मंगळवार, २८ ऑक्टोबर
[यहोवा] तुझं जीवन स्थिर करणारा आहे.—यश. ३३:६.
आपण यहोवाचे विश्वासू सेवक असलो तरीपण, या जगातल्या लोकांप्रमाणेच आपल्यावरही संकट येऊ शकतात. तसंच देवाच्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून आपल्याला छळ आणि विरोध सहन करावा लागू शकतो. यहोवा कदाचित आपल्याला अशा संकटांमधून वाचवणार नाही तरी तो आपल्याला मदत करण्याचं वचन मात्र देतो. (यश. ४१:१०) त्याच्या मदतीने आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थितीतसुद्धा त्याला एकनिष्ठ राहू शकतो. यहोवा आपल्याला एक खास गोष्ट द्यायचं वचन देतो. बायबलमध्ये याला “देवाची शांती” म्हटलंय. (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवासोबतच्या अनमोल नात्यामुळे निर्माण होणारी शांती म्हणजेच देवाची शांती आहे. ही शांती “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” आहे. कारण या शांतीचा अनुभव आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतो. यहोवाला कळकळून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कधी एकदम शांत झाल्यासारखं वाटलंय का? यालाच “देवाची शांती” म्हटलंय. टेहळणी बुरूज२४.०१ २० ¶२; २१ ¶४
बुधवार, २९ ऑक्टोबर
माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर! मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.—स्तो. १०३:१.
यहोवासाठी असलेलं प्रेम विश्वासू लोकांना मनापासून त्याच्या नावाची स्तुती करायला प्रवृत्त करतं. दावीद राजाने असं लिहिलं: “माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर! मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.” (स्तो. १०३:१) दावीदला हे माहीत होतं, की यहोवाच्या नावाची स्तुती करणं म्हणजेच यहोवाची स्तुती करणं. त्यामुळे जेव्हा आपण यहोवाचं नाव ऐकतो, तेव्हा आपण आपोआपच तो कशा प्रकारची व्यक्ती आहे, त्याचे सुंदर गुण कोणते आहेत आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी कोणत्या आहेत यांवर विचार करतो. देवाच्या नावाला आपण पवित्र मानावं आणि त्याची स्तुती करावी अशी दावीदची इच्छा होती. आणि हे सगळं त्याला “अगदी अंतःकरणापासून” करायचं होतं. त्याचप्रमाणे लेवी म्हणून सेवा करणाऱ्या लोकांनीसुद्धा यहोवाची स्तुती करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी नम्रपणे कबूल केलं, की आपण यहोवाच्या नावाची कितीही महिमा आणि स्तुती केली तरी त्याच्या पवित्र नावासाठी ती कमीच आहे. (नहे. ९:५) यात काहीच शंका नाही, की अशा प्रकारे नम्रपणे आणि मनापासून यहोवाची स्तुती केल्यामुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल. टेहळणी बुरूज२४.०२ ९ ¶६
गुरुवार, ३० ऑक्टोबर
आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.—फिलिप्पै. ३:१६.
तुमच्या क्षमतेपलीकडे असलेलं एखादं ध्येय जर तुम्हाला गाठता आलं नाही तर यहोवा तुम्हाला त्यासाठी अपयशी समजणार नाही. (२ करिंथ. ८:१२) एखादं ध्येय गाठता आलं नाही तर निराश होण्यापेक्षा त्या अनुभवातून शिका. तुम्ही आतापर्यंत कोणती ध्येयं पूर्ण केली आहेत ते लक्षात ठेवा. बायबल म्हणतं: ‘तुमचं काम विसरून जायला देव अन्यायी नाही.’ (इब्री ६:१०) त्यामुळे तुम्हीही आधी केलेली कामं विसरू नका. यहोवासोबत मैत्री करणं, त्याच्याबद्दल इतरांना सांगणं किंवा बाप्तिस्मा घेणं यांसारखी कोणती ध्येयं तुम्ही पूर्ण केली आहेत याचा विचार करा. आधी ठेवलेली आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करण्यासाठी जशी तुम्ही प्रगती केली तशीच प्रगती तुम्ही आता ठेवलेल्या ध्येयासाठीही करू शकता. तुम्ही यहोवाच्या मदतीने आपल्या ध्येयांपर्यंत आनंदाने पोहोचू शकता. तुमची ध्येयं पूर्ण करत असताना यहोवा तुम्हाला कशी मदत करत आहे किंवा तुम्हाला कसा आशीर्वाद देत आहे हे अनुभवण्याचा आनंद घ्यायला विसरू नका. (२ करिंथ. ४:७) आणि हार न मानता तुम्ही जर तुमची ध्येयं पूर्ण केली तर यहोवा तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देईल.—गलती. ६:९. टेहळणी बुरूज२३.०५ ३१ ¶१६-१८