नहेम्या
९ सातव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी इस्राएली लोकांनी उपास केला आणि ते गोणपाट घालून व डोक्यावर धूळ टाकून एकत्र जमले.+ २ मग त्यांच्यापैकी मूळच्या इस्राएली लोकांनी स्वतःला विदेश्यांपासून वेगळं केलं.+ त्यांनी उभं राहून आपली आणि आपल्या वाडवडिलांची पापं कबूल केली.+ ३ यानंतर, ते आपापल्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांनी तीन तास* आपला देव यहोवा याच्या नियमशास्त्राचं पुस्तक मोठ्याने वाचलं.+ मग आणखी तीन तास ते आपला देव यहोवा याच्यापुढे नमन करून, आपली पापं कबूल करत राहिले.
४ यानंतर येशूवा, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह,+ बानी आणि कनानी यांनी लेव्यांच्या मंचावर उभं राहून,+ आपला देव यहोवा याला मोठ्याने प्रार्थना केली. ५ मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीया, शबन्याह आणि पथायाह म्हणाले: “उभे राहा आणि तुमचा देव यहोवा याची सदासर्वकाळ* स्तुती करा.+ हे देवा, लोक तुझ्या वैभवी नावाची स्तुती करोत, कारण आम्ही तुझा कितीही महिमा आणि स्तुती केली, तरी ती कमीच आहे.
६ तूच यहोवा आहेस;+ तू आकाश, अगदी सर्वात उंच आकाश आणि त्याची सर्व सेना, पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही, तसंच समुद्र आणि त्यातलं सर्वकाही बनवलंस. तूच त्या सर्वांना जिवंत ठेवतोस आणि आकाशाची सर्व सेना तुला वाकून नमन करते. ७ तू खरा देव यहोवा आहेस. तूच अब्रामला खास्द्यांच्या ऊर देशातून बाहेर आणून+ त्याला अब्राहाम हे नाव दिलंस.+ ८ तो मनापासून तुला विश्वासू होता हे तू पाहिलंस;+ म्हणून, तू त्याला आणि त्याच्या वंशजांना* कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी लोकांचा देश देण्याबद्दल एक करार केलास.+ तू नीतिमान असल्यामुळे आपली वचनं पाळलीस.
९ नंतर, तू इजिप्तमध्ये* आमच्या वाडवडिलांचं दुःख पाहिलंस+ आणि तांबड्या समुद्राजवळ त्यांनी ओरडून केलेली याचना तू ऐकलीस. १० मग तू फारो, त्याचा देश, त्याचे सर्व सेवक आणि त्याच्या देशाचे सर्व लोक यांना शिक्षा देण्यासाठी अनेक चिन्हं व चमत्कार केलेस,+ कारण ते तुझ्या लोकांशी गर्विष्ठपणे वागले+ हे तुला माहीत होतं. तू आपल्या नावाचा गौरव केलास आणि आजही लोकांना तुझं नाव माहीत आहे.+ ११ तू त्यांच्या डोळ्यांसमोर समुद्राचे दोन भाग केले आणि ते लोक समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले;+ खवळलेल्या समुद्रात एखादा दगड फेकावा, तसं तू त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलंस.+ १२ तू त्यांना दिवसा ढगाच्या खांबाने मार्ग दाखवलास, आणि रात्री आगीच्या खांबाने प्रकाश देऊन वाट दाखवलीस.+ १३ मग तू खाली सीनाय पर्वतावर आलास;+ तू त्यांच्याशी स्वर्गातून बोललास+ आणि त्यांना तुझे नीतिमान न्याय-निर्णय, सत्याचे नियम,* चांगले कायदे आणि आज्ञा दिल्यास.+ १४ तू त्यांना तुझ्या पवित्र शब्बाथाबद्दल शिकवलंस+ आणि आपला सेवक मोशे याच्याद्वारे आज्ञा, कायदे आणि एक नियमशास्त्र दिलंस. १५ ते भुकेले होते, तेव्हा तू त्यांना आकाशातून अन्न दिलंस+ आणि त्यांना तहान लागली, तेव्हा तू त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढलंस.+ जो देश त्यांना देण्याची तू शपथ घेतली होतीस,* त्यात जाऊन त्याचा ताबा घ्यायला तू त्यांना सांगितलंस.
१६ पण आमचे वाडवडील गर्विष्ठपणे वागले+ आणि हट्टी बनले*+ आणि त्यांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. १७ त्यांनी तुझं ऐकलं नाही+ आणि तू त्यांच्यासमोर केलेली अद्भुत कार्यं ते विसरून गेले; ते हट्टी बनले* आणि आपल्यासाठी एक पुढारी नेमून ते इजिप्तच्या गुलामगिरीत परत जायला निघाले.+ पण, तू क्षमाशील, करुणामय,* दयाळू व सहनशील* देव आहेस आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला आहेस,+ म्हणून तू आमच्या वाडवडिलांना सोडलं नाहीस.+ १८ त्यांनी आपल्यासाठी धातूपासून एका वासराची मूर्ती* बनवली आणि ते म्हणाले, ‘हे इस्राएल, तुला इजिप्तमधून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.’+ अशा रितीने त्यांनी तुझा खूप अपमान केला. १९ पण तरीसुद्धा, तू त्यांना ओसाड रानात सोडून दिलं नाहीस कारण तू खूप दयाळू आहेस.+ तू दिवसा ढगाच्या खांबाने त्यांना मार्ग दाखवत राहिलास आणि रात्री आगीच्या खांबाने प्रकाश देऊन, तू त्यांना वाट दाखवायचं सोडलं नाहीस.+ २० त्यांनी समजदार व्हावं म्हणून तू त्यांना आपली पवित्र शक्ती* दिलीस.+ तू त्यांना मान्ना खायला द्यायचं सोडलं नाहीस+ आणि त्यांना तहान लागली, तेव्हा तू त्यांना पाणी दिलंस.+ २१ ओसाड रानात ४० वर्षं तू त्यांना अन्न दिलंस.+ त्यांना काहीही कमी पडलं नाही. त्यांचे कपडे जुने झाले नाहीत+ आणि त्यांचे पायही कधी सुजले नाहीत.
२२ तू राष्ट्रांना आणि देशांना त्यांच्या हाती दिलंस आणि त्यांची जमीन त्यांना वाटून दिलीस.+ त्यांनी सीहोनचा,+ म्हणजे हेशबोनच्या राजाचा देश+ ताब्यात घेतला. तसंच, ओगचा, म्हणजेच बाशानच्या राजाचा देशही त्यांनी ताब्यात घेतला.+ २३ तू त्यांच्या मुलांना आकाशातल्या ताऱ्यांसारखं अगणित केलंस.+ तू त्यांच्या वाडवडिलांना जो देश देण्याचं वचन दिलं होतंस, त्या देशात तू त्यांना आणलंस.+ २४ तेव्हा, त्यांच्या मुलांनी जाऊन त्या देशाचा ताबा घेतला.+ तू त्या देशात राहणाऱ्या कनानी लोकांना हरवलंस+ आणि त्यांच्या हाती दिलंस; त्यांनी त्या देशाच्या राजांसोबत आणि लोकांसोबत वाटेल तसं करावं, म्हणून तू त्यांना त्यांच्या हाती दिलंस. २५ त्यांनी सभोवती भिंती असलेली शहरं+ आणि सुपीक जमिनीचा देश+ काबीज केला. तसंच, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींनी भरलेली घरं, आधीच खोदलेली पाण्याची कुंडे, द्राक्षमळे, जैतुनाच्या बागा+ आणि पुष्कळ फळझाडं यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त आणि धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अपार चांगुलपणामुळे ते सुखाने राहू लागले.
२६ पण, त्यांनी तुझ्या आज्ञा मोडून तुझ्याविरुद्ध बंड केलं+ आणि तुझ्या नियमशास्त्राकडे त्यांनी पाठ फिरवली.* त्यांनी तुझ्याकडे परत यावं, म्हणून त्यांना ताकीद देणाऱ्या तुझ्या संदेष्ट्यांना त्यांनी मारून टाकलं आणि त्यांनी तुझा खूप अपमान केला.+ २७ यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिलंस+ आणि ते त्यांच्यावर अत्याचार करत राहिले.+ पण त्यांच्या संकटांच्या काळात जेव्हा ते रडून तुझ्याकडे याचना करायचे, तेव्हा तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकायचास. तू खूप दयाळू असल्यामुळे, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू तारणकर्ते दिलेस.+
२८ पण त्यांची सुटका होताच, ते पुन्हा तुझ्या नजरेत वाईट असलेल्या गोष्टी करू लागायचे.+ मग तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती द्यायचास आणि ते त्यांच्यावर अधिकार गाजवायचे.*+ मग ते पुन्हा तुझ्याकडे परत येऊन मदतीची याचना करायचे+ आणि तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकायचास; तू खूप दयाळू असल्यामुळे वारंवार त्यांची सुटका करायचास.+ २९ त्यांनी परत फिरून तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे वागावं म्हणून तू त्यांना ताकीद द्यायचास. पण, ते गर्विष्ठपणे वागले आणि तुझ्या आज्ञा पाळायला त्यांनी नकार दिला.+ तुझे कायदे पाळल्यामुळे माणसांना जीवन मिळतं.+ पण, आमच्या वाडवडिलांनी तुझे कायदे मोडून पाप केलं. त्यांनी हट्टीपणे तुझ्याकडे पाठ फिरवून तुझ्याविरुद्ध बंड केलं* आणि त्यांनी तुझं ऐकलं नाही. ३० तू अनेक वर्षं त्यांच्याशी सहनशीलपणे वागलास.+ तुझ्या पवित्र शक्तीद्वारे तू आपल्या संदेष्ट्यांकडून त्यांना ताकीद देत राहिलास, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी, तू त्यांना इतर राष्ट्रांच्या हाती दिलंस.+ ३१ तू खूप दयाळू असल्यामुळे तू त्यांचा पूर्णपणे नाश केला नाहीस+ किंवा त्यांना सोडून दिलं नाहीस, कारण तू करुणामय* आणि दयाळू देव आहेस.+
३२ हे आमच्या महान, शक्तिशाली आणि विस्मयकारक देवा, तू नेहमी तुझा करार पाळून एकनिष्ठ प्रेम दाखवलं आहेस.+ म्हणून आमच्यावर, तसंच आमच्या राजांवर, अधिकाऱ्यांवर,+ याजकांवर,+ संदेष्ट्यांवर,+ वाडवडिलांवर आणि अश्शूरच्या राजांच्या दिवसांपासून+ आजपर्यंत तुझ्या लोकांवर जी सर्व संकटं आली, त्यांकडे तू आता दुर्लक्ष करू नकोस. ३३ आमच्यासोबत जे काही घडलं त्याला आम्हीच जबाबदार होतो, तू आमच्यावर कोणताच अन्याय केला नाहीस. कारण, तू विश्वासूपणे वागलास. खरंतर, आम्हीच दुष्टपणे वागलो.+ ३४ आमचे राजे, अधिकारी, याजक, आणि आमचे वाडवडील तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे वागले नाहीत; तू त्यांना ज्या आज्ञा आणि स्मरण-सूचना देऊन ताकीद दिलीस, त्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. ३५ जेव्हा ते स्वतःच्या राज्यात, म्हणजे तू त्यांना दिलेल्या मोठ्या आणि सुपीक देशात राहत होते आणि तू दाखवलेल्या अपार चांगुलपणाचा आनंद घेत होते, तेव्हाही त्यांनी तुझी उपासना केली नाही+ आणि ते आपल्या वाईट कामांपासून मागे वळले नाहीत. ३६ म्हणूनच, आज आम्ही गुलाम झालो आहोत.+ ज्या देशाचं उत्पन्न आणि ज्या देशातल्या चांगल्या गोष्टी खाण्यासाठी, तो देश तू आमच्या वाडवडिलांना दिला, त्याच देशात आज आम्ही गुलाम झालो आहोत. ३७ तू आम्हाला आमच्या पापांमुळे ज्या राजांच्या हाती दिलं आहेस, त्यांना आज या देशाचं भरपूर पीक मिळत आहे.+ ते आमच्यावर* आणि आमच्या गुराढोरांवर त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे अधिकार गाजवतात आणि यामुळे आम्ही फार दुःखात आहोत.
३८ या सर्व कारणांमुळेच आज आम्ही लेखी स्वरूपात एक पक्का करार करत आहोत+ आणि आमचे अधिकारी, लेवी आणि याजक त्यावर आपली मोहर लावत आहेत.”+