याच्यासोबत असल्यामुळे त्याला खूप जवळून ओळखतात. तसंच यहोवा जे काही करतो त्यातून त्यांना त्याचे सुंदर गुण पाहायला मिळतात. त्यामुळे जेव्हा ते यहोवाला काम करताना पाहतात तेव्हा त्यांना त्याची स्तुतीच करावीशी वाटते. (ईयो. ३८:४-७) आपणही प्रार्थनेत यहोवाची स्तुती केली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आणि कदर आहे हे त्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे बायबल वाचताना आणि त्याचा अभ्यास करताना यहोवाचे कोणते गुण तुम्हाला खासकरून आवडतात ते पाहण्याचा प्रयत्न करा. (ईयो. ३७:२३; रोम. ११:३३) आणि मग त्या गुणांबद्दल तुम्हाला कसं वाटतं ते प्रार्थनेत त्याला सांगा. यासोबतच यहोवा तुम्हाला आणि जगभरातल्या भाऊबहिणींना कशा प्रकारे मदत करत आहे याचा विचार करा.—१ शमु. २:१, २. टेहळणी बुरूज२३.०५ ३-४ ¶६-७
मंगळवार, ७ ऑक्टोबर
यहोवाच्या सेवकांना शोभेल असं वागा.—कलस्सै. १:१०.
१९१९ मध्ये देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या प्रभावातून बाहेर आले. या वर्षी ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाला’ नियुक्त करण्यात आलं. आणि ही योग्यच वेळ होती कारण त्यामुळे ते प्रामाणिक मनाच्या लोकांना ‘पवित्रतेच्या मार्गावर’ प्रवास सुरू करायला मदत करू शकत होते. (मत्त. २४:४५-४७; यश. ३५:८) पूर्वी मार्ग तयार करणाऱ्या या विश्वासू लोकांनी जे काम केलं त्याबद्दल आपण त्यांचे आभारच मानले पाहिजे. या राजमार्गावर प्रवास करणाऱ्या नवीन लोकांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल जास्तीत जास्त शिकून घेता आलं. (नीति. ४:१८) शिवाय त्यामुळेच यहोवाच्या अपेक्षांप्रमाणे त्यांना आपल्या जीवनात योग्य ते बदल करता आले. पण हे सगळे बदल त्याच्या लोकांनी एकदमच करावेत अशी यहोवाने अपेक्षा केली नाही. उलट त्याने हळूहळू आपल्या लोकांमध्ये सुधारणा केल्या. आणि लवकरच असा एक काळ येईल जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कार्याने देवाचं मन आनंदित करू. खरंच, तो किती आनंदाचा काळ असेल! पण कोणताही रस्ता चांगला राहावा म्हणून त्याची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते. १९१९ पासून या ‘पवित्रतेच्या मार्गाचं’ काम चालूच आहे. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना मोठ्या बाबेलमधून बाहेर पडून या मार्गावर चालत राहणं शक्य झालं आहे. टेहळणी बुरूज२३.०५ १७ ¶१५; १९ ¶१६
बुधवार, ८ ऑक्टोबर
मी तुला कधीच सोडणार नाही.—इब्री. १३:५.
नियमन मंडळ स्वतः वेगवेगळ्या समित्यांमध्ये सहायक म्हणून सेवा करणाऱ्या बांधवांना प्रशिक्षण देत आहेत. हे सहायक जबाबदाऱ्यांचं मोठं ओझं अगदी विश्वासूपणे पेलत आहेत आणि ख्रिस्ताच्या मेढरांची काळजी घेण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार आहेत. मोठ्या संकटाचा शेवट होत असताना जेव्हा उरलेल्या अभिषिक्तांना स्वर्गात घेतलं जाईल तेव्हा पृथ्वीवर शुद्ध उपासना आता जशी चालू आहे तशीच चालू राहील. येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली यहोवाचे लोक त्याची विश्वासूपणे सेवा करत राहतील. हे खरं आहे, की त्या वेळी मागोगचा गोग म्हणजे राष्ट्रांचा समूह त्यांच्यावर रागाने पेटून हल्ला करेल. (यहे. ३८:१८-२०) पण फक्त काही वेळासाठीच असणारा हा हल्ला अपयशी ठरेल. त्यामुळे देवाचे लोक त्याची उपासना करायचं थांबवणार नाहीत आणि तो त्यांना वाचवेल. एका दृष्टान्तात प्रेषित योहानने दुसऱ्या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय” पाहिला. योहानला सांगण्यात आलं की हा “मोठा लोकसमुदाय,” ‘मोठ्या संकटातून बाहेर येईल.’ (प्रकटी. ७:९, १४) यावरून आपण खातरीने म्हणू शकतो, की त्यांना सुरक्षित ठेवलं जाईल! टेहळणी बुरूज२४.०२ ५-६ ¶१३-१४
गुरुवार, ९ ऑक्टोबर
पवित्र शक्तीची आग विझवू नका.—१ थेस्सलनी. ५:१९.
देवाची पवित्र शक्ती मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, देवाच्या प्रेरित वचनाचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या संघटनेला जडून राहू शकतो. असं केल्यामुळे “पवित्र शक्तीचं फळ” उत्पन्न करायला आपल्याला मदत होईल. (गलती. ५:२२, २३) यहोवा आपली पवित्र शक्ती फक्त अशा लोकांनाच देतो ज्यांची विचारसरणी आणि वागणं शुद्ध आहे. आपण जर अशुद्ध विचारांना आपल्या मनात घर करू दिलं आणि त्याप्रमाणे वागत राहिलो तर यहोवा त्याची पवित्र शक्ती आपल्याला देणार नाही. (१ थेस्सलनी. ४:७, ८) शिवाय, आपल्याला जर पवित्र शक्ती मिळत राहावी असं वाटत असेल तर आपण ‘भविष्यवाण्यांनासुद्धा तुच्छ लेखू नये.’ (१ थेस्सलनी. ५:२०) देवाच्या पवित्र शक्तीने देण्यात आलेल्या संदेशाला या ठिकाणी “भविष्यवाण्या” म्हटलं आहे. यामध्ये यहोवाच्या दिवसाबद्दल आणि तो दिवस किती जवळ आहे याबद्दल दिलेल्या गोष्टीसुद्धा येतात. त्यामुळे यहोवाचा दिवस यायला अजून वेळ आहे किंवा हर्मगिदोन आपल्या काळात येणार नाही असा विचार आपण करू नये. उलट तो दिवस लवकरच येणार आहे असा विचार आपण केला पाहिजे आणि आपलं वागणंबोलणं शुद्ध ठेवून “देवाच्या भक्तीची कार्यं” करण्यात व्यस्त राहिलं पाहिजे.—२ पेत्र ३:११, १२. टेहळणी बुरूज२३.०६ १२ ¶१३-१४
शुक्रवार, १० ऑक्टोबर
यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे.—नीति. ९:१०.
जर आपल्यासमोर अचानक एखादं अश्लील दृश्य आलं तर आपण काय केलं पाहिजे? आपण लगेच त्यापासून आपली नजर फिरवली पाहिजे. यहोवासोबतचं आपलं नातं सगळ्यात मौल्यवान आहे ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर असं करायला आपल्याला सोपं जाईल. सहसा, अश्लील न वाटणारी चित्रंसुद्धा लैंगिक इच्छा उत्तेजित करू शकतात. अशी चित्र पाहायचंसुद्धा आपण का टाळलं पाहिजे? कारण अशी कोणतीही गोष्ट करायची आपली इच्छा नाही ज्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येतील आणि आपण मनात व्यभिचार करून बसू. (मत्त. ५:२८, २९) थायलँडमध्ये राहणारे डेवीड नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “मी नेहमी स्वतःला विचारतो, ‘हे दृश्य जरी अश्लील नसलं तरी ते मी पाहत राहिलेलं यहोवाला आवडेल का?’ अशा प्रकारे विचार केल्यामुळे मला सुज्ञपणे वागायला मदत होते.” यहोवाला न आवडणारी एखादी गोष्ट केल्यामुळे त्याचं मन दुखावेल अशी भीती आपल्या मनात असेल तर आपण सुज्ञपणे वागू. यहोवाची भीती बाळगणं हीच “बुद्धीची सुरुवात” आहे. टेहळणी बुरूज२३.०६ २३ ¶१२-१३
शनिवार, ११ ऑक्टोबर
जा माझ्या लोकांनो, आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा.—यश. २६:२०.
‘आतल्या खोल्या कदाचित आपल्या मंडळ्या असतील. मोठ्या संकटादरम्यान आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून राहिलो, तरच यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपलं संरक्षण करेल. म्हणूनच आपण आपल्या भाऊबहिणींना फक्त सहनच केलं नाही पाहिजे, तर त्यांच्यावर प्रेम करत राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आपलं मोठ्या संकटातून वाचणं कदाचित यावरच अवलंबून असेल! “यहोवाचा मोठा दिवस” सगळ्या मानवजातीसाठी अतिशय कठीण काळ असेल. (सफ. १:१४, १५) यहोवाच्या लोकांनासुद्धा त्या वेळी खूप कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. पण जर आपण आत्तापासूनच तयारी केली तर आपलं मन शांत ठेवायला आणि इतरांना मदत करायला आपल्याला सोपं जाईल. जेव्हा आपल्यावर समस्या येतील तेव्हा आपल्याला धीर दाखवता येईल. आपल्या भाऊबहिणींवर परीक्षा येतील तेव्हा आपण करुणा दाखवून त्यांना होताहोईल तितकी मदत करू आणि त्यांना गरजेच्या वस्तू पुरवू. आपण जर आत्तापासूनच आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करायला शिकलो, तर तेव्हाही आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं सोपं जाईल. मग यहोवा आपल्याला नवीन जगात सर्वकाळाचं जीवन देईल. तिथे कोणत्याही प्रकारच्या संकटाची आणि समस्येची आपल्याला आठवण राहणार नाही.—यश. ६५:१७. टेहळणी बुरूज२३.०७ ७ ¶१६-१७
रविवार, १२ ऑक्टोबर
[यहोवा] तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल आणि स्थिर उभं राहायला मदत करेल.—१ पेत्र ५:१०.
बायबलमध्ये देवाच्या विश्वासू सेवकांचं वर्णन करताना ते खूप ताकदवान आणि खंबीर होते असं म्हटलंय. पण त्यांच्यातल्या सगळ्यात ताकदवान व्यक्तीलासुद्धा नेहमीच तसं वाटलं नाही. उदाहरणार्थ, काही प्रसंगी दावीदला वाटलं की तो ‘पर्वतासारखाच खंबीर’ आहे. पण इतर वेळी तो खूप “भयभीत” झाला. (स्तो. ३०:७) शमशोनला जेव्हा देवाची पवित्र शक्ती मिळाली तेव्हा तो खूप शक्तिशाली बनला, पण त्याला याचीही जाणीव होती की जर देवाने त्याला मदत केली नाही तर ‘त्याची शक्ती जाईल आणि तो इतर माणसांसारखाच होईल.’ (शास्ते १४:५, ६; १६:१७) या विश्वासू सेवकांना देवाच्या मदतीमुळेच सामर्थ्य मिळालं होतं. प्रेषित पौलला याची जाणीव होती की त्यालासुद्धा देवाकडून मिळणाऱ्या शक्तीची गरज आहे. (२ करिंथ. १२:९, १०) पौलला आरोग्याच्या समस्या होत्या. (गलती. ४:१३, १४) कधीकधी तर योग्य ते करण्यासाठीसुद्धा त्याला संघर्ष करावा लागायचा. (रोम. ७:१८, १९) काही वेळा तर तो निराश व्हायचा आणि आपल्यासोबत पुढे काय होईल याची त्याला काळजी असायची. (२ करिंथ. १:८, ९) पण जेव्हा पौल कमजोर होता तेव्हाच तो ताकदवान बनला. ते कसं? त्याला लागणारी शक्ती यहोवाने त्याला दिली. आणि पुढे येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवाने त्याला बळ दिलं. टेहळणी बुरूज२३.१० १२ ¶१-२
सोमवार, १३ ऑक्टोबर
यहोवा हृदय पाहतो.—१ शमु. १६:७.
आपल्याला जर अशीच कमीपणाची भावना सतावत असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की स्वतः यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आकर्षित केलंय. (योहा. ६:४४) तो आपल्यात अशा काही चांगल्या गोष्टी पाहू शकतो ज्या आपण स्वतःसुद्धा पाहू शकणार नाही. आणि आपल्या मनात काय चाललंय हेसुद्धा तो ओळखू शकतो. (२ इति. ६:३०) त्यामुळे जेव्हा यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. (१ योहा. ३:१९, २०) सत्यात येण्याआधी आपल्यापैकी काही जणांनी अशा काही गोष्टी केल्या असतील ज्यांमुळे आपल्या मनात आताही दोषीपणाची भावना असेल. (१ पेत्र ४:३) यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या ख्रिश्चनांना आजही आपल्या पापी प्रवृत्तीशी लढावं लागतं. तुम्हालाही दोषीपणाची भावना सतावते का? जर असेल तर यहोवाच्या विश्वासू सेवकांनाही असंच वाटलं होतं, ही गोष्ट माहीत झाल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. उदाहरणार्थ, जेव्हा प्रेषित पौलने स्वतःच्या कमतरतांवर विचार केला तेव्हा ‘आपली अवस्था किती वाईट आहे,’ असं त्याला वाटलं. (रोम. ७:२४) हे खरंय की पौलने त्याच्या पापांसाठी पश्चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. पण तरी त्याने “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी” आहे असं म्हटलं. आणि “मी सर्वात मोठा पापी आहे” असंही म्हटलं.—१ करिंथ. १५:९; १ तीम. १:१५. टेहळणी बुरूज२४.०३ २७ ¶५-६
मंगळवार, १४ ऑक्टोबर
त्यांनी आपला देव यहोवा याच्या मंदिराचा त्याग केला.—२ इति. २४:१८.
यहोआश राजाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपण नेहमी चांगले मित्र निवडले पाहिजेत; असे मित्र ज्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि ज्यांना यहोवाला आनंदित करायचं आहे. कारण त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो. पण चांगले मित्र निवडण्यासाठी मित्र तुमच्याच वयाचे असावेत असं काही नाही. लक्षात घ्या, यहोआश हासुद्धा यहोयादापेक्षा खूप लहान होता. मित्रांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता: ‘माझे मित्र यहोवावरचा माझा विश्वास मजबूत करायला मला मदत करतात का? ते मला देवाच्या स्तरांनुसार चालायचं प्रोत्साहन देतात का? ते नेहमी यहोवाबद्दल किंवा सत्याबद्दल बोलतात का? त्यांच्या मनातही देवाच्या स्तरांबद्दल आदर आहे का? मला ज्या गोष्टी ऐकाव्याश्या वाटतात अशाच गोष्टी ते माझ्याशी बोलतात का, की जेव्हा मी चुकतो तेव्हा मला सुधारण्याचाही प्रयत्न करतात?’ (नीति. २७:५, ६, १७) स्पष्ट सांगायचं झालं, जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम नसेल तर असे मित्र नसलेलेच बरे. पण जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम असेल तर त्यांना कधीही सोडू नका. कारण त्यांच्यामुळे तुमचं नक्कीच भलं होईल.—नीति. १३:२०. टेहळणी बुरूज२३.०९ ९-१० ¶६-७
बुधवार, १५ ऑक्टोबर
अल्फा आणि ओमेगा मी आहे.—प्रकटी. १:८.
ग्रीक वर्णमालेतलं पहिलं अक्षर म्हणजे अल्फा आणि शेवटचं अक्षर म्हणजे ओमेगा. “अल्फा आणि ओमेगा” या शब्दांचा वापर करून यहोवाला हे सांगायचं होतं, की ज्या गोष्टींची तो सुरुवात करतो त्यांचा तो यशस्वीपणे शेवटही करतो. यहोवाने आदाम आणि हव्वाला निर्माण केल्यानंतर त्यांना म्हटलं: ‘फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका.’ (उत्प. १:२८) यहोवाने पहिल्यांदा जेव्हा त्याचा हा उद्देश बोलून दाखवला, तेव्हा एका अर्थाने तो “अल्फा” असं म्हणाला. या उद्देशाप्रमाणे आदाम आणि हव्वाची परिपूर्ण आणि आज्ञाधारक मुलं या पृथ्वीला भरून टाकणार होती आणि तिला नंदनवन बनवणार होती. भविष्यात जेव्हा यहोवाचा हा उद्देश पूर्ण होईल, तेव्हा एका अर्थाने तो “ओमेगा” असं म्हणेल. यहोवाने “आकाश व पृथ्वी आणि त्यांत असलेलं सर्वकाही” बनवून पूर्ण केल्यावर त्याचा उद्देश पूर्ण होईल याची गॅरंटीही दिली. यहोवा मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश सातव्या दिवसाच्या शेवटी नक्कीच पूर्ण करेल.—उत्प. २:१-३. टेहळणी बुरूज२३.११ ५ ¶१३-१४
गुरुवार, १६ ऑक्टोबर
यहोवासाठी मार्ग मोकळा करा! वाळवंटातून जाणारा महामार्ग आपल्या देवासाठी तयार करा.—यश. ४०:३.
बाबेलपासून इस्राएलला जाण्याच्या खडतर प्रवासाला जवळपास चार महिने लागणार होते. पण यहोवाने त्यांना वचन दिलं होतं, की या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तो काढून टाकेल. पण विश्वासू यहुद्यांना हे माहीत होतं, की इस्राएलला परत जाण्यासाठी त्यांना जितके त्याग करावे लागतील त्यापेक्षा कितीतरी जास्त आशीर्वाद त्यांना मिळणार होते. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद तर उपासनेच्या बाबतीत होता. यहोवाचं एकही मंदिर बाबेल शहरात नव्हतं. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे अर्पणं देण्यासाठी तिथे एकही वेदी नव्हती. आणि ती अर्पणं वाहण्यासाठी तिथे याजकांची कोणतीही व्यवस्था नव्हती. शिवाय, यहोवाच्या लोकांपेक्षा तिथे मूर्तिपूजा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. आणि त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल जराही आदर नव्हता. त्यामुळे हजारो विश्वासू यहुदी आपल्या मायदेशी जाऊन शुद्ध उपासना करण्यासाठी खूप उत्सुक होते. टेहळणी बुरूज२३.०५ १४-१५ ¶३-४
शुक्रवार, १७ ऑक्टोबर
प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा.—इफिस. ५:८.
“प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” चालत राहण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र शक्तीची गरज आहे. का? कारण या अनैतिक जगात नैतिक रित्या शुद्ध राहणं खरंच एक आव्हान आहे. (१ थेस्सलनी. ४:३-५, ७, ८) पण, पवित्र शक्तीमुळे आपल्याला जगाच्या विचारसरणीविरुद्ध लढायला मदत होते. यात देवाच्या विचारसरणीविरुद्ध असलेलं जगातलं तत्त्वज्ञान आणि विचारसरणीसुद्धा सामील आहे. यासोबतच, देवाच्या पवित्र शक्तीमुळे आपल्याला ‘सर्व प्रकारचा चांगुलपणा आणि नीतिमत्त्व’ विकसित करायलाही मदत होऊ शकते. (इफिस. ५:९) पवित्र शक्ती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यासाठी प्रार्थना करणं. येशूने म्हटलं होतं, की ‘जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो नक्कीच पवित्र शक्ती देतो.’ (लूक ११:१३) आणि सभांमध्ये आपण एकत्र मिळून यहोवाची उपासना करतो तेव्हासुद्धा आपल्याला पवित्र शक्ती मिळते. (इफिस. ५:१९, २०) पवित्र शक्तीमुळे आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतो. टेहळणी बुरूज२४.०३ २३-२४ ¶१३-१५
शनिवार, १८ ऑक्टोबर
मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.—लूक ११:९.
तुम्हाला आणखी धीर दाखवण्याची गरज आहे का? तर मग त्यासाठी प्रार्थना करा. धीर हा पवित्र शक्तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) त्यामुळे आपण पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करू शकतो आणि हा गुण वाढवण्यासाठी यहोवाकडे मदत मागू शकतो. आपल्या धीराची परीक्षा होईल अशी परिस्थिती जर आपल्यावर आली, तर आपल्याला धीर दाखवता यावा म्हणून आपण पवित्र शक्ती ‘मागत राहू’ शकतो. (लूक ११:१३) त्याच प्रकारे परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठीसुद्धा आपण त्याच्याकडे मदत मागू शकतो. प्रार्थना केल्यानंतर आपण दररोज धीर दाखवण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपण धीरासाठी जितकी जास्त प्रार्थना करू आणि धीर धरत राहण्याचा जितका प्रयत्न करू, तितका हा गुण आपल्या मनात रुजेल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनेल. बायबलमधल्या उदाहरणांवर मनन केल्यानेही खूप मदत होते. बायबलमध्ये अशा बऱ्याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला. या लोकांच्या अहवालांवर मनन केल्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी धीर दाखवायला शिकू शकतो. टेहळणी बुरूज२३.०८ २२ ¶१०-११
रविवार, १९ ऑक्टोबर
मासे धरण्यासाठी आपली जाळी पाण्यात सोड.—लूक ५:४.
येशूने प्रेषित पेत्रला याची खातरी करून दिली, की यहोवा त्याच्या गरजा नेहमी पूर्ण करेल. पुनरुत्थान झाल्यावर येशूने पुन्हा एकदा पेत्र आणि इतर शिष्यांसाठी चमत्कार केला आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मासे पकडता आले. (योहा. २१:४-६) या चमत्कारानंतर पेत्रला नक्कीच याची खातरी पटली असेल, की यहोवा आपल्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकतो. त्या वेळी त्याला कदाचित येशूचे शब्दही आठवले असतील. येशूने म्हटलं होतं, की जे ‘आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतात’ त्यांच्या गरजा यहोवा नक्की पूर्ण करेल. (मत्त. ६:३३) आणि यामुळेच पेत्रने पुढे मासेमारीच्या व्यवसायाला नाही, तर सेवाकार्याला त्याच्या जीवनात पहिलं स्थान दिलं. इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्याने धैर्याने साक्ष दिली आणि त्यामुळे हजारो लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला. (प्रे. कार्यं २:१४, ३७-४१) त्यानंतर त्याने शोमरोनी आणि विदेशी लोकांनासुद्धा येशूबद्दल शिकायला आणि त्याचं अनुकरण करायला मदत केली. (प्रे. कार्यं ८:१४-१७; १०:४४-४८) खरंच, वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि पार्श्वभूमीच्या लोकांना मंडळीत आणण्यासाठी यहोवाने पेत्रचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला. टेहळणी बुरूज२३.०९ २० ¶१; २३ ¶११
सोमवार, २० ऑक्टोबर
जर माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे केले जातील.—दानी. २:५.
बाबेलने यरुशलेमचा नाश केला, त्याच्या जवळजवळ दोन वर्षांनंतर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याला एक स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. स्वप्नात त्याने एक अतिशय मोठा पुतळा पाहिला होता. ते स्वप्न काय होतं आणि त्याचा अर्थ काय होता, हे त्याला समजत नव्हतं. म्हणून राजाने त्याच्या महालातल्या सगळ्या ज्ञानी माणसांना धमकावलं, की जर कोणीही ते स्वप्न आणि त्याचा अर्थ काय आहे, हे त्याला सांगितलं नाही, तर तो सगळ्यांना मारून टाकेल. (दानी. २:३-५) त्यांच्यामध्ये दानीएलसुद्धा होता आणि त्यामुळे त्याला लगेच पाऊल उचलणं गरजेचं होतं, नाहीतर अनेकांना आपल्या जीव गमवावा लागणार होता. “म्हणून दानीएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला.” (दानी. २:१६) हे करण्यासाठी दानीएलला नक्कीच खूप धैर्याची आणि विश्वासाची गरज होती. शिवाय याआधी दानीएलने कधीच कुठल्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नव्हता. म्हणून त्याने आपल्या तीन सोबत्यांनाही “स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं,” अशी प्रार्थना करायला सांगितली. (दानी. २:१८) यहोवाने त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं आणि मग देवाच्या मदतीने दानीएलने नबुखद्नेस्सरला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्यामुळे, दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांचा जीव वाचला. टेहळणी बुरूज२३.०८ ३ ¶४
मंगळवार, २१ ऑक्टोबर
जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.—मत्त. २४:१३.
धीर धरल्यामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार करा. जेव्हा आपण धीर धरतो तेव्हा आपण आनंदी असतो आणि शांत राहतो. त्याच प्रकारे धीर दाखवल्यामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. जेव्हा आपण दुसऱ्यांसोबत धीराने वागतो, तेव्हा त्यांच्यासोबतचं आपलं नातं आणखीन घट्ट होतं. मंडळीमधल्या भाऊबहिणींची एकतासुद्धा मजबूत होते. जेव्हा कोणी आपल्याला भडकवतं तेव्हा आपण लगेच न रागवल्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडत नाही. (स्तो. ३७:८, तळटीप; नीति. १४:२९) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत असतो आणि त्याच्या आणखीन जवळ जातो. धीर हा असा एक सुंदर गुण आहे ज्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. धीर दाखवणं नेहमीच सोपं नसलं, तरी यहोवाच्या मदतीने हा गुण आपण स्वतःमध्ये वाढवत राहू शकतो. आपण धीराने नवीन जगाची वाट पाहत असताना खातरीने असं म्हणू शकतो: “हे यहोवा, आम्ही तुझी वाट पाहत आहोत. तू नेहमी आमच्यावर एकनिष्ठ प्रेम करत राहा.” (स्तो. ३३:२२) चला, तर आपण सगळे जण धीर दाखवत राहायचा निश्चय करू या! टेहळणी बुरूज२३.०८ २२ ¶७; २५ ¶१६-१७
बुधवार, २२ ऑक्टोबर
कार्यांशिवाय नुसताच विश्वास निर्जीव आहे.—याको. २:१७.
याकोबने सांगितलं, की माणूस देवावर विश्वास असल्याचा दावा जरी करत असला, तरी त्याच्या कार्यांवरून असं म्हणता येत नाही. (याको. २:१-५, ९) याकोबने आणखी एका माणसाबद्दल सांगितलं, जो ‘भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत आणि अन्न नाही’ हे पाहतो, तरी त्यांना काही मदत पुरवत नाही. तो जरी असा दावा करत असला, की त्याचा देवावर विश्वास आहे तरी त्याच्या कार्यांमधून ते दिसून येत नाही. असा विश्वास काहीच उपयोगाचा नाही. (याको. २:१४-१७) विश्वास कार्यांमधून दिसून आला पाहिजे, हे समजावून सांगण्यासाठी याकोबने एक चांगलं उदाहरण म्हणून राहाबविषयी सांगितलं. (याको. २:२५, २६) तिने यहोवाबद्दल ऐकलं आणि तो इस्राएलच्या वतीने लढतोय हे ओळखलं. (यहो. २:९-११) आणि इस्राएली हेरांचा जीव धोक्यात आहे, हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा त्यांचं संरक्षण करून तिने तिचा विश्वास कार्यांमधून दाखवून दिला. याचा परिणाम म्हणजे एका अपरिपूर्ण विदेशी स्त्रीला अब्राहामसारखंच नीतिमान ठरवण्यात आलं. तिने मांडलेल्या उदाहरणातून विश्वासासोबत कार्यं किती महत्त्वाची आहेत हे दिसून येतं. टेहळणी बुरूज२३.१२ ५-६ ¶१२-१३
गुरुवार, २३ ऑक्टोबर
तुम्ही विश्वासाच्या पायावर मुळावलेलं आणि स्थिरावलेलं असावं.—इफिस. ३:१७.
ख्रिस्ती या नात्याने आपण फक्त बायबलचं वरवरचं ज्ञान घेण्यातच समधान मानणार नाही. तर पवित्र शक्तीच्या मदतीने आपण ‘देवाच्या गहन गोष्टींचाही’ अभ्यास करायचा मनापासून प्रयत्न करू. (१ करिंथ. २:९, १०) तर मग, देवासोबत आपलं नातं मजबूत होईल, असा एखादा व्यक्तिगत अभ्यासाचा उपक्रम का सुरू करू नये? उदाहरणार्थ, प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कसं प्रेम दाखवलं त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि यावरून त्याचं आपल्यावरही प्रेम आहे हे कसं स्पष्ट होतं ते तुम्ही पाहू शकता. जसं यहोवाने इस्राएली लोकांना उपासनेची जी व्यवस्था करून दिली होती, तिची तुलना तुम्ही आज देवाने ख्रिश्चनांना उपासनेची जी व्यवस्था घालून दिली आहे तिच्याशी करू शकता. आणि त्या गोष्टी एकमेकांशी कशा जुळतात हे तुम्ही पाहू शकता. किंवा कदाचित, येशूने पृथ्वीवर असताना बायबलच्या कोणकोणत्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या यांचा सखोल अभ्यासही करू शकता. वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक या साहित्यांमधून या विषयांवर अभ्यास केल्यामुळे तुम्हालाही बरंच काही शिकायला मिळू शकतं. बायबलचा गहन अभ्यास केल्यामुळे तुमचा विश्वास मजबूत होऊ शकतो आणि तुम्हाला “देवाचं ज्ञान” मिळू शकतं.—नीति. २:४, ५. टेहळणी बुरूज२३.१० १८-१९ ¶३-५
शुक्रवार, २४ ऑक्टोबर
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा, कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.—१ पेत्र ४:८.
प्रेषित पेत्रच्या शब्दांवर खोलवर विचार करा. आठव्या वचनाच्या सुरुवातीला पेत्रने म्हटलं की आपलं भाऊबहिणींवर “अगदी मनापासून प्रेम” असलं पाहिजे. पेत्रने “अगदी मनापासून” यासाठी जो ग्रीक शब्द वापरला त्याचा शब्दशः अर्थ “ताणून पसरवणं” असा होतो. या वचनाच्या दुसऱ्या भागात, अशा प्रेमामुळे इतरांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल सांगितलंय. हे प्रेम आपल्या भाऊबहिणींच्या पापांना झाकून टाकतं असं म्हटलंय. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा की, एका टेबलावर बरेच डाग आणि ओरखडे आहेत. पण तुम्ही जर त्यावर एखादं कापड पसरवून टाकलं, तर त्यामुळे फक्त एकदोन डागच नाही, तर सगळेच डाग झाकले जातील. त्याच प्रकारे, आपलं जर भाऊबहिणींवर अगदी मनापासून प्रेम असेल, तर आपण फक्त त्यांच्या एकदोन चुकाच नाही तर “पुष्कळ पापांना” झाकून टाकू. आपल्याला भाऊबहिणींना क्षमा करता येईल, इतकं आपलं त्यांच्यावरचं प्रेम मजबूत असलं पाहिजे. मग कधीकधी यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली तरी. (कलस्सै. ३:१३) जर आपण इतरांना क्षमा केली, तर आपलं प्रेम मजबूत आहे आणि आपल्याला यहोवाला खूश करायची इच्छा आहे, हे दिसून येईल. टेहळणी बुरूज२३.११ ११-१२ ¶१३-१५
शनिवार, २५ ऑक्टोबर
शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला.—२ इति. ३४:१८.
योशीया राजा जेव्हा २६ वर्षांचा झाला तेव्हा त्याने यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. हे काम करत असताना त्याला “यहोवाने मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.” या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर तो त्यांप्रमाणे बदल करायला लगेच तयार झाला. आणि त्याने ते करण्यासाठी पावलंही उचलली. (२ इति. ३४:१४, १९-२१) तुम्हीही कदाचित रोज बायबल वाचत असाल आणि ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तुम्हाला ज्या वचनांमुळे मदत होऊ शकते अशी वचनं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता का? योशीया जेव्हा जवळपास ३९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली. आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवही गमवावा लागला. यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला. (२ इति. ३५:२०-२५) यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपलं वय कितीही झालं असलं किंवा आपण कितीही वर्षांपासून बायबलचा अभ्यास करत असलो, तरीही आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण नियमितपणे त्याला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर प्रौढ ख्रिश्चनांकडून जो सल्ला मिळतो तो ऐकला पाहिजे. असं केलं तर कदाचित आपण मोठमोठ्या चुका करण्यापासून दूर राहू आणि आपला आनंदही वाढेल.—याको. १:२५. टेहळणी बुरूज२३.०९ १२ ¶१५-१६
रविवार, २६ ऑक्टोबर
देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.—याको. ४:६.
बायबलमध्ये अशा बऱ्याच स्त्रियांबद्दल सांगितलंय, ज्यांचं यहोवावर प्रेम होतं आणि ज्यांनी विश्वासूपणे त्याची सेवा केली. या स्त्रिया “संयमी” आणि “सर्व बाबतींत विश्वासू” होत्या. (१ तीम. ३:११) इतकंच नाही, तर तुम्हाला तुमच्या मंडळीतही अशा प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया दिसतील, ज्यांचं तुम्ही अनुकरण करू शकता. तरुण बहिणींनो, तुमच्या ओळखीच्या कोणी प्रौढ ख्रिस्ती बहिणी आहेत का, ज्यांच्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता? त्यांच्यातले सुंदर गुण ओळखायचा प्रयत्न करा आणि आपल्यालाही ते गुण कसे दाखवता येतील याचा विचार करा. नम्रतेचा गुण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जी बहीण नम्र असते, तिचं यहोवासोबत आणि इतरांसोबत चांगलं नातं असतं. (याको. ४:६) उदाहरणार्थ, ज्या बहिणीचं यहोवावर प्रेम आहे, ती नम्रतेने १ करिंथकर ११:३ मध्ये सांगितलेल्या तत्त्वाचं पालन करते. आणि मंडळीत व कुटुंबात ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्या ती अधीन राहते. टेहळणी बुरूज२३.१२ १८-१९ ¶३-५
सोमवार, २७ ऑक्टोबर
पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.—इफिस. ५:२८.
एका पतीकडून यहोवा अपेक्षा करतो, की त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम करावं आणि तिच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्यात. विचारशक्ती वाढवल्यामुळे, स्त्रियांचा आदर केल्यामुळे आणि भरवशालायक असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पती बनता येईल. तुमचं लग्न झाल्यावर कदाचित तुम्ही मुलं होऊ द्यायचा निर्णय घ्याल. एक चांगला पिता होण्यासाठी तुम्ही यहोवाकडून बरंच काही शिकू शकता. (इफिस. ६:४) यहोवाचं आपल्या मुलावर, येशूवर प्रेम आहे आणि तो त्याच्यावर खूश आहे हे त्याने त्याला उघडपणे सांगितलं. (मत्त. ३:१७) तुम्ही पुढे एक पिता बनला, तर तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे या गोष्टीची वेळोवेळी त्यांना खातरी करून द्या. तसंच, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं नेहमी कौतुक करा. जे वडील यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करतात, ते आपल्या मुलांना प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करत असतात. तुम्ही आत्तापासूनच या जबाबदारीसाठी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची काळजी घेऊ शकता. त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे आणि त्यांची तुम्ही कदर करता, हे त्यांना तुम्ही बोलून दाखवू शकता.—योहा. १५:९. टेहळणी बुरूज२३.१२ २८-२९ ¶१७-१८
मंगळवार, २८ ऑक्टोबर
[यहोवा] तुझं जीवन स्थिर करणारा आहे.—यश. ३३:६.
आपण यहोवाचे विश्वासू सेवक असलो तरीपण, या जगातल्या लोकांप्रमाणेच आपल्यावरही संकट येऊ शकतात. तसंच देवाच्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून आपल्याला छळ आणि विरोध सहन करावा लागू शकतो. यहोवा कदाचित आपल्याला अशा संकटांमधून वाचवणार नाही तरी तो आपल्याला मदत करण्याचं वचन मात्र देतो. (यश. ४१:१०) त्याच्या मदतीने आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थितीतसुद्धा त्याला एकनिष्ठ राहू शकतो. यहोवा आपल्याला एक खास गोष्ट द्यायचं वचन देतो. बायबलमध्ये याला “देवाची शांती” म्हटलंय. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवासोबतच्या अनमोल नात्यामुळे निर्माण होणारी शांती म्हणजेच देवाची शांती आहे. ही शांती “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” आहे. कारण या शांतीचा अनुभव आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतो. यहोवाला कळकळून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कधी एकदम शांत झाल्यासारखं वाटलंय का? यालाच “देवाची शांती” म्हटलंय. टेहळणी बुरूज२४.०१ २० ¶२; २१ ¶४
बुधवार, २९ ऑक्टोबर
माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर! मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.—स्तो. १०३:१.
यहोवासाठी असलेलं प्रेम विश्वासू लोकांना मनापासून त्याच्या नावाची स्तुती करायला प्रवृत्त करतं. दावीद राजाने असं लिहिलं: “माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर! मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.” (स्तो. १०३:१) दावीदला हे माहीत होतं, की यहोवाच्या नावाची स्तुती करणं म्हणजेच यहोवाची स्तुती करणं. त्यामुळे जेव्हा आपण यहोवाचं नाव ऐकतो, तेव्हा आपण आपोआपच तो कशा प्रकारची व्यक्ती आहे, त्याचे सुंदर गुण कोणते आहेत आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी कोणत्या आहेत यांवर विचार करतो. देवाच्या नावाला आपण पवित्र मानावं आणि त्याची स्तुती करावी अशी दावीदची इच्छा होती. आणि हे सगळं त्याला “अगदी अंतःकरणापासून” करायचं होतं. त्याचप्रमाणे लेवी म्हणून सेवा करणाऱ्या लोकांनीसुद्धा यहोवाची स्तुती करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी नम्रपणे कबूल केलं, की आपण यहोवाच्या नावाची कितीही महिमा आणि स्तुती केली तरी त्याच्या पवित्र नावासाठी ती कमीच आहे. (नहे. ९:५) यात काहीच शंका नाही, की अशा प्रकारे नम्रपणे आणि मनापासून यहोवाची स्तुती केल्यामुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल. टेहळणी बुरूज२४.०२ ९ ¶६
गुरुवार, ३० ऑक्टोबर
आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.—फिलिप्पै. ३:१६.
तुमच्या क्षमतेपलीकडे असलेलं एखादं ध्येय जर तुम्हाला गाठता आलं नाही तर यहोवा तुम्हाला त्यासाठी अपयशी समजणार नाही. (२ करिंथ. ८:१२) एखादं ध्येय गाठता आलं नाही तर निराश होण्यापेक्षा त्या अनुभवातून शिका. तुम्ही आतापर्यंत कोणती ध्येयं पूर्ण केली आहेत ते लक्षात ठेवा. बायबल म्हणतं: ‘तुमचं काम विसरून जायला देव अन्यायी नाही.’ (इब्री ६:१०) त्यामुळे तुम्हीही आधी केलेली कामं विसरू नका. यहोवासोबत मैत्री करणं, त्याच्याबद्दल इतरांना सांगणं किंवा बाप्तिस्मा घेणं यांसारखी कोणती ध्येयं तुम्ही पूर्ण केली आहेत याचा विचार करा. आधी ठेवलेली आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करण्यासाठी जशी तुम्ही प्रगती केली तशीच प्रगती तुम्ही आता ठेवलेल्या ध्येयासाठीही करू शकता. तुम्ही यहोवाच्या मदतीने आपल्या ध्येयांपर्यंत आनंदाने पोहोचू शकता. तुमची ध्येयं पूर्ण करत असताना यहोवा तुम्हाला कशी मदत करत आहे किंवा तुम्हाला कसा आशीर्वाद देत आहे हे अनुभवण्याचा आनंद घ्यायला विसरू नका. (२ करिंथ. ४:७) आणि हार न मानता तुम्ही जर तुमची ध्येयं पूर्ण केली तर यहोवा तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देईल.—गलती. ६:९. टेहळणी बुरूज२३.०५ ३१ ¶१६-१८
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर
पिता स्वतः तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि मी देवाकडून आलो यावर तुम्ही विश्वास ठेवला, म्हणून तो तुमच्यावर प्रेम करतो.—योहा. १६:२७.
यहोवाचं त्याच्या लोकांवर किती प्रेम आहे आणि तो त्यांच्यावर किती खूश आहे, हे दाखवण्याची नेहमी संधी शोधत असतो. बायबलमध्ये आपल्याला अशा दोन घटनांबद्दल वाचायला मिळतं, जेव्हा यहोवाने येशूला हे सांगितलं, की त्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि तो त्याच्यावर किती खूश आहे. (मत्त. ३:१७; १७:५) तुमच्यावरही यहोवा किती खूश आहे, हे तुम्हाला ऐकायचं आहे का? आज तो आपल्याशी थेट बोलत नाही तर त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. आपण जेव्हा शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूचे शब्द वाचतो, तेव्हा यहोवा आपल्यावर किती खूश आहे हे आपल्याला “ऐकायला” मिळतं. येशूने आपल्या पित्याचं व्यक्तिमत्त्व अगदी हुबेहूबपणे दाखवून दिलं. तो आपल्या अपरिपूर्ण पण विश्वासू शिष्यांवर किती खूश आहे आणि त्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्याने बोलून दाखवलं. आपण जेव्हा त्याचे शब्द बायबलमधून वाचतो तेव्हा आपण अशी कल्पना करू शकतो, की यहोवा हेच शब्द आपल्यासाठी वापरतोय. (योहा. १५:९, १५) पण समस्या आल्या तर त्याचा अर्थ असा होत नाही, की आपण देवाची स्वीकृती गमावली आहे. उलट, अशा वेळी आपल्याला यहोवावरचं प्रेम आणि त्याच्यावरचा आपला भरवसा किती मजबूत आहे, हे दाखवण्याची संधी मिळते.—याको. १:१२. टेहळणी बुरूज२४.०३ २८ ¶१०-११