करिंथकर यांना पहिलं पत्र
९ मला स्वातंत्र्य नाही का? मी एक प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूला पाहिलं नाही का?+ आणि तुम्ही प्रभूमध्ये माझ्या कामाचं फळ नाही का? २ इतरांसाठी मी प्रेषित नसलो, तरी तुमच्यासाठी तर नक्कीच आहे! कारण तुम्ही प्रभूमध्ये माझा प्रेषितपणा सिद्ध करणारा शिक्का आहात.
३ माझी चौकशी करणाऱ्यांना मी आपल्या बचावात हेच म्हणीन: ४ आम्हाला खाण्यापिण्याचा हक्क* नाही का? ५ इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ+ आणि केफा*+ यांच्याप्रमाणेच, आम्हालासुद्धा विश्वासात असलेल्या एखाद्या बहिणीशी लग्न करून,+ तिला आपल्यासोबत नेण्याचा हक्क नाही का? ६ फक्त मी आणि बर्णबाच+ असे आहोत का, की ज्यांनी पोटापाण्यासाठी काम केलं पाहिजे? ७ असा कोणता सैनिक आहे जो स्वतःच्या खर्चाने सैन्यात सेवा करतो? असा कोण आहे जो द्राक्षमळा लावतो, पण त्याचं फळ कधी खात नाही?+ आणि असा कोणता मेंढपाळ आहे जो मेंढरांची राखण करतो, पण त्यांचं दूध पीत नाही?
८ मी या गोष्टी माणसांच्या दृष्टिकोनातून बोलत आहे का? नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का? ९ कारण मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलं आहे: “धान्याची मळणी करणाऱ्या बैलाचं तोंड बांधू नका.”+ देव बैलांचीच काळजी करतो का? १० की मुळात आपल्यासाठी तो असं म्हणतो? हे खरंतर आपल्यासाठीच लिहिण्यात आलं होतं. कारण नांगरणी आणि मळणी करणारा, हे दोघंही आपला वाटा मिळण्याच्या आशेने काम करत असतात.
११ आम्ही तुमच्यामध्ये देवाच्या गोष्टींची पेरणी केली आहे. मग तुमच्याकडून आम्ही आपल्या गरजेच्या वस्तूंची कापणी केली, तर ही फार मोठी गोष्ट आहे का?+ १२ इतर जण जर तुमच्यावर हा हक्क बजावू शकतात, तर आम्हाला नक्कीच हा हक्क आहे. पण तरीही आम्ही या हक्काचा* वापर केला नाही.+ उलट, ख्रिस्ताचा आनंदाचा संदेश घोषित करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आम्ही सगळं सहन करत आहोत.+ १३ तुम्हाला माहीत नाही का, की मंदिरात पवित्र सेवा करणाऱ्यांना मंदिरातून आपलं अन्न मिळतं आणि वेदीसमोर नियमितपणे सेवा करणाऱ्यांना वेदीवरच्या अर्पणातून वाटा मिळतो?+ १४ त्याचप्रमाणे, आनंदाच्या संदेशाची घोषणा करणाऱ्यांनी आनंदाच्या संदेशाद्वारे आपलं पोट भरावं, अशी प्रभूने आज्ञा दिली.+
१५ तरी, यांपैकी एकाही तरतुदीचा मी उपयोग केला नाही.+ पण तुम्ही माझ्यासाठी या गोष्टी कराव्यात, म्हणून मी तुम्हाला यांबद्दल लिहिलं नाही. कारण, कोणी माझं बढाई मारायचं कारण माझ्याकडून हिरावून घ्यावं यापेक्षा मला मरण आलेलं बरं!+ १६ जर मी आनंदाच्या संदेशाची घोषणा करत असलो, तर मला बढाई मारायचं काहीच कारण नाही. कारण ते तर माझं कर्तव्यच आहे. उलट, मी जर आनंदाचा संदेश सांगितला नाही, तर माझा धिक्कार असो!+ १७ मी हे काम स्वेच्छेने केलं, तर मला बक्षीस मिळेल. पण इच्छा नसतानाही मी ते केलं, तरी ती माझी जबाबदारीच आहे. कारण देवाने हे काम माझ्यावर सोपवलं आहे.+ १८ तर मग, मला कोणतं बक्षीस मिळेल? हेच की मी कोणताही मोबदला न घेता आनंदाचा संदेश घोषित करू शकेन. असं केल्यामुळे आनंदाच्या संदेशाच्या बाबतीत असलेल्या माझ्या अधिकाराचा* मला गैरवापर करावा लागणार नाही.
१९ कारण मी कोणत्याही माणसाचा दास नसलो, तरी जास्तीत जास्त लोकांना मिळवता यावं म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास बनवलं आहे. २० यहुद्यांना मिळवता यावं म्हणून यहुद्यांसाठी मी एका यहुद्यासारखा झालो.+ मी स्वतः नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना मिळवण्यासाठी, मी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांसारखा झालो.+ २१ जे नियमशास्त्राच्या अधीन नाहीत अशांना मिळवण्यासाठी, मी नियमशास्त्राच्या अधीन नसलेल्यांसारखा झालो. असं असलं, तरी मी देवाच्या नियमाबाहेर नाही आणि ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन आहे.+ हे यासाठी की, जे नियमशास्त्राच्या अधीन नाहीत त्यांना मी मिळवावं. २२ दुर्बलांना मिळवावं म्हणून मी दुर्बलांसाठी दुर्बल झालो.+ मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो, म्हणजे कसंही करून मला काहींचं तारण करता यावं.* २३ मी आनंदाच्या संदेशासाठी सर्वकाही करतो. हे यासाठी, की मला तो इतरांना सांगता यावा.+
२४ शर्यतीत सगळेच धावत असले, तरी त्यांपैकी एकालाच बक्षीस मिळतं हे तुम्हाला माहीत नाही का? अशा प्रकारे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल.+ २५ स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण* सर्व गोष्टींच्या बाबतीत आत्मसंयम बाळगतो. अर्थात, ते नाश होणारा मुकुट मिळवण्यासाठी असं करतात;+ पण आपण कधीही नाश न होणारा मुकुट मिळवण्यासाठी करतो.+ २६ म्हणून, मी कोणतंही ध्येय नसल्यासारखं धावत नाही.+ तसंच, वाऱ्याला मारत असल्यासारखं मी ठोसे मारत नाही. २७ तर, मी आपल्या शरीराला बुक्के मारतो*+ आणि त्याला दास करून ठेवतो, म्हणजे इतरांना प्रचार केल्यावर मी स्वतः काही कारणामुळे नाकारला जाणार नाही. *