करिंथकर यांना पहिलं पत्र
१२ आता बांधवांनो, देवाकडून मिळालेल्या दानांच्या बाबतीत+ तुम्ही अंधारात असावं, अशी माझी इच्छा नाही. २ कारण तुम्ही विदेशी लोकांपैकी* होता, तेव्हा तुम्हाला बहकवण्यात आलं होतं आणि मुक्या मूर्तींची उपासना करावी म्हणून तुमची दिशाभूल करण्यात आली होती.+ त्या नेतील तिथे तुम्ही त्यांच्या मागेमागे जात होता. ३ आता तुम्ही हे समजून घ्यावं असं मला वाटतं, की कोणीही देवाच्या पवित्र शक्तीच्या* मदतीने बोलत असेल, तर “येशू शापित आहे!” असं म्हणणार नाही; तसंच, पवित्र शक्तीच्या मदतीशिवाय कोणीही, “येशू प्रभू आहे!” असं म्हणू शकत नाही.+
४ आता दानं वेगवेगळी असली, तरी पवित्र शक्ती एकच आहे.+ ५ आणि सेवेचे वेगवेगळे प्रकार असले,+ तरी प्रभू एकच आहे. ६ तसंच वेगवेगळी कार्यं असली, तरी सर्वांना ती कार्यं करायला मदत करणारा देव एकच आहे.+ ७ पण, प्रत्येकामध्ये देवाची पवित्र शक्ती कार्य करताना दिसते आणि हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे.+ ८ कारण कोणाला पवित्र शक्तीद्वारे बुद्धीचं वचन,* तर कोणाला त्याच पवित्र शक्तीद्वारे ज्ञानाचं वचन देण्यात आलं आहे. ९ कोणाला त्याच पवित्र शक्तीद्वारे विश्वास,+ तर कोणाला त्या एकाच पवित्र शक्तीद्वारे बरं करायचं दान देण्यात आलं आहे;+ १० कोणाला महान कार्यं करायचं,+ कोणाला भविष्यवाणी करायचं, कोणाला प्रेरित वचनं समजून घेण्याचं,+ कोणाला वेगवेगळ्या भाषांत बोलण्याचं+ तर आणखी कोणाला भाषांतर करायचं दान देण्यात आलं आहे.+ ११ पण, ही सगळी कार्यं ती एकच पवित्र शक्ती घडवून आणते आणि आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला देणगी देते.
१२ कारण ज्याप्रमाणे शरीर एक असलं, तरी बरेच अवयव असतात आणि शरीराचे अवयव बरेच असले, तरी शरीर एकच असतं;+ त्याचप्रमाणे ख्रिस्त आहे. १३ कारण आपण यहुदी असलो किंवा ग्रीक, दास असलो किंवा स्वतंत्र, तरी एकच शरीर होण्यासाठी आपल्या सगळ्यांचा एकाच पवित्र शक्तीद्वारे बाप्तिस्मा झाला आहे आणि आपल्या सगळ्यांना एकच पवित्र शक्ती मिळाली आहे.
१४ कारण शरीर मुळात एका अवयवाचं नाही, तर पुष्कळ अवयवांचं मिळून बनलं आहे.+ १५ पायाने जर म्हटलं, की “मी हात नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,” तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही. १६ आणि जर कानाने म्हटलं, “मी डोळा नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,” तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही. १७ संपूर्ण शरीर डोळा असतं, तर आपण कशाच्या मदतीने ऐकलं असतं? आणि संपूर्ण शरीर कान असतं, तर आपण कशाच्या मदतीने वास घेतला असता? १८ पण, देवाला योग्य वाटलं त्याप्रमाणे त्याने शरीराचा प्रत्येक अवयव आपापल्या जागी ठेवला आहे.
१९ जर सगळे अवयव सारखेच असते, तर त्याला शरीर म्हणता आलं असतं का? २० पण आता पुष्कळ अवयव असले, तरी शरीर एकच आहे. २१ डोळा हाताला म्हणू शकत नाही, की “मला तुझी गरज नाही,” किंवा डोकं पायांना म्हणू शकत नाही, की “मला तुमची गरज नाही.” २२ उलट, शरीराचे जे अवयव कमजोर वाटतात ते खरंतर आवश्यक असतात. २३ आणि शरीराचे जे भाग कमी मानाचे आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांना आपण विशेष मान देतो.+ अशा रितीने, कमी आकर्षक वाटणाऱ्या भागांना आपण जास्त आदराने वागवतो. २४ पण, आपल्या शरीराच्या आकर्षक भागांना याची गरज नसते. असं असलं, तरी देवाने शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे, की कमी मान असलेल्या भागाला जास्त मान मिळावा. २५ हे यासाठी, की शरीरामध्ये फूट पडू नये, तर त्याच्या अवयवांना एकमेकांची काळजी असावी.+ २६ एक अवयव दुःखी झाला, तर बाकीचे सगळे अवयवसुद्धा दुःखी होतात;+ किंवा एकाचा सन्मान झाला, तर बाकीच्या सगळ्यांनाही आनंद होतो.+
२७ आता तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात+ आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण या शरीराचा अवयव आहे.+ २८ आणि देवाने मंडळीत प्रत्येकाला नेमलं आहे: पहिले प्रेषित;+ दुसरे संदेष्टे;+ तिसरे शिक्षक;+ मग, महान कार्यं करणारे;+ त्यानंतर, बरं करण्याचं दान असणारे,+ उपयोगी सेवा करणारे, मार्गदर्शन करण्याच्या क्षमता असणारे+ आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे.+ २९ तर मग, सगळेच प्रेषित आहेत का? सगळेच संदेष्टे आहेत का? सगळेच शिक्षक आहेत का? सगळेच महान कार्यं करतात का? ३० सगळ्यांजवळच रोग बरे करण्याचं दान आहे का? सगळेच वेगवेगळ्या भाषा बोलतात का?+ सगळेच भाषांतर करणारे आहेत का?+ ३१ तुम्ही तर याहून मोठी दानं मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.*+ पण, मी तुम्हाला यांपेक्षाही चांगला असा एक मार्ग दाखवतो.+