योहान
१४ “तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. २ माझ्या पित्याच्या घरात राहायला पुष्कळ जागा आहेत; नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. ३ तसंच, तुमच्यासाठी जागा तयार केल्यावर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्यासोबत घरी घेऊन जाईन, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावं. ४ आणि जिथे मी जात आहे तिथे जाण्याचा मार्ग तुम्हाला माहीत आहे.”
५ तेव्हा थोमा त्याला म्हणाला: “प्रभू, तू कुठे जात आहेस ते आम्हाला माहीत नाही. मग, आम्हाला मार्ग कसा माहीत असेल?”
६ येशू त्याला म्हणाला: “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही. ७ तुम्ही मला ओळखलं असतं, तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं; पण, या क्षणापासून तुम्ही त्याला ओळखाल, खरंतर तुम्ही त्याला पाहिलं आहे.”
८ फिलिप्प त्याला म्हणाला: “प्रभू, आम्हाला पिता दाखव; आमच्यासाठी इतकंच पुरेसं आहे.”
९ येशू त्याला म्हणाला: “फिलिप्प, मी इतक्या काळापासून तुमच्यासोबत आहे, तरी तू मला ओळखलं नाहीस? ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे. मग, ‘आम्हाला पिता दाखव,’ असं तू कसं म्हणतोस? १० मी पित्यासोबत ऐक्यात आहे आणि पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे, यावर तुझा विश्वास नाही का? मी ज्या गोष्टी बोलतो त्या स्वतःच्या मनाने बोलत नाही, तर माझ्यासोबत ऐक्यात राहणारा पिता माझ्याद्वारे त्याची कार्यं करत आहे. ११ मी पित्यासोबत ऐक्यात आहे आणि पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे, असं जे मी म्हटलं त्यावर विश्वास ठेवा; नाहीतर, मी केलेल्या कार्यांमुळे विश्वास ठेवा. १२ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मी करत असलेली कार्यंदेखील करेल; आणि यांहूनही मोठी कार्यं करेल, कारण मी पित्याकडे जात आहे. १३ तसंच, माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करेन, यासाठी की पुत्राद्वारे पित्याचा गौरव व्हावा. १४ जर तुम्ही माझ्या नावाने काही विनंती केली, तर मी ती पूर्ण करेन.
१५ तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. १६ आणि मी पित्याला विनंती करेन आणि तो सर्वकाळ तुमच्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला आणखी एक सहायक* देईल, १७ अर्थात, सत्याचा आत्मा, जो जगाला मिळू शकत नाही, कारण जग त्याला पाहू शकत नाही आणि त्याला ओळखतही नाही. पण, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्यासोबत राहतो आणि तुमच्यामध्ये आहे. १८ मी तुम्हाला एकटं* सोडणार नाही. तर मी परत तुमच्याकडे येत आहे. १९ आता थोडाच वेळ आहे; मग जग मला पुन्हा कधी पाहणार नाही. पण, तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे आणि त्यामुळे तुम्हीही जिवंत व्हाल. २० त्या दिवशी तुम्हाला समजेल, की मी माझ्या पित्यासोबत ऐक्यात आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आणि मी तुमच्यासोबत ऐक्यात आहे. २१ जो कोणी माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यावर माझा पिता प्रेम करेल आणि मीही प्रेम करेन; मी स्वतःला त्याच्यासमोर स्पष्टपणे प्रकट करेन.”
२२ यहूदा, जो इस्कर्योत नाही, तो त्याला म्हणाला: “प्रभू, असं काय घडलं की ज्यामुळे तू आमच्यासमोर स्वतःला स्पष्टपणे प्रकट करशील, पण जगासमोर करणार नाही?”
२३ येशूने त्याला उत्तर दिले: “जो कोणी माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्या शिकवणींचं पालन करतो, आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्यासोबत राहू. २४ ज्याचं माझ्यावर प्रेम नाही, तो मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत नाही. तुम्ही माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या त्या माझ्या नाहीत, तर ज्याने मला पाठवलं त्या पित्याकडून आहेत.
२५ मी तुमच्यासोबत असताना या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. २६ पण, पिता माझ्या नावाने ज्याला पाठवेल तो सहायक, अर्थात पवित्र आत्मा* तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची तुम्हाला आठवण करून देईल. २७ मी तुम्हाला शांती देऊन जातो. मी माझी शांती तुम्हाला देतो; पण, जग देतं त्याप्रमाणे नाही. तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भीतीने खचू देऊ नका. २८ ‘मी जात आहे आणि तुमच्याकडे परत येत आहे,’ असं जे मी तुम्हाला म्हटलं ते तुम्ही ऐकलं. तुमचं माझ्यावर प्रेम असतं, तर मी पित्याकडे जात आहे याबद्दल तुम्हाला आनंद झाला असता, कारण पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. २९ हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते घडण्याआधीच मी तुम्हाला सांगितलं आहे. ३० आता मी तुमच्यासोबत फार काही बोलणार नाही, कारण या जगाचा अधिकारी येत आहे, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही.* ३१ तरीसुद्धा, माझं पित्यावर प्रेम आहे, हे जगाला कळावं म्हणून पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करत आहे. उठा, आता निघू या.