अभ्यास लेख २१
गीत २१ पहिल्याने राज्यासाठी झटा!
कायम टिकणाऱ्या शहराची वाट पाहा!
“जे येणार आहे त्या शहराची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.”—इब्री १३:१४.
या लेखात:
इब्री लोकांना पुस्तकाच्या १३ व्या अध्यायातून आपल्याला आज आणि भविष्यात कसा फायदा होऊ शकतो, ते पाहू या.
१. येशूने यरुशलेमबद्दल कोणती भविष्यवाणी केली होती?
येशूच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने त्याच्या शिष्यांना एक भविष्यवाणी सविस्तरपणे सांगितली. ती म्हणजे, एक दिवस यरुशलेम शहराला एक ‘सैन्य वेढा’ घालेल. (लूक २१:२०) त्याने त्याच्या शिष्यांना असंही सांगितलं होतं की जेव्हा ते यरुशलेमला सैन्याने वेढलेलं पाहतील, तेव्हा त्यांनी लगेच तिथून पळून जावं. येशूचे हे शब्द खरे ठरले. रोमी सैन्याने यरुशलेमला वेढलं. (लूक २१:२१, २२) आणि जेव्हा त्या सैन्याने यरुशलेमचा आणि तिथल्या मंदिराचा नाश केला, तेव्हा येशूने केलेल्या भविष्यवाणीची पहिली पूर्णता झाली.
२. प्रेषित पौलने इब्री ख्रिश्चनांना यहूदीया आणि यरुशलेमबद्दल कोणत्या गोष्टीची आठवण करून दिली?
२ रोमी सैन्याने यरुशलेमला वेढा घालण्याच्या फक्त काही वर्षांआधीच, पौलने ख्रिश्चनांना एक महत्त्वाचा संदेश असलेलं पत्र लिहिलं. त्या पत्राला आज आपण इब्री लोकांना पत्र या नावाने ओळखतो. त्या पत्रात पौलने यहूदीया आणि यरुशलेममधल्या ख्रिश्चनांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. या सल्ल्यामुळे त्यांना पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहायला मदत होणार होती. त्यांना कशासाठी तयार राहायचं होतं? लवकरच यरुशलेम शहराचा नाश होणार होता. आणि त्या ख्रिश्चनांकडे त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचं घरदार, कामधंदा सोडून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पौलने यरुशलेम शहराबद्दल त्यांना अशी आठवण करून दिली: “इथे आपल्यासाठी कायम टिकणारं शहर नाही, तर जे येणार आहे त्या शहराची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.”—इब्री १३:१४.
३. ‘खरा पाया असलेलं शहर’ कोणतं आहे? आणि आपण त्याची वाट का पाहिली पाहिजे?
३ जेव्हा ख्रिश्चनांनी यरुशलेम आणि यहूदीया सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा कदाचित लोकांनी त्यांची थट्टा केली असेल, ते त्यांच्यावर हसले असतील. पण त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा जीव वाचला. आजसुद्धा लोक आपल्याला मूर्ख समजतात. कारण आपण पैशांवर भरवसा ठेवत नाही. आणि या जगातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण माणसांकडे पाहत नाही. पण आपण असं का करतो? कारण आपल्याला माहीत आहे, की या जगाच्या व्यवस्थेचा लवकरच अंत होणार आहे. म्हणूनच आपण “खरा पाया असलेल्या . . . शहराची” वाट पाहतो. म्हणजेच ‘येणाऱ्या’ देवाच्या राज्याची आपण वाट पाहतो.a (इब्री ११:१०; मत्त. ६:३३) या लेखाच्या प्रत्येक उपशीर्षकामध्ये आपण तीन गोष्टी पाहणार आहोत: (१) पौलने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना देवाच्या प्रेरणेने जो सल्ला दिला, त्यामुळे त्यांना ‘येणाऱ्या शहराची’ वाट पाहायला कशी मदत झाली? (२) पौलने त्यांना पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहायला कशी मदत केली? आणि (३) पौलच्या सल्ल्याचा आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
यहोवावर भरवसा ठेवा कारण तो तुम्हाला कधीच सोडणार नाही
४. यरुशलेम शहर ख्रिश्चनांसाठी महत्त्वाचं का होतं?
४ यरुशलेम शहर ख्रिश्चनांसाठी महत्त्वाचं होतं. कारण इ.स. ३३ मध्ये पहिल्या ख्रिस्ती मंडळीची सुरुवात तिथेच झाली होती. नियमन मंडळाचे भाऊसुद्धा तिथेच राहायचे. इतकंच काय, तर तिथे बऱ्याच ख्रिश्चनांची स्वतःची घरं होती आणि त्यांच्या मालकीच्या बऱ्याच गोष्टीही होत्या. पण येशूने त्याच्या शिष्यांना फक्त यरुशलेमच नाही, तर यहूदीयासुद्धा सोडायची ताकीद दिली होती.—मत्त. २४:१६.
५. पौलने ख्रिश्चनांना पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी कसं तयार केलं?
५ पौलने ख्रिश्चनांना पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहायला कशी मदत केली? त्याने ख्रिश्चनांना यरुशलेम शहराला यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायला सांगितलं. पौलने त्यांना आठवण करून दिली की यरुशलेममधलं मंदिर, तिथले याजक आणि तिथे दिली जाणारी बलिदानं आता यहोवासाठी पवित्र नव्हती. (इब्री ८:१३) कारण त्या शहरातल्या बऱ्याच लोकांनी मसीहाला नाकारलं होतं. यरुशलेममधलं मंदिर आता यहोवाच्या शुद्ध उपासनेचं केंद्र राहिलं नव्हतं. आणि लवकरच त्याचा नाश होणार होता.—लूक १३:३४, ३५.
६. पौलने इब्री लोकांना १३:५, ६ मधला सल्ला अगदी योग्य वेळी दिला असं का म्हणता येईल?
६ जेव्हा पौलने इब्री लोकांना हे पत्र लिहिलं, तेव्हा यरुशलेम खूप समृद्ध शहर होतं. त्या काळच्या एका रोमी लेखकाने यरुशलेमबद्दल असं म्हटलं, की ते “पूर्वेकडचं सगळ्यात प्रसिद्ध शहर आहे.” वेगवेगळ्या ठिकाणचे यहुदी लोक दर वर्षी सणांसाठी तिथे यायचे. त्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागायचा. आणि यात काहीच शंका नाही, की काही ख्रिश्चनांनासुद्धा यामुळे पैसे कमवायची संधीही मिळत असावी. म्हणूनच पौलने त्यांना असं म्हटलं: “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा.” हे म्हटल्यानंतर पौलने त्यांना यहोवाने आपल्या प्रत्येक सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. ते म्हणजे: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री लोकांना १३:५, ६ वाचा; अनु. ३१:६; स्तो. ११८:६) यरुशलेममध्ये आणि यहूदीयामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांना त्या वेळी या वचनाची खूप गरज होती. का? कारण हे पत्र मिळाल्याच्या काही काळातच त्यांना त्यांची घरंदारं, व्यवसाय-धंदा आणि त्यांच्या मालकीच्या बऱ्याच गोष्टी सोडून जाव्या लागणार होत्या आणि एका नव्या ठिकाणी जाऊन पुन्हा आयुष्य सुरू करावं लागणार होतं. हे करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.
७. आपण आजच यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला का शिकलं पाहिजे?
७ आपल्यासाठी धडा: लवकरच काय होणार आहे? ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी सध्याच्या जगाच्या व्यवस्थेचा अंत होणार आहे. (मत्त. २४:२१) म्हणून पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणे आपणसुद्धा जागं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तयार असलं पाहिजे. (लूक २१:३४-३६) मोठ्या संकटाच्या वेळी कदाचित आपल्याला आपल्या काही गोष्टी किंवा आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडाव्या लागतील. तसंच, यहोवा त्याच्या लोकांना कधीच सोडणार नाही यावर पूर्ण भरवसा ठेवावा लागेल. मोठं संकट सुरू व्हायच्या आधी म्हणजे आजसुद्धा आपल्याला यहोवावर भरवसा दाखवण्याची संधी आहे. म्हणून स्वतःला विचारा: ‘माझ्या निर्णयांवरून आणि ध्येयांवरून काय दिसून येतं? माझा भरवसा पैशांवर आहे, की माझी काळजी वाहणाऱ्या देवावर?’ (१ तीम. ६:१७) हे खरंय, की पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांच्या उदाहरणामधून आपल्याला मोठ्या संकटाच्या वेळी विश्वासू राहायला मदत होऊ शकते. पण पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी जे सोसलं, त्यापेक्षा जास्त आपल्याला ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी सोसावं लागेल. मग मोठं संकट सुरू झाल्यावर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपल्याला कसं कळेल?
नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञा पाळा
८. येशूने त्याच्या शिष्यांना कोणत्या सूचना दिल्या होत्या?
८ इब्री लोकांना पौलचं पत्र मिळाल्याच्या काही वर्षांनंतरच रोमी सैन्याने यरुशलेमला वेढा घातला. यावरून ख्रिश्चनांनी ओळखलं, की लवकरच यरुशलेमचा नाश होणार आहे. तसंच, येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांची पळून जायची वेळ आली आहे. (मत्त. २४:३; लूक २१:२०, २४) पण त्यांना नेमकं कुठे पळून जायचं होतं? कारण येशूने फक्त असं म्हटलं होतं: “जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी.” (लूक २१:२१) त्या प्रदेशात बरेच डोंगर होते. पण नेमकं कोणत्या डोंगरांच्या दिशेने पळून जायचं हे त्यांना कसं कळणार होतं?
९. कोणत्या डोंगरांच्या दिशेने पळून जायचं असा प्रश्न ख्रिश्चनांना का पडला असेल? (नकाशासुद्धा पाहा.)
९ आता अशा काही डोंगरांचा विचार करा, जिथे ख्रिस्ती लोक पळून जाऊ शकत होते. उदाहरणार्थ, शोमरोनमधले डोंगर, गालीलमधले डोंगर, हर्मोन पर्वत, लबानोनमधले डोंगर आणि यार्देन नदीच्या पलीकडे असलेले डोंगर. (नकाशा पाहा.) या डोंगराळ भागांमधली काही शहरं लोकांना खूप सुरक्षित वाटत असावीत; जसं की, गमला हे शहर. कारण ते एका उंच डोंगराच्या कड्याजवळ वसलेलं होतं आणि तिथे पोहोचणं कठीण होतं. काही यहुद्यांनाही वाटलं की शरण घेण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. पण रोमी सैन्याने त्या शहरावर हल्ला करून त्याचा नाश केला. आणि तिथल्या बऱ्याच रहिवाशांना मारून टाकलं.b
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना पळून जाण्यासाठी बरेच डोंगर होते. पण सगळेच डोंगर पळून जाण्यासाठी आणि राहण्यासाठी सुरक्षित नव्हते (परिच्छेद ९ पाहा)
१०-११. (क) यहोवाने त्याच्या लोकांना मार्गदर्शन कसं दिलं असावं? (इब्री लोकांना १३:७, १७) (ख) नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञा पाळल्यामुळे ख्रिश्चनांना कसा फायदा झाला? (चित्रसुद्धा पाहा.)
१० असं दिसतं की यहोवाने मंडळीचं नेतृत्व करणाऱ्या काही भावांचा वापर करून ख्रिश्चनांना मार्गदर्शन दिलं. युसीबीयस नावाच्या एका इतिहासकाराने त्या काळाबद्दल नंतर असं लिहिलं: “देवाने यरुशलेममधल्या काही भावांना असं प्रकट केलं, की ख्रिश्चनांनी यरुशलेम सोडून पेरियाच्या पेल्ला या शहरात पळून जावं.” पेल्ला हे पळून जाण्यासाठी अगदी योग्य ठिकाण होतं. कारण ते यरुशलेमपासून जास्त दूर नव्हतं. आणि तिथे पोहोचणंही ख्रिश्चनांसाठी जास्त कठीण नव्हतं. तसंच, पेल्लामध्ये बरेचसे लोक विदेशी होते. आणि त्यामुळे ते रोमी लोकांशी युद्ध करत नव्हते.—नकाशा पाहा.
११ पौलने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला होता, की मंडळीमध्ये “जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा.” (इब्री लोकांना १३:७, १७ वाचा.) आणि जे ख्रिश्चन डोंगरांवर पळून गेले त्यांनी पौलच्या सल्ल्याचं पालन केलं. याचा परिणाम म्हणजे देवाच्या लोकांचा जीव वाचला. इतिहासावरून असं दिसून येतं, की देवाने “खरा पाया असलेल्या” शहराची, म्हणजे देवाच्या राज्याची वाट पाहणाऱ्यांना सोडून दिलं नव्हतं.—इब्री ११:१०.
पेल्ला ख्रिश्चनांसाठी सुरक्षित ठिकाण होतं आणि ते जास्त दूरही नव्हतं (परिच्छेद १०-११ पाहा)
१२-१३. यहोवाने कठीण काळात त्याच्या लोकांचं मार्गदर्शन कसं केलं?
१२ आपल्यासाठी धडा: यहोवा नेतृत्व करणाऱ्यांचा वापर करून त्याच्या लोकांना विशिष्ट मार्गदर्शन देतो. यहोवाने कठीण काळात त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी विश्वासू माणसांचा वापर कसा केला, याची बरीच उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. (अनु. ३१:२३; स्तो. ७७:२०) आजच्या काळातसुद्धा यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी नेतृत्व करणाऱ्यांचा वापर करतोय, याचे बरेच पुरावे आपण पाहिले आहेत.
१३ उदाहरणार्थ, कोव्हिड-१९ महामारी सुरू झाल्यानंतर “नेतृत्व” करणाऱ्या भावांनी मंडळ्यांना मार्गदर्शन दिलं. भाऊबहिणींच्या आध्यात्मिक गरजा कशा पुरवायच्या याबद्दल या भावांनी वडिलांना सूचना दिल्या. तसंच, महामारीचा उद्रेक झाल्याच्या काही काळातच इंटरनेट, टिव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून ५०० पेक्षा जास्त भाषांमध्ये अधिवेशनांचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा प्रकारचं अधिवेशन आधी कधीच झालं नव्हतं. खरंच त्या कठीण काळातसुद्धा आपल्याला आध्यात्मिक अन्न मिळायचं बंद झालं नाही. आणि याचा परिणाम म्हणजे, आपल्यातली एकता टिकून राहिली. यामुळे आपण अशी खातरी बाळगू शकतो, की भविष्यात कितीही मोठ्या समस्या आल्या तरी यहोवा पुढाकार घेणाऱ्या भावांना कोणती पावलं उचलायची हे ठरवायला मदत करत राहील. मोठ्या संकटासाठी तयार राहायला आणि त्या कठीण काळात सुज्ञपणे वागायला आपल्याला यहोवावर भरवसा ठेवावा लागेल आणि त्याच्या आज्ञांचं पालन करावं लागेल. पण आणखी कोणत्या गुणांमुळे आपल्याला त्या काळासाठी तयार राहायला मदत होईल?
बांधवांप्रमाणे एकमेकांवर प्रेम करा आणि पाहुणचार करा
१४. इब्री लोकांना १३:१-३ प्रमाणे यहुदी व्यवस्थेचा अंत जसजसा जवळ येत होता तसतसं ख्रिश्चनांना कोणते गुण दाखवायची गरज होती?
१४ मोठं संकट सुरू होईल तेव्हा आपल्याला आपल्या भाऊबहिणींवर कधी नव्हे इतकं प्रेम दाखवावं लागेल. या बाबतीत यरुशलेम आणि यहूदीयामधल्या ख्रिश्चनांकडून आपण खूप काही शिकू शकतो. त्यांनी नेहमी एकमेकांवर प्रेम केलं. (इब्री १०:३२-३४) पण यहुदी व्यवस्थेचा अंत जसजसा जवळ येत होता, तसतसं त्या ख्रिश्चनांना “बांधवांप्रमाणे एकमेकांवर प्रेम” करायची आणि “पाहुणचार” करायची जास्त गरज होती.c (इब्री लोकांना १३:१-३ वाचा.) आपल्या बाबतीतही हेच खरंय. या जगाच्या व्यवस्थेचा अंत जसजसा जवळ येतोय, तसतसं आपल्याला आपल्या भाऊबहिणींवर आणखी प्रेम करावं लागेल.
१५. डोंगरांकडे पळून गेल्यावर इब्री ख्रिश्चनांना एकमेकांवर प्रेम करायची आणि एकमेकांचा पाहुणचार करायची गरज का होती?
१५ रोमी सैन्याने यरुशलेमला वेढा घातला आणि मग ते अचानक तिथून निघून गेलं. यामुळे ख्रिश्चनांना तिथून पळून जायची संधी मिळाली. पण त्यांना त्यांच्यासोबत खूप कमी गोष्टी नेता आल्या. (मत्त. २४:१७, १८) त्यामुळे डोंगरांकडे पळून जाताना प्रवासादरम्यान त्यांना एकमेकांच्या मदतीची गरज होती. तसंच ते जेव्हा पेल्लाला गेले तेव्हा तिथे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठीसुद्धा त्यांना एकमेकांच्या मदतीची गरज होती. बऱ्याच भाऊबहिणींना लगेच काही गोष्टींची गरज लागली असेल यात काहीच शंका नाही. यामुळे ख्रिश्चनांना एकमेकांवर भावांप्रमाणे प्रेम करायची आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना देऊन पाहुणचार करायची संधी मिळाली असेल.—तीत ३:१४.
१६. गरज असलेल्या भाऊबहिणींवर आपण प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ आपल्यासाठी धडा: गरज असलेल्या भाऊबहिणींना मदत करायला आपल्याला प्रेमामुळे प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, ज्या भाऊबहिणींना युद्धामुळे किंवा नैसर्गिक विपत्तींमुळे घर सोडावं लागलंय त्यांना बऱ्याच भाऊबहिणींनी मदत केली. त्यांनी या शरणार्थी भाऊबहिणींना गरजेच्या गोष्टी पुरवल्या. तसंच यहोवाची सेवा करत राहण्यासाठी त्यांना मदत केली आणि प्रोत्साहनसुद्धा दिलं. युक्रेनमध्ये राहणाऱ्या एक बहिणीच्या अनुभवाचा विचार करा. तिला युद्धामुळे तिचं घर सोडावं लागलं. ती म्हणते: “यहोवा भाऊबहिणींचा वापर करून कशा प्रकारे आमचं मार्गदर्शन करतोय आणि आमच्या गरजा पुरवतोय, हे आम्ही पाहू शकलो. युक्रेनमध्ये असताना, हंगेरीमध्ये असताना आणि आता इथे जर्मनीमध्ये असताना आम्ही भाऊबहिणींचं प्रेम अनुभवलं. आणि त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली.” आपण जेव्हा भाऊबहिणींचा पाहुणचार करतो आणि गरजेच्या वेळी त्यांना मदत करतो, तेव्हा आपण यहोवासोबत काम करत असतो.—नीति. १९:१७; २ करिंथ. १:३, ४.
आजसुद्धा शरणार्थी असलेल्या आपल्या भाऊबहिणींना आपल्या मदतीची गरज आहे (परिच्छेद १६ पाहा)
१७. आपण आजच भावाभावांसारखं प्रेम करायला आणि पाहुणचार करायला का शिकलं पाहिजे?
१७ मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला आज आहे त्यापेक्षाही जास्त एकमेकांच्या मदतीची गरज असेल. (हब. ३:१६-१८) यहोवा आज आपल्याला एकमेकांवर भावाभावांसारखं प्रेम करायला आणि एकमेकांचा पाहुणचार करायला शिकवतोय. कारण या गुणांची आपल्याला त्या वेळी खूप जास्त गरज असेल.
लवकरच काय होईल?
१८. आपण पहिल्या शतकातल्या इब्री ख्रिश्चनांप्रमाणे कसं वागू शकतो?
१८ इतिहासावरून दिसून येतं, की ज्या ख्रिश्चनांनी येशूचा सल्ला पाळला आणि डोंगरांवर पळून गेले त्यांचा जीव वाचला. त्यांनी ते शहर सोडलं, पण यहोवाने त्यांना कधीच सोडलं नाही. आज आपल्या बाबतीत काय? भविष्यात नेमकं कायकाय घडेल याबद्दल आपल्याला सगळीच माहिती नाही. पण येशूने आपल्याला काय करायला सांगितलं हे आपल्याला माहीत आहे. त्याने आपल्याला आज्ञा पाळण्याच्या बाबतीत तयार राहायला सांगितलंय. (लूक १२:४०) तसंच पौलने इब्री लोकांना जे पत्र लिहिलं होतं, त्यातला सल्लासुद्धा आपल्याला माहीत आहे. तो सल्ला त्या वेळी जितका उपयोगाचा होता तितकाच आजही उपयोगाचा आहे. शिवाय यहोवानेसुद्धा आपल्याला स्वतः अशी खातरी दिली आहे, की तो आपल्याला कधीच सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही. (इब्री १३:५, ६) तर चला, आपण सगळेच जे शहर येणार आहे त्याची म्हणजे देवाच्या राज्याची वाट पाहू या. आणि त्यामुळे आपल्याला जे आशीर्वाद मिळतील त्यांचा आनंद घेऊ या.—मत्त. २५:३४.
गीत १५७ ही शांती!
a बायबलच्या काळात सहसा शहरांवर राजांचं राज्य असायचं. आणि अशा शहरांना राज्य म्हटलं जायचं.—उत्प. १४:२.
b ही घटना ख्रिश्चनांनी यहूदीया आणि यरुशलेम सोडल्याच्या काही काळातच म्हणजे इ.स. ६७ ला घडली.
c ज्या शब्दांचं भाषांतर “बांधवांप्रमाणे प्रेम” असं करण्यात आलंय, ते शब्द कुटुंबातल्या लोकांमध्ये असलेल्या प्रेमासाठीसुद्धा वापरले जाऊ शकतात. पण पौलने इथे मंडळीतल्या भाऊबहिणींमध्ये असलेल्या प्रेमाला सूचित करण्यासाठी या शब्दांचा वापर केला.