अभ्यास लेख १२
गीत ७७ अंधाऱ्या जगात आशेचा दीप
अंधारापासून दूर राहून प्रकाशात चालत राहा
“एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता . . . तुम्ही प्रकाशात आहात.”—इफिस. ५:८.
या लेखात:
इफिसकर ५ व्या अध्यायात वापरलेल्या अंधार आणि प्रकाश या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो, ते पाहा.
१-२. (क) पौलने इफिसकरांना पत्र लिहिलं तेव्हा तो कुठे होता आणि त्याने त्यांना पत्र का लिहिलं? (ख) या लेखात, आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
प्रेषित पौल जेव्हा रोममध्ये घरात कैद होता, तेव्हा त्याला भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यावंसं वाटत होतं. पण तो त्यांना प्रत्यक्ष भेटू शकत नव्हता, म्हणून त्याने त्यांना पत्रं लिहिली. यांपैकी एक पत्र त्याने इफिसकरांना जवळजवळ इ.स. ६० किंवा ६१ मध्ये लिहिलं.—इफिस. १:१; ४:१.
२ जवळपास दहा वर्षांआधी पौलने इफिसमध्ये बराच वेळ घालवला होता. तिथे त्याने आनंदाच्या संदेशाच्या प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम केलं होतं. (प्रे. कार्यं १९:१, ८-१०; २०:२०, २१) त्याचं तिथल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. आणि यहोवाला विश्वासू राहायला त्यांना मदत करायची त्याची इच्छा होती. पण त्याने अभिषिक्त ख्रिश्चनांना अंधार आणि प्रकाश यांबद्दल का लिहिलं? आणि सगळेच भाऊबहीण या सल्ल्यातून काय शिकू शकतात? चला आता आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.
अंधारातून प्रकाशात
३. इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पौलने कोणत्या शब्दांचा वापर केला?
३ पौलने इफिसमधल्या ख्रिश्चनांना लिहिलं: “एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता . . . तुम्ही प्रकाशात आहात.” (इफिस. ५:८) पौलने विरोधाभास दाखवण्यासाठी अंधार आणि प्रकाश या शब्दांचा वापर केला. पण इफिसमधले भाऊबहीण ‘एकेकाळी अंधारात’ होते असं त्याने का म्हटलं, ते आता आपण पाहू या.
४. इफिसमधले लोक कोणत्या अर्थाने खोट्या धर्माच्या अंधारात होते?
४ खोटा धर्म. पौलने इफिसमधल्या ज्या भाऊबहिणींना पत्र लिहिलं होतं, ते सत्य शिकून ख्रिस्ती बनण्याआधी खोट्या धार्मिक विचारांच्या आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले होते. इफिस शहरात अर्तमी देवीचं खूप प्रसिद्ध मंदिर होतं आणि त्या वेळी ते जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक होतं. तिथे उपासना करायला येणारे लोक मूर्तिपूजेत अगदी गढून जायचे. तिथले कारागीर मंदिराची आणि अर्तमी देवीची मूर्ती बनवून खूप पैसा कमवायचे. (प्रे. कार्यं १९:२३-२७) यासोबतच ते शहर जादूटोण्यासाठी प्रसिद्ध होतं.—प्रे. कार्यं १९:१९.
५. इफिसमधले लोक कोणत्या अर्थाने अनैतिकतेच्या अंधारात होते?
५ अनैतिकता. इफिसमधले लोक खूप अनैतिक होते आणि त्यांना त्यांच्या घाणेरड्या वागण्याचं काही वाटत नव्हतं. शहराच्या नाट्यगृहांमध्ये आणि इतकंच काय तर धार्मिक सणांमध्येसुद्धा अश्लील बोलणं सर्रासपणे ऐकू यायचं. (इफिस. ५:३) तिथे राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी “नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा” ओलांडल्या होत्या. याचा ग्रीक भाषेतला शब्दशः अर्थ होतो, “दुखणं न जाणवणं.” (इफिस. ४:१७-१९) योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकण्याआधी त्यांचा विवेक त्यांना बोचत नव्हता किंवा आपल्याला यहोवाला आपल्या कामांचा हिशोब द्यायचाय हेसुद्धा त्यांना जाणवत नव्हतं. त्यामुळे पौलने त्यांच्याबद्दल म्हटलं: “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे आणि देवाकडून मिळणाऱ्या जीवनापासून ते दुरावले आहेत.”
६. इफिसमधले लोक ‘आता प्रकाशात’ आहेत असं पौल का म्हणू शकला?
६ पण इफिसमधले काही लोक अंधारातच राहिले नाहीत. पौलने लिहिलं की ते “आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे . . . प्रकाशात” आहेत. (इफिस. ५:८) ते देवाच्या वचनानुसार जीवन जगू लागले होते. आणि त्यामुळे ते एका अर्थाने प्रकाशात होते. (स्तो. ११९:१०५) इफिसमधल्या या लोकांनी खोट्या धार्मिक रितीरिवाजांप्रमाणे आणि अनैतिकतेने वागायचं सोडून दिलं होतं. ते आता देवाचं “अनुकरण” करणारे बनले होते. तसंच, ते यहोवाला खूश करण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी जमेल ते करत होते.—इफिस. ५:१.
७. आपली परिस्थिती इफिसमधल्या ख्रिश्चनांसारखी कशी आहे?
७ त्याच प्रकारे, आपणसुद्धा सत्य शिकण्याआधी खोट्या धर्माच्या आणि अनैतिकतेच्या अंधारात होतो. आपल्यापैकी काही जण खोटे धार्मिक सण पाळत होते, तर इतर जण अनैतिक जीवन जगत होते. पण योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल असलेले यहोवाचे स्तर शिकून घेतल्यावर आपण स्वतःमध्ये बदल केले. तसंच, यहोवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगू लागलो. आणि याचे आपल्याला बरेच फायदे झाले. (यश. ४८:१७) आज आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. तरी ज्या अंधारातून आपण बाहेर आलोय तिथे आपण पुन्हा जात नाही, तर “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” आपण चालत राहतो. मग आपण हे कसं करू शकतो?
Image digitally reproduced with the permission of the Papyrology Collection, Graduate Library, University of Michigan, P.Mich.inv. 6238. Licensed under CC by 3.0
प्रेषित पौलने इफिसकरांना जो प्रेमळ सल्ला दिला तो आपणसुद्धा लागू करू शकतो (परिच्छेद ७ पाहा)b
अंधकारापासून दूर राहा
८. इफिसकर ५:३-५ प्रमाणे इफिसकरांना काय टाळायचं होतं?
८ इफिसकर ५:३-५ वाचा. अनैतिकतेच्या अंधारापासून दूर राहण्यासाठी इफिसमधल्या ख्रिश्चनांना यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टी सतत टाळायच्या होत्या. म्हणजेच त्यांना फक्त अनैतिक लैंगिक कृत्यंच टाळायची नव्हती, तर अश्लील भाषेपासूनही दूर राहायचं होतं. पौलने त्यांना म्हटलं, की त्यांना जर “ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा” मिळवायचा असेल तर त्यांना यांसारख्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे.
९. अनैतिकतेला प्रवृत्त करणाऱ्या सगळ्याच गोष्टींपासून आपण दूर का राहिलं पाहिजे?
९ आपण “अंधाराच्या निरुपयोगी कामांत” गुंतू नये म्हणून सतत त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे. (इफिस. ५:११) अनुभवावरून नेहमी असं दिसून आलंय की जी व्यक्ती जितक्या जास्त वेळा घाणेरड्या किंवा अनैतिक गोष्टी पाहत राहते, ऐकत राहते किंवा त्याबद्दल बोलत राहते, तितक्याच सहजपणे तिच्याकडून वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते. (उत्प. ३:६; याको. १:१४, १५) एका देशात, बरेच साक्षीदार सोशल मिडियाच्या माध्यमाद्वारे एकमेकांशी गप्पा मारू लागले. सुरुवातीला त्यातले बरेच जण आध्यात्मिक विषयावर बोलू लागले. पण हळूहळू त्यांच्या गप्पांचा दर्जा घसरू लागला. ते जास्तकरून लैंगिक विषयावरच बोलायचे. नंतर त्यातल्या बऱ्याच जणांनी कबूल केलं की अशा अश्लील गप्पांमुळे त्यांच्याकडून अनैतिक लैंगिक कृत्य घडलं.
१०. सैतान आपल्याला फसवण्याचा प्रयत्न कसा करतो? (इफिसकर ५:६)
१० यहोवा ज्याला अनैतिक आणि अशुद्ध म्हणतो त्या गोष्टी खरंतर तशा नाहीच असा विचार करायला सैतानाचं जग आपल्याला भाग पाडतं. आणि असं करून ते आपल्याला फसवतं. (२ पेत्र २:१९) याचं आपल्याला काही आश्चर्य वाटत नाही. कारण लोकांना गोंधळात पाडणं ही सैतानाची खूप जुनी युक्ती आहे. यामुळे योग्य-अयोग्यमधला फरक त्यांना ओळखता येत नाही. (यश. ५:२०; २ करिंथ. ४:४) म्हणूनच बऱ्याच चित्रपटांमध्ये, टिव्ही कार्यक्रमांमध्ये आणि वेबसाईटवर असे विचार मांडले जातात, जे यहोवाच्या स्तरांच्या अगदी विरोधात असतात. अशुद्ध गोष्टी करणं आणि अनैतिक जीवन जगणं हे फक्त योग्यच नाही, तर त्यात मज्जाही आहे आणि त्यात काही धोका नाही, असा विचार करायला लावून सैतान आपल्याला फसवायचा प्रयत्न करतो.—इफिसकर ५:६ वाचा.
११. इफिसकर ५:७ मध्ये दिलेला सल्ला लागू करणं किती गरजेचं आहे हे अँजलाच्या उदाहरणातून कसं समजतं? (चित्रसुद्धा पाहा.)
११ सैतानाची इच्छा आहे की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवावा, ज्यांच्यामुळे आपल्याला यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगणं आणखी कठीण जाईल. म्हणूनच पौलने इफिसकरांना असा सल्ला दिला की जे देवाच्या नजरेत चुकीच्या गोष्टी करतात “त्यांच्यासोबत सहभागी होऊ नका.” (इफिस. ५:७) आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण प्रत्यक्ष ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्यापुरताच हा सल्ला मर्यादित नाही, तर आपण सोशल मिडियावर ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या बाबतीतही हा सल्ला लागू होतो. जुन्या काळच्या इफिसमधल्या लोकांना सोशल मिडियाचा धोका नव्हता, पण आज आपल्याला आहे. सोशल मिडिया वापरण्यात किती धोका आहे हे आशियामध्ये राहणाऱ्या अँजलाa नावाच्या बहिणीच्या लक्षात आलं. ती म्हणते: “हा एक पाश असू शकतो ज्यामुळे आपल्या नकळत आपली विचार करण्याची क्षमता हळूहळू बधिर होऊ शकते. सोशल मिडियाचा वापर करताना एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटू लागलं, की जे लोक बायबल तत्त्वांचा आदर करत नाहीत त्यांच्याशी ‘मैत्री’ करणं काही चुकीचं नाही. नंतर मी असा विचार करू लागले की जीवनात यहोवाच्या तत्त्वांशी थोडीफार तडजोड केली तर काय हरकत आहे? एवढं तर चालतंच.” एक बरं झालं, की वडिलांनी अँजलाला मदत केली आणि त्यामुळे तिला बदल करता आले. ती म्हणते: “आता मी सोशल मिडियाऐवजी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न करते.”
चांगले मित्र निवडल्यामुळे आपल्याला यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागायला सोपं जातं (परिच्छेद ११ पाहा)
१२. यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार चालायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
१२ जगातले लोक असा विचार करतात की अनैतिक जीवन जगण्यात काहीच हरकत नाही. पण आपण अशा विचारांविरुद्ध लढलं पाहिजे. कारण आपल्याला चांगलंच माहीत आहे की हे चुकीचं आहे. (इफिस. ४:१९, २०) असं असलं तरी आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे. जसं की, ‘जर माझ्या शाळा-कॉलेजमधले किंवा कामावरचे सोबती यहोवाच्या नीतिमान स्तरांचा आदर करत नसतील, तर त्यांच्यासोबत विनाकारण वेळ घालवायचं मी टाळतो का? इतर जण माझी टीका करत असले तरी मी ठामपणे यहोवाच्या स्तरांप्रमाणे चालायचा प्रयत्न करतो का?’ मंडळीतसुद्धा मित्र निवडताना २ तीमथ्य २:२०-२२ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काळजीपूर्वक मित्र निवडले पाहिजेत. कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सगळेच लोक आपल्याला यहोवाची विश्वासूपणे सेवा करायला मदत करतीलच असं नाही.
“प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” चाला
१३. “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत” राहायचा काय अर्थ होतो? (इफिसकर ५:७-९)
१३ प्रेषित पौलने इफिसमधल्या ख्रिश्चनांना अंधारात राहायचं टाळा फक्त एवढंच सांगितलं नाही, तर “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा” असंही म्हटलं. (इफिसकर ५:७-९ वाचा.) याचा काय अर्थ होतो? सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर याचा असा अर्थ होतो की आपण नेहमी ख्रिश्चनांप्रमाणे वागलं पाहिजे. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, बायबल आणि त्यावर आधारित प्रकाशनांचं काळजीपूर्वक वाचन करून त्याचा अभ्यास करणं. त्यासोबतच “जगाचा प्रकाश” असणाऱ्या येशूच्या उदाहरणाकडे आणि त्याच्या शिकवणींकडे लक्ष देणंही खासकरून महत्त्वाचं आहे.—योहा. ८:१२; नीति. ६:२३.
१४. पवित्र शक्तीमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?
१४ “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” चालत राहण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र शक्तीचीसुद्धा गरज आहे. का? कारण या अनैतिक जगात नैतिकरित्या शुद्ध राहणं खरंच एक आव्हान आहे. (१ थेस्सलनी. ४:३-५, ७, ८) पण, पवित्र शक्तीमुळे आपल्याला जगाच्या विचारसरणीविरुद्ध लढायला मदत होते. यात देवाच्या विचारसरणीविरुद्ध असलेलं जगातलं तत्त्वज्ञान आणि विचारसरणीसुद्धा सामील आहे. यासोबतच, देवाच्या पवित्र शक्तीमुळे आपल्याला ‘सर्व प्रकारचा चांगुलपणा आणि नीतिमत्त्व’ विकसित करायलाही मदत होऊ शकते.—इफिस. ५:९.
१५. आपल्याला कोणत्या मार्गांनी पवित्र शक्ती मिळू शकते? (इफिसकर ५:१९, २०)
१५ पवित्र शक्ती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यासाठी प्रार्थना करणं. येशूने म्हटलं होतं, की ‘जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो नक्कीच पवित्र शक्ती देतो.’ (लूक ११:१३) आणि सभांमध्ये आपण एकत्र मिळून यहोवाची उपासना करतो तेव्हासुद्धा आपल्याला पवित्र शक्ती मिळते. (इफिसकर ५:१९, २० वाचा.) पवित्र शक्तीमुळे आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतो.
१६. चांगले निर्णय घ्यायला आपल्याला कशामुळे मदत होईल? (इफिसकर ५:१०, १७)
१६ एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी आपण “यहोवाची इच्छा काय आहे” हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. (इफिसकर ५:१०, १७ वाचा.) एखाद्या परिस्थितीबद्दल जेव्हा आपण बायबलचं तत्त्व शोधतो, तेव्हा खरंतर त्या गोष्टीविषयी यहोवा काय विचार करतो हे आपण जाणून घेत असतो. मग जेव्हा आपण बायबलचं तत्त्व लागू करतो तेव्हा आपल्याला चांगले निर्णय घेता येतात.
१७. आपण आपल्या वेळेचा चांगला वापर कसा करू शकतो? (इफिसकर ५:१५, १६) (चित्रसुद्धा पाहा.)
१७ पौलने इफिलमधल्या ख्रिश्चनांना आपल्या वेळेचा चांगला वापर करायलासुद्धा सांगितलं. (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) सैतान खूप ‘दुष्ट’ आहे आणि त्याला आपल्याला या जगातल्या गोष्टींमध्ये इतकं गुंतवून ठेवायचं आहे की आपल्याला यहोवाच्या सेवेसाठी वेळच मिळणार नाही. (१ योहा. ५:१९; तळटीप.) एखादी व्यक्ती भौतिक गोष्टींमध्ये, शिक्षणामध्ये किंवा करिअर करण्यामध्ये इतकी व्यस्त होऊन जाईल, की यहोवाची सेवा करायची संधी गमावून बसेल. आणि जर असं झालं, तर त्या व्यक्तीवर जगाचा प्रभाव आहे असं दिसून येईल. हे खरं आहे की या गोष्टी चुकीच्या नाहीत. पण, आपण या गोष्टींना आपल्या जीवनात कधीच पहिली जागा नाही दिली पाहिजे. ‘प्रकाशाची मुलं’ म्हणून चालण्यासाठी आपण जास्त महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्या “वेळेचा चांगला उपयोग” केला पाहिजे.
इफिसमधल्या ख्रिश्चनांना आपल्या वेळेचा चांगला उपयोग करायचं प्रोत्साहन देण्यात आलं (परिच्छेद १७ पाहा)
१८. आपल्या वेळेचा चांगला वापर करता यावा म्हणून डॉनल्डने काय केलं?
१८ यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करायची संधी आपण शोधत राहिली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या डॉनल्ड नावाच्या भावाने असंच केलं. तो म्हणतो: “मी माझ्या परिस्थितीचा विचार केला आणि मला सेवेत आणखी जास्त करण्यासाठी मदत व्हावी म्हणून मी यहोवाला कळकळून प्रार्थना केली. त्यासोबतच मी त्याला असं एखादं काम मिळवण्यासाठी प्रार्थना केली, ज्यामुळे मला जास्तीत जास्त वेळ प्रचारात घालवता येईल. यहोवाच्या मदतीने मला तसं काम मिळवता आलं. मग मी आणि माझ्या पत्नीने पूर्ण वेळेच्या सेवेचा आमचा प्रवास सोबत मिळून सुरू केला.”
१९. आपण “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” कसं चालत राहू शकतो?
१९ पौलने इफिसकरांना जे पत्र लिहिलं त्यामुळे त्यांना यहोवाला विश्वासू राहायला नक्कीच मदत झाली असेल. आणि यहोवाच्या या सल्ल्याचा आज आपल्यालाही फायदा होतो. आधी चर्चा केल्याप्रमाणे, आपल्याला यामुळे योग्य मनोरंजन आणि मित्र निवडायला मदत होते. त्यासोबतच आपल्याला सत्याच्या प्रकाशात चालत राहायची प्रेरणा मिळते. पण त्यासाठी नियमितपणे बायबल अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच या सल्ल्यामुळे पवित्र शक्तीचं महत्त्वसुद्धा कळतं ज्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये चांगले गुण वाढवता येतात. पौलचा सल्ला लागू केल्यामुळे यहोवाच्या विचारांनुसार असलेले चांगले निर्णय आपल्याला घेता येतील. असं केल्यामुळे आपल्याला या जगाच्या अंधारापासून दूर राहता येईल आणि प्रकाशात चालत राहता येईल!
तुमचं उत्तर काय असेल?
इफिसकर ५:८ मध्ये सांगितलेला ‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ कशाला सूचित करतो?
आपण “अंधारात” राहायचं कसं टाळू शकतो?
आपण “प्रकाशाच्या मुलांप्रमाणे” कसं चालत राहू शकतो?
गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b चित्राचं वर्णन: प्रेषित पौलने इफिसकरांना जे पत्र लिहिलं त्याची ही जुनी प्रत आहे.